-
समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती « मागील भाग
रोजगार आणि बेरोजगारीमागील भागात म्हटल्याप्रमाणे चलनामुळे विनिमयाची देवाण नि घेवाण ही दोन अनुषंगे सुटी होऊन खरेदी नि विक्री हे व्यवहार स्वतंत्र झाले. एक बाजू चलन सांभाळू लागले. त्याचबरोबर केवळ चलनच देऊ करणारे ‘रोजगार’-क्षेत्र उदयाला आले. ज्यातून आधी केवळ चलन-संचय करून, प्रत्यक्ष गरजांचा विचार त्यानंतर– त्या संचयाच्या परिघात करण्याचे नवे बंधन निर्माण झाले. व्यापाराप्रमाणेच हा रोजगार टोळी वा समाजाच्या परिघातून मुक्त झाला. अन्य समाजातील व्यक्ती वा व्यक्तिगटांसोबत व्यवहार, रोजगार करूनही चलन मिळवणे शक्य झाले. विनिमयाने सैल केलेली सामाजिक वीण चलनाने पुरी उसवून टाकली. इतके झाल्यावर अर्वाचीन महानागरी समाजामध्ये जोडीदाराची निवडही समाजाचे बंधन उल्लंघून होऊ लागली. जन्माने बांधलेल्या माणसांच्या सहजीवनाची संकल्पना पुरी मोडीत निघाली.
‘अन्न दीर्घकाळ साठवून ठेवण्यास मर्यादा होत्या, पण चलनाची साठवण-क्षमता अमर्याद आहे’ हे ध्यानात आल्यावर काहींनी भविष्याची, भावी पिढ्यांचीही तरतूद म्हणून अधिकाधिक चलन जमवून ठेवण्याच्या युक्त्या-प्रयुक्त्या योजायला सुरुवात केली. यासाठी शारीरबळ, सामाजिक-राजकीय सत्ता, श्रम, छद्म अशा विविध आयुधांचा वापर सुरु झाला.
मागे उल्लेख केलेला मूल्य-निर्धारणाचा सिद्धांत हा वास्तविक खुल्या स्पर्धेवर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये वाजवी ठरत होता, परंतु मूल्य-निश्चिती करण्यासाठी मूठभर उत्पादक आपलीच एक टोळी बनवून, पुरवठा नियंत्रित करून, कृत्रिमरित्या टंचाई निर्माण करू लागले. उदाहरण द्यायचे तर खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती आपल्याच कह्यात ठेवण्यासाठी तेल-उत्पादक देश एकत्र येऊन उत्पादनावर बंधने घालतात नि किंमत हवी त्या पातळीवर राखत असतात. जेव्हा अर्थकारण हे टोळीला, समाजाला बांधलेले असे, तेव्हा पुरेसे उत्पादन उपलब्ध करून न देणे हा गुन्हा ठरे. आता उलट त्याबद्दल अधिक मोल मिळू लागले. निकोप नि खुली स्पर्धा हे मृगजळ ठरून अर्थव्यवस्थेअंतर्गत बलवंतांच्या टोळ्यांची स्पर्धा सुरू झाली.
https://www.planetspark.in/ येथून साभार.ही स्वार्थी भूमिका टोळ्यांमधून व्यक्तिंपर्यंत झिरपून वैय्यक्तिक संपत्तीची लालसा वाढीस लागली. सामूहिक मालकीच्या काळात संपूर्ण टोळीला पुरेसे अन्न मिळवता आले, तर त्यातील प्रत्येक व्यक्तिलाही पोटभर अन्नाची प्राप्ती होत असे. पण आता समाजाच्या एकुण गरजांहून अधिक उपलब्धता असूनही, ‘काहींच्या पोटाबरोबरच कोठारेही भरलेली, तर काहींना पोटाची खळगी दिवसांतून एकदा भरण्याचीही मारामार’ अशी स्थिती दिसू लागली. भांडवलशाहीने ‘रोजगार’ ही संकल्पना दिली तसेच तिने बेरोजगारीची नि त्यातून उपासमारीची संकल्पनाही जन्माला घातली.
‘ऑल हेल किंग ज्युलियन’ या चलच्चित्र-मालिकेमधील एका भागामध्ये(१) चलनामुळे ओढवलेल्या या आपत्तीचे सुरेख चित्रण केले आहे. लेमर नामक प्राण्यांचा ज्युलियन नावाचा राजा एका खेळातून (आपल्याकडील ‘व्यापार’ किंवा इंग्रजी नाव अधिक समर्पक– Monopoly!) स्फूर्ती घेऊन चलन निर्माण करतो. त्याच्या आधारे आता व्यवहार करण्याचा आदेश आपल्या प्रजेला देतो.
त्यामुळे होते असे, की आजवर भूक लागली की झाडावरची फळे तोडून पोट भरणार्या लेमर्सना आता ती फळे विकत घेणे भाग पडते आहे. त्यातून जो व्यापार निर्माण होतो, त्याद्वारे मॉर्ट नावाचा सर्वात छोटा, दुबळा काहीसा बुद्धिमंद भासणारा लेमर सर्व चलन जिंकून घेतो, त्याचा संचय करतो. टोळीजगतामध्ये शारीरबलाचे असणारे निर्विवाद महत्त्व चलनाने मोडीत काढल्याचे हे निदर्शक म्हणता येईल. आता समोर झाडावर फळे आहेत, पण ती विकत घेण्यास चलन नसल्याने खुद्द राजासह सर्व लेमर्सची उपासमार होते आहे, अशी आपत्ती निर्माण होते.
सुदैवाने हा छोटा लेमर या सार्या व्यवहाराकडे केवळ एक खेळ म्हणूनच पाहात असतो नि ‘आपण जिंकलो’ हे जाहीर होताच तो गुंडाळूनही ठेवतो. पण मनुष्यप्राण्यामध्ये या मॉर्टइतका खेळकरपणा नसतो, तो अधिक स्वार्थी असतो. आपल्या बांधवांना उपाशी मरताना पाहूनही त्याची संपत्ती-संचयाची भूक कमी होत नसते.
अर्थस्य ही पुरुषो दास:चलच्चित्रांची आठवण काढली आहे, तर त्या अनुषंगाने Asterix : The Mansion of the Gods (2014) या चलच्चित्रपटातील एक प्रसंग आठवला. या चित्रपटामधील सीझर त्याच्या ऐतिहासिक चरित्राच्या विपरीत आहे. हा सीझर आजच्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांचा वा साम्राज्यवादी ब्रिटनचा शासक म्हणून अधिक शोभेल.
सीझरच्या अधिपत्याखालील रोमन मंडळींना तत्कालीन ‘गॉल’मधील (आजचा फ्रान्स) एकच खेडे जिंकून घेता आलेले नाही. तिथल्या लोकांकडे एक जादूचा काढा आहे, ज्याचे दोन घोट घेताच तेथील एक गॉल हा पाच-पन्नास रोमनांना भारी पडत असतो(२). लष्करी उपायाने जिंकता न आलेले हे खेडे जिंकण्यासाठी सीझर वेगळीच युक्ती लढवतो. त्या खेड्यावर सुनियोजित सामाजिक-आर्थिक हल्ला करुन त्यांना उध्वस्त करु पाहातो. त्या खेड्याजवळ तो सर्व सोयींनी युक्त अशी आलिशान इमारत बांधण्याचा आदेश देतो. त्यातील घरे तो त्या गॉल्सना फुकट देऊ करतो. त्या मोहाला शरण जात आजवर अजेय राहिलेला तो समाज रोमनांसोबत राहून आपली ओळख स्वखुशीने विसर्जित करण्यास तयार होतो.
Credit: gettyimages - theasis.जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रवासी’ या कथेमधील गुलामांचा व्यापारी प्रवाशाला म्हणतो, “तू दोन वर्षे एक माणूस माझ्या ताब्यात दे. हातात आसूड न घेता, त्याच्या पायात साखळदंड न घालता मी त्याचा गुलाम करून दाखवीन. मी या साऱ्यांपेक्षाही भयंकर अस्त्र वापरतो. मी त्यांना चांगले कपडे देतो, खायला भरपूर घालतो, आणि रात्री शांतपणे झोपू देतो. यात जखडलेला माणूस गुलामगिरीतून काय सुटणार ?” सीझरने त्या खेड्यावर याच संमोहनास्त्राचा प्रयोग केलेला आहे.
रोम व त्याच्या अधिपत्याखालील प्रांतातील काही लोकांनाही आणून तिथे वसवले जाते. हे लोक जवळचा बाजार म्हणून या शेजारच्या खेड्यात येतात.एक रोमन स्त्री तिथे मासे खरेदी करत असताना ‘त्याची किंमत दोन ‘सेस्टर्स’ (रोमन नाणे : sesterce) आहे’ हे ऐकून उस्फूर्तपणे म्हणते, ‘अरे वा: स्वस्त आहे की. रोममध्ये याची किंमत पाच सेस्टर्स तरी असेल.’ दुसर्या दिवशीपासून बाजारामध्ये त्या माशाची किंमत तीन ते चार सेस्टर्स होऊन जाते. मागणी वाढते, नवे ग्राहक अधिक किंमत देण्यास तयार होतात नि त्याच उत्पादनाची किंमत वाढून बसते. आजवर ते मासे सहजपणे खरेदी करुन आपले पोट भरणार्या स्थानिकांना आता ते परवडेनासे होतात. त्यांच्या आहारशैली नि आरोग्यावर गंडांतर येते.
वास्तविक समुद्रकिनार्यावरील त्या खेड्यात माशांचा तुटवडा कधीच नसतो. त्यामुळे पुरवठा ही समस्याच नाही. शिवाय किंमत तीच ठेवली तरी आता ग्राहक-संख्या वाढल्याने नफाही वाढणारच आहे. पण तरीही, ‘अधिक नफा मिळवणे शक्य आहे’ हे समजताच तो मिळवण्याची अहमहमिका सुरू होते. याचे कारण... नफा हे भांडवलशाही जगातील माणसाचे एकमेव Objective function असते! त्यासाठी खेड्याच्या प्रमुख संरक्षक लढवय्यालाही मासे विकत घेण्यास पुरेसे पैसे नाहीत म्हणून परत पाठवण्यास विक्रेते कमी करत नाहीत.
आर्थिक गुलामगिरी ही लादावी लागत नाही, लोक स्वत:हून आपल्या पायी बांधून घेत असतात, आपले स्वातंत्र्य स्वत:च मोडून समाज-बांधिलकी ऐवजी चलन-चाकरी स्वीकारत असतात. त्यामुळे अर्थकारणावरचे नियंत्रण ही भांडवलशाहीप्रधान, व्यापारप्रधान जगात एक मोठी सत्ता असते. तिच्या बळावर काही राष्ट्रे महासत्ता म्हणून उदयाला आलेली आपण पाहिली आहेत.
अमेरिकेसारखे राष्ट्र या अर्थकारणावरील नियंत्रणासाठी विविध देशांशी युद्धेही खेळते, हजारोंच्या थडग्यावर पुनर्निर्मितीची कंत्राटेही घेते नि युद्धात खर्ची पडलेल्या युद्धसामुग्रीच्या उत्पादकांकडून त्यांना झालेल्या नफ्यातील काही वाटा ‘निवडणूक निधी’ म्हणून खिशात घालते. राजकीय सत्तेच्या दृष्टीने पाहिले तर युद्ध हा सर्वाधिक फायद्याचा व्यवसाय आहे हेच तिने सिद्ध केले आहे. या खेळातील जमाखर्चाच्या ताळेबंदामध्ये बळी जाणारी माणसे ही ‘किरकोळ खर्च’ (collateral damage) म्हणून दुर्लक्षित ठेवण्याइतपत निर्ढावलेपण ‘नफा हे एकमेव उद्दिष्ट’ म्हणणारी भांडवलशाही माणसांमध्ये रुजवते आहे.
विकास नि विध्वंस‘संपत्ती ही श्रमातूनच निर्माण होते’ हे कार्ल मार्क्सचे मुख्य गृहितक आहे. (यातील ‘च’ हा प्रत्यय वगळता मुद्दा मला पटतो आहे.) मार्क्सच्या समोर जी उत्पादक-ग्राहक थेट व्यवस्था होती त्यात कदाचित हे विधान पूर्णांशाने खरे असेलही, पण मोकाट भांडवलशाहीच्या व्यवस्थेत उत्पादन ते ग्राहक ही साखळी बरीच लांबलचक आहे, त्यामध्ये अनेक वेढे आहेत. त्यातील प्रत्येक टप्प्यात तिचे मूल्य बदलत जाते. अर्थात ‘मूल्य नि किंमत वेगळे’ अशी मखलाशी करुन डावे अर्थशास्त्री ‘मूल्य आमचेच’ हा हेका चालू ठेवतात. पण त्याची चिकित्सा हा इथे विषय नाही.
या मुद्द्याचा प्रतिवाद करताना माझा मुद्दा असा होता, की जर ‘श्रमजीवी नसतील तर भांडवल वा भांडवलदार काहीच निर्माण करु शकणार नाहीत’ हा जर तुमचा मुद्दा असेल तर ‘निसर्गदत्त कच्चा माल नसेल, तर श्रमजीवीही काही निर्माण करु शकणार नाहीत!’ म्हणजे ‘मूल्य निर्माण होते ते निसर्गातून’ असे म्हणायला हवे. आणि या तर्काचा विस्तार करायचा झाला तर, ‘संपत्ती निर्माण होते ती निसर्गाच्या विध्वंसातून’ असे म्हणावे लागते.
एखाद्या उत्पादक कंपनीचा तिमाही नफा जेव्हा अमुक इतके टक्के वाढतो, तेव्हा त्यासाठी लागणारा निसर्गातून उचलला जाणारा कच्चा मालही त्या प्रमाणात वाढतो. पण ज्याप्रमाणे शिकारप्रधान, शेतीप्रधान समाज जे जे आवश्यक ते स्वत: निसर्गात निर्माण करत होता, तसे व्यापारप्रधान समाजाचे नाही. त्याने निसर्गातून मिळणारे व्याजच नव्हे, तर मूळ ठेवीही मोडून खायला सुरुवात केली आहे. खाणकाम हे याचे सर्वात ठळक उदाहरण आहे. आणि हे करण्यासाठी त्याने नवनवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जेणेकरुन विकासाचा नि म्हणून निसर्ग विध्वंसाचा वेग कैकपट वाढला आहे.
शिकारजीवी नि शेतीजीवी समूहांचे जीवन निसर्गाशी बांधले गेले होते. या संबंधाची त्यांना जाण होती. व्यापारप्रधान समाजात निर्णयाचे अधिकार असणारी माणसे निसर्गापासून दूर महानगरात राहू लागली नि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते, त्यासंबंधीच्या जाणिवा संपुष्टात आल्या. ते तिथे काँक्रीटच्या जंगलात बसून जिवंत जंगलांचे, त्यावर अवलंबून असणार्या परिसंस्थांचे जाळे उध्वस्त करणारे निर्णय बिनदिक्कतपणे घेऊ लागले.
एखादी टोळी एका जंगलाच्या परिसरात राहात असेल नि आपल्या जगण्याला आवश्यक ते वनस्पतीजन्य, प्राणिजन्य पदार्थ त्यातून मिळवत असेल तर त्यांतून झालेले नुकसान निसर्ग पुनर्भरणाच्या प्रक्रियेने भरुन काढत असे. निसर्गाच्या पुनर्भरणाचा हा वेग माणसाच्या विध्वंसाच्या वेगाहून अधिक– निदान समतोल साधणारा होता. त्यामुळे निसर्गसंपत्तीमधील निव्वळ फरक हा जमेच्या बाजूला राही वा तोटा नगण्य राही.
https://stockcake.com/ येथून साभार.आज पुरे जंगल प्रथम यांत्रिक करवतीने नि आता बुलडोझरसारख्या यंत्रांनी काही दिवसांत साफ करुन टाकले जाते. निसर्गाचे चक्र सोडा, माणसाच्या सहेतुक प्रयत्नांतूनही (ते तर केलेही जात नाहीत) याचे पुनर्भरण होणे शक्य नसते. त्यामुळे ही हानी कायम स्वरूपाची असते. निसर्गाचा विध्वंस करुनच माणसे थांबलेली नाहीत, त्याच्या नैसर्गिक पुनर्भरणाच्या प्रक्रियेलाही उध्वस्त करण्याची प्रक्रिया सोबतच राबवतो आहे. विविध प्रकारच्या खाणींनी उध्वस्त केलेली जंगले, यांत्रिक उद्योगांनी सरकारांशी, त्यातील नेत्यांशी संगनमत करून बिनदिक्कतपणे प्रदूषित केलेले जलस्रोत हे आजच्या जगाचे वास्तव झाले आहे.
उत्पादक खासगी असल्याने काम झाले की हात वर करुन निघून जातात. निसर्गाची हानी भरून काढण्याची जबाबदारी ना उद्योगपतींची असते ना सरकारांची. यातून जगण्यावर जे घातक परिणाम होतात ते पुढच्या पिढ्यांना सोसावे लागतात. पण या पिढ्याही आपल्या बापदाद्यांनी दिलेले विकासमश्गुल आयुष्य जगत असल्याने त्यांना यासाठी निसर्गाने काय किंमत मोजली याचे भान नसते. त्यामुळे ते ही आपल्याही पुढच्या पिढ्यांच्या वाट्याचा निसर्गाचा वाटा गिळून ढेकर देतील नि समस्या अधिक गंभीर करुन पुढे सरकवतील.
पण कॉम्रेड मंडळी जशी आपले ‘श्रमाचे महत्त्व’ तत्त्व दामटताना निसर्ग-रक्षण खिजगणतीत धरत नाहीत, तसेच त्याहून माथेफिरु विकासमार्गी असणारे भांडवलदार ‘विकास विकास’च्या गजराखाली या विध्वंसाचे तपशील चिणून टाकत असतात. त्या त्या देशातील सत्ताधारी जवळजवळ नगण्य किंमतीत, केवळ आपल्या घटनादत्त अधिकाराच्या बळावर याचे उदक खासगी उद्योगपतींच्या हातावर सोडतात. एक-एक झाड, एक-एक प्राणी जणू दत्तक घेऊन त्यांना अभय देणार्या माणसाच्या आदिम टोळ्यांची जागा आता झाडे, पशु, पक्षी सार्यांचा एकाच घावात विध्वंस करण्यासाठी जंगल विकत घेणार्या आणि त्यातील शोषून घेण्याजोगे सारे संपले, की त्या उजाड जमिनीला मरणपंथावर सोडून बेगुमानपणे पुढील जंगलाकडे सरकणार्या धनाढ्य कंपन्यांनी घेतली आहे.
हा लेख लिहित असतानाच छत्तीसगडचे फुप्फुस म्हटल्या जात असलेल्या छत्तीसगडमधील हसदेव अरंद जंगलातील सतराशे हेक्टर जमिनीवरील तब्बल चार ते साडेचार लाख झाडे तोडण्यास अदानीच्या कंपन्यांना भारताच्या विध्वंसक विकासफिरु सरकारने दिलेली परवानगी न्यायालयाने उचलून धरली आहे. आजवर ज्यांचे नैसर्गिक जैववैविध्य जपले त्या अंदमान-निकोबार बेटांपैकी ग्रेटर निकोबार बेटांवरही असाच विध्वंसक विकास(?) करण्याची मोकाट मोकळीक अदानीला देण्यात आली आहे. महाराष्ट्र, म.प्र., राजस्थानचे अरवली पर्वत जंगल... सर्व काही जाळून त्याची राख विकून खाण्याचे कार्यक्रम विकासाच्या नावे मोकाट सुटलेले सत्ताधारी राबवत आहेत. त्यातील काही वाटा आपल्या पदरी पडेल या आशाळभूत वृत्तीने जनता कटोरा घेऊन उभी आहे नि ‘विकास विकास’चे भजन गाते आहे.
https://x.com/ZulkarnainSaer/ येथून साभार.- (क्रमश:) -
पुढील भाग » धर्म आणि सहजीवन
टीपा:
(१). Gimmie Gimme Gimme: The Game[↑]
(२). दुसर्या महायुद्धात जर्मनीकडून पराभूत होऊन हतवीर्य झालेल्या फ्रान्समध्ये विजिगिषु वृत्ती जागवण्यासाठी Asterix हा सुपरहीरो नि त्याच्या अचाट पराक्रमांच्या कहाण्या निर्माण केल्या गेल्या. त्यातील त्या जादूच्या काढ्याच्या कल्पनेप्रमाणेच काही बाह्य पदार्थाच्या साहाय्याने चुटकीसरशी बलवान होणार्या नायकांच्या कथा चलच्चित्रांप्रमाणेच विविध चित्रपटांतूनही साकार केल्या गेल्या आहे. ‘पॉपाय’ या अमेरिकी चलच्चित्र-मालिकेमध्ये हीच कल्पना वापरून पालक खाणारा सामान्य पॉपाय त्याच्याहून कैकपट बलिष्ठ ब्रूटस्लाही कसा भारी पडतो हे दाखवण्यात आले होते. मांसाहारावर अती भर असलेल्या अमेरिकी समाजामधील मुलांमध्ये हिरव्या पालेभाज्यांची आवड रुजवण्यासाठी ही मालिका निर्माण केली गेली. [↑]
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा