-
अद्यतनीकरण (Update) « मागील भाग
कुठलेही तत्त्वज्ञान, विचार माणसाला आकर्षक वाटला नि ‘आपण तो स्वीकारला आहे’ असा दावा त्याने केला, तरी त्याच्याकडून तो पूर्णांशाने आत्मसात होतोच असे नाही. त्याच्या वास्तविक, व्यावहारिक जीवनातील काही प्रिय, काही अंगवळणी पडलेल्या, काही आवश्यक गोष्टींचा त्याच्याशी संघर्ष होऊ लागला, की त्याची मनस्थिती द्विधा होते. ‘याच्यासाठी ते सोडवत नाही, की त्याच्यासाठी हे’ अशी संभ्रमित अवस्था होऊन बसते. मग यातून Best of Both असा पर्याय (वा पळवाट) काढण्याची खटपट सुरू होते.
आपद्धर्माचा महामार्गमला ओशोंनी सांगितलेली, बुद्धाशी संबंधित कथा आठवते आहे(१). बुद्धांनी अहिंसेचा संदेश प्रसृत केल्यानंतर त्याने प्रभावित झालेले अनेक जण त्यांचे अनुयायी झाले. परंतु यात अनेक क्षत्रिय होते. मांसाहार हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग होता. त्यात अचानक बदल झाल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. अति-उत्तरेकडील हिमाच्छादित भागात राहाणार्यांना शाकाहारापेक्षा मांसाहार अधिक सहजपणे उपलब्ध होत असे. या नि अशा कारणांनी जेरीस आलेली काही मंडळी बुद्धांकडे गेली, त्यांना आपली अडचण सांगितली.
बुद्धांनी त्यावर विचार केला नि म्हणाले, ‘हत्या करणे पाप आहे हे तर खरे. पण जर तो जीव आधीच नैसर्गिकरित्या मृत झालेला असेल, तर हत्येचा दोष तुमचा नव्हे. तेव्हा अशा प्राण्याचे मांस खाल्ले तरी चालू शकेल.’(२) (‘अपने आप मरे हुए प्राणियों का मांस खाना वर्जित नही है।’) ओशो सांगतात, “यथावकाश असे घडले की या मांसाहारप्रेमींच्या सोयीसाठी जागोजागी ‘यहाँ अपने आप मरे हुए प्राणियों का मांस मिलेगा’ चे बोर्ड दिसू लागले.” बुद्धांनी आपद्धर्म म्हणून दिलेली ही सवलत मूळ तत्त्वाला मुरड घालण्याचा महामार्गच होऊन बसला.
आपद्धर्माच्या नावाखाली ‘कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये’ या नियमांतून अशी पळवाट न काढता, अशा समाजातील आहाराची समस्या कशी सोडवावी हा लाखमोलाचा प्रश्न आहे. तो कसा सोडवला जातो, यावर ती समाजव्यवस्था टिकून राहाण्याची शक्यता नि संभाव्यता अवलंबून असतात. ‘या प्रश्नाचे काही वेगळे उत्तर मिळते का?’ हे पाहाण्यास मी उत्सुक होतो. पण Pluribus मधील व्यवस्थेनेही ‘अपने आप मरे हुए प्राणियों का...’ ही पळवाटच वापरली आहे.
Vegetarian food not available.जे जीव आधीच मृत झाले आहेत त्यांपैकी ज्यांचे मृत होण्याचे कारण जर जीवाणू, विषाणू, विषजन्य असेल, त्यांचे मांस खाण्यास निरुपयोगी असणार, ते सोडून द्यावे लागणार. हे झाले प्राण्यांचे, त्यांच्या मृत्यूनंतर काही मिनिटे तरी त्यांचे मांस खाण्यायोग्य राहाते. पण वनस्पतींच्या बाबत तर त्यांचा नैसर्गिक मृत्यू म्हणजेच त्यांच्या शरीराच्या उपयुक्ततेचा शेवटही असणार. वारा, पाऊस आदी नैसर्गिक आघाताने तुटून जमिनीवर पडलेली पाने, फुले, फळे, त्यांतील बिया यांचे सेवन या व्यवस्थेमध्ये त्याज्य नाही. परंतु अशा प्रकारे हाती लागणार्या अन्नाचे प्रमाण अतिशय नगण्य नि बिनभरवशाचेच राहाणार. थोडक्यात शाकाहाराला या व्यवस्थेत नगण्य स्थान आहे.
अर्वाचीन महानगरी, रिटेल स्टोअर्सच्या जगात डबाबंद अथवा पूर्व-प्रक्रिया केलेल्या अन्न उपलब्ध असते. ‘प्लरिबस’मध्ये त्या जागतिक बदलापूर्वी तयार झालेल्या अशा अन्नाचा साठाही शिल्लक असणारच. ‘त्यात वापरलेले जैविक घटक मिळवण्यासाठी झालेली सजीव-हत्या ही नवी व्यवस्था अस्तित्वात येण्यापूर्वी झालेली आहे. ‘अपने आप मरे हुए प्राणी’च्या धर्तीवर त्याचा आता नव्याने दोष मानण्याची गरज नाही’ असे गृहित धरले, तर त्याचे सेवन त्याज्य ठरवण्याची आवश्यकता राहात नाही. जोवर हे अपघातपूर्व काळात तयार केलेले शिल्लक आहे, तोवर ‘हवे ते खाद्य’ मिळू शकते(३). परंतु ही उपलब्धता मर्यादित काळापर्यंतच असणार आहे.
याहून अधिक अक्राळविक्राळ प्रश्न निर्माण होतो, तो हा की ‘समस्त पृथ्वीवरील मनुष्यप्राण्यांचे पालनपोषण होईल इतके ‘अपने आप मरे हुए’ प्राणी कुठून मिळणार? नि त्यांचा नियमित पुरवठा कसा होत राहाणार?’ पण त्या व्यवस्थेच्या निर्मितीक्षणात या प्रश्नाचे उत्तरही दिले गेलेले आहे.
क्रांतिचे बळीसुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे Pluribus च्या या नव्या समूह-मन अवस्थेची प्रतिष्ठापना एका जगद्व्यापी अपघातातून झालेली आहे. काही क्षण सारे मानवप्राणी स्तंभित झाले होते. त्यानंतर ते पुन्हा सचेतन झाले ते नव्या व्यवस्थेचे पाईक म्हणून. पण हा बदल काही सुरळित झालेला नाही. ते सचेतन होत असताना त्या बदलाचा धक्का पचवता न आल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे हा आकडा जवळजवळ ९० कोटी– म्हणजे आजच्या लोकसंख्येचा विचार करता दहा टक्क्यांहून अधिक– इतका प्रचंड आहे. म्हणजे हा व्यवस्था-बदल अनेकांचा बळी घेऊनच झालेला आहे.
Memorial gravestones of Soviet soldiers whose remains were unearthed by volunteers and buried in Rossoshka. Credit: Sergey Ponomarev for The New York Timesधर्माधिष्ठित राज्यव्यवस्था असो, धर्माधिष्ठित समाजरचनेला नि राजकीय भांडवलशाहीला विरोध करत उभी राहिलेली कम्युनिस्ट व्यवस्था असो, की कम्युनिस्टांना क्र. १ चा शत्रू मानत त्यांना निखंदून काढण्यासाठी देशोदेशींचे नेतृत्व नि राजकीय व्यवस्था उलथून टाकणारी भांडवलशाहीसमर्थक व्यवस्था असो; आपापल्या सोयीची सामाजिक राजकीय व्यवस्था उभी करण्यासाठी या सार्यांचेच मुख्य हत्यार हे प्रतिस्पर्ध्यांचा, आपल्याला अनुकूल नसणार्यांचा नि:पात करणारे बंड वा उठाव अशा स्वरूपाचे असते. जुनी व्यवस्था मोडून हे सर्वस्वी नवी व्यवस्था स्थापन करतात ते हजारो, लाखो नरबळी देऊनच. Pluribus ची ही नवी व्यवस्थाही त्याच पंक्तीत जाऊन बसलेली आहे.
असं म्हटलं जातं की ‘युद्धाने/रक्तरंजित क्रांतीने जुने प्रश्न संपतात नि नवे निर्माण होतात.’ तसेच त्यात झालेल्या विध्वंसातून निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होतात, नवे रोजगार निर्माण होतात. बळी गेलेल्यांना पायामध्ये चिणून नव्या व्यवस्थांच्या इमारती उभ्या केल्या जातात. Pluribus मध्येही व्यक्तिप्रधान समाजव्यवस्था उलथून ‘सर्वे सुखिन: सन्तु:’ या तत्त्वाधारे उभ्या राहू पाहाणार्या व्यवस्थेला, या नव्वद कोटींच्या मानवी जीवांच्या मृत्युमुळे ‘अपने आप मरे हुए प्राणियों का’ एक प्रचंड साठाच उपलब्ध झाला आहे.
मानवजन्य प्रथिन (Human Derived Protein)पण याचा खाद्य म्हणून वापर करण्यामध्ये दोन अडचणी आहेत. पहिली म्हणजे असे ‘स्वजनाहारी’ (cannibal) होणे हे आजच्या मानवी संस्कारांना प्रचंड धक्कादायक वाटणारे आहे. जरी शिल्लक मानवांची मने नांगरून त्यांची नव्याने घडी बसवली गेली असली, तरी त्यांच्या सामूहिक माहिती-साठ्यामध्ये हे भूतकाळाचे अवशेष शिल्लक आहेतच. ते पूर्णांशाने नाहीसे झालेले नाहीत. कारण त्यांच्या केवळ सामाजिक जाणीवा बदलल्या आहेत, स्मृतिकोष तसेच आहेत(४). त्यामुळे आहारातील हा आमूलाग्र बदल त्यांना स्वीकारणे फारच अवघड होणार आहे. दुसरी समस्या अशी की ही मानवी कलेवरे ती नाशवंत असल्याने त्यांचा आहारोपयोगी कालखंड फार कमी आहे. तेवढ्या काळात एवढ्या प्रचंड संख्येने ती ग्रहण केली जाणे अवघड आहे.
Communism vs. Socialism - What's The DifferenceJohn Cena Explains need for HDP.या दोनही समस्यांवर उपाय म्हणून या मानवी कलेवरांपासून आहारोपयोगी प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया अंमलात आणली आहे. आज फ्लेवर्ड मिल्क, फळांचे ज्यूस ज्याप्रमाणे बाटल्या वा टेट्रापॅक स्वरूपात मिळतात, तशाच स्वरूपात ही मानवजन्य प्रथिने प्रत्येकापर्यंत पोहोचवली जात आहेत. ही नवी समूहजीवी मानवजमात त्याच्या आधारे जीवनावश्यक उर्जा मिळवते आहे.
सजीवांना इजा न पोहोचवता मांसाहार करणे अशक्य आहे हे खरे. पण नागर झाल्यानंतर मानवी समाजातील बहुसंख्य मांसाहारी हे स्वत: प्राणिहत्या करत नाहीत. हे ध्यानात घेतले तर त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आहारात येणारे मांस हे ‘अपने आप मरे हुए’ (खरंतर इतर कुणी मारल्याने मेलेले) प्राण्यांचेच असते. त्यामुळे त्या जीवहत्येचा दोष आपल्या माथी नाही अशी सोयीस्कर समजूत त्यांच्या नेणिवेत जाऊन बसलेली असते.
एवढेच कशाला खुद्द त्यांना मांसविक्री करणारेही केवळ एवढा दोष इतरांच्या माथी मारून उरलेला व्यापार नि त्यातून मिळणारे चलन आपल्या हाती राखत असतात. आपल्या भारतातील काही समाजामध्ये मांसविक्री करणारेही खाटिककाम– म्हणजे प्रत्यक्ष जीवहत्या करण्यास अन्य व्यक्तीची– बहुधा मुस्लिम खाटकाची – मदत घेताना दिसतात. अनेक खेड्यांतून, लहान शहरांतून केवळ एवढ्याच कामासाठी एखाद-दुसरे मुस्लिम घर तगून राहिलेले दिसते.
याचा पुढचा टप्पा म्हणजे एखाद्या प्राण्याच्या आपल्या नजरेसमोर झालेल्या मृत्यूने ज्यांना धक्का बसतो, वेदना होतात, अशा व्यक्तीही रांधलेले मांसाहारी पदार्थ सहजपणे खाऊ शकतात. याचे कारण म्हणजे ‘दृष्टीआडच्या सृष्टी’शी त्यांची तेवढी घट्ट नाळ जुळलेली नसते, तेथील सुखदु:खांनी त्यांना वेदना होत नाहीत. तशा त्या व्हाव्यात यासाठीच कदाचित ‘प्लरिबस’मधील व्यवस्था प्रत्येकाच्या संवेदनांची एकमेकांशी गाठ घालून देत आहे.
आजच्या पर्यावरण-विध्वंसक विकासाच्या भांडवलशाही प्रारूपाचे महानगरी लाभधारकही याच वृत्तीने जगतात. यांच्या सुखासीनतेसाठी आवश्यक असणार्या उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल ज्या निसर्ग-विध्वंसातून निर्माण होतो, तो विध्वंस त्यांच्या दृष्टीआड झाल्याने त्यांच्या संवेदनशीलतेला बाट लागत नाही. भांडवलशाहीने कच्चा माल ते उपभोग ही लांबलचक साखळी निर्माण केली आहे, तिच्यामधील कोणत्याही टप्प्यावरचा लाभधारक त्यातून होणार्या त्या विध्वंसाला, नाशाला, नुकसानीला स्वत:ला जबाबदार मानत नाही.
या साखळीच्या सर्वात वरच्या थरातील लाभधारक आपल्या बंदिस्त फ्लॅट, बंगला वा पेंट-हाऊस मध्ये राहातात नि बंद काचेच्या वाहनातून एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करतात. त्यायोगे त्या प्रारूपाचे बळी असलेल्या निम्नवर्गीय माणसांच्या अवस्थेकडे ‘मला काय त्याचे’ वृत्तीने पाहातात आणि महानगरापासून दूर कुठेतरी घडणार्या पर्यावरण विध्वंसाबाबत संपूर्णपणे संवेदनाशून्य होऊन जातात. याच धर्तीवर ‘Pluribus' मधील मानवी अनुषंगे, या जीवनदायी प्रथिनाचे सेवन करणारे जीव, एका चार भिंतीआड घडणार्या स्वजनाहारी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याकडे सोयीने दुर्लक्ष करू शकतात.
इथे आणखी विशेष काही घडते आहे. सजीवसृष्टीमध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे, जो केवळ ‘उदरभरण’ या एकाच हेतूने आहार घेत नाही. चवीसाठी, वैविध्य म्हणून, आवश्यक जीवनसत्वांची गरज भागवण्यासाठी, अशा विविध कारणांच्या आधारे आहार निश्चित करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. अन्नग्रहणाच्या पातळीवर पाहिले, तर मानवजन्य प्रथिने हा एकच आहार प्रामुख्याने घेणारा हा नवा जीव, पुन्हा एकवार प्राणिसृष्टीतील इतर प्राण्यांच्या पातळीवर उतरलेला आहे.
- (क्रमश:) -
पुढील भाग » गरजा, मागणी आणि पुरवठा
टीपा:
(१). हे प्रत्यक्षात घडले, की ही ओशोंनी आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ रचलेली बोधकथा आहे, मला ठाऊक नाही. मी त्यांच्या एका - बहुधा ‘नास्तिक कौन? - व्याख्यानाच्या तुकड्यामध्ये ऐकली. Revolutionary आणि Rebel या दोनपैकी एका पुस्तकात आली असावी. कथानक जसे आठवले तसे देतो आहे. तपशीलात चूक असू शकते. [↑]
(२). खरंतर इथे या बोधकथेबद्दल शंका निर्माण होते. सामान्यत: एक नियम म्हणून नैसर्गिकरित्या मृत झालेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये असे आहारतज्ज्ञ सांगतात. याला सोपे कारण आहे. जो जीव नैसर्गिकरित्या मृत झाला आहे त्याला कुठल्या न कुठल्या स्वरूपाची बाधा (infection) असण्याची शक्यता बरीच असते. अशा प्रकारचे अन्न खाणे म्हणजे ती बाधा पोटात घेण्यासारखे असते. तसेच मृत्यू होऊन जसजसा काळ जातो, तसतसे त्याचे कुजण्याची नि विघटनाची प्रक्रिया वेग घेत असते. यातून ते खाणार्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावते.[↑]
(३). पण यात मागणी-पुरवठ्याचे गणितही ध्यानात घ्यावे लागते. त्याबद्दल उहापोह पुढच्या भागात करू. [↑]
(४). पुन्हा संगणकीय भाषेत सांगायचे तर त्यांची ‘संचालन-प्रणाली’ (operating system) बदलली आहे, हार्ड-डिस्क अथवा तत्सम साठवणुकीच्या उपकरणांवरील माहिती बदललेली नाही. [↑]
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १२ : जठराग्नी शमवाया भूतां
हे वाचले का?
आकलन
जिज्ञासानंद
प्लरिबस
मालिका
व्यवस्था
समाजजीवन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा