-
मिथ्यकथांची प्रतिबिंबे (पूर्वार्ध) « मागील भाग
ट्रॉयचे युद्ध हे हेलनमुळे– एका स्त्रीच्या अपहरणामुळे उभे राहिले होते. असेच युद्ध रामायणकथेमध्ये सीतेच्या अपहरणामुळेही झाले होते. या दोघींचे आयुष्य बरेचसे समांतर जात असल्याचा उल्लेख या मालिकेच्या तिसर्या भागात आलेला आहे. लंका नि ट्रॉय या दोन्हीं राज्यांवर हल्ला करण्यास आक्रमणकर्त्यांना समुद्र लंघून जाणे आवश्यक होते. लंका भरतखंड म्हटल्या जाणार्या मुख्य भूमीपासून सुटी, बेट म्हणून उभी होती. दुसरीकडे ट्रॉय नि ग्रीक राज्ये एजिअन समुद्राच्या दोन भिन्न किनार्यावर वसलेली होती. ग्रीस हा आजच्या युरपचे दक्षिण टोक, तर ट्रॉय हे आजच्या तुर्किये (तुर्कस्तान) म्हणजे आशिया मायनर या भागात वसलेले. या दोनही युद्धांत नवी भूमी पादाक्रांत करण्याचा पैलूही मिसळलेला आहे.
हेलन आणि सीताहेलन ही स्पार्टाची राजकन्या. तिचे स्वयंवर रचल्याचा उल्लेख येथील चौथ्या भागात आलेला आहे. ते खर्या अर्थाने ‘स्वयं’वर आहे. आपला पती कोण असावा याची निवड करण्याचे स्वातंत्र्य तिला आहे. त्यासाठी अनेक राजे तिच्या प्राप्तीच्या अभिलाषेने स्पार्टामध्ये जमले होते.
बहुतेक क्षत्रियकन्यांच्या स्वयंवरांची परिणती ही संभाव्य वरांच्या संघर्षात होत असते. ज्याप्रमाणे एखाद्या क्षत्रियाची पत्नी हिरावून घेणे हे त्याच्या क्षत्रियत्वाला आव्हान समजले जाई, त्याचप्रमाणे स्वयंवरासाठी जमलेल्या राजांमधून एकाची निवड करणे हे इतरांना अपात्र वा दुय्यम ठरवण्यासारखे असल्याने या नाकारलेल्यांपैकी एक वा अधिक राजे शस्त्रबळावर त्या उपवर स्त्रीला पळवून नेण्याचा प्रयत्न करीत. सीतेच्या विवाहप्रसंगी असा कोणताही संघर्ष झालेला नसला, तरी महाभारत कथेमध्ये द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये मात्र लक्ष्यभेदाचा पण पुरा करुन द्रौपदीचा भावी पती ठरलेल्या अर्जुनावर कर्ण-दुर्योधनासह इतर राजांनी हल्ला केला होता(१).
होमरच्या ‘इलियड’मधील कथानक असे सांगते की हा धोका ध्यानात घेऊनस हेलनच्या पित्याने ‘टिंडेरस’ याने इथाकाचा राजा ओडिसिअसला मध्यस्थ म्हणून पाठवून ‘असा संघर्ष आजच नव्हे तर भविष्यातही होणार नाही’ याची हमी सर्व राजांकडून घेतली होती. हेलनने (वा टिंडेरसने) सत्ता नि संपत्ती या दोन्हीने श्रेष्ठ अशा मिनेलॉसची निवड केली.
परंतु काही ठिकाणी याची पर्यायी कथा आढळते, या लेखनप्रपंचाची सुरुवात ज्यातून झाली त्या मालिकेमध्ये याच कथेचा उल्लेख आहे. यामध्ये अशी कोणतीही शपथ वगैरे घेतली गेलेली नाही. त्रिखंडसुंदरी म्हणून विख्यात असलेल्या(२) हेलनशी विवाह करण्याच्या हेतूने आलेल्या राजांमध्ये संघर्ष झाला. अर्गोसचा राजा अगामेम्नॉन याने या सर्वांचा पराभव करुन या हेलनला बळाने जिंकून घेतले(३) नि आपल्या धाकट्या भावाशी तिचा विवाह लावून दिला. स्पार्टाचे राज्यही त्याच्या स्वाधीन केले. म्हणजे हेलनही एका अर्थी सीता वा द्रौपदीप्रमाणे वीर्यशुल्काच म्हणावी लागेल. फक्त संभाव्य पतीच्या यशासाठी लावलेला निकष हा तिने वा तिच्या वडिलांनी ठरवलेला नव्हता.
तिच्या विवाहाची ही कथा रामायणातील सीता, द्रौपदीपेक्षा महाभारतातील अंबिका, अंबालिका या काशीच्या राजकन्यांशी अधिक जुळते. भीष्मांनी त्यांच्या वडिलांचा युद्धात पराभव करुन, अंबा या तिसर्या बहिणीसह या दोघींना जिंकून आणले होते. त्यानंतर त्या दोघींचा आपला धाकटा - सावत्र - बंधू विचित्रवीर्य याच्याशी त्यांचा विवाह लावून दिला(४).
सिसिलीअन (इटालियन) कवी स्टेसिकोरस याच्या रचनांमध्ये एक रोचक घटना सापडते. पॅरिसने ‘सर्वात सुंदर स्त्री’ म्हणून अफ्रोडाईटीला सोनेरी सफरचंद दिले नि आपल्याला डावलले, याचा राग झ्यूसपत्नी हेराच्या मनात खदखदत होता. त्यामुळे पॅरिस आणि हेलन यांच्या अफ्रोडाईटीने योजलेल्या मीलनामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न तिने केला. एक कथा असे सांगते, की स्पार्टामधून निघालेल्या पॅरिस आणि हेलन यांच्या जहाजाला अडथळा करण्यासाठी तिने वादळ निर्माण केले. त्यामुळे भरकटलेले ते जहाज दक्षिणेकडे इजिप्तमध्ये जाऊन धडकले(५). इथे देवांनी हेलनच्या जागी ढगांपासून बनवलेली ‘नेफिली’ (नेफिली ही ढगांची निम्नदेवता. कदाचित तिने हे कार्य केले असेल) नावाची तिची प्रतिकृती ठेवून मूळ हेलनला सुरक्षितपणे स्पार्टाला पोहोचवून दिले.
विशेष म्हणजे अशाच प्रकारची कथा सीतेच्या संदर्भातही सापडते. रामायणाच्या काही संस्करणांमध्ये असे सांगितले जाते, की ‘रावण सीतेचे अपहरण करणार’ याची रामाला/अग्निला आधीच कल्पना होती. त्यामुळे (रामाने) सीतेला अग्निप्रवेश करायला लावून, तिची एक छाया-आवृत्ती निर्माण केली. मूळ सीता अग्निदेवाकडे सुरक्षित राहिली नि रावणाने या छाया-सीतेचे अपहरण केले. पुढचा कथाभाग सर्वविदित आहेच. लंकेचा पाडाव केल्यावर मुक्त केलेली सीता जेव्हा रामासमोर येते, तेव्हा ‘लोकमानसाच्या शुद्धीसाठी’ तिने अग्निपरीक्षा द्यावी असे राम म्हणतो, तेव्हा या छाया-सीतेचा संदर्भ जुळवला जातो. या अग्निपरीक्षेदरम्यान ही छाया सीता जळून जाते नि मूळ सीता अग्निदेव रामाला परत करतो असे ही कथा सांगते.
शीलसंकल्पनेचा अतिरेक होऊन परपुरुषाच्या स्पर्शाबाबत अतिसंवेदनशील झाल्यानंतर दोन्ही परंपरांमधील वाचक/श्रोत्यांना परपुरुषाने आपल्या राणीला केलेला स्पर्श डाचू लागला असावा. मग दोन्ही परंपरांतील कथेकरीबुवांनी हा पूर्वरंग निर्माण करून हे परस्पर्शाचे किटाळ टाळले आहे हे सहज ध्यानात येण्याजोगे आहे.
या दोघीही पतीपासून दूर (सीता बंदिवासात, तर हेलन स्वेच्छेने) अन्य नगरात असताना, त्यांच्या पतीच्या एका साहाय्यक राजाचा दूत गुप्तपणे नगरात प्रवेश करुन त्यांना ते आत आले त्याच मार्गाने सुखरूपपणे पतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सीतेसाठी हनुमानाने हे दिव्य केले आहे, तर हेलनला नेण्यास ओडिसिअस या राजाचा लढवय्या अकिलीस(६) हा गुप्तपणे ट्रॉयमध्ये शिरलेला आहे.
सीतेच्या सुटकेसाठी गुप्तपणे लंकेत प्रवेश केलेल्या हनुमानासोबत लंकेतून निसटून जाण्याचे नाकारून ‘आपल्या पतीनेच आपला सन्मान आपल्याला परत मिळवून द्यायला हवा’ असे ती निक्षून सांगते. याउलट हेलन स्वत:हून आपल्या प्रियकराकडे आलेली असल्याने तिथून परत पतीकडे जाण्याची तिची इच्छा नाही. (पुढे ती स्वत:च तो निर्णय घेते तेव्हाही परिस्थिती फार बदललेली असते असे नाही. ) म्हणजे दोघींचा निर्णय एकच आहे, पण कारण विरूद्ध आहे.
हेलन नि सीता यांच्या भूमिकाच परस्परविरुद्ध अशा आहेत. सीता ही आपल्या पतीशी एकनिष्ठ होती. याउलट हेलन पतीशी प्रतारणा (?) करुन आपल्या प्रियकरासोबत स्वत:च गेलेली आहे– म्हणजे निदान इलियडचा लेखक तसे सांगतो आहे. लंकेच्या युद्धाची अखेर सीतेचे स्वातंत्र्य तिला परत देणारी आहे, तर ट्रॉयचा विध्वंस हा हेलनचे स्वातंत्र्य हिरावून तिला पुन्हा पिंजर्यात बंदिस्त करणारा आहे. लंकेच्या युद्धानंतर सीता नि ट्रॉयच्या युद्धानंतर हेलन आपापल्या पतींकडे परत गेल्या. सीता सन्मानाने, तर हेलन मानखंडना होऊन.
जन्मवियोगप्रायम नि हेकुबा या ट्रॉयच्या राजदांपत्याचा पुत्र असलेल्या पॅरिसचा जन्मत:च त्याग करण्यात आला होता याचा उल्लेख ‘पूर्वरंग’ या दुसर्या भागात आलेला आहे. ही जन्मवियोगाची घटना जगभरातील महानायकांच्या आयुष्यात दिसते. क्षत्रिय वा पुरोहितवर्गाबाहेरील तथाकथित निम्न जमातींमध्ये जन्मलेले अनेक महानायक हे मूलत: तथाकथित उच्चवर्णीयच होते असा ‘शोध’ नंतर लागत असतो.
कर्ण, कृष्ण, सीता आदी भारतीय नायक नायिका, मोझेस हा हिब्रू (ज्यू) नायक, पर्सिअस नि पॅरिस यांसारखे ग्रीक नायक हे सामाजिकदृष्ट्या निम्नस्तरातील जमातींमधून जन्मून स्वकर्तृत्वावर असामान्यत्वाला पोहोचलेले दिसतात. कर्ण हा क्षत्रियांची परिचर्या करणार्या सूतांच्या कुळातला, तर कृष्ण हा गोपालकांच्या जमातीचा. ग्रीक कथांमधील पर्सिअसचा जन्म हा अक्रिसिअसच्या अनुपस्थितीमध्ये आलेल्या दनाईच्या विवाहबाह्य संबंधातून झाला असावा. त्यामुळे संतापलेल्या अक्रिसिअसने तिला जन्मलेल्या मुलासह बुडवण्याचा आदेश दिला आहे. परंतु पुढे पर्सिअसने केलेला पराक्रम पाहाता झ्यूसपुत्र म्हणून त्याची द्वाही फिरवली गेली असावी. एकुणात झ्यूसपुत्र वा देवपुत्र असणे ही जन्मवियोग कथांप्रमाणेच सामान्य कुळातील नायकांना देवत्वाकडे नेण्यासाठी ग्रीकांनी वापरलेली क्लृप्तीच असावी.
मोझेसची कथा उलट आहे. हा फारोहच्या बहिणीचा पुत्र किंवा दत्तकपुत्र. पुढे त्याने ईजिप्तमध्ये हिब्रूंच्या दास्यत्वाविरोधात बंड केले. कोणाचाही विरोध एरवी सहजपणे मोडून काढणार्या फारोहने त्याला कडक शिक्षा न देता त्याला त्याच्या हिब्रू बंडकर्यांसह केवळ हद्दपार केले आहे. हे पाहाता दोघांचे रक्ताचे नाते असल्याची शक्यता बळावते. या हद्दपारीनंतर तो हिब्रूंचा दास्यमोचक ठरला. कदाचित त्यानंतरच ‘तो स्वत: हिब्रू दासपुत्र होता, परंतु फारोहच्या हिब्रू बालकांच्या हत्याकांडातून वाचवण्यासाठी (कर्ण-कृष्णांप्रमाणे) नदीत सोडून दिला गेला नि अखेर तो इजिप्तच्या फारोहच्या बहिणीने दत्तक घेतला’ अशी उलट कथा निर्माण झाली असावी. यातून या हिब्रू-संकटमोचकाला हिब्रू जमातीमध्ये सामावून घेतले गेले असावे.
जन्मवियोग कथांप्रमाणे, देवपुत्र कथांप्रमाणेच 'अवतारकल्पना' ही महानायकांना पचवण्यासाठी वापरली गेलेली क्लृप्ती आहे. ही भारतीयांची खास आहे. वैष्णवांनी या एकाच आयुधासरशी राम-कृष्णांसह अनेक महानायकांना आपल्या कळपात ओढून घेतले आहे. धनगरांचा राजा विठोबाही विष्णूचा अवतार ठरवला जातो तो ही याच चलाखीने.
भारतीय नि ग्रीकच का, इतरही परंपरांमध्ये अशा ऐतिहासिक, पौराणिक, मौखिक परंपरेतील, अभिजन परंपरेतील ग्रांथिक कथा पाहिल्या तर त्यात काही घटनांची, कथनांची, शैलींची, तंत्रांची अशी प्रतिबिंबे एकमेकांत मिसळून गेलेली दिसतात. यांचा प्रवास कुठून कुठे झाला हे शोधण्याचा आटापिटा करण्याचे कारण नसते. अस्मितेचे शेपूट फुटलेल्यांना त्यात रस असतो खरा, पण त्यात ‘मूलस्रोत आमचाच’ या अहंकाराला कुरवाळणारा पुरावा शोधण्याचा एकतर्फी आटापिटाच अधिक असतो.
वास्तविक अगदी आदिम काळापासून माणूस हा स्थलांतर करत आला आहे, स्वत:बरोबर आपल्या कथा, परंपरा, आहारपद्धती, उपासनापद्धती घेऊन जातो आहे तो जिथे स्थिर होईल तिथे स्थानिकांकडून काही-देणे काही घेणे होत राहिले आहेत. ‘अमुक एक संस्कृती’ हे इतिहासावर पोट भरणार्या भाटांचे लेबल आहे, एरवी संस्कृती असलीच तर ती मनुष्यप्राण्याची आहे, ती प्रवाही आहे तशीच जननक्षम नि नाशवंतही. तिच्या अस्सलतेवरुन झगडणारे, तिच्या आधाराने स्वार्थ साधू पाहाणारे तिचे मारेकरीच असतात. शहाण्यांनी एवढे नक्की ध्यानात ठेवावे.
- (समाप्त) -
टीपा:
(१). द्रौपदीही सीतेप्रमाणेच वीर्यशुल्का ठरवली होती. तिने लावलेला पण पुरा करेल त्याच्याशी ती विवाह करणार होती. ज्याप्रमाणे रामाने शिवधनुष्य उचलून पण पुरा केला तसेच अर्जुनानेही लक्ष्यभेदाचा पण पुरा केला होता. परंतु ‘क्षत्रियकन्येचा विवाह हा केवळ क्षत्रियाशीच होऊ शकतो, ब्राह्मणाशी नाही,’ असे म्हणत या मानखंडना झालेल्या राजांनी त्या ब्राह्मणाशी शस्त्रसंघर्ष मांडला होता. पुढे हा अर्जुन आहे हे ध्यानात आल्यावर हा संघर्ष थांबला.[↑]
(२) वास्तविक विवाहप्रसंगी तिचे वय सुमारे ७ ते १२ वर्षे इतकेच असावे. कारण १४ व्या वर्षी ती हर्मायनी या कन्येची आई झाली आहे. इतक्या लहान मुलीच्या ‘सौंदर्याची ख्याती’ सर्वत्र पसरणे वगैरे कथा ऐकून हा समाज जन्मत:च स्त्रीकडे मादी म्हणून पाहू लागत असे की काय अशी शंका येते. [↑]
(३). स्पार्टाचा– हेलनच्या राज्याचा उत्तराधिकारीही तिचा हा नवरा मिनेलॉस ठरला, तिच्या भावांपैकी कुणी नाही. हे पाहाता मला अगामेम्नॉनने हेलनच्या राज्याचा पराभव करुन ते जिंकून घेतल्याची कथा अधिक सयुक्तिक वाटते. अर्थात मिनेलॉसच्या राज्यारोहणाचे समर्थन करण्यासाठी हेलनच्या जुळ्या भावांची कथाही सोयीनुसार वळवून त्यांना सत्तेबाहेर ठेवले गेले आहे.
माझ्या मते ‘इलियड’मधील तथाकथित शपथेचे कथानक केवळ ‘ट्रॉयच्या युद्धावेळी सर्व ग्रीकांनी अगामेम्नॉनला साथ का दिली?’ या प्रश्नाचे उत्तर देणारे दुबळे समर्थन तयार करणे आहे इतकेच.[↑]
(४). अंबेने मात्र ‘आपण राजा शाल्वाला मनाने वरल्याचे सांगून त्याच्या खेरीज इतर कुणाशी विवाह करणार नाही’ असे बाणेदारपणे सांगितल्याने तिला मुक्त करण्यात आले. [↑]
(५). काही ठिकाणी दक्षिण-पूर्व दिशेस फीनिशिया (आजचा लेबनॉन-सीरियाचा भूभाग) वा सायप्रसमध्ये पोहोचल्याचा उल्लेख आहे. [↑]
(६). एका कथेनुसार हा तिचा भविष्यातील व्याही. ट्रॉयचे युद्ध संपल्यानंतर (त्यात अकिलीसचा पॅरिसच्या हातून मृत्यू झाल्यानंतर) हेलनची मुलगी हर्मायनी हिचा विवाह पुढे त्याचा मुलगा निओटॉलिमस याच्याशी झाला. [↑]
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, २२ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ७. मिथ्यकथांची प्रतिबिंबे (उत्तरार्ध)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा