-
साठ-सत्तर वर्षांपूर्वी पु. ग. सहस्रबुद्धें यांनी ‘नरोटीची उपासना’ या शीर्षकाचा एक सुरेख लेख लिहिला होता. त्याचा followup म्हणून मी त्याच शीर्षकाचा एक लेख (बरं, पोस्ट म्हणू या, ओके?) एका मराठी संस्थळावर लिहिला होता. एखाद्या सार्थ परंपरेचे बुद्धिहीन कर्मकांडांत रूपांतर होते याची काही उदाहरणे त्यामध्ये दिली होती. यात एक उदाहरण होते निर्माल्य नदीत विसर्जन करण्याच्या प्रघाताचे. नद्यांची सद्यस्थिती पाहाता तो कालबाह्यच नव्हे तर उलट मूळ हेतूला मारकच असल्याचे प्रतिपादन मी केले होते.
त्यावर एक जाज्ज्वल्य तरुण तडफदार विद्वान उगवले नि ‘हिंदूच्याच...’ वगैरे टँ: टँ: करणारी नेहेमीची टेप वाजवून झाल्यावर ‘मी भविष्यात ही नदी साफ करेन असा निश्चय करुन मी निर्माल्य नदीत टाकतो.’ अशी गर्जना त्यांनी केली होती. आज त्याला वीसहून अधिक वर्षे होऊन गेली. या विद्वानांनी नदी स्वच्छ करण्यासाठी काही केल्याचे ऐकिवात नाही.
आज ही आठवण झाली ती बिट्टू तबाही या तरुणामुळे. ‘मी नदी स्वच्छ करेन’ वगैरे गमजा समाजमाध्यमांवर मारत बसण्याऐवजी त्याने थेट कामाला सुरुवात केली. काही महिने खपून त्याने अजनेर नदी स्वच्छ केली. यातून देशभरात आणखी काही तरुणांना प्रेरणा मिळाली नि विविध शहरांतून अशीच मोहिम हाती घेतली गेली.
बिट्टू बिचारा तरुण आहे. त्याला सेनापती बापटांचा किस्सा माहित नसावा. त्यामुळे ‘आपण स्वत: आधी काम केले की लोकांनाही पटेल नि ते स्वत:हून काळजी घेतील.’ असा- या समाजाच्या मानसिकतेचा, संस्कार-वारशाचा विचार करता बावळट- समज त्याचा होता. इथल्या समाजाने त्याची ही हौस चांगली जिरवली. त्याने नदी साफ केल्यानंतर लवकरच नव्या कचर्याने ती भरून टाकली. हा कचरा बव्हंशी निर्माल्याचा होता. बिट्टू हार मानणारा नव्हता. त्याने लोक यायच्या-जायच्या वाटेचा विचार करुन योग्य ठिकाणी दोन कचरापेट्या स्वखर्चाने ठेवून दिल्या... चोवीस तासांत त्यातील एक चोरीला गेली!
’उत्सवाची वर्गणी मागणारे वेळेला धावून येतात, लोकांची कामे करतात’ वगैरे भेकड तर्क देणारे (यात वर उल्लेख केलेले विद्वानही आहेत) ‘बाकीची कामे राहू द्या हो, हंडीनंतर, उत्सवानंतर जो रस्त्यावर कचरा सोडून जातात तो का साफ करत नाहीत? गणेश विसर्जनानंतर विद्रूप, विरुप झालेल्या मूर्ती नदी नामक गटारात केविलवाण्या पडलेल्या दिसतात, त्यांची सन्मानाने विल्हेवाट लावण्याचे काम का करत नाहीत? ज्या श्रद्धेच्या आड लपून ते उतमात घालतात किमान त्या श्रद्धेचे पावित्र्य जपण्याची काळजी का घेत नाहीत?’ या प्रश्नांची ‘हिंमत असेल तर...’ या नेहमीच्या रडक्या, निरर्थक प्रत्युत्तराने मुस्कटदाबी करतात.
आज नदी कचर्याने पुन्हा भरून गेली आहे. हताश झालेला बिट्टू आता हे समाजसेवेच्या लष्करच्या भाकरी भाजण्याचे काम सोडून आपल्या शिक्षणावर लक्ष करण्याचा निर्णय घेतो आहे. दोन ते तीन वेळा हजारो कोटींचा चुराडा करुनही गंगा मैलीच आहे. कारण ती मैली होण्याचे कारण त्यात कचरा टाकणारी श्रद्धा आहे, तिला अटकाव केल्याखेरीज कोणतीही नदी स्वच्छ नि प्रवाही राहूच शकणार नाही हे सामान्यांना समजत नाही. गंगाशुद्धिकरणाबरोबरच तिचे नव्याने अशुद्धीकरण होऊ नये यासाठी प्रबोधन करण्याच्या फंदात आपले सरकार कधीच पडत नाही. त्याचे बजेट योजनेच्या प्रचार-प्रसाराच्या ढोल-ताशांवरच खर्च होऊन जाते.
नदी अस्वच्छ होते ती श्रद्धेचा कचरा त्यात साठतो म्हणून आणि माणसांना त्याची फिकीर नसते कारण त्यांच्या मेंदूत उथळ संस्कारांचा कचरा तुंबलेला असतो म्हणून... हे मान्य करण्याची गरज आहे. पण अस्मितेची मूळव्याध ही ‘देवकृपेने आलेले शेपूट’ समजून तिला हळद-कुंकू वाहात बसलेल्या समाजात ही जागृती कधी होईल असे मला वाटत नाही.
याखेरीज त्यांना मिळालेले संस्कार, तो वारसा हा वर्तमान, भविष्य आणि भौतिकाकडे पाठ फिरवून, कल्याणकारी मानवी मूल्यांपेक्षा अतिशय संकुचित कल्पित, वांझोट्या विश्वात जगण्यास भाग पाडणारा आहे. सारासार विवेकबुद्धी मिळाली असलीच तर फार लहानपणी संस्कार नावाच्या ब्रेन-वॉशिंगमार्फत तिचे निर्माल्य गटारगंगेत वाहवणारा आहे.
बिट्टू, तू मूर्ख आहेस. घाणीत लोळत ‘आमची घाण प्राचीन नि त्यांच्यापेक्षा आमचा चिखल मुलायम’ म्हणत विष्ठा चिवडत बसलेल्या डुकरांना घाणीतून बाहेर काढण्याचा आटापिटा करत आपला वेळ नि ऊर्जा वाया घालवायचा नसतो. त्या घाणीपासून स्वत:चा बचाव करण्याकडे लक्ष केंद्रित करायचे असते.
काही वर्षांपूर्वी 'Futurama' नावाच्या मालिकेत पाहिलेला Cold Warriors हा भाग आठवतो. फार पूर्वी संपूर्ण निर्मूलन केले गेले असल्याने जिच्याविरुद्ध लढण्यास तत्कालीन माणसांच्या शरीरात ant-bodies अस्तित्वात नाहीत, अशा साध्या सर्दीच्या (common cold) शिरकावाने इ.स. ३००० मधील जनतेमध्ये कसा हाहाकार उडतो याचे त्यात चित्रण होते. आजही ही सर्दी प्रत्येकाच्या शरीरात कमी-अधिक प्रमाणात तग धरून असते; प्रदूषणयुक्त शहरी जीवनात तर ती ठाणच मांडून बसलेली आहे. इतर अनेक आजारांचे माणसाने जवळजवळ संपूर्ण निर्मूलन केले आहे, परंतु वरकरणी निरुपद्रवी वाटणारी ही सर्दी एखाद्या झुरळासाठी तग धरून आहे. श्रद्धेचेही तसेच आहे.
कावीळ झालेल्या माणसाला जसे सारे जग पिवळे दिसू लागते– किंवा एखादे अंमली द्रव्य घेतल्यावर माणसाला जसे स्वत:मध्ये नसलेल्या शारीर, बौद्धिक बलाचा वा गुणांचा भ्रम होतो तसेच श्रद्धेचेही. तिची मात्रा अधिक झाली की प्रदूषण, विध्वंसही रंगीत चित्रपटासारखे आकर्षक दिसू लागतात. ज्या आवाजाने कुणाची हृदयक्रिया बंद पडू शकते, त्या आवाजामध्ये त्यांना गानकोकिळेचा मधुर आवाज ऐकू येऊ लागतो. आपल्या श्रद्धेखातर इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणे समर्थनीय आहे असे त्यांना वाटू लागते. नशेत धुंद असलेल्यांना जसे आपल्या शोचनीय स्थितीचे भान राहात नाही तसेच अति-श्रद्धेचे होते.
एकुणात सर्दीसारखाच श्रद्धा हा माणसाच्या जगातील सर्वात चिवट नि व्यापक असा संसर्गजन्य आजार आहे. विध्वंस-विकासाच्या मानवी लालसेतून जगली वाचली तर मानवी जमात, आणि पृथ्वीवरील इतर सजीव-सृष्टीला पुढील हजारो वर्षे तो ‘फ्युचुरामा’मधील न्यू-न्यूयॉर्कप्रमाणेच बाधित करत राहाणार आहे.
-oOo-
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
नेकी कर और गटर में डाल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा