Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

आकलनाच्या कलाने...

  • मी नुकत्याच संपवलेल्या मालिकेचे उपशीर्षक होते ‘एक आकलन’. त्याही आधी मी एकदोनदा हा शब्द आवर्जून वापरलेला होता. जे लिहिले जाते ते लेखकाचे आकलनच तर असते, मग ही पुस्ती जोडण्याचे कारण काय? असा प्रश्न पडू शकतो. त्याबद्दल विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याअर्थी हे ही आकलनाचे एक आकलन म्हणता येईल. या लेखानंतर इथे सुरू होणार्‍या दीर्घ मालिकेसाठी भूमिका स्पष्ट करणारे लेखन म्हणून याच्याकडे पाहाता येईल.

    अभ्यासक, अकादमिक, समीक्षणात्मक, लेखनामध्ये एक लेखनाची चौकट, व्याप्ती निश्चित करुन त्याच्या अंतर्गत लेखनाचा विस्तार करावा लागतो. ती शिस्त पाळावी लागते. विधानांचे आधार वा मुद्द्यांची मांडणी प्रस्थापित लेखनाच्या संदर्भात नि तर्कसंगत पद्धतीने करावी लागते. ललित लेखन हे पूर्णपणे लेखकाच्या अभिव्यक्तीचा आविष्कार असतो, त्याला निवडलेल्या घाट अथवा रचनाबंधापलिकडे फारशी बंधने नसतात.

    रसग्रहणात्मक लेखनामध्ये एखादी कलाकृती– शब्द, दृश्य वा श्राव्य – हे मुख्य विषयवस्तू धरून मांडणी करावी लागते. दुर्दैवाने अशा प्रकारचे लेखन तसे दुर्मीळ म्हणावे लागेल. समीक्षा वा लेख या सबगोलंकारी वर्गवारीखाली आपल्या मते वा निवाड्यांचा तडका मारून मांडलेली माहितीची भरताड, या दोन प्रकारांमध्ये हे तसे अंग चोरून कसेबसे उभे राहाते. आकलनाला प्राधान्य देण्याचा प्रघात या लेखनात अधिक दिसतो. चटकन डोळ्यासमोर येणारी नावे म्हणजे विद्याधर पुंडलिकांचे ‘शाश्वताचे रंग’, विजय पाडळकरांचे ‘कवडसे पकडणारा कलावंत’, के. रं. शिरवाडकरांचे ‘तो प्रवास सुंदर होता’ ही पुस्तके.

    सरसकट ‘बुक ऑन बुक्स’ प्रकारची पुस्तके म्हणजे रसग्रहण नव्हे. ती बव्हंशी वर्तमानपत्री स्तंभस्वरूप असतात. यात माहितीची भरताड असते, थोडेफार विश्लेषण असते, पण आकलनाचा भाग जवळजवळ नसतोच. शाळेत असताना मराठीच्या पेपरच्या अभ्यासामध्ये निबंध हा एक प्रकार असे. गाईडमधला तयार निबंध पाठ करणे नि स्वत:च्या बुद्धीने स्वतंत्रपणे तो लिहिणे यातील जो फरक, तसा काहीसा या विश्लेषणात नि आकलनामध्ये असतो. विश्लेषणाला बरेचदा चौकट असते, पूर्वानुभवाची जोड असते. त्यात सापेक्षता फारशी नसते. एकदा विश्लेषण मांडले गेले, की त्याच्या बीजवृत्तीसह (premise) ते आपल्याला कितपत पटते एवढेच अदमास वाचणारा अजमावू शकतो.

    आता तुम्ही म्हणाल “ हे नाही, ते नाही हे सांगत बसू नका, त्या ‘मराठीत जागतिक दर्जाचे लेखन नाही’ म्हणणार्‍यांसारखे. ‘जागतिक दर्जाचे म्हणजे काय?’ या प्रश्नाचे वस्तुनिष्ठ, तार्किक उत्तर देऊ शकत नाहीत, ते फक्त उदाहरणे तोंडावर फेकत राहातात. तसे करु नका, काय ‘आहे’ याचे सरळ उत्तर द्या.” तुमचे एकदम बरोबर आहे. तर आता तिकडे येतो.

    सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ‘आकलनामध्ये सापेक्षतेचा भाग ठळक असतो.’ एकाच विषयवस्तू वा कलाकृतीबद्दल माझे आकलन नि इतर कुणाचे आकलन वेगळे असू शकते, नव्हे असतेच. पण आकलन म्हणजे मत अथवा निवाडा नव्हे. ‘हे चांगले आहे.’ किंवा ‘हे आवडले नाही’ म्हणजे आकलन नव्हे. त्याला तर्कसंगती वा कार्य-कारणभावाची जोड हवी. आता ही तर्कसंगतीची वा कार्यकारणभावाची साखळी जी तयार होईल ती तुमच्या विचार, अनुभव आणि दृष्टिकोनाच्या सरमिसळीतून. अकादमिक अभ्यासामध्ये तिचे वेढे हे संदर्भग्रंथातूनच येतील, पण आकलनामध्ये तुमच्या अनुभवाचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसेल. संदर्भाऐवजी जगण्यातून मिळालेले अनुभव, आठवणी आधार असतील, त्याला एखादे वळण देतील. यात काही प्रासंगिक घटना वा उल्लेख असतील. आकलनाला हा प्रासंगिकतेचा पदरही असू शकतो.

    वरकरणी परस्परांपासून कोसो दूर असलेल्या विषयांमध्ये जेव्हा संगती सापडते त्यातून आकलनाला वेगळाच आकार मिळतो, जो कुठल्याही अभ्यासपूर्ण लेखनात तुम्हाला सापडत नाही. गणिती विचाराची प्रतिबिंबेही मला आपल्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत दिसतात. या अनुषंगाने की आधीच काही लेख इथे लिहिलेले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण मला जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘माणसे: अरभाट चिल्लर’ या पुस्तकात सापडले. जीएंनी पायथागोरसच्या प्रमेयाची त्यांना आलेली अनुभूती लिहिलेली आहे. आपला हा अनुभव प्रत्ययकारी भाषेत शब्दबद्ध करता येणार नाही, इतर कुणाच्या ओटीत घालता येणार नाही, याची खंतही व्यक्त केली आहे. ‘लहान मुलांसाठी’ म्हणून नाक मुरडल्या जाणार्‍या चलच्चित्रमालिकांमधूनही मला चलन, राज्यव्यवस्था, भविष्यवेधी विज्ञान यासंदर्भातील काही आकलन सापडत गेले होते.

    संगणकाच्या तुलनेने आधुनिक क्षेत्रातील, सर्वांना अपरिहार्यपणे ठाऊक असणार्‍या विविध अनुषंगे मला मानवी जीवनव्यापारामध्ये दिसू लागतात. जीवशास्त्र नि संगणकशास्त्र आपल्याला वाटतात तितके परस्परांपासून दूर नाहीत. त्यांच्यातही संकल्पनांची संगती दिसू शकते. याचे एक उदाहरण मला नुकतेच सापडले. ते ‘प्लरिबस’ या विज्ञान-काल्पनिकेच्या निमित्ताने लिहिलेल्या आगामी मालिकेमध्ये येईल.

    विषयांचा हात सोडून माध्यमांकडे वळलो तर चित्रपट, लघुपट, चलच्चित्रे, संगीत, ध्वनी, साहित्य अशी विविध माध्यमे आज माणसाच्या मनोरंजनाचा आणि माहिती-ज्ञानाचा स्रोत म्हणून उभी आहेत. चित्रपटातील एखादा प्रसंग, एखादा संवाद, मालिकेतला एखादा भाग, एखाद्या गाण्याचे शब्द, कथा-कादंबरीतील एखादा उतारा वा प्रसंग हे एखाद्या मुद्द्यावरील विचाराला चालना देतात, एक आकलन पदरात टाकतात. पण त्यासाठी त्यांकडे निव्वळ मनोरंजन म्हणून न पाहाता, जिज्ञासा नि आकलनाची आस मात्र हवी.

    पाहाणे (see) नि निरीक्षण (watch) करणे यात फरक आहे. परंतु या दोहोंतही आकलन (understanding) नाही. निरीक्षणाच्या नोंदी या लेगोच्या तुकड्यांसारख्या असतात. त्यांना स्वत:चा आकार असला तरी व्यक्तिमत्व नसते. विशिष्ट क्रमाने जोडून जो आकार तयार होतो तो आकलनाचा. एखाद्या मेंदूने त्यांना जोडले की तो चेहरा साकार होतो. पण त्याने साकार होण्याआधी त्या मेंदूमध्ये आकार घ्यावा लागतो. आकलन ती साखळी आहे जी या लेगोंच्या तुकड्यांचा क्रम नि बंध निश्चित करते. हे बस किंवा घर आहे, तर निरीक्षणे, माहिती, माध्यमे हे लेगोचे तुकडे आहेत. माहितीचे आकलनात रूपांतर झाले नाही, तर तिचे अस्तित्व केवळ त्या लेगोच्या तुकड्यांसारखे, काहीही न सांगणारे.

    आकलन ही एक तर्कसंगती आहे. आणि तर्कसंगती केवळ एक शक्यता उभी करते. तेवढ्यानेच ते वास्तव आहे हे सिद्ध होत नाही. तुमचे आकलन हे असे सापेक्ष असल्याने ते नेमके सत्य वा वास्तव असल्याचा दावा करता येत नाही. तसा ठोस दावा हा विशिष्ट सामाजिक-राजकीय स्वार्थ असेल तेव्हाच केला जात असतो. आकलनातले समाधान मिळवू पाहाणार्‍याने त्या फंदात पडायचे नसते. अर्थात ज्या समाजात एक अनुकूल निरीक्षणदेखील आपल्या पूर्वग्रहाला सार्वकालिक, सर्वव्यापी वास्तव म्हणून सिद्ध करते असे मानणारी बहुसंख्या आहे, तिथे हे सांगणे म्हणजे वाळूत पाणी ओतण्यासारखे आहे.

    जगण्याच्या अनुभवाचा नि अभ्यासविषयाचा संबंध नसतो असे आपले गृहितक असते. डाव्या, उजव्या मंडळींशी बोलताना अनेक बाबतीत असे जाणवले, की हे जो मुद्दा मांडत आहेत तो त्यांनी जगण्यातील अनुभवाशी ताडून पाहिलेला नाही. पडताळणी हा भागच त्यांच्या दृष्टीने दुय्यम आहे. ते एकाच मुद्द्याची परस्परविरोधी विश्लेषणे वाचतील कदाचित, पण व्यवहाराशी ताडून पाहाण्याची सवय बहुतेकांना नाही. त्यामुळे त्यांच्या मुद्द्याला उघड छेद देणारे काही दिसत असताना ते डोळे मिटून बसतात. किंवा ‘चेरी पिकिंग’ पद्धतीने आपल्या मुद्द्याच्या सोयीचे अनुभव वा निरीक्षणेच तेवढी उचलतात नि विरोधात जाणारी ‘अपवाद म्हणून सोडून द्यावीत’ असा हट्ट धरतात. झेंडेधार्‍यांची केस तर पार श्रद्धाळू पातळीवर पोहोचलेली असते.

    आकलन अकादमिक नसते, ते काही संदर्भग्रंथांच्या आधार घेत चालत नाही. स्वयंपाकाच्या ओट्यावर ओघळलेल्या उतू गेलेल्या दुधासारखे ते प्रवाही होते. ओट्याच्या भूस्तर रचनेनुसार त्याची वाटचाल होते. क्वचित हा प्रवाह दुभंगतो, कधी नुसतीच दिशा बदलतो, तर कधी फारसे फाटे वा वळणे न घेता सरळ त्याचे ‘गन्तव्य स्थान’ असलेल्या किचन-सिंककडे धाव घेते. कधी अंतिम सत्य सापडल्याप्रमाणे, तर कधी गति हरवल्यासारखे एकाच जागी थारोळे करुन बसते. तसेच तुमचा विचाराचा प्रवाह काही वाचलेले, काही पाहिलेले, काही आठवणी, यापूर्वीचे काही आकलन, अशा विविध गोष्टींना स्पर्श करत जातो. त्यातून त्या ओघळलेल्या दुधाने जसा अनियमित आकार निर्माण केला तसे तुमचे स्वत:चे आकलन तयार होत जाते.

    एखादा चित्रकार काम सुरु करतानाच कॅनव्हासचे चार तुकडे करून एक एक तुकडा पूर्ण रंगवून काढू शकत नाही. त्याचे चित्र पुर्‍या कॅनव्हासवर हळूहळू ठळक होत जात असते. विविध ठिकाणी त्याच्या अभिव्यक्तीला जागा सापडतात, तो त्या भरत जात असतो. ज्याला अभिजात संगीत वा शास्त्रीय संगीत म्हणतात त्या गाण्यामध्ये ‘उपज अंगाने विस्तार करणे’ असा वाक्प्रचार वापरला जातो. जिज्ञासा नि आकलनाच्या अंगाने केलेले लेखन साधारणपणे यांच्या जातकुळीचे. हे अकादमिक चौकटीमध्ये बसत नाही. त्याच्या मांडणीची चौकटही मुद्द्यांच्या विस्ताराबरोबरच विकसित होत जात असते.

    अकादमिक वा अभ्यासकाच्या लेखनाच्या तुलनेत आकलनामध्ये दृष्टिकोन, पूर्वग्रह आणि गृहितकांना थोडे अधिक स्थान असते. हा वस्तुनिष्ठ अभ्यास नाही, त्यामुळे यांचा बाट मानायचे कारण नाही. किंबहुना या लेखनाच्या रेसिपीमध्ये सापेक्षता हा एक महत्त्वाचा घटक आहे हे मान्य करुन चालायचे असते. अंतिम पदार्थाला त्याची चव राहाणार, मूल्यमापनावर तिचाही प्रभाव राहाणार हे ध्यानात घेऊनच तिचा आस्वाद घ्यायचा असतो.

    - oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: