-
ख्रिसमसच्या काळात ‘Spreading the Christmas Spirit' नावाचा प्रकार असे, अजूनही असावा. सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही परिचित एकत्र येऊन घरोघरी– अगदी अपरिचित घरासमोरही– जाऊन ख्रिसमसची गाणी (Carol) म्हणतात. हे गट केवळ मुलांचेच नसतात तर मोठ्यांचेही असू शकतात. हे लोक घरोघरी जाऊन ही गाणी म्हणत असताना, एखादा त्या घरचा अथवा बाहेरचाही त्यात सामील होतो नि पुढच्या घरी तो ही गाणी म्हणतो. अशा हृद्य परंपरा हेच सणांचे बलस्थान असते. त्यातील हे गाणं सकाळी-सकाळी ऐकवून या पोरीने या उमेदवार-म्हातार्याकडून उरले-सुरले आयुष्य मागून घेतले.
Village Cooking channel नावाचे तमिळ मंडळींचे एक चॅनेल मी यू-ट्युबवर फॉलो करतो. हे पाच-सहा जण मिळून निसर्गाच्या सान्निध्यात पारंपरिक पद्धतीने विविध पाककृती रांधतात, त्या ही घाऊक प्रमाणात. एखाद्या उपग्रह वाहिनीवरचे नटवे ‘कुकिंग शो’ (ज्याच्या नावातच शेफ टाकले की त्याला आपोआप वजन येते असे निर्मात्यांना वाटते) नि हे यांत वृत्तीचा नि व्याप्तीचा असा दोन्हींचा फरक आहे. ही मंडळी तुम्हाला पाककृतीची ओळख तर देतातच, पण तो रांधलेला पदार्थ स्थानिक ‘ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रा’तील निराधार वृद्धांना खाऊही घालतात. सणांमधून, परंपरांमधून, उत्सवांमधून अशी बांधिलकी निर्माण होत असेल तरच ते कधीच कालबाहय होणार नाहीत. या मंडळींनी त्यांच्या ‘पोंगल’ सणाचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे.
अलिकडे तुम्हा आम्हा मंडळींना कुठलासा सण येतो आहे हे ऐकून एकतर कपाळावर आठी तरी उमटते आहे किंवा इतरांची फिकीर न करणारा उन्माद तरी रक्त दूषित करतो आहे. हे दोन्ही नि असे इतर व्हिडिओ पाहाताना वा त्यांच्याबद्दल वाचताना ‘सण इतके सुंदर असतात तर आपले असे का झाले आहे?’ असा प्रश्न पडतो. माझ्या मते याला बाजार मुख्यत: कारणीभूत असला तरी आपली चढाओढीची वृत्तीही तितकीच कारणीभूत आहे.
त्याखेरीज श्रद्धेचा टप्पा ओलांडून माणसे धर्माकडे पाऊल टाकतात तेव्हा वैय्यक्तिक उन्नतीचे पाऊल मागे घेऊन ते टोळीवृत्तीचे, वैरवृत्तीचे एक पाऊल पुढे टाकतात. आणखी एक पाऊल पुढे पडते ते धर्मस्थळाच्या उभारणीने. ते श्रद्धा नि धर्म यांच्या आरसीसी स्ट्रक्चरच्या आधारे एका अर्थकारणाची इमारत बांधून काढते नि या दोन्हींची घाऊक विक्री सुरू करते. पण दुकानाला वर्षातून एक-दोनदा गिर्हाईकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी घाऊक सेल वगैरे लावावा लागतो. उत्सवांचे काम त्या सेलसारखे असते. इतरांच्या श्रद्धेची नि धर्म-परंपराबांधिलकीची क्रयवस्तू करुन बाजारात आणून तिचे चोख दाम वसूल करणारा हा काळ असतो. भांडवलशाहीने निर्माण केलेला बाजार याला अहमहमिकेने पाठिंबा देत असतो.
बाजाराने ख्रिसमसचे रूपच पालटून टाकले आहे. ख्रिसमसचा संबंध नसलेला सांता-क्लॉज आणला, त्याच्या नावावर भेटी देण्याचा पायंडा पाडला, मग त्या भेटी विकत घेण्यासाठी स्पेशल सेल आले. (खरेतर हा सण व्यापक करण्यात शुभेच्छा-पत्रे विकणार्या कंपन्या अधिक सक्रीय होत्या. पण डिजिटल जगात ती संकल्पना आता जवळजवळ अस्तंगत झाली आहे.) हळूहळू मूळ ख्रिसमस स्पिरीट लयाला गेले. बाजाराने सणातील बांधिलकी नाहीशी केली नि त्याच्या जागी उपभोगाला आणून बसवले.
रक्षाबंधनामध्ये मनगटावर एक दिवसासाठी बांधण्याच्या राखीमध्ये प्रतवारी आली. लाखभराची राखी बांधणार्या उद्योगपती बहीण-भावांचे नाते साधे रंगीत सूत गुंडाळणार्यांपेक्षा श्रेष्ठ ठरले. त्याआधी तो सण एका प्रांतातून उचलून देशभर रुजवला गेला. त्यासाठी बाजाराने ‘एम्बेडेड मार्केटिंग’ तत्त्वाचा वापर करून चित्रपटादि मनोरंजन माध्यमांचा उपयोग करुन घेतला... आपण आपले ब्रेनवॉशिंग होऊ दिले नि त्याला साजरे करण्याचा उन्माद चिकटवून दिला.
दुसरीकडे जे सणाचा अविभाज्य भाग आहे त्याला ‘अन-इंटरेस्टिंग’ म्हणून गुंडाळून वा वगळून आपण बाजारू व्हर्शन अधिक रस घेऊन साजरे करत असतो. हल्ली नोकरदार स्त्रिया श्रावणी मंगळवारची सवाष्ण ‘सुटी नाही’ म्हणून रविवारी जेवू घालतात. अद्याप पीक काढणीला न आल्याने अन्नाचा तुटवडा असलेल्या एखाद्या सामान्य घरच्या स्त्रियांना बोलावण्याऐवजी स्वत:च्या लग्न झालेल्या सुखवस्तू मुलीलाच जेवू घालतात. हे बदल केले तरी त्यावर अळीमिळी गुपचिळी, पण जी मुळातच परंपरेचा भाग नाही अशी रुजलेली त्रासदायक नव-परंपरा बदलायची म्हटले की पदर खोचून नवर्यासोबत भांडायला उभ्या राहातात.
टिळकांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने सुरु केलेला गणेशोत्सव आता तो साजरा करणारे उरलेल्या समाजाशी शून्य बांधिलकी असल्याच्या थाटात साजरे करतात. बाजारातून स्पॉन्सर्स मिळवतात, गुंडांकडून सक्रीय सहभाग, राजकीय पक्षांकडून पाठिंबा नि बोटचेप्या धार्मिक म्हणवणार्या षंढांकडून मूक अनुमोदन. मग ‘आम्हीच काय घोडे मारले आहे’ म्हणत ईदच्या मिरवणुकीतही ढणाणा स्पीकर्स लावून अचकट-विचकट हावभाव करत नाचणारे तरुण काल पाहिले.
हे सारे सण, उत्सव अशा समाजकंटकांच्या हाती जात असताना सर्वधर्मीय स्वयंघोषित खरे धार्मिक, सुज्ञ लोक तोंडातून ब्र काढत नाहीत. या रिकेटी मंडळींचे शौर्य केवळ इतरांवर आगपाखड करतानाच दिसते, बहुधा या समाजकंटकांच्या पाठिंब्याचे सलाईन लावून चढवले जात असावे.
दिवाळीमध्ये पूर्वपहाटे– अगदी चारच्याही आधी- उठून पाहा. रस्त्यावर कुणी नसताना त्या शांत वातावरणात सर्वत्र लागलेले दिवे, ते जग किती मंतरलेले दिसते याचा अनुभव घ्या एकदा. आमच्या लहानपणी दिवाळीमध्ये थंडी असे. त्या अनुभवात ती ही भर पडे. (आता नागरीकरणाने नि दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच नव्हे, तर बारा महिने कुण्या दादा-भाईच्या वाढदिवशी मध्यरात्री वाजणार्या फटाक्यांमुळे आणि रस्तोरस्ती ओतलेल्या सिमेंटमुळे दिवाळी पहाटही उष्णच असते.) ख्रिस्ती वस्ती, समाज वा राष्ट्रात असलात तर ख्रिसमसच्या वेळीही असेच वातावरण अनुभवता येते. हा अनुभव अद्भुत असतो.
मग अरुणोदय झाला की माणसांनाही उजाडते. फटाके, धूर कलकलाट नि रस्त्यावरचा कचरा अनुभवायला मिळतो.
पण हे हरवलेले जग आहे. आता हिंदूचे राज्य आहे नि सणांना डीजे लावून तुमचे कान फाडण्याचे, वयस्कांना लवकर मृत्यू देऊन त्यांची सुटका करण्याचे कार्य करण्याचे कंकण बांधून उतरलेली उन्मादी मंडळी सत्ता राबवत आहेत आणि वैचारिक नपुंसक झालेली मंडळी (–त्यांना सांगूनही) ‘त्यांना सांगा की’ हा एका बैलाने दिलेला ‘हर मर्ज की दवा’ राष्ट्रीय तर्क गळ्यात बांधून त्याला एखाद्या पुरस्कारासारखा मिरवत आहेत, किंवा वॉशिंग्टच्या कुर्हाडीसारखा कुठल्याही झाडावर उगारत आहेत
-oOo-
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६
सण गेले विरुनी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा