Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, १७ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ५. काही बिंदू आणि एक आलेख

  • ट्रॉयचे युद्ध « मागील भाग

    पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक प्रयोगातून मिळालेली निरीक्षणे ज्याप्रमाणे आलेखावर नोंदवून पुढच्या— भाकिताच्या टप्प्याकडे सरकतो, त्याप्रमाणे ट्रॉयच्या, हेलनच्या कथेमधून काही निरीक्षणे, काही प्रश्न, काही तपशील आधी नोंदवून ठेवणार आहे. त्यानंतर त्याच्या आधारे काही निष्कर्षाकडे जाता येते का पाहाणार आहे.

    ट्रॉयचे हे युद्ध तब्बल दहा वर्षे चालले असे इलियड (आणि ओडिसी) सांगते. कोणत्याही कालखंडामध्ये हा कालावधी बराच मोठा आहे. सुरुवातीला म्हटले तसे २७-२८ ग्रीक राजे, सत्ताधीश हे एकत्रितरित्या ट्रॉयविरोधात लढत होते. त्यांनी केलेल्या नाकेबंदीमुळे ट्रॉयला अन्न-टंचाई सहन करावी लागत होती. असे असूनही तब्बल एक दशकभर ट्रॉयने ग्रीकांच्या संयुक्त सैन्याला दाद लागू दिलेली नाही. यावरून ट्रॉय हे लष्करीदृष्ट्या बलिष्ठ किंवा निदान युद्धाच्या डावपेचांत चांगले पारंगत राज्य असावे असा तर्क करता येतो. अशा प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी फंदफितुरीचा मार्ग वापरला जातो. ग्रीकांनी तो वापरला होता का? हा प्रश्न माझ्या डोक्यात उगवला नि त्या अनुषंगाने काही निरीक्षणे नोंदवत गेलो.


    लाकडी घोड्याची गोष्ट

    या युद्धातून निर्माण झालेले महत्त्वाचे मिथ्य आहे ते लाकडी घोड्याचे. असे म्हणतात की दीर्घकाळ घरापासून, राज्यापासून दूर राहिल्याने सैनिक नि राजे कंटाळले होते. अन्नटंचाई, हेक्टरसारख्या प्रमुख वीराचा मृत्यू पचवूनही ट्रॉय अजून झुंजत होते. अकिलीससारखा प्रमुख योद्धा ग्रीकांनीही गमावला होता. इतक्या वर्षांनंतरही या युद्धातून काहीच हाती लागत नव्हते. हे पाहून अखेर ओडिसिअसच्या मध्यस्थीने परतण्याचा निर्णय अगामेम्नॉनच्या गळी उतरवला गेला.

    पण ज्याप्रमाणे युद्धाच्या सुरुवातीला अगामेम्नॉनने स्वत:च्या मुलीचा बळी आर्टेमिस या देवतेला दिला होता, त्याचप्रमाणे परतीची भेट म्हणून एक लाकडी घोडा स्थानिक देवतांसाठी सोडण्याचा निर्णय झाला. असा घोडा किनार्‍यावर सोडून ग्रीक गलबते परतीच्या वाटेने मार्गक्रमण करु लागतात. गलबते दूरदूरवर दिसत नाहीत हे पाहून पाहाणीसाठी आलेल्या ट्रॉयच्या सैनिकांना हा घोडा धान्याने भरलेला होता असे दिसून येते. गेले कित्येक वर्षे अन्नधान्याची चणचण सहन करत असलेले हे सैनिक तो घोडा आनंदाने नगराच्या आत नेतात.

    त्या दिवशी रात्री युद्ध संपल्याच्या आनंदात चालू असलेल्या आनंदोत्सवादरम्यान हेलन मिनेलॉसला दिलेले वचन पुरे करण्यासाठी त्याच्याकडे जाण्यास निघते. त्यासाठी ती नगराचे द्वार उघडते. त्याचा फायदा घेऊन थोडे अंतर कापून उलट फिरलेल्या गलबतांतून परतलेले ग्रीक सैनिक मोठ्या संख्येने आत घुसतात. तसेच घोड्यामध्ये लपलेले मोजके सैनिकही बाहेर येऊन मोक्याच्या जागा ताब्यात घेतात. ट्रॉय पडते, त्याचा बव्हंशी निर्वंश होतो.

    तेव्हापासून सद्‌हेतूचा, मदतीचा, भेटवस्तू देण्याचा आव आणून विश्वासघात करण्याच्या प्रसंगांमध्ये अनेकांना ट्रॉयच्या या अंतिम लढाईचे प्रतिबिंब दिसू लागले. ती भेटवस्तू, वा ती सद्भावदर्शक भेट वा दूत याला ‘ट्रोजन हॉर्स’ अशी संज्ञा मिळाली. या संकल्पनेची प्रतिबिंबे इतिहासामध्ये अनेक ठिकाणी पडलेली दिसतात(१).

    ‘ट्रोजन हॉर्स’ची ही कथा वास्तव आहे की रूपककथा याबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. याच मुद्द्यावर मी माझे आलेखाचे तर्कशास्त्र वापरून पाहाणार आहे. या लेखमालेची उठाठेव ज्यासाठी केली तो भाग मांडण्याचा प्रयत्न आता करतो आहे.


    काही निरीक्षण-बिंदू (points)

    1. ओडिसिअस या इथाकाच्या राजाचा एक हेर झायन्थस (Xianthus) हा युद्धापूर्वीच ट्रॉयमध्ये घुसलेला आहे. तो हेलनला भेटला होता, तिच्या सुटकेसाठी मदत करण्याचा प्रस्तावही त्याने दिला होता. हेलनला या हेराबद्दल माहिती असून तिने ट्रॉयमध्ये कुणालाही ती दिलेली नाही.

    2. झायन्थस या हेराच्या मदतीने अकिलीस या ग्रीक योद्ध्याने गुप्तपणे ट्रॉयमध्ये प्रवेश केला आहे. त्यानेही हेलनची भेट घेतली आहे, झायन्थसप्रमाणेच त्यानेही तिला तिथून सुरक्षितपणे घेऊन जाण्याचा, सुटका करण्याचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला आहे. झायन्थस निदान युद्धापूर्वी आत आलेला होता, अकिलीस सैन्ये परस्परांसमोर उभी असतानाही निर्विघ्नपणे आत येऊ शकला. याचा अर्थ नगराच्या सुरक्षिततेमध्ये कुठेतरी भगदाड आहे याची जाणीव होऊनही तिने पॅरिस वा ट्रॉयमध्ये इतर कुणाला या धोक्याची जाणीव करुन दिलेली नाही. (इथे अकिलीस ऐवजी मिनेलॉस असता तर कदाचित तिचा हा निर्णय समजण्याजोगा आहे, कारण तो तिचा पती आहे.).

    3. अकिलीसला हेलनच्या दालनातून बाहेर बाहेर पडताना राजकुलाचा एक सेवक पाहातो. त्यानंतर झायन्थस म्हणजे ट्रॉयमध्ये घुसलेल्या ओडिसिअसच्या हेराला ती हे सांगते. पुढे त्या सेवकाचे प्रेत सापडते.

    4. युद्धादरम्यान एका टप्प्यावर पॅरिस आणि मिनेलॉस यांचे द्वंद्व होते. दोन्ही बाजूंनी सैनिकांची हत्या होण्यापेक्षा सरळ दोन्ही पतींचे निर्णायक द्वंद्व व्हावे नि हेलनचा निवाडा करावा अशी उपरती तेव्हा झालेली असते. परंतु हे द्वंद्व निर्णायक होत नाही. इतरांनी हस्तक्षेप केला नसता नक्कीच पराभूत झाला असता, मारला गेला असता असा पॅरिस परागंदा होतो.

    5. तरीही हेलन ट्रॉयमध्येच राहाते. ‘स्वत: परतून येण्याबदल्यात युद्ध थांबवून परत जाण्याचा’ जो प्रस्ताव तिने युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात मिनेलॉसला दिला आहे, तो देण्याची ही खरी वेळ होती. तिचे अपहरण करणारा परागंदा झाला आहे. अशा वेळी तिने मिनेलॉससोबत परत जाण्याची तयारी दाखवली, तर ट्रॉयशी युद्ध चालू ठेवण्यास (हे तिच्या मते! कारण ट्रॉय जिंकण्याची अगामेम्नॉनची मनीषा तो सोडणार नव्हताच) काही कारण उरत नाही.

    6. युद्धादरम्यान ट्रॉयची नाकेबंदी केली गेल्याने अन्नाचा तुटवडा पडू लागतो. तेव्हा अन्नाचा पुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी ट्रॉयकडून लगतच्या सिलिसिया (Cilicia) राज्याशी संपर्क केला जातो. हे हेक्टरच्या पत्नीचे माहेर. तिथे तिचे वडील ईशन (Eetion) राज्य करत असतात. एक पुरवठा मार्ग निर्माण करण्यासाठी या दोन नगरांमध्ये एक भुयार खणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून प्रत्यक्ष पुरवठा सुरु होण्यापूर्वीच ग्रीक सैन्याची एक तुकडी सिलिसियामध्ये घुसल्याचे समजल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून ते तातडीने बुजवण्यात येते.

    7. अखेरच्या लढाईमध्ये ग्रीक ट्रॉयमध्ये घुसतात, पाडाव नक्की दिसू लागतो, तेव्हा हे बुजवलेले भुयार पुन्हा उघडून त्यातून सिलिसियाकडे पलायन करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु भुयार सिलिसियाच्या बाजूला उघडताच ग्रीक सैनिक तिकडे आधीच पोहोचलेले दिसून येतात. म्हणजे ग्रीकांना त्याची माहिती आधीच समजली होती. ती कशी हा प्रश्न निर्माण होतो, कारण त्याबाबत ट्रॉयमध्ये मोजक्याच व्यक्तींना माहिती होती.

    8. ग्रीकांनी देवाला म्हणून सोडलेला, अन्नधान्याने भरलेला लाकडी घोडा, ट्रॉयचे लोक नगरात घेऊन येतात. अखेर युद्ध संपले याचा आनंदोत्सव ट्रॉयमध्ये साजरा होत असतानाच हेलन मात्र मिनेलॉसला दिलेले त्याच्यासोबत परतण्याचे वचन पाळण्यासाठी नगराबाहेर जाण्यास दरवाजा उघडते. तिने साधलेली ही वेळ ध्यानात घेण्याजोगी आहे. याक्षणी सर्व ट्रोजन हे गाफील आहेत.

    9. ग्रीक गलबते परतून जाणे हे ‘त्याच्याकडे परत येण्याच्या बदल्यात ट्रॉयमधून ग्रीक सैन्याने निघून जाण्याचा’ हेलनने दिलेला प्रस्ताव मिनेलॉसने स्वीकारल्याचे निदर्शक असते. त्यामुळे आपले वचन पाळण्यासाठी ती त्याच्याकडे निघून जाण्यासाठी निघते. वास्तविक ग्रीक गलबते ग्रीसकडे परतीच्या वाटेवर निघालेली आहेत हे तिला ठाऊक आहे. तरीही तिला नेण्यासाठी एक गलबत परतून येईल हे तिला माहीत आहे. जर एक गलबत परत फिरु शकते, तर सारीच वा बर्‍याच संख्येनेही ती परत फिरु शकतात हे तिला सहज ध्यानात येऊ शकते... की त्याबाबतही तिला माहिती आहे?

    10. आपले वचन पाळण्यासाठी हेलन मिनेलॉससोबत परतून जाण्यासाठी नगराचा दरवाजा उघडते असा दावा तिने केला आहे. वास्तविक तिला परतच जायचे तर जिथून झायन्थस हा ओडिसिअसचा हेर ट्रॉयमध्ये ये-जा करतो, जिथून अकिलीस नगरात येऊन गेला, त्या चोरमार्गाने ती निघून जाऊ शकत होती. त्यासाठी नगराचा दरवाजा उघडण्याची गरजच नव्हती.

    11. तिच्या दाव्यानुसार जर ‘मिनेलॉसने तिच्याबदल्यात ट्रॉयवर हल्ला न करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता नि नंतर विश्वासघात करून ट्रॉयवर हल्ला केला होता’, तर त्या विश्वासघाताचा प्रतिकार तिने शब्दाने, शस्त्राने करायला हवा होता. त्याच्या हाती पुरे यश लागू नये यासाठी निर्वाणीचा उपाय म्हणून हेकुबाप्रमाणे आत्मघात करुन घ्यायला हवा होता. परंतु तिच्यामध्ये तेवढे धैर्य नसावे किंवा तिला मिनेलॉसच्या त्या कृतीने तेवढी तीव्र विश्वासघाताची भावनाच निर्माण झाली नसावी. कदाचित तिला अपेक्षित वा अभिप्रेत तेच घडले असावे का?

    12. युद्ध समाप्त झाल्यावर हेलन मिनेलॉससोबत परत जाते नि त्याची (अनेकींपैकी एक) पत्नी म्हणून आपले स्थान पुन्हा स्वीकारते. पॅरिसवरील तथाकथित प्रेमाखातर पती, मुलगी नि आपले माहेरही सोडताना ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची स्त्री भासली होती. ती खरेच तशी होती का? पॅरिससोबत निघून येण्याचा तिचा निर्णय प्रेमाखातर होता का? की मिनेलॉसने दावा केला तसे हे अपहरणच होते? की आणखी तिसरीच शक्यता होती? हे प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे मधले तपशील जरी कथन करणार्‍याच्या सोयीने, हेलनच्या पॅरिसप्रेमाचे वा केवळ कर्तव्यभावनेचे म्हणून रंगवता आले, तरी युद्धादरम्यान वा त्या नंतर ती एक व्यक्ती म्हणून परावलंबी भासते. तिची वृत्ती बव्हंशी ‘ठेविले पतीने तैसेचि राहावे’ अशी दिसते.

      पॅरिसवर तिचे खरेच प्रेम असेल, मिनेलॉसने तिचा विश्वासघात करुन ट्रॉयचा विध्वंस केला हे ही खरे असेल, तर या दोन्हींवर तिची प्रतिक्रिया या ना त्या प्रकारे उमटायला हवी होती. तिची तथाकथित सावत्र बहीण नि जाऊ असलेल्या क्लायटेम्नेस्ट्राने अगामेम्नॉनच्या केलेल्या हत्येच्या, प्रायमच्या हत्येनंतर हेकुबाने केलेल्या आत्मघाताच्या पार्श्वभूमीवर हेलनचे शरणागत, निष्क्रिय असणे अधिक जाणवते. मग ‘ते खरेच तसे होते का? की जे घडले ते तिच्या संमतीने, तिच्या सहभागानेच घडले?’ असा प्रश्न विचारणे वाजवी ठरते.


    हेलन हीच ट्रोजन हॉर्स?

    Troy: Fall of a City या मालिकेत हेलनच्या भूमिकेत Bella Dayne.

    या सार्‍या बिंदूंकडे मी पाहातो, तेव्हा यातून जाणारा भाकित-आलेख म्हणून ‘हेलन हीच ट्रोजन हॉर्स होती का?’ हा प्रश्न माझ्या मनात उमटतो. अ‍ॅण्ड्रॉमकीने ‘हेलन ही ग्रीकांसाठी हेरगिरी करते आहे’ असा आरोप केलाही आहे. पण तो तिच्या वैय्यक्तिक दु:खाचा वा असूयेचा स्फोट म्हणून फारसा गांभीर्याने घेतला गेलेला नाही.

    कदाचित हेलनचे ट्रॉयमध्ये शिरकाव करून घेणे आणि त्या आधारे ग्रीकांनी त्यावर हल्ला करणे हा कट असू शकेल. अलिकडच्या भाषेत बोलायचे तर पॅरिस हा तिच्यावर लुब्ध झाल्याचा फायदा घेऊन आखलेला हेलन हा ‘हनी-ट्रॅप’ म्हणता येईल का? सर्व ग्रीक राजांची एकजूट नि आतून होणारी मदत यांमुळे युद्ध झटपट संपेल नि हेलन लवकरच परतू शकेल (तोवर झायन्थस हा आत राहून तिला सोबत करेल) असा होरा सुरुवातीला असावा. परंतु ट्रोजन लोकांनी चिवट प्रतिकार केल्याने युद्ध दहा वर्षे लांबले आणि हनी-ट्रॅप उलटून पॅरिसऐवजी हेलनच ट्रॉयमध्ये ट्रॅप झाली असावी. अखेर प्रत्यक्ष युद्धाने कार्यसिद्धी होत नाही हे पाहून छद्मविचाराचा वापर केला गेला असावा.

    ‘आपली पत्नीच कोण हनी-ट्रॅप म्हणून पाठवेल का?’ असा प्रश्न कुणाच्या मनात उमटेल. पण हा प्रश्न अर्वाचीन संदर्भाने विचारला जातो आहे याकडे लक्ष वेधतो. ट्रॉयच्या युद्धाचा तो काळ (Late Bronze Age) असा आहे जेव्हा बहीण-भाऊदेखील पती-पत्नी असत (उदा. अ‍ॅण्ड्रॉमकीचे आई-वडील, झ्यूस नि हेरा तसंच इतर ऑलिम्पियन नि टायटन देवतांच्या पिढ्या), युद्धात यश मिळावे म्हणून अथवा देवाने मागितला म्हणून राजे स्वत:च्या पोटच्या मुलांचा बळी देत होते (अगामेम्नॉन), एखाद्या राजाच्या पत्नीचेदेखील अन्य पुरुषाकडून सहजपणे अपहरण केले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या अपहृत स्त्रियाही त्या नव्या पुरुषासोबत सहजपणे नांदत असत. काही समाजांत अतिथीला परिचर्येसाठी स्वपत्नी अर्पण करण्याचे प्रघात होते. योनिशुचितेसारख्या या अर्वाचीन संकल्पना तेव्हा फारशा प्रबळ नव्हत्या. स्त्रियांना आपल्या आयुष्यातील निर्णय आपले आपण घेता येतात, घ्यायचे असतात याची जाणीव नि त्यासाठी अनुकूल सामाजिक परिस्थिती दोनही नसलेला तो काळ आहे. अगदी निम्नदेवतासुद्धा यातून सुटलेल्या नाहीत. वर दिलेली आयोपासून युरोपापर्यंतची उदाहरण पाहाता येतील. देवतांच्या गोष्टींमध्येही स्त्रीचे राक्षसी वस्तुकरण झालेला तो काळ होता.

    त्याचप्रमाणे अगामेम्नॉनने अपहरण केलेली हेलन स्पार्टा या आपल्या घरच्या राज्यात मिनेलॉसची पत्नी म्हणून नांदली, नंतर पॅरिसने अपहरण(?) केलेली हेलन दहा वर्षे ट्रॉयची राजकन्या म्हणून वावरली नि अखेरीस ट्रॉयच्या विध्वंसानंतर ती मिनेलॉससोबत राहिली. म्हणजे ती हेतुत: पॅरिसला वश झाली नाही असे मानले, तरीही तिचे आयुष्य असे ‘नेल्या घरी सुखी राहा’ प्रकारचेच आहे. दोन्ही पतींपैकी कुणावरच तिची इतकी निष्ठा वा प्रेम नाही, की त्यासाठी ती क्लायटेम्नेस्ट्राप्रमाणे जीव घेण्यास वा प्रायमची पत्नी हेकुबाप्रमाणे जीव देण्यास वा संघर्षास सिद्ध होईल.

    परंतु हे ही मान्य केले पाहिजे की ती जोवर ट्रॉयमध्ये होती तोवर तिच्या तिथे असण्याचा ग्रीक सैन्याला फार काही फायदा झालेला नाही. युद्ध दहा वर्षे लांबले हा त्याचा सज्जड पुरावा आहे. कदाचित सिलिसियाकडे जाणारे भुयार माहित होणे हा एकच तिच्याकरवी झालेला गौप्यस्फोट असू शकतो. पण तो जवळजवळ युद्धाच्या अखेरीस आणि त्याचा निकाल निश्चित झाल्यावरच उपयुक्त ठरलेला आहे. होण्यासारखा उपयोग म्हणजे पॅरिसची पत्नी म्हणून राहात असल्याने राजकुलातील संवाद नि डावपेच याची माहिती ती पॅरिसकडून काढून घेऊ शकत होती. पण त्यानेही फार काही फरक पडला असावा असे म्हणता येत नाही.

    पण तिच्यासारखी एखादी स्त्री हेर फार मदत करु शकेल अशी स्थितीही नसावी. तत्कालिन युद्ध आजच्या युद्धांइतके डावपेच, विविध हत्यारे, संपर्क-साधने, पुरवठा मार्ग वगैरे बाजूंनी तोललेले व्यापक युद्ध नव्हते. दोन सैन्ये समोरासमोर परस्परांशी लढत नि त्यासाठी भाले, तलवारी नि धनुष्य-बाण यांसारखी प्राथमिक पातळीवरील साधने वापरत असत. अन्नसाठा वगैरे बाबत थोडीफार माहिती मिळवायची, तर ती एक राजकुलातील स्त्री असल्याने बाहेरील तपशीलांबाबत ती अनभिज्ञच राहाणार होती.


    उपसंहार

    गरीब बिचारी हेलनऐवजी (संभाव्यत:) ‘पाताळयंत्री हेलन’ असे आरोपपत्र दाखल केल्याबद्दल माझ्यावर ‘पुरुषी मानसिकतेचे डुक्कर’ (male chauvinistic pig) असा आरोप कुणी फेमिनात्झी करु शकेल. पण आम्ही आपले ‘शक्यताशास्त्री’(statistician) आहोत, ‘धूर आहे तिथे अग्नि आहेच’ असे ठाम विधान न करणारे, पण ‘शक्यता नाकारता येत नाही’ म्हणून पडताळा घेण्याच्या बाजूने उभे राहाणारे.

    आता ट्रोजन हॉर्स अर्थात ट्रॉयच्या घोड्याच्या मिथ्यकथेचा उल्लेख कानावर पडेल, तेव्हा ‘असा घोडा खरंच होता की ती एक रूपककथा आहे?’ असा – माझ्या मते वाजवी – प्रश्न डोक्यात उमटेल. हेलन ट्रोजन हॉर्स होती की झायन्थस ट्रोजन हॉर्स होता का? यांपैकी कुणीही खरोखरच ट्रॉयच्या आतून ग्रीकांना साहाय्य करत असेल, तर ट्रॉय जिंकण्यास दहा वर्षे लावणार्‍या ग्रीकांच्या संयुक्त लष्करी सामर्थ्याबद्दल काय म्हणावे? ट्रॉयमार्गे आशिया मायनर नि अधिक पूर्वेकडे सत्ताविस्तार करण्याची अगामेम्नॉनची महत्त्वाकांक्षा फुगलेल्या बेडकाची म्हणायची का? असे अनेक प्रश्न शिल्लक राहातात.

    अधिकृत असे एक कथानक नसल्याने त्यांची ठोस उत्तरे देणे अवघड आहे. किंबहुना ‘अशा बहुपर्यायी कथानकांतून शक्यतांची ही भेळच काय ती समोर येते. ‘अमुक खरं, नि तमुक खोटं’ म्हणत त्यातील कुरमुरे, दाणे, फरसाण नि हिरवी चटणी वगैरे वेगळी वेगळी करून खाण्यात शहाणपण नसते’ हेच पदरी बांधून घ्यावे असे सत्य आहे, असे मी मानतो. त्यातील एखाद्या घटकाचे प्रमाण कमी अथवा जास्त केले की चवीमध्ये कसा बदल होतो याचा पडताळा घेण्यात जी मौज असते, ती त्या घटकांचे वजन वा संख्येचे बिनचूक मोजमाप करण्यात नसते.

    या मुख्य कथानकाला चिकटलेली असंख्य पूर्वरंगसदृश कथानके, त्यांच्यातील पाठभेद आणि आजच्या नैतिकतेच्या कल्पनांना हादरवून टाकणारे त्यांतले तपशीलही सहजी विसरता न येण्याजोगे असतात. यातील काही कथानकांची प्रतिबिंबे भारतीय महाकाव्यांमध्येही दिसतात. त्यातील काहींचा उहापोह पुढच्या नि अखेरच्या भागात केला आहे.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » मिथ्यकथांची प्रतिबिंबे

    टीपा :

    (१). नवव्या शतकामध्ये रोम जिंकण्याच्या ईर्षेने निघालेली– परंतु चुकून ल्यूना या इट्रस्कन (आजचा मध्य-इटलीचा भाग) शहराच्या वेशीवर पोहोचलेली व्हायकिंग सेना त्या शहराला ताब्यात घेण्यासाठी याच तंत्राचा वापर करते. हेस्टिन हा त्यांचा मार्गदर्शक मरणासन्न असल्याची बतावणी करतो. ‘मरणापूर्वी त्याला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, जेणेकरुन त्याची मरणोत्तर उत्तरक्रिया यथासांग ख्रिस्ती पद्धतीने पार पाडता येईल’ अशी बतावणी करुन नगरात प्रवेश देण्याची विनंती केली जाते. मोजक्या नि:शस्त्र सहकार्‍यांसह त्याला शहरात नि चर्चमध्ये प्रवेश मिळून बाप्तिस्मा दिला जातो. दोनच दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करुन अंतिम प्रार्थनेसाठी (mass) त्याची शवपेटी पुन्हा चर्चमध्ये आणली जाते.

    चर्चमध्ये पोहोचताच शवपेटी उघडून सशस्त्र हेस्टिन बाहेर पडतो. त्याचे सोबतीही कपड्यांच्या आत लपवलेली शस्त्रे बाहेर काढतात नि आसपासच्या लोकांवर तुटून पडतात. हे मोजके सैनिक नगरद्वार उघडून आधीच सज्ज असलेल्या इतर सैन्याला आत घेतात नि ल्यूनाचा पराभव निश्चित होतो. त्याही पूर्वी नॉर्मन टोळ्यांनी असाच खोट्या मृत्युसोहळ्याचा वापर करुन फ्रान्समधील अक्वितेन येथील धर्मस्थळ लुटल्याचा उल्लेखही सापडतो. [↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: