-
सहजीवन आणि अर्थकारण « मागील भाग
https://www.globaltimes.cn/ येथून साभार.Operations Research या विषयातील Optimizationच्या अभ्यासामध्ये Objective function नावाची संकल्पना वापरली जाते. जगण्यातील समस्या, अडचणी सोडवत असताना आपले उद्दिष्ट (Objective) निश्चित करावे लागते. मग ते साध्य करण्याच्या दृष्टीने, आपल्या कुवतीच्या मर्यादेत अधिकाधिक परतावा देणारी नियोजन नि कृती निश्चित करता येते. मर्यादित साधने वा गुंतवणूक यांच्या मर्यादेत एकाच वेळी अनेक उद्दिष्टे साध्य करता येत नसतात, त्यातील कुणाला किती प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागते. Objective function हे प्राधान्य निश्चित करत असते.
व्यवसायाला सुरुवात करताना प्रथम एका लहानशा भूगोलावर सुरू करून टप्प्याटप्प्याने विस्तार करत न्यावा, की अंबानींच्या जिओप्रमाणे संपूर्ण देशभर एकाच वेळी वितरणाची महत्त्वाकांक्षा बाळगावी, हे तुमच्या खिशाच्या खोलीवर नि नियोजनाच्या कुवतीवर ठरत असते. ‘तोट्यात असलेला उद्योगव्यवसाय सावरण्यासाठी अधिक पैसा घालून अद्यतनीकरण, आधुनिकीकरण करुन नफा वाढवण्याचे नियोजन करावे, की असलेल्या व्यवसायातील कमी उत्पादक भाग निश्चित करुन त्याची गच्छंती करुन तोटा मर्यादेत आणण्याचा प्रयत्न करावा?’ हा असाच एक प्रश्न. म्हणजे ‘तोटा कमी करणे’ (minimization) हे तुमचे Objective function आहे की ‘नफा वाढवणे’ (maximization) हे तुम्ही निश्चित करावे लागते. व्यावहारिक गणिताचे उत्तर त्यानुसार बदलत असते.
भांडवलशाही व्यवस्थाभांडवलशाहीने मनुष्यप्राण्याच्या सर्वच समाजांमध्ये प्राधान्य असलेले ‘समूह-हित’ हे Objective function नाकारून ‘वैय्यक्तिक संपत्ती’ला प्राधान्य दिले. हा मोठा बदल होता. यामुळे गणित सोडवण्याची रीतही आमूलाग्र बदलावी लागली हे ओघाने आलेच. सहकाराच्या जागी तिने संघर्षाला/स्पर्धेला प्रगतीचा मार्ग मानले. जगात संघर्ष पूर्वीही होते, पण ते विरोधकांमधले, शत्रूंमधले संघर्ष होते, पण अंतर्गत स्पर्धेला महत्त्व देणारी ही पहिलीच व्यवस्था.
तिने ‘संघर्ष/स्पर्धेतूनच गुणवत्ता जिंकेल नि त्यातून पराभूतामध्ये स्वत:च्या गुणवत्तेची प्रतवारी वाढवण्याची आस निर्माण होईल’ असे प्रतिपादन केले. ‘सामूहिकतेने महत्त्वाकांक्षेला कुंपण पडते, पण स्पर्धेमुळे ईर्षेला बळ मिळून माणसे अधिकाधिक प्रगती साधू पाहातील, वैय्यक्तिक संपत्ती अधिकाधिक स्वत:कडे खेचू पाहातील. यामुळे गुणवत्तेच्या, संशोधनाच्या विविध वाटा खुल्या होतील,’ असे तिचे पूर्वसूत्र होते.
https://demand-planning.com/ येथून साभार.एकजिनसी समाजामध्ये वैविध्याला वाव मिळत नाही नि वैविध्य नसेल तर प्रगतीची नवी वाट सापडत नाही. उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये हे तत्त्व अधोरेखित झालेले आहे. भांडवलशाहीने प्रगतीची वाट आखताना हे सूत्र समोर ठेवले आहे. ही व्यवस्था व्यावसायिक विनिमयासाठी मागील भागात उल्लेख केलेल्या ‘मूल्य निर्धारणाच्या सिद्धांता’चा आधार घेताना दिसते. विशिष्ट उत्पादन वा सेवा यांचे स्थल, काल, व्यक्ति, व्यवस्थानिरपेक्ष असे एक आणि एकच मूल्य वा किंमत असावी असे ती मानत नाही. मागणी-पुरवठ्याचे गुणोत्तर हा मूल्यनिश्चितीचा आधार मानते.
बहुतेक धर्मसंस्था ज्याप्रमाणे मानवी एकतेच्या सद्हेतूने उभ्या केलेल्या दिसतात. पण यथावकाश श्रद्धेचे मार्केटिंग नि राजकारण करणार्या नफेखोरांच्या हाती जाऊन विरूप होतात, तसेच भांडवलशाहीचेही झाले. अॅडम स्मिथ या भांडवलशाहीच्या ‘प्रेषिता’ने निकोप स्पर्धेला आधारभूत मानले. पण आज बहुतेक भांडवलशहा ज्याला अनुसरतात त्या मिल्टन फ्रीडमनने ही व्याख्या बदलून ‘नियमांच्या चौकटीत राहून अधिकाधिक नफा मिळवण्याला प्राधान्य असले पाहिजे’ असे प्रतिपादन केले. धूर्त भांडवलशहांनी यातील ‘नियमांच्या चौकटीत राहून’ हा पूर्वार्धही गुंडाळून बेशरमपणे ‘अधिकाधिक नफा मिळवण्याला प्राधान्य’ एवढेच धोरण अंगीकारले.
या विनिमय-व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्थेने किमान हस्तक्षेप करावा, जेणेकरून ही स्पर्धा निकोप राहील असे ती मानते. पण वास्तवात मात्र ‘भूमी अधिग्रहण, पर्यावरणासंबंधी निकषांची पूर्तता, विविध अनुदाने (subsidy), आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक संबंधांमध्ये अप्रत्यक्ष जामीन राहाणे, इत्यादी स्वार्थी बाबतीत मात्र त्यांना राजकीय व्यवस्थेने, वा त्याच्याशी निगडित राजकीय गटाने आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असते(१). हिचे विरोधक म्हणतात तसे, ‘नफ्याचे केंद्रीकरण (स्वत:कडे) आणि तोट्याचे विकेंद्रीकरण (ग्राहक, समाज व राजकीय व्यवस्था)’ करणारी सर्वस्वी स्वार्थानुकूल राजकीय-सामाजिक व्यवस्था तिला अभिप्रेत आहे.
आजवरच्या व्यवस्थांपेक्षा हिचे आणखी एक वेगळेपण म्हणजे हिने समाजरचनेऐवजी भौतिक प्रगतीला प्राधान्य दिले. त्यातून अनायासे प्रगती होईल नि तिला अनुकूल समाजरचनेची घडी बसेल असे ती मानते. समाजातील प्रत्येक व्यक्ती वैय्यक्तिक संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करताना एकुण समाजाची क्रयशक्ती नि उत्पादनही वाढेल. तसंच केवळ अन्न, वस्त्र नि निवारा या मूलभूत गरजांपलिकडे संपत्तीला उपभोगाचे नवे धुमारे फुटतील, नव्या गरजांचे प्रवाह नि त्या भागवण्यासाठी नव्या उत्पादकतेचे मार्ग सापडू लागतील. या सार्या सव्यापसव्यातून संपत्तीची निर्मिती वेगाने होईल असा तिच्या पंडितांचा होरा होता. तो बव्हंशी खराही ठरला आहे!
पण ही समाजव्यवस्था नव्हे, अर्थव्यवस्था आहे! यापूर्वी समाजव्यवस्थेमध्ये होणार्या आर्थिक व्यवहारांतून अर्थव्यवस्था उदयाला आली होती. आता बाजू उलट करुन अर्थव्यवस्थेची मांडणी आधी करुन तिला अनुकूल वा आवश्यक अशी समाजव्यवस्था उभी करण्याचा प्रस्ताव तिने दिला. जुनी समाजव्यवस्था तिला धार्जिणी नव्हती हे ओघाने आलेच. नव्या मांडणीतून व्यक्तिप्रधान अशी नवी समाजव्यवस्था आकाराला येऊ लागली. आधी अस्तित्वात असलेली, समाजाला हितकारक असलेली राजकीय व्यवस्थाही उध्वस्त करुन तिथे आपल्या सोयीची व्यवस्था निर्माण करण्याचा उद्दामपणाही तिने वेळोवेळी केलेला आहे(२).
संपत्ती आणि निसर्गपण त्यासाठी मानवाने, निसर्गाने मोजलेली किंमतही कैकपट आहे. निसर्गाच्या पुनर्भरणाच्या वेगाच्या कैकपट वेग आता मानवी प्रगतीच्या विध्वंसक प्रक्रियेने पकडलेला आहे. प्रगतीला हातभार लावणार्या अनेक मूलद्रव्यांना भूगर्भातून उपसून काढणार्या खाणींनी, उजाड केलेल्या जंगलांनी सजीवांच्या अनेक परिसंस्था उध्वस्त केल्या आहेत. मानवी विकासाचा वरवंटा पुनर्भरणाच्या प्रक्रियेला हतबल करुन टाकतो आहे. निसर्गजीवी म्हणून सुरुवात केलेल्या मनुष्यप्राण्याने विध्वंसजीवी होण्याचा टप्पा गाठलेला आहे.
एका बाजूने निसर्गाचा विध्वंस करणारी भांडवलशाही दुसरीकडे त्यातील नैसर्गिक विघटनकारी साधनसंपत्ती ऐवजी तिथे अविघटनकारी कचरा भरत चालली आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि उपभोग या पलिकडे जाऊन केवळ ‘मालकी हक्क ही देखील गरजच आहे’ असे प्रतिपादन भांडवलशाही करते(३). नफा– म्हणजे चलन हे अंतिम साध्य (objective) असल्याने ते निर्माण करण्याची नि संचय करण्याची पुरी मोकळीक तर आहेच, पण त्यासाठी जमेल ते हत्यार वा साधने वापरण्यास ती प्रोत्साहन देते.
नागरी उपभोगाची साधने त्यांच्या केवळ वेष्टणांचाच (packaging) प्रचंड कचरा निर्माण करत जातात. (Credit: Jeff Spicer from Getty Images.)शेतीजीवी, शिकारजीवी समाजात उपभोगासाठी वापरात येणार्या सर्वच गोष्टी निसर्गातून येत नि वापरानंतर विघटन वा रूपांतर होऊन पुन्हा निसर्गात मिसळून जात. त्या नेहमीच निसर्गाचा भाग असत. याउलट अर्वाचीन (विशेषत: औद्योगिक क्रांतीनंतर) प्रक्रियांमधून निर्माण झालेली उत्पादने त्यांच्या उत्पादन, वितरण, उपभोग नि उपभोगातून बाद होणे या चारही टप्प्यांमध्ये जो कचरा निर्माण करतात तो निसर्गाला बाधक असतो, नैसर्गिकरित्या नष्ट होणारा नसतो. त्याने जल, वायु, जमीन सर्वच प्रदूषित होत राहातात(४).
याशिवाय भांडवलशाहीने रुजवलेल्या ‘जुने फेका नि नवे घ्या’ या मंत्रामुळे एखादे उत्पादन त्याचे आयुष्य पुरे होण्याच्या आतच कचर्यात जाते नि नव्याची मागणी निर्माण होते. यातून उलाढालीचा वेग वाढतो नि संपत्तीही वेगाने निर्माण होते. उपभोगाची खाय काय सुटलेला माणूस इतका कचरा निर्माण करतो, की नव्या जगात ती एक व्यापक समस्या निर्माण झाली आहे. पण ‘उत्पादन ते उपभोग’ साखळीचे पुरे विकेंद्रीकरण झाल्यामुळे या सार्या वास्तवापासून दूर असलेला भोगलोलुप मानव त्याकडे डोळेझाक करुन, तो कचरा वस्तीपासून दूर ‘दृष्टीआडच्या सृष्टीत’ फेकून सुखाने जगत राहातो.
नागरी सुविधांच्या उबेत नि एसीच्या गारव्यात एकाच वेळी सुख भोगणार्या राजकीय धोरणनेतृत्व नि उद्योगनेतृत्वाला त्याची फिकीर नाही. त्यातून उभ्या राहिलेल्या फुटकळ सुविधांसाठी प्रथम गाफीलपणे, मग अपराधभावना सोबत घेऊन आणि अखेरीस पूर्ण निर्ढावलेपणे वर्तमान पिढ्या या भविष्यातील पिढ्यांसमोर विविध आव्हाने निर्माण करत आहेत. उपभोगाच्या नव-नवीन साधनांची चातकासारखी वाट पाहात असलेल्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडेही त्याची दाहकता जाणवावी इतके सजग मन उरलेले नाही.
उपभोगमूल्य‘भरपूर उत्पादन करा, भरपूर विकत घ्या, वापरावसं वाटेल तोवर वापरा; जुने फेका नि नवे घ्या’ हा हिने माणसाला दिलेला मूलमंत्र आहे. ‘उलाढाल जितकी अधिक, तितकी अधिक संपत्ती निर्माण होते’ ही संकल्पना हिने रुजवली आहे. ‘त्या संचयाचे प्रत्यक्ष उपभोगमूल्य काय?’ असा प्रश्न हजारो कोटींची माया जमा केलेल्या माणसाला कधीच पडत नाही.
‘ती संपत्ती उपयुक्त आहे, गरजेची आहे’ हे पटवण्यासाठी त्याने वीस-पंचवीस रुपयांची भाकरी काही हजारांत विकत घेण्यासाठी त्याने पंचतारांकित उपाहारागृहे उभारली आहेत. तिथे त्या भाकरीवर पाच-दहा रुपयांचे ‘टॉपिंग्स’ ऐटबाज शैलीत मांडून, इस्त्री केलेले कपडे परिधान केलेला ‘सर्व्हर’ ती भाकरी ‘डाएट ब्रेड’ म्हणून ‘सर्व्ह’ करतो. त्याबदल्यात हा ‘श्रीमंत’ काही हजार खर्च करू शकतो आणि त्याच्यासारख्याच दोन हात, दोन पाय नि एक डोके असलेल्या, त्याचीच भाषा बोलणार्या, पण वीस रुपयांची भाकरी खाणार्यांपासून स्वत:ला वेगळा करू शकतो. हे वेगळेपण राखण्याचा, हा ‘इतरांहून वरचढ’ असल्याचे ठसवण्याचा आटापिटा मानवी प्रवृत्तीमधील ‘सह नौ भुनक्तु’ प्रवृत्तीला मागे सारून, भांडवलशाहीने व्यक्तिहिताचे प्राधान्य यशस्वीपणे रुजवल्याचा निदर्शक असतो.
या ‘चलन-संचयानुसार खरेदी, गरज दुय्यम’ या मूळ संकल्पनेचे विविध अवतार प्रत्येक उपभोग क्षेत्रात रुजत गेले आहेत. फोन करुन वा मेसेज करुन संपर्क करणे ही मूळ गरज, पण त्यासाठी पाच हजारांहून कमी रकमेपासून पाच लाखांपर्यंत किंमतीचे मोबाईल फोन बाजारात मिळतात. आपापल्या चलन-संचय कुवतीनुसार लोक यातील एक फोन विकत घेतात. मग हे ‘श्रीमंत’ त्यातील वरकड साधनांची उपयुक्तता स्वत:ला नि इतरांना पटवून देत राहातात. थोडक्यात गरजेचेही उपभोग्य-मूल्य तेच असले तरी, खरेदी-मूल्य वाढवून ‘आपण अधिक उपभोग घेतो’ हा भ्रम माणसाने आपल्या डोळ्यांवर बांधून घेतला आहे.
सहकाराचा चंचूप्रवेशअमेरिकेची संयुक्त संस्थाने हे या व्यवस्थेचे सर्वात यशस्वी उदाहरण. त्यांचे यश हे भांडवलशाहीचेही मानले गेल्याने अनेक युरपिय देशांनी– आणि नंतर सर्वस्वी भिन्न भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थिती असलेल्या आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांनीही– ते प्रारूप जसे आहे तसे स्वीकारण्याचा प्रयत्न केला. पण अमेरिकेच्या त्या यशात इतर घटकांचेही श्रेय मोठे आहे हे सोयीस्कररित्या विसरले गेले. राब लावून गवत, झुडपांचे निर्दालन करुन शेतीसाठी जमीन मोकळी करावी तसे केलेले स्थानिक जमातींचे निर्दालन, पुरा समाजच नव्यानेच घडवला जात असल्याने नसलेले सांस्कृतिक वारशाचे दडपण, महायुद्धांमुळे युरपमधून तिथे विस्थापित झालेले बुद्धिजीवी आणि श्रमजीवींचे योगदान, हे या नवथर राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे इतर घटक होते.
https://www.linkedin.com/ येथून साभार.पण ‘यशाला केवळ संघर्षावर/स्पर्धेतील विजयावर आधारित ठेवणे हे एकप्रकारे तिच्या दिग्विजयाला कुंपण घालणारे ठरले आहे’ याची जाणीव त्या व्यवस्थेच्या पंडितांना होऊ लागली. तेव्हा सहजीवनाचा नाही, निदान सहकाराचा अंतर्भाव करता यावा म्हणून ‘खुली अर्थव्यवस्था’ ‘जागतिकीकरण’ यांचा बोलबाला सुरू झाला. जागतिकीकरणाच्या संकल्पनेवर आधारित व्यवस्थेने ‘मानवी समाजाला विभागणार्या धर्म, भाषा, भूगोल, राजकीय व्यवस्थांच्या भिंतींमध्ये खिडक्या निर्माण केल्या, तर त्यांतून साधनसंपत्तीचा प्रवाह सर्वच ठिकाणी खेळता राहील आणि कुठलाच गट वंचित राहाणार नाही’ असा विचार मांडला.
भांडवलशाही प्रथेप्रमाणे हा केवळ वरकरणीच ‘बहुतांच्या हिताचा’ प्रस्ताव होता. पण वास्तवात यांत्रिक औद्योगिकरणात अग्रेसर असलेल्या राष्ट्रांच्या अतिरिक्त उत्पादनाला अधिक मोठी बाजारपेठ मिळवून देण्याचा, तसेच गरीब देशांकडून स्वस्त कच्चा-माल नि मनुष्यबळाची आयात करण्याचा कावा होता— त्याचबरोबर यांत्रिक उत्पादनप्रक्रियेतून होणार्या पर्यावरणीय हानीला गरीब राष्ट्रांत निर्यात करण्याचाही.
आज एकविसाव्या शतकाच्या दुसर्या-तिसर्या दशकांत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांसारख्या या व्यवस्थेच्या सर्वाधिक लाभधारक देशांतही तिच्याविरोधात जनभावना तीव्र झाल्या आहेत. लोक पुन्हा एकवार ‘आपल्याच टोळीचे हित पाहावे, या खिडक्या बंद कराव्यात’ आग्रह धरू लागले आहेत. भांडवलशाहीसोबतच सर्वाधिक काळ लोकशाहीदेखील रुजलेल्या या देशात ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणणार्या, अन्य देशांशी होणार्या व्यापारावर जकात (tariff) लावून देशांतर्गत उत्पादन नि रोजगार यांना प्रोत्साहन देण्याचा आभास निर्माण करणार्या ट्रम्पसारख्या उथळ माथेफिरुलाही लोक आपला त्राता मानू लागले आहेत.
- (क्रमश:) -
पुढील भाग » वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
टीपा:
(१). ऐन इराण-अमेरिका युद्धाच्या धामधुमीत अध्यक्ष ट्रम्प यांनी ३० मोठ्या अमेरिकन उद्योजकांना सोबत घेऊन चीनवारी केली. भारताचे पंतप्रधानही अदानींना सोबत घेऊन देशोदेशीच्या वार्या करताना दिसतात. [↑]
(२). अमेरिकेने आपली गुप्तचर संस्थेच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये प्रच्छन्न ढवळाढवळ तर केली आहेच, पण जिथे स्वार्थाला धक्का बसतो आहे असे दिसताच थेट लष्करी कारवाईही केली आहे. अर्थात यासाठी ‘लोकशाहीच्या हितासाठी’ अत्यंत खोटे कारण निर्लज्जपणे दिले आहे. आणि त्याच वेळी सौदी अरेबियापासून चीनपर्यंत सर्व एकाधिकारशाही देशांशी शय्यासोबतही केली आहे.
जगभरातील चतुर्थांशहून अधिक देशांत अमेरिकेने अशी ढवळाढवळ करुन तिथे सत्तांतर घडवून आणले आहे नि त्या-त्या देशाला आपल्या अनुकूल भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. त्यासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राष्ट्रप्रमुखांच्या हत्याही घडवून आणल्या आहेत. यामध्ये इराणचे मोहम्मद मोसद्देह (१९५३) यांचा क्रमांक पहिला. सद्दाम हुसैन या इराकी नेत्याला रासायनिक शस्त्रे वापरणार्या पाठीशी घातले नि नंतर गरज संपल्यावर ठारही मारले. ग्वाटेमालाच्या लष्करी शासनाने स्थानिक मायन लोकांचे केलेले नृशंस हत्याकांड(१९८१) कंबोडियातील कुप्रसिद्ध ख्मेर रुजच्या लाखोंच्या हत्याकांडांला पाठीशी घातले. ही यादी प्रचंड मोठी आहे.
लोकशाही नि न्याय यांचे नाव घेत शस्त्रबळावरील निर्लज्ज हत्याकांड घडवणार्या युरपिय मानसिकतेचा संहत आविष्कार म्हणजे अमेरिका. भांडवलशाहीने शस्त्रास्त्रनिर्मितीला दिलेली चालना जगातील अनेक प्रगत संस्कृतींच्या मुळावर आली. माया, इन्का, मेसापोटेमिया (इराक), पर्शिया, भारत यांसह आफ्रिकेतील अनेक प्रगत राष्ट्रे लोकशाहीचा बागुलबुवा पुढे करत शस्त्रबळावर धुळीला मिळवण्यात आली. गडाफीचा लिबिया हे त्याचे सर्वात अर्वाचीन उदाहरण. देशात मोफत शिक्षण नि आरोग्यव्यवस्था देऊ करणार्या, जगातील पहिली मानवनिर्मित नदी म्हटले गेले अशी महत्त्वाकांक्षी योजना आखून देशाची पाणीसमस्या सोडवणार्या गडाफीचा खून पाडला नि तो देश आता दारिद्र्याच्या गर्तेत गोते खातो आहे.
एकुणात भांडवलशाहीने ‘ज्याच्या हाती प्रगत शस्त्रे तो देश श्रेष्ठ’ ही प्राचीन टोळीकाळातील उक्ती पुन्हा सार्थ करायला सुरुवात केली. अर्जेंटिनाच्या सीमेपासून काहीशे मैलावरील फॉकलंड बेटे तेथून हजारो मैलावरील इंग्लंड लष्करी बळाने ताब्यात घेते नि पचवते. या दोनही राष्ट्रांनी, तसंच स्पॅनिश लोकांनी द. अमेरिकेत, बल्गेरियन राजाने काँगोमध्ये, पोर्तुगीज नि डच यांनीही विविध आफ्रिकन नि आशियाई देशांत केलेले अत्याचार, घडवून आणलेली हत्याकांडॆ, संपत्तीचा केलेला अपहार याबाबत या देशांना आजवर कुठलीही शिक्षा झालेली नाही. आज रशिया नि इस्रायल याच दांडगाईने शेजारील राष्ट्रांचे प्रदेश घशात घालतात ते ही प्रगत शस्त्रांच्या आधारेच, आणि ही शस्त्रे त्यांच्या हातात आली ती भांडवलशाहीमुळेच. माया, इन्का, मेसापोटेमिया, पर्शिया, भारत, चीन आदी देशांतून उभ्या राहिलेल्या– ज्यांना खर्या अर्थाने संस्कृती म्हणता येतील अशा व्यवस्था मोडून पुन्हा ‘बळी तो कान पिळी’ या रासवट, मागास उक्तीला रुजवणारे, नफ्याला प्राधान्य देताना माणसाचे हित दुय्यम मानणारे हे देश मानवी संस्कृतीचे खुनी मानले पाहिजेत. [↑](३). या मालकीमध्ये समाधान’ प्रवृत्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणून Non-Fungible Token अर्थात NFT कडे पाहाता येईल. काहीसे ट्रेडमार्कसारखी असलेली ही टोकन्स एखाद्या डिजिटल कलाकृतीचे स्वामित्व तुम्हाला देतात. अर्थात याचा अर्थ ती कलाकृती तुमच्या मालकीची झाली असा नसतो. तिच्या अनेक प्रती विविध व्यक्ती तरीही वापरू शकतात, कदाचित त्यातून अप्रत्यक्ष अर्थार्जनही करु शकतात. तुम्ही मालक असता ते त्यामागच्या संकल्पनेचे. अमूर्त चित्रशैलीनंतर आलेली ही अमूर्त मालकी. जिचा नक्की उपयोग काय हे आजही कुणी सांगू शकत नाही. तरीही त्यांच्या मूल्यामध्ये वाढ वा घट होत असते. ही निव्वळ मागणीच्या प्रमाणात होते. आता मागणी का वाढते, तर कुणाला तरी त्या कलाकृतीचे हे आभासी स्वामित्व हवेसे वाटते म्हणून. गरज वा उपभोग यांपासून सर्वस्वी मुक्त असा हा विनिमय वा व्यापार आहे. [↑]
(४). ‘फ्युचुरामा’ नावाच्या एका चलच्चित्र-मालिकेमध्ये एक भाग या मानवनिर्मित कचर्याबद्दल आहे. विसाव्या शतकामध्ये मानवी समाजाने निर्माण केलेल्या प्रचंड कचर्याची समस्या अक्राळविक्राळ झाली. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराने ती सोडवण्यासाठी हा सारा कचरा एकत्र करुन अंतरिक्षात भिरकावून दिला.
एखाद्या उपग्रहाप्रमाणे फिरणारा हा कचर्याचा गोळा तिसाव्या शतकामध्ये उलट दिशेने न्यू-न्यूयॉर्क शहरावर कोसळण्याचा धोका निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणून शहरवासीय पुन्हा भरपूर कचरा निर्माण करुन त्याला या गोळ्यावर सोडून त्या धक्क्याने जुन्या कचर्याच्या गोळ्याची दिशा बदलून संकट टाळतात.
अखेरीस मुख्य वैज्ञानिकाला त्याचा एक दुय्यम मदतनीस विचारतो,‘पण आता अंतरिक्षात आणखी कचरा फिरतो आहे. तो पुन्हा परतून आला तर...?’ त्यावर त्या वैज्ञानिकाचे उत्तर हे मानवी प्रवृत्तीचे प्रातिनिधिक उत्तर आहे. तो म्हणतो, ‘तो भविष्यातील मानवाचा प्रश्न आहे.’ कचर्याला अधिक कचर्याने उत्तर हे अमेरिकेतील ‘नागरिकांना असुरक्षित वाटते म्हणून मागेल त्याला बंदुका द्या’ या बिनडोक धोरणाचे वंशज म्हणावे लागेल. [↑]
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, ९ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा