-
प्राचीन काळी मी संगणक-क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही स्वयंसिद्ध (stand-alone)(१) स्वरूपाची प्रणाली (software) सॉफ्टवेअर तयार करत असू. तिचा आराखडा आमचाच नि तयार करणारे आम्हीच. त्यात काय काय असावे, कसे असावे हे निश्चित करणारा पहिला planning टप्पा असे. त्यानंतर त्याचा डोलारा (skeleton) तयार केले जाई. मग प्रत्यक्ष कार्य करणारे विभाग एक-एक करुन भरले जात.
आता याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरु होई. यात त्याची प्राथमिक वैधता-चाचणी (testing) आणि/किंवा QA अर्थात गुणवत्ता-तपासणी केली जाई. त्यानंतर यात सापडलेल्या ढोबळ चुका दुरुस्त करुन ही प्रणाली अधिक भक्कम केली जाई. यात अपेक्षित निकाल मिळतो आहे ना हे तपासण्याबरोबरच अनपेक्षित निकाल येत नाही ना या दिशेनेही चाचणीचे टप्पे पार पडत. ते पार पडल्यानंतर हे कंपनीच्या बाहेरील काही तज्ज्ञांना Beta-tester म्हणून नेमून त्यांच्याकडे सुपूर्द केले जाई. रुढ चौकटीमध्ये काम करणार्या कंपनीतील कामगारांच्या नजरेस न पडणार्या चुका या टप्प्यात सापडतील अशी अपेक्षा असे.
या बाह्य तज्ज्ञांचे तपासणी काम चालू असताना कंपनीमध्ये या प्रणालीला विक्रीयोग्य (commodity) म्हणून विकसित करण्याचे काम चालू होई. यात या प्रणालीकडे ग्राहकाच्या भूमिकेतून पाहून काही अडचणी येतात का याची चाचपणी सुरु होई. आधी याचे संभाव्य ग्राहक कोण, ते या प्रणालीचा वापर प्रामुख्याने कशासाठी नि कुठल्या संगणकावर करतील, त्यांची ते संगणक वापरण्याची शैली कुठली असावी, त्याआधारे आपल्या प्रणाली वापरताना ते कुठे अडतील, वगैरे बाबी ध्यानात घेतल्या जात. (याचा एक लहानसा टप्पा (user trials) आराखडा पातळीवरही घेतला जात असे.)
या चाचणीचे कारण म्हणजे जे माझ्या संगणकावर मिळते तेच ग्राहकाकडे मिळेल, याची शंभर टक्के खात्री देता येत नसे… अनेक बाबतीत आजही देता येत नाही.
प्रत्येक संगणकाला माणसाप्रमाणेच स्वतंत्र अस्तित्व असते. माणसाला जसे दोन हात, दोन पाय, एक डोके, त्यावर दोन डोळे, दोन कान, एक नाक, एक तोंड आदी मूलभूत शारीर वैशिष्ट्ये समान असली तरी शारीरिक उंची, कांती (रंग), जाडी, वजन, केसांची ठेवण, नाकाची ठेवण, डोळ्यांच्या बाहुलीचा रंग… अशा काही बाबींमध्ये फरक असतो. मूलभूत शारीर वैशिष्ट्यांचा गट हा मनुष्यप्राण्यांच्या गटात बसवण्यास म.सा.वि. असला तरी ही बाकीची वैशिष्ट्ये एका व्यक्तिला दुसरीपासून वेगळे दाखवू शकतात.
याच प्रमाणे कोणत्याही संगणकासाठी (मोबाईल क्षणभर बाजूला ठेवू) एक स्क्रीन, एक मायक्रोप्रोसेसर, RAM, हार्ड-डिस्क वा तत्सम स्टोरेज डिव्हाईस, माऊस नि की-बोर्ड ही जड अनुषंगे तसंच ऑपरेटिंग सिस्टमसारखे प्रणाली अनुषंग इतके किमान आवश्यक असते. पण त्या पलिकडे दोन संगणकांमध्ये बरेच फरकही असतात.
संगणकावर– ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे यावर टेम्पररी फाईल्स कुठे असतील ते ठरत असते. सिस्टमचा फॉण्ट साईझ (लार्ज, स्मॉल, कस्टम) काय आहे त्यानुसार स्क्रीनवर दिसणारे चित्र सुबक दिसते की विरुप हे ठरते. लोकाल (Locale) वेगवेगळा असेल, तर अंक दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. उदाहरणार्थ काही देशांत स्वल्पविराम हे चिन्हच दशांशचिन्ह म्हणून वापरले जाते. विविध देशांमध्ये भाषा वेगळी, त्यांची लिपी डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे लिहिली जाऊ शकते. तारखा लिहिण्याचे प्रत्येक देशाची तर्हा निराळी. इंटरनेटचा संबंध येणार असेल तर ब्राउजर, त्यातील डिफॉल्ट फॉण्ट आणि एनकोडिंग असे अक्षरश: अनेक फरक असतात.
तुमचे सॉफ्टवेअर यातील एक प्रकार गृहित धरुन काम करत असेल तर त्यातून अपेक्षित output मिळण्याची शक्यता सापेक्ष होऊन जाते. आणि ग्राहक हा केवळ ग्राहक असल्याने त्याला या बिघाडाचे वा बदलाचे कारण समजत नसते. ‘अपेक्षित आउटपुट हवे असेल तर आम्ही सांगतो तशा configuration चे मशीन घ्या’ असे सांगता येत नसते(२). तुमच्या एका प्रणालीसाठी संगणकाचे configurations आणि/ किंवा settings बदलले तर तो/ती वापरत असलेल्या इतर प्रणालींना धक्का लागू शकतो.
त्यांच्याकडे जे आहे त्यावर आपले सॉफ्टवेअर चालणे आवश्यक असते. कारण एकतर पैसे ते देणार असतात. त्याचे काम चालले नाही, तर नुकसान आपले होणार असते. हे टाळण्यासाठी, अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संभाव्य ग्राहकांच्या संभाव्य संगणकांमधील बहुसंख्य प्रकारांचे नि आपल्या प्रणालीचे जमावे लागते. ही खातरजमा करण्याचे काम या शेवटच्या टप्प्यात करावे लागते.
---
कट टू:
फेसबुकवर अनेक मंडळी थोड्या अधिक लांबीच्या पोस्ट करतात. काही वेळा चांगले मुद्दे लिहिलेले असतात. पण तरीही पुरे वाचताना प्रचंड जाच होतो. कारण ही मंडळी लिहिण्यामध्ये व्याकरणाचे नियमच नव्हे, तर ड्राफ्टिंगच्या सुसूत्रतेची पार ऐशीतैशी करतात.
यात सर्वाधिक दिसून येणार प्रकार म्हणजे अर्धवट तुटलेली वाक्ये; याचे मुख्य कारण ही मंडळी आपल्या स्क्रीनच्या सोयीने ड्राफ्टिंग करतात. ही बव्हंशी मोबाईलवरून लिहिणारी असावीत असा माझा तर्क आहे. लॅपटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनच्या मोबाईलवर, एखाद्याच्या मोबाईलवर फॉण्ट मोठा ठेवल्यामुळे… हा प्रकार विचित्र रांगोळी घालणारा दिसतो. पुढे वाचण्याची - निदान माझी - इच्छा मरुन जाते. वाक्यांच्या अधेमध्ये एन्टर मारल्यामुळे विचित्र स्वरूपाचे शब्दांचे समूह समोर दिसतात. ‘हां, याने/हिने इथे एन्टर मारलेले दिसते, म्हणजे वाक्य इथे पुरे होत नाही’ हे तर्काने जाणून घ्यावे लागते. बरं एन्टर का मारले? तर या व्यक्तिच्या स्क्रीनची रुंदी संपली असते, म्हणून हे चिरंजीव एन्टर मारून नव्या ओळीत जातात.
त्या पलिकडे वाक्ये व्याकरणदृष्ट्या देखील कशीही तुटलेली दिसतात. अनेकांची ती पुरीही झालेली नसतात. कर्तरी प्रयोग, कर्मणि प्रयोग वगैरेंची ऐशीतैशी झालेली असते. क्रियापद एका प्रकारचे नि क्रियाविशेषण दुसर्याच असा प्रकार वारंवार होतो. वाक्यांची गाडी सुरु झाली आहे म्हणजे कुठेतरी पोहोचायला हवी म्हणून सरपटत कुठेतरी पोहोचते इतकेच. एकत्रितरित्या त्या वाक्याचा अर्थ लावताना घाम फुटतो.
इंटरनेटच्या जगात ‘वापरली तर माथा आळ लागे’ असा समज असलेली विरामचिन्हे तर बव्हंशी गायबच असतातच. (अनेक प्रथितयश इंग्रजी वृत्तपत्रांच्या साईट्सवर विरामचिन्हे जवळजवळ नसतातच. अगदीच नाइलाज झाला तर वापरली जातात. एरवी वाचकाने डोके खाजवून ते वाक्य कसे वाचावे ते ठरवावे.) केलाच तर मन मानेल तसा, ‘केला न केला काय फरक पडतो?’ अशा मोकाट ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या बाण्याने केलेला असतो.
असाच काहीसा अनुभव एका भेट आलेल्या पुस्तकाबाबत झाला होता. विरामचिन्हे पुरी गायब नि परिच्छेद यादृच्छया केलेले; क्वचित पुरे पान नि पुढचे पान असा ऐसपैस परिच्छेद पसरलेला… कंटेंट चांगला असून पुढे वाचणे अवघड होत गेले होते.
बर्याच ब्लॉगलेखकांबाबतही हाच अनुभव येतो. एकाच पोस्टमध्ये वेगवेगळे फॉण्ट, वाक्ये नैसर्गिकरित्या पुरी होऊ न देता एन्टर मारून मोडतोड केलेली असे प्रकार घडताना दिसतात.
या सार्या लेखकांबाबत मला नेहमी असा प्रश्न पडतो की ‘बाबांनो, तुम्ही जर इतरांसाठी म्हणून काही लिहित आहात, तर त्यांना ते कसे दिसते हे किमान एकदा उघडून पाहाल का?’ वर संगणक-प्रणालींबाबत आहे तेच तुमच्या लेखनाबाबतही असते. अगदी फेसबुकही सगळ्यांसाठी सारखे असले, तरी प्रत्येकाचा संगणक, मोबाईल टॅब वेगळा असू शकतो. ते ही एकाच कंपनी, मॉडेल, (गुगल नि अॅपलकृपेने) ऑपरेटिंग सिस्टम तीच असेल तरी फॉण्ट साईझ कमी जास्त असू शकतो, मोबाईलच्या स्क्रीनची रुंदी कमी-जास्त असू शकते. एखाद्याकडे ७ इंची तर एखाद्याकडे ९ इंची स्क्रीन असलेला मोबाईल असतो. ज्याच्याकडे आयफोन आहे त्यावर ब्राउजर सफारी असतो, त्याचा फॉण्ट वेगळा असतो. त्याच्यामुळे स्क्रीनवर एका ओळीत किती शब्द बसतील त्यांची संख्या वेगळी असते.
बाबांनो, तुम्ही एन्टर मारून ‘इथे ही ओळ संपवून वाक्यही पुरे करा’ असा आदेश दिलात तरी त्या बिचार्या ब्राउजरला त्याच्या फॉण्टनुसार नि स्क्रीनच्या रुंदीनुसारच जावे लागते. एखाद्या वाक्यात तुम्ही कमी शब्द दिलेत म्हणून तो आकार वाढवणार नाही की जास्त बसवण्यासाठी तेवढ्या वाक्यात अक्षरांचा आकार कमी करणार नाही. तो तुमची ती आज्ञा त्याच्या आधीच नेमून दिलेल्या नियमांखेरीज अधिक वा जास्तीची म्हणून घेतो आणि ‘त्यांच्यासह’ तिचे पालन करतो. म्हणून तुकड्या तुकड्यांची वाक्ये दिसू लागतात.
यात बरीच मंडळी मला ‘आपले लेखन इतरांपर्यंत पोहोचवावे लागते. तू असे कर, तू तसे कर’ असा सल्ला देणारीही आहेत. मग त्यांना हा प्रकार आपले लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास अडथळा ठरतो हे का समजत नसावे? की आता बाजू बदलून ‘माझे ग्रेट लेखन लोक त्या अडथळ्यांना पार करुनही वाचतील’ अशी भूमिका घेणार आहेत?
यात सर्वाधिक समस्या ब्लॉग्सची आहे असा माझा अनुभव आहे. बहुतेक मराठी ब्लॉग्स अत्यंत वाईट पद्धतीने मांडलेले दिसतात. अगदी प्रथितयश लेखकांच्या ब्लॉगवर एकाच लेखात एकाहुन अधिक फॉण्ट्स, इमेजेस आणि मजकूर यांचा मेळ न बसणे, वरची मुख्य समस्या असलेली तुटकी वाक्ये, कुठेही फेकून दिलेल्या इमेजेस असा प्रकार दिसतो. मग मांडणीचा विचार नि वाचकाच्या भूमिकेत जाऊन त्याला काय सोयीचे नि सुलभ पडेल याचा विचार तर दूरच राहिला.
यात बहुतेक मंडळी ‘कागदावरचे श्रेष्ठ’ मानणारी असतात नि ब्लॉग हा केवळ बॅकअप म्हणून वापरतात. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष द्यावे असे त्यांना वाटत नसते. छापून आलेल्या लेखाची पिचकारी इथेही मारली की त्यांचे काम संपते. पोस्ट करून झाली की ती पोस्ट ते पुन्हा उघडूनही पाहात नसावेत इतक्या ढोबळ चुका त्यात असतात.
मी स्वत: माझा ब्लॉग लॅपटॉप, मोबाईल, टॅब्लेट यावर चेक करुनच त्यांचा लेआउट फायनल करत असतो. कोणतीही वेबसाईट या तीनही प्रकारात वेगवेगळी दिसू शकते. यावर एक आळशी उपाय म्हणून मोबाईल लेआउटच डेस्कटॉपवाल्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न काही जण करतात. (यात एक दोन बँकाही आहेत) पण हे मोबाईल ले-आउट डेस्कटॉपवर बहुधा भयाण दिसतात, विशेषत: फॉण्टसच्या बाबतीत. ‘आता शब्दांचा जमाना संपला, सगळं काही व्हिडिओमधून यावं’ असा जो अपसमज पसरला आहे त्याचप्रमाणे आता ‘मोबाईलधारकांचीच सोय पाहावी, डेस्कटॉप/लॅपटॉप नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत’ असाही समज पसरला असावा.
यातील एका प्रकारातही ब्राउजरनुसार फरक पडू शकतो. मी चारही प्रमुख ब्राउजरवर तपासतो. अर्थात ही तपासणी काही प्रत्येक पोस्टसाठी करावी लागते असे नाही. केवळ डिझाईन करताना करणे पुरते. ते करत असतानाच पोस्ट करताना काय काळजी घ्यावी, कशा पोस्ट कराव्यात हे समजून जाते. मग प्रत्येक पोस्ट करताना तेवढी काळजी घेतली की पुरते. (याच ब्लॉगवर ब्लॉगयात्रा या मालिकेमध्ये यावर एक भाग लिहिलेला आहे.)
जे ब्लॉगबाबत आहे तेच फेसबुक पोस्टलाही लागू पडते. मुद्द्याधारित परिच्छेद करता येत नसतील तर एक साधारण थंब-रुल वापरता येईल. अंदाजे चार ते सहा वाक्यांचा एक परिच्छेद करावा. वाक्यांशेवटी एन्टर मारू नये, सलग ही चार-सहा वाक्ये लिहावीत. मोबाईल, टॅब, लॅपटॉप आदी सर्वांचे स्क्रीन ती व्यवस्थित दाखवतात, स्क्रीनच्या बाहेर जात नाहीत याची काळजी ब्राउजर घेत असतो.
विविध माध्यमांसाठी या लेखन-नियमांत फरक पडतो. मध्यंतरी मी एका परस्पर उचल्या संपादकावर वैतागून एक तपशीलवार लेख लिहून हे फरक कसे पडतात हे लिहिले होते. दीर्घकाळ पत्रकारितेमध्ये राहिलेल्यांनाही हे का समजत नाही हे कोडे आहे मला. (संपादकांनी चिडून मला अनफ्रेंड करुन टाकले. 🙂 )
अशा किचकट लेखनशैलीत लिहिलेल्या पोस्ट वाचक तक्रार न वैतागता वाचतात. यात आपण आपली अधिकची ऊर्जा खर्च करत आहोत, दुय्यम दर्जाच्या ड्राफ्टिंगला रुढ करत आहोत याचे त्यांना भान नसते. आज शुद्धलेखनाची, प्रमाणभाषेची टिंगल करता करता आपण विरामचिन्हांशी, शब्दांच्या नेमकेपणाशीही वैर घेतले आहे ते असेच. याचा तोटा असा होतो की हे रुढ होऊन बसते.
आळशांच्या बहुमताच्या लोकशाहीचा एक तोटा मला मोबाईलवरील मराठी की-बोर्डमध्ये पाहायला मिळतो. तिथेही ‘व्हिडिओच्चं हवेत’ प्रमाणे ‘इन्टेलिसन्सच्चं पाहिजे’ म्हणणार्या गाढवांमुळे, ज्यात मला दहाही बोटांनी टाईप करता येते, माउसला हात लावण्याची गरज नसते, (याचा फायदा म्हणजे टायपिंगचा वेग बराच जास्त राहातो,) असे WYSWYG प्रकारचे (उदा. डेस्कटॉपवर गमभन किंवा बरहा) की-बोर्ड अस्तंगत झाले. इन्टेलिसन्सप्रेमी दोन अक्षरांनंतर आलेल्या ड्रॉप-डाउनमध्ये ‘ढूंढो ढूंढो रे साजना, मुझे चाहिए वो शब्द’ करत बसतात नि अपेक्षित सापड्ला की माऊस उचलून टुचुक करत बसतात. यात बराच वेळ जातो.
अगदी गुगलनेही सुरेख चालणारा गुगल इंडिक की-बोर्ड रद्द करुन जी-बोर्ड नावाचा बकवास प्रकार आणला आहे. ‘आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं’ असं समजणार्या एम्बीएधारकाप्रमाणॆ या कीबोर्डला आपले शब्द करेक्टं माहित असल्याचा भ्रम असतो. आणि बहुतेक वेळा आपल्याला अपेक्षित तो शब्दच त्याच्याकडे नसतो. मग तुकड्यातुकड्याने कसाबसा लिहावा लागतो.
त्याचे नियमही भयाण आहेत. सामान्यपणे ग्राहकाने दिलेली व्यंजने बदलू नयेत असा संकेत असायला हवा. पण बहुतेक इन्टेलिसन्स वापरणे कळफलक हा नियम धुडकावून लावतात. ते केवळ वारंवारतेचे नियम वापरतात. समजा मी ‘कला’ हा शब्द हवा म्हणून kala असे लिहिले की हे ‘कटा’ असा पहिला पर्याय देतात. कारण Kala पेक्षा Kata या अक्षरक्रमाचा वापर अधिक होत असतो. अरे बाळा, कळफलकावर l आणि t ही अक्षरे परस्परांपासून बरीच दूर आहेत. तेव्हा मी ‘चुकून’ t ऐवजी l लिहिले असे समजायचे कारण नाही. (एकुणातच ग्राहकाच्या चुका गृहित धरण्याचा हा प्रकार संतापजनक आहे.) Kala साठी त्याने ‘कल’, ‘कळ’,‘कला’, ‘कळा’, ‘काळ’, ‘काल’, ‘काला’, ‘काळा’ आदी पर्याय देणे आवश्यक आहे. यात व्यंजने राखून केवळ स्वरांच्या शक्यतांशी खेळ आहे. हे अधिक सयुक्तिक आहे. असो.
या गोंधळात भर असते ती लोकशाहीवादी(?), प्रमाणभाषाविरोधक मंडळींची. त्यांच्या चुकीच्या शब्दांना वारंवारतेमुळे प्राधान्य मिळते नि या ‘मठ्ठ इन्टेलिसन्स’चा राडा होऊन जातो.
ब्लॉग, फेसबुकसारखी लोकशाही माध्यमे सोडा, प्रथितयश मराठी वृत्तपत्रांच्या पोर्टल्सची स्थितीही ड्राफ्टिंगच्या बाजूने अतिशय भयाण आहे. पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही. एकुणात राजकारणात असो की सोशल मीडियावर, लोकशाहीबाबत माझा भ्रमनिरास होत चालला आहे.
‘बहुमताचे ते योग्य’ म्हटले की गुणवत्ता आहेत तिथे स्थिर होऊन जाते. प्रगतीच्याच काय, सुधारणेच्या वाटाही बंद होऊन जातात. कारण या दोहोंनाही बहुमताच्या टप्प्याला मागे सोडून पुढे जाण्यासाठी वाव आवश्यक असतो. तिथे हे बहुमताचे लादणे गतिरुद्ध करणारेच नव्हे तर प्रतिगामीही ठरत जाते.
- oOo -
(१). हा प्रकार आता बव्हंशी रद्दबातल होतो आहे.[↑]
(२). हल्ली बँकेच्या वेबसाईट निर्लज्जपणॆ एखाद्या ‘विशिष्ट ब्राउजर वरच चालेल’ अशी शिफारस करतात, तेव्हा माझ्यातला QA वाला त्यांच्या नावे बिब्बे उगाळू लागतो.[↑]
---
संबंधित लेखन: ‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
आळशांच्या बहुमता…
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत
-
मागील आठवडाभर आमच्यासारख्या मूठभरांचं लक्ष न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे होते. आपण ‘डेमोक्रॅटिक सोशलिस्ट’ असल्याचा दावा करणारे जोहराम ममदानी मोठ्या फरकाने निवडून आले.
कुणी त्याला भारतीय वंशाचा म्हणवत ताट-वाटी घेऊन त्याने रांधलेल्या यशाचा एक तुकडा आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला. कुणी ‘डेमोक्रॅटिक’ का होईना सोशलिस्ट आहे ना’ म्हणत विळा-कोयता उंच केला. मोकाट भांडवलशाहीचे आगर असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीमध्ये तिचे नाक कापल्याचा आसुरी आनंद आमच्यासारख्यां रिकामटेकड्यांना झाला… इस्रायलने मध्यपूर्वेत एक मुस्लिम मारला की आपल्याकडे काहींना होतो अगदी तसा. कुणी नुसताच आनंद व्यक्त केला, कुणी ‘तेव्हा कसे… आता का…’ हा भारताचा राष्ट्रीय तर्क वापरुन आपली हिणवत्ता सिद्ध केली. पण या सगळ्या कल्लोळामध्ये काही तपशील पाहायचे आपण विसरुन गेलो.
ममदानी लढवत असलेल्या निवडणुकीत किमान सात उमेदवार रिंगणात होते. ममदानी विविध ठिकाणी प्रत्यक्ष वा व्हिडिओद्वारे मतासाठी आवाहन करत होते. या आवाहनामध्ये ते स्वत:ला मत तर मागत होतेच, पण त्याचबरोबर ते ‘एक मत देऊन थांबू नका. एकुण पाच मते तुम्हाला द्यायची आहेत. ती ही आवर्जून द्या. यात आपल्यासाठी माजी गव्हर्नर अँड्र्यू क्वोमो यांचा पराभवही नक्की करायचा आहे. तेव्हा माझ्या पाठोपाठ अमुक चार जणांना मतदान करा.’ असे आवाहन ते करत होते.
ही काय भानगड? एकच पद असेल तर ही पाच मते कसली? असा प्रश्न पडेल. पण गंमत म्हणजे आपल्याकडेही ही ‘प्राधान्यक्रम’ (preferantial) निवडणूक प्रक्रिया वापरली जाते, फक्त मोठ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या गदारोळात आपल्या ते ध्यानात येत नाही. विधानसभेतून विधान-परिषदेवर अथवा राज्यसभेवर निवडून देण्याच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीत या पद्धतीचा वापर केला जातो. इथे तुम्ही केवळ एका उमेदवाराला मत देत नाही, उभ्या असलेल्यांचे ‘प्राधान्यक्रम’ लावून देता. हा उमेदवाराला माझी पहिला पसंती, दुसरी अमक्याला, तिसरी तमक्याला…’ असे प्रत्येक मतदार सांगत असतो.
मते मोजताना पहिल्या पसंतीची सर्वात प्रथम मोजली जातात. इथे निकाल निश्चित करण्यास मतांचा संख्या वा टक्केवारी (quota) ठरलेली असते. एखाद्याने तो पार केला तर तो निवडून आल्याचे जाहीर होते. पण कुणालाच तेवढी मते मिळाली नाहीत, तर निवडणूक दुसर्या टप्प्यात जाते. इथे सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद केला जातो नि त्याला मिळालेल्या मतांमधून दुसर्या पसंतीची मते ज्यांना ज्यांना मिळालेली आहेत, ती वाटून दिली जातात. आता एखाद्याने आवश्यक मत-संख्या (quota) पार केली तर तो विजयी ठरतो. अन्यथा निवडणूक तिसर्या टप्प्यात जाते.
या मार्गाने टप्प्याटप्याने सरकत अखेरपर्यंत कुणालाच आवश्यक मते मिळाली नाहीत, तर अखेरच्या टप्प्यापर्यंत सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. (एकाच वेळी एकाहून अधिक प्रतिनिधी निवडून द्यायचे असतील तर विजयासाठी आवश्यक मत-संख्या त्या प्रमाणात कमी होते, पण प्रक्रिया तीच राहाते.) न्यूयॉर्कच्या महापौरांची निवडणूक याच प्रक्रियेद्वारे पार पडणार होती.
‘एक आणि एकच’ मत देणार्या व्यवस्थेमध्ये नि या व्यवस्थेमध्ये उमेदवारांच्या भूमिकेतही फरक पडतो. तिथे सर्वच एकमेकांचे विरोधक असतात नि परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण या प्राधान्यक्रम व्यवस्थेत त्याचबरोबर परस्पर-सहकार्यही करावे लागते. समजा मला पहिल्या पसंतीची पुरेशी मते मिळण्याची खात्री नसेल, तर इतर उमेदवारांची दुसर्या पसंतीची मते आपल्याकडे वळवली जावीत अशी तजवीज केली जाते. यात उमेदवार बहुधा साटे-लोटे करत असतात. त्याचबरोबर ‘आपण विजयी होऊ शकलो नाही तर कोण विजयी व्हावा वा होऊ नये’ याचा विचारही ते करत असतात. एक प्रकारे ते ही आपले प्राधान्यक्रम निश्चित करत असतात.
स्वत:च्या विजयाबरोबरच अँड्र्यू क्वोमो या भ्रष्ट माजी गव्हर्नरांचा पराभव हे ममदानींचे उद्दिष्ट होते. (याला बरीच कारणे आहेत, विषयांतर नको म्हणून त्यात जात नाही.) दुसरीकडे काहीही करुन ममदानींचा पराभव व्हावा हे रिपब्लिकन पक्षाचे उद्दिष्ट होते. (याला पुन्हा इस्रायल नि त्यांचे लॉबिस्ट तसंच धनत्तरांचे हित हे पैलू होते.) त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळालेली असूनही कर्टिस स्लिवा यांना पक्षाची साथ मिळत नव्हती. प्रथम पडद्याआडून मदत करणार्या या पक्षाने ट्रम्प यांच्या आवाहनानंतर उघडपणे क्वोमो यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्लिवांच्या विजयाची शक्यता नगण्य झाली. त्यामुळे आधी बरेच मागे पडलेल्या क्वोमो यांची बाजू बळकट होऊ लागली. हे पाहून ममदानी यांनी निदान आपली पुढच्या पसंतीची मते क्वोमो यांच्याकडे जाऊ नयेत याची खबरदारी घेण्यासाठी ती इतर चौघांकडे फिरवण्याचा निर्णय घेतला; मतदारांना तसे आवाहन करायला सुरुवात केली. (स्लिवा यांनी आपल्या मतदारांना काय आवाहन केले हे समजू शकले नाही.)
हा सारा खटाटोप या निवडणुकीत फारसा महत्वाचा ठरलाच नाही. कारण विजयासाठी ठरवलेला ५०% मतांचा क्वोटा ममदानी यांनी पहिल्याच टप्प्यात पार केला नि विजयावर शिक्कामोर्तब केले.
आपल्याकडेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरपंच, नगराध्यक्ष यांच्या निवडणुका थेट जनतेमधून होतात. इथे मतदार मोजके असल्याने ही प्राधान्यक्रमाची व्यवस्था राबवणे शक्य आहे. एरवी खंडप्राय देशात खुल्या निवडणुकांत मतदारसंख्येचा विचार करता हे जिकीरीचे होईल. फार दूरचे कशाला, महानगरांतील महापौरपदाच्या निवडणुका अशा थेट न होता महापालिकेच्या निर्वाचित सदस्यांमधून होतात.
ईव्हीएमसारख्या यंत्रणेमध्ये हे शक्यही होईल. एकाऐवजी एकाहुन अधिकवेळा बटण दाबले की काम होईल. (आजही प्रभाग पद्धतीमध्ये एकाहुन अधिक मते देण्याची सोय केलेली आहेच. पण त्यात प्राधान्यक्रम नोंदला जात नाही. कारण प्रत्येक मत हे स्वतंत्र ईव्हीएममध्ये नोंदले जाते.) पण ईव्हीएमचे रडकरी ‘ईव्हीएमपेक्षा मतपत्रिका बरी नि चोरापेक्षा खुनी बरा कारण तो आमच्या ओळखीचा आहे’ असा उफराटा तर्क देत असल्याने त्यांना नक्कीच हे पटणारे नाही. उलट ‘अमेरिकेत बघा, मतपत्रिका वापरतात’ हे टुमणे लावून, ते मतपत्रिकेच्या सेफ असण्याचे प्रमाण असल्याचा आपल्याकडेही वारंवार खोटा ठरलेला दावा करत राहातात.
काही ठिकाणी एकाहुन अधिक मते देण्याऐवजी ‘बाद’ पद्धत वापरली जाते. पहिल्या फेरीतील इतर सर्व उमेदवार बाद करुन केवळ पहिल्या दोघांमध्ये फेरमतदान (runoff) घेतले जाते. बाद केल्या गेलेल्या उमेदवारांच्या मतदारांना आता आपल्या दुसर्या पसंतीचे मत देण्याची संधी मिळते. ही पद्धत खर्चिक असली तरी अधिक सुटसुटीत आहे, सर्वसामान्यांना अधिक सहज समजणारी आहे.
पण अमेरिकन निवडणुकीत एवढा एकच मुद्दा दखलपात्र होता असे नव्हे. याच प्राधान्यप्रधान निवडणूक प्रक्रियेमध्ये आणखी एक तपशीलाचा फरक मला आढळला. आणि तो म्हणजे इथे ‘बिनविरोध’ निवड ही संकल्पना अस्तित्वात नाही!
न्यूयॉर्कसोबतच बॉस्टन या मॅसॅच्युसेट्स राज्यातील प्रमुख शहराच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. याची गंमत अशी होती की इथे एकच उमेदवार होता. इथे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे non-partisan म्हणजे खुली, पक्षविरहित निवडणूक होते. (अमेरिकेमध्ये विविध राज्यांच्या निवडणूक प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत.) इथे मिशेल वू या विद्यमान महापौर पुनर्नियुक्तीसाठी उभ्या होत्या. सुरुवातीपासूनच कलचाचण्यांनी वू यांची अफाट लोकप्रियता दाखवून दिल्याने निवडणुकीच्या चार दिवस आधी रिंगणातील एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवारानेही माघार घेतली नि वू यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. पण…
तेथील नियमानुसार एक उमेदवार असेल तरीही निवडणूक प्रक्रिया पार पाडावीच लागते. याचे दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे या उमेदवाराला किती जनतेचा पाठिंबा आहे हे दिसते. दुसरा अधिक रोचक आहे. त्यानुसार हा एकमेव उमेदवारही पराभूत होऊ शकतो!
या निवडणुकीत केवळ मतपत्रिकेवर नावे असलेल्याच व्यक्तिलाच नव्हे तर अन्य एखाद्या व्यक्तिलाही write-in पद्धतीने– म्हणजे हाताने नाव लिहून – मतदान करता येते. आणि अशा एखाद्या बाह्य उमेदवाराला जर अधिक मते पडली तर तो निवडूनही येऊ शकतो. (अगदी अमेरिकन अध्यक्षाच्या निवडणुकीतही असे मतदान करणे शक्य आहे, पण तिथे राज्यांकडून अध्यक्षाला येणारी मते ही एकगठ्ठा स्वरूपात येत असल्याने एखादा उमेदवार असा बाहेरून मुसंडी मारणे जवळजवळ अशक्य आहे.) बॉस्टनमध्ये वू यांना ९३% तर उरलेली ७% टक्के मते ही अशा write-in प्रकाराची नोंदली गेली.
(यात या एकमेव उमेदवाराला ५०% टक्क्याहून कमी मते पडली तर तो पराभूत झाल्याचे मानले जाते का? जात असल्यास त्याऐवजी कोण निवडला जातो? फेरनिवडणूक घेतली जाते का? घेतली जात असल्यास सदर उमेदवार ती लढवण्यास अपात्र ठरतो का? हे पुढचे माझे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.)
या नियमाचा विशेष उल्लेख करायचा, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत नि गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना माघार घ्यायला लावून वा फोडून आपल्याकडे वळवून आपल्या उमेदवाराची बिनविरोध निवड करण्याचे बरेच प्रयोग सत्ताधारी भाजपने अवलंबले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे तर महाविद्यालयीन, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकांतही, प्रतिस्पर्ध्यांना धमकावून वा अपहरण करुन माघार घ्यायला लावून, आपली निवड बिनविरोध करुन घेणे हा प्रकार वारंवार घडता दिसतो. बॉस्टनचा नियम अंमलात आणला, तर अशा लायक नसलेल्या, बेकायदेशीर उमेदवारांना पराभूत करण्याचा एक लहानसा मार्ग मतदारांच्या हाती येऊ शकेल.
आपल्याकडे निव्वळ खुल्या निवडणुकांपलिकडे अल्पमतात असलेल्या नि विविध सामायिक हितसंबंध असलेल्या गटांसाठी खुल्या मतदारसंघांऐवजी विशिष्ट मतदारसंघ नि त्यातून त्यांचे प्रतिनिधी आपल्याकडे आधीच आहेत. उदा. राज्यांच्या विधानसभा आपले काही प्रतिनिधी निवडून संघराज्याकडे पाठवतात. हे खासदार राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहातात.
राज्य पातळीवर शिक्षक, पदवीधर वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ आहेत नि त्यांचे प्रतिनिधी विधान परिषदेचे सदस्य, आमदार म्हणून काम पाहातात. या पलिकडेही सभागृह-नेता मोजक्या खेळाडू, सांस्कृतिक क्षेत्र, आरोग्य वगैरे विविध क्षेत्रांचे तज्ज्ञ सदस्य म्हणून नेमण्याची शिफारस राज्यपाल अथवा सभागृह अध्यक्षांकडे करु शकतो. जेणेकरुन त्यांच्या विशेष ज्ञानाचे मार्गदर्शन लोकप्रतिनिधींना होऊ शकते.
पण या पलिकडेही काही त्रुटी राहून जाऊ शकतात. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ढोबळ त्रुटी आहेत. त्यांत सुधारणेची नितांत आवश्यकता आहे. प्राधान्यप्रधान निवडणूक प्रक्रियेबरोबरच इतरही काही सुधारणा करणे शक्य आहे. अमेरिकेच्या नव्हे तर इतरही देशांतील प्रक्रियांचा अभ्यास त्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
बहुतेक ठिकाणी लोकशाहीमधील निवडणूक ही खुल्या पद्धतीने होते. देश पातळीवरील निवडणूक ही थेट न होता ‘मतदारसंघ’ निर्माण केले जातात. यातून निवडून आलेले प्रतिनिधी विविध सभागृहांचे वा मंत्रिमंडळांचे सदस्य म्हणून काम पाहातात. या विशिष्ट व्यक्तींची मते नि त्यांच्या शासक म्हणून काम करणार्या गटाला (पक्षाला) मिळालेली एकुण मते यांच्यामध्ये विरोधाभास दिसू शकतो.
निळा रंग ‘डेमोक्रॅटिक’ पक्षाचा तर लाल रंग हा ‘रिपब्लिकन’ पक्षाचा मतदार.
इथे दाखवलेले त्यांचे प्रमाण केवळ उदाहरणादाखल घेतलेले आहे.पहिली शक्यता म्हणजे असे घडू शकते की सत्ताधारी गटाला मिळालेली मते ही एखाद्या विरोधी पक्षाला मिळालेल्या एकुण मतांपेक्षा कमी आहेत, पण सत्ताधार्यांचे प्रतिनिधी मात्र अधिक निवडून आले आहेत. (अपडेट: हा लेख लिहिल्यानंतर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये याची प्रचीती आली.) सत्ताधार्यांचे विजय कमी मतांच्या फरकाने तर विरोधकांचे मताधिक्य मोठे असेल तर हे घडू शकते.
दुसरी शक्यता म्हणजे पहिली शक्यता कृत्रिमरित्या घडवून आणली जाते. यासाठी सत्तेचा गैरवापर करून मतदारसंघांची निर्मितीच अशा तर्हेने केली जाते, की विरोधकांची मते अधिक असलेली लोकसंख्या अधिक मतदारसंघांत वाटली जाईल; जेणेकरुन विशिष्ट मतदारसंघात ती एकवटून विरोधी उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी होईल. याला Garrymandering असे म्हटले जाते. अमेरिकेच्या संदर्भात या Garrymandering ची संकल्पना बाजूच्या उदाहरणातून सहज समजून घेता येईल.
तिसरी शक्यता म्हणजे सत्ताधारी पक्षाने इतर पक्षांसोबत आघाडी केल्याने काही जागांवर आपले उमेदवार उभे न करता इतर उमेदवारांना पाठिंबा दिलेला असतो. या बाह्य उमेदवारांची मते सत्ताधारी पक्षाची म्हणून गणली न गेल्याने त्या पक्षाची एकुण मते, त्यांच्याहून अधिक जागा लढवणार्या एखाद्या विरोधी पक्षापेक्षा कमी राहू शकतात. कमी जागांवर उमेदवार उभे केले असल्याने संभाव्य मतांची संख्याच विरोधी पक्षाहून कमी होऊन गेल्याचा हा परिणाम असू शकतो. अशा वेळी सर्वाधिक मतदारांची पसंती असलेला पक्ष सत्ताधारी नाही असा प्रकार घडतो.
याशिवाय सत्तेच्या वाटेवर ‘बहुमत’ हा एक मोठा अडथळा असतो. भारतामध्ये किमान निव्वळ बहुमत (सदनातील किमान ५०% लोकप्रतिनिधींचा पाठिंबा) मिळवलेला पक्षच केंद्रीय सरकार स्थापन करण्यास थेट लायक मानला जातो. अमेरिकन निवडणुकीत जशी वर उल्लेख केलेली quota सिस्टम आहे तशीच ही. समजा कुणालाच बहुमत मिळाले नाही, तर एकाहुन अधिक पक्ष एकत्र येऊन ही जमवाजमव करतात नि सत्ता स्थापनेसाठी दावा करतात. यात असेही घडू शकते— अनेकदा घडलेही आहे— की कमी जनमत असलेले पक्ष एकत्र येऊन परस्पर-सहकार्याने सत्ता ताब्यात घेतात नि सर्वात मोठ्या पक्षाला सरकारबाहेर राहून विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागते.
या विसंगतींचा फटका सध्याच्या दोनही प्रमुख राजकीय प्रक्षांना बसलेला आहे. १९९८ मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपहून अधिक मते मिळवलेल्या काँग्रेसची खासदारसंख्या मात्र तब्बल चाळीसने कमी होती. तर १९९९ मध्ये सर्वाधिक खासदार निवडून आणूनही युतीच्या राजकारणामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले होते. याच निवडणुकीत काँग्रेसची मते जवळ-जवळ अडीच टक्क्यांनी वाढलेली असून खासदारांची संख्या मात्र तीसने घटली होती.
‘अधिक मतदारांची पसंती पण प्रतिनिधी कमी’, किंवा ‘अधिक प्रतिनिधी पण बहुमत – आणि म्हणून सत्ता – नाही’ हा तिढा व्यापक लोकप्रियतेचा आधार घेऊन सोडवता यायला हवा. यासाठी श्रीलंकेची निवडणूक प्रक्रिया पाहाता येईल.
इथे भारताप्रमाणेच लोकप्रतिनिधी– खासदार निवडून दिले जातात. पण त्या पलिकडे विविध पक्षांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात काही अधिक प्रातिनिधित्व त्यांना दिले जाते. अशा प्रातिनिधित्वासाठी काही जागा राखून ठेवलेल्या असतात. त्या मतांच्या प्रमाणात वाटून दिल्या जातात. अधिक मते पण कमी खासदार निवडून आल्याने निर्माण झालेला असमतोल मतांनाही ध्यानात घेऊन कमी करण्याचा हा प्रयत्न असतो.
या अधिकच्या प्रातिनिधित्वाच्या उपायाला पर्याय म्हणून एकपक्षीय वा पक्षगटाच्या बहुमताचा आग्रह न धरता विविध पदांसाठी सभागृहांतर्गत निवड वा निवडणूक घेतली तर बहुपक्षीय सरकार स्थापन करता येईल. त्यातून विरोधकांमध्ये सहकार्याचा पायंडा पाडता येईल. आजचे विषारी, शत्रुत्वाच्या पातळीवर पोहोचलेले राजकीय विरोधांचे तळे काही प्रमाणात निवळेल.
१९९८ मध्ये वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर कुणालाच बहुमताचा आकडा गाठता न आल्याने दीड वर्षांतच पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आग्रह सोडला असता, तर त्या टळल्या असत्या. एकुण मतांच्या प्रमाणात अधिक प्रातिनिधित्व दिले गेले असते, तर कदाचित १९९९ मध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले नसते. या त्रुटींचा सर्वाधिक फायदा उठवणार्या, ‘मते आणि प्रतिनिधित्व कमी, तरी सत्ताधारी’ असे संधिसाधू राजकारण करणार्या स्थानिक पक्षांच्या ‘तिसरी आघाडी’ नामक कागदी डोलार्याला दूर ठेवण्यासाठी या दोघांनी एकत्र येऊन निवडणूक सुधारणांचा विचार मनावर घ्यायला हवा.
- oOo -
रविवार, २ नोव्हेंबर, २०२५
ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल
-
भाग - १ « मागील भाग
---व्यवसायातील नफा वाढवायचा असेल, तर ‘वेतन-खर्च कमी करणे’ हा भांडवलशाहीतील हुकमी मार्ग आहे.
आठ वर्षांत आपल्या कर्मचार्यांना जेमतेम एक टक्का वेतनवाढ दिल्याबद्दल बोईंगच्या सीईओला अमेरिकन सेनेट कमिटी सदस्यांनी धारेवर धरल्याचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर सापडेल. याचबरोबर इतर सुरक्षा नियम धाब्यावर बसवून, प्रवासी नि कर्मचारी यांचा जीवही धोक्यात घालून, कंपनीचा नफा वाढवण्याचे नव-नवे मार्ग त्याने शोधले. याबद्दल बक्षीस म्हणून त्याला एकाच वर्षांत ४५% इतकी घसघशीत वाढ देऊन, ३.३ कोटी डॉलर्स(!) इतके वार्षिक वेतन कंपनीच्या संचालक मंडळाने देऊ केले.
कट्टर भांडवलशाहीसमर्थक अमेरिकेत अजिबात न शोभणारे याचे निदान त्याची झाडाझडती घेणार्यांपैकी एका सेनेटरने केले. तो म्हणाला, ‘मि. सीईओ, तुम्हाला कंपनीच्या हिताच्या आड येणारी समस्या शोधायची खटपट करायची गरज नाही. ती समस्या तुम्हीच आहात.’
alJazeera.com येथून साभार.जेव्हा राजकारणी हेच उद्योजकही असतात, तेव्हा ते व्यावसायिक यशाचे उपाय शासनव्यवस्थेतही अंमलात आणू लागतात. ट्रम्प यांच्यासाठी मस्क नामे धनाढ्य उद्योगपतीने सूत्र हाती घेऊन हाच कार्यक्रम सुरु केला. (आपल्याकडे लष्करी नेमणुकाही कालमर्यादित नि कायम नोकरीच्या अनेक फायद्यांविना करण्याचा घाट घालण्यात आला तो ही याच दृष्टिकोनातून.) ‘व्हाईट हाऊस’पासून लष्करी मुख्यालय असलेल्या पेंटगॉनपर्यंत सर्वत्र हा नोकर्या-हटाव चा कार्यक्रम सुरु झाला नि ट्रम्प-प्रेमी अमेरिकन्स प्रथम बिथरले.
आपल्याकडेही मुस्लिम नागरिकांच्या घरावर उ.प्र. नि म.प्र. सरकारे दणादण बुलडोझर चालवत असताना खुश होणार्या अनेकांना, आता ही धग आपल्याकडेही येऊ शकते याची जाणीव झालेली आहे. अयोध्येमध्ये परिक्रमा मार्गाच्या आराखड्यामध्ये येणारी घरे, दुकाने सरकारने बेगुमानपणे चिरडून मोकळी केली, तेव्हा याचे भान अयोध्यावासीयांना आले. याचा माफक सूड त्यांनी अयोध्येत भाजपचा पराभव करुन घेतला. परंतु त्यातून त्यांची झालेली धूळदाण भरुन आलेली नाही.
‘आप’च्या राजकीय भूमिका वा इतर बाबी बाजूला ठेवल्या, तरी त्यांनी जनकल्याणकारी योजना योग्य तर्हेने राबवल्या होत्या याबाबत सर्वसाधारण जनमत समाधानी होते. पण त्यांना तीन वेळा निवडून देणार्या दिल्लीतील मागास वस्त्यांनी यावेळेस ‘अब्दुलची जिरवण्या’साठी नि दरमहा काही रुपयांची भिक्षा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपला भरभरून मते दिली. निवडणुकीनंतर दोन महिन्यांतच यांतील मोठ्या हिश्शावर बुलडोझर फिरून ते अदानीसारख्या बिल्डर्ससाठी मोकळे केले गेले. यातील अनेक मंडळी तळतळून भाजप सरकारला शिव्याशाप देताना पाहून मला पॅस्टर निमॉयलरच्या कवितेची आठवण येत होती.
जर्मन पॅस्टर मार्टिन निमॉयलर यांची ‘First they came' या शीर्षकाची एक कविता आहे. ज्यात विविध गटांच्या दमनाच्या वेळी अलिप्त राहिलेल्याला अखेरीस ‘आपणही त्या दमनाचे बळी होऊ शकतो’ याचे भान येते. पण तोवर उशीर झालेला असतो. जे त्याच्यासोबत उभे राहू शकत होते, त्यांचे दमन आधीच पुरे झालेले असते. त्या वेळी याने/यांनी केवळ बघ्याची भूमिका स्वीकारलेली असते, क्वचित त्या दमनाला पाठिंबाही दिलेला असतो. आता आपला लढा एकाकीपणे आपल्या दुबळ्या हातांनी लढत, अपरिहार्य शेवटाकडे चालत जाण्यापलिकडे काही उरलेले नसते. अनेक रिपब्लिकन समर्थकांना, ट्रम्प यांना मतदान केलेल्यांना याचा प्रत्यय येऊ लागला. कारण मस्क यांच्या DOGE च्या या कापाकापीची झळ त्यांनाही लागली आणि ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्या समर्थकांतही नाराजी रुजू लागली आहे.
आज शिकागो, पोर्टलँड, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन डी.सी. इथल्या अनेक नागरिकांना याचा आणखी वेगळ्या प्रकारे प्रत्यय येतो आहे… ट्रम्प यांच्या दुसर्या धोरणाचा हा परिणाम आहे. हे धोरण आहे स्थलांतरितांना– ट्रम्प यांच्या भाषेत ‘फुकट्या परदेशी लोकांना’– हुसकावून लावण्याचे.
गंमत अशी की, ट्रम्प यांची ही मोहीम केवळ विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रभावक्षेत्रातच चालू आहे. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ही स्थलांतरित मंडळी बहुसंख्येने काहीसे प्रागतिक धोरण राबवणार्या डेमोक्रॅटिक पक्षाला धार्जिणी असतात असे दिसून आले आहे. त्यामुळे स्थलांतरित बहुसंख्येने असलेल्या राज्यांत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षीयांना यश मिळत नाही असा ग्रह रिपब्लिकन आणि ट्रम्प यांचा झालेला आहे. यावर ट्रम्प यांनी हा तोडगा काढला आहे. एकाच शस्त्राने ते बाहेरील नि अंतर्गत शत्रूंना नामोहरम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. (त्यांच्याकडचे ‘MAGA' समर्थक याला ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून सोशल मीडियावर निबंध लिहितात का पाहायला हवे.)
टॉलस्टॉयची एक कथा आहे ‘हाउ मच लॅण्ड डज् अ मॅन नीड’ – ‘(एका) माणसाला किती जमिनीची आवश्यकता असते?’ - या शीर्षकाची. त्याचा दृष्टीकोन उधार घेऊन मलाही असा प्रश्न विचारायचा आहे, ‘तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला येता, त्याच्या आजूबाजूचा भूमीचा किती परीघ तुमच्या मालकीचा वा वहिवाटीचा होतो?’ म्हणजे ‘तुमच्याभोवतीच्या किती परिघामध्ये कुणी राहावे, कुणाला हाकलावे हे सांगण्याचा हक्क वा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो? आणि तो तुम्हाला नक्की कोण देते?’
राजकीय सत्तेचे म्हणाल, तर मुळात ती भूतकाळात वा वर्तमानात बळानेच प्रस्थापित झालेली असते. तिच्या सीमा कृत्रिमरित्या आखलेल्या असतात. त्या पाळण्याचे बंधन कुणीही माझ्यावर कसे घालू शकते? या सीमा राखण्याचे कामही जर बळानेच होत असेल, तर सारी मानवी संस्कृती अजूनही केवळ ‘बळी तो कान पिळी’ या जनावरी न्यायानेच चालते असे म्हणावे लागेल.
उघडपणे नाही, पण मनातून अनेकांना या ना त्या प्रकारे हेच अभिप्रेत असते. फक्त त्यांची अपेक्षा ही असते की हा न्याय जोवर आपल्या गटाला फायदेशीर होतो आहे तोवरच चालवून घेतला जावा. तो आपल्याला गैरसोयीचा होऊ लागला की त्यांना नैतिकता, कायदा, संविधान, बांधिलकी, मानवाधिकार वगैरे आठवू लागतात. मग त्यांना आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी इतरांनी आपल्या पाठीशी उभे राहावे अशी इच्छा निर्माण होते.
Times of Israel च्या संस्थळावरुन साभार.यासाठी अलिकडचे इस्रायलचे उदाहरण घेता येईल. पॅलेस्टाईनमधील हमासच्या अपरिपक्वच नव्हे, तर मूर्खपणाच्या कृत्यांचा फायदा उठवत इस्रायलने गेली दोन वर्षे पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीमध्ये नरसंहारच नव्हे, तर वंशसंहार मांडला आहे. जेमतेम बहुमतावर तरलेले अध्यक्ष नेतान्याहू यांचे हे युद्धखोर धोरण मान्य नसलेले आणि इतरही कारणांनी त्यांचे विरोधक असणारे त्यांच्याविरोधात ‘नेसेट’मध्ये अविश्वास ठराव मांडून वाट पाहात आहेत. पण वर्षभरापूर्वी आलेला हा ठराव ‘सध्याची युद्धजन्य स्थिती निवळेपर्यंत’ स्थगित ठेवण्याचा(suspend) ठराव पास करुन घेण्यात नेतान्याहू यशस्वी झाले आहेत.
आणि आता सत्ता सोडायला लागू नये म्हणून, युद्धजन्य स्थिती निवळूच नये याचा आटापिटा ते करत आहेत. त्यासाठी राष्ट्रभावनेला, धर्मभावनेला, वंशभावनेला चिथावत ते जनतेला आपल्या पाठीशी उभे करु पाहात आहेत. या धोरणाला अपेक्षित फळ येऊन त्यांच्याविरोधातील देशांतर्गत असंतोष निवळतो आहे. त्यांच्या वंशसंहारक धोरणाला ९० टक्क्यांहून अधिक इस्रायलींचा पाठिंबा असल्याचा अंदाज पाश्चात्य अभ्यासक बांधत आहेत. असंतोषाला उन्मादात रूपांतरित करण्यात आणखी एक हुकूमशहा यशस्वी होताना दिसतो आहे.
जगातील अनेक राष्ट्रांनी या सर्व हल्ल्यांचा निषेध करुन, तज्ज्ञांनी गाझामधील हल्ल्यांना वंशसंहार असल्याचे जाहीर करुनही नेतान्याहू ढिम्म बदलायला तयार नाहीत. केवळ पॅलेस्टाईनवर अग्निवर्षाव करुन नेतान्याहू थांबलेले नाहीत. लेबनॉन, सीरिया, येमेन इतकेच नव्हे तर ईजिप्त, कतार अशा दहा राष्ट्रांवर गेल्या काही महिन्यांत त्यांनी हल्ले केले आहेत.
पण अतिसाहस जसे अंगाशी येते तसेच झाले. अमेरिकेच्या पाठिंब्यावरील उन्मादात त्यांनी इराणवरही हल्ले केले (पूर्वी बेगिन अध्यक्ष असताना त्यांनी इराकच्या अणुभट्टीवर हल्ला करुन विरोधात गेलेले देशांतर्गत जनमत आपल्या बाजूने वळवले होते. नेतान्याहू तसेच करु इच्छित असावेत.) पण इराण हे मध्यपूर्वेतील बलशाली राष्ट्र आहे. त्याला रशिया नि चीनसारखे पाठीराखे लाभले आहेत. त्याने जे जोरदार प्रत्युत्तर दिले त्याने थेट जेरुसलेममधील नागरिकांना निमॉयलरच्या कवितेची आठवण करुन दिली.
मोसादच्या मुख्यालयाची झालेली दुर्दशा पाहून, गाझातील शाळा, इस्पितळे इतकेच नव्हे तर अन्नवाटपाच्या रांगेतील नि:शस्त्र जिवांचा बळी घेणार्या इस्रायलला चक्क मानवाधिकाराचे उल्लंघन वगैरे आठवू लागले. ते धावत ट्रम्प यांच्या चरणी दाखल झाले नि ‘काका, मला वाचवा’ अशी विनवणी करु लागले.
आणखी एक युद्ध जिंकल्याची बढाई मारता यावी म्हणून ट्रम्प यांनी इराणच्या अणुप्रक्रिया केंद्रावर क्षेपणास्त्रे डागली. पण इराणने त्यालाही जोरदार प्रत्युत्तर देत आपण अमेरिकेचे मध्यपूर्वेतले सामर्थ्य खच्ची करु शकतो याचे सक्रीय संकेत दिले. ‘हात दाखवून अवलक्षण नको’ म्हणत अमेरिका नि इस्रायल दोघांनीही इराणविरोधातील कारवाई गुंडाळली…
…आणि इतके दिवस इस्रायलवरच्या अन्यायाबाबत गळे काढणारी युरपिय माध्यमे पुन्हा एकवार पॅलेस्टाईनमधील हमासच्या दहशतवादी कृत्यांची उजळणी करु लागली.
लोक मूलत: स्वार्थी नि संकुचित प्रवृत्तीचेच असतात. त्यांच्यात टोळीची मानसिकता खदखदत असते. अशीच मंडळी नेतान्याहू, ट्रम्प नि ट्रम्पसारख्या तोंडच्या वाफेवर देश चालवणार्यांच्या ओसरीवर आश्रयाला जाऊन आपणच मालक असल्याच्या आविर्भावात बाहेरच्यांना हिणवताना दिसतात. (घराच्या आत त्यांना जागा नसते. तिथे केवळ उद्योगपती नि नेत्याच्या इतर गर्भश्रीमंत मित्रांनाच जागा मिळते.)
ट्रम्प यांची मोहिम केवळ स्थलांतरितांवर बडगा उगारून थांबलेली नाही. स्वत: ट्रम्प यांच्याखेरीज उपाध्यक्ष व्हान्स, अॅटर्नी जनरल पॅम बाँडी यांसारखे नेते ‘अँटिफा सारख्या दहशतवादी संघटनांना मुळापासून उखडून काढण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पैसा वा लढाऊ सैनिकांची कमतरता भासू दिली जाणार नाही’ अशी ग्वाही वारंवार देताना दिसतात. पण प्रश्न असा आहे ‘ही अँटिफा आहे कुठली संघटना?’
गंमत अशी की अशा नावाची कुठलीही संघटना मुळी अस्तित्वातच नाही! ज्याप्रमाणे ‘मानवतावादी दृष्टीकोन’ हा केवळ एक विचार आहे, अनेक जण ‘आपण तो अनुसरतो’ असा दावा करत असतात, तसेच अँटिफा हा ‘अॅण्टी-फॅसिस्ट’ या संज्ञेचे लघुरुप अथवा शॉर्टफॉर्म आहे. आपण हुकूमशाहीविरोधक आहोत हे सांगू इच्छिणार अनेक लोक आपण अँटिफा आहोत असे सांगतात इतकेच. अतर्गत नि बाह्य शत्रूंसोबत ‘लढत’(?) असतानाच ट्रम्प यांच्यासारखा भ्रमिष्ट नेता असे काही काल्पनिक शत्रूही स्वत:च उभे करुन त्यांना निखंदून काढण्याची गर्जना करताना दिसतो आहे.
अमेरिका नि अमेरिकेचे अध्यक्ष हे युद्धखोर असतात हे जगजाहीर आहे. ‘युद्ध करणे नि जिंकल्याचा दावा करणे (आजच्या जगात निर्विवाद यश क्वचितच मिळते, असतो तो केवळ यशाचा दावा किंवा प्रासंगिक यश) हे महासत्ता असल्याचे निदर्शक आहे’ असा समज अमेरिकेतच नव्हे, तर जिथे बहुसंख्या ही सरकारकडून फुकट मिळणारे धान्य नि पैसा यांकडे आशाळभूतपणे पाहाणारी आहे अशा देशातही असतो.
इराकसारख्या राष्ट्रात अस्तित्वात नसलेल्या ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’बाबत कांगावा करुन बुश यांच्याकडून त्या राष्ट्राचा विध्वंस केला जातो. गल्फ ऑफ टोन्किनमध्ये ‘व्हिएतकाँगींनी अमेरिकन युद्धनौकांवर हल्ले केल्याचा’ कांगावा करत अध्यक्ष जॉन्सन तत्कालीन उ. व्हिएतनामविरोधी युद्ध पुकारतात. ट्रम्प यांनी बुश नि जॉन्सन यांचा कित्ता एकाच वेळी देशांतर्गत नि आंतरराष्ट्रीय राजकारणातही गिरवायला सुरुवात केलेली दिसते.
- (क्रमश:) -
पुढील भाग » (आगामी)
गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५
ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १ : अमेरिकेमध्ये ट्रम्प
-
बहुप्रतीक्षित नोबेल शांतता पुरस्कार अखेर जाहीर झाला. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या, ‘आपल्या देशात अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करावा’ अशी मागणी करणार्या आणि जगभरात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे असलेल्या त्या देशातील ते साठे भांडवलदारांच्या ओटीत टाकण्यास उत्सुक असणार्या, व्हेनेझुएलाच्या मारिया मच्याडो यांच्या पदरात हा पुरस्कार पडला. मच्याडो यांचा राजकीय दृष्टीकोन शांततावादी मुळीच नाही. नोबेल शांतता कमिटीने बहुधा ‘समाजवाद नि समाजवादी विरोधक = शांततावादी’ ही सोपी व्याख्या स्वीकारली असावी. विध्वंसाचे हत्यार असलेल्या डायनामाईटच्या विक्रीतून अमाप पैसा केलेल्या नोबेलने हा पुरस्कार ठेवलेला असल्याने अंतर्विरोध हा त्याचा स्थायीभाव असा पुन्हा-पुन्हा दिसतो.
पण मच्याडोंना हा पुरस्कार मिळाला यापेक्षा, ‘मी आठ युद्ध थांबवली, मला नोबेल शांतता पुरस्कार द्या’ असं निर्लज्जपणे म्हणत देशोदेशी हिंडणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना अखेर नोबेल कमिटीने ठेंगा दाखवला याची चर्चा अधिक झाली. ट्रम्प यांचा स्वभाव पाहाता यांच्या यशापाठीमागे आपणच असल्याचा दावा अजूनही करु शकतात. मारिया यांनी आपला हा पुरस्कार ट्रम्प यांना अर्पण केलाही आहे.
राजकीय पत घसरली, की राष्ट्रभक्ती नावाचे हुकमी हत्यार शमीच्या झाडावरुन काढून बरेच एककल्ली नेते त्याचा वापर करताना दिसतात. (या विषयावर ‘बेगिन बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली’ हा लेख इथेच वाचता येईल.) मागच्या निवडणुकीत बायडेन यांच्याकडून पराभूत झाल्याने पिसाटलेल्या ट्रम्प यांनीही तोच मार्ग अनुसरावा हे ओघाने आलेच. सनातनी मानसिकतेच्या त्यांच्या रिपब्लिकन मतदारांना हा प्रकार मिरवायलाही छान उपयोगी पडणार होता.
मग ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ऊर्फ MAGA या घोषवाक्याखाली ट्रम्प यांचा प्रचार सुरु झाला. बहुतेक राष्ट्रांत, राष्ट्रांतर्गत राज्यांत, ‘भूमिपुत्रांची कड घेणे’ हा ही एक सोपा उपाय. कारण तो मूलत:च शत्रूलक्ष्यी असतो. ट्रम्प यांनीही ‘मी फुकट्या स्थलांतरितांना हाकलून अमेरिकेची समृद्धी फक्त अमेरिकन्ससाठीच ठेवेन’ अशी गर्जना केली. युरपिय वंशाच्या नि पुरुषी वर्चस्ववादी मागास दृष्टीकोनाच्या त्यांच्या समर्थकांना यातून आता गगन ठेंगणे भासू लागले.
थोडं आडवाटेला जाऊन एक उदाहरण देतो.
दोन-तीन आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांच्या ‘स्थलांतरित विरोधी धडक कारवाई पथका’ने (ICE) जॉर्जिया राज्यामध्ये Hyundai ही द. कोरियन कंपनी उभारत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरवर छापा घालून तीनशे कोरियन नागरिकांना अटक केली नि हातकड्या घालून मिरवले. दुसर्या दिवशी स्थानिक रिपब्लिकन लोकप्रतिनिधीने ‘बघा, अमेरिकन लोकांसाठी तीनशे नोकर्या मोकळ्या झाल्या’ अशी बढाई मारली. पण असे बढाईखोर बहुधा अडाणी असतात हे पुन्हा प्रत्ययाला आले. ते सर्व्हिस सेंटर उभारणीचे काम कंपनीच्या अमेरिकन ग्राहकांना स्थानिक साहाय्य केंद्र निर्माण करणारे होते. ते पुरे झाल्यानंतर तिथे सुमारे नऊ हजार अमेरिकन व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार होता.
हे ध्यानात आल्यावर प्रशासनाने या कामगारांना मुक्त करुन ‘त्यांची इच्छा असल्यास’, त्यांना त्या ठिकाणी काम करण्यास ‘मुभा आहे’ असे सांगितले. पण ‘झाला तेवढा तमाशा पुरे झाला’ म्हणून त्यांच्यातील एकाचा अपवाद वगळता सर्वांनी मायदेशी परत जाणे पसंत केले. इतकेच नव्हे तर Hyudai कंपनीनेही आपले हात वर केले नि हा प्रोजेक्ट गुंडाळून अमेरिकन्ससाठीही साहाय्य सेवा ही कोरियातूनच चालू राहील असे जाहीर केले. म्हणजे रोजगार गेले नि स्थानिक सेवाही. पण चमकोगिरी करणार्या नेत्यांचे काम झाले होते नि आपली चूक मान्य करण्याची पद्धत भारतीय राजकारण्यांत नाही तशीच अमेरिकनही. त्यामुळे ICE नामक गेस्टापोंचा नंगा नाच चालूच राहिला आहे.
या नि अशा अनेक उदाहरणांच्या नि तर्काच्या आधारे ‘बाहेरचे हटाव, अपनेही लाओ’ इतकं सरधोपट गणित असत नाही हे सिद्ध होत आले आहे. परदेशी व्यक्ती अमेरिकन व्यक्तींचे रोजगार हिरावून घेतात असेच नसते. अनेकदा ते ज्या संस्था, कंपन्या उभ्या करतात, त्यातून रोजगारच नव्हे तर स्थानिकांसाठी नव्या संधी वा सेवाही उपलब्ध होतात. काही वेळा संशोधनाची, कौशल्याची नवी दारे उघडली जातात. काही अमेरिकन तज्ज्ञ ही भूमिका विश्लेषणासह वारंवार मांडत आले आहेत.
पण माणसांच्या अडाणी टोळ्यांवर ज्यांना राज्य करायचे आहे असे नेते हे समजून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. त्या टोळ्यांना जे हवे ते बिनदिक्कत देऊन टाकत ते आपली खुर्ची सुरक्षित करत असतात. ‘त्यात त्या टोळ्यांचे नुकसानच आहे’ हे ठाऊक असले, तरी त्या माथेफिरु टोळ्यांना ते समजावून देण्याची समाजसेवा करण्यापेक्षा त्यांना स्वार्थ साधणे अधिक सोपे असते. ट्रम्पनीही हाच मार्ग अनुसरला आहे.
तिसरे हत्यार म्हणजे अमेरिकेच्या बाहेरील शत्रूंना धडा शिकवणे. ‘सारे जग फुकट्यांनी भरले आहे नि ते अमेरिकेला लुटते आहे’ हा भ्रम अमेरिकन जनतेच्या माथी त्यांनी मारायला सुरुवात केली. आपले काहीतरी कुणीतरी हिरावून घेते आहे नि आपल्याला ते ठाऊकच नाही, हे ऐकून फारसा खोल विचार न करणार्या कुणाचेही माथे भडकणार हे ओघाने आलेच. मग आता या समस्येवर उपाय काय… तर ट्रम्प आहेत ना त्यासाठी. त्यांना निवडून द्या म्हणजे झालं.
बाहेरच्या शत्रूचा बागुलबुवा दाखवून आपला गट राखता येतो. महाभारतामध्ये दुर्योधन म्हणतो, ‘पांडवांशी संघर्ष आहे म्हणून मी शंभर कौरवांची एकजूट राखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकतो. ते नसते तर यातील प्रत्येक जण कुरु साम्राज्याचा वाटा मागण्यासाठी माझ्या उरावर बसला असता.’ दोन शत्रूंमधला संघर्ष असला की बाजू निवडणे प्रत्येकाला बंधनकारक होऊन जाते. तिसरी, चौथी, पाचवी भूमिका घेण्याचे पर्याय संपुष्टात येतात.
त्याच धर्तीवर ट्रम्प नि ट्रम्पसारख्या इतर ‘देशाला श्रेष्ठ बनवेन, महान बनवेन’ म्हणणार्या नेत्यांचे धोरण हे नेहमी शत्रूलक्ष्यीच असते. ‘कुणीतरी वा कुठला तरी गट देशाचे, समाजाचे खच्चीकरण करतो आहे. मी त्याचे निर्दालन करुन तो अडथळा दूर करेन’ असे अवघड प्रश्नाचे सोपे, आकर्षक नि लोकांना चटकन पटणारे उत्तर शोधून ते आपल्या अल्पबुद्धी समर्थकांच्या माथी मारतात. त्यानंतर त्या गटाला वा गटांना अधूनमधून धोपटत आपले स्थान बळकट करत नेतात.
त्यातच ट्रम्प यांच्या सुदैवाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर डेमोक्रेटिक पक्षाला उमेदवार बदलणे भाग पडले आणि नवा उमेदवार ही बिगर-युरपिय वंशाची, ‘पुरेशी ख्रिश्चन’ नसलेली, त्यातही स्त्री असल्याने त्यांचा सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला. मागील निवडणुकीमध्ये झालेल्या बायडेन यांच्या विजयाने व्हाईट हाऊस सोडावे लागल्याने पिसाटलेल्या ट्रम्प यांचा चार वर्षांनी पुन्हा तिथे प्रवेश झाला. न मिळालेल्या गोष्टीपेक्षा गमावलेल्या गोष्टीची वेदना अधिक तीव्र असते याचा अनुभव ट्रम्प यांनी घेतला होता. सत्तेवर येताच त्यांनी आपल्या त्या तीन शत्रूलक्ष्यी धोरणांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.
- (क्रमश:) -
पुढील भाग » ट्रम्प आणि इस्रायल
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
अर्ध्यावरती डाव मोडला…
-
(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर…) भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥ तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा(१)” का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥ कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा “उद्या पहाटे दुसर्या वाटा, तिज्या गावचा वारा” पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥ तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ? त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?” या प्रश्नाला उत्तर नव्हते, कमळी लाजिरवाणी ॥३॥ का कमळीचे तुटले दावे(२), आज दूर जाताना ? का तात्याचा डाव गंडला, ‘कर’पाशी(२) चुरताना? भ्रमरासम ती उडून गेली, भुलुनी लाल-फुलांनी ॥४॥ - रमताराम --- (१). शब्दकोष (२). या दोनही ठिकाणी श्लेषावर ध्यान असू द्या.
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?
-
वृद्धत्वाची जेथ प्रचिती… « मागील भाग
---मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ.
जिज्ञासा
https://www.istockphoto.com/ येथून साभार.फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. (‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून) इतक्या सार्यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे.
कुरुंदकरांचे, त्यांच्या दृष्टिकोनाचे स्थान माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच आहे. परंतु तरीही कुणाला तरी कुरुंदकर ठाऊक नाहीत याने माझी अस्मिता दुखावत नाही. विचारांना अस्मितेचे देव्हारे नसावेत अशा मताचा मी आहे.
या प्रतिसादात हास्यास्पद काही आहे असे मला वाटत नाही. पोस्ट वाचून त्या प्रतिसादकाला कुरुंदकर या लेखकाचे आणखी काही वाचावेसे वाटले, याबद्दल मला कौतुकच वाटले. कुरुंदकर हे लेखक त्याला ठाऊक नसतील, त्याला हे लेखन कुणा फेसबुकवर सक्रीय असलेल्या व्यक्तिचे आहे असे वाटले असेल, तर तो त्याचा दोष म्हणता येणार नाही. ढीगभर वाचूनही मला अनेक लेखक ठाऊक नसतात. यात काही लाज वाटावी असे नाही. असंख्य लेखक नि पुस्तके अस्तित्वात असतात. आपली सार्यांशीच ओळख होते असे नाही.
यावरून एक वैय्यक्तिक अनुभव आठवला. एका प्रथितयश वृत्तपत्रामध्ये एका सामाजिक मुद्द्याचा उहापोह करणारा, (माझ्या मते) प्रतिगामी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारा एक लेख प्रसिद्ध झाला. ‘याचा विस्तृत प्रतिवाद व्हायला हवा’ अशी मी प्रतिक्रिया दिल्यावर एका ज्येष्ठ पुरोगामी मित्राने ’ह्यॅ: अमुकतमुक मासिकात तो केव्हाच आला आहे. तुम्ही वाचत नाही नि आलात तोंड वर करुन बोलायला.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
आता हे मासिक मी लंगोटात असतानाच बंद झालेले. तरीही ते न वाचल्याबद्दल मला फटका मिळाला होता. वास्तविक त्या प्रतिवादित मुद्द्याचा पुन्हा एकवार प्रचार-प्रसार सुरू झाला असेल, तर त्याच्या प्रतिवादालाही पुन्हा उजाळा द्यायला हवा हा सामान्य समजाचा भाग आहे. आजचा वृत्तपत्रीय लेख वाचलेली तरूण पिढी किमान चाळीस वर्षांपूर्वीचा तो अंक कुठून मिळवणार होती? परंतु त्यात सूचनेपेक्षा ‘मला अधिक माहित आहे’चा दर्पच मला अधिक जाणवला. ज्येष्ठांना ज्येष्ठत्व दाखवण्याचा कंड सामान्य समजुतीपेक्षा अधिक महत्त्वाचा वाटला असावा. ‘प्रश्न विचारु नका, मी देतो ते पाठ करा’ म्हणणार्या शिक्षकाप्रमाणेच असे अहंकारी माहितगार वा ज्ञानी व्यक्ती जिज्ञासेला मारक ठरत असतात.
हीच बाब त्या कुरुंदकरांबाबतच्या प्रतिसादकाची असू शकेल. तो तरुण असेल, तर त्याला वयामुळॆ अद्याप अनेक लेखकांची ओळख नसेल. यथावकाश तो करुन घेईलही. आपण वयाने अधिक असू म्हणून त्याच्यापेक्षा अधिक माहिती आपल्याला असेल. परंतु त्याबद्दल आपली पाठ थोपटून घेण्याचे नि त्याची थट्टा करण्याचे कारण नाही.
फेसबुकवर अनेकदा लोक एकमेकांचे लेखन cut-paste करतात. त्यामुळे ‘लेखक फेसबुकवर असेल’ असे समजून त्याच्या प्रोफाईलवर जावेसे वाटले, तर ते स्वागतार्हच आहे. मुलाची जिज्ञासा जिवंत असल्याचे लक्षण आहे. अशावेळी हा: हा: प्रतिक्रिया देणे हा जिज्ञासेचा उपहास आहे असे मला वाटते. प्रामाण्यप्रधान बहुसंख्येच्या समाजात जिज्ञासा ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट असल्याने ती अमूल्य आहे असे माझे मत आहे. आणि म्हणून मला तो उपहास जिव्हारी लागतो.
नेहरु म्हटले की एडविना आणून थैमान घालणारे बुद्धिबैल मोकाट सुटले असताना, नेहरुंबद्दल कुणी काही लिहिले आहे, ते वाचून ज्याची जिज्ञासा जागृत होते, ज्याने त्यांच्याबद्दल लिहिले त्या लेखकाचे आणखी काही वाचावे अशी इच्छा ज्याला होते, त्याचा उपहास करण्याऐवजी प्रोत्साहनच द्यायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
इथे एखाद्याने नेहरुंऐवजी वैचारिकदृष्ट्या दुसर्या बाजूचे असणार्या सावरकरांबद्दल लिहिले असते, आणि लिहिणारे पु. ग. सहस्रबुद्धे, स.ह. देशपांडे तर सोडाच अगदी गोपाळ गोडसे असते, तरी जिज्ञासेबाबत माझे हेच मत राहिले असते. त्याबद्दल अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या एखाद्या स्वयंघोषित पुरोगाम्याकडून मिळालेले ‘छुपा मनुवादी’ असल्याचे सर्टिफिकेट मी पोटभर हसून कचर्यात टाकून दिले असते.
पण याचा उपयोग काय?फेसबुकवरील त्या तरुणाप्रमाणेच इतर मंडळीही प्रश्न विचारत असतात. मग प्रत्येक प्रश्न हा जिज्ञासामूलकच असतो का? असा प्रश्नही पडतो.
विजेच्या शोधाचे प्रात्यक्षिक पुरे झाल्यावर ‘पण याचा काय उपयोग?’ असा प्रश्न एका उपस्थिताने फॅरेडेला(१) विचारला होता- असे म्हणतात. त्यावर ‘नवजात अर्भकाचा तरी समाजाला काय उपयोग असतो?’ असा प्रतिप्रश्न त्याने केला होता– म्हणे. काही दशकांनी विजेचा सार्वत्रिक वापर सुरू झाल्यावर हा प्रसंग म्हणजे त्या प्रश्नकर्त्याची र्हस्वबुद्धी नि फॅरेडेचा हजरजबाबीपणा नि दूरदृष्टी यांचा मिलाफ मानला जाऊ लागला… इतपत अर्थ लागला की– किंवा न लागताही, हसून माणसे पुढचा चटपटीत किस्सा वाचायला पाने उलटतात!
पण तत्कालीन वास्तवाच्या परिप्र्येक्ष्यात विचार केला असता, तो प्रश्न अगदीच गैर म्हणता येईल का? माणसाच्या विचाराला, चिकित्सेला, भविष्यवेधी वृत्तीला, आकलनक्षमतेला वास्तवाचे, संस्कार-परिघांचे, स्वीकृत वा जन्मदत्त जीवनदृष्टीचे कुंपण पडलेले नसते का? मग वर उल्लेख केलेल्या प्रश्नाला आज शतकांहून अधिक काळानंतर, अधिक प्रगत वास्तवाच्या सान्निध्यात उपहासात्मक हसणे कितपत योग्य आहे? असेच एखादे बाणेदार उत्तर दिलेला, पण पुढे ज्याच्या शोधाचा व्यावहारिक वापर शून्य झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत पडलेला एखाद्या शास्त्रज्ञही शोधता येईल.
विज्ञानातले नाही, पण राजकीय पटलावरचे एक उदाहरण म्हणजे जपानचा हुकूमशहा जनरल टोजो. याने दुसर्या महायुद्धाच्या अखेरीस युद्धगुन्हेगार म्हणून फासावर जाण्यापूर्वी ‘भविष्यकाळातील जनताच माझा निवाडा करील’ अशी दर्पोक्ती केली होती. आजच्या जपानमध्ये तो इतिहासाच्या काळ्या पानांवरचे एक पात्र आहे. समजा त्या देशातही साम्राज्यवाद्यांनी उचल खाऊन पुन्हा एकवार ‘जपानचे गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी’ त्याच्या इतिहासाला उजाळा दिला असता, तर आज होतो तसा हा त्याचा दावा हास्यास्पद समजला गेला नसता. (आपल्या इतिहासात तर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. पण ती द्यायची म्हणजे मूळ मुद्दे सोडून अस्मितावहिनी नि भावनाकाकूंच्या लढायाच सुरु होतात.)
थोडक्यात भविष्य कसे वळण घेते त्यावर तुमचे दावे दूरदृष्टीचे वा हास्यास्पद ठरत असतात. दावे करणारा दूरदृष्टीचा वा फाजील आत्मविश्वास असलेला वा अहंकारी असल्याचे निवाडे हे त्याने केलेले दावे निर्णायकरित्या सिद्ध वा असिद्ध झाल्यानंतरच करता येतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वर म्हटले तसे माणसाच्या आकलनाला, मूल्यमापनाला चौकटींचे बंधन असते. एखादी कृती राजेशाही असलेल्या राज्यात, धर्मनिष्ठ राज्यात/देशात नि लोकशाही राष्ट्रात कदाचित वेगवेगळ्या प्रकारे पाहिली जाऊ शकते. पण हे झाले मानव-निर्मित व्यवस्थांचे. माणसाच्या जगण्याचे प्राकृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक टप्प्यांचे प्रतिबिंबही विशिष्ट घटना, कृती, शोध, माहिती यांबाबतच्या तुमच्या आकलनावर पडत असते.
मध्यंतरी हे मीम पाहण्यात आले नि याबाबत थोडा विचार सुरु झाला. वर्तमानातील स्पर्धांची प्रतिबिंबस्वरूप स्पर्धा माणसाच्या आदिकालात घेतली असल्यास काय निकाल लागेल असा याचा विषय आहे. (‘फ्लिंटस्टोन्स’ या कार्टून-मालिकेच्या चाहत्यांना हा reverse extrapolation चा प्रकार चटकन समजेल.)
गंमत पाहिलीत तर स्पर्धेचा हा निकाल उघडपणे वर्तमानातील दृष्टिकोनाच्या आधारे दिला गेलेला आहे असे लक्षात येईल. भाष्यचित्रकार आपल्या वर्तमानाला सोडून विचार करू शकलेला नाही. वरच्या फॅरेडेच्या संदर्भातील प्रसंगातील प्रश्नकर्त्याप्रमाणेच हा त्याच्या र्हस्वदृष्टीचा परिणाम आहे. तो प्रश्नकर्ता भविष्याचा वेध घेण्यास कमी पडला होता, इथे भाष्यचित्रकार भूतकाळाचा!
Wheel म्हणजे चाक हा अमूल्य शोध आहे हे मनुष्य नागर झाल्यानंतरच निश्चित झाले. जंगलजीवी, टोळीजीवी माणूस अद्याप hunter-gatherer अर्थात संग्राहक-शिकारी आयुष्य जगत होता. प्राण्यांप्रमाणे भक्ष्याला प्रत्यक्ष भिडून शिकार करण्याइतका तो सबल कधीच नव्हता. त्यामुळे त्याची शिकारीची पद्धत ही चकवा, घात करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुरून वेध घेणारी होती. त्यासाठी आवश्यक असणारे भाले- अथवा बाण ही ‘टोकदार काठी’ (pointy stick) वर्गातील आयुधे- त्याच्या दृष्टीने महत्त्वाची. गंमत म्हणजे या ‘विज्ञान स्पर्धेत’ या टोकदार काठीला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
अग्नी उपलब्ध असेल, तर त्याचा वापर त्याला थोडाफार माहित असेल, परंतु ती गरज अत्यावश्यक ठरण्यास थोडा वेळ गेला असेल. शिवाय अग्निचा ‘शोध’ म्हणता येईल का हाच आधी प्रश्न आहे. कारण तो निसर्गात आधीपासून अस्तित्वात होताच. लांडग्यांना अथवा अन्य प्राण्यांना ‘माणसाळवणे’ या प्रक्रियेप्रमाणेच माणसाने त्याला आपल्या कह्यात आणून त्याचा वापर सुरू केला इतकेच.
चाक हे आयुध तुलनेने आधुनिक मानवाचे, माझ्या मते नागर झाल्यानंतर उपयोगी ठरणारे. खाचखळग्यांच्या, चढ-उतारांच्या, झाडा-शिळांच्या अडथळ्याच्या जगण्यात सर्वस्वी निरुपयोगी. त्याचा नियंत्रित उपयोग करण्यास सपाट जमीन हवी, जी प्रामुख्याने कुरणांच्या वा मैदानी प्रदेशातच उपलब्ध असते. इतकेच नव्हे तर चाकाचा स्वतंत्रपणे असा उपयोग नगण्यच. एकट्या चाकाऐवजी चाकांची जोडी जेव्हा उपलब्ध होते किंवा त्याला अक्ष म्हणून एखाद्या भक्कम लाकडी काठीची जोड मिळते तेव्हाच त्याचा व्यावहारिक वापर शक्य होतो आणि मगच ‘चाकाचा उपयोग काय?’ या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य होते. वर विजेबाबत जो प्रश्न विचारला गेला तो याच कारणाने. विजेचा वापर करून एखादे उपयुक्त उपकरण तयार होते, तेव्हा वीज ही उपयुक्त गोष्ट ठरत असते.
आदिमानवाच्या काळात एखाद्या जिज्ञासू पोराने एखादा वाटोळा दगड उतारावरून गडगडत जाताना पाहून चाकाची कल्पना मांडली असेल. तेव्हा त्याच्या टोळीतील माणसांनीही ‘त्याचा काय उपयोग?’ असे म्हणत उडवून लावले असेल. ते त्याचे बापदादे चूक नव्हते वा ते मूलही. कारण भविष्य कसे वळण घेईल याची कल्पना दोहोंनाही नसणार. त्यातून ‘उपयोग आहे’ वा ‘उपयोग नाही’ हे दोनही दावे त्या काळाच्या दृष्टीने केवळ दावे म्हणूनच पाहायला हवेत, त्यांचे निवाडे हे भविष्यकालावर सोपवून द्यायला हवेत.
वर ‘जपानमध्ये लोकशाहीवाद्यांऐवजी साम्राज्यवादी शिरजोर झाले असते तर टोजोची भविष्यवाणी खरी ठरली असती का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच धर्तीवर ‘एखाद्या ‘अपघाताने’ वाटोळ्या चाकाऐवजी चौकोनी चाकाची संकल्पना रुजली असती तर…?’ या प्रश्नाचा एक गंमतीशीर कल्पनाविस्तार करणारा व्हिडिओ पाहाण्यात आला.
वर म्हटले तसे निव्वळ विजेचा शोध कामाचा नाही, तसाच चाकाचाही. त्यांचा उपयोग करुन घेणारी उपकरणे अस्तित्वात यायला हवीत. या व्हिडिओमध्ये पाहिले तर चाकाच्या आधारे वाहनाची निर्मितीही झाली. त्यातून घडलेल्या अपघाताने त्या वाहनाची उपयुक्तता सिद्ध होऊ शकली नाही. आणि ही घटना वाटोळ्या चाकाच्या उपयुक्ततेलाही बाधक ठरली. थोडक्यात उपकरणाच्या यशावर मूळ शोधाचे यशही अवलंबून असते. त्यामुळे फॅरेडेचे आत्मविश्वासपूर्ण भाकित वास्तवात रूपांतर होण्यास विजेची विविध उपकरणे यशस्वीपणे निर्माण करणार्या अनेक संशोधकांचाही वाटा आहे. अशा चमत्कृतीपूर्ण, मनोरंजक कल्पनाविस्तारातूनही ज्ञानाची शिदोरी जिज्ञासूच्या पदरी पडते ती अशी.
- (क्रमश:) -
टीपा :
(१). कुणी हा प्रश्न खुद्द ब्रिटनच्या राणीने विचारला होता असे सांगतात. दुसरीकडे फॅरेडेचा म्हणून सांगितलेला हा किस्सा मुळात बेन्जामिन फ्रँकलिनचा आहे असाही एक दावा आहे.[↑]
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
पौरुषाचा कांगावा
-
महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी वरणभाताशी असलेली आपली नेहमीची ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला.
मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव्हे तर संपूर्ण भरतभूमीमध्ये पसरलेला मानसिक आजार आहे. तो असाध्य असाच आहे. त्यावर कुणाही धन्वंतर्याला आजवर उपाय सापडलेला नाही. ‘अमुक गावचा ढमुक पदार्थ टमुक गावातील पदार्थापेक्षा बेष्टं असतो’ हे अत्यंत निर्बुद्ध असे विधान अस्मितेच्या झेंड्यावर मिरवणारे माझ्या आसपास असंख्य आहेत.
सुरुवातीला मी त्यातील तार्किक विसंगती दाखवण्याचा प्रयत्न करत असे. पण याचा अर्थ ‘मी माझ्या गटाचे समर्थन करतो आहे’ असे सोयीने गृहित धरुन त्यावर आणखी हिणवत्तापूर्ण अशा अतार्किक दाव्यांची पुटे चढवली जात असत. क्वचित ‘गंमत आहे ही’ अशी पळवाट काढली जाई, पण खांद्यावरचा झेंडा उतरत नसे. अखेर मीच कंटाळून ‘शहाणे करून सोडावे…’ हा माझा मूर्ख कार्यक्रम आवरता घेतला.
मुळात हे असले अतार्किक, मूर्ख, अनेकदा द्वेषगर्भ दावे का केले जातात? याची कारणमीमांसा माणसाच्या टोळीजीवनातील प्रेरणांपर्यंत जाईल. माणसे जितकी खुजी तितकी ती आपली ओळख एखाद्या टोळीमध्ये शोधतात. वैय्यक्तिक काही दिवे लागत नाहीत तर निदान ‘एका कर्तृत्ववान टोळीचे आपण भाग आहोत नि वारशाने आपणही त्या कर्तृत्वाचे शिलेदार आहोत’ अशी बतावणी करण्याचा हा प्रयत्न असतो. मग ती टोळी देश/राज्य/गावाप्रमाणे भौगोलिक सीमांनी बांधलेली असो किंवा जात-धर्मादी वंश-वारसा वा अनुसरणाने. माणसे जितकी सामान्य कुवतीची, तितकी त्यांची बतावणी अधिकाधिक हास्यास्पद, अतार्किक होत जाते. अग्निहोत्रींचा त्रागा याच धर्तीचा.
तेलकट, तिखट, मसालेदार खाणे– त्यातही मांसाहार अधिक– हा अप्रत्यक्षपणे एक पौरुषाचा आविष्कार आहे, असा एक समज मनुष्यप्राण्यांत रुजलेला आहे. भले गावात मूळव्याधीवर सर्वाधिक उपचार होतात हे स्थानिक आरोग्याधिकारी, वैद्य वा डॉक्टर्स मान्य करत असतील, पण गावचे लोक ‘आपण तिखट खाण्यात कुणाला हार जाणार नाही’ ची शेखी मिरवतच राहातात. ते मिरवणे म्हणजे आपल्यातील पौरुषाचा आविष्कार आहे असे ही जनता समजत असते.
पण तिखट खाणे वा त्याबाबत सतत द्वाही फिरवणे ही एकच अभिव्यक्ती पौरुषाच्या कांगाव्याशी निगडित नाही. माझे काही अनुभवत मला आणखी काही नोंदी देऊन गेले आहेत.
काही वर्षांपूर्वी, मी जेव्हा सध्याच्या घरात नुकतेच राहायला आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी माझी दुचाकी पार्किंगमधून काढत होतो. पलिकडे आणखी एक सहनिवासी त्याची मोटरसायकल काढत होता. स्टँडवरून काढताना ती कलली नि याच्या अंगावर घसरली. त्याला ती सरळ करताच येईना. माझी गाडी बाजूला ठेवून मी त्याला मदत केली नि गाडी सरळ केली. आता त्या गाडीकडे नि काडीपैलवान म्हणता येईल अशा त्या बाप्याकडे पाहिल्यावर त्याने हा ‘उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका’ का घेतला असा प्रश्न कोणालाही पडत असे. कारण… जड, मोठी गाडी वापरणे हे काही पौरुषाचे, शौर्याचे लक्षण आहे असे मानले जाते! जावो बापडे. आपल्या शरीरयष्टीला झेपत असेल तर जरुर हे शौर्य दाखवावे. पण न झेपणार्या पौरुषाचे हे जगासमोर प्रदर्शन करताना धोक्याला आमंत्रण का द्यावे? बरे असली गाडी चालवण्याचे शौर्य(?) सहा महिने दाखवले म्हणून कुणी शौर्यपदक देणार आहे की पद्मश्री?
गाडीचे सोडा हो, त्याहून हास्यास्पद बाबी पौरुष-लक्षणे म्हणून नोंदल्या जातात. यातील अनेक मुद्दे तर पडताळणीस उपलब्धही नसतात. ‘बिग बँग थिअरी’ या प्रसिद्ध मालिकेतील हावर्ड हा किरकोळ प्रकृतीचा पुरुष. त्याचा सासरा चतकोर मिलिटरी सर्व्हिस केलेला. त्या जोरावर अर्थातच पौरुषाच्या डरकाळ्या फोडणारा. कुठल्याशा मुद्द्यावर हावर्ड ‘…doesn't bother me, because I sit (on the commode, while peeing)' असे म्हणतो. त्यावर सासरा अत्यंत कुत्सितपणे, ‘Yeah, that's why.' असे म्हणतो. थोडक्यात बसून मूत्रविसर्जन करणे हे बायकी काम आहे, पुरुषाला ते ‘माथा आळ लागे’ स्वरूपाचे आहे असे तो ध्वनित करत असतो.
हे ऐकून हसावे की रडावे कळेना मला. कमी जागेत कमोड्सपेक्षा अधिक संख्येने युरिनल्स बसू शकतात, जे उभ्याने मूत्रविसर्जन करु ‘शकणार्या’ पुरुषांना पुरेसे असते. तेव्हा पुरुषांसाठी युरिनल्स बांधणे हा केवळ सोयीचा भाग आहे. पण तेवढ्यावरुन स्त्री विरुद्ध पुरुष नि अमुक प्रकारचा पुरुष हा स्त्रैण आहे वगैरे निवाडे चालतात. वास्तविक उभ्याने मूत्रविसर्जन करणारे निष्काळजी पुरुष अनेकदा स्वच्छतागृहातील फरशी खराब करताना दिसतात. कमोडवर बसून कार्य उरकले तर ही शक्यता बरीच कमी होते. त्यामुळे ती कृती गैर तर काहीच, पण इतरांसाठी स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे.
अन्य एका मालिकेमध्ये धाकटा भाऊ (जो स्वत: किंचित बुद्धिमंद असतो, इंग्रजीत ज्याला simpleton असा शब्द आहे) थोरला भाऊ अजून आंघोळ करताना अंडरवेअरवरुनच आंघोळ करतो म्हणून हिणवतो. एका थोर वगैरे म्हणवल्या गेलेल्या नेत्याने एक प्रतिस्पर्धी नेता ‘रेनकोट घालून आंघोळ करतो’ अशी मुक्ताफळे उधळली होती. दोन्ही प्रसंगांत ‘नागवे होऊन आंघोळ करणे हे काहीतरी पौरूषाचे लक्षण आहे’ असे अप्रत्यक्षपणे ध्वनित केले जाते. तसे करणे ‘आरोग्यदायी आहे की नाही’ हा वेगळा मुद्दा आहे. ‘थंड पाण्याने आंघोळ करणे आरोग्यदायी की गरम पाण्याने?’ या वादाप्रमाणे (त्यातही हा पौरुषाचा कांगावा आहेच) ज्याला वाद घालायचा त्याने घालावा. माझा मुद्दा त्यात पौरूषाचा आढळ शोधण्याची गरज नाही एवढाच आहे.
पौरुषाची द्वाही फिरवण्याचे सर्वाधिक लोकप्रिय साधन म्हणजे शिव्या! कचाकच शिव्या देणे हे काहीतरी शौर्याचे नि पर्यायाने पौरुषाचे लक्षण असल्यासारखे शिव्या देण्यात भूषण मानणारे अनेक लोक आसपास दिसतात. त्यालाच जोडून येणारे अश्लील बोलणे हे असेच आणखी एक लक्षण.
वेषभूषादेखील यातून सुटलेली नाही. ‘मिश्या वाढवणे हे पौरुषाचे, तर मिश्या काढणे हे बायकी लक्षण’ हा जुना समज आता बॉलिवूडकृपेने थोडा कमी होत चालला आहे. फेटे बांधणे हा एक पौरुषाचा दागिना भलताच लोकप्रिय होत चालला आहे. इतका की हल्ली स्त्रियाही फेटे घालून मिरवणुकांमध्ये सहभागी होत आपल्यातील पौरुषाची, शौर्याची द्वाही फिरवताना दिसतात.
एकुणात काय, शौर्य वा पौरुष (बहुतेक सनातनी मनांत हे दोन्ही समानार्थी असतात) हे गाजवण्यापेक्षा मिरवण्याचे अधिक असते. श्रद्धांशी वा विचारव्यूहांशी निगडित कर्मकांडे वा पठडी असते, तशी पौरुषाच्या कांगाव्यासाठी वर उल्लेख केलेली काही कर्मकांडे असतात. ही कर्मकांडे अग्निहोत्रीसारख्यांसाठी नसलेल्या शौर्याला उद्दिपित करण्यासाठी निळ्या गोळीप्रमाणे काम करत असतात.
- oOo-
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती…
-
१. वार्धक्याची वाट
प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो.
वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते.
प्रगतीच्या नव्या वाटा जे बदल घडवून आणत असतात, त्यातून ‘त्यांचे जग’ म्हणता येईल अशी भौतिक, समाजिक, वैचारिक पातळीवरील त्यांची आकलनाची घडी विस्कटत असते. प्रवास करून एका निश्चित ठिकाणी पोहोचण्याची मानसिकता असलेल्या माणसाला, प्रगतीच्या वेगामुळे सतत प्रवासातच असल्याची, आपले असे कुठलेच स्थान नसल्याची, उपरेपणाची भावना निर्माण होते.
एरवी मनुष्यप्राणी अधिक प्रगतीशील असला, तरी जनावरातील स्थितीशीलताही त्याच्यात अगदी सर्वाधिक कार्यक्षम अशा तारुण्यातही शिल्लक असते. त्यामुळे होता होईतो बदलाला प्रतिरोध करण्याची प्रवृत्तीही त्याच्यामध्ये बलवान असते. याचा परिणाम म्हणू ‘भूतकाळामध्ये— फारतर आपल्या उमेदीच्या काळामध्ये झालेली प्रगती पुरेशी आहे, त्यातून निर्माण झालेल्या जगण्याच्या चौकटीचे आपल्याला आकलन झाले आहे, म्हणून समाजाने आता तिथेच थांबावे म्हणजे एक स्थितीशील आयुष्य आपल्याला मिळेल’ (जनावरांचे जसे आहार, भय नि मैथुन या तीन स्तंभांवर चालते तसे) अशी वृद्धांची धारणा होत असते.
त्या धारणेला अनुसरून ते बदलांना विरोध करु लागतात. ‘पूर्वीची स्थितीच योग्य होती, नवी घातक अथवा अनावश्यक आहे,’ अशी मखलाशी ते करू लागतात. मग ‘होणारे बदल हे चुकीचे, वाईट, घातक आहेत’ असा कांगावा करत, काळाचे चक्र उलट फिरवून, ते त्यांच्या आकलनाशी सुसंगत अशा स्थिर जगामध्ये नेऊ इच्छित असतात. शक्य झाल्यास प्रगतीच्या काही अनुषंगांवर बोळा फिरवून फळ्यावर पुन्हा जुनीच गणिते मांडावीत असा आटापिटा करतात. पुन्हा नवे आकलन साध्य करावे इतकी आकलनक्षमता, ऊर्जा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये उरलेली नसते.
प्रगतीच्या सर्वच वाटा वा अनुषंगे स्वीकारार्ह असतातच असेही नव्हे. म्हणून मी ‘बदल’ असा शब्द वापरला आहे. त्याचे इष्ट-अनिष्ट दोनही प्रकारचे परिणाम होत असतात. माझा मुद्दा सरसकट नकाराचा आणि मागे जाण्यालाच ‘उपाय’– तो ही ‘हुकमी’ वा ‘एकमेव’ समजण्याचा आहे.
२. प्रेषितांचा वारसाया माघारप्रेमी माणसांची ही परागती कुठवर नेऊ इच्छिते? हे परागती-समर्थक बव्हंशी इतिहासातील त्यांच्या देशाच्या, धर्माच्या तथाकथित, काल्पनिक अशा सुवर्णकाळापर्यंत मागे जाणे इष्ट मानतात. हा सुवर्णकाळ त्यांच्या धार्मिक, पौराणिक वा भाटांनी लिहिलेल्या ऐतिहासिक पुस्तकांतून नोंदवून ठेवलेला असतो. यात ठळक कथा मुख्यत: पारलौकिकावर आधारित असलेल्या देव नावाच्या संकल्पनेभोवती रचलेल्या असतात. या अध्याहृताचे माणसाशी असणारे बंध वा माध्यम म्हणून प्रेषितांची नेमणूक झालेली असते. हे प्रेषित देवांशी संवाद साधतात नि त्या अलौकिकाकडून वेचलेले ज्ञानाचे कण मर्त्य मानवांपर्यंत पोहोचवत असतात.
प्रेषितांनी दिलेले ज्ञान आज जवळजवळ सामान्य-ज्ञान (common sense) म्हणता येईल इतके मूलभूत आहे. किंबहुना तीच त्याची ताकद वा Unique Selling Point आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ते मांडले आहे. (उदाहणार्थ बिब्लिकल धर्मांतील ‘टेन कमांडमेंट्स’ पाहा.) त्यामुळे त्यांचा ‘ग्राहक’-विस्तार मोठा आहे. ‘देव-धर्म नको म्हणता तर कशाच्या आधारावर समाजधारणा करावी?’ या प्रश्नाला ‘संविधानाच्या आधारे’ असे – माझ्या मते अमूर्त, abstract – उत्तर देणारे पुरोगामी हा महत्त्वाचा मुद्दा विसरत असतात.
प्रेषितांनी दिलेल्या या सामान्य-ज्ञानाभोवती हळूहळू कर्मकांडांचे कोट उभे केले जातात. काही चलाख धंदेवाईक धार्मिक त्या कोटावर रोषणाई करुन त्याकडे अधिक ग्राहक आकर्षित व्हावेत, जे झाले ते दुसरीकडे वळू नयेत म्हणून पहारेकरी नेमतात. अन्य धर्मांतील, त्यांच्या प्रेषितांकडील ज्ञान(?) हे छद्मज्ञान असल्याचे धोक्याचे इशारे दिले जाऊ लागतात. त्यांचे प्रेषित हे दुय्यम असल्याच्या कहाण्या रचून तो धर्म, ती परंपरा, ती व्यवस्था दुय्यम असल्याचा आभास निर्माण केला जाऊ लागतो. प्रेषितांची ज्ञानाची, कल्याणाची आस बाजूला राहून त्या ज्ञानाची फोलपटे धर्म, कर्मकांड, परधर्मद्वेषाच्या रुपात पूजली जाऊ लागतात. आमच्या धर्मपरंपरेच्या सर्वोच्च पुस्तकात किंवा प्रेषिताकडे ‘अंतिम ज्ञानाचा एकाधिकार’ असल्याची द्वाही फिरवून ज्ञानाचा प्रवाह सीलबंद करुन देव्हार्यात ठेवला जातो.
आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो, किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीतजास्त काय आले याची अखेर कबुली असते.
(जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रवासी’ या कथेमधून)
परंतु प्रश्न असा आहे, की ‘प्रेषितांच्या काळी ज्ञान नव्हते का?’ असलेच तर त्यांनी आपले ज्ञान, आपले आकलन मांडताना ‘आपल्या पूर्वसुरींचे ज्ञान पुरेसे नाही’ असेच सूचित केले नाही का? थोडक्यात ज्ञानाची वाट ही चालत राहण्याचीच आहे असा याचा अर्थ नाही का? मग त्यांचे ज्ञान अंतिम कसे? ‘त्याच्या अथवा तिच्या जिज्ञासेची पूर्ती’ या अर्थी ते त्या व्यक्तिच्या आयुष्यातील अंतिम ज्ञान असू शकेलही. पण सर्व समाजाच्या दृष्टिने ते अंतिम ज्ञान कसे म्हणावे. प्रत्येकाच्या जिज्ञासेची जातकुळी एकच कशी असेल? प्रत्येकाला जगण्याबद्दल पडणारे प्रश्न तेच नि तेवढेच कसे असतील?
ज्या समाजामध्ये प्रगतीशील, सर्जनशील, निर्मितीक्षम विचाराला दुय्यम लेखले जाते नि वारशाला शिरोधार्य मानले जाते अशा समाजात वृद्ध मानसिकता प्रबळ असते असे म्हणता येते. भारतीय समाज हा अशा वृद्ध मानसिकतेचा आहे. भारतच का, बहुतेक देशांमधून भूतकाळातील अशा तथाकथित ‘सुवर्णकाळाकडे’ नेणार असल्याचा दावा करणारे पंथ, चळवळी, राजकीय पक्ष, नेते यांची रेलचेल असते. या सार्यांना या सुवर्णकाळाचा आधार हटकून धर्मग्रंथांतून सापडतो आणि त्यांच्या तंतोतंत मार्गदर्शनाखाली वाटचाल केल्यास तो काळ पुनरुज्जीवित करता येईल असा यांचा दावा असतो.
आजची मानवी समाजाची स्थिती पाहिली तर भगव्या, हिरव्या, पांढर्या वा निळ्या कापडात बांधलेल्या धर्मग्रंथांना कवटाळले, की जमावातील सुरक्षितता पदरी पडते. लाल वेष्टणातील पुस्तकाला शिरी मिरवले की मॉडर्न विचाराची, प्रागतिकतेची पदवी पदरी पडते. पण या दोनही सनातनवृत्तींना छेद देणारी माहिती, ज्ञान, अनुभव, विश्लेषण, दुरुस्ती या मार्गाने जाणारी वाट खर्या अर्थाने प्रागतिक म्हणायला हवी. धर्माचे प्रेषित जे ज्ञान देतात ते ‘अंतिम ज्ञान’ आहे असे आपण ठरवतो, ते नव्हेत. त्यांच्या काळीही ज्ञान या पदवीला पात्र असणारे बरेच काही होते. पण ते ‘अंतिम’ आहे असे त्यांनी मानले नाही. दोन पावले पुढे टाकून त्यांनी ‘आपले’ अंतिम ज्ञान (जर तसे म्हणायचे तर) मिळवले. आपण मात्र त्यांच्या ज्ञानाच्या पोथीला कपड्याने गुंडाळून करकचून गाठ बांधून टाकली; ना आतले काही बाहेर येवो ना बाहेरचे काही आत जावो म्हणून.
प्रेषितांनी दिलेले ज्ञान हा त्यांचा वारसा नव्हे. जिच्या आधारे त्यांनी त्यांच्या काळच्या अंतिम ज्ञानाची सीमारेषा पुढे सरकवून दिली, ती जिज्ञासा हाच त्यांचा वारसा आहे. धार्मिक वारसा असो वा मार्क्सचा, तो तंतोतंत शिरोधार्य मानून त्यांवर बांधलेल्या कर्मकांडांच्या अलवाणाच्या आधारे मार्गक्रमणा करणारेच प्रेषितांचे खरे खुनी असतात.
प्रत्येकाची जिज्ञासा, त्याचे प्रश्न वेगळे असतील तर त्याचे/तिचे अंतिम ज्ञानही वेगळेच असणार ना. आणि जोवर जगात जिज्ञासू व्यक्ती जन्माला येत आहेत तोवर ते नवनव्या प्रश्नांना भिडणारच आहेत, अंतिम ज्ञानाच्या न भरणार्या पेल्यामध्ये आपापली ओंजळ वाढवत नेणारच आहेत. करंटे आपण आहोत, जे प्रेषितांनी आपल्या पूर्वसुरींच्या शहाणपणामध्ये भर घातली हे ध्यानात न घेता त्यांना झालेल्या आकलनाला ‘अंतिम ज्ञान’ असे संबोधून त्यांच्या पोथीचा गळा आवळतो आहोत. कारण आपण जन्मजात वृद्ध आहोत!
मग प्रेषितांच्या ज्ञानाला किंमत नाही का? नक्कीच आहे. त्यांनी नैतिकतेच्या बंधनांचे, चौकटीचे महत्त्व ओळखून जमावातून, टोळ्यांतून समाज घडवण्याचा प्रयत्न केला… पुढे तथाकथित प्रगत माणसांनी पुन्हा त्यांचे टोळ्यांत रूपांतर केले हा मुद्दा अलाहिदा. पण ‘प्रेषितांचा वारसा कुठला?’ असा प्रश्न विचारला तर ‘त्यांची जिज्ञासा’ हे त्याचे उत्तर आहे. त्यांनी दिलेले आकलन ‘अंतिम सत्य’ म्हणून जाहीर करुन आपण तिची हत्या करत आहोत आणि आपला संपूर्ण समाजच वृद्धपणाच्या मानसिकतेमध्ये जगतो आहे.
३. मार्क्स आणि नेहरुधार्मिकांचे प्रेषित प्राचीनत्वाच्या साखळदंडांनी बद्ध झाले आहेत. ज्याला सर्वाधिक अर्वाचीन प्रेषित म्हणता येईल तो कार्ल मार्क्स हा अधार्मिक प्रेषित, त्याने पारलौकिकाचा आधार झुगारून शोषित, पददलित समाजाच्या उत्थानाला केंद्रस्थानी ठेवून संभाव्य समाजरचनेची मांडणी केली.
हे करत असताना – जिचा तो कट्टर शत्रू आहे असा आभास निर्माण केला जातो ती – ‘भांडवलशाही ही मानवी प्रगतीमधील एक संक्रमणशील अवस्था आहे’ असे म्हणत पददलितांच्या, गुलामांच्या, भूदासांच्या मुक्तीमधील तिचे योगदान नाकारले नव्हते. त्यापुढे जाऊन समाजवादी व्यवस्था ही देखील त्याला अपेक्षित असलेल्या साम्यवादी व्यवस्थेकडे जाण्याच्या मार्गावरचा एक आवश्यक टप्पा आहे असेही तो मानत होता. आज शंभर वर्षांनंतर कदाचित त्याने आणखी नवी अपेक्षित व्यवस्था पुढे ठेवत साम्यवादी व्यवस्था ही त्या नव्या अपेक्षित व्यवस्थेच्या मार्गावरचा अपरिहार्य थांबा मानले असते अशी शक्यताही होती.
पूर्वसुरींच्या श्रेयाला सर्वस्वी न नाकारता त्यांच्या यशापयशाच्या, बलस्थानांच्या, वैगुण्यांच्या नोंदी करत स्वत:च्या ज्ञानामध्ये भर घालत राहण्याच्या, त्याच्या आधारे आपले आकलन सुधारून घेत राहाण्याच्या, खर्या अर्थाने पुरोगामी (पुढे जाण्याच्या) त्याच्या वृत्तीमुळे माझ्या दृष्टीने तो जगातला सर्वात शहाणा माणूस ठरतो. ज्या व्यवस्थांच्या मर्यादा दाखवत आपली व्यवस्थेचा पुरस्कार तो करत होता, त्या व्यवस्थांचे ऋण मानण्याइतका मनाचा मोठेपणा त्याच्यामध्ये होता. ‘काही शतकांपूर्वीच जगातील सर्व ज्ञान निर्माण झाले, त्याला आत्मसात करणे, अनुसरणे इतकेच आपले काम आहे’ या खुज्या मानसिकतेच्या बहुसंख्येमध्ये राहून त्याची उंची अधिकच प्रकर्षाने जाणवत राहाते.
पण गंमत अशी, की आज त्याचेही ज्ञान अंतिम असल्याचे सांगणारे काही ‘कॉम्रेड पुरोहित’ही आसपास दिसतात. एक प्रकारे त्याच्या ज्ञानमार्गाला बाजूला सारून त्याच्या ज्ञानाची पठडी नि त्याला प्रेषिताच्या पातळीवर नेऊन ठेवतात. त्याच्या विचारांना, पठडीला प्रश्न विचारले, की ते आक्रमक होतात. प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी प्रत्युत्तरे, हेत्वारोप यांचा आधार घेत प्रश्नकर्त्याला धुडकावून लावू पाहातात. ‘तुमचे ज्ञान तोकडे आहे, तुम्ही आधी मार्क्स नीट समजून घ्या.’ चे आहुत/ अनाहुत सल्ले देतात. डाव्या विचारवंतांचे लेखन वाचण्याची शिफारस करून अंग झटकतात. ‘तू वाचले आहेस, तर तू दे की या प्रश्नाचे उत्तर.’ या विनंतीवर मौन बाळगतात.
हे सारे आचरण धर्मनिष्ठ समाजनिर्मिती करु इच्छिणार्यांसारखेच दिसते, पोथी नि प्रेषित वेगळे इतकेच. धार्मिकांप्रमाणे तयार विचार नि त्यांची पठडी त्यांनी आत्मसात करुन घेतलेली असून, आकलनाच्या वार्यालाही उभे राहिलेले दिसत नाहीत. आत्मसात करणे नि आकलन होणे यातील फरक बहुतेकांच्या गावीही नसतो. असा अनुभव धार्मिक नि अधार्मिक अशा दोनही प्रकारच्या मंडळींमध्ये येत असतो.
स्वातंत्र्यपूर्वकालातील नेहरु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साम्यवादी विचारांनी– विशेषत: रशियाच्या प्रगतीने प्रभावित झाले होते. परंतु पुढे त्याच्या मर्यादाही त्यांना दिसू लागल्या. भांडवलशाही प्रारुप नि साम्यवादी प्रारुप या दोन्हींच्या संमीलनाने काहीशा संकरित दृष्टिकोनाचा पुरस्कार ते करु लागले.
पुढे स्वातंत्र्यानंतर भाक्रा-नांगल धरणाच्या उद्घाटनप्रसंगी त्याला ‘नव्या जगाची तीर्थक्षेत्रे’ म्हणून नावाजणारे नेहरु त्याच्या परिणामांचा एकुण आवाका स्पष्ट होऊ लागल्यावर अशा अजस्र प्रोजेक्ट्सना ‘विनाशाची केंद्रे’ म्हणू लागले. प्रगतीच्या वाटेवर एखाद्या साधनाची, प्रकल्पाची सकारात्मक बाजू पाहात असतानाच त्याच्या नकारात्मक परिणामांबाबत डोळस असणे हा दुर्मीळ गुण यातून दिसून आला. गृहितके, पूर्वसुरींनी दिलेली प्रारुपे, यांसोबतच अनुभवसिद्ध आकलनाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले होते.
मार्क्सप्रमाणेच पं. नेहरुंच्या अनेक अनुयायांमध्ये त्यांच्या विचारांऐवजी पठडीबाजपणा रुजला. त्यांची सत्तालोलुपता जसजशी बळकट होत गेली तसतसा तोही अस्तंगतही होत गेला…
माणूस वारसा मिरवतो तो माहितीस्वरूपात सुस्थिर झालेल्या ज्ञानाचा नि ज्ञानवंतांचा; त्यांनी ते ज्ञान सिद्ध करण्यासाठी आधारभूत मानलेल्या जिज्ञासा, अनुभवसिद्धता नि आकलनाकडे बव्हंशी दुर्लक्ष करुन! मी ‘वृद्ध मानसिकता’ म्हणतो ती ही.
- (क्रमश:) -
पुढील भाग » पण याचा उपयोग काय?
बुधवार, ११ जून, २०२५
काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता
-
(मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.)
मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते(१).
अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षा… वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र तर सोडाच, पारंपरिक काव्यालंकारामध्येही मला ही विषमता चटकन दिसून येते.
आता हेच पाहा ना. साधे उपमांचे क्षेत्र फुले, चंद्र, काटे, आदी केवळ दृश्य पैलूंमध्ये बंदिस्त आहे, याचा आम्हाला नेहमी विषाद वाटत आला आहे. माणसाला पंचेंद्रिये असतात (आणि तरीही १४५ कोटींच्या देशांत लोक सहाव्याच्याच अधिक आहारी गेलेले दिसतात… पण तो मुद्दा अलाहिदा.) रंग, गंध, स्पर्श, चव नि स्वर यापैकी इतर चार इंद्रियानुभव उपमेच्या क्षेत्रात सुखेनैव बागडत असतात. असे असता चवीला अथवा जिंव्हारसज्ञानाला मात्र यातून कायम दूर ठेवले गेले आहे. ‘असे का?’ हे सहज समजण्याजोगे आहे.
हे बघा: तो रंग… तो गंध.. तो स्पर्श… तो स्वर… पण ‘ती’ चव. आता कळले का कारण? नसेल तर आणखी थोडे पुढे जातो.
आता यांचा अनुभव ज्या इंद्रियांकडून घ्यावा लागतो ती इंद्रिये पाहा. तो डोळा/ते डोळे, ते नाक, तो हात, तो कंठ… आणि ‘ती’ जिंव्हा!
नाही कळले? यू ब्लडी एमसीपीग्ज(२), चव नि जिंव्हा दोघीही स्त्रीलिंगी आहेत म्हणून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पुरुषी अहंकाराने लिप्त कवि-मंडळ यांना कटाक्षाने टाळत आले आहे.
आता हेच पाहा ना. आपल्या काल्पनिक प्रियेच्या ओठांनासुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांची उपमा देणारे शायर कुठल्याही नाक्यावरच्या पानाच्या ठेल्यावर, रस्त्यावर पहुडलेल्या प्रत्येक सिगरेटच्या पाकीटामागे एक या दराने सापडतात. पण वास्तवातील प्रियेच्या ओठांना एखाद्या कविने साखरेच्या कणांचे हिमबिंदू पांघरलेल्या सुक्या गुलाबजामची उपमा दिलेली ऐकली आहे कधी? अजिबात नाही!
पण तुम्ही म्हणाल: “पण गुलाबजाम मानवनिर्मित आहे, त्याची उपमा आमच्या स्वर्गीय (म्हणजे कैलासवासी नव्हे, स्वर्गातूनच जणू उतरलेली या अर्थी) प्रेम-विषयाला— (“रमतारामभाऊ, इथे तरी प्राज्ञ मराठी सोडा. ‘प्रेम-विषय’ काय, शाळेत गेल्यासारखे वाटते आहे.”) म्हणजे माशुकाला (उर्दू साली लै चावट, नुसत्या शब्दाने अंगावर मोहोर उमटतो) द्यावी का?”
बरं मग सफरचंद घेऊ. हिमाचलातून येते आणि काश्मीरची गुलाबी आठवण करुन देते. पण नाही. त्याचीही धाव बालकाच्या गालापर्यंतच. पोर मोठी झाली की कविने उपमा भरुन ठेवलेल्या ड्रम वा टाकीतून सफरचंदे हद्दपार.
गालांवरून आठवले, आपण ओठांपासून गालावर घसरलो. पुन्हा ज्ञानेंद्रियांकडे येऊ. खाद्य पदार्थांकडून पेय पदार्थांकडे सरकलो तर स्थिती किंचित सुधारते. आपल्या प्रियेच्या डोळ्यांना ‘नशीली’ म्हणणारा, थोडा धीट प्रियकर हिंदी/ऊर्दूमध्ये सापडेल; पण तो ही अंगचोर; शराब– म्हणजे दारुचा स्पष्ट उल्लेख करण्याची शक्यता खूप कमी आहे. रणांगणाचे तोंड न पाहिलेले कविदेखील प्रियेच्या डोळ्यांवरच्या भुवयांना (की भिवयांना?) धनुष्याची उपमा देतात, पण दिवाळीत ज्यावर ताव मारतात त्या कानवले ऊर्फ करंज्यांची आठवण त्यांना का होत नसावी? चवीलाही गोड असतात ते.
Magicpin appच्या X-भिंतीवरुन साभार.प्रियेच्या नाकाला फार तर पोपटाच्या चोचीची उपमा दिलेली आम्ही वाचली आहे. पण एखाद्या कविने ‘काजूकतलीसारखे शुभ्र नि धारदार’ असे म्हटलेले तुमच्या स्मरणात आहे? किंवा गोलसर, कोबीच्या गड्ड्याच्या आकाराच्या नाकाला, जुन्या कवितेच्या काळात ‘नाकाची गुंजडी’ अशी उपमा आम्ही ऐकली होती. ही गुंजडी काय याची आम्हाला काही कल्पना नाही. बहुधा गुंज या शब्दाचे लडिवाळ रूप असावे. पण त्याऐवजी ‘फणसाच्या गर्यासारखे भक्कम नाक’ अशी उपमा दिली आहे कुणी?
प्रियेच्या कुरळ्या केसांचा उल्लेख न चुकता ‘कुंतल’ असा करणार्या काव्यकर्तनकारागीरांनी ‘एखाद्या मद्यप्याला सोबत करणार्या चकलीसारखे माझे सोबती– तुझे कुंतल’ असे म्हटले आहे कधी? किंवा नितंबांपर्यंत झुळझुळणार्या (अर्थात कल्पनेमध्ये) तिच्या केशसांभाराला ‘अंधारातील सुतरफेणी’ची उपमा दिली आहे कुणी?
कितीही उदाहरणे दिली तरी कमीच आहेत. काव्यकळपातील उपमा-क्षेत्रात असलेला हा भेदभाव नाहीसा व्हावा, यासाठी आम्ही विद्रोह पुकारत आहोत. इथून पुढे आम्ही कविता लिहू तेव्हा चव, जिंव्हा– आणि म्हणून खाद्य पदार्थ, यांना यथोचित सन्मान देण्याचे वचन देत आहोत. या वचनपूर्तीच्या वाटेवरील हा पहिला काव्य-मोतीचूर. (झेंडूच्या फुलांची वा एकुणच पुष्पगुच्छाची उपमा नाकारुन आम्ही बेसन-कळ्यांना सांधणार्या लाडवाची उपमा दिली आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत.)
---
काव्य-मोतीचूर
१. तळून ताटात ठेवलेल्या मैद्याच्या गोळ्यासारखा मी तुझ्या ओठांत उकळत असलेल्या साखरपाकात बुडण्यास अधीर झालेला दोघे मिळून गुलाबजामसारखे अद्वितीय व्हावे म्हणून २. लाडवांसाठी खरपूस भाजलेल्या रव्यासारखा जगण्याच्या तापलेल्या तव्यावरुन तुझ्यापर्यंत पोहोचलो मी पण तू? पाणी कमी पडलेल्या पाकासारखी एका य:कश्चित वेलचीसाठी रुसून बसलेली ३. बटाट्याला पोटात घेऊन, अंगभर बेसनाचा पदर लेवुन, काहिलीवरच्या तप्त कढईतही बेभान उडी घेतलेली— तुझ्यासाठी; बेसनाचा तो पदर दूर करुन, मला कधी कवळशील(३) अशी पर्युत्सुक मी; आणि… शेजारच्या हिरव्या मिरचीचा तोरा, नि लालभडक चटणीचा बडेजाव, यांच्याकडे अतीव प्रेमाने पाहात माझ्या आर्जवांना दूर सारणारा तू ४. दुरूनच जिचा गंध यावा, नि जिच्या लालभडक दर्शनाने आत्मा अधीर व्हावा, असा मिसळीचा कट तू आणि… बटाट्यांपासून पोह्यांपर्यंत, मटकीपासून वाटाण्यापर्यंत; सार्यांमध्ये संघर्ष, तुझ्या सहवासासाठी! यांच्या निवाड्याची वाट पाहात दिङ्मूढ बसलेला शालीन फरसाण मी आपल्या परिणय-प्रसंगी, यज्ञकुंडात आहुतीसाठी सज्ज समिधेसारखा निर्लेपपणे पहुडलेला कांदा… आणि… खाली ढणढणत पेटलेला गावगन्ना अस्मितेचा(४) जाळ… ५. तुझ्या आगमनाच्या प्रतीक्षेत दह्यासारखा टांगून घेतलेला मी आता चक्क्यासारखा फुलून आलो आहे तुझा गोडवा नजरेस पडताच रोमांचाचे केशर मिसळून श्रीखंडासारखा पक्व होऊन होईन
- oOo -
टीपा:
(१). अशाच एका किंकर्तव्यमूढ स्थितीमध्ये स्फुरलेली ‘खिन्न देखणा चेहरा माझा, हुश्श: मुखातुन निसटे’ ही माझी ओरिजिनल ओळ ग्रेसने ‘खिन्न देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातुन वाजे’ अशी बदलून घेतली नि गूढतेचा त्याचा लाडका पॉईंट सर केला. थकलेला, श्रमलेला, कंटाळलेला जीव हुश्श: करेल; बिगुल कुठून आणेल? काहीही लिहायचं उगाच. पण ते जाऊ दे. आपल्या माणसाला फुल फॉन्ट-साईझमध्ये दोष द्यायचा नसतो. [↑]
(२). MCP = Male Chauvinist Pig— पुरुषी अहंकाराने लिप्त व्यक्ती. [↑]
(३). येथील श्लेष ध्यानात घ्या. [↑]
(४). वास्तविक मिसळ हा पावभाजीप्रमाणेच पोटभरु पदार्थ, पण त्याचीही अस्मिता निर्माण करणारे किमान तीन गावचे लोक आहेत. एकुणात भारतीयांना अस्मिता फार प्रिय असते. भविष्यात आप-आपल्या अंडरवेअरच्या रंगांचाही झेंडा करुन त्यावर अस्मिता-युद्धे होतील याची खात्री आहे. सर्जकता नि रचनात्मक विचार याचा संपूर्ण अभाव असलेल्या समाजात अशा थिल्लर अस्मितेचे उद्भव व्हावेत हे अगदीच सयुक्तिक आहे.[↑]
---
संबंधित लेखन: चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही