Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, १२ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ३. पॅरिस आणि हेलन

  • पूर्वरंग « मागील भाग


    सोनेरी सफरचंदाचा निवाडा

    सर्वात सुंदर कोण हे ठरवण्यासाठी या हेरा, अथीना आणि अफ्रोडाईटी या तिघीही आयडाच्या झर्‍यात सुस्नात होऊन नग्न स्थितीत पॅरिस ऊर्फ अलेक्झांडरसमोर आल्या. पण त्यांचे सौंदर्य पाहून दिपून गेलेल्या पॅरिसला त्यांच्यापैकी एकीला निवडणे जमेना. तिघींनीही ते सफरचंद आपल्याला दिल्यास त्याला काही देऊ करण्याची– सौदा करण्याची तयारी दाखवली.

    अथीनाने त्याला शहाणपण, युद्धकौशल्य आणि योद्ध्याचे स्थान देऊ केले. हेराने त्याला राजकीय सत्ता आणि आशियाचे अधिपत्य देऊ केले. तिसर्‍या अफ्रोडाईटीने त्याला ‘जगातील सर्वात सुंदर स्त्रीचे प्रेम’ देऊ केले. पॅरिसने सफरचंद अफ्रोडाईटीच्या पदरात टाकले. यातून देवांना ज्याची भीती होती तेच घडले. इतर दोघी नाराज झाल्या नि त्यांची ती नाराजी अनेक वाटांनी ट्रॉयकडे चालू लागली.

    पॅरिसने प्रेम नि सौंदर्य स्वीकारतानाच युद्धकौशल्य, शहाणपण, नि राजकीय सत्ता हे तीनही नाकारले आहे. त्याच्या पुढच्या कथेमध्ये या त्याच्या निर्णयाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. एका बलशाली राज्याच्या राणीचे अपहरण करुन आणताना त्याचे शहाणपण लयाला गेल्याचे स्पष्ट दिसते. कारण हा केवळ दोन जिवांच्या प्रेमाचा प्रश्न नव्हता, दोन राज्यांच्या परस्परसंबंधांचा आणि म्हणून इतर अनेक माणसांचा होता याचे भान पॅरिसला नव्हते. त्याचे हे आत्मसंतुष्ट असणे राजकारणकुशल घराण्यातील व्यक्तीला शोभणारे नव्हते. कदाचित त्याचे सारे तारुण्य सामान्य कुळात व्यतीत झाल्याने राजकारण, युद्धकौशल्य आदींचे जे प्रशिक्षण एखाद्या राजपुत्राला सुरुवातीपासून लाभते, ते त्याला मिळाले नसल्याने त्याने हा बेजबाबदार निर्णय घेतला असावा.

    ट्रॉय आणि ग्रीकांचे ते युद्ध त्याच्या कृत्याने उद्भवलेले असूनही त्यात ट्रॉयचा प्रमुख योद्धा पॅरिस नव्हता, राजपुत्र हेक्टर होता. शौर्य, डावपेच, कुशल राजकारणी अशा तीनही गुणांनी युक्त असा तो राजपुत्र रणशूर होता. उलट पॅरिसचे चित्र एक सुमार, फारतर सर्वसाधारण सैनिकाचे दिसते.त्याच्या हातून अकिलिसचा मृत्यू घडतो तो केवळ अकिलीसमध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण अशा न्यूनामुळेच. त्यानंतरही त्या यशाला तो निर्णायक विजयामध्ये परिवर्तित करु शकलेला नाही. त्याच्याच कृतीने ट्रॉयचा विध्वंस झाल्याने, आणि त्यातच त्याचा अंतही झाल्याने, राजकीय सत्ताही त्याच्या हाती आलेली नाही. जिवंत असतानाही धाकटा असल्याने त्याला ती मिळण्याची शक्यता नव्हतीच.


    भाकित-कथा

    Curse of Cassandra by Mila Strugatski.

    पॅरिसच्या आयुष्यात झ्यूसचा प्रवेश झाला तो त्याच्या ट्रॉयपूर्व आयुष्यात, तो अलेक्झांडर नावाचा मेंढपाळपुत्र असताना. हेरा, अथीना नि अफ्रोडाईटी या तिघींपैकी हे सफरचंद कुणाला मिळावे याचा निवाडा करण्याची जबाबदारी झ्यूसने या अलेक्झांडरच्या शिरावर दिलेली आहे. ही कथा पुढे सांगते, की या सोनेरी सफरचंदाच्या निवाड्यास बसवलेला हा अलेक्झांडर वास्तविक पॅरिस हा ट्रॉयचा राजा प्रायम याचा जन्मत:च त्यागलेला मुलगा आहे. या घटिताला आधार देण्यासाठी प्रायमची मुलगी कसाण्ड्रा (Cassandra) कथेमध्ये येते. ही राजाची भविष्यवेत्तीही (Oracle) आहे, जिला भविष्याचे कवडसे पाहाता येतात. तिला पॅरिस नि ट्रॉयचे भवितव्य दिसते. ‘पॅरिसमुळे ट्रॉयचा विध्वंस होईल’ असे भाकित पेरण्यास एवढी पार्श्वभूमी तयार होते.

    तिने ते भाकित केले, की तिचे कथानकातले काम संपते. ट्रॉयच्या पुढच्या कथेमध्ये तिला काहीही भूमिका नाही. मग ‘हे भाकित नि त्यातून पॅरिसचा त्याग करण्याचा राजा नि राणीने घेतलेला निर्णय प्रजेसमोर येऊ नये म्हणून तिला कायम सामान्यांपासून दूर ठेवण्यासाठी, ती आजारी असल्याचा बनाव करण्यात आला’... असा बनाव तुम्हा-आम्हाला सांगितलेल्या कथेमध्ये घुसवला जातो. इथे दोन बनाव आहेत, एक राजा-राणीने त्यांच्या प्रजेसमोर केलेला, आणि दुसरा हा सारा बनाव ज्या कथनाचा भाग आहे ती कथा, जो तुम्हा-आम्हा वाचकांसाठी आहे.

    कसाण्ड्राचे आरोग्य खरोखरच ठीक नसेल, तर त्याचा फायदा घेऊन भाकित तिच्या तोंडी पेरले असण्याची शक्यताच अधिक. राजघराण्यातील शारीरिक वा मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींबाबत हे अनेकदा दिसते. अशा उच्चकुलीन पण दुबळ्या जिवांना देवाचे वा नियतीचे विशेष दूत असल्याचे भासवून राजकुलातील न्यून झाकले जात असते. कसाण्ड्रा भविष्यवेत्ती असल्याचा बनाव तिचे अनारोग्य झाकण्यासाठी केला असणे शक्य आहे. जसे पॅरिससारख्या तथाकथित निम्नकुलीन व्यक्तींना जन्मवियोगी (separated at birth) स्वरूपाच्या दंतकथांच्या वा भाकितांच्या आधाराने उच्चकुलीन स्तरात खेचले जाते तसेच.

    मुळात हा सारा कथाभागच पूर्वरंग म्हणून घुसडलेला आहे हे अधिक संभाव्य आहे. भाकित असे काही नव्हतेच, कुण्या राजपुत्राचा त्याग कधी केला गेलाच नसावा. सामान्य कुळातल्या मोझेसला फॅरोहच्या मुलीने जसे दत्तक घेतले होते (पुढे गुलामांप्रती त्याचा कळवळा ज्यूंच्या पथ्यावर पडला, त्यानंतर तो मूळचा ज्यू असल्याची कथा रचली गेली), तसा हा राजपुत्र प्रायमने दत्तक घेतले. ट्रॉयमधील वार्षिक खेळाच्या मैदानात एका वर्षी सामान्य मेंढपाळाचा मुलगा असलेल्या कुण्या अलेक्झांडरने खूप पराक्रम गाजवला. दरवर्षी विजेता ठरणार्‍या राजपुत्र हेक्टरला नमवून ती स्पर्धा जिंकली. हे पाहून प्रभावित झालेल्या राजाने या अलेक्झांडरला दत्तक घेतले नि पॅरिस असे नाव दिले. माझ्या मते मूळ कथाभाग एवढाच असावा.

    त्यानंतर त्याच्या अभिनंदनासाठी गेलेल्या राणी हेकुबाला त्याच्या जन्मखुणेवरुन ‘हाच आपला मुलगा’ असा साक्षात्कार होतो. योगायोगाचा हा भाग कसाण्ड्राच्या भाकिताचा उत्तरार्ध आहे. त्याला उच्चकुलीन, क्षत्रियकुलीन बनवण्याचा नि त्याच वेळी ट्रॉयच्या पुढे झालेल्या विध्वंसासाठी कारणमीमांसा निर्माण करण्याचे काम इथे पुरे होते आहे... उपलब्ध कथाबिंदूंमधून मी काढलेला आलेख असा आहे!


    झ्यूस आणि हेलन

    झ्यूसची भूमिका ट्रॉयच्या विध्वंसामध्ये नि पॅरिसच्या आयुष्यात त्याला सोनेरी सफरंचदाचा निवाडा करण्यास बसवण्यापुरती मर्यादित नाही. पॅरिस नि ट्रॉयच्या कथेमध्ये झ्यूसचा सहभाग आणखी एका प्रकारे आहे.

    आपल्या युद्धाच्या योजनेमध्ये पॅरिसला मोहरा बनवणारा झ्यूस हा ग्रीकांचा स्वर्गाचा अधिपती. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘देवांचा देव’ असाही येतो. याच्या लीलाही आपल्याकडील इंद्रासारख्याच रंगेल नि कामुक आहेत. त्याने बैलाच्या रूपात येऊन फीनिशिअन राणी युरोपा हिच्यावर बलात्कार केला, या संगातून मिनोस या मुलाचा जन्म झाला. (गंमत म्हणजे पुढे तो क्रीटचा राजा झाल्यावर त्याने मिनेटॉर नावाच्या एका बैलमानवासाठी बळींची सोय केल्याचा उल्लेख येतो.) ज्या प्रकारे तिच्या पतीचे – गौतम ऋषींचे– रूप घेऊन इंद्राने अहिल्येशी व्यभिचार केला, त्याच प्रकारे झ्यूसने राजा अक्रिसिअसची राणी दनाई हिच्याशी व्यभिचार केला. त्यातून पर्सिअस जन्मला.

    आयो या निम्न देवतेच्या वंशामध्ये तर झ्यूसचा संबंध इतक्या वेळा आला आहे, की ‘आपल्या नाती, पणती, खापरपणतींशी संग करणारा हा झ्यूस देव सोडा, माणूस म्हणून तर त्याची गणती व्हावी का?’ असा प्रश्न पडेल. जनावरांमध्ये नर-मादी पलीकडे कुठलीही ओळख नसली, जुगण्यासाठी कोणताही अडसर नसला, तरी त्यांचे जीवनमान आणि जीवनपद्धती (विशेषत: कळपात राहणार्‍या प्राण्यांची) विचारात घेतली, तर अशा वंशांतर्गत संगाची शक्यता नगण्य होत असते. शिकारी प्राण्यांमध्ये बहुतेक वेळा कळपात जन्मलेल्या, वयात आलेल्या नरांना कळपाबाहेर हाकलले जात असते, ज्यामुळे ते आपल्या आई, मावशा, बहिणींपासून दूर ढकलले जात असतात. शाकाहारी, भक्ष्य प्राणी मात्र मोठ्या कळपात राहातात नि त्यातून नर हुसकावले जात नाहीत. परंतु त्या कळपातील प्राण्यांची एकुण संख्या बरीच मोठी असल्याने संख्याबळाच्या कारणाने अशा वंशांतर्गत संगाची संभाव्यताही (probability) नगण्यच राहाते.

    याकडे तार्किकदृष्ट्या पाहिले तर, – बहुधा लढाईच्या निमित्ताने – दूरदेशी असलेल्या पतींच्या अनुपस्थितीत उद्भवलेल्या गर्भारपणाचे श्रेय झ्यूसच्या ओटीत घालून त्यातून जन्मलेल्या संततीला प्रतिष्ठित समाजात सामावून घेतले जात असावे असे दिसते.

    याच झ्यूसने हंसाच्या रूपात येऊन स्पार्टाची राणी लीडा हिच्याशी संग केला. असे म्हटले जाते की झ्यूसबरोबर संग केल्यानंतर तिने चक्क एखाद्या हंसीप्रमाणे अंडे प्रसवले. त्यातून जन्मलेली मुलगी हेलन, हीच ‘जगातील सर्वात सुंदर स्त्री’ म्हणून पॅरिसला मिळावी याचे नियोजन पुढे अफ्रोडाईटी करते आहे.

    आपल्याकडे रामायणामधील सीतादेखील हेलनप्रमाणेच अद्भुतजन्मा आहे. ‘जमीन नांगरत असताना जनक राजाला ती सापडली’ असे म्हटले जाते. सीता या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘नांगराच्या फाळाने तयार केलेला चर’ असा आहे. कदाचित त्या नावावरून ही उलट दंतकथा प्रसृत झाली असावी.

    परंतु एका आवृत्तीमध्ये ती वेदवती या साधिकेची मुलगी असे नोंदवले गेले आहे. कुठे ती वेदवतीची मुलगी नव्हे, तर तिचा पुनर्जन्म आहे असे मानले आहे. रामायणाच्या आणखी एका आवृत्तीमध्ये (बहुधा जैन रामायण) ती खुद्द रावणाचीच मुलगी आहे. (या दाव्याने रावणाने सीतेचे अपहरण करुनही तिच्याशी अतिप्रसंग न केल्याची तर्कसंगती मिळून जाते.)

    सर्वसामान्यांना अद्भुततेचे आकर्षण असल्याने – आणि कदाचित वंशशुद्धीच्या कल्पना प्रबळ झाल्यामुळे दत्तक मूल कमअस्सल समजले जाऊ लागल्यामुळे – तिचे अद्भुतजन्मा असणेच अधिक लोकप्रिय झाले आहे. हेलनबाबतही असेच घडले असावे. सीतेचे आयुष्य नि हेलनचे आयुष्य केवळ जन्माबाबतच नव्हे, तर पुढेही वारंवार एकमेकांना समांतर जात आहेत. दोघींच्याही सुटकेसाठी व्यापक युद्धांचा घाट घातला गेला आहे.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » ट्रॉयचे युद्ध

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: