Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ११ : अद्यतनीकरण (Update)

  • नव्या व्यवस्थेकडे « मागील भाग


    अद्यतनीकरण (Update)

    संगणक वा स्मार्ट फोन वापरणार्‍यांना ‘अद्यतनीकरण’ (Update) ही संकल्पना चांगलीच माहित झाली आहे. या दोन्ही उपकरणांवर Microsoft Office, WhatsApp, iTunes यांसारख्या विविध प्रणाली असतात. तुम्ही या दोन उपकरणांचा वापर करत असताना अनेकदा तुमचा संगणक वा फोन ‘अमक्या अ‍ॅपचा अपडेट उपलब्ध आहे’ किंवा ‘पुढचे व्हर्शन उपलब्ध आहे’ असा संदेश देत असतो. हे अद्यतनीकरण करण्यास तुम्ही संमती दिली की ती प्रक्रिया आपोआप– तुमच्या हस्तक्षेपाखेरीज पार पाडली जाते.

    पण हे ही जुने झाले. आता अनेक प्रणाली – विशेषत: browsers – हे तुम्हाला विचारता, तुमच्या माघारी, परस्पर अद्ययावत करून मोकळे होतात. उलट त्यांना तसे करता येऊ नते यासाठी बरेच सव्यापसव्य करावे लागते. बहुतेक वापरकर्ते (Users) हे आळशी असल्याने हे त्यांच्या पथ्यावर पडते. त्यातील धोक्याकडे दुर्लक्ष करुन ते सुखाने काम करत राहातात.

    https://www.eetimes.com/ येथून साभार.

    उपग्रह मनोरंजनाच्या (satellite television) जमान्यात तुम्हाला विविध दूरचित्रवाणी वाहिन्या पाहाण्यासाठी ‘सेट-टॉप बॉक्स’ नावाचे उपकरण वापरावे लागते. यावर सेवादात्या कंपनीने आपल्या नियंत्रणातील संचालन-प्रणाली (Operating system) बसवलेली असते. वापरकर्त्याकडून वेगळी संमती न घेता त्यांच्याकडून त्याचे अद्यतनीकरण परस्पर केले जात असते. अनेकदा एखादा कार्यक्रम चालू असतानाच ते जिच्या माध्यमातून पाहात आहोत त्या प्रणाली (system वा app) मध्ये हा बदल होऊ लागतो. त्यासाठी तुमचा कार्यक्रम सरळ थांबवून हे काम केले जाते.

    तुम्ही खासगी वा शासकीय कार्यालयात काम संगणकावर काम करत असाल, तर हा संगणक एका जाळ्याचा भाग असतो आणि या जाळ्याचे नियंत्रण ‘सर्व्हर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगणकाकडे असते. याच्या नियंत्रणात असलेल्या सर्व संगणकावर असे अद्यतनीकरण करण्याचे, वापरकर्त्यांच्या कामावर देखरेख करण्याचे काम हा सर्व्हर करत असतो.


    एक मेंदू चार हात

    पण ही सारी अर्वाचीन उदाहरणे झाली. यापूर्वीच्या भागांत जसे मानवी जीवनप्रवासाच्या उदयकाळाचा मागोवा घेतला, त्याच धर्तीवर संगणकाच्या उदयकाळाकडे जाऊ. या काळामध्ये संगणकांची उपलब्धता कमी होती नि किंमत सर्वसामान्यांच्या तर सोडाच, अनेक कार्यालये नि कंपन्यांच्याही आर्थिक कुवतीबाहेर होती. शिवाय तो एका वेळी एकच व्यक्ती वापरू शकत असे. मग आहे त्याच संगणकाचा वापर अधिकाधिक करता यावा यासाठी ही मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न झाला. ज्याला CPU (Central Processing Unit) म्हणतात तो मुख्य विभाग अधिक महत्त्वाचा नि किंमतीचा फार मोठा हिस्सा त्याच्यासाठीच दिला जाई. मग हा भाग एकाहुन अधिक व्यक्ति वापरू शकल्या, तर खर्च विभागला जाईल या हेतूने, इतर तीन आवश्यक उपकरणे– मॉनिटर, की-बोर्ड नि माऊस– मिळून तयार झालेले एकाहुन अधिक Terminals या एकाच CPU संगणकाला जोडले गेले.

    ही टर्मिनल्स (Terminal) स्वतंत्रपणे काही कार्य पार पाडू शकत नसल्याने, काही वेळा यांना Dumb – म्हणजे बुद्धिमंद - Terminals असेही म्हटले जाई. एखाद्या बँकेच्या शाखेमध्ये अथवा पोस्ट ऑफिससारख्या सरकारी कार्यालयांतून असते तशी ही टर्मिनल्स म्हणजे त्याच्या वापरकर्त्याला मूळ संगणकाशी संवाद साधण्यासाठी दिलेली केवळ एक खिडकी असे. या खिडकीचा वापर वेग-वेगळी व्यक्ती करु शकत असे. तिच्या मार्फत वापरकर्त्याने पुरवलेली वा मागितलेली माहिती, वा करायला सांगितलेली प्रक्रिया (process) हे सारे मुख्य संगणकाकडे पाठवत असे. तिथेच त्यावर आवश्यक ते काम होऊन, अंतिमोत्तर तेवढे या खिडकीकडे येत असे. मग वापरकर्ता ती माहिती या खिडकीमार्फत पाहू शके, आवश्यक वाटल्यास मुख्य संगणकाला जोडलेल्या प्रिंटरवरुन छापून घेऊ शकत असे.

    ही संकल्पना आज आभासी खासगी जाळे (Virtual Private Network - VPN) मध्ये रूपांतरित झाली आहे. याचा फायदा असा की परस्परांसोबत काम करणारे सारे वापरकर्ते आता एकाच ठिकाणी, एकाच भूभागावर असण्याची गरज उरलेली नाही. एखाद्या अमेरिकन कंपनीसोबत काम करणारे काही जण भारतात, काही इंडोनेशियामध्ये, काही चीनमध्ये तर काही एखाद्या स्कँडिनेवियन देशात बसून काम करु शकतात. हे सारे काम करताना प्रथम VPN मार्फत अमेरिकन कंपनीच्या सर्व्हरवर लॉग-इन करतात. आता त्या कंपनीच्या सर्व्हरच्या कक्षेतील प्रणाली नि डेटा यांचाच वापर त्यांना करता येतो. या कामाशी त्यांच्या स्वत:च्या संगणकाचा संपर्क होत नाही. जणू ते त्या अमेरिकन कंपनीच्या कार्यालयात बसूनच काम करत असतात.

    ही संकल्पना सजीवाला– विशेषेकरुन मानवाला लावून पाहाता येईल. एका मानवाची डोळे, नाक, कान, ही ग्रहणेंद्रिये; हात, पाय हे चल (movable) अवयव, त्यांवरील बोटे, ही सारी अनुषंगे वरकरणी स्वतंत्रपणे कार्यरत असली, तरी ती अंतिमत: मेंदू या एका नियंत्रकाच्या अधिपत्याखाली असतात. या सर्वांनी केलेल्या कार्याचे अहवाल या केंद्रीय नियंत्रकाकडे जातात, त्यानंतर त्या माहितीचे पृथक्करण, विश्लेषण करुन तो आवश्यक पुढील कृतीचा निर्णय घेतो नि ती करण्याची जबाबदारी असणार्‍या त्या-त्या अनुषंगाकडे आवश्यक तो संदेश पोहोचवतो.

    संगणकाचा वा तुमच्या उपग्रह मनोरंजन सेवादात्याचा सर्व्हर जसा एकाच क्षणी त्याला जोडलेल्या सर्व उपकरणांना अद्ययावत करतो, तसे मानवी मेंदूंबाबत करता आले, तर समूह-मन प्रस्थापित करणारी ही नवी प्रणाली त्यांच्या मेंदूत आरोपित करता येईल. यातून या मानवी मेंदूंचे अस्तित्व स्वतंत्र व्यक्ति म्हणून न राहाता एका व्यापक समूह-मनाचे अनुषंग म्हणून बदलता येईल. Pluribus या मालिकेमध्ये हीच कल्पना वापरून एका समूह-मनाची निर्मिती केली आहे.


    Pluribus : समूह-मनाचा उदय

    मालिकेतील घटनांची सुरुवात होते ते एका जगद्व्यापी अपघाताने. एका विशिष्ट क्षणी जगातील बहुतेक सारे मानवप्राणी अचानक स्तंभित (stand-off) होऊन जातात, टीव्हीवरील चालू चित्रमालिका रिमोटवरील ‘Pause’ बटन दाबून मध्येच थांबवावी तसे. काही वेळानंतर टीव्हीवर pause केलेला चित्रपट बटन दाबून पुन्हा सुरु करावा तसे मानवी जग पुन्हा सजीव होते.

    एखाद्या सर्व्हरने एकाच आदेशाने त्याला जोडलेल्या सर्व संगणकांवर/टर्मिनल्सवर असलेल्या संचालन-प्रणाली (operating system) बदलून टाकल्याप्रमाणे– या सार्‍यांच्या मेंदूंचे जणू ऊर्ध्वश्रेणीकरण (upgrade) झाले आहे. (जगभरात विखुरलेल्या तेरा जणांचा अपवाद वगळता) सर्वांच्या वागणुकीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मनुष्यप्राणी म्हणून त्यांच्या मनाची काम-क्रोधादी षड्रिपुयुक्त जी जडणघडण असते, ती पुसून टाकण्यात आली आहे. तिथे नवी मानसिक जडणघडण, नवी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे. आता त्यांचे चेहरे काहीसे भावनाहीन दिसू लागले आहेत. भयपटांतून दिसणार्‍या ‘पुनरुज्जीवित कलेवरांची’ (Zombie) आठवण होते आहे.

    या सार्‍या माणसांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले आहे. पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज हा आता एकच जीव म्हणून जगणार आहे. या सर्व माणसांचे माणसाचे भौतिक अवयव वेगळे असले, तरी स्मरणकोष (memory) नि जाणीवा (Senses) या केवळ समानच नव्हे तर सामायिक (common) आहेत. एकाला झालेले ज्ञान हे आपोआप इतरांच्या स्मरणकोषात पोहोचते आहे. एकाला लागलेली ठेच सार्‍यांच्या चेतासंस्थेमध्ये वेदनेची लहर उमटवून देते आहे. एकाच्या मनात उमटलेली सुखाची, आनंदाची लाट सर्वांच्याच चेहर्‍यावर समाधानाची भावना प्रतिबिंबित करते आहे. आता प्रत्येक व्यक्ती मानवी शरीराच्या हात, पाय, डोळे, इत्यादी अवयवांप्रमाणे या विशाल मानवजीवाचे केवळ एक अनुषंग झालेले आहे’(१).

    एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करुन ठेवायचा, तो असा की, ‘या व्यवस्थेमध्ये मानवी मेंदू वा संगणक-जाळ्याच्या सर्व्हरप्रमाणे एखादी केंद्रीय व्यवस्था नाही. इथे निर्णय समूह-मनानेच होतात,’ असे ही सारी अनुषंगे– ही पूर्वाश्रमीची माणसे– सांगताना दिसतात. (कथानकाच्या प्रवाहामध्ये इथे मला प्रथम ठेच लागली. पण याबद्दल इतर काही मुद्द्यांसह पुढे बोलेन.)

    हा जैविक भाग वगळला, तर उरलेल्या व्यवस्थेचे मुख्य सूत्र हे साम्यवादी व्यवस्थेचे सूत्रच आहे. संपूर्ण मानवी समाज हा एकच असल्याने देशांची निर्मिती करणार्‍या सीमा नाहीत. इथे वैय्यक्तिक मालकीला थारा नाही. इथे कुठलेही चलन नाही नि राज्यव्यवस्थाही नाही. अर्थ नि अधिपत्य ही दोनही मुख्य कारणे निकालात निघालेली असल्याने संघर्ष, लढाया, युद्धे नाहीत. भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहिले असता पतंजलीसूत्रांतील अहिंसा, सत्य, अस्तेय या यमनियमांचे पालन करणारा हा समाज आहे.

    ब्रह्मचर्य नि अपरिग्रह हे इतर दोनही काही अंशी आचरणात आणत आहेत. वैयक्तिक संग्रह नसला, तरी सामूहिक गरजेच्या गोष्टींचा संग्रह– तर काही प्रमाणात उत्पादनही केले जाते आहे. ब्रह्मचर्याबाबत मात्र काहीशी संदिग्ध स्थिती आहे. साम्यवादी व्यवस्था लग्नसंस्थेलाही राज्यव्यवस्थेप्रमाणे शोषणाची पोषक मानून तिलाही मोडीत काढण्याचा प्रस्ताव देते. प्लरिबसच्या व्यवस्थेमध्ये याबाबत थेट उल्लेख नसला, तरी रात्रीच्या समूहवसतीचा प्रयोग पाहाता ती ही मोडीत निघाली असावी असे म्हणता येते.

    पण ही व्यवस्था साम्यवादी व्यवस्थेप्रमाणे केवळ मनुष्यप्राण्यांतील बंधुभावापाशी थांबत नाही. ती निसर्गाशी बंधुभावही प्रस्थापित करते आहे. मनुष्येतर जीवमात्रांशीही आपलेपणाचे सौहार्दमय सहजीवन असायला हवे असा तिचा आग्रह आहे. त्यामुळे आता कोणत्याही सजीवाला हानी न पोहोचवण्याचे तिचे धोरण आहे. त्याअर्थी ती बुद्धाच्या करुणामय दृष्टिकोनाचा अंगीकार करते आहे. परंतु प्राणी, पक्षी, वनस्पती वा कीटक हे सजीव समूह-मनाच्या या जाळ्यामध्ये समाविष्ट नाहीत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे नि नव्या व्यवस्थेचे अभयही. त्यामुळे समूह-मनाच्या निर्मितीनंतर सर्व प्राणिसंग्रहालये, कुक्कुटपालन केंद्रे, वराहपालन केंद्र, मांस व दुधासाठी चालवली जाणारी गोपालन केंद्र बंद करुन त्या प्राण्यांना मुक्त करण्यात येते. अगदी वनस्पतींनाही इजा पोहोचवणे निषिद्ध ठरले आहे.

    पण ‘जीवो जीवस्य जीवनम्‌’ या निसर्गरचनेमध्ये एका सजीवाने दुसर्‍याला हानी करायची नाही म्हटले, तर खायचे काय? जगण्याला आवश्यक ऊर्जा कुठून मिळवायची? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. आणि हे झाले मूलभूत प्रश्न. जिवंत राहाणे नि जगणे या दोन अवस्थांतील फरक दाखवणार्‍या मनुष्यप्राण्याला इतरही बर्‍याच गरजा असतात, त्या कशा भागवायच्या? या प्रश्नांना नवी व्यवस्था सामोरे जाते आहे.

    - ( क्रमश:) -

    पुढील भाग » जठराग्नी शमवाया भूतां

    टीपा:

    (१). प्लरिबसच्या व्यवस्थेकडे या दृष्टिकोनातून पाहाताना मला सुबोध जावडेकर यांच्या ‘पदार्पण’ या विज्ञानकथेची (कथासंग्रह: ‘वामनाचे चौथे पाऊल’) आठवण झाली. त्याबद्दल या मालिकेच्या अखेरीस एका परिशिष्टामध्ये विस्ताराने लिहितो आहे. [↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: