Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, ६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १ : प्रास्ताविक

  • भारतीय भाषांतील धंदेवाईक मनोरंजन माध्यमांना वावडे असणार्‍या ‘विज्ञान-काल्पनिका’ (science-fiction) अनुभवायच्या तर तुम्हाला इंग्रजीकडे वळावे लागते. त्यातही हॉलिवुडकरांच्या अंगणात गेलात, तर भूतकाळातील काही राजे-राज्यांच्या संघर्षाला भविष्यात नि अंतराळात नेऊन ठेवलेले तुम्हाला पाहावे लागते. किंवा वर्तमानातील कथा/चित्रपटांतील महानायकांचे (super-hero) अवतार तिकडे नेऊन त्याला कुण्या एलियन शत्रूशी दोन हात करायला लावलेले दिसतात. कुठलेसे ‘एम्पायर’ नि कुठलासा ‘रेझिस्टन्स’ यांच्या संघर्षाच्या कथा संगणकाच्या साहाय्याने चित्तथरारक चित्रचौकटींमधून सादर करुन ते तुमची मती गुंग करुन टाकतात. प्रत्येक वेळी आपण जणू नवेच काही कथानक पाहात आहोत अशा भ्रमात तुम्हाला ठेवून ही मंडळी आपले खिसे भरताना दिसतात.

    एखाद्या कथानकास विज्ञान-काल्पनिका म्हणवून घेण्यास त्यात वैज्ञानिक भविष्याचे केलेले भाकित नि वर्तमान वैज्ञानिक प्रगतीची स्थिती यांच्यात एक तर्कसंगती राखावी लागते. आजच्या काळात न दिसणारा हा वैज्ञानिक प्रगतीचा टप्पा त्या भविष्यातील समाजरचना, वैय्यक्तिक आयुष्य, राजकीय परिस्थिती यांच्यावर कसा परिणाम करतो, याची बांधणी करता यायला हवी. इंग्रजीमध्ये extrapolation असा शब्द आहे, किंवा गणिती/संख्याशास्त्रीय भाषेत forcasting अशी संज्ञा वापरली जाते.

    आजवरच्या माहिती-बिंदूतून एखादा परस्पर-संबंध प्रस्थापित करुन, त्याला भविष्याकडे ताणून जिथे पोहोचू शकतो, अशा अवकाशामध्ये हे कथानक रुजलेले हवे. त्या जगाने केवळ कल्पनाविश्व (fantasy) म्हणून उभे न राहाता, वर्तमानामध्ये त्याची मुळे रुजलेली दिसायला हवीत. पण त्याचबरोबर त्याच्या फांद्या मात्र वर्तमानाचे आवरण फाडून पुढे विस्तारायला हव्या. भूतकाळातील धातूच्या तलवारीऐवजी बटण दाबून मूठभराची हातभर होणारी लेझरची तलवार एवढाच फरक करुन इतिहासातील लढाईची भविष्यकालीन आवृत्ती चितारणारा बालिशपणा नसावा.

    माझ्या या अपेक्षांशी सुसंगत अशा मोजक्याच मालिका गेल्या दहा-एक वर्षांत पाहाण्यात आल्या. ब्लॅक-मिरर, डार्क (ही मूळची जर्मन भाषेतील), अपलोड, सेव्हरन्स या अलिकडच्या काळातील अशा काही मालिका. यांसोबतच मागील शतकातील एव्हरग्रीन ‘स्टार-ट्रेक’, तसंच ‘द ट्वायलाइट झोन’, ‘द आउटर लिमिट’ (या तीनही मालिका माझ्या जन्मापूर्वीच्या !) या मालिकांमधील काही भागही अशा वैज्ञानिक कल्पनेच्या भरारीचे दर्शन घडवणारे होते. चलच्चित्रांच्या (Animation) क्षेत्रातील ‘फ्युचुरामा’नेही (Futurama) काही उत्तम विज्ञान-कल्पना मांडून दाखवल्या होत्या. (त्यातील काहींना चक्क विनोदप्रधान कथानकाच्या माध्यमातून सादर केले होते हे विशेष.) पहिला टप्पा (Season) अलीकडेच संपवलेली ‘प्लरिबस’ ही मालिका– निदान कथाबीजाच्या (premise) पातळीवर तरी या मांदियाळीमध्ये सामील करता येते.

    या लेखनाचा उद्देश Pluribus ची गोष्ट सांगणे अर्थातच नाही, त्याचे तथाकथित परीक्षण लिहिणे नाही की रसग्रहणही. (ज्यांत पुन्हा मोठा भाग गोष्ट सांगणाराच असतो.) ती मालिका पाहात असताना जाणवलेले मुद्दे, त्यातून फुटलेले विचाराचे प्रवाह आणि आत्मसात केलेल्या आकलनाचे दस्तऐवजीकरण करणे हे आहे. हे माझे आकलन आहे. ज्याची मुळे या मालिकेच्या कथानकात रुजली असली तरी त्याचा विस्तार माझ्या विचारांच्या अवकाशामध्ये, माझ्या कुवतीच्या मर्यादेत होत गेलेला आहे. ‘आकलनाच्या कलाने...’ या मागील लेखामध्ये आकलनाबाबत जे विवेचन केले ते प्रामुख्याने या मालिकेच्या व्याप्तीमागची भूमिका स्पष्ट करण्यासाठीच.

    प्लरिबसमध्ये एका सर्वव्यापी अपघाताने मानवी समाजाची घडी संपूर्णपणे बदलते आहे. ही नवी व्यवस्था धर्म, वंश, देश, भाषा या सार्‍या सीमा पुसून विशाल मानवी समाजाची प्रतिष्ठापना करते आहे. केवळ सहजीवन नव्हे, तर सहसंवेदन ही संकल्पना रुजवते आहे. मानवी समाजाला जणू एका कुटुंब म्हणून रूपांतरित करताना निसर्गातील इतर जिवांशी बांधिलकीही प्रस्थापित करते आहे. पण या व्यवस्थेतूनही अपवाद म्हणून निसटलेले काही जण आहेत. आणि मालिकेची कथा यांच्याभोवती फिरते आहे. कारण त्यातून विक्रियोग्य असा ‘ड्रामा’ लेखकांना नि निर्मात्यांना निर्माण करता येतो आहे.

    पण मला या अपवादांमध्ये वा त्या ड्रामामध्ये रस नाही. माझे लक्ष वेधून घेतले आहे ते त्या नवनिर्मित व्यवस्थेने. या व्यवस्थेमध्ये मला प्रस्थापित नि प्रस्तावित अशा दोन प्रकारच्या व्यवस्थांची प्रतिबिंबे दिसत आहेत. तेव्हा या व्यवस्थेचे मूल्यमापन करताना, तिच्या भविष्याचा वेध घेताना या व्यवस्थांशी जोडून पाहाता येते आहे. बरे या व्यवस्थाही काही आभाळातून टपकलेल्या नाहीत, त्यांच्यावर त्यांच्याही पूर्वसुरींचे सकारात्मक, नकारात्मक प्रभाव असतातच. त्यामुळे ही सारी साखळीच बारकाईने पाहावी असे मला वाटले. त्यातून ही मालिका साकार झाली आहे.

    माणसाच्या इतिहासामध्ये सहजीवनाची मांडणी विविध प्रकारे केली गेली आहे, विविध व्यवस्था निर्माण झाल्या. काही माणसाने हेतुत: घडवल्या तर काही सेंद्रिय पद्धतीने विकसित होत गेल्या. यांचे अवशेष जगाच्या कानाकोपर्‍यात कुठे न कुठे अजूनही तग धरून आहेत. त्याअर्थी यातील कोणतीही एक व्यवस्था निर्विवाद श्रेष्ठ म्हणता येणार नाही. यातील काही रुजल्या, काही रुजवल्या, काही स्थलांतरित मानवाने सोबत नेल्या, तर काही लादल्या गेल्या आहेत.

    इथे मी विशिष्ट क्रमाने त्यांचा उहापोह करतो आहे. हा क्रम कालानुक्रमे लावलेला आहे असा माझा दावा नाही! (चार-दोन दशकांपूर्वीच्या घटनांबाबत छातीठोकपणे सांगता येत नाही तिथे शतकांच्या, सहस्रकांच्या इतिहासातील घटना व कालानुक्रमाबद्दल तसे सांगणे केवळ अहंकाराने स्वत:ला ज्ञानी समजू लागलेल्यालाच शक्य आहे.) या मांडणीतून मला अभिप्रेत असलेले, प्लरिबसमधील व्यवस्थेशी सांगड घालणारे आकलन आकार घेते आहे. ते आकलन माझ्या दृष्टीने ऐतिहासिक बिनचूकपणापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

    त्यामुळे ‘प्लरिबस’च्या नमनाला घडाभरच नव्हे तर चांऽगले बॅरलभर तेल ओतणार आहे, कारण माझा उद्देशच तो आहे. त्या मालिकेमध्ये दिसलेल्या सामाजिक व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी मला त्याची गरज वाटते आहे. त्या बॅरलभर तेलाने माझ्या मेंदूचे चांगले मालिश केले आहे. त्यातून जे स्रवले ते इथे मांडत जाणार आहे.

    एखादी दीर्घ क्रमसंगत (episodic) मालिका लिहिताना सर्वात मोठा धोका असतो तो बौद्धिक थकवा किंवा विचलित होऊन भरकटण्याने मालिका अर्धवट राहाण्याचा. यापूर्वी हा अनुभव असल्याने लेखन पुरे झाल्याखेरीज प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला. त्यातून ५ मे ला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट लांबले नि जुलै उजाडला. परंतु फायदा हा की सुरुवात करतानाच ती पुरी होईल याची हमी देऊ शकतो आहे.

    एखाद्या वृत्तपत्रीय स्तंभाइतका विस्तार असलेली ही मालिका आहे. म्हणून ही प्रकरणे ठराविक काळाने क्रमवार प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. दर सोमवारी पुढचे प्रकरण प्रकाशित करण्याचा मानस आहे. यातील सर्व भाग मिळून एकत्रितरित्या एक आकलन समोर ठेवतात. त्यामुळे अधलेमधले प्रत्येक प्रकरण काही माहिती देत असले, तरी क्रमवार वाचणेच इष्ट ठरणारे आहे. तेवढी चिकाटी नि वेळ वाचकाला मिळावी ही स्वार्थी सदिच्छा.

    काही काळापूर्वी मराठी संस्थळावर लिहित असताना तेथील एका सदस्याने ‘हे पाच मैल लिहितात. इतकं कोण वाचणार?’ अशी प्रतिक्रिया दिली होती. या लेखनाच्या विस्ताराकडे पाहून काही वाचक तेच म्हणणार आहेत याची जाणीव आहे. पण पाच मैल धावल्यावर जो घाम निघतो, त्यातून आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात याकडे लक्ष वेधून थांबतो.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » समूहजीवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: