-
साठ-सत्तर वर्षांपूर्वी पु. ग. सहस्रबुद्धें यांनी ‘नरोटीची उपासना’ या शीर्षकाचा एक सुरेख लेख लिहिला होता. त्याचा followup म्हणून मी त्याच शीर्षकाचा एक लेख (बरं, पोस्ट म्हणू या, ओके?) एका मराठी संस्थळावर लिहिला होता. एखाद्या सार्थ परंपरेचे बुद्धिहीन कर्मकांडांत रूपांतर होते याची काही उदाहरणे त्यामध्ये दिली होती. यात एक उदाहरण होते निर्माल्य नदीत विसर्जन करण्याच्या प्रघाताचे. नद्यांची सद्यस्थिती पाहाता तो कालबाह्यच नव्हे तर उलट मूळ हेतूला मारकच असल्याचे प्रतिपादन मी केले होते.
त्यावर एक जाज्ज्वल्य तरुण तडफदार विद्वान उगवले नि ‘हिंदूच्याच...’ वगैरे टँ: टँ: करणारी नेहेमीची टेप वाजवून झाल्यावर ‘मी भविष्यात ही नदी साफ करेन असा निश्चय करुन मी निर्माल्य नदीत टाकतो.’ अशी गर्जना त्यांनी केली होती. आज त्याला वीसहून अधिक वर्षे होऊन गेली. या विद्वानांनी नदी स्वच्छ करण्यासाठी काही केल्याचे ऐकिवात नाही.
आज ही आठवण झाली ती बिट्टू तबाही या तरुणामुळे. ‘मी नदी स्वच्छ करेन’ वगैरे गमजा समाजमाध्यमांवर मारत बसण्याऐवजी त्याने थेट कामाला सुरुवात केली. काही महिने खपून त्याने अजनेर नदी स्वच्छ केली. यातून देशभरात आणखी काही तरुणांना प्रेरणा मिळाली नि विविध शहरांतून अशीच मोहिम हाती घेतली गेली.
बिट्टू बिचारा तरुण आहे. त्याला सेनापती बापटांचा किस्सा माहित नसावा. त्यामुळे ‘आपण स्वत: आधी काम केले की लोकांनाही पटेल नि ते स्वत:हून काळजी घेतील.’ असा- या समाजाच्या मानसिकतेचा, संस्कार-वारशाचा विचार करता बावळट- समज त्याचा होता. इथल्या समाजाने त्याची ही हौस चांगली जिरवली. त्याने नदी साफ केल्यानंतर लवकरच नव्या कचर्याने ती भरून टाकली. हा कचरा बव्हंशी निर्माल्याचा होता. बिट्टू हार मानणारा नव्हता. त्याने लोक यायच्या-जायच्या वाटेचा विचार करुन योग्य ठिकाणी दोन कचरापेट्या स्वखर्चाने ठेवून दिल्या... चोवीस तासांत त्यातील एक चोरीला गेली!
’उत्सवाची वर्गणी मागणारे वेळेला धावून येतात, लोकांची कामे करतात’ वगैरे भेकड तर्क देणारे (यात वर उल्लेख केलेले विद्वानही आहेत) ‘बाकीची कामे राहू द्या हो, हंडीनंतर, उत्सवानंतर जो रस्त्यावर कचरा सोडून जातात तो का साफ करत नाहीत? गणेश विसर्जनानंतर विद्रूप, विरुप झालेल्या मूर्ती नदी नामक गटारात केविलवाण्या पडलेल्या दिसतात, त्यांची सन्मानाने विल्हेवाट लावण्याचे काम का करत नाहीत? ज्या श्रद्धेच्या आड लपून ते उतमात घालतात किमान त्या श्रद्धेचे पावित्र्य जपण्याची काळजी का घेत नाहीत?’ या प्रश्नांची ‘हिंमत असेल तर...’ या नेहमीच्या रडक्या, निरर्थक प्रत्युत्तराने मुस्कटदाबी करतात.
आज नदी कचर्याने पुन्हा भरून गेली आहे. हताश झालेला बिट्टू आता हे समाजसेवेच्या लष्करच्या भाकरी भाजण्याचे काम सोडून आपल्या शिक्षणावर लक्ष करण्याचा निर्णय घेतो आहे. दोन ते तीन वेळा हजारो कोटींचा चुराडा करुनही गंगा मैलीच आहे. कारण ती मैली होण्याचे कारण त्यात कचरा टाकणारी श्रद्धा आहे, तिला अटकाव केल्याखेरीज कोणतीही नदी स्वच्छ नि प्रवाही राहूच शकणार नाही हे सामान्यांना समजत नाही. गंगाशुद्धिकरणाबरोबरच तिचे नव्याने अशुद्धीकरण होऊ नये यासाठी प्रबोधन करण्याच्या फंदात आपले सरकार कधीच पडत नाही. त्याचे बजेट योजनेच्या प्रचार-प्रसाराच्या ढोल-ताशांवरच खर्च होऊन जाते.
नदी अस्वच्छ होते ती श्रद्धेचा कचरा त्यात साठतो म्हणून आणि माणसांना त्याची फिकीर नसते कारण त्यांच्या मेंदूत उथळ संस्कारांचा कचरा तुंबलेला असतो म्हणून... हे मान्य करण्याची गरज आहे. पण अस्मितेची मूळव्याध ही ‘देवकृपेने आलेले शेपूट’ समजून तिला हळद-कुंकू वाहात बसलेल्या समाजात ही जागृती कधी होईल असे मला वाटत नाही.
याखेरीज त्यांना मिळालेले संस्कार, तो वारसा हा वर्तमान, भविष्य आणि भौतिकाकडे पाठ फिरवून, कल्याणकारी मानवी मूल्यांपेक्षा अतिशय संकुचित कल्पित, वांझोट्या विश्वात जगण्यास भाग पाडणारा आहे. सारासार विवेकबुद्धी मिळाली असलीच तर फार लहानपणी संस्कार नावाच्या ब्रेन-वॉशिंगमार्फत तिचे निर्माल्य गटारगंगेत वाहवणारा आहे.
बिट्टू, तू मूर्ख आहेस. घाणीत लोळत ‘आमची घाण प्राचीन नि त्यांच्यापेक्षा आमचा चिखल मुलायम’ म्हणत विष्ठा चिवडत बसलेल्या डुकरांना घाणीतून बाहेर काढण्याचा आटापिटा करत आपला वेळ नि ऊर्जा वाया घालवायचा नसतो. त्या घाणीपासून स्वत:चा बचाव करण्याकडे लक्ष केंद्रित करायचे असते.
काही वर्षांपूर्वी 'Futurama' नावाच्या मालिकेत पाहिलेला Cold Warriors हा भाग आठवतो. फार पूर्वी संपूर्ण निर्मूलन केले गेले असल्याने जिच्याविरुद्ध लढण्यास तत्कालीन माणसांच्या शरीरात ant-bodies अस्तित्वात नाहीत, अशा साध्या सर्दीच्या (common cold) शिरकावाने ३१व्या शतकातील जनतेमध्ये कसा हाहाकार उडतो याचे त्यात चित्रण होते. आजही ही सर्दी प्रत्येकाच्या शरीरात कमी-अधिक प्रमाणात तग धरून असते; प्रदूषणयुक्त शहरी जीवनात तर ती ठाणच मांडून बसलेली आहे. इतर अनेक आजारांचे माणसाने जवळजवळ संपूर्ण निर्मूलन केले आहे, परंतु वरकरणी निरुपद्रवी वाटणारी ही सर्दी एखाद्या झुरळासाठी तग धरून आहे. श्रद्धेचेही तसेच आहे.
कावीळ झालेल्या माणसाला जसे सारे जग पिवळे दिसू लागते– किंवा एखादे अंमली द्रव्य घेतल्यावर माणसाला जसे स्वत:मध्ये नसलेल्या शारीर, बौद्धिक बलाचा वा गुणांचा भ्रम होतो तसेच श्रद्धेचेही. तिची मात्रा अधिक झाली की प्रदूषण, विध्वंसही रंगीत चित्रपटासारखे आकर्षक दिसू लागतात. ज्या आवाजाने कुणाची हृदयक्रिया बंद पडू शकते, त्या आवाजामध्ये त्यांना गानकोकिळेचा मधुर आवाज ऐकू येऊ लागतो. आपल्या श्रद्धेखातर इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणे समर्थनीय आहे असे त्यांना वाटू लागते. नशेत धुंद असलेल्यांना जसे आपल्या शोचनीय स्थितीचे भान राहात नाही तसेच अति-श्रद्धेचे होते.
एकुणात सर्दीसारखाच श्रद्धा हा माणसाच्या जगातील सर्वात चिवट नि व्यापक असा संसर्गजन्य आजार आहे. विध्वंस-विकासाच्या मानवी लालसेतून जगली वाचली तर मानवी जमात, आणि पृथ्वीवरील इतर सजीव-सृष्टीला पुढील हजारो वर्षे तो ‘फ्युचुरामा’मधील न्यू-न्यूयॉर्कप्रमाणेच बाधित करत राहाणार आहे.
-oOo-
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
नेकी कर और गटर में डाल
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - परिशिष्ट : ‘पदार्पण’ - एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध)
-
नवे जीवशास्त्र (?)आजच्या जीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये एखाद्या झाडाची प्रजाती, वर्गीकरण निश्चिती ही अनेक निकषांवर होते. (सध्या त्यातील शैवाल, कवक, वेली वगैरे इतर प्रकार सोडून केवळ वृक्ष या एकाच प्रकाराचा विचार इथे करत आहोत.) यातील विविध प्रजाती निश्चिती वा विभागणीसाठी पानांचा आकार, रंग, पोत (texture), खोडांचे म्हणजे सालीचे स्वरूप, मुळांचा प्रकार (सोटमूळ, तंतुमुळे वगैरे), फुलांचा प्रकार-आकार नि विस्तार, पुनरुत्पादनाची पद्धत (बीजोत्पादन, माध्यम, वगैरे) असे बरेच निकष वापरले जातात. पण एक नक्की की मूळ, खोड (अधिक फांद्या), पाने, फुले, फळे, बीज यांच्या एकत्रित समूहाला एक नाव दिले जाते.
काही मुंग्या आपल्या वारूळामध्ये aphids म्हणजे आपल्याकडील मावा किड्याच्या जातीचे कीटक आपल्या वारुळामध्ये पाळतात. त्यांना आवश्यक खाद्य त्या बाहेरून आणून पुरवतात नि त्याबदल्यात त्या कीटकांच्या शरीरातून स्रवणारा दुधासारखा पांढरा स्राव सेवन करतात. कीटकांना वारुळाची सुरक्षितता मिळते नि मुंग्यांना हवे असणारे खाद्य. आता वृक्षसृष्टीमध्ये मूळ, खोड नि पाने यांच्यामध्येही अशीच विनिमयाची व्यवस्था उभी राहिल्यावर, स्वतंत्र झालेली मुळे नि पाने त्यांच्यातील (खोडामार्फत) होणारी देवाणघेवाण हा असाच जातिबाह्य सहकार म्हणता येईल. जर मुंग्या नि मावा कीटक या स्वतंत्र प्रजाती असतील, तर मुळे नि पाने यांनाही स्वतंत्र जीवांचा दर्जा मिळायला हवा. मग कदाचित जीवशास्त्राला यांच्या वर्गीकरणाचा, अभ्यास-चौकटीचा नव्याने विचार करावा लागेल. पण यात एक अडचणीचा मुद्दा आहे, आणि तो आहे पुनरुत्पादनाचा!
https://thumbs.dreamstime.com/ येथून साभार.एखादा जीव हा बहुधा प्रजाती म्हणून वेगळा ओळखला जातो, तो आपल्यासारख्याच जिवाचे पुनरुत्पादन करणारा असतो. मानवाला त्याचीच प्रतिकृती असणारे मूल होते, मुंग्यांच्या अंड्यांतून पूर्ण मुंगीच बाहेर येते, हरणाचे पाडस हरणासारखे असते आणि गायीच्या पाडसालाही जन्मत: नसली तरी यथावकाश शिंगे उगवत असतात. आजच्या जगातील वृक्षसृष्टीतही एका वृक्षाची बीजे रुजताच त्याच जातीचे मूळ,खोड,पाने युक्त असे संपूर्ण झाडच उभे होते. त्या वृक्षाच्या या तीनही उपांगांच्या शक्यता त्या एका बीजामध्येच एकवटलेल्या असतात.
या निकषावर पाहिले तर मूळ नि पाने ही उपांगे स्वतंत्र जीव म्हणवण्यास पात्र ठरत नाहीत. ‘पदार्पण’ कथेमध्ये विस्ताराने उल्लेख नसला, तरी या संपूर्ण व्यवस्थेचे पुनरुत्पादन पक्ष्यांसदृश स्थलांतर करणार्या बीजांपासून होते असा उल्लेख येतो. म्हणजे या बीजांपासून खोडाची निर्मिती होते नि त्यानंतर इतर उपांगे निर्माण होतात असे गृहित धरावे लागते. याचा अर्थ या वृक्षाच्या जीवनप्रवासात पुढे कधीतरी ही उपांगे खोडापासून सुटी होतात.
आजच्या निसर्गात प्राण्यांची, पक्ष्यांची, काही कीटकांची पुढची पिढीही सुरुवातीचा काही काळ जन्मदात्यांसोबत काढून पुढे स्वतंत्र आयुष्य जगू लागते. त्यांच्याशी तुलना करता ही दोघे मूळ खोडाची पुढची पिढी म्हणावी का? परंतु तसे म्हणण्यासाठी ती गुणवैशिष्ट्यांनुसार आपल्या जन्मदात्यासारखी असायला हवी होती. तशी ती नाहीत. म्हणजे या व्यवस्थेमध्ये प्रजाती-निश्चितीसाठी एका एककाची, एका जीवाची व्याख्या करावी कशी हाच पहिला पेच उभा राहातो आहे.
कथेचा परिघ सोडून विचार केला, तर यांच्यासाठी पुनरुत्पादनाच्या अन्य काही शक्यता असू शकतात. यासाठी सद्य जीवसृष्टीतील अनेकविध पर्याय पाहाता येतील. कांदा जमिनीत रुजवला तर स्वत:ला विसर्जित करून तो नवी तंतुमुळे, नवी हिरवी पात जन्माला घालतो. गाजरापासून - जे मूळ आहे - जिथे पाने अंकुरतात तेथील एक लहानशी चकतीच काढून पाण्यात वा मातीत ठेवली असता त्यातून नव्या पानांचा संभव होतो. काही झाडांच्या फांद्या जमिनीत खोचल्या असता त्यातून नवी मुळे आणि म्हणून नव्या वृक्षाची उभारणी होते.
भटक्या मुळांसाठी गाजराची, तर खोडासाठी गुलाबाची वा ऊसाची पुनरुत्पादन पद्धत सयुक्तिक दिसते. परंतु पानांबाबत पेच राहातो. मुळे नि खोड आजच्या जीवसृष्टीतही मातीशी बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांची त्यातील पुनरुत्पादनाची पद्धतच वापरली जाऊ शकते. परंतु पानांची मातीशी नाळ जुळलेली नाही. त्यामुळे त्यांचे पुनरुत्पादन हे झाडातून फूल वा फळ उगवावे तसे व्हावे लागेल. कदाचित इथे एकपेशीय जिवाचे पुनरुत्पादन पुन्हा उदयाला येऊ शकते. काही वेलींच्या पानाच्या देठापाशीच मुळांसारखे तंतू फुटलेले असतात. त्याच धर्तीवर पानांमधून काही द्रव्य वेगळे होत नव्या पानाची निर्मिती होऊ शकेल. एक अधोरेखित करण्याची बाब म्हणजे अशा व्यवस्थेमध्ये या तीनही जिवांचे पुनरुत्पादन हे ‘अलैंगिक’ पुनरुत्पादनामध्ये रूपांतरित होते आहे. जीवद्रव्याच्या विभागणीतून अथवा त्याचे प्रथम उपांग म्हणून त्यातूनच नव्या जीवाचा संभव (germination) होतो आहे.
जुनी व्यवस्था, नवे जीवया कल्पनाविस्ताराच्या प्रवाहाचा संगम वर्तमान व्यवस्थेशी झाला तर मध्ये काय नि कसे बदल होतील या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी दोन उद्दिष्टे समोर आहेत. यापैकी पहिले– ‘पदार्पण’मधील ग्रहाप्रमाणे अभावाच्या परिस्थिती अथवा भूभागामध्ये जीवसृष्टीच्या विकासाला यामुळे कितपत मदत होईल? आणि दुसरे, यामुळे वर्तमान जीवसृष्टीमध्ये काय बदल घडू शकतील? शक्यतांचा प्रवाह बराच मोठा असणार हे उघड आहे. तेव्हा दोन्ही उद्दिष्टांमध्येही प्रत्येकी एकच उदाहरण घेऊन विस्तार केला आहे.
पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात दीर्घ हिवाळा नि दीर्घ उन्हाळ्याचे ऋतू असतात. हिवाळ्याच्या काळामध्ये इथे वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने त्या तगून राहाणे शक्य नाही. त्यामुळे या प्रदेशांतील वनस्पतीसृष्टीमध्ये जगातील जीवसाखळीचे मूळ असलेले फायटोक्लँक्टन आणि मोजक्या शैवालवर्गीय वनस्पतींचा समावेश होतो. मोठ्या वृक्षांना सोडा, वेलींनाही आवश्यक इतका जीवनरस निर्माण व्हावा यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश इथे उपलब्ध नसतो. फायटोक्लँक्टन हे देखील तरंगते जीव असतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते स्थलांतर करतात. पण त्यामागे कुठलीही प्रेरणा असत नाही. कॅरिबूसारख्या अति-उत्तरेकडील प्रदेशांत आढळणार्या प्रजाती, अनेक पक्षी हे हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे– म्हणजे अधिक उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करतात. ध्रुवीय अस्वलेही हिवाळ्यापूर्वी भरपूर खाऊन घेऊन चरबीच्या स्वरूपात ते साठवून ठेवतात. त्यानंतर हिवाळ्यात ते दीर्घ झोप घेऊन ऊर्जेची गरज किमान पातळीवर आणून ठेवतात.
https://www.idyl.co.in/ येथून साभार.आता ‘उपांगांचे सहजीवन’ स्वरूपातील वृक्षाचा विचार केला तर, त्याची पाने सहेतुकपणे पाण्यावरुन प्रवास करून सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशाकडे स्थलांतर करु शकतील– ‘पदार्पण’मधील पाने करतात तसे. त्यासाठी त्यामध्ये इतर बदल व्हावे लागतील. आता या ध्रुवीय उपांग-जीवी वृक्षाच्या पानांनाही पुरेसे पाणी पोटात घेऊन हिवाळ्यात प्रकाशाच्या दिशेने स्थलांतर करावे लागेल.
या काळात (आफ्रिकेसारख्या वृत्तीय प्रदेशात) राहून प्रकाश-संश्लेषणाद्वारे जीवनरस निर्मितीचे आपले काम चालू ठेवावे लागेल. हा जीवनरस थेट खोडांकडे जाण्याची सोय नसल्याने त्याला सोयीच्या अशा (चरबीसदृश) कोषांमध्ये साठवत न्यावे लागेल. आणि हिवाळा संपता-संपता पुन्हा ध्रुवीय प्रदेशाकडे स्थलांतर करुन हे जीवनरसाचे कोष तेथील खोडामध्ये रिते करून मोकळे व्हावे लागेल. हे करत असताना खोडाकडून आवश्यक तो पाण्याचा वाटा स्वीकारावा लागेल. (कदाचित जीवनरसाचे रिकामे कोषच आता या साठवणुकीस उपयोगी पडू शकतील.)
हिवाळ्यापूर्वी चरबीने सुजलेली अस्वले हिवाळी झोपेतून बाहेर येईतो सारी चरबी झडून गेल्याने हाडाडलेली असतात. या पानांबाबत नि खोडाबाबतही तसेच काहीसे होईल. दोघांकडचा हिवाळी साठा तेवढा वेग-वेगळ्या रसद्रव्याचा असेल. खोडाला पानांनी दिलेला जीवनरस साठवून ठेवावा लागेल; तर प्रकाशाच्या दिशेने जाणार्या पानांना, मुळांनी खोडामार्फत दिलेला पाण्याचा साठा सोबत ठेवावा लागेल.
नवे जीव, जुने जीववनस्पती हे स्थानबद्ध, दुर्बळ जीव आहेत या गृहितकावर माणूस जगत आला आहे. आपल्याला हवे तेव्हा त्यांचे निर्दालन करून त्यापासून अन्न, ऊर्जा आणि दैनंदिन उपभोगाच्या अनेक वस्तूंची निर्मिती तो करत आला आहे. त्या जिवांना एक प्रकारे आपले गुलाम समजत आलेला आहे. परंतु सहजीवी वृक्षसृष्टीचा उदय झाला तर त्याने काय परिणाम असू शकतील याचा विचार केला तर परिस्थिती पालटलेली दिसू शकेल.
जिथून या कल्पनाविस्ताराची सुरुवात झाली त्या ‘पदार्पण’ कथेमध्येच याची चुणूक सापडते. या सहजीवी वृक्षाच्या प्रदेशामध्ये उतरलेली एक वैज्ञानिक अचानक कोसळते. तिला एका हिरव्या मुळाने घट्ट पकडून ठेवलेले असते. इतर सोबती तिची सोडवणूक करण्यास धावतात. त्या धांदलीत एकाकडील पाण्याचा साठा जमिनीवर सांडतो. ते मूळ तातडीने तिला सोडून त्या पाण्याकडे धावते नि तिची सुटका होते.
असे का घडले याचा विचार केला, तर ध्यानात येईल की माणसाच्या शरीरामध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक भाग हा पाण्याचा असतो. मुळांचे कार्य पाणी शोषून घेण्याचे आहे. आजच्या जीवसृष्टीमध्ये वनस्पतींची मुळे जमिनीत असल्याने ती त्यात मुरलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. या उत्क्रांत वृक्षाची मुळे आता जमिनीवर फिरू लागल्याने त्यांच्या पाण्याच्या स्रोतांमध्येही बदल होऊ शकतो. ‘पाण्याचा हुकमी साठा’ म्हणून एखाद्या जिवंत प्राण्याकडेही ती आकर्षित होऊ शकतात…‘अन्नाचा हुकमी साठा’ म्हणून एखादा शिकारी प्राणी एखाद्या भक्ष्य प्राण्याकडे होतो तसा! ही मुळेही लहानसहान प्राण्यांची ‘शिकार’ करून त्यातील पाणी शोषून घेण्याची क्षमता विकसित करु शकतात.
आजवर वनस्पतीसृष्टी ही बव्हंशी भक्ष्य नि प्राणी हे भक्षक अशी व्यवस्थाच आपण पाहात आलो आहोत. या नव्या जीवाच्या उदयानंतर सामना असा एकतर्फी राहाणार नाही! त्या वैज्ञानिकाप्रमाणेच माणसेही या धोक्याच्या कक्षेत आलेली असतील.
- oOo -
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - परिशिष्ट : ‘पदार्पण’ - एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)
-
विज्ञान-काल्पनिका प्रकारातील ‘प्लरिबस’ या मालिकेचा पहिला टप्पा नुकताच पाहाण्यात आला. ‘एका नेमक्या क्षणी पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एका समूह-मनाच्या समाजामध्ये अथवा जीवामध्ये परिवर्तित होते’ अशी कल्पना आधारभूत धरून त्याभोवती तिचे कथानक उभे राहिले आहे. पूर्वाश्रमींच्या मानवी प्राण्यांमध्ये आता सामूहिक मन प्रस्थापित झाल्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज म्हणजे एक व्यापक जीव आणि ही पूर्वाश्रमीची माणसे त्याची स्वतंत्रपणे वावरणारी उपांगे अशी व्यवस्था आकाराला येते आहे.
एक जीव नि त्याची चल (roaming) उपांगे ही व्यवस्था पाहाताना काही वर्षांपूर्वी वाचलेल्या ‘पदार्पण’ या सुबोध जावडेकर यांच्या विज्ञानकथेची (कथासंग्रह: ‘वामनाचे चौथे पाऊल’) आठवण झाली. ‘प्लरिबस’मध्ये एका जगद्व्यापी समूह-मनाच्या व्यवस्थेतून बाहेर राहिलेल्या तेरा जणांच्या त्या समूह-जीवाशी निर्माण झालेला परस्पर-संबंध, सहकार नि संघर्ष याभोवती कथानक उभे राहाते आहे. तर ‘पदार्पण’मध्ये अशाच उपांगजीवी वृक्ष-जीवाच्या संदर्भात नवी शक्यता मांडली आहे. ‘प्लरिबस’मध्ये समूह-मनाची संकल्पना प्राणिसृष्टीमध्ये रुजलेली आहे, तर ‘पदार्पण’मध्ये वनस्पतीसृष्टीमध्ये. दोनही कथानकांची पार्श्वभूमी वेगळी असली तरी पूर्वसूत्र बव्हंशी एकच आहे.
परंतु दोहोंमधील बदलाच्या दिशेतील फरकही ध्यानात घ्यायला हवा. ‘प्लरिबस’मध्ये स्वतंत्र जीवांचे संमीलन (Confluence) होऊन व्यापक पण उपांगजीवी सजीवाची निर्मिती होते आहे. तर या उलट आजच्या जीवसृष्टीच्या संदर्भात पाहिले तर ‘पदार्पण’मध्ये एका सजीवाचा विग्रह होऊन विलग झालेली त्याची उपांगे स्वतंत्रपणे कार्यरत झालेली आहेत.
मनुष्यप्राण्याच्या सामाजिक इतिहासामध्ये समूह-मनाची नसली, तरी समूह-जीवनाची विविध व्यवस्था-प्रारूपे सापडत असल्याने, त्यांचा मागोवा घेत ‘प्लरिबस’च्या निमित्ताने एक दीर्घ मालिका इथे नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. वनस्पतीसृष्टीमध्येही भिन्न जातीय जीवांच्या सह-जीवनाची, परस्पर-सहकार्याची अनेक उदाहरणे सापडतात. परंतु एकाच प्रजातीमधील भिन्न जिवांच्या सहजीवनाची उदाहरणे दुर्मीळ आहेत. त्यामुळे या क्षेत्रात ‘प्लरिबस’वरील मालिकेप्रमाणे दीर्घ उहापोह करणे शक्य नसले, तरी या दीर्घ लेखामधून ‘पदार्पण’मधील कल्पनेचा वेध घेऊन व्यापक शक्यता उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या मालिकेचे परिशिष्ट म्हणून या लेखाकडे पाहाता येईल.
सहजीवीमधमाश्यांसारखे, मुंग्यांसारखे सहजीवी कीटक आपल्या समाजामध्ये, वसतीमध्ये नेमक्या कार्यविभागणीचे नियोजन करत असतात. पुनरुत्पादनाचा एकाधिकार नि जबाबदारी असणारी राणी माशी वा मुंगी, पुनरुत्पादनात सहभागी असणारे मोजके नर, आणि त्या तुलनेत बर्याच अधिक संख्येने असणारे कामकरी नि लढाऊ कामगार अशी विभागणी पोळ्यांमध्ये किंवा वारूळांमधून दिसते. मानवी समाजाने ही संकल्पना कैकपट विस्तारत प्रगतीच्या अनेक वाटा पादाक्रांत केल्या आहेत.
हे सारेच समूहजीवी जीव आहार मिळवण्यासाठी भ्रमंती करतात. त्यांचे वसतीस्थान हे केवळ विश्रांतीस्थळ असते… काहींचे ते ही निश्चित नसते. या सजीवांच्या वसतीस्थानाच्या आसपास अभावाची परिस्थिती निर्माण झाली, तर ही भ्रमंती स्थलांतरामध्येही परिवर्तित होत असते. मानवी समूहामध्येही प्रशासन जरी स्थिर असले तरी इतर उपांगे– म्हणजे माणसे चल (moving) असतात. जशी गरज निर्माण होईल तसे, जिथे ती भागवता येईल, आवश्यक गोष्टी जिथे उपलब्ध असतील, तिकडे जाऊन ते आपली कार्ये पार पाडत असतात.
वनस्पतीसृष्टी याला अपवाद आहे. तिला हा पर्याय उपलब्ध नाही! कारण त्यातील जीव अचल, स्थानबद्ध आहेत. ते ज्या स्थानी रुजले आहे तिथेच त्यांना पाणी, सूर्यप्रकाश वा आवश्यक जीवनद्रव्ये पुरेशी मिळाली नाहीत, तर त्यांचे अस्तित्व खुरटे होते वा संपून जाते.
पदार्पणपरंतु त्यातील वृक्षवर्गाचा विचार केला तर वृक्षाची उपांगे– म्हणजे मूळ, खोड, पाने, बीजे यांची कार्येही निश्चित आहेत. मुळांनी पाणी शोषून आणावे, पानांनी प्रकाश-संश्लेषणाचा वापर करुन सर्व उपांगांना आवश्यक असणारा जीवनरस निर्माण करावा, बियांनी नव्या जीवनिर्मितीच्या शक्यता निर्माण कराव्यात आणि खोडाने या सार्यांना एकत्र राखणारी प्रशासन व्यवस्था म्हणून काम करावे, असे एकुण नियोजन आहे. त्याअर्थी एक वृक्ष एखाद्या पोळ्यासारखा, वारूळासारखा वा मानवी समुदायासारखाच आहे असे म्हणता येईल.
‘मधमाश्या, मुंग्या अथवा माणसे या त्या-त्या समाजाच्या उपांगांप्रमाणेच झाडाची मुळे, पाने आदी उपांगेही चल आहेत नि परस्परांशी केवळ गरजेनुसारच जोडली जातात’ या कल्पनेच्या पायावर ‘पदार्पण’ ही कथा उभी आहे.
इथे पुरा वृक्ष स्थानबद्ध नाही, त्याचे एकटे खोडच तेवढे जमिनीला बांधलेले आहे. परंतु पाणी जमा करण्याचे काम करणारी मुळे, प्रकाश-संश्लेषणातून अन्न निर्माण करणारी पाने मुक्तपणे अनुक्रमे पाणी नि प्रकाशाच्या शोधात फिरु शकतात. जिथे खोड उभे आहे तिथे आवश्यक प्रमाणात प्रकाश, पाणी उपलब्ध नसेल, तर चल असणारी मुळे नि पाने ते उपलब्ध असलेल्या भूमीच्या दिशेने प्रवास करु शकतात. तिथे त्या त्या गरजेची पूर्ती करुन परत येऊ शकतात नि खोडामार्फत त्या दोहोंची देवाणघेवाण पुरी करू शकतात. अभावाच्या परिस्थितीत त्यांच्या चल असण्याचा फायदा मिळून वृक्ष खुरटण्याची वा वठण्याची संभाव्यता कैकपट कमी होते आहे.
खोडाचे काम पानांकडून मिळणारा जीवनरस नि मुळांकडून उपलब्ध होणारे पाणी एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे (आणि आपल्या अस्तित्वासाठी या दोहोंतला वाटा राखून ठेवण्याचे) काम हे मध्यस्थासारखे आहे. फिरत्या मुळांना नि पानांना परतून येण्यासाठी नेमका ‘पत्ता’ सापडावा यासाठी खोडाला नेमक्या ठिकाणी स्थानबद्ध राहाणे आवश्यक ठरते आहे.
आता मुळे स्वतंत्र झाली नि प्रवासही करु लागल्यामुळे ती जमिनीच्या वरही आली. त्याचा अधिकचा फायदा असा झाला की त्यांना केवळ जमिनीतील थेंबभर पाण्यावर अवलंबून राहाण्याची गरज उरली नाही. त्याहून मुबलक पाण्याचे साठेही त्यांना शोधणे शक्य झाले. किंबहुना कथेतील ग्रहावर मुळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यानेच उत्क्रांतीच्या प्रवाहात अशा प्रकारची ‘उपांगजीवी’ वृक्षाची व्यवस्था विकसित झाली वा असलेली टिकून राहिली असावी. परंतु त्या दुर्भिक्ष्याचा परिणाम म्हणून पाण्याचा अंश सापडताच ती अतिशयक आक्रमकपणे तो शोषून घेण्याचा प्रयत्न करत असतात. उत्क्रांतिच्या ‘नैसर्गिक निवडीच्या’ (Natural Selection) नियमानुसार जी मुळे तशी आक्रमक होती, त्या वृक्षांचा वंशच त्या अभावाच्या जगात टिकून राहिला असावा.
पण उत्क्रांतिमध्ये केवळ टिकून राहाणे पुरेसे नाही, वंशविस्ताराचा संभवही आवश्यक असतो. कथेचा निरास या वंशविस्ताराची एक धक्कादायक शक्यता उभी करतो. ‘पदार्पण’ ही कथा असल्याने त्यात कथन होते नि एक निरासही. परंतु निव्वळ त्या कल्पनेवर न थांबता त्या स्वरूपातील सजीवाचे अस्तित्व आजच्या जीवसृष्टीमध्ये संभव आहे का, असल्यास त्या जीवाच्या– आता जीव-समूहाच्या म्हटले पाहिजे– अस्तित्वामुळे एकुण जीवसृष्टीमध्ये काय फरक पडेल, आपले आकलन कसे बदलेल, याचा विचार करणे रोचक ठरेल.
एक कल्पनाविस्तारवृक्षांची उपांगे वेगळी झाली आणि आपली कामे साध्य करण्यासाठी स्थलांतरही करू लागली. मूळ पाण्याच्या शोधात हिंडणार, जिथे पाणी मिळेल तिथून ते शोषून घेणार; साठा पुरेसा झाला की परत येऊन खोडाशी विनिमय करून पाणी देऊन त्याकडून जीवनरस अथवा ऊर्जा प्राप्त करणार. असाच विनिमय व्यवहार पानेही करणार. खोडाचे काम साधारणत: बँकेसारखे– दोन्हींचा साठा नि विनिमय करण्याचे.
आता पुढचा टप्पा म्हणजे या एकास-एक विनिमयाचा विस्तार करुन मानवाने निर्माण केलेल्या व्यापारव्यवस्थेप्रमाणेच व्यापक विनिमय व्यवस्था झाडांमध्येही निर्माण होऊ शकेल. मूळ एकदा सुटे झाले की ते स्वतंत्रही होऊ शकेल. त्याला एका विशिष्ट वृक्षाला बांधील राहाण्याची गरज नाही. माणूस जसा परगावी असताना एखाद्या परक्या घरात वा होटेलमध्ये आसरा घेतो, तसेच जीवनरसाची पातळी घसरली तर ते मूळ दूर असलेल्या आपल्या खोडाऐवजी जवळच्याच एखाद्या सजातीय वृक्षाच्या खोडाशी देवाणघेवाण पुरे करून आपली गरज भागवू शकेल.
आणखी एक पाऊल पुढे म्हणजे खोडही सजातीय वृक्षाचे असायची गरज नाही. रासायनिक प्रक्रियेमध्ये ‘संयुजा’ (valency) म्हणजे संयोग-क्षमता हा कळीचा मुद्दा असतो. इलेक्ट्रॉन देऊन व घेऊन आपली कक्षा पुरी करु पाहाणार्या दोन मूलद्रव्यांमध्ये हा व्यवहार पुरा होऊन दोघांची गरज भागते आणि संयुगाची निर्मिती होते. त्याच धर्तीवर ज्या मुळा-खोडामध्ये देवाणघेवाणीची शक्यता आहे अशा कोणत्याही जातीच्या झाड (खोड) नि मुळामध्ये ही देवाणघेवाण होऊ शकेल. हे शक्य झाले की आणखी एक रोचक शक्यता निर्माण होते…
मुळांना नि पानांना मोजक्या सजातीय खोडांऐवजी अनेक वृक्षजातीच्या खोडांचा पर्याय उपलब्ध झाला, की त्यांच्यातही निवडीचे उद्दिष्ट (objective) निर्माण होईल. ‘प्रवासाचे अंतर मर्यादित केल्यास ऊर्जा-बचत होत असल्याने’ मुळे नि पाने शक्यतो जवळच्या खोडाशीच व्यवहार करू लागतील. मग दूरच्या खोडांची व्यवहार्यता कमी होत जाईल. म्हणजे अभावाच्या भूमीमध्ये खोडेही तगून राहू शकणार नाहीत. मग कदाचित खोडांचेही ‘स्थलांतर’ (अथवा अस्तित्व टिकून राहाणे) हे पुन्हा अन्न पाणी अधिक उपलब्ध असलेल्या भागात एकवटले जाईल. उपांगजीवी व्यवस्था ज्या अभाव-स्थितीवर मात करत उभी राहिली ते कारण आता गैरलागू (redundant) ठरण्याची शक्यता बळावेल. कारण ही उपांगे पुन्हा विशिष्ट भूभागातच केंद्रित होत जातील…
…ही कारणमीमांसा माणसाच्या जगातील महानगरांच्या अवाढव्य विस्तारालाही लागू पडते! मानवी इतिहासात ही व्यवस्था भांडवलशाहीची नांदी ठरली होती. विनिमयातील बचत अधिकाधिक करण्यासाठी परस्परावलंबी व्यवसाय नि सेवा आणि त्यांच्याशी निगडित मनुष्यप्राण्यांची वसती सोयीच्या, सलग अशा भूभागावर एकवटत गेल्याने महानगरांची निर्मिती झाली.
या नव्या जैविक व्यवस्थेमध्येही पाने नि मुळे चल झाल्यामुळे अभावाच्या क्षेत्रात झाडे रुजण्याची वाढलेली संभाव्यता पुन्हा कमी होत जाईल. याला चालना मिळेल ती मूळ-खोड-पाने ही बांधिलकी मोडून निर्माण झालेल्या व्यापक विनिमयाच्या व्यवस्थेमुळे. प्रजातीबाह्य विनिमयातून वृक्षसृष्टीमध्येही अशी एखादी भांडवलशाही व्यवस्था उदयाला येईल का? मग त्यातून उभ्या राहिलेल्या जीवघेण्या स्पर्धेत बलवंतांनी बळाने मागे ढकललेले दुबळे जीव तगून राहाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन एकमेकांना बांधिलकीची हमी देत मूळ-खोड-पाने ही व्यवस्था निर्माण होईल का…?
अभावाची परिस्थिती नवी शक्यता निर्माण करते, ही नवी शक्यता पुरवठ्यामध्ये वाढीच्या वाटा निर्माण करते. पुरवठ्यामध्ये झालेली वाढ सजीवाच्या (खरंतर ही प्रवृत्ती केवळ माणसांत दिसते) मनामध्ये लालसेला जन्म देते. त्यातून पुरवठ्याचा अधिकाधिक वाटा खेचून घेत संचयाचा राक्षस वाढू लागतो. या संचयाच्या फुगवट्यामुळे पुन्हा नवी अभावाची क्षेत्रे निर्माण होऊ लागतात. त्यामुळे आपणच दूर केलेल्या मूळ सहजीवी व्यवस्थेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागते! कारण सामूहिक वापर, ‘गरजेनुसार वापरा’मध्ये रूपांतरित होतो. यातून अतिरिक्त संचयाची (reserve) आवश्यकता नाहीशी होते आणि एकुण समाजाच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक उत्पादन अथवा संग्रहाची (foraging) गरजही लक्षणीयरित्या कमी होते.
- (क्रमश:) -
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १५ : उपसंहार
-
अंत:स्फोटाची अपरिहार्यता « मागील भाग
ते तेरा जण
‘प्लरिबस’मधील या समूह-मनाच्या या सर्वव्यापी बदलाला जगभरात तेरा जण अपवाद आहेत. पृथ्वीवरील मानवजातीच्या सामूहिक ‘धर्मांतरा’मधून हे तेरा जण अनाकलनीय कारणाने सुटले आहेत. मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी हे तेरा जण– प्रामुख्याने त्यातील कॅरल ही लेखिका आहे.
समूह-मनाची अनुषंगे-पूर्वाश्रमीची माणसे- हा ‘अपघात’ निस्तरून घेण्याचा आटापिटा करत आहेत. या तेरा जणांना ते आपल्यात सामावून घेण्यास उत्सुक असले, तरी हे कसे साध्य करावे याची माहिती त्यांना नाही. याचे एक कारण म्हणजे मुळात आपल्यामध्ये हा बदल कसा झाला याची माहिती त्यांनाच नाही. त्यामुळे या जुन्या जगाचा अवशेष असलेल्यांच्या मनांवर आपल्या संघर्षहीन आयुष्यातील तथाकथित सुखी, समाधानी असण्याचे महत्त्व बिंबवत त्यांना वळवून आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यासाठी या ‘बाहेरच्यां’च्या शक्य त्या सार्या इच्छा-आकांक्षा पुरवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना हवी ती वस्तू, हवे ते सुखोपभोग मागणीसरशी हजर केले जात आहेत. उत्पादन आता गरजेशी जोडले गेल्याने आणि मितव्ययी जीवनशैली स्वीकारली गेल्यामुळे, कृत्रिम मागणी निर्माण करणार्या भांडवलशाही हपापलेपणाला इथे थारा उरलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त मालाचा साठा करुन ग्राहकाला गरजेचे तेवढेच उचलून नेण्याची मुभा ठेवणारी ठेवणारी रीटेल स्टोअर्स मोडीत काढली जात आहेत.
परंतु कॅरल आपली जीवनशैली बदलण्याचे नाकारून ‘गरजेच्या वस्तू समूहाकडून न मागवता– म्हणजे त्यांचे ‘उपकार’ न घेता– अशा स्टोअर्समधूनच खरेदी करण्याचा’ निर्धार करते, तेव्हा रिकामे केलेले ते स्टोअर पुन्हा वस्तूंनी भरून उभे केले जाते. त्या तेरा जणांच्या इच्छापूर्तीचे हे बंधन इतके कडक नि अनुल्लंघनीय आहे की त्यातील एखाद्याने अणुबॉम्ब मागितला तरी त्यांना तो पुरवावा लागणार आहे… याची एक चुणूक प्रत्यक्षात दाखवलीही जाते.
पण असे असेल तर ‘आतील’ लोक असूयाग्रस्त होऊन ‘बाहेरचेच आयुष्य योग्य’ अशी प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होणार नाही का? की त्यांच्यामध्ये असलेल्या ‘मुक्त विचारशक्ती’चा (free will) संपूर्ण अभाव याचे हे लक्षण आहे. तसे असेल तर याला समूह-मन म्हणायचे की गुलाम-मन?
सुख म्हणजे नक्की काय असतं?ही ‘पूर्वाश्रमीची माणसे’ त्या तेरा जणांना सांगतात की, ‘आमच्यामध्ये एक जाणीव, एक स्मरणकोष असल्याने आम्ही सारे एकच झालो आहोत. त्यामुळे आता परस्परांबद्दल द्वेष, अहंकार, ईर्षा यांचा लवलेश नाही. जीवनातील दु:ख नाहीसे झाल्याने एक असीम शांत असे आयुष्य आम्हाला मिळालेले आहे.’
‘आम्ही सारे सुखी आहोत’ असं म्हणणार्या जीवांकडे सुखाची व्याख्या काय आहे? धर्मसंस्थेपासून तिचा कडवा विरोधक असलेल्या कम्युनिझमपर्यंत सार्यांचे बहुसंख्य अनुयायी जसे त्यांची तत्त्वे, कर्मकांडे आकलनाशिवायही आत्मसात करून घेतात तसे झाले आहे का? म्हणजे सुखाची व्याख्या माहित नाही, पण ‘आपण सुखी आहोत’ हे वाक्य त्याचा अर्थ न जाणवताही रुजून गेले आहे?
शिवाय ‘केवळ संघर्षरहित जीवन म्हणजे सुख’ असे असते का? ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकामध्ये जी.ए. कुलकर्णींनी रेड्या जोशी या व्यक्तिबद्दल लिहिले आहे :
काही झाले तरी माणसाने संस्कृतच्या रेड्या जोशीसारखे असावे. आठ मुली झाल्यावर देखील मुलगा निर्माण करण्याची जिद्द त्याने सोडली नाही. त्याला कसलेच प्रश्न नव्हते. जेवणात वाटीभर दही असले की त्याच्या दृष्टीने "All is right with the world." तो कुणालाही चटकन सल्ला देत असे : सहन कर, मन शांत ठेव, केव्हा तरी सत्याचा जय होतो. एखादा इरसाल स्वामी ऐसपैस कफनीतून खोट्या खड्यांच्या आंगठ्या काढतो, त्याप्रमाणे सटासट त्याच्या तोंडून गोगलगाई बाहेर पडत. मला दह्याची वाटी नको, पण देवाने रेड्या जोशीचे अतिशय जाड गेंडा कातडे तरी मला द्यायला हवे होते.
(‘माणसे : अरभाट आणि चिल्लर’ पृ. ८६)सुखाची व्याख्या नि समाधानाची व्याप्ती तुम्ही जशी कराल, त्यानुसार त्यांच्या पूर्तीच्या शक्यता नि संभाव्यता कमी वा अधिक होत असतात इतकेच. अपेक्षांचे गाठोडे जितके किमान, तितकी सुखाची संभाव्यता अधिक असते. पण एक नोंदवून ठेवायला हवे, अशा संघर्षरहित, गतिहीन जगण्यामध्ये प्रगतीच्या वाटा निर्माण होत नाहीत.
तसेही संघर्ष हा जीव-उत्क्रांतीच्या दोन प्रमुख पायांपैकी एक नव्हे का? केवळ सहकार प्रगतीला मारक ठरत नाही का? एखाद्या सजीवाच्या आयुष्यामध्ये संघर्षाची शक्यताच नसेल, तर त्याच्या मनातील ईर्षा मावळून जाईल. आणि ईर्षेविना प्रगतीच्या कोणत्या वाटा खुल्या राहातील? मर्यादित संघर्ष ऊर्फ स्पर्धा हा मूलाधार मानून उभ्या राहिलेल्या भांडवलशाही व्यवस्थेने मानवी आयुष्यात काही सुखकर गोष्टींची भर घातली नाही का?
किमयागारांच्या काळापासून अमरत्व– किमान दीर्घायुष्य देऊ करेल असे औषध वा रसायन (Elixir) निर्माण करण्याच्या मागे मनुष्यप्राणी हात धुवून लागलेला आहे. मृत्यूचे भय नि म्हणून अमरत्वाचे एक प्रकारचे विकृत आकर्षण मानवी मनात रुजले आहे. त्यामुळे अमरत्व वा दीर्घायुष्य हे अप्रत्यक्षपणे सुखाशी जोडले गेले आहे.
काही काळापूर्वी एक कथा (दुर्दैवाने लेखक नि कथेचे नाव स्मरणात नाही) वाचण्यात आली होती. एका जमातीमध्ये सरासरी आयुर्मान बाह्य, प्रगत जगापेक्षा कितीतरी अधिक असते. एक संशोधक यांचा अभ्यास करून त्यांच्या दीर्घायुष्याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशाने त्यांच्यामध्ये जाऊन राहातो. अखेर त्याच्या ध्यानात येते की त्यांची क्रियाशून्यता, संघर्षाचा अभाव हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक आहे. परंतु त्याचाच परिणाम म्हणून ही जमात सुस्त नि आळशी आहे. जे अनायासे मिळते त्याहून अधिक काही मिळवण्याची, निर्माण करण्याची आसच त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते लोक दीर्घायुषी असले तरी, प्रगतीच्या वाटा सोडून विसावलेले आहेत.
अलिकडच्या काही वर्षांत भारतीय निवडणुकांच्या राजकारणामध्ये पैसे, धान्य आदींचे वाटप सुरु झाले, तेव्हा त्याविरोधातील याचिका दाखल करुन घेताना ‘गरजा अशा आयत्या भागत राहिल्या तर माणसांमध्ये काम करण्याची प्रेरणाच उरणार नाही, देशाची क्रयशक्ती घटेल’ अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली होती. म्हणजे ‘सुख वा गरजपूर्ती ही संघर्षाशी, परिपूर्तीशी जोडली गेलेली असली पाहिजे’, हे न्यायव्यवस्थेनेही सूचित केले होते. सुख हे आयुष्याचा एक भागच असायला हवा. पुरे आयुष्य त्याने व्यापून गेले की हजारो वर्षे सुस्त पडून राहिलेल्या एखाद्या खडकासारखे ते आयुष्य क्रियाशून्य नि वांझ होऊन राहील.
व. पु. काळे यांच्या एका कथेतील पात्र ‘सुख म्हणजे वेदनेचा अभाव’ अशी व्याख्या करते. पण ती व्याख्या करण्यासाठी आधी वेदनेच्या चरकातून जावे लागते, तरच त्या व्याख्येला आधार मिळतो.
Mr. Diabaté यांच्या व्याख्येतील सुख
बहुतांचा न्यूनगंडआपण सुखी आहोत असा दावा करणारी ही मानवी अनुषंगे पुढे असंही म्हणतात की, ‘तुम्हीही आमच्यामध्ये सामील व्हाल तर तुमच्यातील षड्रिपुंपासून तुमचीही सुटका होईल आणि तुम्हालाही आमच्यासारखे सुखी आयुष्य जगता येईल.’ हे पाहून मला विविध धर्म, पंथ, संस्थाने यांची आठवण होते आहे.
आजच्या जगात धर्म (religion) पेक्षाही विविध आध्यात्मिक गुरु आणि त्यांची संस्थाने यांच्या अनुयायी म्हणवणार्या टोळ्यांचे वर्तन या बहुसंख्येसारखे असते(१). ‘आपल्या पदरी जे पडले आहे ते काहीतरी श्रेष्ठ आहे’ हा भ्रम ते कुरवाळत बसलेले असतात. बहुसंख्य माणसे तर ही निवडीची तसदीही न घेता जन्मदत्त धर्म, परंपरा, आचारविचार सांभाळून ठेवतात. ‘तेच श्रेष्ठ– नव्हे सर्वश्रेष्ठ असल्याचा, बिनचूक असल्याचा, मानवी उन्नतीचा एकमेव सोपान असल्याचा’ दुराग्रही दावा करत राहातात.
वास्तविक हे सारे आपापल्या जाती, धर्मांच्या समाजात राहात असतात. कळपातील सुरक्षितता त्यांना मोलाची वाटत असते. (त्याअर्थी मनुष्यप्राणी हा शिकारी प्राण्यांपेक्षा भक्ष्य प्राण्यांची प्रवृत्ती अधिक दर्शवतो.) परंतु मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. जे स्वीकारले वा पदरी पडले त्यातील न्यूनेही त्याला दिसत असतातच. फक्त ती जाहीरपणे मान्य करण्याची त्याची तयारी नसते. कारण तसे केल्याने आपल्या निवडीचे वा बाजूचे स्थान डळमळीत होईल अशी त्यांना भीती वाटत असते.
पण ही न्यूने जाहीर न करण्याने, मनात दडपल्याने त्यांचा न्यूनगंड नाहीसा होत नाही. टोळीजीवनाच्या काळात शारीर-संघर्ष हीच यशाची कसोटी असल्याने संख्या हा टोळीच्या यशाचा मुख्य आधार असे. माणसे नागर झाल्यावर त्याचे रूपांतर अहिंसक अशा बहुमत या संकल्पनेमध्ये झाले. त्यामुळे ही न्यूनगंड असलेली माणसे ‘बहुमताच्या निकषावर आपली निवड वा बाजू निदान मोठी तरी ठरावी’ म्हणून आपल्याहून भिन्न निवड केलेल्या वा वारसा लाभलेल्यांना विविध प्रकारे आपल्याकडे खेचून घेऊ पाहातात. त्यासाठी सोयीनुसार साम-दाम-दंडभेदादी उपाय ते वापरत असतात. ‘पर्यायाचे किमान अस्तित्वही आपल्या मताला सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरू शकते’ या भीतीनेही, त्या प्रवाहाबाहेर राहिलेल्यांवर आपली निवड लादण्याचा प्रयत्न करत राहातात…‘प्लरिबस’मधील या अनुषंगांचे वर्तनही–निदान नेणिवेच्या पातळीवर– या वृत्तीला अनुसरूनच होते आहे.
काही अनुत्तरित प्रश्न‘प्लरिबस’मधील सर्वव्यापी बदलानंतर तेरा जण या बदलापासून अस्पर्श राहिले आहेत. ‘तेरा’ हा आकडा बहुधा ख्रिस्त अधिक त्याचे १२ अनुयायी (apostle) या ख्रिस्ती धर्माच्या आद्य प्रसारकांकडे अंगुलिनिर्देश करतो आहे. ‘या जगाला योग्य दिशा दाखवण्याचा, त्याला अध:पातापासून (?) वाचवण्याचा भार आता यांच्या खांद्यावर आहे’ असे सूचित केले जात असावे का? मालिका अद्याप पुरी न झाल्याने सध्या केवळ प्रश्नच उपस्थित करता येतो(२).
कॅरलला सोबत करण्यास जी स्त्री निवडली, तिची निवड कुणी केली? ‘अमुक स्त्री ही कॅरलला अधिक चांगली सोबत करेल’ हे कसे ठरले? समूह-मनाच्या या जीवांमध्ये हे निर्णय-केंद्र नक्की कुठे आहे? प्रत्येक व्यक्तिचे मन हे केवळ ग्रहण-केंद्र असून, त्या सार्यांहून वेगळे असे निर्णयकेंद्र आहे नि त्याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीमध्ये समूह-मनामार्फत प्रक्षेपित होतो आहे का? तसे असेल तरीही समूह-मनाची कल्पना बाधित होत नाही का? की याउलट प्रत्येक व्यक्तीचे मन निर्णयास स्वतंत्र आहे पण लोकशाही पद्धतीने प्रत्येकाचे मत नोंदवून निवाडा होत असेल, तर मतभिन्नतेला वाव राहून समूह-मन ही संकल्पनाच रद्दबातल होत नाही का?… हे नि असे अनेक मूलभूत प्रश्न या व्यवस्थेबाबत विचारणे शक्य आहे.
परंतु यात माझे एक महत्त्वाचे गृहितक आहे आणि ते म्हणजे हे समूह-मन ही समाजव्यवस्था म्हणून आकाराला येते आहे. मालिकेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरीकडे येताना असे दिसू लागले आहे की, हे समूह-मन कशाची तरी वाट पाहाते आहे. एखादी घटना घडणे अपेक्षित आहे. ती व्यवस्था निरंतर अस्तित्वात राहाणे अभिप्रेतच नसावे. म्हणजे ही बीज पेरण्यापूर्वी केलेली जमिनीची केवळ मशागतच असू शकते, मार्क्सला अभिप्रेत असलेल्या साम्यवादी व्यवस्थेपूर्वीची तात्पुरती सोय म्हणून प्रस्थापित केलेली समाजवादी व्यवस्थेसारखी. हा सारा खेळ रंगवणार्यांना अभिप्रेत असणारी व्यवस्था वा अव्यवस्था आणखी काही वेगळेच घेऊन येऊ शकते.
- (समाप्त) -
परिशिष्ट » ‘पदार्पण’- एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)
टीपा:
(१). कारण आज नवा धर्म उभा करणे तुलनेने अवघड आहे, माणसे बव्हंशी जन्मदत्त धर्म राखून श्रद्धा वा अध्यात्माच्या या पळवाटेने जाऊन पर्यायी काही पदरी पाडून घेऊ पाहातात. [↑]
(२). माझा हेतू त्या समूह-मनाच्या व्यवस्थेकडे तिच्या पूर्वसुरींचा वारसा म्हणून पाहाण्याचा असल्याने, त्या तेरा जणांचे स्थान वा त्यांची भूमिका याबद्दल काही अधिक उहापोह करण्याचा माझा उद्देश नाही. तसेही हा लेखनप्रपंच ऐसपैस पसरल्याने तो भाग आवरता घेतला तरी हरकत नसावी. [↑]
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता
-
गरजा, मागणी आणि पुरवठा « मागील भाग
विकासाच्या नावाखाली ज्या बेगुमानपणे निसर्गाचा विध्वंस होतो आहे ते पाहाता, अशी इच्छा कधी कधी तीव्र होते की,
“एक प्रचंड प्रलय यावा नि सारी मानवजात नष्ट व्हावी; म्हणजे इतर जीव सुखाने जगू शकतील.”
मानवी वंशविच्छेदपण मानवी बुद्धीच्या मर्यादेत अशा सर्वंकष विध्वंसाची सोय ही केवळ बाह्य हल्ल्याद्वारेच - शस्त्राघात, जैविक, रासायनिक वा आण्विक - केली जाऊ शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे असा सर्वंकष संघर्ष नि व्यापक विध्वंस व्हायचा, तर किमान दोन समबल असे प्रतिस्पर्धी समोरासमोर यायला हवेत. सारासार विवेकाला उध्वस्त करुन जाईल इतपत सत्तेची, अस्मितेची, असुरक्षिततेची वा उन्मादाची भावना त्यांच्यात ओसंडून वाहायला हवी. ‘समोरच्या टोळीचे संपूर्ण निर्दालन केल्याखेरीज आपण नि आपली टोळी जगूच शकणार नाही’ इतका अतिरेकी विचार इतर सार्या पर्यायांची साफ धूळदाण करुन शिल्लक राहायला हवा. खरंतर हा विचार कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजरूपी मानवी टोळ्यांमध्ये रुजलेला आहे, त्याला भरपूर खतपाणी घालून प्रमाण तेवढे वाढवावे लागेल.
वर उल्लेख केलेल्यांपैकी हत्यार कोणतेही वापरले असो, त्या विध्वंसाची झळ इतर जीवसृष्टीलाही बसणार आहे. इतकेच नव्हे तर अशा विध्वंसानंतरही मानवी कलेवरांचा जो खच पृथ्वी व्यापून राहील, त्याद्वारे त्यातील प्रदूषण इतर मांसभक्षी जिवांमध्येही संक्रमित होणार हे ओघाने आले. म्हणजे मानवी संहार हा प्रत्यक्ष नि अप्रत्यक्ष अशा दोनही प्रकाराने उरलेल्या जीवसृष्टीला बाधक ठरणार आहे. हे टाळायचे असेल तर दोन उद्दिष्टे साध्य व्हायला हवीत. पहिले म्हणजे केवळ मानवी प्रजातीचाच घात करेल असे नवे संहारक हत्यार शोधायला हवे. आणि दुसरे– त्या संहारातून निर्माण झालेल्या मानवी कलेवरांनाही इतर जिवांपासून काळजीपूर्वक दूर ठेवायला हवे. Pluribus मधील व्यवस्थेतून ही दोनही उद्दिष्टे साध्य करेल असा एक पर्याय उदयाला येतो आहे.
‘सर्वे सुखिन:’ ची दास्य-शृंखलाHDP चा वापर माणसांना जगवण्यासाठी करणे ही एक प्रकारे स्वयंपूर्णता असली, तरी ती घटत्या उपलब्धतेची आहे. एकाच आघाताने ही समूह-मनाची व्यवस्था प्रस्थापित झाली तेव्हा कामी आलेल्या नव्वद कोटी जिवांनी सुरुवातीचे काही महिने उरलेल्यांची अन्नाची गरज भागवली. पण हा ‘पुरवठा’ उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे आणि जित्यांना इतरांच्या/काहींच्या मरणाची कामना करण्याची वेळ येणार आहे. आणि हे त्यांच्या ‘सर्वे सुखिन:’ या जीवनसूत्राला छेद देऊन जाणारे असेल.
अन्नपुरवठा कमी झाला की उपासमारीचे संकटही उभे राहू शकते. (त्यातून ‘पुरवठा’ वाढू शकतो, पण लोकसंख्या– आणि म्हणून कार्यक्षम हातही वेगाने कमी होतात हे ही विसरता येत नाही.) मग कदाचित आहाराची गरज भागवण्यासाठी काही माणसे या समूह-मनाच्या व्यवस्थेविरोधात बंड करुन, मानवेतर जिवांना अभय देण्याचा नियम मोडून माघार घेण्याचा मार्ग निवडू शकतात. पण स्वतंत्र विचारशक्ती (free will) नसलेल्या, सहजीवनाचे सूत्र काळ्या दगडावरच्या रेघेसारखे मनावर कोरलेल्या जिवांना ते शक्य होईल का, शंकाच आहे.
जगण्यातले संघर्षHDP हे केवळ प्रथिन आहे. माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी केवळ तेवढे पुरेसे नसते. त्या उत्पादनाच्या नावात ‘प्रथिन’ असूनही त्यांत इतर जीवनसत्त्वे असली तर गोष्ट वेगळी. परंतु मानवी शरीरातील यांच्या प्रमाणांचा विचार करता ही शक्यता कमीच आहे. प्रथिने वगळता इतर आवश्यक घटक - जरी HDP मृत जीवापासूनच निर्माण होत असले तरी- प्रत्येक पुढच्या टप्प्यात घटत जाणारे आहेत. एखाद-दोन पिढ्यांतच त्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटणार आहे. ती तूट भरून काढण्यास अन्य सजीव पर्याय वापरण्याचे स्वातंत्र्य नसल्याने पुढील पिढ्या बव्हंशी असंतुलित, घटत्या रोगप्रतिकारशक्तीच्या असणार आहेत.
दुसरीकडे समूह-मनाच्या निर्मितीनंतर माणसांनी जरी संघर्ष थांबवला असला, तरी इतर जिवांमध्ये असे काहीही घडलेले नाही. त्यामुळे साथीचे आजार, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींसोबतच मोकाट सोडलेल्या प्राण्यांमुळे प्राणिजन्य आजारांचे प्रमाण वाढणार आहे. इतकेच नव्हे तर प्राण्यांशी थेट संघर्ष उद्भवले तर समोरच्या प्राण्याचा प्रतिकार करावा की नाही, केलाच तर किती मर्यादेपर्यंत करावा याबाबत या नव्या ‘सर्वजीव मंगलम्’ व्यवस्थेला नियम घालून द्यावे लागतील.
https://www.firstpost.com/ आणि https://www.etsy.com/ येथून साभार.याखेरीज आणखी एका नव्या समस्येचा सामना या मानवी जिवांना करावाच लागणार आहे. उपचारासाठी आवश्यक औषधांतील बहुतेक रसायने ही सजीवांकडूनच येत असल्याने, ‘सजीवांना हानी न पोहोचवण्या’च्या नियमांमुळे त्यांची निर्मिती ठप्प होणार आहे. त्याचबरोबर औषधनिर्मिती प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा हा प्राण्यांवरील चाचण्यांचा असल्याने पुढील संशोधन हा विषय तर बादच ठरावा. समजा या प्राथमिक चाचण्या थेट मानवांवर करायचे म्हटले, तर मानवही सजीव असल्याने एकीकडे नियमभंग तर होतोच, पण तो अपवाद केला तर या सुरुवातीच्या टप्प्यांत अधिक असलेल्या अपयशाच्या संभाव्यतेला (greater risk) मानव जमातीला थेट सामोरे जावे लागेल.
घटते जीवनमान, त्यामुळे लोकसंख्या घटण्याचा वाढलेला वेग यांना प्रतिरोध करायचा तर पुनरुत्पादनाचा वेग त्या प्रमाणात वाढायला हवा.
कुटुंबव्यवस्थापरंतु कुटुंबव्यवस्था(बहुधा) मोडीत निघाल्याने, वैय्यक्तिक मालकीचा लोप झाल्याने (आणि काही आशियाई समाजांमध्ये असते ते ‘म्हातारपणची काठी’ हे उद्दिष्टही न उरल्याने) मूल जन्माला घालण्यासाठी आवश्यक प्रेरणाच उरणार नाही.
पितृत्व निश्चित नसले की लैंगिक संबंध ही नराच्या दृष्टीने केवळ प्रासंगिक सुखोपभोगाची क्रिया होऊन राहाते, एकाहुन अधिक पर्याय उपलब्ध असलेली. त्यातून त्याची बांधिलकी निर्माण होत नाही. पर्यायाने अपत्य-संगोपन ही बव्हंशी आईची– म्हणजे स्त्रीची जबाबदारी राहाते. ‘सर्वांशी सारखीच बांधिलकी’ या मानसिक जडणघडणीमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले, तरी ते प्रस्थापित करणार्या दोन व्यक्तींमध्ये त्या नात्यातील विशेष भावनिक आपुलकी कितपत शिल्लक राहील शंकाच आहे.एकुणात पुनरुत्पादन प्रेरणा न राहाता परिणाम म्हणूनच शिल्लक राहाते.
https://yourteenmag.com/ येथून साभार.लग्नसंस्था स्थिर होण्यापूर्वी आदिम टोळीजीवनाच्या काळात मूल हे पुर्या टोळीचे असे. तिच्या भविष्याचा आधार असे. अन्य टोळ्या, शिकारी प्राणी यांच्याशी होणार्या संघर्षामध्ये ते मूल एक भावी लढवय्या अथवा त्याच्या उत्पादनासाठी लागणारी भूमी असे. संख्याबळ या अस्तित्वाच्या लढाईतील सर्वात महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे त्यांचे संगोपन ही पुर्या टोळीची गरजही होती. ही एक प्रकारे टोळीच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असे. पण ‘प्लरिबस’मधील समाजामध्ये संघर्षही नाही नि सर्वांच्या गरजा सारख्याच भागवल्या जात असल्याने प्रगतीला निश्चित साध्यही नाही. त्यामुळे मूल हे Asset वा Investment म्हणूनही पाहाता येत नाही. त्यामुळे ‘मूल सार्या समाजाचे’ हा नियम म्हणून कितीही रुजवला, तरी त्यामागची भावना सर्वांची सारखी राहील असे नाही. अनेकांच्या दृष्टीने त्याचे संगोपन ही बांधिलकी न राहाता, केवळ जबाबदारी म्हणून पाहिले जाणार आहे.
या सार्याचा एकत्रित विचार करता या समाजातील माणसांचे जीवनमान आणि लोकसंख्या आजच्या मानवाच्या तुलनेत घटत जाणार आहे असा निष्कर्ष निघतो. परिणामी मानवी लोकसंख्या ही हळूहळू घटत जाणार आहे. म्हणजे ही व्यवस्था प्रगतीच्या नव्हे, तर अंत:स्फोटाच्या (impload) दिशेने वाटचाल करणारी आहे हे स्पष्ट होत जाते.
माणसांनी समाजातील मृत जिवांची HDP च्या स्वरूपात विल्हेवाट लावण्याने, त्यांची कलेवरे अन्य प्राण्यांपासून दूर राहात आहेत, इतर जीवसृष्टीशी संपर्क न येता विरून जात आहेत. म्हणजे ही व्यवस्था अन्य जीवसृष्टीला मानवी हस्तक्षेपापासून नि संसर्गापासून वेगळे करुन स्वतंत्रपणे विकसित होण्यास मोकळी करत आहे. एकीकडे ही व्यवस्था मानवी प्रजातीचा वंशखंड (extinction) करणारी व्यवस्था असेल. दुसरीकडे ही एक प्रजाती विरुन जात असताना, उरलेल्या जीवसृष्टीने तिच्या अस्तित्वाला वगळून नव्या उत्क्रांतीची सुरुवातही केलेली असेल… ती रुजवणार्यांनाही(!) हेच अभिप्रेत असावे का?
https://blog.naver.com/stoppoint/223503646610 येथून साभार.- (क्रमश:) -
पुढील भाग » उपसंहार
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा
-
जठराग्नी शमवाया भूतां « मागील भाग
जीवसृष्टीतील प्रत्येक जिवाच्या अन्न आणि निवारा (संरक्षण) या दोन मूलभूत गरजा आहेत नि जुगण्याची प्रेरणा ही जीवसातत्याला चालना देणारी भावना. कोणतीही नवी सामाजिक, राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली, तरी या दोन गरजांच्या पूर्तीसाठी पुरवठ्याचे व्यवस्थापन तिला करावे लागते. तरच तो समाज नि ती व्यवस्था स्थिर राहू शकते.
पुरवठा नव्हे साठा‘प्लरिबस’मधील समूहजीवी व्यवस्था सर्व सजीवांना अभय देत असल्याने आजवर शेती, नि पशुपालन या दोन मार्गाने आपले अन्न मिळवणार्या अर्वाचीन मानवाला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या व्यवस्थेमध्ये अन्नाची गरज भागवणारी जी व्यवस्था निर्माण केली गेली आहे, ती दीर्घकाळ उपयोगी ठरणारी नाही. ज्या नव्वद कोटी कलेवरांच्या पुरवठ्यावर ही व्यवस्था अवलंबून आहे, तो साठा आहे, उत्पादन-व्यवस्था नाही. एका मनुष्यप्राण्याचा दैनिक आहार ध्यानात घेतला, तर हा साठा काही दिवसांतच– निदान महिन्यांत संपून जाणार आहे. तसंच प्रत्येक कलेवराला प्रथिनामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही काही घट होणार आहे. या दरम्यान त्या साठ्यामध्ये पडणारी ‘भर’ ही गरजेच्या तुलनेत नगण्य असणार आहे. हे चक्र सतत फिरते ठेवण्यास आवश्यक इतकी ती असूच शकणार नाही. मग लवकरच अशी स्थिती येईल की गरज ही आवश्यकतेपेक्षा/मागणीपेक्षा कमी असेल, आणि मानवी समाज पुन्हा परिचित अशा तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचतो आहे.
ही समस्या केवळ अन्नाच्याच संदर्भात उद्भवते असे नाही, जगण्याला आवश्यक सर्वच गोष्टींसंदर्भात ही समस्या उद्भवणार आहे. व्यवस्थाबदलाच्या धक्क्यामध्ये जगाची लोकसंख्या प्रचंड घटली. यामुळे आधीच उत्पादित वस्तू नि ग्राहक यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने सुरुवातीच्या काळात उपभोग सुकर झाला असेल. परंतु हा साठाही कधीतरी संपणार आहे. त्यानंतरच्या भविष्यातील उपभोगासाठी उत्पादनव्यवस्था शिल्लक ठेवावीच लागेल. पण यात अडचण अशी की ‘सजीवांना धक्का लावायचा नाही’ या नियमामुळे यातील अनेक उत्पादनांसाठी पुरेसा कच्चा मालच उपलब्ध नसेल. त्यामुळे लवकरच हे व्यस्त प्रमाण उलट दिशेने– म्हणजे ‘ग्राहक/मागणी अधिक नि पुरवठा कमी’ या बाजूला झुकणार हे ओघाने आलेच.
एक भाकर दोन माणसे‘सर्वांना समान हक्क’ हा साम्यवादी व्यवस्थेचा नियम तेव्हाच पाळता येतो जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अधिक– निदान पुरेसा असतो. समजा प्रत्येक माणसाची भूक एका भाकरीइतकी आहे. एकच भाकर उपलब्धही आहे, पण एक नव्हे तर दोन भुकेले जीव तिथे आहेत. आता दोघांपैकी एकाचीच भूक भागवता येत असते. म्हणजे निवाडा करणार्या व्यक्तिला निर्दोष असा पर्यायच उपलब्ध नाही. तिला दोघांपैकी एकाची भूक भागवून दुसर्याला भुकेला ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो किंवा दोघांना (समान म्हणून) अर्धी अर्धी भाकर वाटून द्यावी लागते. पहिल्या पर्यायामध्ये एक जण असमाधानी राहातो तर दुसर्या पर्यायामध्ये दोघेही.
https://www.istockphoto.com/ Credit: Shaiith.भांडवलशाही जगामध्ये मात्र मागणी नि पुरवठा यांच्यामध्ये ही जी तफावत निर्माण होते, तिला इष्टापत्ती मानले जाते. कारण पुरवठ्यामधील तुटवडा भरून काढण्यासाठी नव्या उत्पादकतेला, नव्या श्रमाला चालना मिळते. त्यातून नवे रोजगार नि संपत्ती निर्माण होते. तथाकथित प्रगतीचे चक्र अधिक वेगाने फिरू लागते.
पण ही जी नवी उत्पादकव्यवस्था निर्माण होते, ती कच्च्या मालाची मागणी वाढवणारी असते. आणि तिच्या पुरवठा-साखळीच्या थेट उगमापाशी जाऊन पाहिले तर निसर्गाच्या विध्वंसाच्या चक्राची गतीही वाढवणारी ठरते.
निसर्गाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी, कच्चा माल पुरेसा उपलब्ध नसेल, तर अशी निरर्गल उत्पादनवाढ शक्य होत नाही. तसंच ही नवी उत्पादन-व्यवस्था उत्पादन वाढवत असली तरीही पुरवठा-साखळी, ग्राहकांची खरेदी-क्षमता, कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार उत्पादनावर येणारी बंधने, टिकाऊपणा (shelf-life) नि साठवण-क्षमता (storage capacity) यांच्या मर्यादांमुळे ‘हवे त्याला मिळेल’ ही आकांक्षा पुरी करता येत नाहीच.
नव्या व्यवस्थेसमोरील पेचआता मागणीपेक्षा उपलब्धता कमी असल्याने मागणीमध्ये/गरजांमध्ये प्रतवारी लावून त्यानुसार उपभोगाचा प्राधान्यक्रम लावण्याचा दुसरा पर्याय स्वीकारावा लागतो. ग्राहकांमधील कोणाची गरज अधिक निकडीची आहे त्यांची गरज प्राधान्याने भागवत जावे लागते. परंतु यासाठी ‘कुणाची गरज अधिक निकडीची’ याचा निवाडा देणारी नियंत्रक व्यवस्था आवश्यक असते. त्यामुळे ‘राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप कमीत कमी असावा’ यावर कटाक्ष असणार्या भांडवलशाहीला हा मार्ग पसंत नसतो.
राजकीय व्यवस्थेऐवजी बाजाराला सार्वभौम मानणारी ही व्यवस्था हा निवाडा तथाकथित खुल्या स्पर्धेवर सोडून देते. ‘उत्पादनाच्या मालकीसाठी ग्राहकांनी स्पर्धा करावी नि जेत्याने उपभोग घ्यावा’ असे ती सांगते. या मालकी-युद्धामध्ये चलन हे प्रमुख शस्त्र आहे, ते ज्याचे बळकट त्याला पुरवठ्याचा आवश्यक वा त्याहून अधिक हिस्सा मिळवता येतो. ‘चलनाची, स्पर्धेची व्यवस्था बाह्य हस्तक्षेपापासून दूर आणि म्हणून निकोप आहे’ असा तिचा दावा असतो… जो वास्तवात केव्हाच मोडीत निघालेला असतो. शिवाय यातून निकडीची गरज असलेले वंचित राहाण्याचा धोका असतो. पण स्पर्धा नि चलन हे सार्वभौम मानणारी ही व्यवस्था त्याबाबत पूर्णपणे निर्मम भूमिका घेत असते.
चलनाला मोडीत काढलेल्या आणि त्याचवेळी व्यापक अशा नियंत्रक व्यवस्थेचा अभाव असलेल्या Pluribus मधील व्यवस्थेमध्ये वरीलपैकी दोनही पर्याय (खुली स्पर्धा वा प्राधान्यक्रम लावणे) अंमलात आणता येणार नाहीत. त्यातच Pluribus ची ही व्यवस्था निसर्गस्नेही आहे. निसर्गाला मन:पूत ओरबाडणे तिला मान्य नाही. त्यामुळे भांडवलशाही व्यवस्थेप्रमाणे कच्च्या मालाची मागणी वाढवणारे नवे उद्योग उभारणेही तिला शक्य नाही. म्हणजे पुरवठा कमी असेल तेव्हा फारतर गरजांची प्रतवारी नि त्याआधारे ग्राहकांमध्ये प्राधान्यक्रम निश्चित करणे ही पद्धत तिला स्वीकारता येईल.
पण इथेही दोन समस्या आहेत. पहिली म्हणजे अशी प्रतवारी वा प्राधान्यक्रम निश्चित करणारी नियंत्रक व्यवस्था अस्तित्वात नाही. कुणाची/कोणत्या ठिकाणची गरज अधिक महत्त्वाची नि कोणती कमी महत्त्वाची याचा निवाडा करणार कोण? दुसरी समस्या म्हणजे ही पद्धत केवळ वरकड वस्तूंच्या मागणीसंदर्भात मान्य करण्याजोगी आहे. मूलभूत गरजेच्या वस्तू– जसे वस्त्र, प्रवासासाठी वाहन, आरोग्य नि उपचार, उत्पादनप्रक्रियेत सामील असणार्यांसाठी कच्चा माल वगैरे बाबतीत डावे-उजवे करता येणार नाही. तसे केले तर या ‘सर्व समान’ व्यवस्थेच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासला जातो. भांडवलशाही व्यवस्थेसमोर हा पेच नाही, कारण तिने समानता हे आपले उद्दिष्टच (objective) ठेवलेले नाही.
एकुणात मालिकेमध्ये अशा तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये वितरणाच्या पद्धतीबद्दल,निकषांबद्दल काही स्पष्ट उल्लेख नाही. तिच्या पुढील टप्प्यांमध्ये, पुढील भागांमध्ये त्याबद्दल काही संदर्भ आले, तर तेव्हाच त्याचा अधिक उहापोह करणे शक्य होईल.
जेवढे अन्न तेवढीच भूकउत्पादकता वाढवण्याचे फार स्वातंत्र्य नसणार्या, केंद्रीय नियंत्रक नसणार्या आणि निसर्गाला बांधलेल्या या व्यवस्थेने अपरिहार्यपणे ‘पुरवठ्याच्या प्रमाणात उपभोग’ हे सूत्र स्वीकारले आहे. यातून असमानता काही प्रमाणात दूर करता येईल. पण त्यासाठी किमान गरजा निश्चित कराव्या लागतील. त्या निश्चित केल्यानंतर त्यांना आवश्यक साधनांचा संपूर्ण मानवजातीला सुरळीत नि पुरेसा पुरवठा होत राहील अशी यंत्रणा उभारण्याला प्राधान्य देण्याची गरज निर्माण होते. जगाच्या कानाकोपर्यातील प्रत्येकाच्या गरजा संपूर्णपणे भागल्यानंतरच पुढील– कमी गरजेच्या उत्पादनांकडे वळावे लागेल.
उदाहरणाने स्पष्ट करायचे झाले तर, ‘प्रचंड विस्तार असलेली एक इमारत बांधायची आहे. परंतु जिचा एक एक मजला संपूर्णपणे बांधून पुरा राहण्यायोग्य झाल्यावरच वरील मजल्याचे बांधकाम सुरु करण्यास परवानगी आहे’ अशा स्वरुपाचे हे नियोजन असेल. आधी चार मजल्यांचे आरसीसी काम केले. मग दोन मजल्यांचे वीटकाम केले. मग त्यांचे प्लॅस्टरिंग चालू करतानाच वरच्या मजल्यांवर भिंती बांधणे सुरू केले… अशा समांतर कामांना इथे परवानगी नाही. तसंच इथे संपूर्ण इमारतीच्या जमिनीवरील विस्ताराचे (Carpet-spread) विभाग करुन त्या-त्या विभागावरील बांधकाम स्वतंत्रपणे करण्याची परवानगी नाही. कारण तसे केले तर हा आप-परभाव, भेदाभेद ठरेल.
तसेच एका मजल्याचे बांधकाम पुरे होण्यापूर्वीच वरील बांधकाम चालू केले आणि निधी वा कच्चा माल संपला, तर एकाच वेळी दोन मजले अपुरे राहाण्याचा धोका संभवतो. त्याच धर्तीवर उत्पादक व्यवस्थेमध्ये ‘विविध उत्पादनांसाठी एकच कच्चा माल वापरला जात असेल नि त्या सार्यांसाठी पुरेसा पुरवठा नाही’ अशी स्थिती असेल, तर एकाच वेळी एकाहुन अधिक उत्पादनांच्या निर्मितीला खीळ बसण्याचा धोका संभवतो. यातून पुरवठ्यामध्ये विषमता निर्माण होऊन काहींची गरज न भागण्याचा धोका निर्माण होतो.
या नव्या व्यवस्थेमध्ये आहार वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा-साखळी कशी असेल हे स्पष्ट होत नाही. कारण सर्वच बाबतीत ‘आहे त्यात भागवा’ हा मंत्र कामी येणार नाही. माणसाच्या आयुष्यात अन्नाप्रमाणेच अनेक गरजांना नाशवंत वस्तूंच्या – उदा. औषधे – पुरवठ्याची आवश्यकता असते. यांचे उत्पादन करणे अपरिहार्य आहे. ही उत्पादनव्यवस्था तिला लागणारा कच्चा माल कुठून उभा करणार यावर प्रश्नचिन्ह आहे. आज आपण वापरत असलेल्या बहुतेक वस्तूंची उत्पादनसाखळी ही निसर्गापाशीच उगम पावते आहे. नव्याने निसर्ग-विध्वंस करायचा नाही म्हटले तर वनस्पतीजन्य, प्राणिजन्य कच्च्या मालाचा पुरवठा तर थांबतोच, पण खनिज पदार्थांच्या पुरवठ्यालाही ‘एक्स्पायरी डेट’ मिळून जाते. कारण नव्या खाणी खोदायच्या, तर एखाद्या भूभागावरील जीवसृष्टीचा विध्वंस केल्याखेरीज गत्यंतर नसते.
पुरवठ्याच्या मर्यादेत गरजा कमी करत नेण्याचा हा मार्ग काहीसा अध्यात्मिक मार्गाचे प्रतिबिंबही दाखवतो. माणूस असमाधानी असतो याचे कारण तृष्णा, लालसा असे म्हटले जाते. उपभोगाने लिप्त, अधिकाधिक मिळवत राहायला हवे या लालसेने हपापलेला माणूस समाधानी नसतो. याउलट अनेकदा गुलामगिरीतही माणसे समाधानाने जगताना दिसतात. म्हणजे समाधानी असण्याच्या मुळाशी तृष्णेचे, आकांक्षेचे दमन असते. साहजिकच अपेक्षांची सांगड उपलब्धतेशी घातली तर समाधानी होण्याची शक्यता अधिक, तर लालसेने गरजांना जमिनीवर सोडून आभाळी भरारी घेतली, की त्या दोहोंशी एकाच वेळी जोडून असलेला माणसाच्या शरीर-मनावर तणाव वाढत जातो.
समूह-मनाच्या या व्यवस्थेमध्ये म्हणूनच तृष्णेला खुडून काढत ‘आम्ही सारे सुखी आहोत’ ही भावना प्रत्येक माणसामध्ये रुजवलेली आहे. त्या मानसिकतेमध्ये मर्यादापालनाची शिस्त रुजवणे अधिक सोपे जाते आहे.
वैय्यक्तिक संपत्तीचा लोप‘जेवढे अन्न तेवढीच भूक’ या दृष्टिकोनाचे उदाहरण मालिकेमध्ये ऊर्जावापराच्या संदर्भात दिसून येते. आजचा मनुष्यप्राणी सर्वाधिक अवलंबून आहे तो ऊर्जेवर. या ऊर्जेची गरज प्रामुख्याने जैविक इंधनांने भागवली जाते. त्याखेरीज भारतासारखी आशियाई राष्ट्रे आजही प्रामुख्याने कोळशावर आधारित औष्णिक विजेवर भर देते. या दोनही प्रकारांमध्ये निसर्गाची प्रत्यक्ष हानी होते नि प्रदूषणही. याखेरीज अणुऊर्जा हा ऊर्जेचा तिसरा स्रोत आहे. पण नष्ट करता न येणारा किरणोत्सारी कचरा निर्माण करण्यापासून परिसर पर्यावरणाच्या तपमानावर– नि म्हणून परिस्थितिकीवर (Ecosystem) होणारा अनिष्ट परिणाम आदींमुळे आर्थिकदृष्ट्या स्वस्त असलेली ही ऊर्जा प्रत्यक्षात निसर्ग नि भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीने प्रचंड महाग आहे. परंतु मोजावयाच्या किंमतीचे गणित हे फक्त चलनाच्या भाषेत करण्याची सवय भांडवलशाहीने आपल्याला लावलेली असल्याने, याची जाणीव सुखोपभोगाच्या मागे धावणार्या समाजांना नाही. त्यामुळे बाटलीतून एकदा बाहेर आलेला हा जिन्न आता पुन्हा आत जाण्याचे नाव घेत नाही.
गमावण्याजोगे बरेच काही जमवून ते सांभाळण्याचा आटापिटा करणारी माणसे सर्वाधिक वांझोटा ऊर्जाऽपव्यय करतात तो रात्री. घराच्या बाहेर, रस्त्यांवर सुरक्षिततेच्या कारणाने रात्रभर पेटते ठेवले जाणारे दिवे, जे पाहाण्यास त्या अवकाळी अक्षरश: शून्य माणसे असून झगमगत राहाणारे जाहिरातींचे बोर्ड, वगैरे गोष्टींची गरज नाहीशी करण्यासाठी निदान रात्रीपुरता तरी त्यांनी समूहवसतीचा प्रयोग अंमलात आणला आहे. त्या त्या शहरांतील खेळांच्या स्टेडियमवर ही विशाल मानवजीवाची अनुषंगे एकत्र होतात नि विश्रांती घेतात. त्यामुळे प्रत्यक्ष वसतीस्थानांच्या परिसरातील ऊर्जेचा पुरवठा संपूर्णपणे बंद करता येतो(१).
हे लोक आपला दिनक्रम संपताच घरी जाण्याऐवजी जिथे असतील तेथून जवळच्या अशा एखाद्या समूह-वसतीस्थानी जाऊन सायंकाळ नि रात्र व्यतीत करु शकतात. यातून प्रवासाचे अंतर बहुधा कमी झाल्याने इंधनात बचत नि पर्यावरण हानी कमी होते. पुढे दैनंदिन कामाचे स्थान नि हे समूह-वसतीस्थान इथेच बहुतेक वेळ व्यतीत केला जाऊ लागल्याने वैय्यक्तिक मालकीच्या घराची गरज हळूहळू संपुष्टात येणार आहे. आणि वैय्यक्तिक मालकीचे घरच नाही म्हटल्यावर इतर वस्तूंचा संचय करण्याची जागाच संपते. त्यामुळे वैय्यक्तिक मालकी ही संकल्पनाही संपुष्टात येते.
- (क्रमश:) -
पुढील भाग » अंत:स्फोटाची अपरिहार्यता
टीपा:
(१). या दृष्टिकोनाला छेद देणारा एक प्रसंग आहे. कॅरोल या समूह-मनाच्या बाहेर राहिलेल्या स्त्रीची सहकारी म्हणून ज्या स्त्रीची निवड होते, ती स्त्री इराणमधून थेट अमेरिकेमध्ये एकटी एक विमान घेऊन जाते. यामध्ये ‘बाहेरील’ व्यक्तीला व्यवस्थेच्या आत खेचण्याची असलेली निकड अधोरेखित होत असली तरी, एका व्यक्तीसाठी एवढे प्रचंड जैविक इंधन– ज्याचे आता पुनर्भरण होणार नाही – जाळणे हे व्यवस्थेच्या तत्त्वाशी विसंगत आहे. कदाचित ‘ही व्यवस्था तात्पुरती आहे, तिला कालमर्यादा आहे; आणि म्हणून पुनर्भरणाची आवश्यकताच राहाणार नाही’ याचे हे निदर्शक असू शकते.[↑]
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १२ : जठराग्नी शमवाया भूतां
-
अद्यतनीकरण (Update) « मागील भाग
कुठलेही तत्त्वज्ञान, विचार माणसाला आकर्षक वाटला नि ‘आपण तो स्वीकारला आहे’ असा दावा त्याने केला, तरी त्याच्याकडून तो पूर्णांशाने आत्मसात होतोच असे नाही. त्याच्या वास्तविक, व्यावहारिक जीवनातील काही प्रिय, काही अंगवळणी पडलेल्या, काही आवश्यक गोष्टींचा त्याच्याशी संघर्ष होऊ लागला, की त्याची मनस्थिती द्विधा होते. ‘याच्यासाठी ते सोडवत नाही, की त्याच्यासाठी हे’ अशी संभ्रमित अवस्था होऊन बसते. मग यातून Best of Both असा पर्याय (वा पळवाट) काढण्याची खटपट सुरू होते.
आपद्धर्माचा महामार्गमला ओशोंनी सांगितलेली, बुद्धाशी संबंधित कथा आठवते आहे(१). बुद्धांनी अहिंसेचा संदेश प्रसृत केल्यानंतर त्याने प्रभावित झालेले अनेक जण त्यांचे अनुयायी झाले. परंतु यात अनेक क्षत्रिय होते. मांसाहार हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग होता. त्यात अचानक बदल झाल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. अति-उत्तरेकडील हिमाच्छादित भागात राहाणार्यांना शाकाहारापेक्षा मांसाहार अधिक सहजपणे उपलब्ध होत असे. या नि अशा कारणांनी जेरीस आलेली काही मंडळी बुद्धांकडे गेली, त्यांना आपली अडचण सांगितली.
बुद्धांनी त्यावर विचार केला नि म्हणाले, ‘हत्या करणे पाप आहे हे तर खरे. पण जर तो जीव आधीच नैसर्गिकरित्या मृत झालेला असेल, तर हत्येचा दोष तुमचा नव्हे. तेव्हा अशा प्राण्याचे मांस खाल्ले तरी चालू शकेल.’(२) (‘अपने आप मरे हुए प्राणियों का मांस खाना वर्जित नही है।’) ओशो सांगतात, “यथावकाश असे घडले की या मांसाहारप्रेमींच्या सोयीसाठी जागोजागी ‘यहाँ अपने आप मरे हुए प्राणियों का मांस मिलेगा’ चे बोर्ड दिसू लागले.” बुद्धांनी आपद्धर्म म्हणून दिलेली ही सवलत मूळ तत्त्वाला मुरड घालण्याचा महामार्गच होऊन बसला.
आपद्धर्माच्या नावाखाली ‘कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये’ या नियमांतून अशी पळवाट न काढता, अशा समाजातील आहाराची समस्या कशी सोडवावी हा लाखमोलाचा प्रश्न आहे. तो कसा सोडवला जातो, यावर ती समाजव्यवस्था टिकून राहाण्याची शक्यता नि संभाव्यता अवलंबून असतात. ‘या प्रश्नाचे काही वेगळे उत्तर मिळते का?’ हे पाहाण्यास मी उत्सुक होतो. पण Pluribus मधील व्यवस्थेनेही ‘अपने आप मरे हुए प्राणियों का…’ ही पळवाटच वापरली आहे.
Vegetarian food not available.जे जीव आधीच मृत झाले आहेत त्यांपैकी ज्यांचे मृत होण्याचे कारण जर जीवाणू, विषाणू, विषजन्य असेल, त्यांचे मांस खाण्यास निरुपयोगी असणार, ते सोडून द्यावे लागणार. हे झाले प्राण्यांचे, त्यांच्या मृत्यूनंतर काही मिनिटे तरी त्यांचे मांस खाण्यायोग्य राहाते. पण वनस्पतींच्या बाबत तर त्यांचा नैसर्गिक मृत्यू म्हणजेच त्यांच्या शरीराच्या उपयुक्ततेचा शेवटही असणार. वारा, पाऊस आदी नैसर्गिक आघाताने तुटून जमिनीवर पडलेली पाने, फुले, फळे, त्यांतील बिया यांचे सेवन या व्यवस्थेमध्ये त्याज्य नाही. परंतु अशा प्रकारे हाती लागणार्या अन्नाचे प्रमाण अतिशय नगण्य नि बिनभरवशाचेच राहाणार. थोडक्यात शाकाहाराला या व्यवस्थेत नगण्य स्थान आहे.
अर्वाचीन महानगरी, रिटेल स्टोअर्सच्या जगात डबाबंद अथवा पूर्व-प्रक्रिया केलेल्या अन्न उपलब्ध असते. ‘प्लरिबस’मध्ये त्या जागतिक बदलापूर्वी तयार झालेल्या अशा अन्नाचा साठाही शिल्लक असणारच. ‘त्यात वापरलेले जैविक घटक मिळवण्यासाठी झालेली सजीव-हत्या ही नवी व्यवस्था अस्तित्वात येण्यापूर्वी झालेली आहे. ‘अपने आप मरे हुए प्राणी’च्या धर्तीवर त्याचा आता नव्याने दोष मानण्याची गरज नाही’ असे गृहित धरले, तर त्याचे सेवन त्याज्य ठरवण्याची आवश्यकता राहात नाही. जोवर हे अपघातपूर्व काळात तयार केलेले शिल्लक आहे, तोवर ‘हवे ते खाद्य’ मिळू शकते(३). परंतु ही उपलब्धता मर्यादित काळापर्यंतच असणार आहे.
याहून अधिक अक्राळविक्राळ प्रश्न निर्माण होतो, तो हा की ‘समस्त पृथ्वीवरील मनुष्यप्राण्यांचे पालनपोषण होईल इतके ‘अपने आप मरे हुए’ प्राणी कुठून मिळणार? नि त्यांचा नियमित पुरवठा कसा होत राहाणार?’ पण त्या व्यवस्थेच्या निर्मितीक्षणात या प्रश्नाचे उत्तरही दिले गेलेले आहे.
क्रांतिचे बळीसुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे Pluribus च्या या नव्या समूह-मन अवस्थेची प्रतिष्ठापना एका जगद्व्यापी अपघातातून झालेली आहे. काही क्षण सारे मानवप्राणी स्तंभित झाले होते. त्यानंतर ते पुन्हा सचेतन झाले ते नव्या व्यवस्थेचे पाईक म्हणून. पण हा बदल काही सुरळित झालेला नाही. ते सचेतन होत असताना त्या बदलाचा धक्का पचवता न आल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे हा आकडा जवळजवळ ९० कोटी– म्हणजे आजच्या लोकसंख्येचा विचार करता दहा टक्क्यांहून अधिक– इतका प्रचंड आहे. म्हणजे हा व्यवस्था-बदल अनेकांचा बळी घेऊनच झालेला आहे.
Memorial gravestones of Soviet soldiers whose remains were unearthed by volunteers and buried in Rossoshka. Credit: Sergey Ponomarev for The New York Timesधर्माधिष्ठित राज्यव्यवस्था असो, धर्माधिष्ठित समाजरचनेला नि राजकीय भांडवलशाहीला विरोध करत उभी राहिलेली कम्युनिस्ट व्यवस्था असो, की कम्युनिस्टांना क्र. १ चा शत्रू मानत त्यांना निखंदून काढण्यासाठी देशोदेशींचे नेतृत्व नि राजकीय व्यवस्था उलथून टाकणारी भांडवलशाहीसमर्थक व्यवस्था असो; आपापल्या सोयीची सामाजिक राजकीय व्यवस्था उभी करण्यासाठी या सार्यांचेच मुख्य हत्यार हे प्रतिस्पर्ध्यांचा, आपल्याला अनुकूल नसणार्यांचा नि:पात करणारे बंड वा उठाव अशा स्वरूपाचे असते. जुनी व्यवस्था मोडून हे सर्वस्वी नवी व्यवस्था स्थापन करतात ते हजारो, लाखो नरबळी देऊनच. Pluribus ची ही नवी व्यवस्थाही त्याच पंक्तीत जाऊन बसलेली आहे.
असं म्हटलं जातं की ‘युद्धाने/रक्तरंजित क्रांतीने जुने प्रश्न संपतात नि नवे निर्माण होतात.’ तसेच त्यात झालेल्या विध्वंसातून निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होतात, नवे रोजगार निर्माण होतात. बळी गेलेल्यांना पायामध्ये चिणून नव्या व्यवस्थांच्या इमारती उभ्या केल्या जातात. Pluribus मध्येही व्यक्तिप्रधान समाजव्यवस्था उलथून ‘सर्वे सुखिन: सन्तु:’ या तत्त्वाधारे उभ्या राहू पाहाणार्या व्यवस्थेला, या नव्वद कोटींच्या मानवी जीवांच्या मृत्युमुळे ‘अपने आप मरे हुए प्राणियों का’ एक प्रचंड साठाच उपलब्ध झाला आहे.
मानवजन्य प्रथिन (Human Derived Protein)पण याचा खाद्य म्हणून वापर करण्यामध्ये दोन अडचणी आहेत. पहिली म्हणजे असे ‘स्वजनाहारी’ (cannibal) होणे हे आजच्या मानवी संस्कारांना प्रचंड धक्कादायक वाटणारे आहे. जरी शिल्लक मानवांची मने नांगरून त्यांची नव्याने घडी बसवली गेली असली, तरी त्यांच्या सामूहिक माहिती-साठ्यामध्ये हे भूतकाळाचे अवशेष शिल्लक आहेतच. ते पूर्णांशाने नाहीसे झालेले नाहीत. कारण त्यांच्या केवळ सामाजिक जाणीवा बदलल्या आहेत, स्मृतिकोष तसेच आहेत(४). त्यामुळे आहारातील हा आमूलाग्र बदल त्यांना स्वीकारणे फारच अवघड होणार आहे. दुसरी समस्या अशी की ही मानवी कलेवरे ती नाशवंत असल्याने त्यांचा आहारोपयोगी कालखंड फार कमी आहे. तेवढ्या काळात एवढ्या प्रचंड संख्येने ती ग्रहण केली जाणे अवघड आहे.
John Cena Explains need for HDP.या दोनही समस्यांवर उपाय म्हणून या मानवी कलेवरांपासून आहारोपयोगी प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया अंमलात आणली आहे. आज फ्लेवर्ड मिल्क, फळांचे ज्यूस ज्याप्रमाणे बाटल्या वा टेट्रापॅक स्वरूपात मिळतात, तशाच स्वरूपात ही मानवजन्य प्रथिने प्रत्येकापर्यंत पोहोचवली जात आहेत. ही नवी समूहजीवी मानवजमात त्याच्या आधारे जीवनावश्यक उर्जा मिळवते आहे.
सजीवांना इजा न पोहोचवता मांसाहार करणे अशक्य आहे हे खरे. पण नागर झाल्यानंतर मानवी समाजातील बहुसंख्य मांसाहारी हे स्वत: प्राणिहत्या करत नाहीत. हे ध्यानात घेतले तर त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आहारात येणारे मांस हे ‘अपने आप मरे हुए’ (खरंतर इतर कुणी मारल्याने मेलेले) प्राण्यांचेच असते. त्यामुळे त्या जीवहत्येचा दोष आपल्या माथी नाही अशी सोयीस्कर समजूत त्यांच्या नेणिवेत जाऊन बसलेली असते.
एवढेच कशाला खुद्द त्यांना मांसविक्री करणारेही केवळ एवढा दोष इतरांच्या माथी मारून उरलेला व्यापार नि त्यातून मिळणारे चलन आपल्या हाती राखत असतात. आपल्या भारतातील काही समाजामध्ये मांसविक्री करणारेही खाटिककाम– म्हणजे प्रत्यक्ष जीवहत्या करण्यास अन्य व्यक्तीची– बहुधा मुस्लिम खाटकाची – मदत घेताना दिसतात. अनेक खेड्यांतून, लहान शहरांतून केवळ एवढ्याच कामासाठी एखाद-दुसरे मुस्लिम घर तगून राहिलेले दिसते.
याचा पुढचा टप्पा म्हणजे एखाद्या प्राण्याच्या आपल्या नजरेसमोर झालेल्या मृत्यूने ज्यांना धक्का बसतो, वेदना होतात, अशा व्यक्तीही रांधलेले मांसाहारी पदार्थ सहजपणे खाऊ शकतात. याचे कारण म्हणजे ‘दृष्टीआडच्या सृष्टी’शी त्यांची तेवढी घट्ट नाळ जुळलेली नसते, तेथील सुखदु:खांनी त्यांना वेदना होत नाहीत. तशा त्या व्हाव्यात यासाठीच कदाचित ‘प्लरिबस’मधील व्यवस्था प्रत्येकाच्या संवेदनांची एकमेकांशी गाठ घालून देत आहे.
आजच्या पर्यावरण-विध्वंसक विकासाच्या भांडवलशाही प्रारूपाचे महानगरी लाभधारकही याच वृत्तीने जगतात. यांच्या सुखासीनतेसाठी आवश्यक असणार्या उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल ज्या निसर्ग-विध्वंसातून निर्माण होतो, तो विध्वंस त्यांच्या दृष्टीआड झाल्याने त्यांच्या संवेदनशीलतेला बाट लागत नाही. भांडवलशाहीने कच्चा माल ते उपभोग ही लांबलचक साखळी निर्माण केली आहे, तिच्यामधील कोणत्याही टप्प्यावरचा लाभधारक त्यातून होणार्या त्या विध्वंसाला, नाशाला, नुकसानीला स्वत:ला जबाबदार मानत नाही.
या साखळीच्या सर्वात वरच्या थरातील लाभधारक आपल्या बंदिस्त फ्लॅट, बंगला वा पेंट-हाऊस मध्ये राहातात नि बंद काचेच्या वाहनातून एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करतात. त्यायोगे त्या प्रारूपाचे बळी असलेल्या निम्नवर्गीय माणसांच्या अवस्थेकडे ‘मला काय त्याचे’ वृत्तीने पाहातात आणि महानगरापासून दूर कुठेतरी घडणार्या पर्यावरण विध्वंसाबाबत संपूर्णपणे संवेदनाशून्य होऊन जातात. याच धर्तीवर ‘Pluribus' मधील मानवी अनुषंगे, या जीवनदायी प्रथिनाचे सेवन करणारे जीव, एका चार भिंतीआड घडणार्या स्वजनाहारी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याकडे सोयीने दुर्लक्ष करू शकतात.
इथे आणखी विशेष काही घडते आहे. सजीवसृष्टीमध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे, जो केवळ ‘उदरभरण’ या एकाच हेतूने आहार घेत नाही. चवीसाठी, वैविध्य म्हणून, आवश्यक जीवनसत्वांची गरज भागवण्यासाठी, अशा विविध कारणांच्या आधारे आहार निश्चित करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. अन्नग्रहणाच्या पातळीवर पाहिले, तर मानवजन्य प्रथिने हा एकच आहार प्रामुख्याने घेणारा हा नवा जीव, पुन्हा एकवार प्राणिसृष्टीतील इतर प्राण्यांच्या पातळीवर उतरलेला आहे.
- (क्रमश:) -
पुढील भाग » गरजा, मागणी आणि पुरवठा
टीपा:
(१). हे प्रत्यक्षात घडले, की ही ओशोंनी आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ रचलेली बोधकथा आहे, मला ठाऊक नाही. मी त्यांच्या एका - बहुधा ‘नास्तिक कौन? - व्याख्यानाच्या तुकड्यामध्ये ऐकली. Revolutionary आणि Rebel या दोनपैकी एका पुस्तकात आली असावी. कथानक जसे आठवले तसे देतो आहे. तपशीलात चूक असू शकते. [↑]
(२). खरंतर इथे या बोधकथेबद्दल शंका निर्माण होते. सामान्यत: एक नियम म्हणून नैसर्गिकरित्या मृत झालेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये असे आहारतज्ज्ञ सांगतात. याला सोपे कारण आहे. जो जीव नैसर्गिकरित्या मृत झाला आहे त्याला कुठल्या न कुठल्या स्वरूपाची बाधा (infection) असण्याची शक्यता बरीच असते. अशा प्रकारचे अन्न खाणे म्हणजे ती बाधा पोटात घेण्यासारखे असते. तसेच मृत्यू होऊन जसजसा काळ जातो, तसतसे त्याचे कुजण्याची नि विघटनाची प्रक्रिया वेग घेत असते. यातून ते खाणार्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावते.[↑]
(३). पण यात मागणी-पुरवठ्याचे गणितही ध्यानात घ्यावे लागते. त्याबद्दल उहापोह पुढच्या भागात करू. [↑]
(४). पुन्हा संगणकीय भाषेत सांगायचे तर त्यांची ‘संचालन-प्रणाली’ (operating system) बदलली आहे, हार्ड-डिस्क अथवा तत्सम साठवणुकीच्या उपकरणांवरील माहिती बदललेली नाही. [↑]
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ११ : अद्यतनीकरण (Update)
-
नव्या व्यवस्थेकडे « मागील भाग
अद्यतनीकरण (Update)संगणक वा स्मार्ट फोन वापरणार्यांना ‘अद्यतनीकरण’ (Update) ही संकल्पना चांगलीच माहित झाली आहे. या दोन्ही उपकरणांवर Microsoft Office, WhatsApp, iTunes यांसारख्या विविध प्रणाली असतात. तुम्ही या दोन उपकरणांचा वापर करत असताना अनेकदा तुमचा संगणक वा फोन ‘अमक्या अॅपचा अपडेट उपलब्ध आहे’ किंवा ‘पुढचे व्हर्शन उपलब्ध आहे’ असा संदेश देत असतो. हे अद्यतनीकरण करण्यास तुम्ही संमती दिली की ती प्रक्रिया आपोआप– तुमच्या हस्तक्षेपाखेरीज पार पाडली जाते.
पण हे ही जुने झाले. आता अनेक प्रणाली – विशेषत: browsers – हे तुम्हाला विचारता, तुमच्या माघारी, परस्पर अद्ययावत करून मोकळे होतात. उलट त्यांना तसे करता येऊ नते यासाठी बरेच सव्यापसव्य करावे लागते. बहुतेक वापरकर्ते (Users) हे आळशी असल्याने हे त्यांच्या पथ्यावर पडते. त्यातील धोक्याकडे दुर्लक्ष करुन ते सुखाने काम करत राहातात.
https://www.eetimes.com/ येथून साभार.उपग्रह मनोरंजनाच्या (satellite television) जमान्यात तुम्हाला विविध दूरचित्रवाणी वाहिन्या पाहाण्यासाठी ‘सेट-टॉप बॉक्स’ नावाचे उपकरण वापरावे लागते. यावर सेवादात्या कंपनीने आपल्या नियंत्रणातील संचालन-प्रणाली (Operating system) बसवलेली असते. वापरकर्त्याकडून वेगळी संमती न घेता त्यांच्याकडून त्याचे अद्यतनीकरण परस्पर केले जात असते. अनेकदा एखादा कार्यक्रम चालू असतानाच ते जिच्या माध्यमातून पाहात आहोत त्या प्रणाली (system वा app) मध्ये हा बदल होऊ लागतो. त्यासाठी तुमचा कार्यक्रम सरळ थांबवून हे काम केले जाते.
तुम्ही खासगी वा शासकीय कार्यालयात काम संगणकावर काम करत असाल, तर हा संगणक एका जाळ्याचा भाग असतो आणि या जाळ्याचे नियंत्रण ‘सर्व्हर’ म्हणून ओळखल्या जाणार्या संगणकाकडे असते. याच्या नियंत्रणात असलेल्या सर्व संगणकावर असे अद्यतनीकरण करण्याचे, वापरकर्त्यांच्या कामावर देखरेख करण्याचे काम हा सर्व्हर करत असतो.
एक मेंदू चार हातपण ही सारी अर्वाचीन उदाहरणे झाली. यापूर्वीच्या भागांत जसे मानवी जीवनप्रवासाच्या उदयकाळाचा मागोवा घेतला, त्याच धर्तीवर संगणकाच्या उदयकाळाकडे जाऊ. या काळामध्ये संगणकांची उपलब्धता कमी होती नि किंमत सर्वसामान्यांच्या तर सोडाच, अनेक कार्यालये नि कंपन्यांच्याही आर्थिक कुवतीबाहेर होती. शिवाय तो एका वेळी एकच व्यक्ती वापरू शकत असे. मग आहे त्याच संगणकाचा वापर अधिकाधिक करता यावा यासाठी ही मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न झाला. ज्याला CPU (Central Processing Unit) म्हणतात तो मुख्य विभाग अधिक महत्त्वाचा नि किंमतीचा फार मोठा हिस्सा त्याच्यासाठीच दिला जाई. मग हा भाग एकाहुन अधिक व्यक्ति वापरू शकल्या, तर खर्च विभागला जाईल या हेतूने, इतर तीन आवश्यक उपकरणे– मॉनिटर, की-बोर्ड नि माऊस– मिळून तयार झालेले एकाहुन अधिक Terminals या एकाच CPU संगणकाला जोडले गेले.
ही टर्मिनल्स (Terminal) स्वतंत्रपणे काही कार्य पार पाडू शकत नसल्याने, काही वेळा यांना Dumb – म्हणजे बुद्धिमंद - Terminals असेही म्हटले जाई. एखाद्या बँकेच्या शाखेमध्ये अथवा पोस्ट ऑफिससारख्या सरकारी कार्यालयांतून असते तशी ही टर्मिनल्स म्हणजे त्याच्या वापरकर्त्याला मूळ संगणकाशी संवाद साधण्यासाठी दिलेली केवळ एक खिडकी असे. या खिडकीचा वापर वेग-वेगळी व्यक्ती करु शकत असे. तिच्या मार्फत वापरकर्त्याने पुरवलेली वा मागितलेली माहिती, वा करायला सांगितलेली प्रक्रिया (process) हे सारे मुख्य संगणकाकडे पाठवत असे. तिथेच त्यावर आवश्यक ते काम होऊन, अंतिमोत्तर तेवढे या खिडकीकडे येत असे. मग वापरकर्ता ती माहिती या खिडकीमार्फत पाहू शके, आवश्यक वाटल्यास मुख्य संगणकाला जोडलेल्या प्रिंटरवरुन छापून घेऊ शकत असे.
ही संकल्पना आज आभासी खासगी जाळे (Virtual Private Network - VPN) मध्ये रूपांतरित झाली आहे. याचा फायदा असा की परस्परांसोबत काम करणारे सारे वापरकर्ते आता एकाच ठिकाणी, एकाच भूभागावर असण्याची गरज उरलेली नाही. एखाद्या अमेरिकन कंपनीसोबत काम करणारे काही जण भारतात, काही इंडोनेशियामध्ये, काही चीनमध्ये तर काही एखाद्या स्कँडिनेवियन देशात बसून काम करु शकतात. हे सारे काम करताना प्रथम VPN मार्फत अमेरिकन कंपनीच्या सर्व्हरवर लॉग-इन करतात. आता त्या कंपनीच्या सर्व्हरच्या कक्षेतील प्रणाली नि डेटा यांचाच वापर त्यांना करता येतो. या कामाशी त्यांच्या स्वत:च्या संगणकाचा संपर्क होत नाही. जणू ते त्या अमेरिकन कंपनीच्या कार्यालयात बसूनच काम करत असतात.
ही संकल्पना सजीवाला– विशेषेकरुन मानवाला लावून पाहाता येईल. एका मानवाची डोळे, नाक, कान, ही ग्रहणेंद्रिये; हात, पाय हे चल (movable) अवयव, त्यांवरील बोटे, ही सारी अनुषंगे वरकरणी स्वतंत्रपणे कार्यरत असली, तरी ती अंतिमत: मेंदू या एका नियंत्रकाच्या अधिपत्याखाली असतात. या सर्वांनी केलेल्या कार्याचे अहवाल या केंद्रीय नियंत्रकाकडे जातात, त्यानंतर त्या माहितीचे पृथक्करण, विश्लेषण करुन तो आवश्यक पुढील कृतीचा निर्णय घेतो नि ती करण्याची जबाबदारी असणार्या त्या-त्या अनुषंगाकडे आवश्यक तो संदेश पोहोचवतो.
संगणकाचा वा तुमच्या उपग्रह मनोरंजन सेवादात्याचा सर्व्हर जसा एकाच क्षणी त्याला जोडलेल्या सर्व उपकरणांना अद्ययावत करतो, तसे मानवी मेंदूंबाबत करता आले, तर समूह-मन प्रस्थापित करणारी ही नवी प्रणाली त्यांच्या मेंदूत आरोपित करता येईल. यातून या मानवी मेंदूंचे अस्तित्व स्वतंत्र व्यक्ति म्हणून न राहाता एका व्यापक समूह-मनाचे अनुषंग म्हणून बदलता येईल. Pluribus या मालिकेमध्ये हीच कल्पना वापरून एका समूह-मनाची निर्मिती केली आहे.
Pluribus : समूह-मनाचा उदयमालिकेतील घटनांची सुरुवात होते ते एका जगद्व्यापी अपघाताने. एका विशिष्ट क्षणी जगातील बहुतेक सारे मानवप्राणी अचानक स्तंभित (stand-off) होऊन जातात, टीव्हीवरील चालू चित्रमालिका रिमोटवरील ‘Pause’ बटन दाबून मध्येच थांबवावी तसे. काही वेळानंतर टीव्हीवर pause केलेला चित्रपट बटन दाबून पुन्हा सुरु करावा तसे मानवी जग पुन्हा सजीव होते.
एखाद्या सर्व्हरने एकाच आदेशाने त्याला जोडलेल्या सर्व संगणकांवर/टर्मिनल्सवर असलेल्या संचालन-प्रणाली (operating system) बदलून टाकल्याप्रमाणे– या सार्यांच्या मेंदूंचे जणू ऊर्ध्वश्रेणीकरण (upgrade) झाले आहे. (जगभरात विखुरलेल्या तेरा जणांचा अपवाद वगळता) सर्वांच्या वागणुकीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मनुष्यप्राणी म्हणून त्यांच्या मनाची काम-क्रोधादी षड्रिपुयुक्त जी जडणघडण असते, ती पुसून टाकण्यात आली आहे. तिथे नवी मानसिक जडणघडण, नवी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे. आता त्यांचे चेहरे काहीसे भावनाहीन दिसू लागले आहेत. भयपटांतून दिसणार्या ‘पुनरुज्जीवित कलेवरांची’ (Zombie) आठवण होते आहे.
या सार्या माणसांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले आहे. पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज हा आता एकच जीव म्हणून जगणार आहे. या सर्व माणसांचे माणसाचे भौतिक अवयव वेगळे असले, तरी स्मरणकोष (memory) नि जाणीवा (Senses) या केवळ समानच नव्हे तर सामायिक (common) आहेत. एकाला झालेले ज्ञान हे आपोआप इतरांच्या स्मरणकोषात पोहोचते आहे. एकाला लागलेली ठेच सार्यांच्या चेतासंस्थेमध्ये वेदनेची लहर उमटवून देते आहे. एकाच्या मनात उमटलेली सुखाची, आनंदाची लाट सर्वांच्याच चेहर्यावर समाधानाची भावना प्रतिबिंबित करते आहे. आता प्रत्येक व्यक्ती मानवी शरीराच्या हात, पाय, डोळे, इत्यादी अवयवांप्रमाणे या विशाल मानवजीवाचे केवळ एक अनुषंग झालेले आहे’(१).
एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करुन ठेवायचा, तो असा की, ‘या व्यवस्थेमध्ये मानवी मेंदू वा संगणक-जाळ्याच्या सर्व्हरप्रमाणे एखादी केंद्रीय व्यवस्था नाही. इथे निर्णय समूह-मनानेच होतात,’ असे ही सारी अनुषंगे– ही पूर्वाश्रमीची माणसे– सांगताना दिसतात. (कथानकाच्या प्रवाहामध्ये इथे मला प्रथम ठेच लागली. पण याबद्दल इतर काही मुद्द्यांसह पुढे बोलेन.)
हा जैविक भाग वगळला, तर उरलेल्या व्यवस्थेचे मुख्य सूत्र हे साम्यवादी व्यवस्थेचे सूत्रच आहे. संपूर्ण मानवी समाज हा एकच असल्याने देशांची निर्मिती करणार्या सीमा नाहीत. इथे वैय्यक्तिक मालकीला थारा नाही. इथे कुठलेही चलन नाही नि राज्यव्यवस्थाही नाही. अर्थ नि अधिपत्य ही दोनही मुख्य कारणे निकालात निघालेली असल्याने संघर्ष, लढाया, युद्धे नाहीत. भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहिले असता पतंजलीसूत्रांतील अहिंसा, सत्य, अस्तेय या यमनियमांचे पालन करणारा हा समाज आहे.
ब्रह्मचर्य नि अपरिग्रह हे इतर दोनही काही अंशी आचरणात आणत आहेत. वैयक्तिक संग्रह नसला, तरी सामूहिक गरजेच्या गोष्टींचा संग्रह– तर काही प्रमाणात उत्पादनही केले जाते आहे. ब्रह्मचर्याबाबत मात्र काहीशी संदिग्ध स्थिती आहे. साम्यवादी व्यवस्था लग्नसंस्थेलाही राज्यव्यवस्थेप्रमाणे शोषणाची पोषक मानून तिलाही मोडीत काढण्याचा प्रस्ताव देते. प्लरिबसच्या व्यवस्थेमध्ये याबाबत थेट उल्लेख नसला, तरी रात्रीच्या समूहवसतीचा प्रयोग पाहाता ती ही मोडीत निघाली असावी असे म्हणता येते.
पण ही व्यवस्था साम्यवादी व्यवस्थेप्रमाणे केवळ मनुष्यप्राण्यांतील बंधुभावापाशी थांबत नाही. ती निसर्गाशी बंधुभावही प्रस्थापित करते आहे. मनुष्येतर जीवमात्रांशीही आपलेपणाचे सौहार्दमय सहजीवन असायला हवे असा तिचा आग्रह आहे. त्यामुळे आता कोणत्याही सजीवाला हानी न पोहोचवण्याचे तिचे धोरण आहे. त्याअर्थी ती बुद्धाच्या करुणामय दृष्टिकोनाचा अंगीकार करते आहे. परंतु प्राणी, पक्षी, वनस्पती वा कीटक हे सजीव समूह-मनाच्या या जाळ्यामध्ये समाविष्ट नाहीत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे नि नव्या व्यवस्थेचे अभयही. त्यामुळे समूह-मनाच्या निर्मितीनंतर सर्व प्राणिसंग्रहालये, कुक्कुटपालन केंद्रे, वराहपालन केंद्र, मांस व दुधासाठी चालवली जाणारी गोपालन केंद्र बंद करुन त्या प्राण्यांना मुक्त करण्यात येते. अगदी वनस्पतींनाही इजा पोहोचवणे निषिद्ध ठरले आहे.
पण ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या निसर्गरचनेमध्ये एका सजीवाने दुसर्याला हानी करायची नाही म्हटले, तर खायचे काय? जगण्याला आवश्यक ऊर्जा कुठून मिळवायची? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. आणि हे झाले मूलभूत प्रश्न. जिवंत राहाणे नि जगणे या दोन अवस्थांतील फरक दाखवणार्या मनुष्यप्राण्याला इतरही बर्याच गरजा असतात, त्या कशा भागवायच्या? या प्रश्नांना नवी व्यवस्था सामोरे जाते आहे.
- ( क्रमश:) -
पुढील भाग » जठराग्नी शमवाया भूतां
टीपा:
(१). प्लरिबसच्या व्यवस्थेकडे या दृष्टिकोनातून पाहाताना मला सुबोध जावडेकर यांच्या ‘पदार्पण’ या विज्ञानकथेची (कथासंग्रह: ‘वामनाचे चौथे पाऊल’) आठवण झाली. त्याबद्दल या मालिकेच्या अखेरीस एका परिशिष्टामध्ये विस्ताराने लिहितो आहे. [↑]
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १० : नव्या व्यवस्थेकडे
-
सर्वे सुखिन: सन्तु « मागील भाग
शिकारजीवी, शेतीजीवी, आणि व्यापारजीवी असे मानवी समाजव्यवस्थांचे प्रमुख टप्पे दिसतात. यातील पहिले दोन अनायासे सहजीवी होते. शिकारजीवी, शेतीजीवी समाजांमध्ये प्रामुख्याने टोळ्यांचा परस्पर-संघर्ष वा स्पर्धा होती, तर व्यापारजीवी समाजाने त्याला आपल्यामध्ये आतच सामावून घेतले. या बदलाने सहभावनेला दुर्बल केले. त्यातून समाज शबल होत गेला. साम्यवादी व्यवस्था तर खर्या अर्थाने ‘सर्वे सुखिन: सन्तु’ स्वरूपाची म्हणता येईल, समूह-हिताच्या हेतूने पाहिले तर तिच्यामध्ये न्यून दिसत नाही. तरीही व्यावहारिक पातळीवर तिचा पहिला– श्रमजीवींच्या एकाधिकारशाहीचा– टप्पाही मूळ हेतू साध्य करण्यात यशस्वी झालेला दिसत नाही.
शेती नि पशुपालन या दोहोंमार्फत आपले अन्न मिळवू लागलेला मनुष्यप्राण्याला – अगदी मोजक्या वन्यजीवी जमाती सोडल्या तर – शिकारजीवी राहण्याची गरज उरलेली नाही. मानवी इतिहासाच्या प्राचीन अध्यायामध्ये प्रबळ असलेले संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) हे तीन जीवनाधार आज अदखलपात्र वा संदर्भानुसार गुन्हेही ठरत आहेत. उत्पादन आणि विनिमयप्रधान समाजामध्ये शेती आणि पशुपालन यांचे महत्त्वदेखील ‘अनेकांपैकी एक’ उत्पादन-व्यवस्था इतकेच राहिले आहे. आता सर्व प्रकारच्या सामाजिक नि राजकीय व्यवस्था यांना छेदून जाणारी व्यापारजीवी वृत्ती सर्वत्र प्रबळ आहे. भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेली राष्ट्रे असोत, कम्युनिस्ट एकाधिकारशाही राबवणारी राष्ट्रे असोत की धर्माधिष्ठित एकाधिकारशाही राबवणारी राष्ट्रे असोत, या सार्यांनीच उद्योग नि विनिमयप्रधान व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे तिच्याशी निगडित गुणदोषांचा आढळ त्या सर्वच व्यवस्थांमध्ये दिसतो आहे.
असमाधानी अस्थिर अस्तित्वया सर्व देशांतून, समाजांतून प्रगतीच्या विविध वाटा फुटलेल्या दिसतात, आणि तरीही यातील कोणतीही एक व्यवस्था समाधानी नि स्थिर असा समाज निर्माण करु शकलेली नाही. युरपमधील अति उत्तरेकडील नॉर्डिक राष्ट्रे(१) वगळता सर्वच समाज हे अंतर्गत संघर्षांनी आणि विषमतेच्या वाळवीने पोखरलेले आहेत. याला काही सोपी, तर काही अतिशय गुंतागुंतीची कारणे आहेत. बहुतेक व्यवस्थांची पुस्तकी मांडणी कितीही आकर्षक असली, तरी त्याची अंमलबजावणी ही भ्रष्ट स्वरूपातच होताना दिसते. याला षड्रिपुयुक्त मानवी मनाची जडणघडण, वंश-धर्म-भाषा आदी पर्यायी व्यवस्थांचा जाणारा छेद नि होणारा संघर्ष वगैरे बरीच कारणे असतात.
‘माणसाने समाधानी असणं’ ही मनाची प्रवृत्ती आहे. एखादा एक वेळ पोटभर अन्न मिळाले तरी आनंदी राहील, तर उद्योजकांसारखी नि राजकारण्यांसारखी मंडळी कोट्यवधींचा संचय पचवूनही ‘अजून द्या, अजून द्या’ म्हणत राहतील. वास्तविक पोटात जाणार्या अन्नाचे प्रमाण पोटभर असणे एवढी खरी गरज आहे. उरलेला सारा संचय हा बाह्य वस्तूंचा आणि म्हणून मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाला फारसा हातभार न लावणारा असतो. सर्व नमस्कार ‘केशवं प्रतिगच्छती’ असं म्हटलं जातं, तसं चलनाच्या उदयानंतर माणसाची सारी इच्छाशक्ती, सारी ईर्षा अधिकाधिक चलन मिळवण्याकडे नि साठवण्याकडे केंद्रित झाली आहे. आणि हा वरकड संचयही पुन्हा आणखी चलन मिळवण्याचे मार्ग चोखाळण्यासाठी अथवा लालसेने निर्माण केलेल्या काल्पनिक सुखांच्या लहरी निर्माण करण्यासाठी वापरला जातो आहे.
त्यामुळे होते असे की माणसाला समाधानी असणे पुरेसे वाटले नाही, की विषमतेला खतपाणी मिळते आणि विषमतेमधून नव्या असमाधानाला. व्यवस्थेचा, नेत्याचा चेहरा कुठलाही असला, कुठलेही उद्दिष्ट (objective) त्यांनी समोर ठेवलेले असले, तरी समाजातील माणसांमध्ये असमाधान, लालसा असली की विषमता रुजतेच. तेव्हा मुद्दा समाजातील व्यक्तींच्या दृष्टिकोनाचा असतो. म्हणून महात्मा गांधी माणसांतील नैतिकतेला आवाहन करतात नि त्यावर आधारित भारतीय समाजाची कल्पना मांडतात.
बाबा वाक्यम् प्रमाणम्या मुद्द्याचे आणखी एक अनुषंग आहे ते बंधुभावाचे. वर ‘अर्थकारणाचे सहजीवन’ या भागामध्ये समाजाअंतर्गत, संघटनेअंतर्गत अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक बाबांच्या अनुयायांचे एक उपसमाज, अर्थकारणाचा पाया म्हणून उभे राहाण्याबद्दलदेखील लिहिले आहे. बुवा-बाबांचे, राजकीय नेत्यांचे वा अर्थकारणाने बांधल्या गेलेल्या उपरिनिर्दिष्ट व्यापक संघटनेचे अनुयायी केवळ अर्थकारणाच्या बाबतच नव्हे, तर आपापल्या बाबांनी, नेत्यांनी, अध्वर्यूंनी व्यक्त केलेल्या मतांच्या बाबतही एकमताने ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ वृत्तीने जगतात. ते बाबा अथवा नेते म्हणाले, ‘अमुक पदार्थ खाण्याने माणूस शूर होतो’ की त्या विधानाचा प्रसार करण्याचा धडाका अनुयायी लावतात. याला सिद्ध करण्याचे आव्हान देणार्यावर तुटून पडतात.
पण समजा काही काळानंतर एखाद्या हे बाबाच म्हणाले की, ‘तो पदार्थ खाल्ल्याने माणूस दुबळा होतो’ की अनुयायी तसे म्हणू लागतात. मग ‘आधी असे सांगितलेत ते का ?’ असा जाब ते विचारत नाहीत. कुणी बाहेरच्याने विचारलाच तर उलट,‘आमचे बाबा असे म्हटलेच नव्हते, कुण्या हितशत्रूंनी त्यांच्या नावे हा खोटा संदेश कसा पसरवला होता’ यावर ते आवेशाने बोलू लागतात. त्या-त्या श्रेष्ठींच्या संदर्भात ते एक गट, एक विचार या सूत्राने वागत असतात. त्यात मतभिन्नतेला थारा नसतो. आयुष्यात इतर बाबतीत भानावर असणारेही आपापल्या या स्वयंघोषित श्रेष्ठींसंदर्भात संपूर्ण अविवेकी श्रद्धा ठेवून असतात.
म्हणजे (आर्थिक) हितसंबंधांमुळे वा सहप्रवासी असल्याच्या भावनेतून या सामूहिक दृष्टिकोनाचा– एका प्रकारच्या समूह-मनाचा उगम होताना दिसतो. त्या पंथाचा, पक्षाचा वा संघटनेचा डोलारा या परस्पर-संबंधांवर उभारलेला असतो. या आधी आपण कर्मकांड वा टोळीच्या ओळखीबाबत जसे पाहिले, तसेच इथेही कार्यकारणभाव उलट करून पाहिले तर? आर्थिक असोत वा भावनिक, परस्परसंबंध निर्माण करण्याचा टप्पा वगळून व्यापक मानवी समाजामध्ये सामूहिक दृष्टिकोनाची थेट रुजवणूक करता आली तर…?
समूह-मनाची गरजबुवाबाबांचे पंथ, वर उल्लेख केलेली सांस्कृतिक संघटना यांसाठी अध्यात्म, धर्म, संस्कृती या आधीच प्रस्थापित सामाजिक बंधांची शिडी करुन हे साध्य करताना दिसतात. पण मनाचे हे दुय्यम (secondary) उद्भव पकडण्याऐवजी थेट ‘या मनाचे त्या मनाशी’ बंध निर्माण केले, तर त्यातून तयार झालेल्या समाजाला आर्थिक, सामाजिक, कर्मकांड, नीतिनियम यांच्या शिवायही एकत्र बांधून घालता येईल, त्यांचा एक विशाल सहजीवी समुदाय निर्माण करता येईल. एका ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थेचे बीज रुजवता येईल.
संकल्पचित्र: https://jonathanwarden.com/the-hive-mindयेथून साभार.अशा व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तिच्या मनामध्ये इतरांच्या भाव-भावनांची स्पंदने उमटतील. त्याने होईल असे की बेगुमानपणे चलन-संकलन करत मोकाट धावणार्याच्या मनामध्ये त्याने तुडवलेल्या, सामाजिक वा आर्थिक स्तरावर त्याच्याहून खाली असणार्याच्या आयुष्यातील गरजांचे, वेदनांचे प्रतिध्वनी उमटतील. त्याचवेळी या दोघांच्याही मनात या सार्यांच्याच गरजा नि सुखलोलुपतेचे चोचले पुरवण्यासाठी विध्वंस झालेल्या निसर्गाचे आक्रंदनही प्रतिबिंबित होईल. नागरी, सुखलोलुप आयुष्याने नाहीशी केलेली संवेदनेची पुरी साखळी जोडली जाऊन विकास अथवा प्रगतीचे प्रत्येक पाऊल काय काय किंमत वसूल करते याची जाणीव प्रत्येक मनात उमटत राहील.
यातून हव्यासाला मोकाट न सोडता, निसर्गाचा तसंच श्रम नि ऊर्जेचा अपव्यय टाळून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्याचा डोळसपणा त्यांच्या रुजेल. फक्त त्यासाठी या समूहजीवी व्यवस्थेला असलेली बाह्य प्रतिस्पर्ध्यांची गरज मोडून काढून, शत्रूलक्ष्यी विचारांना आणि मांडणीला तिलांजली देण्याची गरज आहे. ‘प्लरिबस’ या मालिकेमध्ये रुजवली गेलेली समाजव्यवस्था या समूह-मनाच्या संकल्पनेच्या आधारे उभी केली आहे.
एकुणात समूह-मालकी, समूह-वसती, सहकार या संकल्पना समाजाला पुरेशा एकसंघ करीत नाहीत असे सिद्ध होत आले आहे. समाजातील व्यक्तिंच्या विचारक्षमतेचे स्वतंत्र अस्तित्वच लयाला गेल्याखेरीज एकसंघता साधणे शक्य नाही(२) हे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर अशी व्यवस्था ही केवळ भौतिक व्यवस्था असणार नाही, ती समूहाच्या मानसिकतेलाच एकत्र आणणारी असावी लागते. मग त्याचा परिणाम म्हणून भौतिक जगण्याचे धागेही एकत्र गुंफले जाऊ लागतात. या निष्कर्ष वा निकषाच्या आधारे पुढचा टप्पा म्हणून पातळीवर ‘समूह-मना’ची (Hive Mind) ही संकल्पना उभी आहे.
समूह-मनाची रुजवणूकएक प्रस्ताव म्हणून समाज-व्यवस्थेचे नवे प्रारूप मांडणे सोपे आहे. पण त्याची अंमलबजावणी (roll out) करण्यामध्ये व्यावहारिक अडचणी येत असतात. कारण त्यामध्ये अशी ‘अंमलबजावणी करण्यासाठी साधने कुठली असावीत, रुजवण्याची पद्धत काय असावी?’ याचाही जास्तीचा विचार करावा लागतो.
ही अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम विचारांची रूजवणूक करून त्याआधारे पुढील आराखडा रुजवत जावा? की निव्वळ वैचारिक प्रेरणेवर भर देऊन पुढील बदल सेंद्रीय पद्धतीने होतील अशी आशा करावी? की साम्यवादी प्रारूप म्हणते तसे आधी सत्ता ताब्यात घेऊन त्या सत्तेमार्फत राजकीय व्यवस्था म्हणून लादली जावी? एखाद्या भूभागातील समाजात ही रुजवणूक व्हावी, की एकाच वेळी पुर्या मानवी समाजात व्हावी? व्यापक पातळीवर राबवण्यासाठी सर्वत्र एकदम रुजवणूक व्हावी, की एका छोट्या तुकड्यावर आधी रुजवून त्याच्या यशापयशाच्या आधारे, चुका सुधारून नि तेथील यशाची द्वाही फिरवत पुढील टप्प्यांकडे जावे?
मानवी उत्क्रांती ही हजारो वर्षे चालू असलेली प्रक्रिया आहे. पण ती काही कुणी हेतुत: चालना दिलेली प्रक्रिया नव्हे, तसंच असुरक्षित, भयगंडाने ग्रासलेली माणसे मानतात त्या कुण्या एका सर्वशक्तिमान नियंत्रक व्यवस्थेच्या संपूर्ण कह्यात असलेली यंत्रणाही. तिथे बहुविध प्रेरणा नि कृती आहेत, त्यांचा एकत्रित परिणाम दाखवणारे प्रारूप असे त्याचे ढोबळ स्वरूप आहे. ती काही एका निश्चित दिशेने केली जाणारी वाटचाल नव्हे की नियंत्रित करण्याजोगी प्रक्रियाही. त्यामुळे प्रवास चालू असलेली गाडी थांबवून, वळवून ‘अप’ ची पुन्हा ‘डाऊन’ करता यावी इतके ते सोपे नाही. आजवरच्या मानवी वाटचालीमधून असंख्य अपरिवर्तनीय असे बदल झाले आहेत, त्यांना पोटात घेऊनच नवी व्यवस्था उभी राहायला हवी.
https://t3.ftcdn.net/ येथून साभार.त्यामुळे ही नवी ‘समूह-मनाची’ व्यवस्था समाजामध्ये आरोपितच (install) करावी लागेल, उत्क्रांतीप्रमाणे अकर्मक पद्धतीने रुजत जाण्याची वाट पाहाणे शक्य नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्य व्यवस्थेचे लाभधारक असलेल्या, बदलांच्या विरोधात उभे असलेल्यांची संख्या– संख्येपेक्षाही सत्ता, तिला उध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार, हे ही ओघाने आलेच. त्यांना प्रत्याघातासाठी पुरेशी संधी वा उसंत न देता, लहानशा कालखंडात एखाद्या शस्त्रक्रियेसारखी ही व्यवस्था वेगाने प्रस्थापित व्हायला हवी.
अल्पावधीत घडवून आणलेल्या अशा बदलांना मानवी इतिहासात ‘क्रांती’ असे म्हटले जाते. परंतु हा शब्द प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेमधील बदलाच्या संदर्भात वापरला जातो. आपण या क्षणी बोलत आहोत ती मानवी मनाची जडणघडण बदलणार्या क्रांतीबाबत. मानवी मनाच्या संदर्भात ही क्रांती कशी साध्य करावी याचा विचार करताना, मला संगणक-क्षेत्रातील एक रूपक वापरण्याचा मोह होतो आहे. माणसाच्या आदिम टोळीजीवनाकडून एक वळसा (detour) घेऊन मी थेट संगणकाच्या जगात शिरणार आहे.
- (क्रमश:) -
पुढील भाग » अद्यतनीकरण (Update)
टीपा:
(१). यामध्ये डेन्मार्क, नॉर्वे नि स्वीडन ही स्कँडिनेविअन राष्ट्रे आणि फिनलंड, आईसलंड या दोन राष्ट्रांचा समावेश होतो. मध्य युरपमधील स्वित्झर्लंड हे राष्ट्रदेखील बहुतेक वर्षी समाधानी राष्ट्रांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवते आहे. [↑]
(२). मुळात अशी व्यक्ति-ओळख पुसून टाकणारी एकसंघता आणावी का, ती व्यवस्था खरंच कल्याणकारी असेल का? प्रत्येकाच्या विचारक्षमतेचे स्वतंत्र अस्तित्व लयाला जाण्यामध्ये गुलामगिरीची व्यवस्था निर्माण होण्याचा मोठाच धोका निर्माण होतो. मोजक्यांच्या हाती सत्ता नि उरलेला स्वतंत्र विचारक्षमता नसलेला त्यांच्या आदेशांवर चालणारा व्यापक समाज अशी व्यवस्था निर्माण होऊ शकते. ही व्यवस्था सर्वकल्याणकारी होऊ शकेल का? या प्रश्नांचा विचारही करायला हवा. गांधींजीनी मांडलेली श्रेष्ठींच्या विश्वस्तपणाची कल्पना अथवा सामाजिक हिताच्या प्रेरणेने भारलेल्या मूठभरांच्या अधिपत्याखालील साम्यवादी व्यवस्था या काहीशा याच वळणाने जाताना दिसतात. धर्मसंस्थाही व्यवस्था म्हणवून घेत नसली तरी अशीच बहुसंख्येच्या हिताचा विचार करण्याची जबाबदारी नि अधिकार मूठभरांना प्रदान करते. या तीनही प्रकारांत नि लोकशाहीसारख्या अन्य व्यवस्थांमध्येही अखेरीस हे तळे राखणारेच फक्त पाणी चाखताना दिसतात.[↑]