-
वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता « मागील भाग
यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पोटामागे विस्थापित झालेल्या, विखंडित झालेल्या टोळ्या विखुरल्या. विविध भूभागांवर पसरलेल्या या गटांचा वारसा समान होता, कर्मकांडांत साम्य होते. पुढे धर्मसंस्थांनी अमूर्त अशा नीतिकल्पनांच्या आधारे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या गटांनाही बांधिलकीचा वसा देऊन नवी टोळी बांधली. पुढे धर्माने राजकीय व्यवस्थांना ताब्यात घेण्यासाठी स्वत:ची सैन्ये उभारली, काही वेळा आपले धर्मदूत पाठवून टोळीत नसलेल्यांना टोळीत सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला नि त्यायोगे बहुसंख्या प्रस्थापित करुन राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. धर्माधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्ती, ज्यू नि मुस्लिम सत्तालोलुपांच्या रक्तरंजित संघर्षाने - ज्यांना ‘क्रूसेड्स’ (crusades) असे म्हटले जाते - इतिहासाचे एक पर्व लालभडक झालेले आहे. अगदी मोजक्याच उदाहरणांमध्ये उलट दिशेने एका धर्माचे वा एकाच वर्तन-विचाराचे लोक एकत्र येत त्यांनी एका भूभागावर सहजीवनाची मेढ रोवली आहे.
आमीश समाज‘विनम्रता, कुटुंब नि समाज’ या त्रिसूत्रीच्या आधारे बांधलेला अमेरिकेतील ‘आमीश समाज’ हा समूहजीवनाचे अर्वाचीन उदाहरण आहे. सोळाव्या शतकात हा समाज स्वित्झर्लंड/अल्सेस (फ्रान्स/जर्मन) परिसरात उगम पावला असला, तरी पुढे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पेनसिल्वानिया भागात स्थायिक झाला. हा समाज ख्रिस्ती धर्माने बांधला गेलेला आहे. हे सारे ‘अॅनाबॅप्टिस्ट’ म्हणजे सज्ञान झाल्यावर स्वयंनिर्णयाने बाप्तिस्मा घेणार्या पंथाचे लोक आहेत.
शक्य तितक्या गरजा आपल्या आपण भागवण्याकडे यांचा कल असतो. आहार नि पेहराव यांत आवश्यक गोष्टींचे उत्पादन शक्यतो वैय्यक्तिक– अन्यथा समूहाच्या पातळीवर करण्याकडे यांचा कल असतो. दही, लोणी, तूप, ब्रेड याबाबत बहुतेक घरे स्वयंपूर्ण असतात. सुरुवातीला शेतीजीवी नि स्वयंपूर्ण असण्याकडे कटाक्ष असल्याने कुटुंब मोठे असते, जेणेकरुन शेताची सारी कामे करण्यास मनुष्यबळ घरातच उपलब्ध व्हावे. पुढे काही मोजक्या अर्वाचीन व्यवसायांतही शिरला.
साधी राहाणी हे यांचे वैशिष्ट्य. हे कोणत्याही नक्षीकामाशिवाय एकरंगी असे कपडे परिधान करतात. हे यांत्रिक वाहनांचा वापर न करता घोड्यांची बग्गी वापरतात. यांच्या घरात विजेचा वापर केला जात नाही. यंत्राचा कमीत कमी वापर करुन जगण्याचा यांचा प्रयत्न असतो. निसर्गाच्या संदर्भात विचार करता यांची जीवनशैली अत्यंत किमान विध्वंसक असते असे म्हणता येईल.
सामाजिक एकता त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. आपल्या समाजात चाळ वा वाडा संस्कृतीमध्ये विशेषत्वाने असलेली ‘अंगत-पंगत’ म्हणजे potluck हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. एखाद्या घरच्या कार्यक्रमासाठी समाजातील सर्वजण एकत्र येऊन कामाचा भार उचलत असतात. समाजाचे अहित करणार्यावर बहिष्काराचे म्हणजे ‘वाळीत टाकण्याचे’ अस्त्र यांच्या अजूनही वापरले जाते. त्याचबरोबर हा समाज बाह्य समाजाहून जास्तीत-जास्त दूर राहातो. त्यांच्यावर अवलंबून नसावे यावर यांचा कटाक्ष असतो.
आजच्या जगात कदाचित सर्वाधिक निसर्गस्नेही असा हा समाज असला, तरी तंत्रज्ञानाला असलेला अतिरेकी विरोध यांना प्रगतीच्या वाटेवर बाह्य जगाहून बराच मागे ठेवतो आहे. बाह्य समाजाशी किमान संबंध ठेवण्याच्या दुराग्रहामुळे झालेले विलगवस्तीकरण (ghettoization) आणि धर्माधिष्ठितच नव्हे तर प्रांत/भाषाधिष्ठित एकारलेपण हा दोषही त्यात आहे. मूलत: स्विस/जर्मन वंशाचे हे लोक आपल्या समाजबाह्य जनतेला सरसकट ‘the English' असे लेबल चिकटवून मोकळे होत आहेत. युरपमधून येताना हा इंग्लिश-द्वेष ते सोबत घेऊन आले आहेत. ‘जे त्याज्य ते English (किंवा उलटही)’ असा काहीसा सूर त्यांच्या वर्तनात दिसतो.
किबुत्झ: ज्यू सहजीवनकदाचित या आमीश मंडळींच्या प्रेरणेने असेल— पण ज्यू धर्मीयांनीही असाच शेतीजीवी समूहजीवनाचा प्रयोग राबवलेला आहे. इस्रायलच्या निर्मितीकाळामध्ये विविध देशांतून पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होणार्या ज्यूंनी ‘किबुत्झ’ (Kibbutz) म्हणजे ‘समूह-वसती’चा अंगीकार केला. हे ज्यू विविध देशांतून आलेले, विविध भाषा बोलणारे होते, त्यांचे आहार-पेहराव भिन्न होते. यामुळे त्यांच्यात परस्परांप्रती असलेली परकेपणाची भावना कमी करुन ‘ज्यू सारा एक’ ही भावना रुजवण्याचा हा प्रयत्न होता. ‘एकाच धर्माच्या लोकांनी निर्माण केलेली समाजवादी व्यवस्था’ हिचं वर्णन केलं जातं. इस्रायलच्या निर्मितीचा पाया घालण्यात या ‘किबुत्झ’चा मोठा वाटा होता.
पहिल्या महायुद्धानंतर पॅलेस्टाईनवर सत्ता असलेले ऑटोमन साम्राज्य खिळखिळे होत होते. याच काळात ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ या न्यायाने ब्रिटन-फ्रान्स युतीने ‘बाल्फोर जाहिरनामा’ नामक चिठोर्यावर पॅलेस्टाईनचे उदक ज्यूंच्या हातावर सोडले. परंतु तिथे आपले बस्तान बसवण्यासाठी तेथील अरबांशी त्यांचा संघर्ष होणे अपरिहार्य होते. मुस्लिम धर्मीय अरब हे विविध टोळ्यांमध्ये विभागलेले होते, तर ज्यू हे एकधर्मीय म्हणून त्यांच्याशी संघर्ष करत होते. या एकसंघतेमागे किबुत्झमुळे निर्माण झालेल्या बांधिलकी नि सामूहिक ओळखीचा मोठा हातभार होता.
पण धनको– विशेषत: युरपिय– ज्यूंनी त्यापासून दूर राहाणे पसंत केल्याने त्यात नकळत वर्गव्यवस्था निर्माण झाली. इस्रायलच्या निर्मितीनंतर सुरुवातीच्या काळात असलेली समाजवादी विचारांची राजकीय सद्दी यथावकाश घटत गेली नि इस्रायल माथेफिरू राष्ट्रवादाच्या (Zionism) आहारी गेला (याबद्दल काही तपशील ‘बेगिन, बुश, बालाकोट आणि अंधारातील अधेली’ या लेखात वाचायला मिळतील.) आणि समूहजीवनाचे महत्त्व लयाला जाऊन त्याची जागा अस्मितेच्या अहंकारी राजकारणाने घेतली.
नवनिर्मित इस्रायल या ज्यूधर्मीय राष्ट्राने भांडवलशाहीचे मशालधारी आणि म्हणून समाजवादाचे कट्टर विरोधक असलेल्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाशी आर्थिक-राजकीय संधान बांधले. परिणामी इस्रायलमधील समाजवादी विचारसरणीलाही ओहोटी लागली. तेथील निसर्गजीवी ज्यूंना अमेरिकनांप्रमाणे बंदूकजीवी राहाणे अधिक रुचू लागले. बर्याच किबुत्झ वस्त्या शेती सोडून औद्योगिकतेकडे वळल्या, काहींचे खासगीकरणही झाले. या संकल्पनेतील प्रगतीची ऊर्जा मर्यादित यशामध्येच संपून गेली.
शत्रूलक्ष्यी सहजीवनवास्तविक सहजीवन या शब्दामध्ये बांधिलकी अनुस्यूत आहे. परंतु टोळीजीवनामध्ये टोळीचे अस्तित्व जसे बांधिलकीमुळे, सहकाराचा फायदा घेण्यासाठी असे, त्याचप्रमाणे जीवसृष्टीतील इतर शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी ‘एकीचे बळ’ म्हणूनही आवश्यक ठरत असे. एकता ही जगण्यासाठी होती तसेच जिवंत राहण्यासाठीही.
टोळीजीवनाच्या नि धर्मसंस्थांच्या काळाची तुलना करता धर्मसंस्था या तुलनेने अधिक नागर, अधिक सुस्थिर समाजामध्ये रुजल्या होत्या. अन्नासाठी नि जुगण्याच्या हक्कांसाठी होणार्या संघर्षाचे प्रमाण कमी झाले होते. लढाया, शत्रूशी संघर्षही तुलनेने कमी होते. जे संघर्ष उरले होते ते प्रामुख्याने राजकीय सत्तेशी संबंधित होते.
मनुष्यप्राण्यांमध्ये फूट पाडून त्यातील एकेका गटाला आपल्या भौतिक-पारलौकिक काल्पनिक संरचना देऊन धर्मसंस्थांनी आपापल्या टोळ्या बांधल्या नि अन्य टोळ्यांविरोधात त्यांचा वापर सुरू केला. ज्या टोळ्यांशी अन्न वा भूमीचा संघर्ष नाही अशा टोळ्यांविरोधातही धर्मसंस्थांनी आपापल्या टोळ्यांमध्ये नव्या द्वेषाची बीजे रोवली. एखाद्या धर्माच्या केवळ नीतिनियमांचे अनुसरण करणे पुरेसे ठरत नव्हते. त्या टोळीच्या हितासाठी अन्य धर्मीय टोळीवर कुरघोडी करणे, तिचे खच्चीकरण करणे प्रत्येक सदस्याच्या मनात रुजलेले असते.
प्राचीन काळात अन्य टोळ्या आपली भूमी, आपले अन्न, आपल्या स्त्रिया हिरावून नेतील या भीतीने प्रतिबंधात्मक (preemptive) हल्ले करुन त्या संभाव्य धोक्याला निर्माण होण्यापूर्वीच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जाई. धर्मसंस्था या तीनपैकी कोणत्याही मूलभूत गरजा भागवत नाहीत. तरीही त्यांनी उभ्या केलेल्या अमूर्त संकल्पनांच्या रक्षणासाठी, त्यांच्या आधारे उभ्या असलेल्या टोळ्यांमध्ये द्वेषाची रुजवणूक करत होत्या. शेतीप्रधान, सुस्थिर नागर आयुष्यातही माणसाला युयुत्सु राहण्यास भाग पाडत होत्या.
यातून भूतलावरील दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमध्ये आजही परस्परांबद्दलचा अविश्वास रुजलेला दिसतो. मग नागरी, महानगरी आयुष्यामध्ये माणसे शक्यतो आपल्या धर्मीयांच्या वसतीमध्ये राहाणे पसंत करू लागली. अन्य धर्मीयास तिथे घर मिळू नये असा आग्रह घरमालकांना केला जाऊ लागला. द्वेषाचे पलिते इतके बेभान झाले की वरकरणी बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक समाजामध्ये विविध धर्मांचे, जातीचे, वंशाचे, स्थलांतरितांच्या विलग-वसत्या (ghetto) तयार होऊ लागल्या.
द. आफ्रिका या ८०% आफ्रिकन वंशीयांच्या राष्ट्रामध्ये केवळ गोर्या वंशीयांचे ‘ओरेनिया’ नावाचे एक शहर आजही उभे आहे. राष्ट्राचे नियम, कायदे झुगारून आपले अर्थकारण, आपली न्यायव्यवस्था इतकेच काय आपले चलनही वापरत आहे. आफ्रिकान्स ही डच भाषेपासून उगम पावलेली, आफ्रिकेत सर्वप्रथम स्थायिक झालेल्या युरपिय लोकांमध्ये विकसित झालेली भाषा बोलणारे, युरपिय वंशाचे, ख्रिश्चनच फक्त इथे राहू शकतात. यांना ‘आफ्रिकानर’ असे म्हटले जाते. विशेष म्हणजे हे अगदी अलिकडे, म्हणजे मागील शतकाच्या अखेरच्या दशकामध्ये वसवण्यात आले आहे. इतका उद्दाम विरोधाभास घेऊन उभे असलेले शत्रूलक्ष्यी सहजीवनाचे दुसरे उदाहरण नसावे.
या ओरेनियामध्ये धर्मासोबतच वंश नि भाषा या आणखी दोन निकषांवरही टोळीची मदार आहे. जगभरामध्ये वांशिक भेदभावाचा सर्वात मोठा फटका आफ्रिकन वंशीयांनाच बसलेला आहे आणि तो देण्यात गोर्या कातडीचे युरपिय आघाडीवर आहेत हे ओघाने आलेच. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अधिक वंशवादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिणी संस्थानांध्ये ‘सनडाउन टाउन’(sundown town) अशी संकल्पना १९६८ पर्यंत अधिकृतपणे नि अनधिकृतपणे अजूनही चालू आहे. ही गावे केवळ गोर्या, युरपिय वंशाच्या अमेरिकन्सची वसतीस्थाने असतात. इतरांना– विशेषत: आफ्रिकन वंशाच्या लोकांना– सूर्यास्तानंतर तिथे थांबण्यास मनाई होती वा असते. अंधाराची उपजत भीती नि परक्या टोळीच्या माणसाची भीती एकत्रितरित्या असे रूप घेत असते.
पांढर्या कातडीचा अहंकार बाळगणार्या युरपिय लोकांचा आफ्रिकन, आशियाई इतकेच काय लॅटिन-अमेरिकन वंशाच्या व्यक्तिंप्रती केला जाणारा भेदभाव इतका उघडानागडा नि बेशरम पातळीवर होता, की ऑस्ट्रेलियामध्ये स्वत: आगंतुक असलेल्या या युरपिय मंडळींनी केवळ गोर्या युरपिय मंडळींनाच स्थायिक होता येईल असा नियम केला होता. हा नियम अगदी १९७३ पर्यंत अंमलात होता.
काही वर्षांपूर्वी PBS या अव्यावसायिक स्वतंत्र संस्थेने प्रसारित केलेल्या एका माहितीपटात पाहाण्यात आले होते की (‘हॉलिवूड’ साठी प्रसिद्ध असलेल्या) लॉस एंजेलिस या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील प्रमुख शहराच्या उपनगरांतील सामान्यांच्या वसत्यांचे सरळ तीन विभाग होते. गोर्या वर्णाचे पाश्चात्त्य, आफ्रिकन वंशाचे नि लॅटिन-अमेरिकन वंशांचे लोक आपापल्या विलग-वसत्या (ghetto) करुन राहात. यांतून त्या त्या भागामध्ये तयार झालेल्या गँग्समध्ये हा एक जास्तीचा द्वेषाचा मुद्दा रुजलेला होता. त्यामुळे यापैकी एका वंशाची व्यक्ती चुकून अन्य वंशीयांच्या भागात गेली, तर तिचा मुडदाच तिथून बाहेर येई. (ही मागील शतकाच्या अखेरच्या दोन-तीन दशकांतील माहिती आहे. आज परिस्थिती कशी आहे ठाऊक नाही.)
याचा पुढचा टप्पा म्हणजे सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या विविध भूभागांवरील राजकीय सत्ताच हस्तगत करण्यासाठी केलेल्या ‘क्रूसेड्स’. यामध्ये एकाच अब्राहमला मूळ पुरुष मानणार्या तीन धर्मांनी अधिकाधिक भूभाग ताब्यात घेऊन त्यावरील साधनसंपत्तीवर एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या लढाया व्यापक होत्या नि दीर्घकाळ चालल्या. विसाव्या शतकापूर्वी मानवी इतिहासातील सर्वात मोठा संहार यांनीच घडवून आणला. विसाव्या शतकामध्ये लोकशाहीच्या उदयानंतर धर्मसंस्थांची राजकीय सत्तेवरील पकड ढिली झाली नि हा हिंसाचार कमी झाला. काही ठिकाणी तो दोन देशांतील संघर्षामध्ये रूपांतरित झाला अथवा हेतुत: केला गेला.
धर्मसंस्थांनी ‘बळी तो कान पिळी’ या मोकाट तत्त्वावर जगणार्या मानवी टोळ्यांना नीतिनियमांचा अंकुश देऊन त्यांना समाज म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनीच व्यापक टोळीसंघर्षाचे नवे कारणही निर्माण केले हे ही तितकेच खरे.
- (क्रमश:) -
पुढील भाग » सर्वे सुखिन: सन्तु
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ८ : धर्म आणि सहजीवन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा