Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, २६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ४ : संग्रह ते व्यापार

  • समूहाची ओळख « मागील भाग

    https://www.sugiproject.com/ येथून साभार.

    मानवी संस्कृतीच्या उदयकालात मानव हा संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) या तीन प्रकारांनी आपले अन्न मिळवताना दिसतो. संग्रहामध्ये प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहार– जसे फळे, बिया वगैरे अंतर्भूत होतो. अपहारामध्ये मध, पक्ष्यांची अंडी, एखाद्या शिकारी प्राण्याच्या शिकारीवर डल्ला मारणे आदींचा समावेश होतो.

    माणूस आणि प्राणी यांच्या सहजीवनाची सुरुवात कुत्र्यांपासून झाली असं म्हटलं जातं. कॉनरॅड लोरेन्झ नावाच्या एका वर्तनवैज्ञानिकाने (ethologist) ’Man Meets Dog’ नावाच्या पुस्तकात माणूस आणि कुत्रा यांच्या सहजीवनाच्या वाटचालीची एक काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. माणसाच्या टोळी मागे सोडलेल्या अतिरिक्त अन्नाच्या वाट्यावर पोसले गेलेले कोल्हे त्यांच्या कुशाग्र घ्राणेंद्रियांच्या आधारे माणसाला शिकारीस साहाय्यभूत ठरत जातात, नि यथावकाश त्या दोन टोळ्यांचे सहजीवन सुरु होते अशी त्यामागची कल्पना आहे.

    माणसाला शेतीचा शोध लागला तेव्हा तो भौगोलिकदृष्ट्या स्थिर झाला, नागर झाला. शिकारजीवी आयुष्यामध्ये अन्य जातीय प्राण्याला ‘माणसाळवण्याचा’ प्रयोग यशस्वी झाल्यामुळेच शेतीच्या आगेमागेच ‘प्राण्यांची शेती’ अर्थात पशुपालनाचाही प्रेरणा मिळाली असावी. त्यातून मग शेळ्या-मेंढ्या, डुकरे, गायी, कोंबड्या यांना आपल्या परिसरातच सांभाळण्यास सुरुवात केली. यातील बहुतेक प्राणी हे दूध, अंडी, शेतीमध्ये खत म्हणून वापरता येणारी विष्ठा यांच्यासह मांसाचा हुकमी स्रोत म्हणून कामी येऊ लागले.

    जंगलजीवी, शेतीजीवी समाज हा अनायासे समूहजीवीही होता. परंतु जेव्हा कुटुंब-वंश व्यवस्था फोफावली, तेव्हा उत्पादन-कौशल्य वंशपरंपरागत झाले. विशिष्ट उत्पादनावर सातत्याने काम करत राहिल्याने उत्पादनाचा दर्जा नि वेग वाढत गेला. गरज वा मागणीनुसार नव्हे, तर उत्पादकाला सोयीचे असेल तेव्हा उत्पादन तयार करुन सिद्ध ठेवता येऊ लागले. पुढे ते ज्याला नि जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा ते पुरवणे शक्य झाले. दोघांकडे असलेल्या वस्तू वा सेवा यांची परस्परांना मान्य होईल अशा विनिमय दराने एकमेकांना आवश्यक असलेल्या वस्तू वा सेवा यांचे देवाण-घेवाण होऊ लागली. विनिमयाची पद्धत रूढ झाली.

    शेतीने बांधलेल्या समाजाप्रमाणे या उत्पादकाचा ग्राहक निश्चित नसल्याने हे दोघे परस्परावलंबी आयुष्य जगत नव्हते. प्रत्येक वस्तू वा सेवा यांचे अस्तित्व समाजाच्या सामूहिक गरजेपासून स्वतंत्र झाले. उत्पादक आणि ग्राहक एका समाजव्यवस्थेने बांधलेला असण्याची गरज उरली नाही. त्यामुळे या विनिमय व्यवहारामध्ये देणारा नि घेणारा एकाच टोळीचा, समाजाचा भाग असण्याची गरज उरली नव्हती. परक्या समाजातील उत्पादकाकडूनही गरजेची वस्तू घेणे शक्य झाले. यातून संभाव्य ग्राहकसंख्या वाढल्याने देवाणघेवाणीच्या सोयीसाठी अतिरिक्त उत्पादनाला वाव मिळू लागला, जे कौशल्य नि तंत्राच्या विकासाने साध्य होऊ लागले. यामुळे आपल्या टोळी वा समाजाच्या कौशल्य वा अधिकारक्षेत्रात उपलब्ध होऊ शकत नसलेले उत्पादनही उपभोग्य होऊ शकले आणि तिच्या गरजांची कक्षा रुंदावली.

    कक्षा या शब्दामुळे मला रसायनशास्त्रातील मूलद्रव्यांच्या अभ्यासातील रासायनिक अभिक्रियेची आठवण झाली. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असू शकते याची एक क्षमता (capacity) असते. हे इलेक्ट्रॉन अणुकेंद्राभोवती एकाहुन अधिक कक्षांमध्ये ते फिरतात(?). पैकी पहिल्या कक्षेमध्ये जास्तीतजास्त दोन, तर पुढील प्रत्येक कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन असू शकतात. ज्यांच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या क्षमतेइतकी असते अशी मूलद्रव्ये स्वयंसिद्ध (प्रामुख्याने noble किंवा inert gases) असतात. ती कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेऊन संयुगाची निर्मिती करू शकत नाहीत. स्वयंपूर्ण टोळी ही त्या स्वयंसिद्ध मूलद्रव्यांसारखी असते.

    उलट ज्या मूलद्रव्यांच्या अणूतील एखाद्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्सची कमतरता (valency) असते, अशी मूलद्रव्ये इतर मूलद्रव्यांशी अभिक्रिया करताना त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन स्वीकारून कक्षेची क्षमता पुरी करण्याचा प्रयत्न करतात. त्याद्वारे नव्या संयुगाची निर्मिती होत असते. विनिमयाची प्रक्रिया या रासायनिक अभिक्रियेतील इलेक्ट्रॉनप्रमाणे केवळ गरजांच्या देवाणघेवाणीतून दोन टोळ्यांचे सहजीवन प्रस्थापित करू शकते. शिकारजीवी असताना ज्या टोळ्यांमध्ये शत्रुत्वाखेरीज कोणतेही संबंध असू शकत नव्हते, त्या टोळ्यांनी विनिमयाद्वारे आपल्या कक्षा रुंदावल्या नि परस्परांशी व्यावहारिक बंध निर्माण केले.

    पण अशा तर्‍हेने अन्य टोळीकडून आपल्या गरजा भागवू पाहणारी टोळी परावलंबी झाली. तिच्या काही उपभोग्य वस्तूंचे उत्पादन तिच्या नियंत्रणाच्या बाहेर गेले. त्यातील माणूस स्वत:च्या टोळीप्रमाणेच अन्य टोळी वा समाजाशी बांधला गेला नाही, तरी व्यावहारिक नाते जोडू लागला. टोळीची, समाजाची वीण सैल होऊ लागली.

    विनिमयपूर्तीमध्येही एक बंधन अजूनही शिल्लक होते आणि ते होते ‘उपलब्धते’चे! समजा मला एका उत्पादनाची गरज निर्माण झाली आहे नि ते एका व्यक्तीकडे अतिरिक्त म्हणून उपलब्ध आहे. पण त्या व्यक्तिलाही काही गरजा आहेत. पण त्यातील एकही गरज भागवण्याजोगे उत्पादन वा सेवा देणे मला शक्य नसेल, तर मला आवश्यक वस्तू तिच्याकडून मिळणार नसते.

    ‘इस हाथ दे, उस हाथ ले’ या व्यवस्थेत हा समतोल गरजेचा असे. म्हणजे माझ्याकडे देय असलेल्या गोष्टींच्या मोबदल्यामध्ये मला हवी ती गोष्ट देऊ करणारीच व्यक्ती वा गट मला शोधावा लागे. यातून माझे पर्याय नि म्हणून अनुकूल व्यवहार करण्याची कुवत (bargaining power) कमी होत असते.

    या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आधारवस्तूची संकल्पना अंमलात आणली गेली. गणितामध्ये, मोजमापामध्ये जसे अंक, अंतराची एकके (फूट, वीत वगैरे) यांच्या पटीत मोजमापे केली जात, तसे मुबलक उपलब्ध असलेल्या तिसर्‍या वस्तूच्या (उदा. कवड्या, एखाद्या वृक्षाच्या दीर्घजीवी बिया) संदर्भात दोन्हींची ‘किंमत’ निश्चित करुन एकतर्फी व्यवहार पार पाडला जाऊ लागला. इथे देणारी व्यक्ती कदाचित ती सामायिक वस्तूच घेई (जी पुढे तिला गरजेची अन्य वस्तू घेण्यास उपयोगी ठरे) वा तितके ‘श्रेय’ अथवा ‘वायदा’ (credit) घेई. भविष्यात घेणार्‍याकडून आवश्यक वस्तू घेताना हा वायदा वापरला जाई. या एकतर्फी व्यवहारांतून देवाणघेवाणीच्या दोन बाजू सुट्या झाल्या. देवाण नि घेवाण हे एकाच व्यवहाराचे भाग असण्याची गरज संपली. एका विनिमय-व्यवहाराचे रूपांतर ‘खरेदी’ नि ‘विक्री’ अशा दोन स्वतंत्र व्यवहारामध्ये झाले आणि या दोन्हींला आधार म्हणून चलनाची संकल्पना उभी राहिली.

    एखाद्या उत्पादकाला त्याच्याकडील उत्पादनाच्या परताव्याच्या मर्यादेतच (उत्पन्न) आपल्या सर्व गरजांचे नियोजन करावे लागे. एखादे वेळी काही कारणाने ते उत्पादन कमी झाले असेल, तर त्या उत्पादनाचा प्रतिनग विनिमय दर वाढवणे अपरिहार्य ठरे. आजच्या भाषेत ते महाग होई. हे विनिमय व्यवस्थेमध्ये करणे जिकीरीचे होते, परंतु चलनाच्या आधाराने तसे करणे अधिक सोपे आहे.

    https://shabbir.in/buy-bse-sell-nse/येथून साभार.

    पण त्या एका उत्पादकाची लहर वा निर्णय म्हणून हे घडू शकत नाही. त्या वाढवलेल्या मूल्यासह व्यवहार करणारा ग्राहकही मिळायला हवा. शिवाय आता उत्पादक हा समाजव्यवस्थेपासून सुटा झाल्याने एकाहुन अधिक उत्पादक स्वनिर्णयाने त्याच उत्पादनाचे उत्पादन करु शकत असे. त्यामुळे खरेदी करु इच्छिणार्‍याला एकाहुन अधिक ‘विक्रेते’ उपलब्ध झाले. त्यातील एकाने मूल्य वाढवले, तर ग्राहक सहजपणे दुसर्‍या विक्रेत्याकडे जाऊ शकतो. म्हणजे ज्याने उत्पादनाचे मूल्य– खरेदीची किंमत– वाढवले, त्याचे उत्पादन विकले न जाण्याची शक्यता वाढली.

    पण उलट दिशेने टोळीबाह्य विनिमयाच्या संकल्पनेमुळे ग्राहकाला जसे उत्पादकांचे पर्याय उपलब्ध झाले, तसे उत्पादकाच्या संभाव्य ग्राहकांचे क्षेत्रही विस्तारले. आता दोनही बाजूंना आपापल्या गरजेचा अधिक स्वतंत्रपणे विचार करणे शक्य झाले. त्यातून उत्पादकाला नि ग्राहकाला संभाव्य ग्राहक नि संभाव्य उत्पादक (पुरवठा) यांचा विचार करून ‘वाजवी किंमत’ निश्चित करता येऊ लागली. आणि जेव्हा विक्रेता नि ग्राहक दोघांना मान्य असलेली किंमत निश्चित होई तेव्हा व्यवहार पुरा होई. म्हणजे ही किंमत निश्चित करताना मागणी नि पुरवठा या दोहोंचाही विचार अंतर्भूत झाला.

    वस्तूचे मोल हे निव्वळ गरजेनुसार वा उत्पादनखर्चानुसार न ठरवता उपलब्धता नि मागणी यांच्या वास्तविक स्थितीच्या आधारे ठरवणारा हा ‘मूल्य निर्धारणाचा सिद्धांत’ पुढे नव्या व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. आता विनिमय-व्यापाराने सहजीवनाचे बंध सैल केले असले, तरी स्वत: व्यापार हा स्वत:च एका नव्या व्यवस्थेने - अर्थव्यवस्थेने - बांधला गेला. बंदिस्त सामाजिक व्यवस्थेची जागा बंदिस्त अर्थव्यवस्थेने घेतली.

    परंतु या आधारवस्तूला– चलनाला– विनिमयाचा आधार म्हणून टोळी वा समाजाने (अथवा ज्या व्यक्तिंना वा गटांना आपसांत असे व्यवहार करायचे आहेत त्यांनी) मान्यता द्यावी लागते, जेणेकरुन तिला सर्वच व्यवहारांमध्ये मान्यता राहील नि ती प्रवाही राहू शकेल. मोजक्याच व्यवहारांत तिला मान्यता मिळणार असेल, तर ती मोजक्यांकडे एकवटली जाईल नि तिचे खरेदी-मूल्य घटत जाईल. त्यायोगे तिचा वापरही हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे हे चलन एका समाजव्यवस्थेला बांधले जायला हवे. व्यापक नागरीकरणानंतर चलन हे समाजव्यवस्थेला नव्हे, तर राजकीय व्यवस्थेला बांधले गेले आहे.

    चलनाच्या आधाराने उपलब्धतेनुसार, शक्य असेल तेव्हा, हे सुटे खरेदी वा विक्रीचे व्यवहार होऊ लागले. ‘गरज’ नसतानाही होऊ लागले. व्यापारव्यवस्थेचा उदय झाला. टोळी वा शेती/शिकारप्रधान समाजामध्ये व्यक्तीचे कार्यस्वातंत्र अतिशय किमान पातळीवर असते. बहुतेकांना आपले कार्य निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. व्यापारप्रधान समाजाने हे बंधन बरेचसे सैल केले आहे. आपला उदरनिर्वाह करण्यास आपण कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावे वा सेवा पुरवावी याची निवड करण्याचे स्वातंत्र्य या व्यवस्थेमध्ये आहे. इतकेच नव्हे तर निव्वळ उत्पादन नि थेट सेवा यांच्यादरम्यान वितरण (distribution), प्रसिद्धी (publicity), प्रशिक्षण (training), विपणन (marketing) अशी विविध नवी कौशल्याची क्षेत्रे खुली झाली आहेत.

    विशेष म्हणजे जगभरातील उत्पादन वा सेवांच्या संख्येच्या तुलनेत मोजक्या संख्येने असलेल्या विविध राजकीय व्यवस्थांच्या या चलनांमध्ये आपसांत विनिमय व्यवस्था चालू राहिली आहे. या सार्‍यांना बाजूला सारून जगातील सर्वच व्यवहारांना सामायिक असे एकमेव जागतिक चलन निर्माण करण्याइतपत सहजीवनाचे महत्त्व जगभरातील समाजांना वा त्यांच्या धुरिणांना वाटत नाही. नफ्याला नि म्हणून व्यापाराला असलेल्या त्यांचे प्राधान्यामुळे, अशा चलनामुळे निर्माण होणार्‍या व्यावहारिक अडचणी टाळणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. म्हणून ती कल्पना अंमलात आणणे आजवर टळले आहे.

    संपूर्ण जगाचे नाही तरी युरपिय राष्ट्रांचे ‘युरो’ हे एक चलन निर्माण केले आहे. पण त्याचे तोटेही दिसून आले. दोन देशांतील चलनांच्या विनिमय मूल्यांमध्ये असलेला फरक जिथे उपयुक्त ठरत होता, तिथे हे सामायिक चलन काही देशांच्या गळ्याचा फास बनून राहिले आहे. २००८ च्या मंदीच्या काळात कर्जबाजारी झालेला ग्रीस या सामायिक चलनाच्या साखळदंडामुळे अधिक खोल रुतत गेला. या उलट आपले स्वतंत्र चलन राखणारे आईसलँडसारखे छोटे बेट-राष्ट्र स्थानिक उपाय राबवून त्यातून वेगाने बाहेर येऊ शकले. म्हणजे सहजीवन ही निरपवाद श्रेष्ठ समाजव्यवस्था आहे असे निदान चलनासंदर्भात तरी म्हणता येत नाही.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » सहजीवन आणि अर्थकारण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: