Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६

नेकी कर और गटर में डाल

  • Thumbnail

    साठ-सत्तर वर्षांपूर्वी पु. ग. सहस्रबुद्धें यांनी ‘नरोटीची उपासना’ या शीर्षकाचा एक सुरेख लेख लिहिला होता. त्याचा followup म्हणून मी त्याच शीर्षकाचा एक लेख (बरं, पोस्ट म्हणू या, ओके?) एका मराठी संस्थळावर लिहिला होता. एखाद्या सार्थ परंपरेचे बुद्धिहीन कर्मकांडांत रूपांतर होते याची काही उदाहरणे त्यामध्ये दिली होती. यात एक उदाहरण होते निर्माल्य नदीत विसर्जन करण्याच्या प्रघाताचे. नद्यांची सद्यस्थिती पाहाता तो कालबाह्यच नव्हे तर उलट मूळ हेतूला मारकच असल्याचे प्रतिपादन मी केले होते.

    त्यावर एक जाज्ज्वल्य तरुण तडफदार विद्वान उगवले नि ‘हिंदूच्याच...’ वगैरे टँ: टँ: करणारी नेहेमीची टेप वाजवून झाल्यावर ‘मी भविष्यात ही नदी साफ करेन असा निश्चय करुन मी निर्माल्य नदीत टाकतो.’ अशी गर्जना त्यांनी केली होती. आज त्याला वीसहून अधिक वर्षे होऊन गेली. या विद्वानांनी नदी स्वच्छ करण्यासाठी काही केल्याचे ऐकिवात नाही.

    आज ही आठवण झाली ती बिट्टू तबाही या तरुणामुळे. ‘मी नदी स्वच्छ करेन’ वगैरे गमजा समाजमाध्यमांवर मारत बसण्याऐवजी त्याने थेट कामाला सुरुवात केली. काही महिने खपून त्याने अजनेर नदी स्वच्छ केली. यातून देशभरात आणखी काही तरुणांना प्रेरणा मिळाली नि विविध शहरांतून अशीच मोहिम हाती घेतली गेली.

    बिट्टू बिचारा तरुण आहे. त्याला सेनापती बापटांचा किस्सा माहित नसावा. त्यामुळे ‘आपण स्वत: आधी काम केले की लोकांनाही पटेल नि ते स्वत:हून काळजी घेतील.’ असा- या समाजाच्या मानसिकतेचा, संस्कार-वारशाचा विचार करता बावळट- समज त्याचा होता. इथल्या समाजाने त्याची ही हौस चांगली जिरवली. त्याने नदी साफ केल्यानंतर लवकरच नव्या कचर्‍याने ती भरून टाकली. हा कचरा बव्हंशी निर्माल्याचा होता. बिट्टू हार मानणारा नव्हता. त्याने लोक यायच्या-जायच्या वाटेचा विचार करुन योग्य ठिकाणी दोन कचरापेट्या स्वखर्चाने ठेवून दिल्या... चोवीस तासांत त्यातील एक चोरीला गेली!

    ’उत्सवाची वर्गणी मागणारे वेळेला धावून येतात, लोकांची कामे करतात’ वगैरे भेकड तर्क देणारे (यात वर उल्लेख केलेले विद्वानही आहेत) ‘बाकीची कामे राहू द्या हो, हंडीनंतर, उत्सवानंतर जो रस्त्यावर कचरा सोडून जातात तो का साफ करत नाहीत? गणेश विसर्जनानंतर विद्रूप, विरुप झालेल्या मूर्ती नदी नामक गटारात केविलवाण्या पडलेल्या दिसतात, त्यांची सन्मानाने विल्हेवाट लावण्याचे काम का करत नाहीत? ज्या श्रद्धेच्या आड लपून ते उतमात घालतात किमान त्या श्रद्धेचे पावित्र्य जपण्याची काळजी का घेत नाहीत?’ या प्रश्नांची ‘हिंमत असेल तर...’ या नेहमीच्या रडक्या, निरर्थक प्रत्युत्तराने मुस्कटदाबी करतात.

    आज नदी कचर्‍याने पुन्हा भरून गेली आहे. हताश झालेला बिट्टू आता हे समाजसेवेच्या लष्करच्या भाकरी भाजण्याचे काम सोडून आपल्या शिक्षणावर लक्ष करण्याचा निर्णय घेतो आहे. दोन ते तीन वेळा हजारो कोटींचा चुराडा करुनही गंगा मैलीच आहे. कारण ती मैली होण्याचे कारण त्यात कचरा टाकणारी श्रद्धा आहे, तिला अटकाव केल्याखेरीज कोणतीही नदी स्वच्छ नि प्रवाही राहूच शकणार नाही हे सामान्यांना समजत नाही. गंगाशुद्धिकरणाबरोबरच तिचे नव्याने अशुद्धीकरण होऊ नये यासाठी प्रबोधन करण्याच्या फंदात आपले सरकार कधीच पडत नाही. त्याचे बजेट योजनेच्या प्रचार-प्रसाराच्या ढोल-ताशांवरच खर्च होऊन जाते.

    नदी अस्वच्छ होते ती श्रद्धेचा कचरा त्यात साठतो म्हणून आणि माणसांना त्याची फिकीर नसते कारण त्यांच्या मेंदूत उथळ संस्कारांचा कचरा तुंबलेला असतो म्हणून... हे मान्य करण्याची गरज आहे. पण अस्मितेची मूळव्याध ही ‘देवकृपेने आलेले शेपूट’ समजून तिला हळद-कुंकू वाहात बसलेल्या समाजात ही जागृती कधी होईल असे मला वाटत नाही.

    याखेरीज त्यांना मिळालेले संस्कार, तो वारसा हा वर्तमान, भविष्य आणि भौतिकाकडे पाठ फिरवून, कल्याणकारी मानवी मूल्यांपेक्षा अतिशय संकुचित कल्पित, वांझोट्या विश्वात जगण्यास भाग पाडणारा आहे. सारासार विवेकबुद्धी मिळाली असलीच तर फार लहानपणी संस्कार नावाच्या ब्रेन-वॉशिंगमार्फत तिचे निर्माल्य गटारगंगेत वाहवणारा आहे.

    बिट्टू, तू मूर्ख आहेस. घाणीत लोळत ‘आमची घाण प्राचीन नि त्यांच्यापेक्षा आमचा चिखल मुलायम’ म्हणत विष्ठा चिवडत बसलेल्या डुकरांना घाणीतून बाहेर काढण्याचा आटापिटा करत आपला वेळ नि ऊर्जा वाया घालवायचा नसतो. त्या घाणीपासून स्वत:चा बचाव करण्याकडे लक्ष केंद्रित करायचे असते.

    काही वर्षांपूर्वी 'Futurama' नावाच्या मालिकेत पाहिलेला Cold Warriors हा भाग आठवतो. फार पूर्वी संपूर्ण निर्मूलन केले गेले असल्याने जिच्याविरुद्ध लढण्यास तत्कालीन माणसांच्या शरीरात ant-bodies अस्तित्वात नाहीत, अशा साध्या सर्दीच्या (common cold) शिरकावाने ३१व्या शतकातील जनतेमध्ये कसा हाहाकार उडतो याचे त्यात चित्रण होते. आजही ही सर्दी प्रत्येकाच्या शरीरात कमी-अधिक प्रमाणात तग धरून असते; प्रदूषणयुक्त शहरी जीवनात तर ती ठाणच मांडून बसलेली आहे. इतर अनेक आजारांचे माणसाने जवळजवळ संपूर्ण निर्मूलन केले आहे, परंतु वरकरणी निरुपद्रवी वाटणारी ही सर्दी एखाद्या झुरळासाठी तग धरून आहे. श्रद्धेचेही तसेच आहे.

    कावीळ झालेल्या माणसाला जसे सारे जग पिवळे दिसू लागते– किंवा एखादे अंमली द्रव्य घेतल्यावर माणसाला जसे स्वत:मध्ये नसलेल्या शारीर, बौद्धिक बलाचा वा गुणांचा भ्रम होतो तसेच श्रद्धेचेही. तिची मात्रा अधिक झाली की प्रदूषण, विध्वंसही रंगीत चित्रपटासारखे आकर्षक दिसू लागतात. ज्या आवाजाने कुणाची हृदयक्रिया बंद पडू शकते, त्या आवाजामध्ये त्यांना गानकोकिळेचा मधुर आवाज ऐकू येऊ लागतो. आपल्या श्रद्धेखातर इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणे समर्थनीय आहे असे त्यांना वाटू लागते. नशेत धुंद असलेल्यांना जसे आपल्या शोचनीय स्थितीचे भान राहात नाही तसेच अति-श्रद्धेचे होते.

    एकुणात सर्दीसारखाच श्रद्धा हा माणसाच्या जगातील सर्वात चिवट नि व्यापक असा संसर्गजन्य आजार आहे. विध्वंस-विकासाच्या मानवी लालसेतून जगली वाचली तर मानवी जमात, आणि पृथ्वीवरील इतर सजीव-सृष्टीला पुढील हजारो वर्षे तो ‘फ्युचुरामा’मधील न्यू-न्यूयॉर्कप्रमाणेच बाधित करत राहाणार आहे.

    -oOo-

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - परिशिष्ट : ‘पदार्पण’ - एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध)

  • « पूर्वार्ध


    नवे जीवशास्त्र (?)

    आजच्या जीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये एखाद्या झाडाची प्रजाती, वर्गीकरण निश्चिती ही अनेक निकषांवर होते. (सध्या त्यातील शैवाल, कवक, वेली वगैरे इतर प्रकार सोडून केवळ वृक्ष या एकाच प्रकाराचा विचार इथे करत आहोत.) यातील विविध प्रजाती निश्चिती वा विभागणीसाठी पानांचा आकार, रंग, पोत (texture), खोडांचे म्हणजे सालीचे स्वरूप, मुळांचा प्रकार (सोटमूळ, तंतुमुळे वगैरे), फुलांचा प्रकार-आकार नि विस्तार, पुनरुत्पादनाची पद्धत (बीजोत्पादन, माध्यम, वगैरे) असे बरेच निकष वापरले जातात. पण एक नक्की की मूळ, खोड (अधिक फांद्या), पाने, फुले, फळे, बीज यांच्या एकत्रित समूहाला एक नाव दिले जाते.

    काही मुंग्या आपल्या वारूळामध्ये aphids म्हणजे आपल्याकडील मावा किड्याच्या जातीचे कीटक आपल्या वारुळामध्ये पाळतात. त्यांना आवश्यक खाद्य त्या बाहेरून आणून पुरवतात नि त्याबदल्यात त्या कीटकांच्या शरीरातून स्रवणारा दुधासारखा पांढरा स्राव सेवन करतात. कीटकांना वारुळाची सुरक्षितता मिळते नि मुंग्यांना हवे असणारे खाद्य. आता वृक्षसृष्टीमध्ये मूळ, खोड नि पाने यांच्यामध्येही अशीच विनिमयाची व्यवस्था उभी राहिल्यावर, स्वतंत्र झालेली मुळे नि पाने त्यांच्यातील (खोडामार्फत) होणारी देवाणघेवाण हा असाच जातिबाह्य सहकार म्हणता येईल. जर मुंग्या नि मावा कीटक या स्वतंत्र प्रजाती असतील, तर मुळे नि पाने यांनाही स्वतंत्र जीवांचा दर्जा मिळायला हवा. मग कदाचित जीवशास्त्राला यांच्या वर्गीकरणाचा, अभ्यास-चौकटीचा नव्याने विचार करावा लागेल. पण यात एक अडचणीचा मुद्दा आहे, आणि तो आहे पुनरुत्पादनाचा!

    RootsOnly
    https://thumbs.dreamstime.com/ येथून साभार.

    एखादा जीव हा बहुधा प्रजाती म्हणून वेगळा ओळखला जातो, तो आपल्यासारख्याच जिवाचे पुनरुत्पादन करणारा असतो. मानवाला त्याचीच प्रतिकृती असणारे मूल होते, मुंग्यांच्या अंड्यांतून पूर्ण मुंगीच बाहेर येते, हरणाचे पाडस हरणासारखे असते आणि गायीच्या पाडसालाही जन्मत: नसली तरी यथावकाश शिंगे उगवत असतात. आजच्या जगातील वृक्षसृष्टीतही एका वृक्षाची बीजे रुजताच त्याच जातीचे मूळ,खोड,पाने युक्त असे संपूर्ण झाडच उभे होते. त्या वृक्षाच्या या तीनही उपांगांच्या शक्यता त्या एका बीजामध्येच एकवटलेल्या असतात.

    या निकषावर पाहिले तर मूळ नि पाने ही उपांगे स्वतंत्र जीव म्हणवण्यास पात्र ठरत नाहीत. ‘पदार्पण’ कथेमध्ये विस्ताराने उल्लेख नसला, तरी या संपूर्ण व्यवस्थेचे पुनरुत्पादन पक्ष्यांसदृश स्थलांतर करणार्‍या बीजांपासून होते असा उल्लेख येतो. म्हणजे या बीजांपासून खोडाची निर्मिती होते नि त्यानंतर इतर उपांगे निर्माण होतात असे गृहित धरावे लागते. याचा अर्थ या वृक्षाच्या जीवनप्रवासात पुढे कधीतरी ही उपांगे खोडापासून सुटी होतात.

    आजच्या निसर्गात प्राण्यांची, पक्ष्यांची, काही कीटकांची पुढची पिढीही सुरुवातीचा काही काळ जन्मदात्यांसोबत काढून पुढे स्वतंत्र आयुष्य जगू लागते. त्यांच्याशी तुलना करता ही दोघे मूळ खोडाची पुढची पिढी म्हणावी का? परंतु तसे म्हणण्यासाठी ती गुणवैशिष्ट्यांनुसार आपल्या जन्मदात्यासारखी असायला हवी होती. तशी ती नाहीत. म्हणजे या व्यवस्थेमध्ये प्रजाती-निश्चितीसाठी एका एककाची, एका जीवाची व्याख्या करावी कशी हाच पहिला पेच उभा राहातो आहे.

    कथेचा परिघ सोडून विचार केला, तर यांच्यासाठी पुनरुत्पादनाच्या अन्य काही शक्यता असू शकतात. यासाठी सद्य जीवसृष्टीतील अनेकविध पर्याय पाहाता येतील. कांदा जमिनीत रुजवला तर स्वत:ला विसर्जित करून तो नवी तंतुमुळे, नवी हिरवी पात जन्माला घालतो. गाजरापासून - जे मूळ आहे - जिथे पाने अंकुरतात तेथील एक लहानशी चकतीच काढून पाण्यात वा मातीत ठेवली असता त्यातून नव्या पानांचा संभव होतो. काही झाडांच्या फांद्या जमिनीत खोचल्या असता त्यातून नवी मुळे आणि म्हणून नव्या वृक्षाची उभारणी होते.

    भटक्या मुळांसाठी गाजराची, तर खोडासाठी गुलाबाची वा ऊसाची पुनरुत्पादन पद्धत सयुक्तिक दिसते. परंतु पानांबाबत पेच राहातो. मुळे नि खोड आजच्या जीवसृष्टीतही मातीशी बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांची त्यातील पुनरुत्पादनाची पद्धतच वापरली जाऊ शकते. परंतु पानांची मातीशी नाळ जुळलेली नाही. त्यामुळे त्यांचे पुनरुत्पादन हे झाडातून फूल वा फळ उगवावे तसे व्हावे लागेल. कदाचित इथे एकपेशीय जिवाचे पुनरुत्पादन पुन्हा उदयाला येऊ शकते. काही वेलींच्या पानाच्या देठापाशीच मुळांसारखे तंतू फुटलेले असतात. त्याच धर्तीवर पानांमधून काही द्रव्य वेगळे होत नव्या पानाची निर्मिती होऊ शकेल. एक अधोरेखित करण्याची बाब म्हणजे अशा व्यवस्थेमध्ये या तीनही जिवांचे पुनरुत्पादन हे ‘अलैंगिक’ पुनरुत्पादनामध्ये रूपांतरित होते आहे. जीवद्रव्याच्या विभागणीतून अथवा त्याचे प्रथम उपांग म्हणून त्यातूनच नव्या जीवाचा संभव (germination) होतो आहे.


    जुनी व्यवस्था, नवे जीव

    या कल्पनाविस्ताराच्या प्रवाहाचा संगम वर्तमान व्यवस्थेशी झाला तर मध्ये काय नि कसे बदल होतील या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी दोन उद्दिष्टे समोर आहेत. यापैकी पहिले– ‘पदार्पण’मधील ग्रहाप्रमाणे अभावाच्या परिस्थिती अथवा भूभागामध्ये जीवसृष्टीच्या विकासाला यामुळे कितपत मदत होईल? आणि दुसरे, यामुळे वर्तमान जीवसृष्टीमध्ये काय बदल घडू शकतील? शक्यतांचा प्रवाह बराच मोठा असणार हे उघड आहे. तेव्हा दोन्ही उद्दिष्टांमध्येही प्रत्येकी एकच उदाहरण घेऊन विस्तार केला आहे.

    पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात दीर्घ हिवाळा नि दीर्घ उन्हाळ्याचे ऋतू असतात. हिवाळ्याच्या काळामध्ये इथे वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने त्या तगून राहाणे शक्य नाही. त्यामुळे या प्रदेशांतील वनस्पतीसृष्टीमध्ये जगातील जीवसाखळीचे मूळ असलेले फायटोक्लँक्टन आणि मोजक्या शैवालवर्गीय वनस्पतींचा समावेश होतो. मोठ्या वृक्षांना सोडा, वेलींनाही आवश्यक इतका जीवनरस निर्माण व्हावा यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश इथे उपलब्ध नसतो. फायटोक्लँक्टन हे देखील तरंगते जीव असतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते स्थलांतर करतात. पण त्यामागे कुठलीही प्रेरणा असत नाही. कॅरिबूसारख्या अति-उत्तरेकडील प्रदेशांत आढळणार्‍या प्रजाती, अनेक पक्षी हे हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे– म्हणजे अधिक उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करतात. ध्रुवीय अस्वलेही हिवाळ्यापूर्वी भरपूर खाऊन घेऊन चरबीच्या स्वरूपात ते साठवून ठेवतात. त्यानंतर हिवाळ्यात ते दीर्घ झोप घेऊन ऊर्जेची गरज किमान पातळीवर आणून ठेवतात.

    LeavesOnTheGround
    https://www.idyl.co.in/ येथून साभार.

    आता ‘उपांगांचे सहजीवन’ स्वरूपातील वृक्षाचा विचार केला तर, त्याची पाने सहेतुकपणे पाण्यावरुन प्रवास करून सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशाकडे स्थलांतर करु शकतील– ‘पदार्पण’मधील पाने करतात तसे. त्यासाठी त्यामध्ये इतर बदल व्हावे लागतील. आता या ध्रुवीय उपांग-जीवी वृक्षाच्या पानांनाही पुरेसे पाणी पोटात घेऊन हिवाळ्यात प्रकाशाच्या दिशेने स्थलांतर करावे लागेल.

    या काळात (आफ्रिकेसारख्या वृत्तीय प्रदेशात) राहून प्रकाश-संश्लेषणाद्वारे जीवनरस निर्मितीचे आपले काम चालू ठेवावे लागेल. हा जीवनरस थेट खोडांकडे जाण्याची सोय नसल्याने त्याला सोयीच्या अशा (चरबीसदृश) कोषांमध्ये साठवत न्यावे लागेल. आणि हिवाळा संपता-संपता पुन्हा ध्रुवीय प्रदेशाकडे स्थलांतर करुन हे जीवनरसाचे कोष तेथील खोडामध्ये रिते करून मोकळे व्हावे लागेल. हे करत असताना खोडाकडून आवश्यक तो पाण्याचा वाटा स्वीकारावा लागेल. (कदाचित जीवनरसाचे रिकामे कोषच आता या साठवणुकीस उपयोगी पडू शकतील.)

    हिवाळ्यापूर्वी चरबीने सुजलेली अस्वले हिवाळी झोपेतून बाहेर येईतो सारी चरबी झडून गेल्याने हाडाडलेली असतात. या पानांबाबत नि खोडाबाबतही तसेच काहीसे होईल. दोघांकडचा हिवाळी साठा तेवढा वेग-वेगळ्या रसद्रव्याचा असेल. खोडाला पानांनी दिलेला जीवनरस साठवून ठेवावा लागेल; तर प्रकाशाच्या दिशेने जाणार्‍या पानांना, मुळांनी खोडामार्फत दिलेला पाण्याचा साठा सोबत ठेवावा लागेल.


    नवे जीव, जुने जीव

    वनस्पती हे स्थानबद्ध, दुर्बळ जीव आहेत या गृहितकावर माणूस जगत आला आहे. आपल्याला हवे तेव्हा त्यांचे निर्दालन करून त्यापासून अन्न, ऊर्जा आणि दैनंदिन उपभोगाच्या अनेक वस्तूंची निर्मिती तो करत आला आहे. त्या जिवांना एक प्रकारे आपले गुलाम समजत आलेला आहे. परंतु सहजीवी वृक्षसृष्टीचा उदय झाला तर त्याने काय परिणाम असू शकतील याचा विचार केला तर परिस्थिती पालटलेली दिसू शकेल.

    जिथून या कल्पनाविस्ताराची सुरुवात झाली त्या ‘पदार्पण’ कथेमध्येच याची चुणूक सापडते. या सहजीवी वृक्षाच्या प्रदेशामध्ये उतरलेली एक वैज्ञानिक अचानक कोसळते. तिला एका हिरव्या मुळाने घट्ट पकडून ठेवलेले असते. इतर सोबती तिची सोडवणूक करण्यास धावतात. त्या धांदलीत एकाकडील पाण्याचा साठा जमिनीवर सांडतो. ते मूळ तातडीने तिला सोडून त्या पाण्याकडे धावते नि तिची सुटका होते.

    असे का घडले याचा विचार केला, तर ध्यानात येईल की माणसाच्या शरीरामध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक भाग हा पाण्याचा असतो. मुळांचे कार्य पाणी शोषून घेण्याचे आहे. आजच्या जीवसृष्टीमध्ये वनस्पतींची मुळे जमिनीत असल्याने ती त्यात मुरलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. या उत्क्रांत वृक्षाची मुळे आता जमिनीवर फिरू लागल्याने त्यांच्या पाण्याच्या स्रोतांमध्येही बदल होऊ शकतो. ‘पाण्याचा हुकमी साठा’ म्हणून एखाद्या जिवंत प्राण्याकडेही ती आकर्षित होऊ शकतात…‘अन्नाचा हुकमी साठा’ म्हणून एखादा शिकारी प्राणी एखाद्या भक्ष्य प्राण्याकडे होतो तसा! ही मुळेही लहानसहान प्राण्यांची ‘शिकार’ करून त्यातील पाणी शोषून घेण्याची क्षमता विकसित करु शकतात.

    आजवर वनस्पतीसृष्टी ही बव्हंशी भक्ष्य नि प्राणी हे भक्षक अशी व्यवस्थाच आपण पाहात आलो आहोत. या नव्या जीवाच्या उदयानंतर सामना असा एकतर्फी राहाणार नाही! त्या वैज्ञानिकाप्रमाणेच माणसेही या धोक्याच्या कक्षेत आलेली असतील.

    - oOo -

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - परिशिष्ट : ‘पदार्पण’ - एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)

  • विज्ञान-काल्पनिका प्रकारातील ‘प्लरिबस’ या मालिकेचा पहिला टप्पा नुकताच पाहाण्यात आला. ‘एका नेमक्या क्षणी पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एका समूह-मनाच्या समाजामध्ये अथवा जीवामध्ये परिवर्तित होते’ अशी कल्पना आधारभूत धरून त्याभोवती तिचे कथानक उभे राहिले आहे. पूर्वाश्रमींच्या मानवी प्राण्यांमध्ये आता सामूहिक मन प्रस्थापित झाल्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज म्हणजे एक व्यापक जीव आणि ही पूर्वाश्रमीची माणसे त्याची स्वतंत्रपणे वावरणारी उपांगे अशी व्यवस्था आकाराला येते आहे.

    एक जीव नि त्याची चल (roaming) उपांगे ही व्यवस्था पाहाताना काही वर्षांपूर्वी वाचलेल्या ‘पदार्पण’ या सुबोध जावडेकर यांच्या विज्ञानकथेची (कथासंग्रह: ‘वामनाचे चौथे पाऊल’) आठवण झाली. ‘प्लरिबस’मध्ये एका जगद्व्यापी समूह-मनाच्या व्यवस्थेतून बाहेर राहिलेल्या तेरा जणांच्या त्या समूह-जीवाशी निर्माण झालेला परस्पर-संबंध, सहकार नि संघर्ष याभोवती कथानक उभे राहाते आहे. तर ‘पदार्पण’मध्ये अशाच उपांगजीवी वृक्ष-जीवाच्या संदर्भात नवी शक्यता मांडली आहे. ‘प्लरिबस’मध्ये समूह-मनाची संकल्पना प्राणिसृष्टीमध्ये रुजलेली आहे, तर ‘पदार्पण’मध्ये वनस्पतीसृष्टीमध्ये. दोनही कथानकांची पार्श्वभूमी वेगळी असली तरी पूर्वसूत्र बव्हंशी एकच आहे.

    परंतु दोहोंमधील बदलाच्या दिशेतील फरकही ध्यानात घ्यायला हवा. ‘प्लरिबस’मध्ये स्वतंत्र जीवांचे संमीलन (Confluence) होऊन व्यापक पण उपांगजीवी सजीवाची निर्मिती होते आहे. तर या उलट आजच्या जीवसृष्टीच्या संदर्भात पाहिले तर ‘पदार्पण’मध्ये एका सजीवाचा विग्रह होऊन विलग झालेली त्याची उपांगे स्वतंत्रपणे कार्यरत झालेली आहेत.

    मनुष्यप्राण्याच्या सामाजिक इतिहासामध्ये समूह-मनाची नसली, तरी समूह-जीवनाची विविध व्यवस्था-प्रारूपे सापडत असल्याने, त्यांचा मागोवा घेत ‘प्लरिबस’च्या निमित्ताने एक दीर्घ मालिका इथे नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. वनस्पतीसृष्टीमध्येही भिन्न जातीय जीवांच्या सह-जीवनाची, परस्पर-सहकार्याची अनेक उदाहरणे सापडतात. परंतु एकाच प्रजातीमधील भिन्न जिवांच्या सहजीवनाची उदाहरणे दुर्मीळ आहेत. त्यामुळे या क्षेत्रात ‘प्लरिबस’वरील मालिकेप्रमाणे दीर्घ उहापोह करणे शक्य नसले, तरी या दीर्घ लेखामधून ‘पदार्पण’मधील कल्पनेचा वेध घेऊन व्यापक शक्यता उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या मालिकेचे परिशिष्ट म्हणून या लेखाकडे पाहाता येईल.


    सहजीवी

    मधमाश्यांसारखे, मुंग्यांसारखे सहजीवी कीटक आपल्या समाजामध्ये, वसतीमध्ये नेमक्या कार्यविभागणीचे नियोजन करत असतात. पुनरुत्पादनाचा एकाधिकार नि जबाबदारी असणारी राणी माशी वा मुंगी, पुनरुत्पादनात सहभागी असणारे मोजके नर, आणि त्या तुलनेत बर्‍याच अधिक संख्येने असणारे कामकरी नि लढाऊ कामगार अशी विभागणी पोळ्यांमध्ये किंवा वारूळांमधून दिसते. मानवी समाजाने ही संकल्पना कैकपट विस्तारत प्रगतीच्या अनेक वाटा पादाक्रांत केल्या आहेत.

    हे सारेच समूहजीवी जीव आहार मिळवण्यासाठी भ्रमंती करतात. त्यांचे वसतीस्थान हे केवळ विश्रांतीस्थळ असते… काहींचे ते ही निश्चित नसते. या सजीवांच्या वसतीस्थानाच्या आसपास अभावाची परिस्थिती निर्माण झाली, तर ही भ्रमंती स्थलांतरामध्येही परिवर्तित होत असते. मानवी समूहामध्येही प्रशासन जरी स्थिर असले तरी इतर उपांगे– म्हणजे माणसे चल (moving) असतात. जशी गरज निर्माण होईल तसे, जिथे ती भागवता येईल, आवश्यक गोष्टी जिथे उपलब्ध असतील, तिकडे जाऊन ते आपली कार्ये पार पाडत असतात.

    वनस्पतीसृष्टी याला अपवाद आहे. तिला हा पर्याय उपलब्ध नाही! कारण त्यातील जीव अचल, स्थानबद्ध आहेत. ते ज्या स्थानी रुजले आहे तिथेच त्यांना पाणी, सूर्यप्रकाश वा आवश्यक जीवनद्रव्ये पुरेशी मिळाली नाहीत, तर त्यांचे अस्तित्व खुरटे होते वा संपून जाते.


    पदार्पण

    परंतु त्यातील वृक्षवर्गाचा विचार केला तर वृक्षाची उपांगे– म्हणजे मूळ, खोड, पाने, बीजे यांची कार्येही निश्चित आहेत. मुळांनी पाणी शोषून आणावे, पानांनी प्रकाश-संश्लेषणाचा वापर करुन सर्व उपांगांना आवश्यक असणारा जीवनरस निर्माण करावा, बियांनी नव्या जीवनिर्मितीच्या शक्यता निर्माण कराव्यात आणि खोडाने या सार्‍यांना एकत्र राखणारी प्रशासन व्यवस्था म्हणून काम करावे, असे एकुण नियोजन आहे. त्याअर्थी एक वृक्ष एखाद्या पोळ्यासारखा, वारूळासारखा वा मानवी समुदायासारखाच आहे असे म्हणता येईल.

    ‘मधमाश्या, मुंग्या अथवा माणसे या त्या-त्या समाजाच्या उपांगांप्रमाणेच झाडाची मुळे, पाने आदी उपांगेही चल आहेत नि परस्परांशी केवळ गरजेनुसारच जोडली जातात’ या कल्पनेच्या पायावर ‘पदार्पण’ ही कथा उभी आहे.

    इथे पुरा वृक्ष स्थानबद्ध नाही, त्याचे एकटे खोडच तेवढे जमिनीला बांधलेले आहे. परंतु पाणी जमा करण्याचे काम करणारी मुळे, प्रकाश-संश्लेषणातून अन्न निर्माण करणारी पाने मुक्तपणे अनुक्रमे पाणी नि प्रकाशाच्या शोधात फिरु शकतात. जिथे खोड उभे आहे तिथे आवश्यक प्रमाणात प्रकाश, पाणी उपलब्ध नसेल, तर चल असणारी मुळे नि पाने ते उपलब्ध असलेल्या भूमीच्या दिशेने प्रवास करु शकतात. तिथे त्या त्या गरजेची पूर्ती करुन परत येऊ शकतात नि खोडामार्फत त्या दोहोंची देवाणघेवाण पुरी करू शकतात. अभावाच्या परिस्थितीत त्यांच्या चल असण्याचा फायदा मिळून वृक्ष खुरटण्याची वा वठण्याची संभाव्यता कैकपट कमी होते आहे.

    खोडाचे काम पानांकडून मिळणारा जीवनरस नि मुळांकडून उपलब्ध होणारे पाणी एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे (आणि आपल्या अस्तित्वासाठी या दोहोंतला वाटा राखून ठेवण्याचे) काम हे मध्यस्थासारखे आहे. फिरत्या मुळांना नि पानांना परतून येण्यासाठी नेमका ‘पत्ता’ सापडावा यासाठी खोडाला नेमक्या ठिकाणी स्थानबद्ध राहाणे आवश्यक ठरते आहे.

    आता मुळे स्वतंत्र झाली नि प्रवासही करु लागल्यामुळे ती जमिनीच्या वरही आली. त्याचा अधिकचा फायदा असा झाला की त्यांना केवळ जमिनीतील थेंबभर पाण्यावर अवलंबून राहाण्याची गरज उरली नाही. त्याहून मुबलक पाण्याचे साठेही त्यांना शोधणे शक्य झाले. किंबहुना कथेतील ग्रहावर मुळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यानेच उत्क्रांतीच्या प्रवाहात अशा प्रकारची ‘उपांगजीवी’ वृक्षाची व्यवस्था विकसित झाली वा असलेली टिकून राहिली असावी. परंतु त्या दुर्भिक्ष्याचा परिणाम म्हणून पाण्याचा अंश सापडताच ती अतिशयक आक्रमकपणे तो शोषून घेण्याचा प्रयत्न करत असतात. उत्क्रांतिच्या ‘नैसर्गिक निवडीच्या’ (Natural Selection) नियमानुसार जी मुळे तशी आक्रमक होती, त्या वृक्षांचा वंशच त्या अभावाच्या जगात टिकून राहिला असावा.

    पण उत्क्रांतिमध्ये केवळ टिकून राहाणे पुरेसे नाही, वंशविस्ताराचा संभवही आवश्यक असतो. कथेचा निरास या वंशविस्ताराची एक धक्कादायक शक्यता उभी करतो. ‘पदार्पण’ ही कथा असल्याने त्यात कथन होते नि एक निरासही. परंतु निव्वळ त्या कल्पनेवर न थांबता त्या स्वरूपातील सजीवाचे अस्तित्व आजच्या जीवसृष्टीमध्ये संभव आहे का, असल्यास त्या जीवाच्या– आता जीव-समूहाच्या म्हटले पाहिजे– अस्तित्वामुळे एकुण जीवसृष्टीमध्ये काय फरक पडेल, आपले आकलन कसे बदलेल, याचा विचार करणे रोचक ठरेल.


    एक कल्पनाविस्तार

    वृक्षांची उपांगे वेगळी झाली आणि आपली कामे साध्य करण्यासाठी स्थलांतरही करू लागली. मूळ पाण्याच्या शोधात हिंडणार, जिथे पाणी मिळेल तिथून ते शोषून घेणार; साठा पुरेसा झाला की परत येऊन खोडाशी विनिमय करून पाणी देऊन त्याकडून जीवनरस अथवा ऊर्जा प्राप्त करणार. असाच विनिमय व्यवहार पानेही करणार. खोडाचे काम साधारणत: बँकेसारखे– दोन्हींचा साठा नि विनिमय करण्याचे.

    आता पुढचा टप्पा म्हणजे या एकास-एक विनिमयाचा विस्तार करुन मानवाने निर्माण केलेल्या व्यापारव्यवस्थेप्रमाणेच व्यापक विनिमय व्यवस्था झाडांमध्येही निर्माण होऊ शकेल. मूळ एकदा सुटे झाले की ते स्वतंत्रही होऊ शकेल. त्याला एका विशिष्ट वृक्षाला बांधील राहाण्याची गरज नाही. माणूस जसा परगावी असताना एखाद्या परक्या घरात वा होटेलमध्ये आसरा घेतो, तसेच जीवनरसाची पातळी घसरली तर ते मूळ दूर असलेल्या आपल्या खोडाऐवजी जवळच्याच एखाद्या सजातीय वृक्षाच्या खोडाशी देवाणघेवाण पुरे करून आपली गरज भागवू शकेल.

    आणखी एक पाऊल पुढे म्हणजे खोडही सजातीय वृक्षाचे असायची गरज नाही. रासायनिक प्रक्रियेमध्ये ‘संयुजा’ (valency) म्हणजे संयोग-क्षमता हा कळीचा मुद्दा असतो. इलेक्ट्रॉन देऊन व घेऊन आपली कक्षा पुरी करु पाहाणार्‍या दोन मूलद्रव्यांमध्ये हा व्यवहार पुरा होऊन दोघांची गरज भागते आणि संयुगाची निर्मिती होते. त्याच धर्तीवर ज्या मुळा-खोडामध्ये देवाणघेवाणीची शक्यता आहे अशा कोणत्याही जातीच्या झाड (खोड) नि मुळामध्ये ही देवाणघेवाण होऊ शकेल. हे शक्य झाले की आणखी एक रोचक शक्यता निर्माण होते…

    मुळांना नि पानांना मोजक्या सजातीय खोडांऐवजी अनेक वृक्षजातीच्या खोडांचा पर्याय उपलब्ध झाला, की त्यांच्यातही निवडीचे उद्दिष्ट (objective) निर्माण होईल. ‘प्रवासाचे अंतर मर्यादित केल्यास ऊर्जा-बचत होत असल्याने’ मुळे नि पाने शक्यतो जवळच्या खोडाशीच व्यवहार करू लागतील. मग दूरच्या खोडांची व्यवहार्यता कमी होत जाईल. म्हणजे अभावाच्या भूमीमध्ये खोडेही तगून राहू शकणार नाहीत. मग कदाचित खोडांचेही ‘स्थलांतर’ (अथवा अस्तित्व टिकून राहाणे) हे पुन्हा अन्न पाणी अधिक उपलब्ध असलेल्या भागात एकवटले जाईल. उपांगजीवी व्यवस्था ज्या अभाव-स्थितीवर मात करत उभी राहिली ते कारण आता गैरलागू (redundant) ठरण्याची शक्यता बळावेल. कारण ही उपांगे पुन्हा विशिष्ट भूभागातच केंद्रित होत जातील…

    …ही कारणमीमांसा माणसाच्या जगातील महानगरांच्या अवाढव्य विस्तारालाही लागू पडते! मानवी इतिहासात ही व्यवस्था भांडवलशाहीची नांदी ठरली होती. विनिमयातील बचत अधिकाधिक करण्यासाठी परस्परावलंबी व्यवसाय नि सेवा आणि त्यांच्याशी निगडित मनुष्यप्राण्यांची वसती सोयीच्या, सलग अशा भूभागावर एकवटत गेल्याने महानगरांची निर्मिती झाली.

    या नव्या जैविक व्यवस्थेमध्येही पाने नि मुळे चल झाल्यामुळे अभावाच्या क्षेत्रात झाडे रुजण्याची वाढलेली संभाव्यता पुन्हा कमी होत जाईल. याला चालना मिळेल ती मूळ-खोड-पाने ही बांधिलकी मोडून निर्माण झालेल्या व्यापक विनिमयाच्या व्यवस्थेमुळे. प्रजातीबाह्य विनिमयातून वृक्षसृष्टीमध्येही अशी एखादी भांडवलशाही व्यवस्था उदयाला येईल का? मग त्यातून उभ्या राहिलेल्या जीवघेण्या स्पर्धेत बलवंतांनी बळाने मागे ढकललेले दुबळे जीव तगून राहाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन एकमेकांना बांधिलकीची हमी देत मूळ-खोड-पाने ही व्यवस्था निर्माण होईल का…?

    अभावाची परिस्थिती नवी शक्यता निर्माण करते, ही नवी शक्यता पुरवठ्यामध्ये वाढीच्या वाटा निर्माण करते. पुरवठ्यामध्ये झालेली वाढ सजीवाच्या (खरंतर ही प्रवृत्ती केवळ माणसांत दिसते) मनामध्ये लालसेला जन्म देते. त्यातून पुरवठ्याचा अधिकाधिक वाटा खेचून घेत संचयाचा राक्षस वाढू लागतो. या संचयाच्या फुगवट्यामुळे पुन्हा नवी अभावाची क्षेत्रे निर्माण होऊ लागतात. त्यामुळे आपणच दूर केलेल्या मूळ सहजीवी व्यवस्थेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागते! कारण सामूहिक वापर, ‘गरजेनुसार वापरा’मध्ये रूपांतरित होतो. यातून अतिरिक्त संचयाची (reserve) आवश्यकता नाहीशी होते आणि एकुण समाजाच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक उत्पादन अथवा संग्रहाची (foraging) गरजही लक्षणीयरित्या कमी होते.

    - (क्रमश:) -

    « उत्तरार्ध

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १५ : उपसंहार

  • अंत:स्फोटाची अपरिहार्यता « मागील भाग

    ते तेरा जण

    ‘प्लरिबस’मधील या समूह-मनाच्या या सर्वव्यापी बदलाला जगभरात तेरा जण अपवाद आहेत. पृथ्वीवरील मानवजातीच्या सामूहिक ‘धर्मांतरा’मधून हे तेरा जण अनाकलनीय कारणाने सुटले आहेत. मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी हे तेरा जण– प्रामुख्याने त्यातील कॅरल ही लेखिका आहे.

    TheConvertsAndTheHeathen

    समूह-मनाची अनुषंगे-पूर्वाश्रमीची माणसे- हा ‘अपघात’ निस्तरून घेण्याचा आटापिटा करत आहेत. या तेरा जणांना ते आपल्यात सामावून घेण्यास उत्सुक असले, तरी हे कसे साध्य करावे याची माहिती त्यांना नाही. याचे एक कारण म्हणजे मुळात आपल्यामध्ये हा बदल कसा झाला याची माहिती त्यांनाच नाही. त्यामुळे या जुन्या जगाचा अवशेष असलेल्यांच्या मनांवर आपल्या संघर्षहीन आयुष्यातील तथाकथित सुखी, समाधानी असण्याचे महत्त्व बिंबवत त्यांना वळवून आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

    त्यासाठी या ‘बाहेरच्यां’च्या शक्य त्या सार्‍या इच्छा-आकांक्षा पुरवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना हवी ती वस्तू, हवे ते सुखोपभोग मागणीसरशी हजर केले जात आहेत. उत्पादन आता गरजेशी जोडले गेल्याने आणि मितव्ययी जीवनशैली स्वीकारली गेल्यामुळे, कृत्रिम मागणी निर्माण करणार्‍या भांडवलशाही हपापलेपणाला इथे थारा उरलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त मालाचा साठा करुन ग्राहकाला गरजेचे तेवढेच उचलून नेण्याची मुभा ठेवणारी ठेवणारी रीटेल स्टोअर्स मोडीत काढली जात आहेत.

    परंतु कॅरल आपली जीवनशैली बदलण्याचे नाकारून ‘गरजेच्या वस्तू समूहाकडून न मागवता– म्हणजे त्यांचे ‘उपकार’ न घेता– अशा स्टोअर्समधूनच खरेदी करण्याचा’ निर्धार करते, तेव्हा रिकामे केलेले ते स्टोअर पुन्हा वस्तूंनी भरून उभे केले जाते. त्या तेरा जणांच्या इच्छापूर्तीचे हे बंधन इतके कडक नि अनुल्लंघनीय आहे की त्यातील एखाद्याने अणुबॉम्ब मागितला तरी त्यांना तो पुरवावा लागणार आहे… याची एक चुणूक प्रत्यक्षात दाखवलीही जाते.

    पण असे असेल तर ‘आतील’ लोक असूयाग्रस्त होऊन ‘बाहेरचेच आयुष्य योग्य’ अशी प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होणार नाही का? की त्यांच्यामध्ये असलेल्या ‘मुक्त विचारशक्ती’चा (free will) संपूर्ण अभाव याचे हे लक्षण आहे. तसे असेल तर याला समूह-मन म्हणायचे की गुलाम-मन?


    सुख म्हणजे नक्की काय असतं?

    ही ‘पूर्वाश्रमीची माणसे’ त्या तेरा जणांना सांगतात की, ‘आमच्यामध्ये एक जाणीव, एक स्मरणकोष असल्याने आम्ही सारे एकच झालो आहोत. त्यामुळे आता परस्परांबद्दल द्वेष, अहंकार, ईर्षा यांचा लवलेश नाही. जीवनातील दु:ख नाहीसे झाल्याने एक असीम शांत असे आयुष्य आम्हाला मिळालेले आहे.’

    ‘आम्ही सारे सुखी आहोत’ असं म्हणणार्‍या जीवांकडे सुखाची व्याख्या काय आहे? धर्मसंस्थेपासून तिचा कडवा विरोधक असलेल्या कम्युनिझमपर्यंत सार्‍यांचे बहुसंख्य अनुयायी जसे त्यांची तत्त्वे, कर्मकांडे आकलनाशिवायही आत्मसात करून घेतात तसे झाले आहे का? म्हणजे सुखाची व्याख्या माहित नाही, पण ‘आपण सुखी आहोत’ हे वाक्य त्याचा अर्थ न जाणवताही रुजून गेले आहे?

    शिवाय ‘केवळ संघर्षरहित जीवन म्हणजे सुख’ असे असते का? ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकामध्ये जी.ए. कुलकर्णींनी रेड्या जोशी या व्यक्तिबद्दल लिहिले आहे :

    सुखाची व्याख्या नि समाधानाची व्याप्ती तुम्ही जशी कराल, त्यानुसार त्यांच्या पूर्तीच्या शक्यता नि संभाव्यता कमी वा अधिक होत असतात इतकेच. अपेक्षांचे गाठोडे जितके किमान, तितकी सुखाची संभाव्यता अधिक असते. पण एक नोंदवून ठेवायला हवे, अशा संघर्षरहित, गतिहीन जगण्यामध्ये प्रगतीच्या वाटा निर्माण होत नाहीत.

    तसेही संघर्ष हा जीव-उत्क्रांतीच्या दोन प्रमुख पायांपैकी एक नव्हे का? केवळ सहकार प्रगतीला मारक ठरत नाही का? एखाद्या सजीवाच्या आयुष्यामध्ये संघर्षाची शक्यताच नसेल, तर त्याच्या मनातील ईर्षा मावळून जाईल. आणि ईर्षेविना प्रगतीच्या कोणत्या वाटा खुल्या राहातील? मर्यादित संघर्ष ऊर्फ स्पर्धा हा मूलाधार मानून उभ्या राहिलेल्या भांडवलशाही व्यवस्थेने मानवी आयुष्यात काही सुखकर गोष्टींची भर घातली नाही का?

    किमयागारांच्या काळापासून अमरत्व– किमान दीर्घायुष्य देऊ करेल असे औषध वा रसायन (Elixir) निर्माण करण्याच्या मागे मनुष्यप्राणी हात धुवून लागलेला आहे. मृत्यूचे भय नि म्हणून अमरत्वाचे एक प्रकारचे विकृत आकर्षण मानवी मनात रुजले आहे. त्यामुळे अमरत्व वा दीर्घायुष्य हे अप्रत्यक्षपणे सुखाशी जोडले गेले आहे.

    काही काळापूर्वी एक कथा (दुर्दैवाने लेखक नि कथेचे नाव स्मरणात नाही) वाचण्यात आली होती. एका जमातीमध्ये सरासरी आयुर्मान बाह्य, प्रगत जगापेक्षा कितीतरी अधिक असते. एक संशोधक यांचा अभ्यास करून त्यांच्या दीर्घायुष्याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशाने त्यांच्यामध्ये जाऊन राहातो. अखेर त्याच्या ध्यानात येते की त्यांची क्रियाशून्यता, संघर्षाचा अभाव हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक आहे. परंतु त्याचाच परिणाम म्हणून ही जमात सुस्त नि आळशी आहे. जे अनायासे मिळते त्याहून अधिक काही मिळवण्याची, निर्माण करण्याची आसच त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते लोक दीर्घायुषी असले तरी, प्रगतीच्या वाटा सोडून विसावलेले आहेत.

    अलिकडच्या काही वर्षांत भारतीय निवडणुकांच्या राजकारणामध्ये पैसे, धान्य आदींचे वाटप सुरु झाले, तेव्हा त्याविरोधातील याचिका दाखल करुन घेताना ‘गरजा अशा आयत्या भागत राहिल्या तर माणसांमध्ये काम करण्याची प्रेरणाच उरणार नाही, देशाची क्रयशक्ती घटेल’ अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली होती. म्हणजे ‘सुख वा गरजपूर्ती ही संघर्षाशी, परिपूर्तीशी जोडली गेलेली असली पाहिजे’, हे न्यायव्यवस्थेनेही सूचित केले होते. सुख हे आयुष्याचा एक भागच असायला हवा. पुरे आयुष्य त्याने व्यापून गेले की हजारो वर्षे सुस्त पडून राहिलेल्या एखाद्या खडकासारखे ते आयुष्य क्रियाशून्य नि वांझ होऊन राहील.

    व. पु. काळे यांच्या एका कथेतील पात्र ‘सुख म्हणजे वेदनेचा अभाव’ अशी व्याख्या करते. पण ती व्याख्या करण्यासाठी आधी वेदनेच्या चरकातून जावे लागते, तरच त्या व्याख्येला आधार मिळतो.

    WhatIsHappiness
    Mr. Diabaté यांच्या व्याख्येतील सुख

    बहुतांचा न्यूनगंड

    आपण सुखी आहोत असा दावा करणारी ही मानवी अनुषंगे पुढे असंही म्हणतात की, ‘तुम्हीही आमच्यामध्ये सामील व्हाल तर तुमच्यातील षड्रिपुंपासून तुमचीही सुटका होईल आणि तुम्हालाही आमच्यासारखे सुखी आयुष्य जगता येईल.’ हे पाहून मला विविध धर्म, पंथ, संस्थाने यांची आठवण होते आहे.

    आजच्या जगात धर्म (religion) पेक्षाही विविध आध्यात्मिक गुरु आणि त्यांची संस्थाने यांच्या अनुयायी म्हणवणार्‍या टोळ्यांचे वर्तन या बहुसंख्येसारखे असते(१). ‘आपल्या पदरी जे पडले आहे ते काहीतरी श्रेष्ठ आहे’ हा भ्रम ते कुरवाळत बसलेले असतात. बहुसंख्य माणसे तर ही निवडीची तसदीही न घेता जन्मदत्त धर्म, परंपरा, आचारविचार सांभाळून ठेवतात. ‘तेच श्रेष्ठ– नव्हे सर्वश्रेष्ठ असल्याचा, बिनचूक असल्याचा, मानवी उन्नतीचा एकमेव सोपान असल्याचा’ दुराग्रही दावा करत राहातात.

    Surrounded

    वास्तविक हे सारे आपापल्या जाती, धर्मांच्या समाजात राहात असतात. कळपातील सुरक्षितता त्यांना मोलाची वाटत असते. (त्याअर्थी मनुष्यप्राणी हा शिकारी प्राण्यांपेक्षा भक्ष्य प्राण्यांची प्रवृत्ती अधिक दर्शवतो.) परंतु मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. जे स्वीकारले वा पदरी पडले त्यातील न्यूनेही त्याला दिसत असतातच. फक्त ती जाहीरपणे मान्य करण्याची त्याची तयारी नसते. कारण तसे केल्याने आपल्या निवडीचे वा बाजूचे स्थान डळमळीत होईल अशी त्यांना भीती वाटत असते.

    पण ही न्यूने जाहीर न करण्याने, मनात दडपल्याने त्यांचा न्यूनगंड नाहीसा होत नाही. टोळीजीवनाच्या काळात शारीर-संघर्ष हीच यशाची कसोटी असल्याने संख्या हा टोळीच्या यशाचा मुख्य आधार असे. माणसे नागर झाल्यावर त्याचे रूपांतर अहिंसक अशा बहुमत या संकल्पनेमध्ये झाले. त्यामुळे ही न्यूनगंड असलेली माणसे ‘बहुमताच्या निकषावर आपली निवड वा बाजू निदान मोठी तरी ठरावी’ म्हणून आपल्याहून भिन्न निवड केलेल्या वा वारसा लाभलेल्यांना विविध प्रकारे आपल्याकडे खेचून घेऊ पाहातात. त्यासाठी सोयीनुसार साम-दाम-दंडभेदादी उपाय ते वापरत असतात. ‘पर्यायाचे किमान अस्तित्वही आपल्या मताला सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरू शकते’ या भीतीनेही, त्या प्रवाहाबाहेर राहिलेल्यांवर आपली निवड लादण्याचा प्रयत्न करत राहातात…‘प्लरिबस’मधील या अनुषंगांचे वर्तनही–निदान नेणिवेच्या पातळीवर– या वृत्तीला अनुसरूनच होते आहे.


    काही अनुत्तरित प्रश्न

    ‘प्लरिबस’मधील सर्वव्यापी बदलानंतर तेरा जण या बदलापासून अस्पर्श राहिले आहेत. ‘तेरा’ हा आकडा बहुधा ख्रिस्त अधिक त्याचे १२ अनुयायी (apostle) या ख्रिस्ती धर्माच्या आद्य प्रसारकांकडे अंगुलिनिर्देश करतो आहे. ‘या जगाला योग्य दिशा दाखवण्याचा, त्याला अध:पातापासून (?) वाचवण्याचा भार आता यांच्या खांद्यावर आहे’ असे सूचित केले जात असावे का? मालिका अद्याप पुरी न झाल्याने सध्या केवळ प्रश्नच उपस्थित करता येतो(२).

    कॅरलला सोबत करण्यास जी स्त्री निवडली, तिची निवड कुणी केली? ‘अमुक स्त्री ही कॅरलला अधिक चांगली सोबत करेल’ हे कसे ठरले? समूह-मनाच्या या जीवांमध्ये हे निर्णय-केंद्र नक्की कुठे आहे? प्रत्येक व्यक्तिचे मन हे केवळ ग्रहण-केंद्र असून, त्या सार्‍यांहून वेगळे असे निर्णयकेंद्र आहे नि त्याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीमध्ये समूह-मनामार्फत प्रक्षेपित होतो आहे का? तसे असेल तरीही समूह-मनाची कल्पना बाधित होत नाही का? की याउलट प्रत्येक व्यक्तीचे मन निर्णयास स्वतंत्र आहे पण लोकशाही पद्धतीने प्रत्येकाचे मत नोंदवून निवाडा होत असेल, तर मतभिन्नतेला वाव राहून समूह-मन ही संकल्पनाच रद्दबातल होत नाही का?… हे नि असे अनेक मूलभूत प्रश्न या व्यवस्थेबाबत विचारणे शक्य आहे.

    परंतु यात माझे एक महत्त्वाचे गृहितक आहे आणि ते म्हणजे हे समूह-मन ही समाजव्यवस्था म्हणून आकाराला येते आहे. मालिकेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरीकडे येताना असे दिसू लागले आहे की, हे समूह-मन कशाची तरी वाट पाहाते आहे. एखादी घटना घडणे अपेक्षित आहे. ती व्यवस्था निरंतर अस्तित्वात राहाणे अभिप्रेतच नसावे. म्हणजे ही बीज पेरण्यापूर्वी केलेली जमिनीची केवळ मशागतच असू शकते, मार्क्सला अभिप्रेत असलेल्या साम्यवादी व्यवस्थेपूर्वीची तात्पुरती सोय म्हणून प्रस्थापित केलेली समाजवादी व्यवस्थेसारखी. हा सारा खेळ रंगवणार्‍यांना अभिप्रेत असणारी व्यवस्था वा अव्यवस्था आणखी काही वेगळेच घेऊन येऊ शकते.

    - (समाप्त) -

    परिशिष्ट » ‘पदार्पण’- एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)

    टीपा:

    (१). कारण आज नवा धर्म उभा करणे तुलनेने अवघड आहे, माणसे बव्हंशी जन्मदत्त धर्म राखून श्रद्धा वा अध्यात्माच्या या पळवाटेने जाऊन पर्यायी काही पदरी पाडून घेऊ पाहातात. [↑]

    (२). माझा हेतू त्या समूह-मनाच्या व्यवस्थेकडे तिच्या पूर्वसुरींचा वारसा म्हणून पाहाण्याचा असल्याने, त्या तेरा जणांचे स्थान वा त्यांची भूमिका याबद्दल काही अधिक उहापोह करण्याचा माझा उद्देश नाही. तसेही हा लेखनप्रपंच ऐसपैस पसरल्याने तो भाग आवरता घेतला तरी हरकत नसावी. [↑]

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता

  • Thumbnail

    गरजा, मागणी आणि पुरवठा « मागील भाग

    विकासाच्या नावाखाली ज्या बेगुमानपणे निसर्गाचा विध्वंस होतो आहे ते पाहाता, अशी इच्छा कधी कधी तीव्र होते की,


    मानवी वंशविच्छेद

    पण मानवी बुद्धीच्या मर्यादेत अशा सर्वंकष विध्वंसाची सोय ही केवळ बाह्य हल्ल्याद्वारेच - शस्त्राघात, जैविक, रासायनिक वा आण्विक - केली जाऊ शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे असा सर्वंकष संघर्ष नि व्यापक विध्वंस व्हायचा, तर किमान दोन समबल असे प्रतिस्पर्धी समोरासमोर यायला हवेत. सारासार विवेकाला उध्वस्त करुन जाईल इतपत सत्तेची, अस्मितेची, असुरक्षिततेची वा उन्मादाची भावना त्यांच्यात ओसंडून वाहायला हवी. ‘समोरच्या टोळीचे संपूर्ण निर्दालन केल्याखेरीज आपण नि आपली टोळी जगूच शकणार नाही’ इतका अतिरेकी विचार इतर सार्‍या पर्यायांची साफ धूळदाण करुन शिल्लक राहायला हवा. खरंतर हा विचार कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजरूपी मानवी टोळ्यांमध्ये रुजलेला आहे, त्याला भरपूर खतपाणी घालून प्रमाण तेवढे वाढवावे लागेल.

    वर उल्लेख केलेल्यांपैकी हत्यार कोणतेही वापरले असो, त्या विध्वंसाची झळ इतर जीवसृष्टीलाही बसणार आहे. इतकेच नव्हे तर अशा विध्वंसानंतरही मानवी कलेवरांचा जो खच पृथ्वी व्यापून राहील, त्याद्वारे त्यातील प्रदूषण इतर मांसभक्षी जिवांमध्येही संक्रमित होणार हे ओघाने आले. म्हणजे मानवी संहार हा प्रत्यक्ष नि अप्रत्यक्ष अशा दोनही प्रकाराने उरलेल्या जीवसृष्टीला बाधक ठरणार आहे. हे टाळायचे असेल तर दोन उद्दिष्टे साध्य व्हायला हवीत. पहिले म्हणजे केवळ मानवी प्रजातीचाच घात करेल असे नवे संहारक हत्यार शोधायला हवे. आणि दुसरे– त्या संहारातून निर्माण झालेल्या मानवी कलेवरांनाही इतर जिवांपासून काळजीपूर्वक दूर ठेवायला हवे. Pluribus मधील व्यवस्थेतून ही दोनही उद्दिष्टे साध्य करेल असा एक पर्याय उदयाला येतो आहे.


    ‘सर्वे सुखिन:’ ची दास्य-शृंखला

    HDP चा वापर माणसांना जगवण्यासाठी करणे ही एक प्रकारे स्वयंपूर्णता असली, तरी ती घटत्या उपलब्धतेची आहे. एकाच आघाताने ही समूह-मनाची व्यवस्था प्रस्थापित झाली तेव्हा कामी आलेल्या नव्वद कोटी जिवांनी सुरुवातीचे काही महिने उरलेल्यांची अन्नाची गरज भागवली. पण हा ‘पुरवठा’ उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे आणि जित्यांना इतरांच्या/काहींच्या मरणाची कामना करण्याची वेळ येणार आहे. आणि हे त्यांच्या ‘सर्वे सुखिन:’ या जीवनसूत्राला छेद देऊन जाणारे असेल.

    अन्नपुरवठा कमी झाला की उपासमारीचे संकटही उभे राहू शकते. (त्यातून ‘पुरवठा’ वाढू शकतो, पण लोकसंख्या– आणि म्हणून कार्यक्षम हातही वेगाने कमी होतात हे ही विसरता येत नाही.) मग कदाचित आहाराची गरज भागवण्यासाठी काही माणसे या समूह-मनाच्या व्यवस्थेविरोधात बंड करुन, मानवेतर जिवांना अभय देण्याचा नियम मोडून माघार घेण्याचा मार्ग निवडू शकतात. पण स्वतंत्र विचारशक्ती (free will) नसलेल्या, सहजीवनाचे सूत्र काळ्या दगडावरच्या रेघेसारखे मनावर कोरलेल्या जिवांना ते शक्य होईल का, शंकाच आहे.


    जगण्यातले संघर्ष

    HDP हे केवळ प्रथिन आहे. माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी केवळ तेवढे पुरेसे नसते. त्या उत्पादनाच्या नावात ‘प्रथिन’ असूनही त्यांत इतर जीवनसत्त्वे असली तर गोष्ट वेगळी. परंतु मानवी शरीरातील यांच्या प्रमाणांचा विचार करता ही शक्यता कमीच आहे. प्रथिने वगळता इतर आवश्यक घटक - जरी HDP मृत जीवापासूनच निर्माण होत असले तरी- प्रत्येक पुढच्या टप्प्यात घटत जाणारे आहेत. एखाद-दोन पिढ्यांतच त्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटणार आहे. ती तूट भरून काढण्यास अन्य सजीव पर्याय वापरण्याचे स्वातंत्र्य नसल्याने पुढील पिढ्या बव्हंशी असंतुलित, घटत्या रोगप्रतिकारशक्तीच्या असणार आहेत.

    दुसरीकडे समूह-मनाच्या निर्मितीनंतर माणसांनी जरी संघर्ष थांबवला असला, तरी इतर जिवांमध्ये असे काहीही घडलेले नाही. त्यामुळे साथीचे आजार, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींसोबतच मोकाट सोडलेल्या प्राण्यांमुळे प्राणिजन्य आजारांचे प्रमाण वाढणार आहे. इतकेच नव्हे तर प्राण्यांशी थेट संघर्ष उद्भवले तर समोरच्या प्राण्याचा प्रतिकार करावा की नाही, केलाच तर किती मर्यादेपर्यंत करावा याबाबत या नव्या ‘सर्वजीव मंगलम्‌’ व्यवस्थेला नियम घालून द्यावे लागतील.

    MoreRiskNoMeds
    https://www.firstpost.com/ आणि https://www.etsy.com/ येथून साभार.

    याखेरीज आणखी एका नव्या समस्येचा सामना या मानवी जिवांना करावाच लागणार आहे. उपचारासाठी आवश्यक औषधांतील बहुतेक रसायने ही सजीवांकडूनच येत असल्याने, ‘सजीवांना हानी न पोहोचवण्या’च्या नियमांमुळे त्यांची निर्मिती ठप्प होणार आहे. त्याचबरोबर औषधनिर्मिती प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा हा प्राण्यांवरील चाचण्यांचा असल्याने पुढील संशोधन हा विषय तर बादच ठरावा. समजा या प्राथमिक चाचण्या थेट मानवांवर करायचे म्हटले, तर मानवही सजीव असल्याने एकीकडे नियमभंग तर होतोच, पण तो अपवाद केला तर या सुरुवातीच्या टप्प्यांत अधिक असलेल्या अपयशाच्या संभाव्यतेला (greater risk) मानव जमातीला थेट सामोरे जावे लागेल.

    घटते जीवनमान, त्यामुळे लोकसंख्या घटण्याचा वाढलेला वेग यांना प्रतिरोध करायचा तर पुनरुत्पादनाचा वेग त्या प्रमाणात वाढायला हवा.


    कुटुंबव्यवस्था

    परंतु कुटुंबव्यवस्था(बहुधा) मोडीत निघाल्याने, वैय्यक्तिक मालकीचा लोप झाल्याने (आणि काही आशियाई समाजांमध्ये असते ते ‘म्हातारपणची काठी’ हे उद्दिष्टही न उरल्याने) मूल जन्माला घालण्यासाठी आवश्यक प्रेरणाच उरणार नाही.

    पितृत्व निश्चित नसले की लैंगिक संबंध ही नराच्या दृष्टीने केवळ प्रासंगिक सुखोपभोगाची क्रिया होऊन राहाते, एकाहुन अधिक पर्याय उपलब्ध असलेली. त्यातून त्याची बांधिलकी निर्माण होत नाही. पर्यायाने अपत्य-संगोपन ही बव्हंशी आईची– म्हणजे स्त्रीची जबाबदारी राहाते. ‘सर्वांशी सारखीच बांधिलकी’ या मानसिक जडणघडणीमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले, तरी ते प्रस्थापित करणार्‍या दोन व्यक्तींमध्ये त्या नात्यातील विशेष भावनिक आपुलकी कितपत शिल्लक राहील शंकाच आहे.एकुणात पुनरुत्पादन प्रेरणा न राहाता परिणाम म्हणूनच शिल्लक राहाते.

    CommuneFamily
    https://yourteenmag.com/ येथून साभार.

    लग्नसंस्था स्थिर होण्यापूर्वी आदिम टोळीजीवनाच्या काळात मूल हे पुर्‍या टोळीचे असे. तिच्या भविष्याचा आधार असे. अन्य टोळ्या, शिकारी प्राणी यांच्याशी होणार्‍या संघर्षामध्ये ते मूल एक भावी लढवय्या अथवा त्याच्या उत्पादनासाठी लागणारी भूमी असे. संख्याबळ या अस्तित्वाच्या लढाईतील सर्वात महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे त्यांचे संगोपन ही पुर्‍या टोळीची गरजही होती. ही एक प्रकारे टोळीच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असे. पण ‘प्लरिबस’मधील समाजामध्ये संघर्षही नाही नि सर्वांच्या गरजा सारख्याच भागवल्या जात असल्याने प्रगतीला निश्चित साध्यही नाही. त्यामुळे मूल हे Asset वा Investment म्हणूनही पाहाता येत नाही. त्यामुळे ‘मूल सार्‍या समाजाचे’ हा नियम म्हणून कितीही रुजवला, तरी त्यामागची भावना सर्वांची सारखी राहील असे नाही. अनेकांच्या दृष्टीने त्याचे संगोपन ही बांधिलकी न राहाता, केवळ जबाबदारी म्हणून पाहिले जाणार आहे.

    या सार्‍याचा एकत्रित विचार करता या समाजातील माणसांचे जीवनमान आणि लोकसंख्या आजच्या मानवाच्या तुलनेत घटत जाणार आहे असा निष्कर्ष निघतो. परिणामी मानवी लोकसंख्या ही हळूहळू घटत जाणार आहे. म्हणजे ही व्यवस्था प्रगतीच्या नव्हे, तर अंत:स्फोटाच्या (impload) दिशेने वाटचाल करणारी आहे हे स्पष्ट होत जाते.

    माणसांनी समाजातील मृत जिवांची HDP च्या स्वरूपात विल्हेवाट लावण्याने, त्यांची कलेवरे अन्य प्राण्यांपासून दूर राहात आहेत, इतर जीवसृष्टीशी संपर्क न येता विरून जात आहेत. म्हणजे ही व्यवस्था अन्य जीवसृष्टीला मानवी हस्तक्षेपापासून नि संसर्गापासून वेगळे करुन स्वतंत्रपणे विकसित होण्यास मोकळी करत आहे. एकीकडे ही व्यवस्था मानवी प्रजातीचा वंशखंड (extinction) करणारी व्यवस्था असेल. दुसरीकडे ही एक प्रजाती विरुन जात असताना, उरलेल्या जीवसृष्टीने तिच्या अस्तित्वाला वगळून नव्या उत्क्रांतीची सुरुवातही केलेली असेल… ती रुजवणार्‍यांनाही(!) हेच अभिप्रेत असावे का?

    HumanExtinction
    https://blog.naver.com/stoppoint/223503646610 येथून साभार.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » उपसंहार