Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १५ : उपसंहार

  • अंत:स्फोटाची अपरिहार्यता « मागील भाग

    ते तेरा जण

    ‘प्लरिबस’मधील या समूह-मनाच्या या सर्वव्यापी बदलाला जगभरात तेरा जण अपवाद आहेत. पृथ्वीवरील मानवजातीच्या सामूहिक ‘धर्मांतरा’मधून हे तेरा जण अनाकलनीय कारणाने सुटले आहेत. मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी हे तेरा जण– प्रामुख्याने त्यातील कॅरल ही लेखिका आहे.

    TheConvertsAndTheHeathen

    समूह-मनाची अनुषंगे-पूर्वाश्रमीची माणसे- हा ‘अपघात’ निस्तरून घेण्याचा आटापिटा करत आहेत. या तेरा जणांना ते आपल्यात सामावून घेण्यास उत्सुक असले, तरी हे कसे साध्य करावे याची माहिती त्यांना नाही. याचे एक कारण म्हणजे मुळात आपल्यामध्ये हा बदल कसा झाला याची माहिती त्यांनाच नाही. त्यामुळे या जुन्या जगाचा अवशेष असलेल्यांच्या मनांवर आपल्या संघर्षहीन आयुष्यातील तथाकथित सुखी, समाधानी असण्याचे महत्त्व बिंबवत त्यांना वळवून आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

    त्यासाठी या ‘बाहेरच्यां’च्या शक्य त्या सार्‍या इच्छा-आकांक्षा पुरवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना हवी ती वस्तू, हवे ते सुखोपभोग मागणीसरशी हजर केले जात आहेत. उत्पादन आता गरजेशी जोडले गेल्याने आणि मितव्ययी जीवनशैली स्वीकारली गेल्यामुळे, कृत्रिम मागणी निर्माण करणार्‍या भांडवलशाही हपापलेपणाला इथे थारा उरलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त मालाचा साठा करुन ग्राहकाला गरजेचे तेवढेच उचलून नेण्याची मुभा ठेवणारी ठेवणारी रीटेल स्टोअर्स मोडीत काढली जात आहेत.

    परंतु कॅरल आपली जीवनशैली बदलण्याचे नाकारून ‘गरजेच्या वस्तू समूहाकडून न मागवता– म्हणजे त्यांचे ‘उपकार’ न घेता– अशा स्टोअर्समधूनच खरेदी करण्याचा’ निर्धार करते, तेव्हा रिकामे केलेले ते स्टोअर पुन्हा वस्तूंनी भरून उभे केले जाते. त्या तेरा जणांच्या इच्छापूर्तीचे हे बंधन इतके कडक नि अनुल्लंघनीय आहे की त्यातील एखाद्याने अणुबॉम्ब मागितला तरी त्यांना तो पुरवावा लागणार आहे... याची एक चुणूक प्रत्यक्षात दाखवलीही जाते.

    पण असे असेल तर ‘आतील’ लोक असूयाग्रस्त होऊन ‘बाहेरचेच आयुष्य योग्य’ अशी प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होणार नाही का? की त्यांच्यामध्ये असलेल्या ‘मुक्त विचारशक्ती’चा (free will) संपूर्ण अभाव याचे हे लक्षण आहे. तसे असेल तर याला समूह-मन म्हणायचे की गुलाम-मन?


    सुख म्हणजे नक्की काय असतं?

    ही ‘पूर्वाश्रमीची माणसे’ त्या तेरा जणांना सांगतात की, ‘आमच्यामध्ये एक जाणीव, एक स्मरणकोष असल्याने आम्ही सारे एकच झालो आहोत. त्यामुळे आता परस्परांबद्दल द्वेष, अहंकार, ईर्षा यांचा लवलेश नाही. जीवनातील दु:ख नाहीसे झाल्याने एक असीम शांत असे आयुष्य आम्हाला मिळालेले आहे.’

    ‘आम्ही सारे सुखी आहोत’ असं म्हणणार्‍या जीवांकडे सुखाची व्याख्या काय आहे? धर्मसंस्थेपासून तिचा कडवा विरोधक असलेल्या कम्युनिझमपर्यंत सार्‍यांचे बहुसंख्य अनुयायी जसे त्यांची तत्त्वे, कर्मकांडे आकलनाशिवायही आत्मसात करून घेतात तसे झाले आहे का? म्हणजे सुखाची व्याख्या माहित नाही, पण ‘आपण सुखी आहोत’ हे वाक्य त्याचा अर्थ न जाणवताही रुजून गेले आहे?

    शिवाय ‘केवळ संघर्षरहित जीवन म्हणजे सुख’ असे असते का? ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकामध्ये जी.ए. कुलकर्णींनी रेड्या जोशी या व्यक्तिबद्दल लिहिले आहे :

    सुखाची व्याख्या नि समाधानाची व्याप्ती तुम्ही जशी कराल, त्यानुसार त्यांच्या पूर्तीच्या शक्यता नि संभाव्यता कमी वा अधिक होत असतात इतकेच. अपेक्षांचे गाठोडे जितके किमान, तितकी सुखाची संभाव्यता अधिक असते. पण एक नोंदवून ठेवायला हवे, अशा संघर्षरहित, गतिहीन जगण्यामध्ये प्रगतीच्या वाटा निर्माण होत नाहीत.

    तसेही संघर्ष हा जीव-उत्क्रांतीच्या दोन प्रमुख पायांपैकी एक नव्हे का? केवळ सहकार प्रगतीला मारक ठरत नाही का? एखाद्या सजीवाच्या आयुष्यामध्ये संघर्षाची शक्यताच नसेल, तर त्याच्या मनातील ईर्षा मावळून जाईल. आणि ईर्षेविना प्रगतीच्या कोणत्या वाटा खुल्या राहातील? मर्यादित संघर्ष ऊर्फ स्पर्धा हा मूलाधार मानून उभ्या राहिलेल्या भांडवलशाही व्यवस्थेने मानवी आयुष्यात काही सुखकर गोष्टींची भर घातली नाही का?

    किमयागारांच्या काळापासून अमरत्व– किमान दीर्घायुष्य देऊ करेल असे औषध वा रसायन (Elixir) निर्माण करण्याच्या मागे मनुष्यप्राणी हात धुवून लागलेला आहे. मृत्यूचे भय नि म्हणून अमरत्वाचे एक प्रकारचे विकृत आकर्षण मानवी मनात रुजले आहे. त्यामुळे अमरत्व वा दीर्घायुष्य हे अप्रत्यक्षपणे सुखाशी जोडले गेले आहे.

    काही काळापूर्वी एक कथा (दुर्दैवाने लेखक नि कथेचे नाव स्मरणात नाही) वाचण्यात आली होती. एका जमातीमध्ये सरासरी आयुर्मान बाह्य, प्रगत जगापेक्षा कितीतरी अधिक असते. एक संशोधक यांचा अभ्यास करून त्यांच्या दीर्घायुष्याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशाने त्यांच्यामध्ये जाऊन राहातो. अखेर त्याच्या ध्यानात येते की त्यांची क्रियाशून्यता, संघर्षाचा अभाव हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक आहे. परंतु त्याचाच परिणाम म्हणून ही जमात सुस्त नि आळशी आहे. जे अनायासे मिळते त्याहून अधिक काही मिळवण्याची, निर्माण करण्याची आसच त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते लोक दीर्घायुषी असले तरी, प्रगतीच्या वाटा सोडून विसावलेले आहेत.

    अलिकडच्या काही वर्षांत भारतीय निवडणुकांच्या राजकारणामध्ये पैसे, धान्य आदींचे वाटप सुरु झाले, तेव्हा त्याविरोधातील याचिका दाखल करुन घेताना ‘गरजा अशा आयत्या भागत राहिल्या तर माणसांमध्ये काम करण्याची प्रेरणाच उरणार नाही, देशाची क्रयशक्ती घटेल’ अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली होती. म्हणजे ‘सुख वा गरजपूर्ती ही संघर्षाशी, परिपूर्तीशी जोडली गेलेली असली पाहिजे’, हे न्यायव्यवस्थेनेही सूचित केले होते. सुख हे आयुष्याचा एक भागच असायला हवा. पुरे आयुष्य त्याने व्यापून गेले की हजारो वर्षे सुस्त पडून राहिलेल्या एखाद्या खडकासारखे ते आयुष्य क्रियाशून्य नि वांझ होऊन राहील.

    व. पु. काळे यांच्या एका कथेतील पात्र ‘सुख म्हणजे वेदनेचा अभाव’ अशी व्याख्या करते. पण ती व्याख्या करण्यासाठी आधी वेदनेच्या चरकातून जावे लागते, तरच त्या व्याख्येला आधार मिळतो.

    WhatIsHappiness
    Mr. Diabaté यांच्या व्याख्येतील सुख

    बहुतांचा न्यूनगंड

    आपण सुखी आहोत असा दावा करणारी ही मानवी अनुषंगे पुढे असंही म्हणतात की, ‘तुम्हीही आमच्यामध्ये सामील व्हाल तर तुमच्यातील षड्रिपुंपासून तुमचीही सुटका होईल आणि तुम्हालाही आमच्यासारखे सुखी आयुष्य जगता येईल.’ हे पाहून मला विविध धर्म, पंथ, संस्थाने यांची आठवण होते आहे.

    आजच्या जगात धर्म (religion) पेक्षाही विविध आध्यात्मिक गुरु आणि त्यांची संस्थाने यांच्या अनुयायी म्हणवणार्‍या टोळ्यांचे वर्तन या बहुसंख्येसारखे असते(१). ‘आपल्या पदरी जे पडले आहे ते काहीतरी श्रेष्ठ आहे’ हा भ्रम ते कुरवाळत बसलेले असतात. बहुसंख्य माणसे तर ही निवडीची तसदीही न घेता जन्मदत्त धर्म, परंपरा, आचारविचार सांभाळून ठेवतात. ‘तेच श्रेष्ठ– नव्हे सर्वश्रेष्ठ असल्याचा, बिनचूक असल्याचा, मानवी उन्नतीचा एकमेव सोपान असल्याचा’ दुराग्रही दावा करत राहातात.

    Surrounded

    वास्तविक हे सारे आपापल्या जाती, धर्मांच्या समाजात राहात असतात. कळपातील सुरक्षितता त्यांना मोलाची वाटत असते. (त्याअर्थी मनुष्यप्राणी हा शिकारी प्राण्यांपेक्षा भक्ष्य प्राण्यांची प्रवृत्ती अधिक दर्शवतो.) परंतु मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. जे स्वीकारले वा पदरी पडले त्यातील न्यूनेही त्याला दिसत असतातच. फक्त ती जाहीरपणे मान्य करण्याची त्याची तयारी नसते. कारण तसे केल्याने आपल्या निवडीचे वा बाजूचे स्थान डळमळीत होईल अशी त्यांना भीती वाटत असते.

    पण ही न्यूने जाहीर न करण्याने, मनात दडपल्याने त्यांचा न्यूनगंड नाहीसा होत नाही. टोळीजीवनाच्या काळात शारीर-संघर्ष हीच यशाची कसोटी असल्याने संख्या हा टोळीच्या यशाचा मुख्य आधार असे. माणसे नागर झाल्यावर त्याचे रूपांतर अहिंसक अशा बहुमत या संकल्पनेमध्ये झाले. त्यामुळे ही न्यूनगंड असलेली माणसे ‘बहुमताच्या निकषावर आपली निवड वा बाजू निदान मोठी तरी ठरावी’ म्हणून आपल्याहून भिन्न निवड केलेल्या वा वारसा लाभलेल्यांना विविध प्रकारे आपल्याकडे खेचून घेऊ पाहातात. त्यासाठी सोयीनुसार साम-दाम-दंडभेदादी उपाय ते वापरत असतात. ‘पर्यायाचे किमान अस्तित्वही आपल्या मताला सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरू शकते’ या भीतीनेही, त्या प्रवाहाबाहेर राहिलेल्यांवर आपली निवड लादण्याचा प्रयत्न करत राहातात...‘’प्लरिबस’मधील ही अनुषंगांचे वर्तनही–निदान नेणिवेच्या पातळीवर– या वृत्तीला अनुसरूनच होते आहे.


    काही अनुत्तरित प्रश्न

    ‘प्लरिबस’मधील सर्वव्यापी बदलानंतर तेरा जण या बदलापासून अस्पर्श राहिले आहेत. ‘तेरा’ हा आकडा बहुधा ख्रिस्त अधिक त्याचे १२ अनुयायी (apostle) या ख्रिस्ती धर्माच्या आद्य प्रसारकांकडे अंगुलिनिर्देश करतो आहे. ‘या जगाला योग्य दिशा दाखवण्याचा, त्याला अध:पातापासून (?) वाचवण्याचा भार आता यांच्या खांद्यावर आहे’ असे सूचित केले जात असावे का? मालिका अद्याप पुरी न झाल्याने सध्या केवळ प्रश्नच उपस्थित करता येतो(२).

    कॅरलला सोबत करण्यास जी स्त्री निवडली, तिची निवड कुणी केली? ‘अमुक स्त्री ही कॅरलला अधिक चांगली सोबत करेल’ हे कसे ठरले? समूह-मनाच्या या जीवांमध्ये हे निर्णय-केंद्र नक्की कुठे आहे? प्रत्येक व्यक्तिचे मन हे केवळ ग्रहण-केंद्र असून, त्या सार्‍यांहून वेगळे असे निर्णयकेंद्र आहे नि त्याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीमध्ये समूह-मनामार्फत प्रक्षेपित होतो आहे का? तसे असेल तरीही समूह-मनाची कल्पना बाधित होत नाही का? की याउलट प्रत्येक व्यक्तीचे मन निर्णयास स्वतंत्र आहे पण लोकशाही पद्धतीने प्रत्येकाचे मत नोंदवून निवाडा होत असेल, तर मतभिन्नतेला वाव राहून समूह-मन ही संकल्पनाच रद्दबातल होत नाही का?...हे नि असे अनेक मूलभूत प्रश्न या व्यवस्थेबाबत विचारणे शक्य आहे.

    परंतु यात माझे एक महत्त्वाचे गृहितक आहे आणि ते म्हणजे हे समूह-मन ही समाजव्यवस्था म्हणून आकाराला येते आहे. मालिकेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरीकडे येताना असे दिसू लागले आहे की, हे समूह-मन कशाची तरी वाट पाहाते आहे. एखादी घटना घडणे अपेक्षित आहे. ती व्यवस्था निरंतर अस्तित्वात राहाणे अभिप्रेतच नसावे. म्हणजे ही बीज पेरण्यापूर्वी केलेली जमिनीची केवळ मशागतच असू शकते, मार्क्सला अभिप्रेत असलेल्या साम्यवादी व्यवस्थेपूर्वीची तात्पुरती सोय म्हणून प्रस्थापित केलेली समाजवादी व्यवस्थेसारखी. हा सारा खेळ रंगवणार्‍यांना अभिप्रेत असणारी व्यवस्था वा अव्यवस्था आणखी काही वेगळेच घेऊन येऊ शकते.

    - (समाप्त) -

    परिशिष्ट » ‘पदार्पण’- एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)

    टीपा:

    (१). कारण आज नवा धर्म उभा करणे तुलनेने अवघड आहे, माणसे बव्हंशी जन्मदत्त धर्म राखून श्रद्धा वा अध्यात्माच्या या पळवाटेने जाऊन पर्यायी काही पदरी पाडून घेऊ पाहातात. [↑]

    (२). माझा हेतू त्या समूह-मनाच्या व्यवस्थेकडे तिच्या पूर्वसुरींचा वारसा म्हणून पाहाण्याचा असल्याने, त्या तेरा जणांचे स्थान वा त्यांची भूमिका याबद्दल काही अधिक उहापोह करण्याचा माझा उद्देश नाही. तसेही हा लेखनप्रपंच ऐसपैस पसरल्याने तो भाग आवरता घेतला तरी हरकत नसावी. [↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: