वेचित चाललो...

वेचित चाललो’ ही विविध प्रकारच्या लेखनातील लक्षणीय वेच्यांची संचयनी आता नव्या देखण्या रूपात, शोधासाठी सोयीच्या विविध अनुक्रमणिकांसह

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

वेचित चाललो: ओॲसिसच्या शोधात

लेखनाच्या दर्जावरुन नव्हे तर लेखकाच्या ’आडनावा’वरून किंवा त्याच्या साहित्यबाह्य मतांवरून त्याच्या लेखनाला न वाचताच बाद करून टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे. एवढं पुरेसं नाही म्हणून की काय वर आपापले गट असतात, इतर सार्या निकषांत बसत असला पण आपल्या गटातला नसला तर त्याच्या लेखनाची दखल न घेणे, त्यावर ताशेरे ओढणे हे ही चालते. नवे-जुने, देशीवादी-आधुनिक वगैरे कळप आपापली ’भूमी’ राखून असतात. त्यातच देशातील बहुसंख्येच्या बाहेरच्या सामाजिक गटातला लेखक असेल मग तर विचारायलाच नको. त्यामुळे ’फादर’ दिब्रिटोंचं ’ओॲसिसच्या शोधात’ वाचलंस का?’ या माझ्या प्रश्नावर ’आम्ही खूप वाचतो बरं का’ असा दावा करणारे बरेच जण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. इतके सुरेख पुस्तक वाचून त्यातला आनंद घेता आला नाही, हे असल्या पूर्वग्रहदूषित मनाच्या व्यक्तींचे दुर्दैव म्हणायला हवे. मध्यंतरी एका साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मीना प्रभू उमेदवार होत्या तेव्हा साहित्यिकांनी ’प्रवासवर्णन’ हा लेखनप्रकार साहित्य मानावा की नाही असा वाद निर्माण केला होता. सामान्यत: पर्यटनाचे अनुभव लिहिणे हा ढोबळमानाने प्रवासवर्णनाचा घाट असतो. यात प्रामुख्याने ज्या ठिकाणाला भेट दिली तिथली माहिती, तात्कालिक अनुभव, इतिहास, आदि माहितीचा भराव असतो. पण फादर दिब्रिटोंच्या युरोप भेटींवर आधारित या लेखनाला प्रवासवर्णन या सदरात टाकता येणार नाही. याचे कारण म्हणजे यातील दृष्टीकोन पर्यटकाचा नाही. ज्या देशांना, शहरांना भेट दिली तेथील प्रसिद्ध ठिकाणांना दिलेल्या भेटींच्या आधारे लिहिलेले हे लेखन नाही. ज्या देशांना भेटी दिल्या त्या समाजातील व्यक्तींशी समरस होताना आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करुन समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. यात माहितीची भरताड, पर्यटनाची हौस यापेक्षाही त्या त्या ठिकाणच्या समाजातील मूलाधाराशी जोडून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण यात निव्वळ भेटींपेक्षा ’वास्तव्या’चा भाग अधिक आहे. दिब्रिटो हे फादर असल्याने चर्चच्या माध्यमातून झालेले हे दौरे ख्रिश्चन परंपरांच्या संदर्भाशिवाय मांडले जाणे अशक्यच होते. पण केवळ जाताजाता येणारा उल्लेख इतकेच त्याचे स्थान या लेखनात आहे असे माझे मत झाले. एरवी युरोपच्या समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचे आकलन करण्याचा, तिला भिडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे करत असतानाच त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय समाजाची आणि युरोपिय समाजाची तुलना करून पाहण्याचा प्रयत्नही केला आहे. आणि पूर्वग्रहदूषित मने गृहित धरतील तसे हे विवेचन एकांगी अजिबातच नाही. ज्ञानोबा-तुकोबाला सोबतीला घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय समाज, परंपरा यांच्याबाबत तुलनात्मक केलेले भाष्य विचारात घेण्याजोगे आहे. खरंतर हा त्यांच्या प्रवासाचा अनुभव नसून 'अनुभवाचा प्रवास' आहे असे म्हटले तर ते अधिक सयुक्तिक ठरेल. ज्या काळात मोबाईल, इंटरनेट, आदि तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते; जेव्हा भारतात लॅंडलाईन फोन ही देखील समाजात मूठभर प्रतिष्ठितांची चैन होती आणि परस्पर-संपर्कासाठी पत्र हे एकच माध्यम उपलब्ध होते, त्या काळात दिब्रिटोंनी देशाच्या सीमा ओलांडून अनेक परदेशस्थ व्यक्तींशी, माणसांशी प्रस्थापित केलेल्या नात्यांचा हा लेखाजोखा आहे. इथे निवडलेला वेचा त्यांच्या इटलीतील वास्तव्यादरम्यान एका कुटुंबासोबत घालवलेल्या काही काळासंदर्भात आहे. तोडकेमोडके इटालियन शिकलेले फादर आणि इंग्रजीचा गंध नसलेले इटालियन जोडपे आणि त्यांची छोटी मुलगी यांच्यात निर्माण झालेल्या ऋणानुबंधाची ही गोष्ट आहे. पण निव्वळ तितकेच न राहता त्या दरम्यान फादर इटलीतील समाज, त्यांची जीवनपद्धती, खाद्यसंस्कृती, त्यांच्या जगण्यातले ताण-तणाव इत्यादींना स्पर्श करून जातात. त्यातल्या सर्वात छोट्या सदस्याशी - अनाशी - तर त्यांची छान दोस्ती होऊन जाते.  या लेखात छोटी असलेली आना पुढे बरीच वर्षे त्यांच्या संपर्कात होती. पुढे तरुण आनाशी झालेल्या संवादावर पुढे आणखी एक लेख याच पुस्तकात त्यांनी लिहिला आहे.  या दोन टप्प्यातील संवादावरुन अनाच्या व्यक्तिमत्वात झालेल्या स्थित्यंतराच्या निमित्ताने तेथील संस्कृतीचे काही पैलू डोकावून जातात.  वाचन हा ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, अशांसाठी काही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. अशा पुस्तकांच्या माझ्या यादीत 'ओअॅसिसच्या शोधात' हे पुस्तक आजही समाविष्ट आहे. शाब्दिक, शारीरिक हिंसा, विध्वंस, द्वेष, असूया, हेवेदावे इत्यादींचा मारा असह्य होतो तेव्हा मी हे पुस्तक उघडतो. माणसाच्या माणसावरच्या विश्वासावरचा माझा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा दृढ होतो. ('ओॲसिसच्या शोधात’ या पुस्तकातील एक वेचा 'वेचित चाललो' वर http://vechitchaalalo.blogspot.in/2017/10/Oasis.html)

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

वेचित चाललो: पं. नेहरु: एक मागोवा

माणसाच्या बुद्धीचा विकास जसजसा झाला, तसतसे त्याची बाह्य धोक्यांची जाणीव वाढत गेली. मग त्याने धोक्यापासून रक्षण करु शकतील अशी भौतिक आणि अध्याहृत अशी दोन प्रकारची साधने त्याने विकसित केली. निसर्ग घटकांच्या  दैवतीकरणाने सुरुवात करुन अखेर अमूर्त अशा देव संकल्पनेपर्यंत तो पोचला. स्वतःला सुरक्षित करुन घेण्यासाठी या बाह्य, अध्याहृत खुंट्यांचा आधार घेत असतानाच तो जनावरांप्रमाणे कळपाने राहात होता. जनावरांहून अधिक  प्रगल्भ जाणीवा, अपेक्षा नि प्रेरणा विकसित झाल्या, तसतसे त्याला कळपातील परस्पर-व्यवहारांना अधिक काटेकोर करण्याची गरज भासू लागली. त्यातून आचारी (बिहेविरल)  धर्माचा जन्म झाला, आणि कळपाचे रूपांतर समाजात झाले. परंतु समाज आणि व्यक्ती यांचे हितसंबंध अनेकदा परस्परांना छेदून जात असल्याने व्यक्तींचा कल अनेकदा सामाजिक - आचारी धर्माचे - नीतिनियम डावलून स्वार्थानुरूप वर्तन करण्याकडे होत असतो. याला प्रतिरोध  करण्यासाठी काही चतुर नेत्यांनी आचारी धर्माला यथावकाश देव-संकल्पनेसह पारलौकिक संकल्पनांशी जोडून दिले; आणि आचारी धर्माच्या नीतिनियमांना पावित्र्य संकल्पनेचा आवरणात गुंडाळून सादर केले, ज्यातून ते अनुल्लंघनीय असल्याचा  धाक अधिक  परिणामकारकपणे घालता येऊ लागला. 

परंतु इतकेही पुरेसे होईना. पुढे वेगवेगळ्या धार्मिक समाजातील व्यक्तींची सरमिसळ होऊ लागली आणि त्यातून विविध समाजव्यवस्थांचे परस्परांना छेद जाऊ लागले. आता एक-धर्माचारी  समाजच एकत्र वस्ती करून राहील असे बंधन राहिले नाही. त्यामुळे पुन्हा धर्मगट आणि समाज या कल्पना वेगळ्या झाला. आता या सरमिसळ समाजासाठी नीतिव्यवस्था आणि व्यवहार-व्यवस्था निर्माण करणे अपरिहार्य ठरले.  विविध तत्त्वज्ञानांच्या माध्यमांतून नवे वैयक्तिक आचारधर्म पुढे आले, तर व्यापारादि परस्पर-व्यवहारासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण केल्या गेल्या. तत्त्वज्ञानांचे क्षेत्र बुद्धिमंतांचे, तर सामाजिक व्यवस्थेचे क्षेत्र प्रामुख्याने राजकीय/सामाजिक नेत्यांचे ठरले. अर्वाचीन काळात पुन्हा ही विभागणी धूसर होत एखादा तत्त्वविचार एकाच वेळी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चौकटी देऊ लागला. कम्युनिझमच्या विचाराने धर्मसंस्थाचे अस्तित्व प्रथमच संपूर्णपणे झुगारून सर्वस्वी अधार्मिक, ऐहिक अशी देऊ केलेली समाजव्यवस्था हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नि विसाव्या  शतकाच्या पूर्वार्धात जगात व्यापकदृष्ट्या प्रभावशाली ठरलेला सर्वात अर्वाचीन असा विचार मानला जातो. 

पं. जवाहरलाल नेहरु हे केवळ भारताचे पहिले पंतप्रधान इतकीच ओळख घेऊन उभे असलेले व्यक्तिमत्व नव्हते. आपल्या विद्यार्थी दशेतच आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजव्यवस्था आणि अर्थकारण यांचा सांगोपांग अभ्यास करून भारतात आल्यानंतर संयुक्त प्रांतातील शेतकरी चळवळीच्या माध्यमातून थेट भारतातील समाजाच्या सर्वात वंचित थरातील समाजाशी जोडले गेले होते. स्वातंत्र्यपूर्व कालात त्यांच्यावर कम्युनिझमचा पगडा होता आणि रशियातील त्याच्या प्रयोगाबाबत आस्था. पण त्याच वेळी 'डिस्कवरी ऑफ इंडिया'च्या निमित्ताने भारतीय इतिहास व संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून तिच्याबद्दलचा अभिमान आपल्या विचारव्यूहात व दृष्टिकोनात राखूनही राष्ट्रवादाचे संकुचित  रूप झाडून टाकून भारतीय स्वातंत्र्याला देशोदेशींच्या स्वातंत्र्य लढ्यांच्या संदर्भात पाहात होते. त्याआधारे एका व्यापक स्वातंत्र्याची संकल्पना मांडत एका बाजूने साम्राज्यवादी नि दुसर्‍या बाजूने फॅसिस्ट सत्तांशी आपला लढा आहे असे बजावून सांगत होते. असे बहुआयामी बहुश्रुत असे हे व्यक्तिमत्व. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मला भावलेला भाग म्हणजे त्यांची वस्तुनिष्ठता, मूल्यमापनाचा आग्रह आणि विचार तसेच निर्णय हे व्यक्ती, समाज, काल आणि परिस्थिती-सापेक्ष असणे मान्य करण्याचा खुलेपणा.  त्याचबरोबर ज्यांच्या सोबत प्रवास करायचा त्यांच्यावरच्या निष्ठा, बंधुभाव कायम ठेवतानाच मतभेदांची शक्यता न नाकारणे, 'गिव एवरी डेविल हिज ड्यू' या न्यायाने ज्याला विरोधक मानले, त्याज्य मानले अशा व्यक्ति अथवा विचाराचीही सकारात्मक बाजू - कदाचित अन्य स्थळी, काळी आपले मूल्यमापन वेगळे असू शकते या साठी - नोंदवून ठेवणे. 

इथे निवडलेला वेचा हा त्यांच्या मार्क्स, मार्क्सवाद आणि त्याचे भारतीय व पाश्चात्य संदर्भ याबाबत  त्यांची भूमिका मांडणारा आहे. पण मी तो निवडला तो कम्युनिजमचा पंचनामा म्हणून नव्हे. मला भावली ती त्यांच्या विचाराची  पद्धत. व्यक्ती, त्याचा विचार, अंमलबजावणी, त्याचे संदर्भ, स्थल-काला संदर्भातील सापेक्षता या परिमाणांचा इतका सांगोपांग वेध क्वचितच घेतलेला पहायला मिळतो. त्यामुळे इथे कम्युनिजम कडे मी केवळ 'केस स्टडी' म्हणून  पाहतो आहे, आणि त्या निमित्ताने विश्लेषण, मूल्यमापनाचा वस्तुपाठ म्हणून मी हा वेचा निवडला आहे. कम्युनिजमवरची टीका शेअर करणे हा इथे हेतूच नाही! तेव्हा कम्युनिस्ट/कम्युमिजम  द्वेष्ट्यांनी खूष व्हायचे कारण नाही, तसेच कम्युनिजम बद्दल आस्था असणार्‍या किंवा कम्युनिस्ट असलेल्यांनी नाराज व्हायचेही कारण नाही. 

दुसरा मुद्दा असा की ज्या पुस्तकातून हा वेचा निवडला आहे त्या पुस्तकाचे  लेखक खुद्द  पं. नेहरु नाहीत. त्यांच्या समग्र लेखनातून विविध विषयांबद्दल त्यांच्या मतांचा मागोवा घेणारे हे लेखन संपादित केले आहे ते नेहरुंचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. न. गो. राजूरकर आणि प्रसिद्ध विचारवंत, अभ्यासक, तत्त्वज्ञ - जे स्वतःला मार्क्सवादी म्हणवीत - प्रा. नरहर कुरुंदकर यांनी. तेव्हा या वेच्यातील विचार, तसंच वाक्यरचना तंतोतंत नेहरुंचे आहेत असे गृहित धरण्याचे कारण नाही. याशिवाय या वेच्यात नेहरुंने मार्क्सबाबत केलेले विवेचन या  वेच्यासंदर्भात आणि एकुणच त्यातून प्रतिबिंबित होणार्‍या त्यांच्या विचारव्यूहाला लागू करणे आवश्यक आहे. नेहरुंचे बहुतेक लेखन हे स्वातंत्र्यपूर्व कालातले आहे, त्या परिस्थिती-संदर्भात आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांची मते बदललेली असू शकतात.

यात नेहरुंनी मार्क्सवादाबाबत केलेले भाष्य, केलेली टीका मला किंवा इतर कुणाला सर्वस्वी मान्य असायला हवी असा आग्रह धरण्याचे कारण नाही. (यातील एक दोन मुद्द्यांचा मीच विस्ताराने प्रतिवाद करु शकेन.) कदाचित यातील विचार पुढे कालबाह्य झाल्याचे नेहरुंनी मान्य केले असणे शक्य आहे किंवा कुण्या कम्युनिस्ट विचारवंताने त्याचा प्रतिवाद केला असणेही शक्य आहे.  
प्रस्तावना आवरती घेताना पुन्हा एकदा आठवण करतो की हा वेचा कम्युनिजमवरची टीका म्हणून शेअर केलेला नाही, तर त्या टीकेचा दृष्टीकोन अभ्यासावा या हेतूने शेअर केलेला आहे. "मार्क्सही शेवटी आपल्या काळाचे अपत्य होता.", "मार्क्सचे विवेचन घडून गेल्यानंतरच्या काळात जर नवे घटक अस्तित्वात आले असतील तर त्याचा विचार करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन  पडते. " यासारखी वाक्ये माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि त्यासंबंधीचे विवेचन अभ्यासनीय ठरते. 

('पं. नेहरु: एक मागोवा' या पुस्तकातील हा वेचा 'वेचित चाललो' वर:
http://vechitchaalalo.blogspot.in/2017/10/NehruMaagowaa.html)