-
प्रस्तावना « मागील भाग
सजीवांतील सहजीवननिसर्गामध्ये प्रगतीच्या वाटेवर सजीवांची वाटचाल संघर्ष नि सहकार या दोन साधनांच्या आधारे होत असते. या दोन्हींचा वापर करुन संरक्षण नि आक्रमकता या दोहोंसाठी आवश्यक विविध गुणकौशल्यांचा विकास होत असतो किंवा ज्यांच्याकडे ते अधिक विकसित असतात ते जगण्याच्या वाटेवर वेगाने पुढे जाऊ शकतात.
संघर्षामध्ये सजातीय प्राण्यांशी होणारे संघर्ष आणि अन्य प्रजातींशी होणारे संघर्ष असे दोन प्रकार दिसतात. पैकी अन्न (आणि त्यासाठी हद्दीचा) संघर्ष हा सजातीय नि अन्य जातीय अशा दोनही प्रकारच्या जीवांशी होतो. पण त्याखेरीज नरांचा सजातीय प्राण्यांशी जुगण्याच्या हक्कासाठीही संघर्ष होत असतो. हा प्रत्यक्ष संघर्ष प्राणिकुलांत आणि कीटकांच्या काही प्रजातींमध्ये दिसतो. पक्ष्यांमध्ये स्पर्धा असली, तरी प्रत्यक्ष संघर्ष क्वचितच दिसतो.
सहकारामध्ये एकाच प्रजातीच्या सजीवांचे सहजीवन आणि भिन्न प्रजातींचे परस्पर-सहकार्य असे दोन प्रकार दिसतात. काही मुंग्या वारूळामध्ये विशिष्ट कवकाची ‘शेती’ करतात. यात त्यांना थेट न पचणारे सेंद्रीय पदार्थ आणून ते या कवकांना ‘खाऊ घालतात’. त्या बदल्यात हे कवक त्यांचे विघटन करुन मुंग्यांना पचतील अशा अन्नामध्ये त्याचे रूपांतर करतात. काही मुंग्या मावासदृश aphids प्रजातीच्या कीटकांचे संगोपन करुन त्यांच्या शरीरातून स्रवणारा दुधासारखा पदार्थ सेवन करतात. त्या बदल्यात त्यांची टोळी या कीटकांचे त्यांच्या शत्रूंपासून संरक्षण करते, सुरक्षितता प्रदान करते. हे आंतर-प्रजाती सहकाराचे उदाहरण आहे. उंच झाडावर बसलेल्या माकडाने किचकिचाट करुन शिकारी प्राण्याच्या आगमनाची इतर भक्ष्य प्राण्यांना सूचना देणे असेल की शहरात साळुंक्यांनी कलकलाट करून मांजराच्या आगमनाची चाहूल देणे, हे एकतर्फी मदतीचे उदाहरण.
पण सहकारापेक्षा सहजीवनाचा आढळ निसर्गात, विशेषत: प्राण्यांमध्ये, चांगलाच रूढ आहे. कारणे भिन्न असली तरी हरणांसारख्या भक्ष्य प्राण्यांपासून लांडग्यांसारख्या भक्षक प्राण्यांपर्यंत, तसंच वानरकुलातील प्राण्यांसारखे या दोन्ही वर्गात मोडणारे बहुतेक प्राणी हे सहजीवनपद्धतीचा अंगीकार करतात. हरणांसारख्या भक्ष्य प्राण्यांमध्ये ‘safety in numbers’ या तत्त्वाचा अंगीकार दिसतो. एकत्रितपणे मोठ्या संख्येने वावरण्याने एका शिकारीमध्ये विशिष्ट हरणाची शिकार होण्याची संभाव्यता (probability)(१) कमी होते. कळपामध्ये जितके अधिक प्राणी तितका प्रत्येक प्राणी अधिकाधिक सुरक्षित होत जातो.
याउलट शिकारी प्राण्यांमध्येही ‘एकीचे बळ’ महत्त्वाचे असले तरी कळपाची संख्या फार वाढून चालत नाही. कारण तसे झाले तर अन्नातील वाटेकरी वाढतात. त्यामुळे पुरेसे अन्न मिळत नाही आणि अंतर्गत संघर्ष तीव्र होतो. त्यामुळे शिकारी प्राण्यांच्या प्रत्येक टोळीचा संतुलन राखणारी (optimum) एक सदस्य-संख्या असते, ती पार झाली की टोळी विभागते. लांडगे, कोळसुंदे, सिंह (प्रामुख्याने सिंहिणीच्या) यांच्या टोळ्यांमध्ये ही संख्या वेगवेगळी दिसते. भक्ष्य प्राण्यांमध्ये मात्र असे होत नाही. त्यांची टोळी/कळप निरंतर वाढता राहाणे शक्य असते. पण तिथे संख्यानियंत्रणाचे काम शिकारी प्राणी करत असतात.
निसर्गात सहज दिसणारे, ज्यावर मानवी जीवनही बरेच अवलंबून असल्याने मानवाला ज्याचे सर्वाधिक आकलन झाले आहे असे सहजीवन आहे मधमाश्यांचे; आणि त्याच धर्तीवरचे मुंग्यांचे. या कीटकांचे मोठे जत्थे, कळप सहजीवन जगतात. यांच्यात स्पष्ट अशी कार्यविभागणी दिसते. विशिष्ट कौशल्याचे काम प्रत्येक सदस्य जन्मभर करत राहातो.
मधमाश्यांमध्ये मधाचा शोध घेणार्या, पोळ्याची निगा राखणार्या, राणी माशीची सेवा करणार्या माश्या; केवळ पुनरुत्पादनापुरते असणारे नर आणि पुनरुत्पादनाचा एकाधिकार नि जबाबदारी असणारी राणी अशी स्पष्ट विभागणी असते. मधाचे पोळे ही एक परिसंस्था म्हणून एकत्रितरित्या जगत असते. यातील एकाही माशीला स्वतंत्र अस्तित्व नसते. यातील कुणीही वैय्यक्तिक आयुष्य जगू शकत नाही, कारण जगण्यास आवश्यक असणारी सारी कौशल्ये एकत्रितरित्या त्यांच्यापैकी एकीमध्ये अस्तित्वात नसतात... आजचा प्रगत मानवी समाजही याच पातळीवर जगतो आहे!
सारे जगच एक मानवी टोळी असून विविध सेवा, उत्पादने, अन्नधान्ये, यांची विशेष कौशल्ये आत्मसात करुन, त्यांची देवाण-घेवाण करण्याची व्यवस्था त्यात स्थिरावली आहे. पण असे असूनही यात वैय्यक्तिक स्वार्थाला जसा वाव आहे तसाच धर्म, देश, वंश अशा उपगटांना, उपटोळ्यांना स्वतंत्रपणे जगण्यास वाव शिल्लक राहातो आहे. पण या लहानमोठ्या स्वार्थांचे परस्परांना छेद जात आहेत. साधनसंपत्ती, उपभोग्य वस्तू, व्यक्ती यांना आपल्याकडे अधिकाधिक खेचून घेण्याच्या स्पर्धेतून जे अंतर्गत ताण उद्भवत आहेत त्यातून प्रगतीसोबतच परागतीच्या वाटांचेही महामार्ग होताना दिसत आहेत.
मनुष्यप्राणी: अन्न-वितरण ते संपत्तीमानवी संस्कृतीच्या उदयकाळात माणूसही कळपाने राहाणारा प्राणी होता. अन्न, निवारा/संरक्षण नि पुनरुत्पादन या तीन गरजांभोवती त्याचे जगणे बांधलेले होते. या तीनही गरजांची पूर्ती केवळ वैय्यक्तिक पातळीवर होणे जवळजवळ अशक्य असल्याने परस्पर-सहकार्य हा टोळीच्या अस्तित्वाचा मूलाधार होता. साहजिकच त्या जीवनामध्ये वैय्यक्तिक हक्काला स्थान नव्हते. जगण्यात दोनच गरजा; संघर्ष व्हायचा तो त्या संदर्भातच. पहिले म्हणजे अन्न आणि दुसरा देहसुखाचा किंवा जुगण्याचा हक्क(२).
टोळीने शिकार करणार्या प्राण्यांमध्ये टोळी असली, तरी अन्नाचे वाटप वाजवी होईलच असे नाही. बहुतेक शिकारी टोळ्यांमध्ये शिकार जमिनीवर पडली, की टोळीतील सारे तिच्यावर तुटून पडतात. सारे एकाच वेळी खात असल्याने वितरणात प्रत्येकाला वाजवी संधी (fair chance) असते असे म्हणता येईल. पण त्यात बलवंताला अधिक संधी हे ओघाने आलेच. सिंहिणींच्या टोळीने केलेल्या शिकारीवर त्यांना हुसकावून लावून त्यांचा टोळीमालक नर पहिला हक्क प्रस्थापित करतो. कोळसुंदे (जंगली कुत्री) तर भक्ष्य जिवंत असतानाच त्याचे लचके तोडायला सुरुवात करतात. लांडगे मात्र अन्य टोळी-सदस्यांची काळजी घेतात असे दिसते. पण असा एखादा अपवाद, बाकी बहुतेक शिकारी प्राण्यांत गोडीगुलाबीने प्रत्येक टोळी-सदस्याला अन्नाचा वाटा देण्याची वहिवाट नसते.
पण माणसांचे असे नाही. वानरकुलापासून मनुष्यप्राणी वेगळा झाला तो त्याच्या मेंदूच्या विकासामुळे. या प्रगत मेंदूमुळेच त्याला टोळीतील प्रत्येक सदस्याचे महत्त्व नि स्थान ध्यानात आले असावे. टोळीतील प्रत्येकाला अन्नाचा वाटा दिला पाहिजे हे शहाणपण त्याला आले असावे. आज निरर्गल स्पर्धा नि निरंकुश साठेबाजीला प्रोत्साहन देणार्या भांडवलशाहीप्रधान व्यवस्थेमध्ये हे शहाणपण अस्तंगत होताना दिसते आहे.
वयोमानापरत्वे आलेल्या शारीरिक मर्यादांमुळे टोळीतील ज्येष्ठांना शिकारीत भाग घेणे अवघड होई. पण मागील अनुभवांच्या आधारे माहिती-ज्ञानाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवणे आणि त्या अनुभवाच्या आधारे टोळीसमोर येणार्या अडचणींचे निवारण करण्यासाठी उपाय शोधणे आदी कामे या पिढीच्या शिरावर होती. बाह्य धोक्याच्या धाक हा ही अन्न-वाटपावर परिणाम घडवणार घटक होता. बाह्य धोक्याशी, शेजारी/शत्रू टोळ्यांशी जो संघर्ष होई, त्यात यश मिळण्याची शक्यता वाढवायची असेल, तर टोळीतील सदस्य संघर्षाच्या परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेने लढण्यास सिद्ध असायला हवा. यासाठी संघर्षात प्रामुख्याने लढणार्या पुरुषांना पुरेसे अन्न मिळायला हवे.
टोळीचे मुख्य बळ म्हणजे त्यातील सदस्यांची संख्या, ती सतत वाढती राहायला हवी. आणि ज्या पुनरुत्पादनक्षम स्त्रिया ती वाढवणार, त्यांनाही पुरेसे अन्न हवे. मुले तर भावी लढाऊ रसदच. अशा तर्हेने प्रत्येक सदस्याचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे निश्चित होत असे. त्यामुळे मोजक्या व्यक्तिंनी वा एखाद्या उपगटाने फार अधिक वाटा बळकावला, इतर सदस्य कुपोषित राहून हा समतोल बिघडे नि टोळीचे भविष्य धोक्यात येई. परस्परावलंबी आयुष्यामुळे गरजेहून अधिक बळकावण्याच्या स्वार्थी वृत्तीला आपोआप आळा बसे.
त्याचबरोबर अन्न हे नाशवंत असल्याने त्याच्या साठवणुकीला मर्यादा होती. वाघ, चित्ते आदी एकांडे शिकारी प्राणी एकदा केलेली शिकार बहुधा एकाच वेळेस संपवू शकत नाहीत. मग ते आडबाजूला, पाना-फांद्यांच्या कचर्याखाली ती झाकून ठेवतात, पुढच्या भुकेची तरतूद म्हणून. पण ही साठवण अत्यंत मर्यादित काळ उपयुक्त ठरते, कारण मांस हे लवकरच सडू लागते. माणसाने आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करुन अतिरिक्त अन्नाच्या साठवणुकीचा कालावधी वाढवला असला, तरी त्यातून सुदूर भविष्याची तरतूद करणे त्यालाही शक्य नव्हते. त्यामुळे अवाजवी साठवणुकीला आणि म्हणून विषम-वितरणाला फारसा वाव नव्हता.
अंतर्गत संघर्षाचे दुसरे कारण म्हणजे जुगण्याचा हक्क. मनुष्य वगळता वानरकुलातील इतर प्राण्यांच्या टोळ्यांमध्ये केवळ टोळीप्रमुखालाच हा विशेषाधिकार असतो. तो डावलून जुगण्याचा प्रयत्न करणार्या, त्याला विरोध करणार्या नर व माद्या दोघांनाही त्याचे फटके खावे लागतात. लांडग्यांसारख्या टोळीमध्ये अशा व्यभिचारासाठी टोळीबहिष्कृतीची शिक्षा दिली जाते. टोळीप्रमुखाचा हा विशेषाधिकार हिरावून घेण्यासाठी वयात आलेल्या इतर नरांची त्याच्याशी स्पर्धा होत असते. यातून होणार्या अंतर्गत संघर्षाने टोळी दुर्बळ होण्याचा धोका असे. हे ओळखून मनुष्यटोळ्यांनी अन्य सजातीय प्राण्यांत नसलेली एकास-एक जोडीदाराची संकल्पना रुजवली. या व्यवस्थेमुळे अंतर्गत संघर्षाचे प्रमाण बरेच कमी करता आले. सामूहिकतेकडून वैय्यक्तिकतेकडे नेणारे बहुधा हे पहिले पाऊल असावे.
एकास-एक जोडीदार निश्चित झाल्याने जन्मलेल्या मुलांचे पितृत्वही निश्चित होऊ लागले. यातून कुटुंबसंस्था आकार घेऊ लागली. कुटुंबापाठोपाठ कुटुंबियांची उतरंड, म्हणजे वंश-संकल्पनाही रुजली. टोळीतील प्रत्येक व्यक्तिला उरलेल्या बहुसंख्येपेक्षा काही सदस्य अधिक जवळचे झाले. हितसंबंधांमध्ये प्रतवारी आली... टोळी-अंतर्गत या लहान टोळ्या निर्माण झाल्या. टोळी/समाजामधील बंध काहीसे सैल होऊ लागले.
शिकारजीवी माणूस पुढे माणूस शेती करू लागला, नागर झाला. या व्यवस्थेमध्येही सामूहिकता होती. शेती करणारा कुणबी, हत्यारे बनवणारे लोहार, सुतार, मडकी घडवणारे कुंभार या सार्यांची उत्पादने ही समाजासाठी होती, गरजेनुसार प्रत्येकाला त्या त्या वस्तूचा पुरवठा करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्याचवेळी त्यांच्या गरजाही त्याच प्रकारे भागवल्या जात असत. एखाद्याने आपल्या कामात कुचराई केली तर त्या तुटवड्याचा फटका पुर्या समाजाला बसत असे. त्यामुळे ती व्यक्ती पुर्या टोळीची, समाजाची गुन्हेगार ठरत असे. त्याची शिक्षा म्हणून बहिष्कृतीचे जे अस्त्र उगारले जाई, त्यानंतर त्या व्यक्तिला स्वतंत्रपणे जगणे अशक्य होऊन जाई.
जंगलजीवी, शेतीजीवी समाज हा समूहजीवी होता. त्याचे हे समूहजीवी असणे ही त्याच्या अस्तित्वाच्या लढ्याची गरज होती. शिकार असो वा शेती, सहकाराखेरीज साध्य होत नव्हते. शेतीचा शोध नि अंगीकार केल्यानंतर माणूस नागरजीवी झाल्याने सहनिवासीही झाला. शेतीमधून अन्नाची शाश्वती निर्माण झाल्यामुळे जगण्यातील अन्नाशी निगडित संघर्ष काहीसे बोथट झाले. मानवी आयुष्यात अधिक उसंत निर्माण झाली.
- (क्रमश:) -
पुढील भाग » समूहाची ओळख
टीपा:
(१). प्रत्यक्षात संभाव्यता या संकल्पनेचे व्यावहारिक अर्थ फार क्वचित समजतात. अगदी शक्यताविज्ञानाच्या (Probability Theory) शिक्षक वा विद्यार्थ्यांनाही पुस्तकी व्याख्येपलिकडे फार आकलन नसते. [↑]
(२). काही मंडळी यालाच ‘पुनरुत्पादनाचा हक्क’ असे म्हणतात. पण हे दोन्ही समानार्थी नाही! [↑]
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, १३ जुलै, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - २ : समूहजीवी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा