Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - परिशिष्ट : ‘पदार्पण’ - एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध)

  • « पूर्वार्ध


    नवे जीवशास्त्र (?)

    आजच्या जीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये एखाद्या झाडाची प्रजाती, वर्गीकरण निश्चिती ही अनेक निकषांवर होते. (सध्या त्यातील शैवाल, कवक, वेली वगैरे इतर प्रकार सोडून केवळ वृक्ष या एकाच प्रकाराचा विचार इथे करत आहोत.) यातील विविध प्रजाती निश्चिती वा विभागणीसाठी पानांचा आकार, रंग, पोत (texture), खोडांचे म्हणजे सालीचे स्वरूप, मुळांचा प्रकार (सोटमूळ, तंतुमुळे वगैरे), फुलांचा प्रकार-आकार नि विस्तार, पुनरुत्पादनाची पद्धत (बीजोत्पादन, माध्यम, वगैरे) असे बरेच निकष वापरले जातात. पण एक नक्की की मूळ, खोड (अधिक फांद्या), पाने, फुले, फळे, बीज यांच्या एकत्रित समूहाला एक नाव दिले जाते.

    काही मुंग्या आपल्या वारूळामध्ये aphids म्हणजे आपल्याकडील मावा किड्याच्या जातीचे कीटक आपल्या वारुळामध्ये पाळतात. त्यांना आवश्यक खाद्य त्या बाहेरून आणून पुरवतात नि त्याबदल्यात त्या कीटकांच्या शरीरातून स्रवणारा दुधासारखा पांढरा स्राव सेवन करतात. कीटकांना वारुळाची सुरक्षितता मिळते नि मुंग्यांना हवे असणारे खाद्य. आता वृक्षसृष्टीमध्ये मूळ, खोड नि पाने यांच्यामध्येही अशीच विनिमयाची व्यवस्था उभी राहिल्यावर, स्वतंत्र झालेली मुळे नि पाने त्यांच्यातील (खोडामार्फत) होणारी देवाणघेवाण हा असाच जातिबाह्य सहकार म्हणता येईल. जर मुंग्या नि मावा कीटक या स्वतंत्र प्रजाती असतील, तर मुळे नि पाने यांनाही स्वतंत्र जीवांचा दर्जा मिळायला हवा. मग कदाचित जीवशास्त्राला यांच्या वर्गीकरणाचा, अभ्यास-चौकटीचा नव्याने विचार करावा लागेल. पण यात एक अडचणीचा मुद्दा आहे, आणि तो आहे पुनरुत्पादनाचा!

    RootsOnly
    https://thumbs.dreamstime.com/ येथून साभार.

    एखादा जीव हा बहुधा प्रजाती म्हणून वेगळा ओळखला जातो, तो आपल्यासारख्याच जिवाचे पुनरुत्पादन करणारा असतो. मानवाला त्याचीच प्रतिकृती असणारे मूल होते, मुंग्यांच्या अंड्यांतून पूर्ण मुंगीच बाहेर येते, हरणाचे पाडस हरणासारखे असते आणि गायीच्या पाडसालाही जन्मत: नसली तरी यथावकाश शिंगे उगवत असतात. आजच्या जगातील वृक्षसृष्टीतही एका वृक्षाची बीजे रुजताच त्याच जातीचे मूळ,खोड,पाने युक्त असे संपूर्ण झाडच उभे होते. त्या वृक्षाच्या या तीनही उपांगांच्या शक्यता त्या एका बीजामध्येच एकवटलेल्या असतात.

    या निकषावर पाहिले तर मूळ नि पाने ही उपांगे स्वतंत्र जीव म्हणवण्यास पात्र ठरत नाहीत. ‘पदार्पण’ कथेमध्ये विस्ताराने उल्लेख नसला, तरी या संपूर्ण व्यवस्थेचे पुनरुत्पादन पक्ष्यांसदृश स्थलांतर करणार्‍या बीजांपासून होते असा उल्लेख येतो. म्हणजे या बीजांपासून खोडाची निर्मिती होते नि त्यानंतर इतर उपांगे निर्माण होतात असे गृहित धरावे लागते. याचा अर्थ या वृक्षाच्या जीवनप्रवासात पुढे कधीतरी ही उपांगे खोडापासून सुटी होतात.

    आजच्या निसर्गात प्राण्यांची, पक्ष्यांची, काही कीटकांची पुढची पिढीही सुरुवातीचा काही काळ जन्मदात्यांसोबत काढून पुढे स्वतंत्र आयुष्य जगू लागते. त्यांच्याशी तुलना करता ही दोघे मूळ खोडाची पुढची पिढी म्हणावी का? परंतु तसे म्हणण्यासाठी ती गुणवैशिष्ट्यांनुसार आपल्या जन्मदात्यासारखी असायला हवी होती. तशी ती नाहीत. म्हणजे या व्यवस्थेमध्ये प्रजाती-निश्चितीसाठी एका एककाची, एका जीवाची व्याख्या करावी कशी हाच पहिला पेच उभा राहातो आहे.

    कथेचा परिघ सोडून विचार केला, तर यांच्यासाठी पुनरुत्पादनाच्या अन्य काही शक्यता असू शकतात. यासाठी सद्य जीवसृष्टीतील अनेकविध पर्याय पाहाता येतील. कांदा जमिनीत रुजवला तर स्वत:ला विसर्जित करून तो नवी तंतुमुळे, नवी हिरवी पात जन्माला घालतो. गाजरापासून - जे मूळ आहे - जिथे पाने अंकुरतात तेथील एक लहानशी चकतीच काढून पाण्यात वा मातीत ठेवली असता त्यातून नव्या पानांचा संभव होतो. काही झाडांच्या फांद्या जमिनीत खोचल्या असता त्यातून नवी मुळे आणि म्हणून नव्या वृक्षाची उभारणी होते.

    भटक्या मुळांसाठी गाजराची, तर खोडासाठी गुलाबाची वा ऊसाची पुनरुत्पादन पद्धत सयुक्तिक दिसते. परंतु पानांबाबत पेच राहातो. मुळे नि खोड आजच्या जीवसृष्टीतही मातीशी बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांची त्यातील पुनरुत्पादनाची पद्धतच वापरली जाऊ शकते. परंतु पानांची मातीशी नाळ जुळलेली नाही. त्यामुळे त्यांचे पुनरुत्पादन हे झाडातून फूल वा फळ उगवावे तसे व्हावे लागेल. कदाचित इथे एकपेशीय जिवाचे पुनरुत्पादन पुन्हा उदयाला येऊ शकते. काही वेलींच्या पानाच्या देठापाशीच मुळांसारखे तंतू फुटलेले असतात. त्याच धर्तीवर पानांमधून काही द्रव्य वेगळे होत नव्या पानाची निर्मिती होऊ शकेल. एक अधोरेखित करण्याची बाब म्हणजे अशा व्यवस्थेमध्ये या तीनही जिवांचे पुनरुत्पादन हे ‘अलैंगिक’ पुनरुत्पादनामध्ये रूपांतरित होते आहे. जीवद्रव्याच्या विभागणीतून अथवा त्याचे प्रथम उपांग म्हणून त्यातूनच नव्या जीवाचा संभव (germination) होतो आहे.


    जुनी व्यवस्था, नवे जीव

    या कल्पनाविस्ताराच्या प्रवाहाचा संगम वर्तमान व्यवस्थेशी झाला तर मध्ये काय नि कसे बदल होतील या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी दोन उद्दिष्टे समोर आहेत. यापैकी पहिले– ‘पदार्पण’मधील ग्रहाप्रमाणे अभावाच्या परिस्थिती अथवा भूभागामध्ये जीवसृष्टीच्या विकासाला यामुळे कितपत मदत होईल? आणि दुसरे, यामुळे वर्तमान जीवसृष्टीमध्ये काय बदल घडू शकतील? शक्यतांचा प्रवाह बराच मोठा असणार हे उघड आहे. तेव्हा दोन्ही उद्दिष्टांमध्येही प्रत्येकी एकच उदाहरण घेऊन विस्तार केला आहे.

    पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात दीर्घ हिवाळा नि दीर्घ उन्हाळ्याचे ऋतू असतात. हिवाळ्याच्या काळामध्ये इथे वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने त्या तगून राहाणे शक्य नाही. त्यामुळे या प्रदेशांतील वनस्पतीसृष्टीमध्ये जगातील जीवसाखळीचे मूळ असलेले फायटोक्लँक्टन आणि मोजक्या शैवालवर्गीय वनस्पतींचा समावेश होतो. मोठ्या वृक्षांना सोडा, वेलींनाही आवश्यक इतका जीवनरस निर्माण व्हावा यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश इथे उपलब्ध नसतो. फायटोक्लँक्टन हे देखील तरंगते जीव असतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते स्थलांतर करतात. पण त्यामागे कुठलीही प्रेरणा असत नाही. कॅरिबूसारख्या अति-उत्तरेकडील प्रदेशांत आढळणार्‍या प्रजाती, अनेक पक्षी हे हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे– म्हणजे अधिक उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करतात. ध्रुवीय अस्वलेही हिवाळ्यापूर्वी भरपूर खाऊन घेऊन चरबीच्या स्वरूपात ते साठवून ठेवतात. त्यानंतर हिवाळ्यात ते दीर्घ झोप घेऊन ऊर्जेची गरज किमान पातळीवर आणून ठेवतात.

    LeavesOnTheGround
    https://www.idyl.co.in/ येथून साभार.

    आता ‘उपांगांचे सहजीवन’ स्वरूपातील वृक्षाचा विचार केला तर, त्याची पाने सहेतुकपणे पाण्यावरुन प्रवास करून सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशाकडे स्थलांतर करु शकतील– ‘पदार्पण’मधील पाने करतात तसे. त्यासाठी त्यामध्ये इतर बदल व्हावे लागतील. आता या ध्रुवीय उपांग-जीवी वृक्षाच्या पानांनाही पुरेसे पाणी पोटात घेऊन हिवाळ्यात प्रकाशाच्या दिशेने स्थलांतर करावे लागेल.

    या काळात (आफ्रिकेसारख्या वृत्तीय प्रदेशात) राहून प्रकाश-संश्लेषणाद्वारे जीवनरस निर्मितीचे आपले काम चालू ठेवावे लागेल. हा जीवनरस थेट खोडांकडे जाण्याची सोय नसल्याने त्याला सोयीच्या अशा (चरबीसदृश) कोषांमध्ये साठवत न्यावे लागेल. आणि हिवाळा संपता-संपता पुन्हा ध्रुवीय प्रदेशाकडे स्थलांतर करुन हे जीवनरसाचे कोष तेथील खोडामध्ये रिते करून मोकळे व्हावे लागेल. हे करत असताना खोडाकडून आवश्यक तो पाण्याचा वाटा स्वीकारावा लागेल. (कदाचित जीवनरसाचे रिकामे कोषच आता या साठवणुकीस उपयोगी पडू शकतील.)

    हिवाळ्यापूर्वी चरबीने सुजलेली अस्वले हिवाळी झोपेतून बाहेर येईतो सारी चरबी झडून गेल्याने हाडाडलेली असतात. या पानांबाबत नि खोडाबाबतही तसेच काहीसे होईल. दोघांकडचा हिवाळी साठा तेवढा वेग-वेगळ्या रसद्रव्याचा असेल. खोडाला पानांनी दिलेला जीवनरस साठवून ठेवावा लागेल; तर प्रकाशाच्या दिशेने जाणार्‍या पानांना, मुळांनी खोडामार्फत दिलेला पाण्याचा साठा सोबत ठेवावा लागेल.


    नवे जीव, जुने जीव

    वनस्पती हे स्थानबद्ध, दुर्बळ जीव आहेत या गृहितकावर माणूस जगत आला आहे. आपल्याला हवे तेव्हा त्यांचे निर्दालन करून त्यापासून अन्न, ऊर्जा आणि दैनंदिन उपभोगाच्या अनेक वस्तूंची निर्मिती तो करत आला आहे. त्या जिवांना एक प्रकारे आपले गुलाम समजत आलेला आहे. परंतु सहजीवी वृक्षसृष्टीचा उदय झाला तर त्याने काय परिणाम असू शकतील याचा विचार केला तर परिस्थिती पालटलेली दिसू शकेल.

    जिथून या कल्पनाविस्ताराची सुरुवात झाली त्या ‘पदार्पण’ कथेमध्येच याची चुणूक सापडते. या सहजीवी वृक्षाच्या प्रदेशामध्ये उतरलेली एक वैज्ञानिक अचानक कोसळते. तिला एका हिरव्या मुळाने घट्ट पकडून ठेवलेले असते. इतर सोबती तिची सोडवणूक करण्यास धावतात. त्या धांदलीत एकाकडील पाण्याचा साठा जमिनीवर सांडतो. ते मूळ तातडीने तिला सोडून त्या पाण्याकडे धावते नि तिची सुटका होते.

    असे का घडले याचा विचार केला, तर ध्यानात येईल की माणसाच्या शरीरामध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक भाग हा पाण्याचा असतो. मुळांचे कार्य पाणी शोषून घेण्याचे आहे. आजच्या जीवसृष्टीमध्ये वनस्पतींची मुळे जमिनीत असल्याने ती त्यात मुरलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. या उत्क्रांत वृक्षाची मुळे आता जमिनीवर फिरू लागल्याने त्यांच्या पाण्याच्या स्रोतांमध्येही बदल होऊ शकतो. ‘पाण्याचा हुकमी साठा’ म्हणून एखाद्या जिवंत प्राण्याकडेही ती आकर्षित होऊ शकतात...‘अन्नाचा हुकमी साठा’ म्हणून एखादा शिकारी प्राणी एखाद्या भक्ष्य प्राण्याकडे होतो तसा! ही मुळेही लहानसहान प्राण्यांची ‘शिकार’ करून त्यातील पाणी शोषून घेण्याची क्षमता विकसित करु शकतात.

    आजवर वनस्पतीसृष्टी ही बव्हंशी भक्ष्य नि प्राणी हे भक्षक अशी व्यवस्थाच आपण पाहात आलो आहोत. या नव्या जीवाच्या उदयानंतर सामना असा एकतर्फी राहाणार नाही! त्या वैज्ञानिकाप्रमाणेच माणसेही या धोक्याच्या कक्षेत आलेली असतील.

    - oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: