Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २० जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ६. मिथ्यकथांची प्रतिबिंबे (पूर्वार्ध)

  • काही बिंदू आणि एक आलेख « मागील भाग

    [ मागील भागाच्या अखेरीस हा अखेरचा भाग असेल असे म्हटले होते. परंतु बराच मोठा झाल्याने दोन भागांत विभागणे भाग पडले आहे. पुढील भाग हा अंतिम भाग असेल.]
    ---


    अकिलीस आणि ओडिसिअस

    ट्रॉयच्या युद्धादरम्यान दोन्ही बाजूंनी जे प्रमुख योद्धे सहभागी झाले होते, त्यांत राजकुलातील अगामेम्नॉन, मिनेलॉस, हेक्टर आणि पॅरिस हे चौघे तर होतेच पण त्या खेरीज दोघा ग्रीक योध्यांचा उल्लेख विशेषत्वाने येतो. ते होते ओडिसिअस आणि अकिलीस.

    यापैकी पहिला होता इथाकाचा राजा नि कवी होमरच्या ‘ओडिसी’ या महाकाव्याचा नायक ओडिसिअस. ट्रॉयच्या युद्धाचे बरेच तपशील हे ‘ओडिसी’मध्ये त्याच्या स्मरणांच्या स्वरूपामध्ये सापडतात. बुद्धिमान आणि युद्धाच्या डावपेचामध्ये तरबेज असा हा योद्धा, ट्रॉयच्या युद्धामध्ये संयुक्त ग्रीक सेनेचा सेनापती म्हणून अगामेम्नॉनने याची नेमणूक केली आहे. वैय्यक्तिक आयुष्यामध्येही सर्व ग्रीक राज्यांत ज्याच्याबद्दल आदरयुक्त भीती नि सद्भाव आहे अशी व्यक्ती. हेलनच्या स्वयंवरामध्ये संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी टिंडेरसने शांतिदूत म्हणून याचीच निवड केली होती. पुढे युद्धादरम्यानही भडक डोक्याचे अगामेम्नॉन आणि अकिलीस यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे अवघड काम यानेच पार पाडले आहे.

    दुसरा होता अकिलीस. त्याच्याही जीवनावर ‘अकिलियड’ हे तुलनेने कमी प्रसिद्ध असलेले काव्य लिहिले गेले आहे. हा थेटिस या समुद्रदेवतेचा मुलगा. प्रामुख्याने योद्धा म्हणूनच याची ओळख आहे. ट्रॉयच्या युद्धादरम्यान याचे हेक्टरबरोबर झालेले युद्ध विशेष महत्त्वाचे ठरले. या युद्धामध्ये (इथे सोनेरी सफरचंदाच्या कथेमध्ये अवमानित झालेल्या अथीनाने अकिलीसला मदत केली आहे) याने हेक्टरचा पराभव करुन त्याची हत्या केली. नंतर त्याच्या टाचेमध्ये एक हुक अडकवून आपल्या रथाला बांधून त्याचा मृतदेह फरफटत आपल्या छावणीमध्ये नेला(१). पुढे पॅरिसशी झालेल्या द्वंद्वामध्ये पॅरिसने याच्या टाचेतच बाण मारून त्याची हत्या केली नि आपल्या भावाच्या हत्येचा सूड उगवला.

    या दोघांच्या आयुष्यातील काही घटनांमध्ये महाभारतीय व्यक्ती नि घटनांचे प्रतिबिंब दिसून येते.


    अकिलीस आणि दुर्योधन

    ट्रॉयच्या युद्धाने ‘ट्रोजन हॉर्स’ ही संज्ञा जशी प्रसिद्ध केली तशीच ‘अकिलीज्‌ हील’ (Achilles' Heel) ही संज्ञाही रुजली. पण ही कथा ‘इलियड’मध्ये नव्हे, तर अकिलीसची चरित्र गाथा असलेल्या ‘अकिलियड’ मध्ये येते. यात असे सांगितले जाते की अकिलीस जन्मत:च त्याच्या आईने– म्हणजे थेटिस या समुद्रदेवतेने त्याला अवध्य करण्यासाठी स्टिक्स (Styx) या पाताळलोकातील पवित्र नदीमध्ये बुडवले. तसे बुडवताना तिने त्याच्या डाव्या टाचेला पकडले होते, त्यामुळे त्या भागाला नदीच्या पाण्याचा स्पर्श होऊ न शकल्याने तेवढाच भाग दुर्बल राहिला(२). ट्रॉयच्या युद्धामध्ये ‘पॅरिसने त्या टाचेवरच बाण मारून अकिलीसचा पाडाव केला’ असे सांगितले जाऊ लागले.

    या कथेचे दुर्योधनाच्या बाबतीतही सांगितल्या जाणार्‍या एका कथेशी साम्य दिसते. अंध असलेल्या धृतराष्ट्राशी विवाह होताक्षणीच गांधारीने डोळे बांधून अंधपणा स्वीकारला होता. या पातिव्रत्याचे तेज या तिच्या नजरेमध्ये उतरले होते असे म्हटले जाते. त्या नजरेने तिने एखाद्या व्यक्ति वा वस्तूकडे पाहिले तर ती अवध्य वा अजेय होईल असा तिला वर होता. पांडवांशी युद्ध अपरिहार्य झाल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी गांधारीने दुर्योधनाला सांगितले की ‘तू नदीमध्ये स्नान करुन तसाच नग्नावस्थेमध्ये माझ्याकडे ये, म्हणजे माझ्या नजरेने मी तुला अवध्य करेन.’

    परंतु असा नग्न नि सुस्नात दुर्योधन परतत असता कृष्णाने त्याला गाठून स्वत:च्या आईसमोर अशा अवस्थेत जाण्याबद्दल त्याची कानउघाडणी केली– म्हणे. ‘निदान लहानसे अधरीय तरी पांघरून जा’ असा सल्ला दिला. कधी नव्हे ते चक्क दुर्योधनाला त्याचे पटलेही— म्हणे. त्यानुसार दुर्योधन लज्जारक्षणापुरते वस्त्र गुंडाळून गेला. त्यामुळे त्या वस्त्राने झाकल्या गेलेल्या त्याच्या मांड्या दुर्बल राहून गेल्या. अंतिम युद्धात भीमाने त्या मांड्यावर गदेचा प्रहार करुन दुर्योधनाचा पराभव केला.

    या दोनही कथा युद्धभूमीवरील घटितांचे समर्थन करण्यासाठी बांधलेले पूर्वरंग आहेत हे उघड आहे. खुद्द इलियडमध्येच एका युद्धामध्ये पायोनियन योद्धा अ‍ॅस्टरोपायोसने अकिलीसच्या कोपरावर मारलेल्या बाणाने ‘रक्ताची धार लागल्याचा’ उल्लेख आहे. म्हणजे अकिलीस अजेय असल्याचे मिथ्य होमरनेच खोडून काढले आहे. काही घटचित्रांमध्ये (pot art) अकिलीसच्या मृत्यूचा प्रसंग रंगवताना त्याच्या धडाच्या भागावर बाण लागल्याचे चित्रित केले आहे.

    ‘हेक्टरच्या मृतदेहाच्या अकिलीसने केलेल्या विटंबनेची आठवण करुन देण्यासाठी पॅरिसने अकिलीसच्या टाचेत बाण मारला’ ही कारणमीमांसा अधिक समजण्याजोगी आहे. धनुर्धरांचे शरसंधान सामान्यपणे धडाच्या वा मानेच्या दिशेने होत असते. हा संकेत डावलून टाचेवर बाण मारणे ही अनपेक्षित कृती आहे, त्यामुळे प्रतिस्पर्ध्याचा गोंधळ उडून लक्ष विचलित करणे हा उद्देश असावा. माणसाची टाच ही इतर शरीराहून दुबळी असतेच, तिथे होणारी वेदना अधिक त्रासदायक असते. या वेदनेसह स्थिर उभे राहाणे अशक्य होऊन अकिलीसचा प्रतिकार नि प्रति-वार दुबळा होत गेला असणार(३).

    हेच दुर्योधनाच्या मांडीबाबतही आहे. गदायुद्धामध्ये (आणि तलवारयुद्धामध्येही) वार करताना नि विशेषत: अडवताना पावलांच्या हालचाली अतिशय महत्त्वाच्या ठरतात. ज्याची मांडी पिचली आहे असा गदाधर गदेचे वार करण्यास जमिनीकडून उलट दिशेने आवश्यक असलेला प्रतिरोध मिळवू शकणार नाही, प्रतिस्पर्ध्याने केलेला वार अडवताना त्याचा धक्का पायांमार्फत भूमीकडे सोडून तोल राखू शकणार नाही. याच कारणासाठी गदायुद्धामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या कंबरेच्या खालील भागात वार न करण्याचा प्रघात आहे. तो धुडकावून केलेल्या भीमाच्या या नियमबाह्य कृत्याचे समर्थन करण्यासाठी ‘उरलेला दुर्योधन अजेय होता, भीम तरी काय करणार बिचारा’ हे सांगणारी ही कथा मागाहून निर्माण केली गेली असावी नि त्यासाठी गांधारीचे पातिव्रत्याचे तेज पणाला लावण्यात आले(४).

    अकिलीसचे हत्यार होते तलवार नि भाला. ही दोन्हीं हत्यारे समोरासमोरच्या युद्धांसाठी उपयुक्त असणारी. याउलट पॅरिसने त्याच्या टाचेवर (विषारी) बाण मारला होता, जो दूर अंतरावरून मारता येतो. तत्कालीन योद्ध्यांच्या दृष्टीने दुरून वार करणारे धनुष्य-बाण(५) हे भेकडाचे शस्त्र मानले जात असे. अस्सल योद्धा हा तलवार, युद्ध-कुर्‍हाड, भाला अशी शस्त्रे घेऊन शत्रूला थेट भिडतो असा सर्वसाधारण समज असे. त्याअर्थी पॅरिसचे हे कृत्यही भीमाप्रमाणेच एक प्रकारे नियमबाह्य डावपेच अन्यथा भेकड सैनिकाचे म्हणता येईल.


    अकिलीस आणि द्रोणाचार्य

    ट्रॉयच्या युद्धादरम्यान दोन वेळा अकिलीस युद्धात भाग न घेता युद्धभूमीपासून दूर राहिला आहे. पहिल्या वेळी युद्धलूट म्हणून त्याने ताब्यात घेतलेली स्त्री अगामेम्नॉनने हिरावून घेतल्यामुळे तो नाराज झाल्यामुळे त्याने युद्धातून अंग काढून घेतले. यामुळे त्याची मार्मेडॉन जमातीची तुकडीही युद्धापासून दूर राहिली. ट्रॉयची बाजू काहीशी दुबळी झालेली असताना अशा वेळेस हे घडले. अशा वेळी निर्वाणीचा हल्ला करुन हे युद्ध संपवता येईल असा होरा असलेला अगामेम्नॉन ओडिसिअसला हल्ल्याची घाई करत होता.

    अकिलीसचा ‘जोडीदार’ पेट्रोक्लसही युद्धात भाग घ्यायला हवा या मताचा होता. त्याने अकिलीस युद्धात सहभागी झाल्याचा संदेश देऊन मार्मेडॉन्सना युद्धात उतरवण्याच्या हेतूने अकिलीसचा युद्धवेष परिधान करुन युद्धात उडी घेतली. त्यालाच अकिलीस समजून हेक्टर नि त्याच्या तुकडीने गनिमी काव्याने हल्ला करुन त्याला ठार मारले. आपल्या प्रिय व्यक्तीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अकिलीस पुन्हा युद्धात उतरला. पुढे हेक्टरला ठार मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विटंबना करणे ही या सूडभावनेतून निर्माण झालेल्या संतापाची अभिव्यक्ती होती.

    अगामेम्नॉनवर धावून जाणार्‍या अकिलीसला थोपवताना अथीना (Painting by Pierre Narcisse Guerin).

    परंतु एकदा त्या सूडभावनेचे विरेचन झाल्यानंतर त्याच्यातील योद्धा जागा झाला. हेक्टरचे कलेवर परत नेण्यास त्याने प्रायमला अनुमती दिली, इतकेच नव्हे तर त्याच्या मृत्युचा दुखवटा पाळण्यासाठी १२ दिवसांची आपल्याकडून युद्धबंदीही जाहीर केली. हे ऐकून अगामेम्नॉन खवळला. ‘शत्रूचा प्रमुख योद्धा पडला आहे, त्यांचे सैन्य विखुरले आहे, अशा स्थितीत १२ दिवसांची युद्धबंदी ही शत्रूला आपली फळी नव्याने उभी करण्यास दिलेली संधीच आहे’ असे त्याचे (रास्त) मत होते. अकिलीसला हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला. पण तो आपल्या वचनावर ठाम राहिला.

    यानंतर अगामेम्नॉनने एक खेळी केली. त्याने ट्रोजन सैन्याच्या गनिमी सैनिकांनी आपल्या काही सैनिकांवर लपून हल्ला केला असा कांगावा केला. (अर्वाचीन युद्धांतही लढणार्‍या दोन्ही बाजू एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे आरोप करत स्वत: सोयीनुसार स्वत:ही तीच कृती करताना दिसतात.) त्याचा पुरावा म्हणून दोन जखमी सैनिकांना त्याने अकिलीससमोर उभे केले. ‘हे युद्धबंदीचे उल्लंघन असल्याने आपणही आता युद्धबंदी पाळण्याची गरज नाही’ असा त्याचा दावा होता. परंतु अकिलीसचा अगामेम्नॉनवर विश्वास नव्हता. त्याने ओडिसिअसला 'हे खरे आहे का?' अशी विचारणा केली. क्षणभर गांगरलेल्या ओडिसिअसने अखेरीस एक शब्दही न उच्चारता केवळ मान हलवून रुकार दिला. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून अकिलीस पुन्हा युद्धात उतरला.

    अकिलीसच्या संदर्भातील या दोनही घटना पाहून/वाचून मला महाभारत युद्धातील द्रोणाचार्य आठवतात. भीष्मांनंतर कौरवांचे सेनापती झालेले द्रोणाचार्य अतिशय शौर्याने आणि कौशल्याने लढत असतात. भीष्मांच्या नेतृत्वाखालील युद्धात उजवे राहिलेले पांडवांचे पारडे पुन्हा समतोलाकडे झुकू लागलेले असते. काहीही करुन द्रोणाचार्यांना युद्धविन्मुख करावे असा विचार पांडवपक्षामध्ये मांडला जातो. त्यांनी वापरलेली क्लृप्ती ही अगामेम्नॉनच्या कृतीशी मिळतीजुळती आहे.

    अश्वत्थामा हा द्रोणांचा मुलगा. तो ही कौरवांच्या बाजूने लढत होता. पांडवांनी आपल्याच सैन्यातील त्याच नावाच्या हत्तीची हत्या केली नि ‘अश्वत्थामा मेला’ असे द्रोणांना ओरडून सांगितले गेले. द्रोणांनी राजपुत्रांसह आपल्या पुत्रालाही युद्धकौशल्याचे सारे प्रशिक्षण दिलेले असल्याने त्यांचा यावर विश्वास बसला नाही. मग खात्री करून घेण्यासाठी त्यांनी ‘हे खरे आहे का?’ असा प्रश्न ‘धर्मराज’ म्हणून प्रख्यात असलेल्या युधिष्ठिराला विचारला. त्याने चलाखीने ‘होय अश्वत्थामा मेला. पण मनुष्य की हत्ती हे ठाऊक नाही.’ असे उत्तर दिले. हे उत्तर देताना दुसरे वाक्य त्याने इतके हळू उच्चारले, की ते द्रोणांना ऐकू जाऊ नये. कदाचित पहिल्या वाक्याचा धक्का बसलेल्या द्रोणांचे या उत्तरार्धाकडे लक्षही गेले नसावे. आपल्या प्रिय पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकून विव्हल झालेल्या द्रोणांनी शस्त्रे टाकली. त्याचा फायदा घेऊन पुढे द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने त्यांची हत्या केली.

    दोन्ही कथांमध्ये सत्यक्रिया हा समान धागा आहे. युधिष्ठिर नि ओडिसिअस हे दोघेही सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या उत्तराला सत्यक्रिया मानले जात असे. हे ठाऊक असलेल्या अकिलीस नि द्रोणाचार्य या दोघांनीही घडल्या घटनेची खातरजमा त्यांच्याकडून करण्याचा प्रयत्न केला आहे. युधिष्ठिराने चलाखीने आपल्या उत्तराला खोटेपणाच्या बालंटापासून दूर ठेवले, तर ओडिसिअसने संभ्रमित मनाने, एक शब्दही न उच्चारता, केवळ संकेत दिला आहे.

    पण या दोघांच्या प्रतिक्रियांमध्ये फरक आहे. प्रिय पुत्र अश्वत्थाम्याची मृत्यूची बातमी ऐकून द्रोण युद्धविन्मुख होत आहेत. तर पेट्रोक्लसच्या मृत्यूने वेदनेने चवताळलेला अकिलीस हेक्टरचा सूड उगवण्यासाठी युद्धात उडी घेतो आहे, ट्रोजन्सनी युद्धबंदी मोडून घात केला हे ऐकून (साहजिकच) शस्त्रे परजतो आहे. द्रोण पुत्रमायेपुढे आपल्या कर्तव्याला दूर सारत आहेत, तर अकिलीस कर्तव्याचा हात पुन्हा हाती घेतो आहे.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » मिथ्यकथांची प्रतिबिंबे (उत्तरार्ध)

    टीपा:

    (१). त्यापूर्वी झालेल्या युद्धामध्ये हेक्टरने अकिलीसचा जवळचा मित्र पेट्रोक्लसचा वध केला होता. पेट्रोक्लसने अकिलीसची सारी युद्धभूषणे घालून अकिलीस युद्धप्रवण झाल्याचा आभास आपल्या नि विरोधी सैन्यात निर्माण केला होता. [↑]

    (२). अन्य कथेत हाच तपशील येतो फक्त नदीऐवजी तिने अकिलीसला अग्निवर तापवले आहे. आणि दुसर्‍या टाचेला पकडून डावी टाच भाजून काढण्यापूर्वीच तिच्या पतीने तिला थांबवल्याने ती दोघांना तिथेच सोडून रागाने चालती झाली. [↑]

    (३). इतिहासामध्ये पुढे जेव्हा योद्धे घोडेस्वारी करु लागले, तेव्हा एखाद्या योद्ध्याला पाडण्यासाठी प्रथम त्याच्या घोड्याला पाडण्याचा प्रयत्न केला जाई, भारतीय उपखंडामध्ये वापरल्या जाणार्‍या हत्तींबाबतही असेच केले जाई, रथीला गतिरुद्ध करण्यासाठी रथाची चाके तोडली जात. प्रतिस्पर्धी योद्धा ज्या बाह्य साधनाच्या साहाय्याने लढतो आहे तेच दुबळे केले की प्रतिकार विस्कळित होतो नि पाडाव सोपा होतो. आता कर्णाच्या रथाचे चाक अनायासे रुतले की शरवर्षावाने मोडले असावे याचा तर्क करुन पाहा. [↑]

    (४). द्यूतप्रसंगी मांडीवर थाप मारणार्‍या दु:शासनाच्या बाबतीतही भीमाने ‘तुझी मांडी फोडून रक्त पिईन’ अशी अघोरी प्रतिज्ञाही कुलातील सर्व ज्येष्ठांच्या समोरच केली आहे नि ती पुढे पुरीही करुन दाखवली आहे. हा ही पूर्वरंगच आहे. वास्तव एवढेच की भीमाने दोनही भावांचा पराभव करताना संकेतांचे उल्लंघन करुन मांडीवर वार केला आहे. हे अपकृत्य समर्थनीय ठरवण्यासाठी मागे जाऊन दोघांबाबत अशा कथा रचल्या गेल्या आहेत. [↑]

    (५).Troy: Fall of a City मालिकेमध्ये आंणखी एक उपकथानक येते आहे. मिनेलॉसशी झालेल्या अनिर्णित द्वंद्वानंतर परागंदा झालेल्या पॅरिसला अ‍ॅमेझॉनमधील स्त्रियांची एक टोळी भेटते. या टोळीकडून पॅरिसला धनुष्य-बाण चालवण्याचे कौशल्य शिकवले जाते. म्हणजे ग्रीकांना हे हत्यार अपरिचित असावे का? कदाचित म्हणूनच अकिलीसला त्याचा सामना कसा करावा हे उमजले नसावे? कदाचित हेच ‘अकिलीस हील’ होते का? [↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: