Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १० : नव्या व्यवस्थेकडे

  • सर्वे सुखिन: सन्तु « मागील भाग

    शिकारजीवी, शेतीजीवी, आणि व्यापारजीवी असे मानवी समाजव्यवस्थांचे प्रमुख टप्पे दिसतात. यातील पहिले दोन अनायासे सहजीवी होते. शिकारजीवी, शेतीजीवी समाजांमध्ये प्रामुख्याने टोळ्यांचा परस्पर-संघर्ष वा स्पर्धा होती, तर व्यापारजीवी समाजाने त्याला आपल्यामध्ये आतच सामावून घेतले. या बदलाने सहभावनेला दुर्बल केले. त्यातून समाज शबल होत गेला. साम्यवादी व्यवस्था तर खर्‍या अर्थाने ‘सर्वे सुखिन: सन्तु’ स्वरूपाची म्हणता येईल, समूह-हिताच्या हेतूने पाहिले तर तिच्यामध्ये न्यून दिसत नाही. तरीही व्यावहारिक पातळीवर तिचा पहिला– श्रमजीवींच्या एकाधिकारशाहीचा– टप्पाही मूळ हेतू साध्य करण्यात यशस्वी झालेला दिसत नाही.

    शेती नि पशुपालन या दोहोंमार्फत आपले अन्न मिळवू लागलेला मनुष्यप्राण्याला – अगदी मोजक्या वन्यजीवी जमाती सोडल्या तर – शिकारजीवी राहण्याची गरज उरलेली नाही. मानवी इतिहासाच्या प्राचीन अध्यायामध्ये प्रबळ असलेले संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) हे तीन जीवनाधार आज अदखलपात्र वा संदर्भानुसार गुन्हेही ठरत आहेत. उत्पादन आणि विनिमयप्रधान समाजामध्ये शेती आणि पशुपालन यांचे महत्त्वदेखील ‘अनेकांपैकी एक’ उत्पादन-व्यवस्था इतकेच राहिले आहे. आता सर्व प्रकारच्या सामाजिक नि राजकीय व्यवस्था यांना छेदून जाणारी व्यापारजीवी वृत्ती सर्वत्र प्रबळ आहे. भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेली राष्ट्रे असोत, कम्युनिस्ट एकाधिकारशाही राबवणारी राष्ट्रे असोत की धर्माधिष्ठित एकाधिकारशाही राबवणारी राष्ट्रे असोत, या सार्‍यांनीच उद्योग नि विनिमयप्रधान व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे तिच्याशी निगडित गुणदोषांचा आढळ त्या सर्वच व्यवस्थांमध्ये दिसतो आहे.


    असमाधानी अस्थिर अस्तित्व

    या सर्व देशांतून, समाजांतून प्रगतीच्या विविध वाटा फुटलेल्या दिसतात, आणि तरीही यातील कोणतीही एक व्यवस्था समाधानी नि स्थिर असा समाज निर्माण करु शकलेली नाही. युरपमधील अति उत्तरेकडील नॉर्डिक राष्ट्रे(१) वगळता सर्वच समाज हे अंतर्गत संघर्षांनी आणि विषमतेच्या वाळवीने पोखरलेले आहेत. याला काही सोपी, तर काही अतिशय गुंतागुंतीची कारणे आहेत. बहुतेक व्यवस्थांची पुस्तकी मांडणी कितीही आकर्षक असली, तरी त्याची अंमलबजावणी ही भ्रष्ट स्वरूपातच होताना दिसते. याला षड्रिपुयुक्त मानवी मनाची जडणघडण, वंश-धर्म-भाषा आदी पर्यायी व्यवस्थांचा जाणारा छेद नि होणारा संघर्ष वगैरे बरीच कारणे असतात.

    ‘माणसाने समाधानी असणं’ ही मनाची प्रवृत्ती आहे. एखादा एक वेळ पोटभर अन्न मिळाले तरी आनंदी राहील, तर उद्योजकांसारखी नि राजकारण्यांसारखी मंडळी कोट्यवधींचा संचय पचवूनही ‘अजून द्या, अजून द्या’ म्हणत राहतील. वास्तविक पोटात जाणार्‍या अन्नाचे प्रमाण पोटभर असणे एवढी खरी गरज आहे. उरलेला सारा संचय हा बाह्य वस्तूंचा आणि म्हणून माणसाच्या अस्तित्वाला फारसा हातभार न लावणारा असतो. सर्व नमस्कार ‘केशवं प्रतिगच्छती’ असं म्हटलं जातं, तसं चलनाच्या उदयानंतर माणसाची सारी इच्छाशक्ती, सारी ईर्षा अधिकाधिक चलन मिळवण्याकडे नि साठवण्याकडे केंद्रित झाली आहे. आणि हा वरकड संचयही पुन्हा आणखी चलन मिळवण्याचे मार्ग चोखाळण्यासाठी अथवा लालसेने निर्माण केलेल्या काल्पनिक सुखांच्या लहरी निर्माण करण्यासाठी वापरला जातो आहे.

    त्यामुळे होते असे की माणसाला समाधानी असणे पुरेसे वाटले नाही, की विषमतेला खतपाणी मिळते आणि विषमतेमधून नव्या असमाधानाला. व्यवस्थेचा, नेत्याचा चेहरा कुठलाही असला, कुठलेही उद्दिष्ट (objective) त्यांनी समोर ठेवलेले असले, तरी समाजातील माणसांमध्ये असमाधान, लालसा असली की विषमता रुजतेच. तेव्हा मुद्दा समाजातील व्यक्तींच्या दृष्टिकोनाचा असतो. म्हणून महात्मा गांधी माणसांतील नैतिकतेला आवाहन करतात नि त्यावर आधारित भारतीय समाजाची कल्पना मांडतात.


    बाबा वाक्यम्‌ प्रमाणम्‌

    या मुद्द्याचे आणखी एक अनुषंग आहे ते बंधुभावाचे. वर ‘अर्थकारणाचे सहजीवन’ या भागामध्ये समाजाअंतर्गत, संघटनेअंतर्गत अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक बाबांच्या अनुयायांचे एक उपसमाज, अर्थकारणाचा पाया म्हणून उभे राहाण्याबद्दलदेखील लिहिले आहे. बुवा-बाबांचे, राजकीय नेत्यांचे वा अर्थकारणाने बांधल्या गेलेल्या उपरिनिर्दिष्ट व्यापक संघटनेचे अनुयायी केवळ अर्थकारणाच्या बाबतच नव्हे, तर आपापल्या बाबांनी, नेत्यांनी, अध्वर्यूंनी व्यक्त केलेल्या मतांच्या बाबतही एकमताने ‘बाबा वाक्यम्‌ प्रमाणम्‌’ वृत्तीने जगतात. ते बाबा अथवा नेते म्हणाले, ‘अमुक पदार्थ खाण्याने माणूस शूर होतो’ की त्या विधानाचा प्रसार करण्याचा धडाका अनुयायी लावतात. याला सिद्ध करण्याचे आव्हान देणार्‍यावर तुटून पडतात.

    पण समजा काही काळानंतर एखाद्या हे बाबाच म्हणाले की, ‘तो पदार्थ खाल्ल्याने माणूस दुबळा होतो’ की अनुयायी तसे म्हणू लागतात. मग ‘आधी असे सांगितलेत ते का ?’ असा जाब ते विचारत नाहीत. कुणी बाहेरच्याने विचारलाच तर उलट,‘आमचे बाबा असे म्हटलेच नव्हते, कुण्या हितशत्रूंनी त्यांच्या नावे हा खोटा संदेश कसा पसरवला होता’ यावर ते आवेशाने बोलू लागतात. त्या-त्या श्रेष्ठींच्या संदर्भात ते एक गट, एक विचार या सूत्राने वागत असतात. त्यात मतभिन्नतेला थारा नसतो. आयुष्यात इतर बाबतीत भानावर असणारेही आपापल्या या स्वयंघोषित श्रेष्ठींसंदर्भात संपूर्ण अविवेकी श्रद्धा ठेवून असतात.

    म्हणजे (आर्थिक) हितसंबंधांमुळे वा सहप्रवासी असल्याच्या भावनेतून या सामूहिक दृष्टिकोनाचा– एका प्रकारच्या समूह-मनाचा उगम होताना दिसतो. त्या पंथाचा, पक्षाचा वा संघटनेचा डोलारा या परस्पर-संबंधांवर उभारलेला असतो. या आधी आपण कर्मकांड वा टोळीच्या ओळखीबाबत जसे पाहिले, तसेच इथेही कार्यकारणभाव उलट करून पाहिले तर? आर्थिक असोत वा भावनिक, परस्परसंबंध निर्माण करण्याचा टप्पा वगळून व्यापक मानवी समाजामध्ये सामूहिक दृष्टिकोनाची थेट रुजवणूक करता आली तर...?


    समूह-मनाची गरज

    बुवाबाबांचे पंथ, वर उल्लेख केलेली सांस्कृतिक संघटना यांसाठी अध्यात्म, धर्म, संस्कृती या आधीच प्रस्थापित सामाजिक बंधांची शिडी करुन हे साध्य करताना दिसतात. पण मनाचे हे दुय्यम (secondary) उद्भव पकडण्याऐवजी थेट ‘या मनाचे त्या मनाशी’ बंध निर्माण केले, तर त्यातून तयार झालेल्या समाजाला आर्थिक, सामाजिक, कर्मकांड, नीतिनियम यांच्या शिवायही एकत्र बांधून घालता येईल, त्यांचा एक विशाल सहजीवी समुदाय निर्माण करता येईल. एका ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थेचे बीज रुजवता येईल.

    संकल्पचित्र: https://jonathanwarden.com/the-hive-mindयेथून साभार.

    अशा व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तिच्या मनामध्ये इतरांच्या भाव-भावनांची स्पंदने उमटतील. त्याने होईल असे की बेगुमानपणे चलन-संकलन करत मोकाट धावणार्‍याच्या मनामध्ये त्याने तुडवलेल्या, सामाजिक वा आर्थिक स्तरावर त्याच्याहून खाली असणार्‍याच्या आयुष्यातील गरजांचे, वेदनांचे प्रतिध्वनी उमटतील. त्याचवेळी या दोघांच्याही मनात या सार्‍यांच्याच गरजा नि सुखलोलुपतेचे चोचले पुरवण्यासाठी विध्वंस झालेल्या निसर्गाचे आक्रंदनही प्रतिबिंबित होईल. नागरी, सुखलोलुप आयुष्याने नाहीशी केलेली संवेदनेची पुरी साखळी जोडली जाऊन विकास अथवा प्रगतीचे प्रत्येक पाऊल काय काय किंमत वसूल करते याची जाणीव प्रत्येक मनात उमटत राहील.

    यातून हव्यासाला मोकाट न सोडता, निसर्गाचा तसंच श्रम नि ऊर्जेचा अपव्यय टाळून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्याचा डोळसपणा त्यांच्या रुजेल. फक्त त्यासाठी या समूहजीवी व्यवस्थेला असलेली बाह्य प्रतिस्पर्ध्यांची गरज मोडून काढून, शत्रूलक्ष्यी विचारांना आणि मांडणीला तिलांजली देण्याची गरज आहे. ‘प्लरिबस’ या मालिकेमध्ये रुजवली गेलेली समाजव्यवस्था या समूह-मनाच्या संकल्पनेच्या आधारे उभी केली आहे.

    एकुणात समूह-मालकी, समूह-वसती, सहकार या संकल्पना समाजाला पुरेशा एकसंघ करीत नाहीत असे सिद्ध होत आले आहे. समाजातील व्यक्तिंच्या विचारक्षमतेचे स्वतंत्र अस्तित्वच लयाला गेल्याखेरीज एकसंघता साधणे शक्य नाही(२) हे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर अशी व्यवस्था ही केवळ भौतिक व्यवस्था असणार नाही, ती समूहाच्या मानसिकतेलाच एकत्र आणणारी असावी लागते. मग त्याचा परिणाम म्हणून भौतिक जगण्याचे धागेही एकत्र गुंफले जाऊ लागतात. या निष्कर्ष वा निकषाच्या आधारे पुढचा टप्पा म्हणून पातळीवर ‘समूह-मना’ची (Hive Mind) ही संकल्पना उभी आहे.


    समूह-मनाची रुजवणूक

    एक प्रस्ताव म्हणून समाज-व्यवस्थेचे नवे प्रारूप मांडणे सोपे आहे. पण त्याची अंमलबजावणी (roll out) करण्यामध्ये व्यावहारिक अडचणी येत असतात. कारण त्यामध्ये अशी ‘अंमलबजावणी करण्यासाठी साधने कुठली असावीत, रुजवण्याची पद्धत काय असावी?’ याचाही जास्तीचा विचार करावा लागतो.

    ही अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम विचारांची रूजवणूक करून त्याआधारे पुढील आराखडा रुजवत जावा? की निव्वळ वैचारिक प्रेरणेवर भर देऊन पुढील बदल सेंद्रीय पद्धतीने होतील अशी आशा करावी? की साम्यवादी प्रारूप म्हणते तसे आधी सत्ता ताब्यात घेऊन त्या सत्तेमार्फत राजकीय व्यवस्था म्हणून लादली जावी? एखाद्या भूभागातील समाजात ही रुजवणूक व्हावी, की एकाच वेळी पुर्‍या मानवी समाजात व्हावी? व्यापक पातळीवर राबवण्यासाठी सर्वत्र एकदम रुजवणूक व्हावी, की एका छोट्या तुकड्यावर आधी रुजवून त्याच्या यशापयशाच्या आधारे, चुका सुधारून नि तेथील यशाची द्वाही फिरवत पुढील टप्प्यांकडे जावे?

    मानवी उत्क्रांती ही हजारो वर्षे चालू असलेली प्रक्रिया आहे. पण ती काही कुणी हेतुत: चालना दिलेली प्रक्रिया नव्हे, तसंच असुरक्षित, भयगंडाने ग्रासलेली माणसे मानतात त्या कुण्या एका सर्वशक्तिमान नियंत्रक व्यवस्थेच्या संपूर्ण कह्यात असलेली यंत्रणाही. तिथे बहुविध प्रेरणा नि कृती आहेत, त्यांचा एकत्रित परिणाम दाखवणारे प्रारूप असे त्याचे ढोबळ स्वरूप आहे. ती काही एका निश्चित दिशेने केली जाणारी वाटचाल नव्हे की नियंत्रित करण्याजोगी प्रक्रियाही. त्यामुळे प्रवास चालू असलेली गाडी थांबवून, वळवून ‘अप’ ची पुन्हा ‘डाऊन’ करता यावी इतके ते सोपे नाही. आजवरच्या मानवी वाटचालीमधून असंख्य अपरिवर्तनीय असे बदल झाले आहेत, त्यांना पोटात घेऊनच नवी व्यवस्था उभी राहायला हवी.

    https://t3.ftcdn.net/ येथून साभार.

    त्यामुळे ही नवी ‘समूह-मनाची’ व्यवस्था समाजामध्ये आरोपितच (install) करावी लागेल, उत्क्रांतीप्रमाणे अकर्मक पद्धतीने रुजत जाण्याची वाट पाहाणे शक्य नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्य व्यवस्थेचे लाभधारक असलेल्या, बदलांच्या विरोधात उभे असलेल्यांची संख्या– संख्येपेक्षाही सत्ता, तिला उध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार, हे ही ओघाने आलेच. त्यांना प्रत्याघातासाठी पुरेशी संधी वा उसंत न देता, लहानशा कालखंडात एखाद्या शस्त्रक्रियेसारखी ही व्यवस्था वेगाने प्रस्थापित व्हायला हवी.

    अल्पावधीत घडवून आणलेल्या अशा बदलांना मानवी इतिहासात ‘क्रांती’ असे म्हटले जाते. परंतु हा शब्द प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेमधील बदलाच्या संदर्भात वापरला जातो. आपण या क्षणी बोलत आहोत ती मानवी मनाची जडणघडण बदलणार्‍या क्रांतीबाबत. मानवी मनाच्या संदर्भात ही क्रांती कशी साध्य करावी याचा विचार करताना, मला संगणक-क्षेत्रातील एक रूपक वापरण्याचा मोह होतो आहे. माणसाच्या आदिम टोळीजीवनाकडून एक वळसा (detour) घेऊन मी थेट संगणकाच्या जगात शिरणार आहे.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » अद्यतनीकरण (Update)

    टीपा:

    (१). यामध्ये डेन्मार्क, नॉर्वे नि स्वीडन ही स्कँडिनेविअन राष्ट्रे आणि फिनलंड, आईसलंड या दोन राष्ट्रांचा समावेश होतो. मध्य युरपमधील स्वित्झर्लंड हे राष्ट्रदेखील बहुतेक वर्षी समाधानी राष्ट्रांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवते आहे. [↑]

    (२). मुळात अशी व्यक्ति-ओळख पुसून टाकणारी एकसंघता आणावी का, ती व्यवस्था खरंच कल्याणकारी असेल का? प्रत्येकाच्या विचारक्षमतेचे स्वतंत्र अस्तित्व लयाला जाण्यामध्ये गुलामगिरीची व्यवस्था निर्माण होण्याचा मोठाच धोका निर्माण होतो. मोजक्यांच्या हाती सत्ता नि उरलेला स्वतंत्र विचारक्षमता नसलेला त्यांच्या आदेशांवर चालणारा व्यापक समाज अशी व्यवस्था निर्माण होऊ शकते. ही व्यवस्था सर्वकल्याणकारी होऊ शकेल का? या प्रश्नांचा विचारही करायला हवा. गांधींजीनी मांडलेली श्रेष्ठींच्या विश्वस्तपणाची कल्पना अथवा सामाजिक हिताच्या प्रेरणेने भारलेल्या मूठभरांच्या अधिपत्याखालील साम्यवादी व्यवस्था या काहीशा याच वळणाने जाताना दिसतात. धर्मसंस्थाही व्यवस्था म्हणवून घेत नसली तरी अशीच बहुसंख्येच्या हिताचा विचार करण्याची जबाबदारी नि अधिकार मूठभरांना प्रदान करते. या तीनही प्रकारांत नि लोकशाहीसारख्या अन्य व्यवस्थांमध्येही अखेरीस हे तळे राखणारेच फक्त पाणी चाखताना दिसतात.[↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: