Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, १९ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ३ : समूहाची ओळख

  • समूहजीवी « मागील भाग

    समूहजीवी समाज, मूर्त ओळख

    केवळ सहजीवन आणि सहभोजन यांखेरीज आचार-विचारांत सामूहिकता आली ती सामायिक कर्मकांडातून. मानवी (किंबहुना सर्वच प्राणी, पक्षी व कीटकांच्या) आयुष्यातील जन्म नि मृत्यू या दोन घटना निश्चित आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम कर्मकांडे त्यांच्याभोवती उदयाला आली. जगभरातील सर्वच मानवटोळ्या नि समाज यांच्यामध्ये या दोन घटनांभोवती गुंफलेली कर्मकांडे आहेत.

    चित्रपटप्रेमींना डिस्नेच्या सुप्रसिद्ध ‘द लायन किंग’मधील सिंहराज सिम्बाच्या जन्माचा प्रसंग आठवत असेल. रफीकी हे माकड वनराज मुफासाच्या टोळीचा भगत वा पुरोहित आहे. मुफासा आणि सराबी यांच्या या पुत्राच्या– म्हणजे सिंबाच्या जन्मानंतर तो त्या ‘युवराजा’ला उचलतो नि गुहेतून बाहेर येतो. मुफासाचे जणू सिंहासनच असलेल्या त्या उंचावरील ‘प्राईड रॉक’च्या टोकाशी उभा राहातो आणि सिंबाला दोन्ही हातांनी उचलून उंच धरतो(१)— त्याच्या सर्व ‘प्रजेला’ दिसावे इतका उंच. आपल्या नव्या युवराजाला पाहून सर्व प्राणी आनंदोत्सव साजरा करतात.

    प्राणिजीवनात हा प्रसंग अर्थातच अतिरंजित आहे. पण माणसांच्या टोळ्यांमध्ये रफीकीप्रमाणेच भगत/पुरोहिताने वा एखाद्या ज्येष्ठाने नवजातावर जातक संस्कार करुन पुर्‍या टोळीला, समाजाला त्याची ओळख करुन देण्याचा हा प्रसंग हे त्या जिवाच्या आयुष्यातील पहिले कर्मकांड. जन्माप्रमाणेच मृत्यूशी निगडित कर्मकांडेही माणसाची ओळख निश्चित करणारी असत.

    शिकारजीवी जमाती शिकारीच्या मागावर भरपूर प्रवास करीत. कित्येक दिवस वसतीपासून दूर राहात. या दरम्यान टोळीतील एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याचे शव अर्थातच उचलून वसतीपर्यंत आणत नसत. त्याच ठिकाणी त्याचे दफन करुन त्यावर दगडांचा एक मनोरा - केर्न (Cairn) - उभा करीत. (कारण दगड हे कुठेही नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असत.) हा मनोरा त्या सहकार्‍याचे स्मरण असे आणि तिथे असलेल्या संभाव्य धोक्याचेही. पुढे नागर झालेल्या अब्राहमिक धर्मांनी या शिलामनोर्‍याऐवजी आकर्षक, कोरीव मृत्युशिळेची अथवा मृताच्या टोळी वा क्रॉससारख्या प्रतीकाची स्थापना करण्यास (आणि त्यावर लहानसा मृत्युलेख - Epitaph- कोरण्यास) सुरुवात केली. निसर्गजीवींनी त्यांच्या सहजीवनामध्ये, कर्मकांडांमध्ये मनुष्येतर सजीवांनाही सामील करुन घेतले होते. आफ्रिकेमध्ये प्रत्येक टोळीचे एक नैसर्गिक आराध्य दैवत असते, त्या त्या टोळीकडून त्या प्राण्या-पक्ष्याला वा वृक्षाला अभय मिळत असते. या वैविध्यामुळे काही प्रमाणात निसर्गसंरक्षणही साध्य होते.

    टोळीतील ज्येष्ठांच्या अनुभवाचा मार्गदर्शनामार्फत लाभ मिळत असल्याचा उल्लेख वर आला आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही तो मिळत राहावा अशी इच्छा त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये निर्माण झाली. पण दस्तऐवजीकरण करण्यास आवश्यक लेखन वा मुद्रण कला तोवर विकसित झालेली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष वारसा हा अप्रत्यक्ष वारशामध्ये रूपांतरित केला गेला. प्रत्यक्ष माहिती, ज्ञान यांच्याऐवजी ‘गोळाबेरीज निवाड्या’ची पद्धत स्वीकारली गेली. आधीच मृत झालेले हे पूर्वज तपशीलवार मार्गदर्शन करणे शक्य नव्हते. मग त्यांना मोजके पर्याय देऊन निवड करण्यास मुभा दिली गेली. महत्त्वाच्या प्रसंगी या मृत पूर्वजांचा असा ‘कौल’ घेण्याचा प्रघात रूढ झाला(२). पूर्वजांचे एक प्रकारे दैवतीकरण होऊन त्याभोवती कर्मकांडे वाढत गेली. आफ्रिका, द. अमेरिका, उत्तर आशियातील राष्ट्रांतून आजही पूर्वजांचे हे स्थान बरेचसे टिकून आहे.

    पुढे माणूस नागर नि प्रगत होत गेला, विविध टोळ्यांचे समाज झाले तसतशी कर्मकांडे त्याला अनुसरून बदलत गेली. या कर्मकांडाची सामायिकता समाजातील सदस्यांमध्ये एकतेची भावना दृढ करत असते. जन्म नि मृत्यु या नैसर्गिक घटनांशी निगडित कर्मकांडांपलिकडे प्रत्येक टोळीची आहारपद्धती, संवादपद्धती (भाषा), पेहराव यांच्यातही सामायिकता होती. सारांशाने सांगायचे तर वंश, उपास्य दैवत/ उपासना पद्धती, भाषा, वसतीस्थान, आहारपद्धती या सार्‍यांमधून त्यांची सामूहिक ओळख निर्माण होत होती, तसेच अन्य टोळ्यांपासून तिचे वेगळेपणही निश्चित होत होते. हे सर्व निकष व्यावहारिक होते आणि सामूहिकता सेंद्रिय पद्धतीने विकसित झालेली होती. या समाजांमध्ये व्यक्तिला स्वतंत्र असे स्थान नव्हते, समाजाचा एक एकक (subject) हीच तिची ओळख होती.

    परंतु एकदा कर्मकांडांतून मानसिक आधार शोधू लागलेल्या माणसाने, सामाजिक कर्मकांडांपाशी न थांबता वैय्यक्तिक आयुष्यातील वयात येणे, लग्न, प्रशिक्षण-प्रारंभ, कार्यारंभ आदी विविध घटनांभोवती लहान-मोठी कर्मकांडे निर्माण केली.


    विकेंद्रित समाज, अमूर्त ओळख

    अन्नाचा अपुरा पुरवठा, टोळीची वाढती लोकसंख्या वा अंतर्गत संघर्ष यामुळे टोळीला वा तिच्या एका गटाला स्थलांतर करावे लागे. टोळी वा तिच्यातील एक गट वेगळा होऊन अन्न नि वसतीसाठी योग्य अशा भूमीच्या शोधात निघून जाई. हा पुढे नव्या भौगोलिक परिसंस्थेशी जुळवून घेत स्थिरावे. तिथे त्याची वाढ होई.

    या टोळीमध्ये काही प्रमाणात मूळ टोळीची कर्मकांडे रुजलेली असत. हेतुत: त्यात बदल केला नाही तर ती बव्हंशी तशीच चालू राहात. पण मूळ चालीरीती, कर्मकांडे यांत काही थोडे बदलही होत नि मूळ टोळीहून थोडा वेगळा चेहरा या टोळीला मिळत जाई. ही प्रक्रिया निरंतर चालणारी होती. यातून टोळीचे विकेंद्रीकरण होई. विविध ठिकाणी पसरलेल्या या विभागांमध्ये एक महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) म्हणता येईल अशा चालीरीती, कर्मकांडे समान असत. यातून त्यांचा परस्पर-संबंध दिसून येत असे. पुढे दोन माणसे परस्परांसमोर आली की एकमेकांच्या चालीरीती, कर्मकांडे जाणून घेऊन परस्परांशी विश्वासाने, अविश्वासाने की औपचारिकपणे वागावे याबाबत निर्णय घेतला जाई. ‘तू कुठला नाच नाचतोस? घुबडाचा की मोराचा? या प्रश्नांतून एकमेकांची टोळी वा परंपरा जाणून घेतली जाते’ असा उल्लेख ‘द लायटनिंग बर्ड’ या लायल्‌ वॉट्सन यांच्या निरंजन घाटेंनी अनुवादित केलेल्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते.

    टोळीचे असे विकेंद्रीकरण न होता, उलट दिशेने, भिन्न समूहांचे केंद्रीकरण होऊन त्या समूहाला सामायिक ओळख देता आली... विविध भौगोलिक तुकड्यांवर जगणारे समूह कर्मकांडे, चालीरीतींनी कृत्रिमरित्या एकत्र बांधले तर...? यातून विकेंद्रित स्वरूपाची एक मोठी टोळी वा समाज बांधता येईल. धर्मसंस्थांनी नेमके हेच साध्य केले आहे! शिकारजीवी, जंगलजीवी जगामध्ये टोळी ही सेंद्रीय पद्धतीने विकसित होत जाई, पण धर्माच्या टोळीच्या विस्ताराला श्रद्धा, उपासनापद्धती, राजकीय सत्तेपासून हत्यारांपर्यंत अनेक रचनात्मक... आणि विध्वंसकही मार्ग उपलब्ध झाले.

    धर्मांनी विविध वंशांच्या, विविध भौगोलिक परिसंस्थांमध्ये निवास असणार्‍या समूहांना अशी सामायिक ओळख निर्माण करुन दिली. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने जगणार्‍या मानवी टोळ्यांना पुन्हा एकवार सांघिकतेचे, सहकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तिने नीतिनियमांची कुंपणे घालायला सुरुवात केली. ज्यू आणि ख्रिस्ती या अब्राहमिक धर्मांचे मूलाधार असणार्‍या दहा आज्ञा (Ten commandments) हे त्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण. हे नीतिनियम, त्याच्याशी निगडित आचार-विचार अनुसरणारा जगभरातील कुणीही व्यक्ती या व्यापक टोळीचा, समाजाचा सदस्य होत असे. हे नीतिनियम संकल्पनास्वरूप, अव्यावहारिक असल्याने धर्मसंस्थांनी उभारलेल्या टोळ्या वा समाज हा भौगोलिक सीमा लंघून विस्तारू शकला.

    जमिनीच्या दूरदूरच्या तुकड्यावर विखुरलेले एकाच धर्माचे हे लोक आता कोणत्याही व्यावहारिक बंधाने बांधले गेलेले नव्हते. तरीही त्यांच्यामध्ये आपण एका टोळीचे, एका समाजाचे भाग असल्याची भावना निर्माण होत होती. कारण त्यांची सामायिक ओळख कर्मकांडांप्रमाणे मूर्त नव्हती, ती कोणत्याही भौगोलिक, व्यावहारिक कुंपणांशिवाय सिद्ध होणार्‍या अमूर्त अशा संकल्पनांच्या आधारे निर्माण झाली होती.

    कर्मकांडे औपचारिकरित्या विकसित होत असली, तरी ती जगण्याशी निगडित होती. धर्मसंस्थांनी निर्माण केलेले बंध हे नियमित आचार-विचारांशी संबंधित होते, बव्हंशी अव्यावहारिकही होते. कर्मकांडांचा जगण्याशी असलेला बंध वगळून त्यामागच्या निव्वळ विचारांना नीतिनियमांचे स्वरूप दिले गेले होते. टोळी वा समाजाची ओळख ही जगण्याकडून विचाराकडे सरकू लागली होती. प्राकृतिक देवांच्या टायटन्स, ऑलिम्पियन्स, वैदिक देवांच्या पिढ्यांची माघारही याच सुमारास सुरू झाली असावी. अब्राहमिक धर्मांनी तर मूर्त जगाशी नाळ जोडलेल्या मागील सार्‍या दैवतांना नाकारत अमूर्त अशा एकेश्वरवादाची मुहूर्तमेढ रोवली. यातून त्या धर्मांच्या विविध भूभागांवर वसलेल्या अनुयायांमधील वारशाचे वेगळेपण पुसून समानधर्मा असल्याची भावना अधिक प्रभावीपणे रुजवता आली.

    पण हे करत असताना विविध बलिष्ठ वा बलवान समाज व टोळ्यांना आपलेसे करताना संघर्षाचे प्रमाण किमान राखण्यासाठी त्यांची मूळ ओळख असणार्‍या कर्मकांडांना मोडून न काढता अलगद सामील करुन घेतले. (याची काही उदाहरणे ‘सण आले जुळुनी’ या लेखात सापडतील.) यामुळे अमूर्त नैतिकतेच्या कल्पनांच्या आधारे निर्माण झालेल्या धर्मसंस्थांमध्येही कर्मकांडांचे स्थान निर्माण झाले... यथावकाश मूळ नीतिनियमांना मागे सारत ते शिरजोर झाले नि अखेर त्यांची ओळखच होऊन गेले.

    मानवी टोळ्या हा जसा समाज होता तसाच सत्ताही. त्याच्या सदस्यांमध्ये परस्पर-बंध होते तसेच त्यांनी जमिनीच्या एका तुकड्यावर अधिपत्य निर्माण केलेले असे. त्या तुकड्यावर ते आपले अन्न मिळवत असत. धार्मिक समाजाने मात्र अमूर्त विचारांच्या वा संकल्पनांच्या आधारे बस्तान बसवले होते. तिने बांधलेला समाज हा भौगोलिकदृष्ट्या विकेंद्रित स्वरूपाचा होता. अमूर्त संकल्पनांच्या आधारे टोळीचा विस्तार वेगाने होत असतानाच त्या टोळीची अनुषंगे भूगोलाच्या ज्या-ज्या भागावर वसली होते त्या भूभागांच्या स्वामित्वाची आसही या विशाल टोळीमध्ये ओघानेच वाढू लागली. त्यामुळे सत्तेची प्रेरणा बळावून (काही इतिहासकारांच्या मते तीच मूळ प्रेरणा होती) ती राजकीय सत्तेला पूरक, क्वचित स्पर्धक म्हणूनही उभी राहू लागली.

    यामुळे भौगोलिक सलगतेने बांधल्या गेलेल्या समाजात भिन्न धर्मीयांमध्ये निर्माण झालेल्या वेगळेपणाच्या भावनेने विसंवाद निर्माण होऊ लागले. परिणामी धर्मसत्ता ही अनेकदा भौगोलिक, राजकीय सत्तेला डोईजड होऊ लागली, पर्यायी सत्ताकेंद्रे निर्माण करु लागली. (पण सत्तेबद्दल विवेचन करणे हा लेखनाचा विषय नसल्याने अधिक विस्तार करत नाही.) मग राजकीय सत्तेने धर्मसत्तेला शह देण्यासाठी एक देश, एक वंश, एक भाषा यांचा नारा देत वंश नि भाषा वारशाने जोडलेल्या समाजाला एकत्र राखण्याचा प्रयत्न केला. पण हे निकषही यथावकाश शिरजोर झाले नि राजकीय सत्तेला आतून सुरुंग लावू लागले.

    एक अर्वाचीन ठळक उदाहरण युगोस्लाव्हिया या देशाचे पाहाता येईल. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस सर्व द. स्लाव्हिक भाषिकांचे राज्य (Kingdom) म्हणून हा देश उदयाला आला. दुसर्‍या महायुद्धानंतर साडेतीन दशके इथे मार्शल टिटो याच्या नेतृत्वाखाली रशियन पद्धतीची सोविएत कम्युनिस्ट व्यवस्था राबवली गेली. परंतु त्याच्या निधनानंतर त्यातील घटक राज्यांमध्ये कुरबुरी वाढू लागल्या आणि एका दशकातच बोस्निया-हर्झेगोविना, क्रोएशिया, माँटेनेग्रो, उ. मॅसडोनिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया ही सहा घटक-राज्ये वेगळी झाली. इतकेच नव्हे तर पुढील दोन-दशकांत सर्बियामध्येही कोसोवो आणि वोज्वोदिना हे स्वायत्त प्रदेश निर्माण झाले आहेत. कोसोवोचा स्वायत्त प्रदेश आपल्याच अधिपत्याखाली असावा यावर सर्बिया नि मॉन्टेनेग्रो यांच्यातील विवाद कायम आहे. पण कोसोवोची संसद मात्र संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करते आहे.

    मनुष्यसमूहाला एकत्र ठेवण्यासाठी बळ दिले गेलेले निकष उलट दिशेने त्याच्या विघटनासही कारणीभूत ठरू लागले. याचे एक कारण हे सारे घटक एकाच वेळी काम करत होते आणि ‘प्राधान्य यांपैकी कशाला असावे?’ हे नवे – तिसरे! – संघर्षाचे बळकट कारण त्यांनीच निर्माण करुन दिले होते.

    असे असले तरी अर्वाचीन जगात सर्वसाधारणपणे एकाच धर्माची माणसे ही विविध देशांत विखुरलेली असतात. तिथे त्या त्या देशांच्या राजकीय सत्तेखाली राहात असताना ते आपापल्या चालीरिती वैय्यक्तिक पातळीवर पाळत असतात. एकुणात आधुनिक जगामध्ये धार्मिक समाज हा निरंतर विखंडित नि विकेंद्रित होत चालला आहे नि राजकीय सत्ता त्यावर वर्चस्व राखून आहे.

    पुन्हा, या नियमाला इस्रायल हा एक ठळक अपवाद आहे. एका धर्माची विखुरलेली टोळी एका सलग भूभागावर एकत्र आणून त्यांचे एक राष्ट्र, एक देश, एक राजकीय सत्ता निर्माण केली गेली आहे. स्वत:वरील अन्यायाचे भांडवल करत असतानाच इतरांचे मूलभूत हक्कही बेगुमानपणे चिरडत जाणारा हा युद्धखोर देश, अजूनही मागास टोळी मानसिकतेच्या जगात वावरणार्‍या अनेकांसाठी आदर्श होऊन राहिला आहे. रोचक बाब म्हणजे या देशाच्या निर्मितीकाळातच समूहजीवी प्रारूपाच्या एका नव्या समाजाच्या निर्मितीची चाचणी घेण्यात आली होती. त्याबद्दलचा तपशील पुढे येईलच.

    Credit: https://www.aclu-wy.org/ येथून साभार.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » संग्रह ते व्यापार

    टीपा:

    (१). हा भगत वानरकुलातील का निवडला याचे कारण तुम्हाला आता कळते. शारीरिक जडणघडणीचा विचार करता इतर कोणताही प्राणी ही कृती करू शकला नसता. [↑]

    (२). एकुणात माणसाचा कल नीतिनियमाला, आकलनाला कर्मकांडात रूपांतरित करून, तेवढेच अनुसरत मूळ नियमांना, आकलनाला विसरून जाण्याकडे अधिक असतो. ‘ज्येष्ठांबद्दल आदर असावा’ हा झाला संस्कार, नैतिक संकल्पना; पण ‘ज्येष्ठांच्या पाया पडणे’ हे त्याचे कर्मकांड. कुणी एखादा पाया पडताना दिसला की, ‘बघा किती चांगले संस्कार’ असे म्हटले जाते. पण हे संस्काराचे केवळ कर्मकांड असते. वैय्यक्तिक आयुष्यामध्ये ज्येष्ठांच्या पाया पडण्याचे कर्मकांड पार पाडून एरवी अनादराने, तुच्छतेने, तुसडेपणाने वागणे शक्य आहे, माझ्या पाहाण्यात अशी बरीच उदाहरणे आहेत.

    शालेय शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना ज्ञान व माहितीचे आकलन करून देणे हा असतो. ते झाले की नाही याची चाचणी परीक्षेद्वारे होत असते. आता परीक्षेत उत्तम गुण मिळाले म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्यातील ज्ञानाचे आकलन झालेच असेल असे नाही. केवळ पाठांतराचा रट्टा मारूनही त्याने गुण मिळवले असतील. कारण परीक्षा ही ज्ञानाची केवळ एक चाचणी आहे आणि चाचणीत यशस्वी होण्याचे इतरही मार्ग आहेत. तेव्हा उत्तम गुण मिळवणे हे कर्मकांड आहे, त्यामागचा उद्देश विसरून फक्त कर्मकांड पार पाडणे शक्य आहे.

    अगदी विज्ञानाच्या क्षेत्रातही पाहिले तर बुद्धिमत्ता, ज्ञान यांचा उल्लेख करायचा तर बहुतेकांना केवळ न्यूटन, आईन्स्टाईन वा फारतर अलिकडे श्रॉडिंगरची आठवण होते. उदाहरण म्हणून यांचे अनुक्रमे सफरचंद, E=mc^2 हे समीकरण आणि ‘मांजर जिवंत आहे नि मेलेलीही’ हा गूढ म्हणून आकर्षक वाटणारा तर्क, हे तोंडावर फेकले जाते. एखाद्या चित्रपटात, मालिकेमध्ये शास्त्रज्ञ म्हणजे बहुतेक वेळा रसायनशास्त्रज्ञच दाखवला जातो. त्याला पडद्यावर तसे दाखवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याला त्याच्या प्रयोगशाळेत दाखवायचा. म्हणजे काय तर त्याच्याभोवती चंचूपात्र (beaker) स्तंभमापक (burette) शंकूपात्र (conical flask) परीक्षा-नळी (test-tube) बुन्सेन बर्नर, उर्ध्वपातनाचा लांब चोचीचा चंबू वगैरे मांडून ठेवायचे नि त्यात विविध रंगांचे द्रव दाखवायचे. त्यापलिकडे संवादांमध्ये कुठेही भौतिकशास्त्राच्या, रसायनशास्त्राच्या अगदी प्राथमिक, शालेय पातळीवरच्या संकल्पनांचा उल्लेख करण्याचीही गरज नसते. हे एवढे दृश्य पुरते. [↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: