-
धर्म आणि सहजीवन « मागील भाग
साम्यवादी व्यवस्थाआर्थिक विषमता दूर करण्यासाठी नि विध्वंसक विकासाला निसर्गानुकूल अशा एका वाजवी पातळीवर स्थिर करण्यासाठी पुन्हा एकवार सामूहिकतेचा अंगीकार करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली जाऊ लागली. ही प्राचीन व्यवस्था जणू ‘सर्वे सुखिन: सन्तु’ प्रकारची होती– निदान सर्वसमावेशक होती, असे यामागचे गृहितक होते. बदलत्या मानवी जीवनशैलीस अनुसरून यासाठी विविध सामाजिक प्रारूपे (models or systems) समोर आली. त्यातील सर्वात व्यापक, सर्वसमावेशी प्रारूप होते साम्यवादी व्यवस्थेचे.
स्पर्धा/संघर्ष आणि सहकार हे उत्क्रांतीचे दोन प्रमुख आधार गणले जातात. भांडवलशाहीने त्यातील केवळ स्पर्धा हे एकच अनुषंग उचलून आपले प्रारूप मांडले. याउलट साम्यवादाने त्यातील केवळ सहकाराच्या आधारे सर्वकल्याणकारी व्यवस्थेची कल्पना मांडली. हे ‘समूह-मालकी’चे किंवा सामूहिक व्यवस्थापनाचे सामाजिक प्रारुप आहे. यामध्ये धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेमध्ये असणारे पंथ, जात, वर्ग वगैरे ‘उपटोळ्या’ मोडून काढून विश्वव्यापी बंधुभावनेच्या, सहकाराच्या आधारे जगणार्या विशाल मानवीसमूहाची कल्पना मांडली गेली आहे.
अशा समाजामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठच काय, पण कुठल्याही प्रकारची वर्गवारी अस्तित्वात असणार नव्हती. हा वर्गविहीन समाज काहीसा आदिम टोळ्यांप्रमाणे ‘सामूहिक स्वामित्व’, ‘गरजेनुसार उपभोग’ नि ‘न्याय्य वाटप’ या सूत्रांनुसार काम करणार होता. आणि हे साध्य करण्यासाठी तिने ज्यांच्या (वर उल्लेख केलेल्या) साहाय्याने विषमता रूजवली जाऊ शकते अशा सर्व साधनांचे, व्यवस्थांचे विसर्जन करण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे.
राज्यसंस्था जी सत्ता निर्माण करते, त्यातून मूठभरांना व्यापक समाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. शिवाय राज्यकर्ते नि नागरिक यांच्यात जणू राजा नि प्रजा यांच्याप्रमाणे नाते प्रस्थापित होत गेल्याने राज्यकर्ते जनतेच्या हितापासून तर दूर जातातच, पण स्वार्थ साधण्यास सत्तेचा वापर करू लागतात. त्याचबरोबर चलन ही संकल्पनाही अतिरिक्त धनसंचयाला नि पर्यायाने विषमतेला चालना देते. (यावर विस्तृत विवेचन वर आले आहे.) तेव्हा या दोन व्यवस्था विसर्जित करणे आवश्यक आहे, असे या साम्यवादी व्यवस्थेने मानले आहे(१).
ही साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्याआधी तिचे संभाव्य विरोधक असलेले, चलनाच्या साहाय्याने शिरजोर होऊन बसलेले भांडवलदार नि राजकीय सत्तेचे ठेकेदार यांचे कोंडाळे उध्वस्त करावे लागणार आहे. हे साध्य करण्यासाठी एक मधला टप्पा म्हणून समाजवाद पुढे आला. ज्याला मार्क्सने ‘श्रमजीवींची एकाधिकारशाही’ (Dictatorship of the Prolatariat) असे म्हटले होते. श्रमजीवींनी(२) राजकीय सत्ता प्रथम ताब्यात घेऊन हे प्रस्थापित स्वार्थी कोंडाळे मोडून काढणे अपेक्षित होते.
एकाधिकारशाहीपण साम्यवादी म्हणवणार्यांनी या समाजवादी सत्तेच्या टप्प्यातच या तत्त्वाला गुंडाळून ठेवत पुन्हा मूठभरांचे नियंत्रण असणारी व्यवस्थाच रुजवली. ही सत्ता ‘श्रमजीवींची एकाधिकारशाही’ ऐवजी ‘पॉलिटब्युरोची एकाधिकारशाही’ (Dictatorship of the Politburo) या स्वरूपात उदयाला आली. खरंतर पॉलिटब्युरोचे ‘राज्य’ म्हटले तरी चालेल. पक्षाचा अध्यक्ष– चुकलो, ‘सरचिटणीस’ हा राजा नि पॉलिटब्युरो हे त्याचे मंत्रिमंडळ असे त्याचे स्वरूप होत गेले. बिचार्या श्रमजीवींच्या मताला काडीची किंमत उरली नाही.
उद्घोष केलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाही मूल्ये दुय्यम ठरली. लोकशाहीमध्ये अनुस्यूत असणारी, जनतेला कायम उपलब्ध असायला हवी अशी ‘राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची (reverse feedback system) किंवा त्यांच्या अकार्यक्षमेसाठी त्यांना पदच्युत करण्याची’ सोय यात उपलब्ध नाही. जिथे ‘सत्ताधारी करतील ते योग्यच करतील’ ही श्रद्धा ठेवूनच जगावे लागते अशी कोणतीही व्यवस्था माझ्या मते देव-संकल्पनेहून वेगळी राहात नाही.
या व्यवस्थेचे जॉर्ज ऑरवेल याने रेखाटलेले एक शाब्दिक व्यंगचित्र ‘अॅनिमल फार्म’ या अतिशय गाजलेल्या छोटेखानी कादंबरीमध्ये सापडते. आपल्याकडील ‘पंचतंत्रा’प्रमाणे मानवी भावभावना नि व्यवस्थांना मानवेतर जिवांच्या जगात नेऊन त्यावर भाष्य करणारी ही कादंबरी; साम्यवादाला बागुलबुवा मानणार्या पाश्चात्य जगामध्ये चांगलीच गाजली. नऊ अक्राळविक्राळ कुत्र्यांच्या बळावर डुक्कर जमात– म्हणजे त्यांचा नेता ‘नेपोलियन’– पुरा फार्म ताब्यात ठेवते नि हे तथाकथित ‘प्राण्यांचे राज्य’ आपल्या फायद्यासाठी नि आपल्या लहरीनुसार चालवते. एवढेच नव्हे तर अखेर आपल्या ‘शत्रू’ असलेल्या माणसांसारखेच होत जाते.
ऑरवेलने रुपकात्मक भाषेत केलेला हा दावा काही प्रमाणात खराही ठरला आहे. ही श्रमजीवींची एकाधिकारशाही नि भांडवलशाही या दोहोंच्या भौतिक दृष्टिकोनात फार फरक दिसून येत नाही. भांडवलशाही राष्ट्रांप्रमाणेच बहुतेक कम्युनिस्ट राष्ट्रांनीही औद्योगिकरणावर भर दिलेला आहे. निसर्गस्नेही वा विकेंद्रित व्यवस्था स्वीकारण्याऐवजी औद्योगिकरणास साह्यभूत होणारी केंद्रीय व्यवस्थाच अंगीकारली आहे. त्यामुळे उत्पादकतेशी जोडला जाणारा निसर्ग-विध्वंस तसाच आहे. उलट हुकूमशाही व्यवस्थेमुळे विरोधाची शक्यता नसल्याने राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या नि लहरीच्या आधारे निर्णयप्रक्रिया राबवली जाताना दिसते.
समाजवादी व्यवस्थेचे सर्वाधिक यशस्वी प्रारूप मानले जात असलेल्या चीनवर प्रचंड प्रदूषण केल्याचा आरोप कायम होत आलेला आहे. ‘थ्री गॉर्जेस धरणा’सारखे प्रकल्प थेट पृथ्वीच्या गतीशीच खेळ करणारे ठरले आहेत. ‘जे शक्य आहे ते करावे’ या भांडवलशाही वृत्तीचा उलट कडेलोटच या डाव्या व्यवस्थेत पाहायला मिळतो. ‘हा पाश्चात्त्य गवगवा आहे’ हे काही प्रमाणात खरे असेलही, तरी त्या दाव्यामध्ये तथ्यही बरेच आहे.
मानवी हक्कांची गळचेपी हा हुकूमशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग इथेही आहेच. तत्कालीन सोविएत रशियामध्ये राजकीय विरोधकांचा झालेला छळ, त्यासाठी वापरलेले अनेक अघोरी मार्ग याबाबत बरेच लिहिले बोलले गेले आहे. शासनविरोधक ‘नाहीसे होणे’ ही सर्वच समाजवादी हुकूमशाहीची आवडली कार्यशैली (standard operating procedure) आहे. स्तालिनच्या काळात रशियामध्ये असंख्य माणसांचे शिरकाण झालेले हे खरेच आहे... पण त्याच्याबद्दल– गो.पु. देशपांडे यांच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटकामधील कॉ. श्रीधर विश्वनाथ म्हणतो,‘माणसांनी ओढायच्या नांगरावर खपणारा देश त्याने अणुयुगात आणून सोडला’. हा दावाही खराच आहे.
एक पाऊल पुढेभांडवलशाहीशी तुलना करता समाजवादी व्यवस्थेचा सामाजिक दृष्टिकोन काही बाबतीत वेगळा आहे. इथे स्पर्धेला, नफ्याला सर्वोपरी (sacrosanct) न मानता शिक्षण, आरोग्य यांसह मूलभूत गरजांना सर्वोपरी मानले गेले आहे नि बहुतेक समाजवादी राष्ट्रांत यांना प्राधान्यच नव्हे, तर मूलभूत अधिकारांमध्ये स्थान दिले गेले आहे. सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या विरोधाचा सामना करावा लागणार्या कम्युनिस्ट क्यूबासारखे छोटे बेट-राष्ट्र सर्वांसाठी विनामूल्य आरोग्यव्यवस्था (universal health care) राबवते आहे नि त्या क्षेत्रात आपण केलेल्या प्रगतीचा आपल्याहून दुर्बळ अशा आफ्रिकन राष्ट्रांनाही लाभ मिळवून देत आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर पहिली प्रतिरोधक लस विकसित करते आहे.
याउलट अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांत आरोग्य व्यवस्था ही औषधनिर्मिती कंपन्यांची बटीक आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक सार्वजनिक वावराचे निर्बंध घालण्याचे नाकारून, सामान्यांचे जीवन हे खासगी आरोग्यव्यवस्थांच्या दयेवर सोडून देण्यात आले होते. त्यानंतर उद्योगपतींचे धार्जिणे असलेले डोनाल्ड ट्रम्प सत्ताधारी होताच जिला (ती सुरु करणार्या माजी अध्यक्षांच्या नावे) ‘ओबामाकेअर’ असे म्हटले जात होते, ती सर्वकल्याणकारी आरोग्य योजना मोडीत काढण्यात आली.
समाजाच्या व्यापक बांधिलकीची कास धरून मांडल्या गेलेल्या समाजवादी प्रारुपाने, सैद्धांतिक पातळीवर पुन्हा एकवार टोळी मानसिकतेकडे जाताना, लोकशाहीने नि भांडवलशाहीने केलेल्या प्रगतीच्या वाटांवर सोबत घेतलेली कल्याणकारी मूल्येही– निदान व्यवहारात तरी– नाकारलेली दिसतात. भांडवलशाहीप्रमाणेच ‘अंतिम भौतिक यशा’ला सर्वोच्च मानून त्यासाठी बेगुमानपणे निसर्गाचा, त्यातील जीवांचाच नव्हे तर विरोध करणार्या माणसांचाही बिनदिक्कतपणे विध्वंस करत जाणार्या या व्यवस्था मूल्यांच्या पातळीवर साफ अपयशी ठरलेल्या दिसतात.
मार्क्सने ज्याला ‘पहिला टप्पा’ म्हटले ती समाजवादी एकाधिकारशाही सामाजिक पातळीवर अद्याप अपेक्षित ते बदल घडवू शकलेली नाही. ही तथाकथित श्रमजीवींची एकाधिकारशाही भांडवलशाहीप्रमाणेच ‘थोडी प्रगती, थोडा विध्वंस’ पातळीवर राहिली आहे. मार्क्सला अभिप्रेत असलेली ‘सर्वे सुखिन: सन्तु’ चा घोष करणारी ‘साम्यवादी’ व्यवस्था तर अद्याप क्षितिजाच्याही पार दूर आहे. मागील भागात उल्लेख केलेली इस्रायलमधील ‘किबुत्झ’ समूह-वसती व्यवस्था ही वास्तवामध्ये साम्यवादाच्या सर्वाधिक जवळ जाणारी व्यवस्था म्हणता येईल.
दोन व्यवस्थादोन भिन्न धर्मीयांमध्ये नसेल इतका द्वेष कम्युनिस्ट नि भांडवलशाही राष्ट्रांमध्ये, तसंच त्या दोहोंतील नागरिकांमध्ये परस्परांबद्दल दिसतो. एवढेच नव्हे तर उरलेल्या जगावरही वर्चस्व कोणत्या विचाराचे असावे यावरून दीर्घकाळ शीतयुद्ध चालू आहे. वर्चस्वाची ही लढाई नि मुस्लिम व ख्रिश्चन या अब्राहमिक धर्मांतील वर्चस्वाची सुप्त लढाई, या दोन संघर्षांमध्ये जगभरातील इतर राष्ट्रेही खेचली जात असतात. भांडवलशाहीची प्रतिनिधी असलेली अमेरिका आणि साम्यवादाची पुरस्कर्ती सोविएट रशिया (USSR) यांनी जर्मनी, कोरिया, व्हिएतनाम यांसारख्या राष्ट्रांचे या आधारावर विभाजन करुन एकेका भागावर आपल्याला अभिप्रेत असलेली व्यवस्था नि सत्ता लादण्याचा आटापिटा केला आहे(३).
गंमत म्हणजे कम्युनिस्ट राष्ट्रे ही एकाधिकारशाही– म्हणजे केंद्रीय सत्ता राबवतात, जे खरेतर त्यांच्या मूळ तत्त्वाच्या विरोधात आहे. त्याला मार्क्सने दमनकारी राज्यव्यवस्था नि चलनाचे साखळदंड मोडून काढण्यासाठी आवश्यक ‘पहिला टप्पा’ म्हटले आहे. त्याला अभिप्रेत असणारी साम्यवादी समाजव्यवस्था हा दुसरा नि अखेरचा टप्पा आहे. परंतु बुद्धाने सांगितलेल्या आपद्धर्माचाच मांसाहारी मंडळींनी महामार्ग केला(४), तसे सर्व सत्ताकांक्षी कम्युनिस्टांनी(?) हा पहिला टप्पाच सोडायचा नाही हे धोरण राबवले आहे.
उलट कट्टर समाजवादद्वेष्ट्या अमेरिकेच्या भांडवलशाहीमध्ये असलेल्या ‘किमान वेतन हमी’, ‘रोजगार हमी’, ‘सोशल सिक्युरिटी’, शेतीवरील सबसिडी, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये राज्यव्यवस्थेने स्वदेशी उद्योगांना – अगदी युद्धे घडवूनही – सक्रीय मदत करणे, आदी बाबी भांडवलशाहीच्या ‘राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाखेरीज निव्वळ स्पर्धेतूनच विकास’ या मूलतत्त्वाला छेद देत असतात. गोळाबेरीज ही की खांद्यावर कुठल्याही तत्त्वज्ञानाचा झेंडा घेतलेला असला तरी ‘स्पर्धा वा सहकार यापैकी एकच तत्त्व मानवी प्रगतीला पुरेसे नसते’ हे माणूस अघोषितपणे मान्य करत असतो...
- (क्रमश:) -
पुढील भाग » नव्या व्यवस्थेकडे
टीपा:
(१). या व्यवस्थेचा एक प्राथमिक आविष्कार बादल सरकारांच्या ‘हट्टामालार आपोरे’ या नाटकामध्ये मांडला गेला आहे.[↑]
(२). श्रमजीवी या संज्ञेमध्ये केवळ शारीरिक श्रम अभिप्रेत नाहीत. या शब्दाची व्याख्या व्यापक आहे. जी व्यक्ति शारीरिक वा बौद्धिक श्रम करुन एखाद्या वस्तूच्या उत्पादनात सहभागी होते,परंतु उत्पादनाची मालकी वा विक्री-अधिकार ज्याच्या हाती नसते अशी व्यक्ती किंवा जी दुसर्या एखाद्या व्यक्तिला वा गटाला एखादी सेवा पुरवते नि त्या बदली मोल मोजून घेते अशी व्यक्ती म्हणजे श्रमजीवी. ही देखील बरीच ढोबळ व्याख्या आहे. पण विस्तारभयास्तव फार खोलात शिरत नाही.) [↑]
(३). जर्मनी– म्हणजे हिटलरपूर्व प्रशिया हा मूलत:च साम्राज्यवादी आणि म्हणून प्रगत देश असल्याने विभाजित जर्मनीतील दोन्ही बाजूंच्या जनतेच्या रेट्याने यथावकाश तो देश पुन्हा एकसंध झाला. व्हिएतनामला त्यासाठी मोठा लढा द्यावा लागला, तर कोरियामध्ये ही विभागणी अधिकाधिक घट्ट होत गेलेली दिसते. [↑]
(४). पुढे ’प्लरिबस’मधील व्यवस्थेबाबत विवेचन करताना याबाबत थोडा अधिक तपशील येईल. [↑]
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ९ : सर्वे सुखिन: सन्तु
हे वाचले का?
आकलन
जिज्ञासानंद
प्लरिबस
मालिका
व्यवस्था
समाजजीवन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा