Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

रविवार, २६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ४ : संग्रह ते व्यापार

  • समूहाची ओळख « मागील भाग

    https://www.sugiproject.com/ येथून साभार.

    मानवी संस्कृतीच्या उदयकालात मानव हा संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) या तीन प्रकारांनी आपले अन्न मिळवताना दिसतो. संग्रहामध्ये प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहार– जसे फळे, बिया वगैरे अंतर्भूत होतो. अपहारामध्ये मध, पक्ष्यांची अंडी, एखाद्या शिकारी प्राण्याच्या शिकारीवर डल्ला मारणे आदींचा समावेश होतो.

    माणूस आणि प्राणी यांच्या सहजीवनाची सुरुवात कुत्र्यांपासून झाली असं म्हटलं जातं. कॉनरॅड लोरेन्झ नावाच्या एका वर्तनवैज्ञानिकाने (ethologist) ’Man Meets Dog’ नावाच्या पुस्तकात माणूस आणि कुत्रा यांच्या सहजीवनाच्या वाटचालीची एक काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. माणसाच्या टोळी मागे सोडलेल्या अतिरिक्त अन्नाच्या वाट्यावर पोसले गेलेले कोल्हे त्यांच्या कुशाग्र घ्राणेंद्रियांच्या आधारे माणसाला शिकारीस साहाय्यभूत ठरत जातात, नि यथावकाश त्या दोन टोळ्यांचे सहजीवन सुरु होते अशी त्यामागची कल्पना आहे.

    माणसाला शेतीचा शोध लागला तेव्हा तो भौगोलिकदृष्ट्या स्थिर झाला, नागर झाला. शिकारजीवी आयुष्यामध्ये अन्य जातीय प्राण्याला ‘माणसाळवण्याचा’ प्रयोग यशस्वी झाल्यामुळेच शेतीच्या आगेमागेच ‘प्राण्यांची शेती’ अर्थात पशुपालनाचाही प्रेरणा मिळाली असावी. त्यातून मग शेळ्या-मेंढ्या, डुकरे, गायी, कोंबड्या यांना आपल्या परिसरातच सांभाळण्यास सुरुवात केली. यातील बहुतेक प्राणी हे दूध, अंडी, शेतीमध्ये खत म्हणून वापरता येणारी विष्ठा यांच्यासह मांसाचा हुकमी स्रोत म्हणून कामी येऊ लागले.

    जंगलजीवी, शेतीजीवी समाज हा अनायासे समूहजीवीही होता. परंतु जेव्हा कुटुंब-वंश व्यवस्था फोफावली, तेव्हा उत्पादन-कौशल्य वंशपरंपरागत झाले. विशिष्ट उत्पादनावर सातत्याने काम करत राहिल्याने उत्पादनाचा दर्जा नि वेग वाढत गेला. गरज वा मागणीनुसार नव्हे, तर उत्पादकाला सोयीचे असेल तेव्हा उत्पादन तयार करुन सिद्ध ठेवता येऊ लागले. पुढे ते ज्याला नि जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा ते पुरवणे शक्य झाले. दोघांकडे असलेल्या वस्तू वा सेवा यांची परस्परांना मान्य होईल अशा विनिमय दराने एकमेकांना आवश्यक असलेल्या वस्तू वा सेवा यांचे देवाण-घेवाण होऊ लागली. विनिमयाची पद्धत रूढ झाली.

    शेतीने बांधलेल्या समाजाप्रमाणे या उत्पादकाचा ग्राहक निश्चित नसल्याने हे दोघे परस्परावलंबी आयुष्य जगत नव्हते. प्रत्येक वस्तू वा सेवा यांचे अस्तित्व समाजाच्या सामूहिक गरजेपासून स्वतंत्र झाले. उत्पादक आणि ग्राहक एका समाजव्यवस्थेने बांधलेला असण्याची गरज उरली नाही. त्यामुळे या विनिमय व्यवहारामध्ये देणारा नि घेणारा एकाच टोळीचा, समाजाचा भाग असण्याची गरज उरली नव्हती. परक्या समाजातील उत्पादकाकडूनही गरजेची वस्तू घेणे शक्य झाले. यातून संभाव्य ग्राहकसंख्या वाढल्याने देवाणघेवाणीच्या सोयीसाठी अतिरिक्त उत्पादनाला वाव मिळू लागला, जे कौशल्य नि तंत्राच्या विकासाने साध्य होऊ लागले. यामुळे आपल्या टोळी वा समाजाच्या कौशल्य वा अधिकारक्षेत्रात उपलब्ध होऊ शकत नसलेले उत्पादनही उपभोग्य होऊ शकले आणि तिच्या गरजांची कक्षा रुंदावली.

    कक्षा या शब्दामुळे मला रसायनशास्त्रातील मूलद्रव्यांच्या अभ्यासातील रासायनिक अभिक्रियेची आठवण झाली. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असू शकते याची एक क्षमता (capacity) असते. हे इलेक्ट्रॉन अणुकेंद्राभोवती एकाहुन अधिक कक्षांमध्ये ते फिरतात(?). पैकी पहिल्या कक्षेमध्ये जास्तीतजास्त दोन, तर पुढील प्रत्येक कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन असू शकतात. ज्यांच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या क्षमतेइतकी असते अशी मूलद्रव्ये स्वयंसिद्ध (प्रामुख्याने noble किंवा inert gases) असतात. ती कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेऊन संयुगाची निर्मिती करू शकत नाहीत. स्वयंपूर्ण टोळी ही त्या स्वयंसिद्ध मूलद्रव्यांसारखी असते.

    उलट ज्या मूलद्रव्यांच्या अणूतील एखाद्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्सची कमतरता (valency) असते, अशी मूलद्रव्ये इतर मूलद्रव्यांशी अभिक्रिया करताना त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन स्वीकारून कक्षेची क्षमता पुरी करण्याचा प्रयत्न करतात. त्याद्वारे नव्या संयुगाची निर्मिती होत असते. विनिमयाची प्रक्रिया या रासायनिक अभिक्रियेतील इलेक्ट्रॉनप्रमाणे केवळ गरजांच्या देवाणघेवाणीतून दोन टोळ्यांचे सहजीवन प्रस्थापित करू शकते. शिकारजीवी असताना ज्या टोळ्यांमध्ये शत्रुत्वाखेरीज कोणतेही संबंध असू शकत नव्हते, त्या टोळ्यांनी विनिमयाद्वारे आपल्या कक्षा रुंदावल्या नि परस्परांशी व्यावहारिक बंध निर्माण केले.

    पण अशा तर्‍हेने अन्य टोळीकडून आपल्या गरजा भागवू पाहणारी टोळी परावलंबी झाली. तिच्या काही उपभोग्य वस्तूंचे उत्पादन तिच्या नियंत्रणाच्या बाहेर गेले. त्यातील माणूस स्वत:च्या टोळीप्रमाणेच अन्य टोळी वा समाजाशी बांधला गेला नाही, तरी व्यावहारिक नाते जोडू लागला. टोळीची, समाजाची वीण सैल होऊ लागली.

    विनिमयपूर्तीमध्येही एक बंधन अजूनही शिल्लक होते आणि ते होते ‘उपलब्धते’चे! समजा मला एका उत्पादनाची गरज निर्माण झाली आहे नि ते एका व्यक्तीकडे अतिरिक्त म्हणून उपलब्ध आहे. पण त्या व्यक्तिलाही काही गरजा आहेत. पण त्यातील एकही गरज भागवण्याजोगे उत्पादन वा सेवा देणे मला शक्य नसेल, तर मला आवश्यक वस्तू तिच्याकडून मिळणार नसते.

    ‘इस हाथ दे, उस हाथ ले’ या व्यवस्थेत हा समतोल गरजेचा असे. म्हणजे माझ्याकडे देय असलेल्या गोष्टींच्या मोबदल्यामध्ये मला हवी ती गोष्ट देऊ करणारीच व्यक्ती वा गट मला शोधावा लागे. यातून माझे पर्याय नि म्हणून अनुकूल व्यवहार करण्याची कुवत (bargaining power) कमी होत असते.

    या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आधारवस्तूची संकल्पना अंमलात आणली गेली. गणितामध्ये, मोजमापामध्ये जसे अंक, अंतराची एकके (फूट, वीत वगैरे) यांच्या पटीत मोजमापे केली जात, तसे मुबलक उपलब्ध असलेल्या तिसर्‍या वस्तूच्या (उदा. कवड्या, एखाद्या वृक्षाच्या दीर्घजीवी बिया) संदर्भात दोन्हींची ‘किंमत’ निश्चित करुन एकतर्फी व्यवहार पार पाडला जाऊ लागला. इथे देणारी व्यक्ती कदाचित ती सामायिक वस्तूच घेई (जी पुढे तिला गरजेची अन्य वस्तू घेण्यास उपयोगी ठरे) वा तितके ‘श्रेय’ अथवा ‘वायदा’ (credit) घेई. भविष्यात घेणार्‍याकडून आवश्यक वस्तू घेताना हा वायदा वापरला जाई. या एकतर्फी व्यवहारांतून देवाणघेवाणीच्या दोन बाजू सुट्या झाल्या. देवाण नि घेवाण हे एकाच व्यवहाराचे भाग असण्याची गरज संपली. एका विनिमय-व्यवहाराचे रूपांतर ‘खरेदी’ नि ‘विक्री’ अशा दोन स्वतंत्र व्यवहारामध्ये झाले आणि या दोन्हींला आधार म्हणून चलनाची संकल्पना उभी राहिली.

    एखाद्या उत्पादकाला त्याच्याकडील उत्पादनाच्या परताव्याच्या मर्यादेतच (उत्पन्न) आपल्या सर्व गरजांचे नियोजन करावे लागे. एखादे वेळी काही कारणाने ते उत्पादन कमी झाले असेल, तर त्या उत्पादनाचा प्रतिनग विनिमय दर वाढवणे अपरिहार्य ठरे. आजच्या भाषेत ते महाग होई. हे विनिमय व्यवस्थेमध्ये करणे जिकीरीचे होते, परंतु चलनाच्या आधाराने तसे करणे अधिक सोपे आहे.

    https://shabbir.in/buy-bse-sell-nse/येथून साभार.

    पण त्या एका उत्पादकाची लहर वा निर्णय म्हणून हे घडू शकत नाही. त्या वाढवलेल्या मूल्यासह व्यवहार करणारा ग्राहकही मिळायला हवा. शिवाय आता उत्पादक हा समाजव्यवस्थेपासून सुटा झाल्याने एकाहुन अधिक उत्पादक स्वनिर्णयाने त्याच उत्पादनाचे उत्पादन करु शकत असे. त्यामुळे खरेदी करु इच्छिणार्‍याला एकाहुन अधिक ‘विक्रेते’ उपलब्ध झाले. त्यातील एकाने मूल्य वाढवले, तर ग्राहक सहजपणे दुसर्‍या विक्रेत्याकडे जाऊ शकतो. म्हणजे ज्याने उत्पादनाचे मूल्य– खरेदीची किंमत– वाढवले, त्याचे उत्पादन विकले न जाण्याची शक्यता वाढली.

    पण उलट दिशेने टोळीबाह्य विनिमयाच्या संकल्पनेमुळे ग्राहकाला जसे उत्पादकांचे पर्याय उपलब्ध झाले, तसे उत्पादकाच्या संभाव्य ग्राहकांचे क्षेत्रही विस्तारले. आता दोनही बाजूंना आपापल्या गरजेचा अधिक स्वतंत्रपणे विचार करणे शक्य झाले. त्यातून उत्पादकाला नि ग्राहकाला संभाव्य ग्राहक नि संभाव्य उत्पादक (पुरवठा) यांचा विचार करून ‘वाजवी किंमत’ निश्चित करता येऊ लागली. आणि जेव्हा विक्रेता नि ग्राहक दोघांना मान्य असलेली किंमत निश्चित होई तेव्हा व्यवहार पुरा होई. म्हणजे ही किंमत निश्चित करताना मागणी नि पुरवठा या दोहोंचाही विचार अंतर्भूत झाला.

    वस्तूचे मोल हे निव्वळ गरजेनुसार वा उत्पादनखर्चानुसार न ठरवता उपलब्धता नि मागणी यांच्या वास्तविक स्थितीच्या आधारे ठरवणारा हा ‘मूल्य निर्धारणाचा सिद्धांत’ पुढे नव्या व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. आता विनिमय-व्यापाराने सहजीवनाचे बंध सैल केले असले, तरी स्वत: व्यापार हा स्वत:च एका नव्या व्यवस्थेने - अर्थव्यवस्थेने - बांधला गेला. बंदिस्त सामाजिक व्यवस्थेची जागा बंदिस्त अर्थव्यवस्थेने घेतली.

    परंतु या आधारवस्तूला– चलनाला– विनिमयाचा आधार म्हणून टोळी वा समाजाने (अथवा ज्या व्यक्तिंना वा गटांना आपसांत असे व्यवहार करायचे आहेत त्यांनी) मान्यता द्यावी लागते, जेणेकरुन तिला सर्वच व्यवहारांमध्ये मान्यता राहील नि ती प्रवाही राहू शकेल. मोजक्याच व्यवहारांत तिला मान्यता मिळणार असेल, तर ती मोजक्यांकडे एकवटली जाईल नि तिचे खरेदी-मूल्य घटत जाईल. त्यायोगे तिचा वापरही हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे हे चलन एका समाजव्यवस्थेला बांधले जायला हवे. व्यापक नागरीकरणानंतर चलन हे समाजव्यवस्थेला नव्हे, तर राजकीय व्यवस्थेला बांधले गेले आहे.

    चलनाच्या आधाराने उपलब्धतेनुसार, शक्य असेल तेव्हा, हे सुटे खरेदी वा विक्रीचे व्यवहार होऊ लागले. ‘गरज’ नसतानाही होऊ लागले. व्यापारव्यवस्थेचा उदय झाला. टोळी वा शेती/शिकारप्रधान समाजामध्ये व्यक्तीचे कार्यस्वातंत्र अतिशय किमान पातळीवर असते. बहुतेकांना आपले कार्य निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. व्यापारप्रधान समाजाने हे बंधन बरेचसे सैल केले आहे. आपला उदरनिर्वाह करण्यास आपण कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावे वा सेवा पुरवावी याची निवड करण्याचे स्वातंत्र्य या व्यवस्थेमध्ये आहे. इतकेच नव्हे तर निव्वळ उत्पादन नि थेट सेवा यांच्यादरम्यान वितरण (distribution), प्रसिद्धी (publicity), प्रशिक्षण (training), विपणन (marketing) अशी विविध नवी कौशल्याची क्षेत्रे खुली झाली आहेत.

    विशेष म्हणजे जगभरातील उत्पादन वा सेवांच्या संख्येच्या तुलनेत मोजक्या संख्येने असलेल्या विविध राजकीय व्यवस्थांच्या या चलनांमध्ये आपसांत विनिमय व्यवस्था चालू राहिली आहे. या सार्‍यांना बाजूला सारून जगातील सर्वच व्यवहारांना सामायिक असे एकमेव जागतिक चलन निर्माण करण्याइतपत सहजीवनाचे महत्त्व जगभरातील समाजांना वा त्यांच्या धुरिणांना वाटत नाही. नफ्याला नि म्हणून व्यापाराला असलेल्या त्यांचे प्राधान्यामुळे, अशा चलनामुळे निर्माण होणार्‍या व्यावहारिक अडचणी टाळणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. म्हणून ती कल्पना अंमलात आणणे आजवर टळले आहे.

    संपूर्ण जगाचे नाही तरी युरपिय राष्ट्रांचे ‘युरो’ हे एक चलन निर्माण केले आहे. पण त्याचे तोटेही दिसून आले. दोन देशांतील चलनांच्या विनिमय मूल्यांमध्ये असलेला फरक जिथे उपयुक्त ठरत होता, तिथे हे सामायिक चलन काही देशांच्या गळ्याचा फास बनून राहिले आहे. २००८ च्या मंदीच्या काळात कर्जबाजारी झालेला ग्रीस या सामायिक चलनाच्या साखळदंडामुळे अधिक खोल रुतत गेला. या उलट आपले स्वतंत्र चलन राखणारे आईसलँडसारखे छोटे बेट-राष्ट्र स्थानिक उपाय राबवून त्यातून वेगाने बाहेर येऊ शकले. म्हणजे सहजीवन ही निरपवाद श्रेष्ठ समाजव्यवस्था आहे असे निदान चलनासंदर्भात तरी म्हणता येत नाही.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » सहजीवन आणि अर्थकारण

रविवार, १९ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ३ : समूहाची ओळख

  • समूहजीवी « मागील भाग

    समूहजीवी समाज, मूर्त ओळख

    केवळ सहजीवन आणि सहभोजन यांखेरीज आचार-विचारांत सामूहिकता आली ती सामायिक कर्मकांडातून. मानवी (किंबहुना सर्वच प्राणी, पक्षी व कीटकांच्या) आयुष्यातील जन्म नि मृत्यू या दोन घटना निश्चित आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम कर्मकांडे त्यांच्याभोवती उदयाला आली. जगभरातील सर्वच मानवटोळ्या नि समाज यांच्यामध्ये या दोन घटनांभोवती गुंफलेली कर्मकांडे आहेत.

    चित्रपटप्रेमींना डिस्नेच्या सुप्रसिद्ध ‘द लायन किंग’मधील सिंहराज सिम्बाच्या जन्माचा प्रसंग आठवत असेल. रफीकी हे माकड वनराज मुफासाच्या टोळीचा भगत वा पुरोहित आहे. मुफासा आणि सराबी यांच्या या पुत्राच्या– म्हणजे सिंबाच्या जन्मानंतर तो त्या ‘युवराजा’ला उचलतो नि गुहेतून बाहेर येतो. मुफासाचे जणू सिंहासनच असलेल्या त्या उंचावरील ‘प्राईड रॉक’च्या टोकाशी उभा राहातो आणि सिंबाला दोन्ही हातांनी उचलून उंच धरतो(१)— त्याच्या सर्व ‘प्रजेला’ दिसावे इतका उंच. आपल्या नव्या युवराजाला पाहून सर्व प्राणी आनंदोत्सव साजरा करतात.

    प्राणिजीवनात हा प्रसंग अर्थातच अतिरंजित आहे. पण माणसांच्या टोळ्यांमध्ये रफीकीप्रमाणेच भगत/पुरोहिताने वा एखाद्या ज्येष्ठाने नवजातावर जातक संस्कार करुन पुर्‍या टोळीला, समाजाला त्याची ओळख करुन देण्याचा हा प्रसंग हे त्या जिवाच्या आयुष्यातील पहिले कर्मकांड. जन्माप्रमाणेच मृत्यूशी निगडित कर्मकांडेही माणसाची ओळख निश्चित करणारी असत.

    शिकारजीवी जमाती शिकारीच्या मागावर भरपूर प्रवास करीत. कित्येक दिवस वसतीपासून दूर राहात. या दरम्यान टोळीतील एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याचे शव अर्थातच उचलून वसतीपर्यंत आणत नसत. त्याच ठिकाणी त्याचे दफन करुन त्यावर दगडांचा एक मनोरा - केर्न (Cairn) - उभा करीत. (कारण दगड हे कुठेही नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असत.) हा मनोरा त्या सहकार्‍याचे स्मरण असे आणि तिथे असलेल्या संभाव्य धोक्याचेही. पुढे नागर झालेल्या अब्राहमिक धर्मांनी या शिलामनोर्‍याऐवजी आकर्षक, कोरीव मृत्युशिळेची अथवा मृताच्या टोळी वा क्रॉससारख्या प्रतीकाची स्थापना करण्यास (आणि त्यावर लहानसा मृत्युलेख - Epitaph- कोरण्यास) सुरुवात केली. निसर्गजीवींनी त्यांच्या सहजीवनामध्ये, कर्मकांडांमध्ये मनुष्येतर सजीवांनाही सामील करुन घेतले होते. आफ्रिकेमध्ये प्रत्येक टोळीचे एक नैसर्गिक आराध्य दैवत असते, त्या त्या टोळीकडून त्या प्राण्या-पक्ष्याला वा वृक्षाला अभय मिळत असते. या वैविध्यामुळे काही प्रमाणात निसर्गसंरक्षणही साध्य होते.

    टोळीतील ज्येष्ठांच्या अनुभवाचा मार्गदर्शनामार्फत लाभ मिळत असल्याचा उल्लेख वर आला आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही तो मिळत राहावा अशी इच्छा त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये निर्माण झाली. पण दस्तऐवजीकरण करण्यास आवश्यक लेखन वा मुद्रण कला तोवर विकसित झालेली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष वारसा हा अप्रत्यक्ष वारशामध्ये रूपांतरित केला गेला. प्रत्यक्ष माहिती, ज्ञान यांच्याऐवजी ‘गोळाबेरीज निवाड्या’ची पद्धत स्वीकारली गेली. आधीच मृत झालेले हे पूर्वज तपशीलवार मार्गदर्शन करणे शक्य नव्हते. मग त्यांना मोजके पर्याय देऊन निवड करण्यास मुभा दिली गेली. महत्त्वाच्या प्रसंगी या मृत पूर्वजांचा असा ‘कौल’ घेण्याचा प्रघात रूढ झाला(२). पूर्वजांचे एक प्रकारे दैवतीकरण होऊन त्याभोवती कर्मकांडे वाढत गेली. आफ्रिका, द. अमेरिका, उत्तर आशियातील राष्ट्रांतून आजही पूर्वजांचे हे स्थान बरेचसे टिकून आहे.

    पुढे माणूस नागर नि प्रगत होत गेला, विविध टोळ्यांचे समाज झाले तसतशी कर्मकांडे त्याला अनुसरून बदलत गेली. या कर्मकांडाची सामायिकता समाजातील सदस्यांमध्ये एकतेची भावना दृढ करत असते. जन्म नि मृत्यु या नैसर्गिक घटनांशी निगडित कर्मकांडांपलिकडे प्रत्येक टोळीची आहारपद्धती, संवादपद्धती (भाषा), पेहराव यांच्यातही सामायिकता होती. सारांशाने सांगायचे तर वंश, उपास्य दैवत/ उपासना पद्धती, भाषा, वसतीस्थान, आहारपद्धती या सार्‍यांमधून त्यांची सामूहिक ओळख निर्माण होत होती, तसेच अन्य टोळ्यांपासून तिचे वेगळेपणही निश्चित होत होते. हे सर्व निकष व्यावहारिक होते आणि सामूहिकता सेंद्रिय पद्धतीने विकसित झालेली होती. या समाजांमध्ये व्यक्तिला स्वतंत्र असे स्थान नव्हते, समाजाचा एक एकक (subject) हीच तिची ओळख होती.

    परंतु एकदा कर्मकांडांतून मानसिक आधार शोधू लागलेल्या माणसाने, सामाजिक कर्मकांडांपाशी न थांबता वैय्यक्तिक आयुष्यातील वयात येणे, लग्न, प्रशिक्षण-प्रारंभ, कार्यारंभ आदी विविध घटनांभोवती लहान-मोठी कर्मकांडे निर्माण केली.


    विकेंद्रित समाज, अमूर्त ओळख

    अन्नाचा अपुरा पुरवठा, टोळीची वाढती लोकसंख्या वा अंतर्गत संघर्ष यामुळे टोळीला वा तिच्या एका गटाला स्थलांतर करावे लागे. टोळी वा तिच्यातील एक गट वेगळा होऊन अन्न नि वसतीसाठी योग्य अशा भूमीच्या शोधात निघून जाई. हा पुढे नव्या भौगोलिक परिसंस्थेशी जुळवून घेत स्थिरावे. तिथे त्याची वाढ होई.

    या टोळीमध्ये काही प्रमाणात मूळ टोळीची कर्मकांडे रुजलेली असत. हेतुत: त्यात बदल केला नाही तर ती बव्हंशी तशीच चालू राहात. पण मूळ चालीरीती, कर्मकांडे यांत काही थोडे बदलही होत नि मूळ टोळीहून थोडा वेगळा चेहरा या टोळीला मिळत जाई. ही प्रक्रिया निरंतर चालणारी होती. यातून टोळीचे विकेंद्रीकरण होई. विविध ठिकाणी पसरलेल्या या विभागांमध्ये एक महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) म्हणता येईल अशा चालीरीती, कर्मकांडे समान असत. यातून त्यांचा परस्पर-संबंध दिसून येत असे. पुढे दोन माणसे परस्परांसमोर आली की एकमेकांच्या चालीरीती, कर्मकांडे जाणून घेऊन परस्परांशी विश्वासाने, अविश्वासाने की औपचारिकपणे वागावे याबाबत निर्णय घेतला जाई. ‘तू कुठला नाच नाचतोस? घुबडाचा की मोराचा? या प्रश्नांतून एकमेकांची टोळी वा परंपरा जाणून घेतली जाते’ असा उल्लेख ‘द लायटनिंग बर्ड’ या लायल्‌ वॉट्सन यांच्या निरंजन घाटेंनी अनुवादित केलेल्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते.

    टोळीचे असे विकेंद्रीकरण न होता, उलट दिशेने, भिन्न समूहांचे केंद्रीकरण होऊन त्या समूहाला सामायिक ओळख देता आली… विविध भौगोलिक तुकड्यांवर जगणारे समूह कर्मकांडे, चालीरीतींनी कृत्रिमरित्या एकत्र बांधले तर…? यातून विकेंद्रित स्वरूपाची एक मोठी टोळी वा समाज बांधता येईल. धर्मसंस्थांनी नेमके हेच साध्य केले आहे! शिकारजीवी, जंगलजीवी जगामध्ये टोळी ही सेंद्रीय पद्धतीने विकसित होत जाई, पण धर्माच्या टोळीच्या विस्ताराला श्रद्धा, उपासनापद्धती, राजकीय सत्तेपासून हत्यारांपर्यंत अनेक रचनात्मक… आणि विध्वंसकही मार्ग उपलब्ध झाले.

    धर्मांनी विविध वंशांच्या, विविध भौगोलिक परिसंस्थांमध्ये निवास असणार्‍या समूहांना अशी सामायिक ओळख निर्माण करुन दिली. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने जगणार्‍या मानवी टोळ्यांना पुन्हा एकवार सांघिकतेचे, सहकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तिने नीतिनियमांची कुंपणे घालायला सुरुवात केली. ज्यू आणि ख्रिस्ती या अब्राहमिक धर्मांचे मूलाधार असणार्‍या दहा आज्ञा (Ten commandments) हे त्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण. हे नीतिनियम, त्याच्याशी निगडित आचार-विचार अनुसरणारा जगभरातील कुणीही व्यक्ती या व्यापक टोळीचा, समाजाचा सदस्य होत असे. हे नीतिनियम संकल्पनास्वरूप, अव्यावहारिक असल्याने धर्मसंस्थांनी उभारलेल्या टोळ्या वा समाज हा भौगोलिक सीमा लंघून विस्तारू शकला.

    जमिनीच्या दूरदूरच्या तुकड्यावर विखुरलेले एकाच धर्माचे हे लोक आता कोणत्याही व्यावहारिक बंधाने बांधले गेलेले नव्हते. तरीही त्यांच्यामध्ये आपण एका टोळीचे, एका समाजाचे भाग असल्याची भावना निर्माण होत होती. कारण त्यांची सामायिक ओळख कर्मकांडांप्रमाणे मूर्त नव्हती, ती कोणत्याही भौगोलिक, व्यावहारिक कुंपणांशिवाय सिद्ध होणार्‍या अमूर्त अशा संकल्पनांच्या आधारे निर्माण झाली होती.

    कर्मकांडे औपचारिकरित्या विकसित होत असली, तरी ती जगण्याशी निगडित होती. धर्मसंस्थांनी निर्माण केलेले बंध हे नियमित आचार-विचारांशी संबंधित होते, बव्हंशी अव्यावहारिकही होते. कर्मकांडांचा जगण्याशी असलेला बंध वगळून त्यामागच्या निव्वळ विचारांना नीतिनियमांचे स्वरूप दिले गेले होते. टोळी वा समाजाची ओळख ही जगण्याकडून विचाराकडे सरकू लागली होती. प्राकृतिक देवांच्या टायटन्स, ऑलिम्पियन्स, वैदिक देवांच्या पिढ्यांची माघारही याच सुमारास सुरू झाली असावी. अब्राहमिक धर्मांनी तर मूर्त जगाशी नाळ जोडलेल्या मागील सार्‍या दैवतांना नाकारत अमूर्त अशा एकेश्वरवादाची मुहूर्तमेढ रोवली. यातून त्या धर्मांच्या विविध भूभागांवर वसलेल्या अनुयायांमधील वारशाचे वेगळेपण पुसून समानधर्मा असल्याची भावना अधिक प्रभावीपणे रुजवता आली.

    पण हे करत असताना विविध बलिष्ठ वा बलवान समाज व टोळ्यांना आपलेसे करताना संघर्षाचे प्रमाण किमान राखण्यासाठी त्यांची मूळ ओळख असणार्‍या कर्मकांडांना मोडून न काढता अलगद सामील करुन घेतले. (याची काही उदाहरणे ‘सण आले जुळुनी’ या लेखात सापडतील.) यामुळे अमूर्त नैतिकतेच्या कल्पनांच्या आधारे निर्माण झालेल्या धर्मसंस्थांमध्येही कर्मकांडांचे स्थान निर्माण झाले… यथावकाश मूळ नीतिनियमांना मागे सारत ते शिरजोर झाले नि अखेर त्यांची ओळखच होऊन गेले.

    मानवी टोळ्या हा जसा समाज होता तसाच सत्ताही. त्याच्या सदस्यांमध्ये परस्पर-बंध होते तसेच त्यांनी जमिनीच्या एका तुकड्यावर अधिपत्य निर्माण केलेले असे. त्या तुकड्यावर ते आपले अन्न मिळवत असत. धार्मिक समाजाने मात्र अमूर्त विचारांच्या वा संकल्पनांच्या आधारे बस्तान बसवले होते. तिने बांधलेला समाज हा भौगोलिकदृष्ट्या विकेंद्रित स्वरूपाचा होता. अमूर्त संकल्पनांच्या आधारे टोळीचा विस्तार वेगाने होत असतानाच त्या टोळीची अनुषंगे भूगोलाच्या ज्या-ज्या भागावर वसली होते त्या भूभागांच्या स्वामित्वाची आसही या विशाल टोळीमध्ये ओघानेच वाढू लागली. त्यामुळे सत्तेची प्रेरणा बळावून (काही इतिहासकारांच्या मते तीच मूळ प्रेरणा होती) ती राजकीय सत्तेला पूरक, क्वचित स्पर्धक म्हणूनही उभी राहू लागली.

    यामुळे भौगोलिक सलगतेने बांधल्या गेलेल्या समाजात भिन्न धर्मीयांमध्ये निर्माण झालेल्या वेगळेपणाच्या भावनेने विसंवाद निर्माण होऊ लागले. परिणामी धर्मसत्ता ही अनेकदा भौगोलिक, राजकीय सत्तेला डोईजड होऊ लागली, पर्यायी सत्ताकेंद्रे निर्माण करु लागली. (पण सत्तेबद्दल विवेचन करणे हा लेखनाचा विषय नसल्याने अधिक विस्तार करत नाही.) मग राजकीय सत्तेने धर्मसत्तेला शह देण्यासाठी एक देश, एक वंश, एक भाषा यांचा नारा देत वंश नि भाषा वारशाने जोडलेल्या समाजाला एकत्र राखण्याचा प्रयत्न केला. पण हे निकषही यथावकाश शिरजोर झाले नि राजकीय सत्तेला आतून सुरुंग लावू लागले.

    एक अर्वाचीन ठळक उदाहरण युगोस्लाव्हिया या देशाचे पाहाता येईल. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस सर्व द. स्लाव्हिक भाषिकांचे राज्य (Kingdom) म्हणून हा देश उदयाला आला. दुसर्‍या महायुद्धानंतर साडेतीन दशके इथे मार्शल टिटो याच्या नेतृत्वाखाली रशियन पद्धतीची सोविएत कम्युनिस्ट व्यवस्था राबवली गेली. परंतु त्याच्या निधनानंतर त्यातील घटक राज्यांमध्ये कुरबुरी वाढू लागल्या आणि एका दशकातच बोस्निया-हर्झेगोविना, क्रोएशिया, माँटेनेग्रो, उ. मॅसडोनिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया ही सहा घटक-राज्ये वेगळी झाली. इतकेच नव्हे तर पुढील दोन-दशकांत सर्बियामध्येही कोसोवो आणि वोज्वोदिना हे स्वायत्त प्रदेश निर्माण झाले आहेत. कोसोवोचा स्वायत्त प्रदेश आपल्याच अधिपत्याखाली असावा यावर सर्बिया नि मॉन्टेनेग्रो यांच्यातील विवाद कायम आहे. पण कोसोवोची संसद मात्र संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करते आहे.

    मनुष्यसमूहाला एकत्र ठेवण्यासाठी बळ दिले गेलेले निकष उलट दिशेने त्याच्या विघटनासही कारणीभूत ठरू लागले. याचे एक कारण हे सारे घटक एकाच वेळी काम करत होते आणि ‘प्राधान्य यांपैकी कशाला असावे?’ हे नवे – तिसरे! – संघर्षाचे बळकट कारण त्यांनीच निर्माण करुन दिले होते.

    असे असले तरी अर्वाचीन जगात सर्वसाधारणपणे एकाच धर्माची माणसे ही विविध देशांत विखुरलेली असतात. तिथे त्या त्या देशांच्या राजकीय सत्तेखाली राहात असताना ते आपापल्या चालीरिती वैय्यक्तिक पातळीवर पाळत असतात. एकुणात आधुनिक जगामध्ये धार्मिक समाज हा निरंतर विखंडित नि विकेंद्रित होत चालला आहे नि राजकीय सत्ता त्यावर वर्चस्व राखून आहे.

    पुन्हा, या नियमाला इस्रायल हा एक ठळक अपवाद आहे. एका धर्माची विखुरलेली टोळी एका सलग भूभागावर एकत्र आणून त्यांचे एक राष्ट्र, एक देश, एक राजकीय सत्ता निर्माण केली गेली आहे. स्वत:वरील अन्यायाचे भांडवल करत असतानाच इतरांचे मूलभूत हक्कही बेगुमानपणे चिरडत जाणारा हा युद्धखोर देश, अजूनही मागास टोळी मानसिकतेच्या जगात वावरणार्‍या अनेकांसाठी आदर्श होऊन राहिला आहे. रोचक बाब म्हणजे या देशाच्या निर्मितीकाळातच समूहजीवी प्रारूपाच्या एका नव्या समाजाच्या निर्मितीची चाचणी घेण्यात आली होती. त्याबद्दलचा तपशील पुढे येईलच.

    Credit: https://www.aclu-wy.org/ येथून साभार.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » संग्रह ते व्यापार

    टीपा:

    (१). हा भगत वानरकुलातील का निवडला याचे कारण तुम्हाला आता कळते. शारीरिक जडणघडणीचा विचार करता इतर कोणताही प्राणी ही कृती करू शकला नसता. [↑]

    (२). एकुणात माणसाचा कल नीतिनियमाला, आकलनाला कर्मकांडात रूपांतरित करून, तेवढेच अनुसरत मूळ नियमांना, आकलनाला विसरून जाण्याकडे अधिक असतो. ‘ज्येष्ठांबद्दल आदर असावा’ हा झाला संस्कार, नैतिक संकल्पना; पण ‘ज्येष्ठांच्या पाया पडणे’ हे त्याचे कर्मकांड. कुणी एखादा पाया पडताना दिसला की, ‘बघा किती चांगले संस्कार’ असे म्हटले जाते. पण हे संस्काराचे केवळ कर्मकांड असते. वैय्यक्तिक आयुष्यामध्ये ज्येष्ठांच्या पाया पडण्याचे कर्मकांड पार पाडून एरवी अनादराने, तुच्छतेने, तुसडेपणाने वागणे शक्य आहे, माझ्या पाहाण्यात अशी बरीच उदाहरणे आहेत.

    शालेय शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना ज्ञान व माहितीचे आकलन करून देणे हा असतो. ते झाले की नाही याची चाचणी परीक्षेद्वारे होत असते. आता परीक्षेत उत्तम गुण मिळाले म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्यातील ज्ञानाचे आकलन झालेच असेल असे नाही. केवळ पाठांतराचा रट्टा मारूनही त्याने गुण मिळवले असतील. कारण परीक्षा ही ज्ञानाची केवळ एक चाचणी आहे आणि चाचणीत यशस्वी होण्याचे इतरही मार्ग आहेत. तेव्हा उत्तम गुण मिळवणे हे कर्मकांड आहे, त्यामागचा उद्देश विसरून फक्त कर्मकांड पार पाडणे शक्य आहे.

    अगदी विज्ञानाच्या क्षेत्रातही पाहिले तर बुद्धिमत्ता, ज्ञान यांचा उल्लेख करायचा तर बहुतेकांना केवळ न्यूटन, आईन्स्टाईन वा फारतर अलिकडे श्रॉडिंगरची आठवण होते. उदाहरण म्हणून यांचे अनुक्रमे सफरचंद, E=mc^2 हे समीकरण आणि ‘मांजर जिवंत आहे नि मेलेलीही’ हा गूढ म्हणून आकर्षक वाटणारा तर्क, हे तोंडावर फेकले जाते. एखाद्या चित्रपटात, मालिकेमध्ये शास्त्रज्ञ म्हणजे बहुतेक वेळा रसायनशास्त्रज्ञच दाखवला जातो. त्याला पडद्यावर तसे दाखवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याला त्याच्या प्रयोगशाळेत दाखवायचा. म्हणजे काय तर त्याच्याभोवती चंचूपात्र (beaker) स्तंभमापक (burette) शंकूपात्र (conical flask) परीक्षा-नळी (test-tube) बुन्सेन बर्नर, उर्ध्वपातनाचा लांब चोचीचा चंबू वगैरे मांडून ठेवायचे नि त्यात विविध रंगांचे द्रव दाखवायचे. त्यापलिकडे संवादांमध्ये कुठेही भौतिकशास्त्राच्या, रसायनशास्त्राच्या अगदी प्राथमिक, शालेय पातळीवरच्या संकल्पनांचा उल्लेख करण्याचीही गरज नसते. हे एवढे दृश्य पुरते. [↑]

सोमवार, १३ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - २ : समूहजीवी

  • प्रस्तावना « मागील भाग


    सजीवांतील सहजीवन

    निसर्गामध्ये प्रगतीच्या वाटेवर सजीवांची वाटचाल संघर्ष नि सहकार या दोन साधनांच्या आधारे होत असते. या दोन्हींचा वापर करुन संरक्षण नि आक्रमकता या दोहोंसाठी आवश्यक विविध गुणकौशल्यांचा विकास होत असतो किंवा ज्यांच्याकडे ते अधिक विकसित असतात ते जगण्याच्या वाटेवर वेगाने पुढे जाऊ शकतात.

    संघर्षामध्ये सजातीय प्राण्यांशी होणारे संघर्ष आणि अन्य प्रजातींशी होणारे संघर्ष असे दोन प्रकार दिसतात. पैकी अन्न (आणि त्यासाठी हद्दीचा) संघर्ष हा सजातीय नि अन्य जातीय अशा दोनही प्रकारच्या जीवांशी होतो. पण त्याखेरीज नरांचा सजातीय प्राण्यांशी जुगण्याच्या हक्कासाठीही संघर्ष होत असतो. हा प्रत्यक्ष संघर्ष प्राणिकुलांत आणि कीटकांच्या काही प्रजातींमध्ये दिसतो. पक्ष्यांमध्ये स्पर्धा असली, तरी प्रत्यक्ष संघर्ष क्वचितच दिसतो.

    सहकारामध्ये एकाच प्रजातीच्या सजीवांचे सहजीवन आणि भिन्न प्रजातींचे परस्पर-सहकार्य असे दोन प्रकार दिसतात. काही मुंग्या वारूळामध्ये विशिष्ट कवकाची ‘शेती’ करतात. यात त्यांना थेट न पचणारे सेंद्रीय पदार्थ आणून ते या कवकांना ‘खाऊ घालतात’. त्या बदल्यात हे कवक त्यांचे विघटन करुन मुंग्यांना पचतील अशा अन्नामध्ये त्याचे रूपांतर करतात. काही मुंग्या मावासदृश aphids प्रजातीच्या कीटकांचे संगोपन करुन त्यांच्या शरीरातून स्रवणारा दुधासारखा पदार्थ सेवन करतात. त्या बदल्यात त्यांची टोळी या कीटकांचे त्यांच्या शत्रूंपासून संरक्षण करते, सुरक्षितता प्रदान करते. हे आंतर-प्रजाती सहकाराचे उदाहरण आहे. उंच झाडावर बसलेल्या माकडाने किचकिचाट करुन शिकारी प्राण्याच्या आगमनाची इतर भक्ष्य प्राण्यांना सूचना देणे असेल की शहरात साळुंक्यांनी कलकलाट करून मांजराच्या आगमनाची चाहूल देणे, हे एकतर्फी मदतीचे उदाहरण.

    पण सहकारापेक्षा सहजीवनाचा आढळ निसर्गात, विशेषत: प्राण्यांमध्ये, चांगलाच रूढ आहे. कारणे भिन्न असली तरी हरणांसारख्या भक्ष्य प्राण्यांपासून लांडग्यांसारख्या भक्षक प्राण्यांपर्यंत, तसंच वानरकुलातील प्राण्यांसारखे या दोन्ही वर्गात मोडणारे बहुतेक प्राणी हे सहजीवनपद्धतीचा अंगीकार करतात. हरणांसारख्या भक्ष्य प्राण्यांमध्ये ‘safety in numbers’ या तत्त्वाचा अंगीकार दिसतो. एकत्रितपणे मोठ्या संख्येने वावरण्याने एका शिकारीमध्ये विशिष्ट हरणाची शिकार होण्याची संभाव्यता (probability)(१) कमी होते. कळपामध्ये जितके अधिक प्राणी तितका प्रत्येक प्राणी अधिकाधिक सुरक्षित होत जातो.

    याउलट शिकारी प्राण्यांमध्येही ‘एकीचे बळ’ महत्त्वाचे असले तरी कळपाची संख्या फार वाढून चालत नाही. कारण तसे झाले तर अन्नातील वाटेकरी वाढतात. त्यामुळे पुरेसे अन्न मिळत नाही आणि अंतर्गत संघर्ष तीव्र होतो. त्यामुळे शिकारी प्राण्यांच्या प्रत्येक टोळीचा संतुलन राखणारी (optimum) एक सदस्य-संख्या असते, ती पार झाली की टोळी विभागते. लांडगे, कोळसुंदे, सिंह (प्रामुख्याने सिंहिणीच्या) यांच्या टोळ्यांमध्ये ही संख्या वेगवेगळी दिसते. भक्ष्य प्राण्यांमध्ये मात्र असे होत नाही. त्यांची टोळी/कळप निरंतर वाढता राहाणे शक्य असते. पण तिथे संख्यानियंत्रणाचे काम शिकारी प्राणी करत असतात.

    निसर्गात सहज दिसणारे, ज्यावर मानवी जीवनही बरेच अवलंबून असल्याने मानवाला ज्याचे सर्वाधिक आकलन झाले आहे असे सहजीवन आहे मधमाश्यांचे; आणि त्याच धर्तीवरचे मुंग्यांचे. या कीटकांचे मोठे जत्थे, कळप सहजीवन जगतात. यांच्यात स्पष्ट अशी कार्यविभागणी दिसते. विशिष्ट कौशल्याचे काम प्रत्येक सदस्य जन्मभर करत राहातो.

    मधमाश्यांमध्ये मधाचा शोध घेणार्‍या, पोळ्याची निगा राखणार्‍या, राणी माशीची सेवा करणार्‍या माश्या; केवळ पुनरुत्पादनापुरते असणारे नर आणि पुनरुत्पादनाचा एकाधिकार नि जबाबदारी असणारी राणी अशी स्पष्ट विभागणी असते. मधाचे पोळे ही एक परिसंस्था म्हणून एकत्रितरित्या जगत असते. यातील एकाही माशीला स्वतंत्र अस्तित्व नसते. यातील कुणीही वैय्यक्तिक आयुष्य जगू शकत नाही, कारण जगण्यास आवश्यक असणारी सारी कौशल्ये एकत्रितरित्या त्यांच्यापैकी एकीमध्ये अस्तित्वात नसतात… आजचा प्रगत मानवी समाजही याच पातळीवर जगतो आहे!

    सारे जगच एक मानवी टोळी असून विविध सेवा, उत्पादने, अन्नधान्ये, यांची विशेष कौशल्ये आत्मसात करुन, त्यांची देवाण-घेवाण करण्याची व्यवस्था त्यात स्थिरावली आहे. पण असे असूनही यात वैय्यक्तिक स्वार्थाला जसा वाव आहे तसाच धर्म, देश, वंश अशा उपगटांना, उपटोळ्यांना स्वतंत्रपणे जगण्यास वाव शिल्लक राहातो आहे. पण या लहानमोठ्या स्वार्थांचे परस्परांना छेद जात आहेत. साधनसंपत्ती, उपभोग्य वस्तू, व्यक्ती यांना आपल्याकडे अधिकाधिक खेचून घेण्याच्या स्पर्धेतून जे अंतर्गत ताण उद्भवत आहेत त्यातून प्रगतीसोबतच परागतीच्या वाटांचेही महामार्ग होताना दिसत आहेत.


    मनुष्यप्राणी: अन्न-वितरण ते संपत्ती

    मानवी संस्कृतीच्या उदयकाळात माणूसही कळपाने राहाणारा प्राणी होता. अन्न, निवारा/संरक्षण नि पुनरुत्पादन या तीन गरजांभोवती त्याचे जगणे बांधलेले होते. या तीनही गरजांची पूर्ती केवळ वैय्यक्तिक पातळीवर होणे जवळजवळ अशक्य असल्याने परस्पर-सहकार्य हा टोळीच्या अस्तित्वाचा मूलाधार होता. साहजिकच त्या जीवनामध्ये वैय्यक्तिक हक्काला स्थान नव्हते. जगण्यात दोनच गरजा; संघर्ष व्हायचा तो त्या संदर्भातच. पहिले म्हणजे अन्न आणि दुसरा देहसुखाचा किंवा जुगण्याचा हक्क(२).

    टोळीने शिकार करणार्‍या प्राण्यांमध्ये टोळी असली, तरी अन्नाचे वाटप वाजवी होईलच असे नाही. बहुतेक शिकारी टोळ्यांमध्ये शिकार जमिनीवर पडली, की टोळीतील सारे तिच्यावर तुटून पडतात. सारे एकाच वेळी खात असल्याने वितरणात प्रत्येकाला वाजवी संधी (fair chance) असते असे म्हणता येईल. पण त्यात बलवंताला अधिक संधी हे ओघाने आलेच. सिंहिणींच्या टोळीने केलेल्या शिकारीवर त्यांना हुसकावून लावून त्यांचा टोळीमालक नर पहिला हक्क प्रस्थापित करतो. कोळसुंदे (जंगली कुत्री) तर भक्ष्य जिवंत असतानाच त्याचे लचके तोडायला सुरुवात करतात. लांडगे मात्र अन्य टोळी-सदस्यांची काळजी घेतात असे दिसते. पण असा एखादा अपवाद, बाकी बहुतेक शिकारी प्राण्यांत गोडीगुलाबीने प्रत्येक टोळी-सदस्याला अन्नाचा वाटा देण्याची वहिवाट नसते.

    पण माणसांचे असे नाही. वानरकुलापासून मनुष्यप्राणी वेगळा झाला तो त्याच्या मेंदूच्या विकासामुळे. या प्रगत मेंदूमुळेच त्याला टोळीतील प्रत्येक सदस्याचे महत्त्व नि स्थान ध्यानात आले असावे. टोळीतील प्रत्येकाला अन्नाचा वाटा दिला पाहिजे हे शहाणपण त्याला आले असावे. आज निरर्गल स्पर्धा नि निरंकुश साठेबाजीला प्रोत्साहन देणार्‍या भांडवलशाहीप्रधान व्यवस्थेमध्ये हे शहाणपण अस्तंगत होताना दिसते आहे.

    वयोमानापरत्वे आलेल्या शारीरिक मर्यादांमुळे टोळीतील ज्येष्ठांना शिकारीत भाग घेणे अवघड होई. पण मागील अनुभवांच्या आधारे माहिती-ज्ञानाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवणे आणि त्या अनुभवाच्या आधारे टोळीसमोर येणार्‍या अडचणींचे निवारण करण्यासाठी उपाय शोधणे आदी कामे या पिढीच्या शिरावर होती. बाह्य धोक्याच्या धाक हा ही अन्न-वाटपावर परिणाम घडवणार घटक होता. बाह्य धोक्याशी, शेजारी/शत्रू टोळ्यांशी जो संघर्ष होई, त्यात यश मिळण्याची शक्यता वाढवायची असेल, तर टोळीतील सदस्य संघर्षाच्या परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेने लढण्यास सिद्ध असायला हवा. यासाठी संघर्षात प्रामुख्याने लढणार्‍या पुरुषांना पुरेसे अन्न मिळायला हवे.

    टोळीचे मुख्य बळ म्हणजे त्यातील सदस्यांची संख्या, ती सतत वाढती राहायला हवी. आणि ज्या पुनरुत्पादनक्षम स्त्रिया ती वाढवणार, त्यांनाही पुरेसे अन्न हवे. मुले तर भावी लढाऊ रसदच. अशा तर्‍हेने प्रत्येक सदस्याचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे निश्चित होत असे. त्यामुळे मोजक्या व्यक्तिंनी वा एखाद्या उपगटाने फार अधिक वाटा बळकावला, इतर सदस्य कुपोषित राहून हा समतोल बिघडे नि टोळीचे भविष्य धोक्यात येई. परस्परावलंबी आयुष्यामुळे गरजेहून अधिक बळकावण्याच्या स्वार्थी वृत्तीला आपोआप आळा बसे.

    त्याचबरोबर अन्न हे नाशवंत असल्याने त्याच्या साठवणुकीला मर्यादा होती. वाघ, चित्ते आदी एकांडे शिकारी प्राणी एकदा केलेली शिकार बहुधा एकाच वेळेस संपवू शकत नाहीत. मग ते आडबाजूला, पाना-फांद्यांच्या कचर्‍याखाली ती झाकून ठेवतात, पुढच्या भुकेची तरतूद म्हणून. पण ही साठवण अत्यंत मर्यादित काळ उपयुक्त ठरते, कारण मांस हे लवकरच सडू लागते. माणसाने आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करुन अतिरिक्त अन्नाच्या साठवणुकीचा कालावधी वाढवला असला, तरी त्यातून सुदूर भविष्याची तरतूद करणे त्यालाही शक्य नव्हते. त्यामुळे अवाजवी साठवणुकीला आणि म्हणून विषम-वितरणाला फारसा वाव नव्हता.

    अंतर्गत संघर्षाचे दुसरे कारण म्हणजे जुगण्याचा हक्क. मनुष्य वगळता वानरकुलातील इतर प्राण्यांच्या टोळ्यांमध्ये केवळ टोळीप्रमुखालाच हा विशेषाधिकार असतो. तो डावलून जुगण्याचा प्रयत्न करणार्‍या, त्याला विरोध करणार्‍या नर व माद्या दोघांनाही त्याचे फटके खावे लागतात. लांडग्यांसारख्या टोळीमध्ये अशा व्यभिचारासाठी टोळीबहिष्कृतीची शिक्षा दिली जाते. टोळीप्रमुखाचा हा विशेषाधिकार हिरावून घेण्यासाठी वयात आलेल्या इतर नरांची त्याच्याशी स्पर्धा होत असते. यातून होणार्‍या अंतर्गत संघर्षाने टोळी दुर्बळ होण्याचा धोका असे. हे ओळखून मनुष्यटोळ्यांनी अन्य सजातीय प्राण्यांत नसलेली एकास-एक जोडीदाराची संकल्पना रुजवली. या व्यवस्थेमुळे अंतर्गत संघर्षाचे प्रमाण बरेच कमी करता आले. सामूहिकतेकडून वैय्यक्तिकतेकडे नेणारे बहुधा हे पहिले पाऊल असावे.

    एकास-एक जोडीदार निश्चित झाल्याने जन्मलेल्या मुलांचे पितृत्वही निश्चित होऊ लागले. यातून कुटुंबसंस्था आकार घेऊ लागली. कुटुंबापाठोपाठ कुटुंबियांची उतरंड, म्हणजे वंश-संकल्पनाही रुजली. टोळीतील प्रत्येक व्यक्तिला उरलेल्या बहुसंख्येपेक्षा काही सदस्य अधिक जवळचे झाले. हितसंबंधांमध्ये प्रतवारी आली… टोळी-अंतर्गत या लहान टोळ्या निर्माण झाल्या. टोळी/समाजामधील बंध काहीसे सैल होऊ लागले.

    शिकारजीवी माणूस पुढे माणूस शेती करू लागला, नागर झाला. या व्यवस्थेमध्येही सामूहिकता होती. शेती करणारा कुणबी, हत्यारे बनवणारे लोहार, सुतार, मडकी घडवणारे कुंभार या सार्‍यांची उत्पादने ही समाजासाठी होती, गरजेनुसार प्रत्येकाला त्या त्या वस्तूचा पुरवठा करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्याचवेळी त्यांच्या गरजाही त्याच प्रकारे भागवल्या जात असत. एखाद्याने आपल्या कामात कुचराई केली तर त्या तुटवड्याचा फटका पुर्‍या समाजाला बसत असे. त्यामुळे ती व्यक्ती पुर्‍या टोळीची, समाजाची गुन्हेगार ठरत असे. त्याची शिक्षा म्हणून बहिष्कृतीचे जे अस्त्र उगारले जाई, त्यानंतर त्या व्यक्तिला स्वतंत्रपणे जगणे अशक्य होऊन जाई.

    जंगलजीवी, शेतीजीवी समाज हा समूहजीवी होता. त्याचे हे समूहजीवी असणे ही त्याच्या अस्तित्वाच्या लढ्याची गरज होती. शिकार असो वा शेती, सहकाराखेरीज साध्य होत नव्हते. शेतीचा शोध नि अंगीकार केल्यानंतर माणूस नागरजीवी झाल्याने सहनिवासीही झाला. शेतीमधून अन्नाची शाश्वती निर्माण झाल्यामुळे जगण्यातील अन्नाशी निगडित संघर्ष काहीसे बोथट झाले. मानवी आयुष्यात अधिक उसंत निर्माण झाली.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » समूहाची ओळख

    टीपा:

    (१). प्रत्यक्षात संभाव्यता या संकल्पनेचे व्यावहारिक अर्थ फार क्वचित समजतात. अगदी शक्यताविज्ञानाच्या (Probability Theory) शिक्षक वा विद्यार्थ्यांनाही पुस्तकी व्याख्येपलिकडे फार आकलन नसते. [↑]

    (२). काही मंडळी यालाच ‘पुनरुत्पादनाचा हक्क’ असे म्हणतात. पण हे दोन्ही समानार्थी नाही! [↑]

सोमवार, ६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १ : प्रास्ताविक

  • भारतीय भाषांतील धंदेवाईक मनोरंजन माध्यमांना वावडे असणार्‍या ‘विज्ञान-काल्पनिका’ (science-fiction) अनुभवायच्या तर तुम्हाला इंग्रजीकडे वळावे लागते. त्यातही हॉलिवुडकरांच्या अंगणात गेलात, तर भूतकाळातील काही राजे-राज्यांच्या संघर्षाला भविष्यात नि अंतराळात नेऊन ठेवलेले तुम्हाला पाहावे लागते. किंवा वर्तमानातील कथा/चित्रपटांतील महानायकांचे (super-hero) अवतार तिकडे नेऊन त्याला कुण्या एलियन शत्रूशी दोन हात करायला लावलेले दिसतात. कुठलेसे ‘एम्पायर’ नि कुठलासा ‘रेझिस्टन्स’ यांच्या संघर्षाच्या कथा संगणकाच्या साहाय्याने चित्तथरारक चित्रचौकटींमधून सादर करुन ते तुमची मती गुंग करुन टाकतात. प्रत्येक वेळी आपण जणू नवेच काही कथानक पाहात आहोत अशा भ्रमात तुम्हाला ठेवून ही मंडळी आपले खिसे भरताना दिसतात.

    एखाद्या कथानकास विज्ञान-काल्पनिका म्हणवून घेण्यास त्यात वैज्ञानिक भविष्याचे केलेले भाकित नि वर्तमान वैज्ञानिक प्रगतीची स्थिती यांच्यात एक तर्कसंगती राखावी लागते. आजच्या काळात न दिसणारा हा वैज्ञानिक प्रगतीचा टप्पा त्या भविष्यातील समाजरचना, वैय्यक्तिक आयुष्य, राजकीय परिस्थिती यांच्यावर कसा परिणाम करतो, याची बांधणी करता यायला हवी. इंग्रजीमध्ये extrapolation असा शब्द आहे, किंवा गणिती/संख्याशास्त्रीय भाषेत forcasting अशी संज्ञा वापरली जाते.

    आजवरच्या माहिती-बिंदूतून एखादा परस्पर-संबंध प्रस्थापित करुन, त्याला भविष्याकडे ताणून जिथे पोहोचू शकतो, अशा अवकाशामध्ये हे कथानक रुजलेले हवे. त्या जगाने केवळ कल्पनाविश्व (fantasy) म्हणून उभे न राहाता, वर्तमानामध्ये त्याची मुळे रुजलेली दिसायला हवीत. पण त्याचबरोबर त्याच्या फांद्या मात्र वर्तमानाचे आवरण फाडून पुढे विस्तारायला हव्या. भूतकाळातील धातूच्या तलवारीऐवजी बटण दाबून मूठभराची हातभर होणारी लेझरची तलवार एवढाच फरक करुन इतिहासातील लढाईची भविष्यकालीन आवृत्ती चितारणारा बालिशपणा नसावा.

    माझ्या या अपेक्षांशी सुसंगत अशा मोजक्याच मालिका गेल्या दहा-एक वर्षांत पाहाण्यात आल्या. ब्लॅक-मिरर, डार्क (ही मूळची जर्मन भाषेतील), अपलोड, सेव्हरन्स या अलिकडच्या काळातील अशा काही मालिका. यांसोबतच मागील शतकातील एव्हरग्रीन ‘स्टार-ट्रेक’, तसंच ‘द ट्वायलाइट झोन’, ‘द आउटर लिमिट’ (या तीनही मालिका माझ्या जन्मापूर्वीच्या !) या मालिकांमधील काही भागही अशा वैज्ञानिक कल्पनेच्या भरारीचे दर्शन घडवणारे होते. चलच्चित्रांच्या (Animation) क्षेत्रातील ‘फ्युचुरामा’नेही (Futurama) काही उत्तम विज्ञान-कल्पना मांडून दाखवल्या होत्या. (त्यातील काहींना चक्क विनोदप्रधान कथानकाच्या माध्यमातून सादर केले होते हे विशेष.) पहिला टप्पा (Season) अलीकडेच संपवलेली ‘प्लरिबस’ ही मालिका– निदान कथाबीजाच्या (premise) पातळीवर तरी या मांदियाळीमध्ये सामील करता येते.

    या लेखनाचा उद्देश Pluribus ची गोष्ट सांगणे अर्थातच नाही, त्याचे तथाकथित परीक्षण लिहिणे नाही की रसग्रहणही. (ज्यांत पुन्हा मोठा भाग गोष्ट सांगणाराच असतो.) ती मालिका पाहात असताना जाणवलेले मुद्दे, त्यातून फुटलेले विचाराचे प्रवाह आणि आत्मसात केलेल्या आकलनाचे दस्तऐवजीकरण करणे हे आहे. हे माझे आकलन आहे. ज्याची मुळे या मालिकेच्या कथानकात रुजली असली तरी त्याचा विस्तार माझ्या विचारांच्या अवकाशामध्ये, माझ्या अनुभवविश्वाच्या परिघात, माझ्या कुवतीच्या मर्यादेत होत गेलेला आहे. ‘आकलनाच्या कलाने…’ या मागील लेखामध्ये आकलनाबाबत जे विवेचन केले ते प्रामुख्याने या मालिकेच्या व्याप्तीमागची भूमिका स्पष्ट करण्यासाठीच.

    प्लरिबसमध्ये एका सर्वव्यापी अपघाताने मानवी समाजाची घडी संपूर्णपणे बदलते आहे. ही नवी व्यवस्था धर्म, वंश, देश, भाषा या सार्‍या सीमा पुसून विशाल मानवी समाजाची प्रतिष्ठापना करते आहे. केवळ सहजीवन नव्हे, तर सहसंवेदन ही संकल्पना रुजवते आहे. मानवी समाजाला जणू एका कुटुंब म्हणून रूपांतरित करताना निसर्गातील इतर जिवांशी बांधिलकीही प्रस्थापित करते आहे.

    या व्यवस्थेतूनही अपवाद म्हणून निसटलेले काही जण आहेत आणि मालिकेची कथा यांच्याभोवती फिरते आहे. कारण त्यातून विक्रियोग्य असा ‘ड्रामा’ लेखकांना नि निर्मात्यांना निर्माण करता येतो आहे.

    पण मला या अपवादांमध्ये वा त्या ड्रामामध्ये रस नाही. माझे लक्ष वेधून घेतले आहे ते त्या नवनिर्मित व्यवस्थेने. या व्यवस्थेमध्ये मला प्रस्थापित नि प्रस्तावित अशा दोन प्रकारच्या व्यवस्थांची प्रतिबिंबे दिसत आहेत. तेव्हा या व्यवस्थेचे मूल्यमापन करताना, तिच्या भविष्याचा वेध घेताना या व्यवस्थांशी जोडून पाहाता येते आहे. बरे या व्यवस्थाही काही आभाळातून टपकलेल्या नाहीत, त्यांच्यावर त्यांच्याही पूर्वसुरींचे सकारात्मक, नकारात्मक प्रभाव असतातच. त्यामुळे ही सारी साखळीच बारकाईने पाहावी असे मला वाटले. त्यातून ही मालिका साकार झाली आहे.

    माणसाच्या इतिहासामध्ये सहजीवनाची मांडणी विविध प्रकारे केली गेली आहे, विविध व्यवस्था निर्माण झाल्या. काही माणसाने हेतुत: घडवल्या तर काही सेंद्रिय पद्धतीने विकसित होत गेल्या. यांचे अवशेष जगाच्या कानाकोपर्‍यात कुठे न कुठे अजूनही तग धरून आहेत. त्याअर्थी यातील कोणतीही एक व्यवस्था निर्विवाद श्रेष्ठ म्हणता येणार नाही. यातील काही रुजल्या, काही रुजवल्या, काही स्थलांतरित मानवाने सोबत नेल्या, तर काही लादल्या गेल्या आहेत.

    इथे मी विशिष्ट क्रमाने त्यांचा उहापोह करतो आहे. हा क्रम कालानुक्रमे लावलेला आहे असा माझा दावा नाही! (चार-दोन दशकांपूर्वीच्या घटनांबाबत छातीठोकपणे सांगता येत नाही तिथे शतकांच्या, सहस्रकांच्या इतिहासातील घटना व कालानुक्रमाबद्दल तसे सांगणे केवळ अहंकाराने स्वत:ला ज्ञानी समजू लागलेल्यालाच शक्य आहे.) या मांडणीतून मला अभिप्रेत असलेले, प्लरिबसमधील व्यवस्थेशी सांगड घालणारे आकलन आकार घेते आहे. ते आकलन माझ्या दृष्टीने ऐतिहासिक बिनचूकपणापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

    त्यामुळे ‘प्लरिबस’च्या नमनाला घडाभरच नव्हे तर चांऽगले बॅरलभर तेल ओतणार आहे, कारण माझा उद्देशच तो आहे. त्या मालिकेमध्ये दिसलेल्या सामाजिक व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी मला त्याची गरज वाटते आहे. त्या बॅरलभर तेलाने माझ्या मेंदूचे चांगले मालिश केले आहे. त्यातून जे स्रवले ते इथे मांडत जाणार आहे.

    एखादी दीर्घ क्रमसंगत (episodic) मालिका लिहिताना सर्वात मोठा धोका असतो तो बौद्धिक थकवा किंवा विचलित होऊन भरकटण्याने मालिका अर्धवट राहाण्याचा. यापूर्वी हा अनुभव असल्याने लेखन पुरे झाल्याखेरीज प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला. त्यातून ५ मे ला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट लांबले नि जुलै उजाडला. परंतु फायदा हा की सुरुवात करतानाच ती पुरी होईल याची हमी देऊ शकतो आहे.

    एखाद्या वृत्तपत्रीय स्तंभाइतका विस्तार असलेली ही मालिका आहे. म्हणून ही प्रकरणे ठराविक काळाने क्रमवार प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. दर सोमवारी पुढचे प्रकरण प्रकाशित करण्याचा मानस आहे. यातील सर्व भाग मिळून एकत्रितरित्या एक आकलन समोर ठेवतात. त्यामुळे अधलेमधले प्रत्येक प्रकरण काही माहिती देत असले, तरी क्रमवार वाचणेच इष्ट ठरणारे आहे. तेवढी चिकाटी नि वेळ वाचकाला मिळावी ही स्वार्थी सदिच्छा.

    काही काळापूर्वी मराठी संस्थळावर लिहित असताना तेथील एका सदस्याने ‘हे पाच मैल लिहितात. इतकं कोण वाचणार?’ अशी प्रतिक्रिया दिली होती. या लेखनाच्या विस्ताराकडे पाहून काही वाचक तेच म्हणणार आहेत याची जाणीव आहे. पण पाच मैल धावल्यावर जो घाम निघतो, त्यातून आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात याकडे लक्ष वेधून थांबतो.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » समूहजीवी

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

आकलनाच्या कलाने…


  • मी नुकत्याच संपवलेल्या मालिकेचे उपशीर्षक होते ‘एक आकलन’. त्या आधीही मी एकदोनदा हा शब्द आवर्जून वापरलेला होता. ‘जे लिहिले जाते ते लेखकाचे आकलनच तर असते, मग ही पुस्ती जोडण्याचे कारण काय?’ असा प्रश्न पडू शकतो. त्याबद्दल विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याअर्थी हे ही आकलनाचे एक आकलन म्हणता येईल. या लेखानंतर इथे सुरू होणार्‍या दीर्घ मालिकेसाठी भूमिका स्पष्ट करणारे लेखन म्हणून याच्याकडे पाहाता येईल.

    अभ्यासक, अकादमिक, समीक्षणात्मक, लेखनामध्ये एक लेखनाची चौकट, व्याप्ती निश्चित करुन त्याच्या अंतर्गत लेखनाचा विस्तार करावा लागतो. ती शिस्त पाळावी लागते. विधानांचे आधार वा मुद्द्यांची मांडणी प्रस्थापित लेखनाच्या संदर्भात नि तर्कसंगत पद्धतीने करावी लागते. ललित लेखन हे पूर्णपणे लेखकाच्या अभिव्यक्तीचा आविष्कार असतो, त्याला निवडलेल्या घाट अथवा रचनाबंधापलिकडे फारशी बंधने नसतात.

    रसग्रहणात्मक लेखनामध्ये एखादी कलाकृती– शब्द, दृश्य वा श्राव्य – हे मुख्य विषयवस्तू धरून मांडणी करावी लागते. दुर्दैवाने अशा प्रकारचे लेखन तसे दुर्मीळ म्हणावे लागेल. समीक्षा वा लेख या सबगोलंकारी वर्गवारीखाली आपल्या मते वा निवाड्यांचा तडका मारून मांडलेली माहितीची भरताड, या दोन प्रकारांमध्ये हे तसे अंग चोरून कसेबसे उभे राहाते. आकलनाला प्राधान्य देण्याचा प्रघात या लेखनात अधिक दिसतो. चटकन डोळ्यासमोर येणारी नावे म्हणजे विद्याधर पुंडलिकांचे ‘शाश्वताचे रंग’, विजय पाडळकरांचे ‘कवडसे पकडणारा कलावंत’, के. रं. शिरवाडकरांचे ‘तो प्रवास सुंदर होता’ ही पुस्तके.

    सरसकट ‘बुक ऑन बुक्स’ प्रकारची पुस्तके म्हणजे रसग्रहण नव्हे. ती बव्हंशी वर्तमानपत्री स्तंभस्वरूप असतात. यात माहितीची भरताड असते, थोडेफार विश्लेषण असते, पण आकलनाचा भाग जवळजवळ नसतोच. शाळेत असताना मराठीच्या पेपरच्या अभ्यासामध्ये निबंध हा एक प्रकार असे. गाईडमधला तयार निबंध पाठ करणे नि स्वत:च्या बुद्धीने स्वतंत्रपणे तो लिहिणे यातील जो फरक, तसा काहीसा या विश्लेषणात नि आकलनामध्ये असतो. विश्लेषणाला बरेचदा चौकट असते, पूर्वानुभवाची जोड असते. त्यात सापेक्षता फारशी नसते. एकदा विश्लेषण मांडले गेले, की त्याच्या बीजवृत्तीसह (premise) ते आपल्याला कितपत पटते एवढेच अदमास वाचणारा अजमावू शकतो.

    आता तुम्ही म्हणाल “ हे नाही, ते नाही हे सांगत बसू नका, त्या ‘मराठीत जागतिक दर्जाचे लेखन नाही’ म्हणणार्‍यांसारखे. ‘जागतिक दर्जाचे म्हणजे काय?’ या प्रश्नाचे वस्तुनिष्ठ, तार्किक उत्तर देऊ शकत नाहीत, ते फक्त उदाहरणे तोंडावर फेकत राहातात. तुम्हीही तसे करु नका, काय ‘आहे’ याचे सरळ उत्तर द्या.” तुमचे एकदम बरोबर आहे. तर आता तिकडे येतो.

    सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ‘आकलनामध्ये सापेक्षतेचा भाग ठळक असतो.’ एकाच विषयवस्तू वा कलाकृतीबद्दल माझे आकलन नि इतर कुणाचे आकलन वेगळे असू शकते, नव्हे असतेच. पण आकलन म्हणजे मत अथवा निवाडा नव्हे. ‘हे चांगले आहे.’ किंवा ‘हे आवडले नाही’ म्हणजे आकलन नव्हे. त्याला तर्कसंगती वा कार्य-कारणभावाची जोड हवी. आता ही तर्कसंगतीची वा कार्यकारणभावाची साखळी जी तयार होईल ती तुमच्या विचार, अनुभव आणि दृष्टिकोनाच्या सरमिसळीतून. अकादमिक अभ्यासामध्ये तिचे वेढे हे संदर्भग्रंथातूनच येतील, पण आकलनामध्ये तुमच्या अनुभवाचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसेल. संदर्भाऐवजी जगण्यातून मिळालेले अनुभव, आठवणी आधार असतील, त्याला एखादे वळण देतील. यात काही प्रासंगिक घटना वा उल्लेख असतील. आकलनाला हा प्रासंगिकतेचा पदरही असू शकतो.

    वरकरणी परस्परांपासून कोसो दूर असलेल्या विषयांमध्ये जेव्हा संगती सापडते त्यातून आकलनाला वेगळाच आकार मिळतो, जो कुठल्याही अभ्यासपूर्ण लेखनात तुम्हाला सापडत नाही. गणिती विचाराची प्रतिबिंबेही मला आपल्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत दिसतात. या अनुषंगाने की आधीच काही लेख इथे लिहिलेले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण मला जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘माणसे: अरभाट चिल्लर’ या पुस्तकात सापडले. जीएंनी पायथागोरसच्या प्रमेयाची त्यांना आलेली अनुभूती लिहिलेली आहे. आपला हा अनुभव प्रत्ययकारी भाषेत शब्दबद्ध करता येणार नाही, इतर कुणाच्या ओटीत घालता येणार नाही, याची खंतही व्यक्त केली आहे. ‘लहान मुलांसाठी’ म्हणून नाक मुरडल्या जाणार्‍या चलच्चित्रमालिकांमधूनही मला चलन, राज्यव्यवस्था, भविष्यवेधी विज्ञान यासंदर्भातील काही आकलन सापडत गेले होते.

    संगणकाच्या तुलनेने आधुनिक क्षेत्रातील, सर्वांना अपरिहार्यपणे ठाऊक असणार्‍या विविध अनुषंगे मला मानवी जीवनव्यापारामध्ये दिसू लागतात. जीवशास्त्र नि संगणकशास्त्र आपल्याला वाटतात तितके परस्परांपासून दूर नाहीत. त्यांच्यातही संकल्पनांची संगती दिसू शकते. याचे एक उदाहरण मला नुकतेच सापडले. ते ‘प्लरिबस’ या विज्ञान-काल्पनिकेच्या निमित्ताने लिहिलेल्या आगामी मालिकेमध्ये येईल.

    विषयांचा हात सोडून माध्यमांकडे वळलो तर चित्रपट, लघुपट, चलच्चित्रे, संगीत, ध्वनी, साहित्य अशी विविध माध्यमे आज माणसाच्या मनोरंजनाचा आणि माहिती-ज्ञानाचा स्रोत म्हणून उभी आहेत. चित्रपटातील एखादा प्रसंग, एखादा संवाद, मालिकेतला एखादा भाग, एखाद्या गाण्याचे शब्द, कथा-कादंबरीतील एखादा उतारा वा प्रसंग हे एखाद्या मुद्द्यावरील विचाराला चालना देतात, एक आकलन पदरात टाकतात. पण त्यासाठी त्यांकडे निव्वळ मनोरंजन म्हणून न पाहाता, जिज्ञासा नि आकलनाची आस मात्र हवी.

    पाहाणे (see) नि निरीक्षण (watch) करणे यात फरक आहे. परंतु या दोहोंतही आकलन (understanding) नाही. निरीक्षणाच्या नोंदी या लेगोच्या तुकड्यांसारख्या असतात. त्यांना स्वत:चा आकार असला तरी व्यक्तिमत्व नसते. विशिष्ट क्रमाने जोडून जो आकार तयार होतो तो आकलनाचा. एखाद्या मेंदूने त्यांना जोडले की तो चेहरा साकार होतो. पण त्याने साकार होण्याआधी त्या मेंदूमध्ये आकार घ्यावा लागतो. आकलन ती साखळी आहे जी या लेगोंच्या तुकड्यांचा क्रम नि बंध निश्चित करते. हे बस किंवा घर आहे, तर निरीक्षणे, माहिती, माध्यमे हे लेगोचे तुकडे आहेत. माहितीचे आकलनात रूपांतर झाले नाही, तर तिचे अस्तित्व केवळ त्या लेगोच्या तुकड्यांसारखे, काहीही न सांगणारे.

    आकलन ही एक तर्कसंगती आहे. आणि तर्कसंगती केवळ एक शक्यता उभी करते. तेवढ्यानेच ते वास्तव आहे हे सिद्ध होत नाही. तुमचे आकलन हे असे सापेक्ष असल्याने ते नेमके सत्य वा वास्तव असल्याचा दावा करता येत नाही. तसा ठोस दावा हा विशिष्ट सामाजिक-राजकीय स्वार्थ असेल तेव्हाच केला जात असतो. आकलनातले समाधान मिळवू पाहाणार्‍याने त्या फंदात पडायचे नसते. अर्थात ज्या समाजात एक अनुकूल निरीक्षणदेखील आपल्या पूर्वग्रहाला सार्वकालिक, सर्वव्यापी वास्तव म्हणून सिद्ध करते असे मानणारी बहुसंख्या आहे, तिथे हे सांगणे म्हणजे वाळूत पाणी ओतण्यासारखे आहे.

    जगण्याच्या अनुभवाचा नि अभ्यासविषयाचा संबंध नसतो असे आपले गृहितक असते. डाव्या, उजव्या मंडळींशी बोलताना अनेक बाबतीत असे जाणवले, की हे जो मुद्दा मांडत आहेत तो त्यांनी जगण्यातील अनुभवाशी ताडून पाहिलेला नाही. पडताळणी हा भागच त्यांच्या दृष्टीने दुय्यम आहे. ते एकाच मुद्द्याची परस्परविरोधी विश्लेषणे वाचतील कदाचित, पण व्यवहाराशी ताडून पाहाण्याची सवय बहुतेकांना नाही. त्यामुळे त्यांच्या मुद्द्याला उघड छेद देणारे काही दिसत असताना ते डोळे मिटून बसतात. किंवा ‘चेरी पिकिंग’ पद्धतीने आपल्या मुद्द्याच्या सोयीचे अनुभव वा निरीक्षणेच तेवढी उचलतात नि विरोधात जाणारी ‘अपवाद म्हणून सोडून द्यावीत’ असा हट्ट धरतात. झेंडेधार्‍यांची केस तर पार श्रद्धाळू पातळीवर पोहोचलेली असते.

    आकलन अकादमिक नसते, ते काही संदर्भग्रंथांच्या आधार घेत चालत नाही. स्वयंपाकाच्या ओट्यावर ओघळलेल्या उतू गेलेल्या दुधासारखे ते प्रवाही होते. ओट्याच्या भूस्तर रचनेनुसार त्याची वाटचाल होते. क्वचित हा प्रवाह दुभंगतो, कधी नुसतीच दिशा बदलतो, तर कधी फारसे फाटे वा वळणे न घेता सरळ त्याचे ‘गन्तव्य स्थान’ असलेल्या किचन-सिंककडे धाव घेते. कधी अंतिम सत्य सापडल्याप्रमाणे, तर कधी गति हरवल्यासारखे एकाच जागी थारोळे करुन बसते. तसेच तुमचा विचाराचा प्रवाह काही वाचलेले, काही पाहिलेले, काही आठवणी, यापूर्वीचे काही आकलन, अशा विविध गोष्टींना स्पर्श करत जातो. त्यातून त्या ओघळलेल्या दुधाने जसा अनियमित आकार निर्माण केला तसे तुमचे स्वत:चे आकलन तयार होत जाते.

    एखादा चित्रकार काम सुरु करतानाच कॅनव्हासचे चार तुकडे करून एक एक तुकडा पूर्ण रंगवून काढू शकत नाही. त्याचे चित्र पुर्‍या कॅनव्हासवर हळूहळू ठळक होत जात असते. विविध ठिकाणी त्याच्या अभिव्यक्तीला जागा सापडतात, तो त्या भरत जात असतो. ज्याला अभिजात संगीत वा शास्त्रीय संगीत म्हणतात त्या गाण्यामध्ये ‘उपज अंगाने विस्तार करणे’ असा वाक्प्रचार वापरला जातो. जिज्ञासा नि आकलनाच्या अंगाने केलेले लेखन साधारणपणे यांच्या जातकुळीचे. हे अकादमिक चौकटीमध्ये बसत नाही. त्याच्या मांडणीची चौकटही मुद्द्यांच्या विस्ताराबरोबरच विकसित होत जात असते.

    अकादमिक वा अभ्यासकाच्या लेखनाच्या तुलनेत आकलनामध्ये दृष्टिकोन, पूर्वग्रह आणि गृहितकांना थोडे अधिक स्थान असते. हा वस्तुनिष्ठ अभ्यास नाही, त्यामुळे यांचा बाट मानायचे कारण नाही. किंबहुना या लेखनाच्या रेसिपीमध्ये सापेक्षता हा एक महत्त्वाचा घटक आहे हे मान्य करुन चालायचे असते. अंतिम पदार्थाला त्याची चव राहाणार, मूल्यमापनावर तिचाही प्रभाव राहाणार हे ध्यानात घेऊनच तिचा आस्वाद घ्यायचा असतो.

    - oOo -