सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - ३

...टॉडला पुढे सलमानची भूमिका देऊन त्याचे ज्युनियर्स ’साजन के घर आयी...’ वर नाचायलाही लावतात. तो पठ्ठ्याही त्या ठेक्यावर मस्तपैकी नाचून बिचून घेतो. (पुढे चालू)

गेस्ट हाऊसमधे प्रवेश करणार्‍या टॉडला एकदा भिंतिपलिकडून हाक येते. भिंतीवरून पलिकडचा एक धोबी टॉडला त्याच्या घरी बोलावत असतो. हो ना करता टॉड जायला तयार होतो. भिंतीवरून उडी मारून तो पलिकडे जातो. ही भिंत देखील एक मेटॅफर आहे. या भिंतीपलिकडचे जग नि अलिकडचे जग वेगळे आहे, त्या दोन जगांना वेगळे करणारी ही भिंत! आल्या आल्या पहिल्याच दिवशी भिंतीआडच्या त्या जगात तो डोकावला होता. पण तो त्या जगात कधीच शिरला नव्हता. टॉडचे ही भिंत ओलांडून जाणे हे एक प्रकारचे पलिकडच्या जगात प्रवेश करणे आहे.
कसे दिसले त्याला हे जग? जेमतेच त्याच्या उंचीची दाटीवाटीने वसलेली बैठी घरे. भिंती कळकटलेल्या, त्या कधी कुडाच्या, कधी पत्र्याच्या तर कधी निव्वळ पुठ्ठ्याच्या, अरूंद गल्ल्या, त्याच्या मधोमध वाहणारे गटार. त्याच्या बाजूलाच उघड्यावर आंघोळीपासून, कपडे धुणे, भांडी घासणे, जेवणखाण इ. अनेक प्रकारची कामे करणारे लहानथोर, वृद्ध, त्या एवढ्याश्या खुराड्यात जगणारी माणसं. टॉडला हे जग अगदी नवीन आहे. इंडियाचा परिचय त्याला त्याच्या एम्प्लॊईजनी करून दिला होता, त्यापलिकडचा भारत तो आता पाहत होता. अनेक गल्लीबोळातून तो धोबी त्याला आपल्या घरी घेऊन जातो. घर एवढेसे, त्यामुळे दारासमोर बाहेरच बैठक मारली जाते. त्या धोब्याची वृद्ध आई त्याच्यासाठी भरड तांदुळाचा दोन तीन चमचे भात नि त्यावर चमचा दोन चमचे करी वाढते. त्याच्यासाठी खास केलेले - एकमेव - उकडलेले अंडे त्यावर ठेवते (आता आपल्याला ही वृद्धा आपण आधीही पाहिली असल्याचे आठवते. आधीच्या प्रसंगात टॉड ऑफिसमधून परतत असता, एका अंडी विकणारीशी शिल्लक राहिलेले एकमेव अंडे स्वस्तात देण्यासाठी हुज्जत घालताना दिसलेली असते, तीच ही). धोब्याची पत्नी वरून लटकणार्‍या एका वायरला मिक्सरची वायर झटक्यात जोडते नि मिक्सर चालू होतो. ती वायर कुठून आलेली आहे हे कुतूहलाने पाहणार्याला टॉडला वरच्या एका मुख्य वाहिनीवरून आलेली दिसते (या ’तंत्राचा’ वापर पुढे तो करून घेतो.). धोब्याची पत्नी एका खोलगट तव्यातून त्याच्यासाठी जाडसर उत्तप्पा भाजते. तयार झालेला उत्तप्पा उलथून तो टॉडला वाढते. त्यावर वोक्सवॅगन कंपनीचा लोगो उमटलेला दिसतो.
एकीकडे मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपला स्वत:चा लोगो लहानग्या वासरावर चरचरून उमटवणारे अमेरिकन तर दुसरीकडे तवा घेण्याची ऐपत नसल्याने वोक्सवॅगन गाडीच्या स्टेपनीचा पत्राच तव्याऐवजी वापरल्याने कोण्या दुसर्‍याचा लोगो प्रत्यक्ष आपल्या अन्नावर उमटला तरी त्याबद्दल फारशी फिकीर करण्याच्या स्थितीत नसलेला तो धोबी. आणखी एक विरोधाभास टॉडच्या समोर असतो. त्याचवेळी त्याच्याशी नित्यनेमाने पळवापळवीचा खेळ खेळणारं ते पोरगं त्याच घरचं आहे हे त्याला समजते. टॉडचा पळवलेला मोबाईल ते त्याला परत देतं. आता तो मोबाईल छान नक्षीदार स्टिकरने सजवलेला असतो. टॉड समाधानाने हसतो.

टॉड आता घारापुरीमधे चांगला रुळलाय. येथील आचारविचार, इथली माणसे, जीवनपद्धती हळू हळू त्याला उमगू लागली आहे. ’आपला जॉब हिरावून घेणारे’ ही ओळख आता पुसट झाली आहे. अशातच एक दिवस त्याचा बॉस डेव अचानक येऊन थडकतो. त्याला स्टेशनवर रिसीव करायला गेलेल्या टॉडल दिसतो तो बर्फाचा गोळा खाणारा डेव. तो हसतो, डेवला गोळा खाण्यापासून मुळीच परावृत्त करत नाही की त्याच्या परिणामाबाबत त्याला सावध करण्याचा प्रयत्नसुद्धा करीत नाही. निव्वळ पैसे वाचवण्यासाठी आपली चांगली नोकरी घालवून परागंदा व्हायला लावणार्‍या डेववर एक छोटासा का होईना, सूड घेण्याची संधी तो का सोडेल?

डेवला घेऊन टॉड ऑफिसमधे प्रवेश करतो. त्याला दिसतात पाणी उपसणारे त्याचे कर्मचारी, त्यात आघाडीवर मॅनेजर पुरू. पुरू त्याला सांगतो मागे असलेल्या शेताला पाणी देताना ओसंडून वाहिलेले पाणी इथे शिरले आहे. आपल्याकडची काही वर्कस्टेशन्स बंद पडून फक्त आठच काम करताहेत. हे सांगत असतानाच इलेक्ट्रिक बोर्डवर स्पार्किंग होते नि उरलेली वर्कस्टेशन्सही धराशायी होतात. डेवच्या आगमनाच्या वेळीच हे घडल्याने आपल्याला वाटते आता संपला खेळ. पण थांबा, हा टॉड काय करतोय ते पाहू या. संतापलेल्या डेवला तो आश्वासन देतोय की लवकरच सर्व काही ठीक होईल. तो सर्वांना सांगतो की आपण सर्व टर्मिनल्स गच्चीवर हलवतोय. पुढच्या वीस मिनिटात सर्व काही चालू व्हायला हवे. तोवर मी जाऊन ’टेक्निकल कन्सल्टंट’ ला घेऊन येतो.

इथे पाण्यावर त्रिकोणी आकाराच्या चीज सारखा दिसणारा स्पंज तरंगताना दिसतो. यावरून आपल्याला आयटेम नं फोर झीरो थ्री (अमेरिकन मंडळी स्पोर्ट्स इवेंट्सना जाताना घालतात ती टोपी) आठवते.

सर्व कर्मचारी गच्चीवर मशीन्स जोडत असतानाच टॊड त्याच्या शेजारी असलेल्या त्या धोब्याला घेऊन येतो नि हा आपला ’कन्सल्टंट’ अशी ओळख करून देतो. कुत्सित नजरेने ’हा तुझा कन्सल्टंट?’ असे विचारणार्‍या डेवला ’हो’ असे ठाम उत्तर देतो. टॉडच्या विश्वासाला हा कन्सल्टंटही जागतो. वरून जाणार्‍या मुख्य वाहिनीवरून तो खालच्या मशीन्सना वीजपुरवठा चालू करून देतो. डेव अवाक होतो.
मशीन्स चालू होतात, सेंटरचे काम सुरळीत चालू होते. मि. मनमीत पुन्हा एकदा एलिझाबेथशी कोर्टिंग करताना सापडतात. टॉड बजावतो ’मॅरेज प्रपोजल इज नॉट स्मॉल टॉक. इफ शी बाईज् समथिंग एवरी फाईव मिनट अँड यू क्लॉक इट अ‍ॅज अ सेपरेट इन्सिडन्स देन इट्ज ए डिफरन्ट स्टोरी.’ मनमीतला मोकळे कुरणच मिळते. परिणामी एमपीआय प्रथमच सहाच्या खाली जातो. सर्वजण जल्लोष करतात. इतक्यात एका कॉलवर सुपरवायजरी डिमान्ड होते. एक संतप्त अमेरिकन ग्राहक आउटसोर्सिंगला जोरदार शिव्या देत असतो आणि मला अमेरिकन सर्विसच हवी असा आग्रह धरून बसलेला असतो. त्याला अमेरिकन ईगलची प्रतिकृती हवी असते आणि त्यासाठी एका देशी कंपनीशी व्यवहार करायची तयारी नसते. सुपरवायजर म्हणून टॉड तो फोन घेण्यासाठी उठतो, पण तोवर आशाने त्या फोनचा ताबा घेतलेला असतो. ती त्या ग्राहकाला सांगते की आम्हाला तुमचा राग समजू शकतो. तो उसळून म्हणतो ’मुळीच नाही. मागच्या महिन्यातच माझा जॉब गेला. मी तिथे बावीस वर्षे रक्ताचं पाणी केलं तो जॉब आज मेक्सिकोत गेला आहे. माझ्या भावाची नोकरीसुद्धा गेली आहे.’ ती त्याला आश्वासन देते. ’तुमच्या सारख्या आग्रही ग्राहकांसाठी आम्ही एका अमेरिकन कंपनीबरोबर टाय-अप केले आहे. ही कंपनी आमच्या कंपनीप्रमाणे कोणतेही काम आउट्सोर्स करत नाही. त्यांची सर्व उत्पादने १००% अमेरिकन असतात. मी तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नि वेब-साईट अ‍ॅड्रेस देते त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. फक्त एकच करावे लागेल तुम्हाला...’ ती थांबते. अधीर झालेला ग्राहक विचारतो ’पण किमतीचे काय?’ ’...तुम्हाला फक्त २१२ डॉलर जास्त द्यावे लागतील.’ ती सांगते. पलिकडील आवाज शांत होतो. काहीवेळाने तो ग्राहक वेस्टर्न नॉवेल्टीचा ईगल खरेदी करण्यासाठी ऑर्डर नोंदवतो.

इथे नोकरी गमावलेल्या आणि त्यामुळे कधी नव्हे ते काटकसरीने पैसे खर्च करण्याची वेळ आलेल्या त्या ग्राहकाबद्दल क्षणभर सहानुभूती वाटते. नोकरी गेल्याने कमी पैशात आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करायची असेल तर शेवटी अपरिहार्यपणे त्यांच्याकडेच जावे लागते ज्यांनी त्याची नोकरी हिरावून घेतली आहे. सार्‍या जगाला स्पर्धात्मक व्यापार शिकविणार्‍या, त्यासाठी राजनैतिक, कूटनितिक, लष्करी मार्गाने विविध देशांवर दबाव आणून त्यांचा व्यापार-उदीम खुला करण्यास भाग पाडणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनाच त्या व्यवस्थेचा फटका बसावा हा काव्यगत न्याय म्हणता येईल. स्वत:च्या फायद्यासाठी, आपल्या कंपन्यांना पलिकडील मार्केटमधे प्रवेश करता यावा म्हणून जी ज्या भिंती पाडल्या त्यातून पलिकडचेही इकडे येऊ शकतात हे अमेरिका समजू शकली नाही त्याचे हे फळ. सारे जग हे फक्त अमेरिकेच्या फायद्यासाठीच आहे, जे आपण करू तेच बरोबर या भ्रमात राहून जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेत इतरही लोक येतात हे सोईस्करपणे विसरली त्याचा हा परिणाम होता. इथे जीएंच्या’ ’प्रवासी’ मधल्या आंधळ्या शिकार्‍याची गोष्ट आठवली. डोळस माणसांवर सूड घेण्यासाठी त्याने केलेला आरशांचा व्यूह एक कुत्रे सहज पार करून जाते - बरोबर त्या प्रवाशालाही सहिसलामत बाहेर काढते - तेव्हा हताश होऊन तो म्हणतो. ’माझंच चुकलं. मी सगळं जग माणसांचं गृहित धरलं. त्यांच्यासाठी अगदी चिरेबंद व्यूह निर्माण केला, एकादी लहानशी फटसुद्धा ठेवली नाही. पण या विश्वात माणूस एकटा नाही हे मला सुचलं नाही. म्हणूनच एका यक:श्चित कुत्र्याने आज माझा पराभव केला.’ म्हणूनच आज ओबामाकाका स्वदेशीचा नारा देतात, सिटी बँक सारख्या जायंट बँका वाचवण्यासाठी सरकारी खजिना खुला करतात तेव्हा मोठी गंमत वाटते आणि एकेकाळी खुली अर्थव्यवस्था म्हणजे चिरेबंद व्यवस्था, प्रोटेक्शनिझम सर्वात घातक मानणारी अमेरिका घड्याळाची निदान काही चक्रे उलटी फिरवू लागल्याचे जाणवते.

एमपीआय सहाच्या खाली आणण्याबद्दल जवळच्या ’लोटस कोर्ट’ मधे पार्टी अ‍ॅरेंज केली जाते. पार्टीपूर्वीच डेव हे सेंटर बंद करून चीनमधे हलवण्यात येणार असल्याचे सांगतो. तिथे एका अमेरिकनाच्या पगारात मला वीस माणसे कामावर ठेवता येतील, तो सांगतो. पुन्हा एकवार हा पटींचा हिशोब टॉडला वेटाळून राहतो. ही बातमी इथल्या कर्मचार्‍यांना देण्याचे काम टॉडवरच येते. लोटस मधे पार्टीच्या मूड मधे असलेल्या एम्प्लॉईजना तो सांगतो ’ऑल योर जॉब्स हॅव बीन आउटसोर्सड्. यू विल गेट वन मंथ्स सर्वंट्स पे.’ त्यांच्या मधे कुजबूज सुरू होते. त्यातून ’एक महिन्याचा पगार... नॉट सो बॅड’ असा आशाचा आवाज ऐकू येतो. या पैशात काय चैन करता येईल याची चर्चाही चालू होते. इतक्यात मनमीत उठतो नि न्यू जर्सी येथील एलिझबेथ वॉटसन हिच्याशी आपली एंगेजमेंट निश्चित झाल्याचे जाहीर करतो. सगळॆ जल्लोष करतात, त्याचे अभिनंदन करतात. 'ओ टॉड भैया, नौकरी गयी तो गयी, की फर्क पैंदा’ तो टॉडला म्हणतो. पार्टी सुरू होते.

या सर्वापासून अलिप्त आहे तो फक्त पुरू. सगळॆ जल्लोष करीत असताना खिन्न झालेला तो एकटाच बार टेबलपाशी उभा आहे. सर्वांच्या प्रतिक्रियेने गोंधळ्लेला टॉड त्याला विचारतो नोकरी गमावूनही हे सगळे खूष कसे? पुरू म्हणतो ’खूष होतील नाहीतर काय. तुम्ही दिलेल्या ट्रेनिंगच्या बळावर आठ्यवड्याभरात बहुतेक सगळ्यांना दुसरी नोकरी मिळेल, वर एक महिन्याचा फुकट पगार. त्यात आणखी चैन करता येईल. ’ ’व्हॉट अबाउट यू?’ टॉड विचारतो. ’मॅनेजमेंट इज डिफरंट, अँड आय अ‍ॅम नॉट यंग एनिमोअर’ धास्तावलेला पुरू सांगतो. त्याच्या लग्नाबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते हे ही टॉडला समजते. विकल होऊन पुरू सांगतो तिला दुसर्‍याबरोबर पाहण्यापेक्षा मरण पत्करेन मी किंवा भारताबाहेर स्थलांतर करेन.’ पण कदाचित टॉडचीही नोकरी जाईल हे ऐकून तो टॉडचेच सांत्वन करतो. तू एक चांगला बॉस आहेस असे सांगतो. आशा ’हॉलिडे इन गोवा’ चे पुढचे प्रकरण लिहिण्यासाठी टॉडला घेऊन जाते.टॉडला डेव सांगतो की वेस्टर्न नॉवेल्टी ला टेक-ओवर करण्यात आले आहे. नवी कंपनी चार हजार जॉब्ज शांघायला आउटसोर्स करणार आहे. तिथे तुझी आम्हाला गरज आहे. पण टॉडला आता या प्रकाराचा उबग आला आहे. तो नकार देतो. डेव त्याला मोठे पॅकेज, अधिक पर्क्स देऊ करतो, पण तो आपल्या निर्णयावर आता ठाम असतो. हे संभाषण चालू असताना आजपर्यंत न आलेली सुपरवायजर केबिनची काच आणून बसवली जात असते. टॉड असताना त्याचे एम्प्लॉई आणि तो यांच्यात नसलेली ही भिंत तिथे डेव बसताच त्याच्या नि टॉडच्या मधे उभी राहिलेली असते. (यात भारतीयांच्या कामातील वेगाला हळूच चिमटाही काढला आहे.) टॉड स्वत: ऐवजी पुरूची शिफारस करतो आणि पुरू एक नवा टॉड बनून पत्नी भाग्यश्रीसह शांघायकडे प्रयाण करतो.
टॉड आता अमेरिकेत परतलाय. आल्याआल्या तो प्रथम आपल्या आईला फोन करून भेटायला येत असल्याचे सांगतो. घरात येताच आणलेल्या ग्रोसरीतले अंडे काढून क्षणभर त्याच्याकडे पाहतो. (कदाचित त्याला भिंतीपलिकडील जगात आपल्या धोबी मित्राकडे खाल्लेल्या त्या अंड्याची आठवण होत असावी.) कॉफी करून टेबलवर ठेवतो. तीन चमचे साखर घालून झाल्यावर क्षणभर थांबतो पण (आंटीच्या गेस्ट हाउसवर प्यायलेल्या कॉफीची आठवण होऊन) लगेच चवथा चमचा कॉफीमधे घालतो. ती पिता पिताच त्याला समोरची जॉर्ज वॉशिंग्टनचे चित्र असलेली प्लेट दिसते.
’हॉलिडे इन गोवा’च्या दुसर्‍या प्रकरणाची आठ्वण म्हणून आणलेली टिकली तो त्या वॉशिंग्टनच्या माथी लावतो. जणू अमेरिका आता भारताचे सौभाग्य मिरवणार असे तो सूचित करतो आहे. हे करत असतानाच त्याचा मोबाईल खास बॉलिवूड रिंगटोन वाजवू लागतो.'

(समाप्त)
ता.क.: कथानकाचा विषय लक्षात घेता बरेचसे संवाद मूळ इंग्रजीत तसेच ठेवले आहेत. फक्त वाचनाच्या सलगतेसाठी देवनागरीमधे लिहिले आहेत.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - २

...कोणताही प्रसंग उपरा वाटत नाही, त्याचा कुठे ना कुठे सांधा जोडून घेतलेला दिसून येतो. (पुढे चालू)

टॉड ज्या कामासाठी आलेला आहे ते ट्रेनिंगचे काम चालू होते. तो इथल्या एम्प्लॉईजना सांगतो की इथल्या ऑफिसच्या कामावर कंपनी समाधानी नाही. ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत नि बहुतेक सर्व या येथील कर्मचार्‍यांना अमेरिकेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने उद्भवल्या आहेत. यावर उपाय म्हणून सर्वांना कंपनीची प्रॉड्क्टस, अमेरिकन वोकॅब्युलरी, जीवनपद्धती इ. बद्दल त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे. इथल्या ऒफिसचा एम.पी.आय. (मिनिट्स पर इन्सिड्न्स) जो १२ मिनिटाच्या आसपास आहे तो फार जास्त आहे नि तो ६ पर्यंत खाली आणण्याची आवश्यकता आहे हे ही सांगतो. ’बेसिकली यू पीपल शुड लर्न अबाउट अमेरिका’ टॉड म्हणतो. ’जर ग्राहकाशी तुम्ही नेटिव इंग्रजी मधे बोललात तर संभाषण लवकर पूर्णत्त्वाला जाईल’. ’बट वी आर स्पीकींग नेटिव इंग्लीश’ एक एम्प्लॉई म्हणते. ती म्हणते ’आमच्या देशाची कारभाराची भाषाच मुळी इंग्रजी आहे. तुम्ही आम्ही दोघांनीही ही भाषा ब्रिटिशांकडून घेतली आहे. आमचे उच्चार तुमच्या पेक्षा वेगळे आहेत हे खरे पण बहुधा आमचे उच्चार तुमच्यापेक्षा अचूक असतात’. ’उदाहरणार्थ आम्ही ’इंटरनेट’ असा नेमका उच्चार करतो तर तुम्ही ’इंट्रनेट’ असा सदोष उच्चार करता’ ती हसत हसत सांगते. टॉड म्हणतो ’हे बरोबर आहे. पण हाच तर मुद्दा आहे. तुम्हाला जर अमेरिकनाशी अमेरिकन बनून बोलायचे असेल तुम्हाला ’इंट्रनेट’ असाच उच्चार करावा लागेल’. एक एम्प्लॉई शंका विचारण्यासाठी हात वर करतो. ’मी मनमीत...’ तो सांगतो. ’मॅनमीट...?’ टॉड उच्चारतो. मनमीत त्याचा उच्चार दुरूस्त करतो, पण टॉडला बरोबर उच्चार करता येत नाहीच. आता आपल्याला टॉड ऐवजी इथे सरसकट टोड म्हणून का हाक मारली जाते ते टॉडला समजून येते. स्मॉल टॉक म्हणजे काय हे समजावून सांगताना तो म्हणतो की ’समजा तुम्ही एखाद्या खेळाबद्दल बोलत असाल...’, ’उदाहरणार्थ क्रिकेट’ पुरू मधेच बोलतो. बेसबॉल नि हाताने खेळण्याचा ’फुट’बॉल च्या चाहत्या नि ’जे जे इंग्लिश ते ते टाळावे” अशा वृत्तीच्या देशातून आलेला टॉड चटकन विषय बदलून टाकतो. तो त्यांना काही किमान काळजी घेण्यास सांगतो. 'इफ समवन आस्कस हाऊज द वेदर, आलवेज से विंडी’ तो सांगतो. मगाशी इंग्रजीबद्दल सडेतोड बोलणारी ती कन्या पुन्हा एकदा त्याचे बोलणे थांबवते. ती म्हणते, आम्ही इथे घारापुरीत आहोत, शिकागोत नाही. मग हे खोटं बोलणे नाही का? आम्हाला नोकरी देताना आमचे काम फोनवरून प्रॉडक्टस विकण्याचे आहे असे सांगण्यात आले होते, ग्राहकांशी खोटे बोलण्याचे नाही.’ ’बहुतेक अमेरिकन हे आउटसोर्सिंगवर नाराज आहेत.’ तो समजावू पाहतो. ’पण ते विकत घेत असलेल्या बहुतेक सर्व गोष्टी तर ’मेड इन चायना’ असतात ना?’ या तिच्या प्रश्नावर तो निरुत्तर होतो. ही मुलगी - आशा तिचे नाव - ही पुढे आणखी एक-दोनदा त्याचे तोंड बंद करते, पण ते वेगळ्या प्रकारे.

ट्रेनिंग चालू होते. कंपनीच्या प्रॉडक्टसबद्दल एंप्लॉईजना असलेल्या शंकांचे टॉड एकएक करून निरसन करतो आहे, त्या निमित्ताने त्यांना अमेरिकन जीवनपद्धतीची ओळख होते आहे. काही गोष्टींचा खुलासा देणॆ टॉडला अवघड जाते आहे.

आयटेम नं एच फोर-झीरो-थ्री - चीज कॅप.

टॉड : बरेच अमेरिकन्स एखाद्या खेळाचा सामना बघायला जाताना ही टोपी घालतात’

मनमीत : का?’
टॊड : (गडबडलेला) ’अम्म... इट्स हार्ड टू एक्स्प्लेन’

आयटेम नं ए टू-टू-वन - बर्गर ब्रँड.
टॉड : ’काही अमेरिकन्सना अन्न शिजवताना अन्नावर आपला खास शिक्का उमटवायला आवडतो. जसे आपल्या मालकीच्या गायींच्या पाठीवर मालकी दाखवणारे शिक्के उमटवतात तसे’

राणी: ’पण गाय पळून जात नाही का?’

टॊड : ’नाही, अगदी लहान वासरू असतानाच - जेव्हा त्याला पकडून ठेवता येऊ शकते - तेव्हाच हे ब्रँडिंग केले जाते’. या उत्तरावर प्रश्न विचारणार्‍या मुलीला - राणीला - विलक्षण धक्का बसल्याचे दिसते. या ठिकाणी पुन्हा एकवार आशा काही बोलण्याची परवानगी मागते ’एक अनाहुत सल्ला आहे टॉड. यू नीड टू नो अबाऊट इंडिया’. इंडियातल्या लोकांना ’यू मस्ट लर्न अबाऊट अमेरिका’ म्हणणार्‍या टॉडला त्याचाच सल्ला देऊन आशा वास्तवाची जाणीव करून देते. एक वर्तुळ पूर्ण होते. हा ब्रँडिंगचा प्रसंगही नीट लक्षात ठेवण्याजोगा. पुढे एका प्रसंगात याचा भारतीय संदर्भ येतो तो अतिशय मार्मिक नि दोन जगातला फरक दाखवणारा.

ट्रेनिंग चालू आहे. टॉड एक रेकॉर्डेड कॉल ऐकवतो. एक अमेरिकन आजीचा फोन आहे हेल्पडेस्कला. त्यात ती सांगते की तिचा नातू आता शाळेत जाणार आहे. त्यासाठी आवश्यक गोष्टींची खरेदी तिला करायची आहे. पण तिला हल्लीच्या व्यवस्थेत काय काय हवे ते ठाऊक नाही. हेल्पडेस्कवरील एग्जिक्युटिव तिला यादी देऊ लागतो, त्यात ’रबर’ हा शब्द ऐकून आजी किंचाळतातच ’काय??????’. ’तुमचा नातू पेन्सिल वापरेल ना, मग त्याबरोबर रबर नको का?’ एग्जिक्युटिव खुलासा करू पाहतो. हे ऐकवून झाल्यावर टॉड विचारतो की या संभाषणात काय चूक आहे. बहुतेक सर्वांना काहीच समजत नाही. तो सांगतो रबर नव्हे ’इरेजर’ म्हणायला हवे, ’रबर’ म्हणजे काँडम, रबर जे संततीनियमनासाठी वापरले जाते ते. या संवादाकडे मनमीत चे अर्धवट लक्ष आहे. तो ’संततीनियमन’ हा शब्द ऐकतो, बुचकळ्यात पडतो, त्या ’इरेजर’चे कव्हर काढतो, त्याकडे साशंक नजरेने पहात विचारतो ’बट डज इट वर्क?’.


ऑफिसमधील बहुतेक सर्व प्रसंगांचे चित्रण हे सुपरवायजर्स केबिनच्या कोनातून केले आहे. त्यामुळे समोरच्या भिंतीवरचा एमपीआय मॉनिटर सतत दिसत राहतो. ट्रेनिंग जसजसे पुढे सरकते तसतसा त्यावरचा आकडा हळूहळू कमी होत गेलेलाही दिसतो.

देशी खाणे खाऊन हैराण झालेल्या टॉडला एकदा पेपरमधे मॅक्डोनल्डस ची जाहीरात दिसते. आता त्याला बर्गर खायचा आहे. पण ते दुकान मुंबईत आहे. एका टॅक्सीवाल्याला चार हजार रुपये देऊन अखेर तो त्या दुकानी पोहोचतो नि खुषीत दोन चीज बर्गर्सची ऒर्डर देतो. ऑर्डर घेणारा नम्रपणे सांगतो ’इथे चीज बर्गर मिळत नाही’. ’काय सांगतोस? मॅक्डोनल्ड्समधे चीज बर्गर मिळत नाही?’ टॉड वैतागाने विचारतो. ’सॉरी सर, धिस इज Mc Donnells नॉट Mc Donalds'. तेवढ्यात एक शेजारचा गोरा साहेब ’एक महाराजा वेज बर्गर’ अशी ऑर्डर देतो नि टॉड कडे वळून सांगतो ’दॅट इज क्लोजेस्ट यू गेट.’ टॉड पूर्ण वैतागतो. तो म्हणतो मी चार हजार रुपये खर्च करून घारापुरीहून फक्त चीज बर्गर खाण्यासाठी इथे आलोय. ’तुला माहित नाही का, घारापुरी मधेच एक खरे खुरे मॅक्डोनल्डस आहे ते?’ दुसरा गोरोबा सांगतो. ’अर्थात तिथेही चीज बर्गर मिळत नाहीच.’ अशी पुस्तीही जोडतो.

हे दोन गोरोबा समदु:खी असतात. दोघांचेही जॉब्स भारतात आलेले नि ज्यांना ते मिळालेत त्यांनाच मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली. संभाषणाच्या ओघात दुसरा सांगतो ’मी जोवर या व्यवस्थेचा, भारताचा विरोध करत होतो तोवर मला त्रास होत होता. आता मी तो सोडून दिल्यावर स्थिती बरीच सुधारली आहे.’ टॉड अंतर्मुख होतो.

एकदा सुपरवायजर केबिनमधून टॉड एम्प्लॉईजचे कॉल मॉनिटर करत असतो. एक एग्जिक्युटिव आपण शिकाsssगो (हा टॉडने शिकवलेला अमेरिकन उच्चार) मधे असल्याची बतावणी करत न्यू जर्सीतल्या कुण्या एलिझबेथ बरोबर फोनवरून फ्लर्ट करतोय. टॉड चिडतो. तेवढ्यात पुरू एक ट्रे घेऊन येतो. टॉड आपला वैताग त्याच्यावर काढतो. माफी मागून पुरू जाऊ लागतो. त्याने ठेवलेला ट्रे पाहून टॉड हे काय आहे म्हणून विचारतो. ’हे तुझ्यासाठी. इथल्या जेवणामुळॆ तुझे पोट बिघडते म्हणून खास हायजिनिक अन्न तुझ्यासाठी आणले आहे.’ टॉड शरमतो नि त्याच्यावर राग काढल्याबद्दल माफी मागतो.

काही दिवस जातात. होळीचा दिवस आहे. सकाळी घाईघाईत बाहेर पडलेल्या टॉड दारावर आंटीने लावलेली 'आज बाहेर जाऊ नये' ही चिठी न पाहिल्यामुळे बाहेर जातो. आधी घाबरतो पण नंतर मस्तपैकी होळीचा आस्वाद घेतो. बेसबॉलच्या अनुभवाचा वापर करून अचूक नेमबाजी करून पोरांना भिजवतो. त्यानंतर जवळच्या कुंडात स्वत:ला झोकून देतो. थोडक्यात सांगायचे तर दुसर्‍या गोरोबाने दिलेला सल्ला अंगीकारून गाडी रुळावर आणतो.
होळीची मजा करून तो आणि पुरू ऑफिसात पोचताच तो ऑफिस अमेरिकन पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माफी मागतो नि ऑफिसमधे योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक ते करण्याची सर्वांना मुभा देतो. एवढेच नव्हे तर कंपनीची उत्पादने एम्प्लॉईजना भरघोस डिस्काउंट मधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही देतो. यावर कंपनीतर्फे त्याची कान उघाडणी करणार्‍या त्याच्या बॉसला तो शांतपणे सांगतो ’एक बिलियन लोकांच्या देशात या मार्गाने कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा शिरकाव व्हावा अशी माझी योजना आहे.’ तडतडणारा बॉसचा आवाज बंद होतो.

याच प्रसंगात एक गंमत आहे जी कदाचित संवादाच्या ओघात दुर्लक्षित राहू शकते. एक एम्प्लॉई काही शंका विचारण्यासाठी हात वर करते. तिचे नाव टॉडला आठवत नाही. तो विचारतो ’वॉटज् योर गुड नेम?’. पहिल्या भेटीत आंटीच्या या ब्रिटिश इंग्रजीला बावचळलेला टॉड आता त्याच्या इंडियन एम्प्लॉईजच्या संगतीने त्याला नुसताच सरावलेलाच नाही तर नकळत त्याने ते काही प्रमाणात अंगीकारले सुद्धा आहे.

होळीची संध्याकाळ. पुरू नि टॉड मस्तपैकी मदिरेच्या संगतीत गप्पा मारतायत. टॉड थोडा होमसिक थोडा नॉस्टाल्जिक झालाय. ’होली’ या शब्दावरून त्याला त्याच्या आईने बनवलेल्या कॉस्चुमस्ची आठवण येतेय. गाडीने गेल्यास ती त्याच्या घरापासून दोन तासाच्या अंतरावर राहते. तरीही ते वर्षातून एकदोनदाच भेटतात. इतक्या जवळ राहूनही इतक्या कमी वेळा भेटता? पुरू आश्चर्यचकित झालेला. मद्याच्या अंमलामुळॆ थोडा सैलावलेला तो सांगतो ’तुमच्या जीवनपद्धतीचे हेच मला कळत नाही. तुम्ही लोक आईवडिलांबरोबर का रहात नाही?’ आणि तुला तुझा बॉस आवडत नाही मग तू दुसरी नोकरी का शोधत नाहीस?’ एकाच प्रश्नात त्या जीवनपद्धतीमधला अंतर्विरोध स्पष्ट होतो. आईवडिलांचे घर सहज सोडणार्‍या अमेरिकन्सना कटकट्या बॉसस असूनही कंपनी सोडणे सहजासहजी जमत नाही. टॉडकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. ’इन अवर वर्ल्ड, वी वर्क अवर अ‍ॅस आउट’ तो कडवटपणे म्हणतो.

यानंतर आशाचे नि टॉडचे जवळ येणे हा एक भाग येतो, परंतु तो बहुतेक हिंदी चित्रपटाच्या वळणाने जातो त्यामुळे त्याबद्दल फारसे सांगण्यासारखे काही नाही. या घारापुरी ऐवजी कंपनीचे पार्सल घारापुरी बेटांवर जाणे, ते आणण्यासाठी स्वत: टॉड नि असिस्टंट मॅनेजर इन-मेकिंग आशा या दोघांनीच जाणे (जसे काही एक फोन करून नव्या पत्त्यावर रिडायरेक्ट करणॆ या मागास देशात शक्यच नसते... पण हा चित्रपट आहे राव, थोडासा रोमान्स टाकायला चानस नको का? ) शेवटची फेरीबोट रद्द होणे, त्यांना तिथेच रहावे लागणे, धूर्त होटेल मॅनेजरने त्यांना सर्वात महाग स्वीटच उपलब्ध असल्याचे सांगणेआणि मग आशाने ’हॉलिडे इन गोवा’ साजरा करणे वगैरे आपल्या ओळखीचे सगळे घडते नि टॉड नि आशा जवळ येतात. परत येताना आशा टॉड च्या मोबाईलवर स्वत:च्या नंबरसाठी खास बॉलिवूड रिंगटोन सेट करून देते आणि हा तुझ्या इंडियन ट्रेनिंगचा भाग आहे असा मिश्कील चिमटाही काढते.इथे रुळलेल्या टॉडला पुढे सलमानची भूमिका देऊन त्याचे ज्युनियर्स ’साजन के घर आयी...’ वर नाचायलाही लावतात. तो पठ्ठ्याही त्या ठेक्यावर मस्तपैकी नाचून बिचून घेतो.

(क्रमशः)

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - १

एक मार्केटिंग एग्जिक्युटिव एका ग्राहकाशी फोनवर बोलतो आहे. ग्राहकाला हव्या असलेल्या उत्पादनाच्या शिपिंग बद्दल बोलणे चालू आहे. एग्जिक्युटिव त्या ग्राहकाला ’नेक्स्ट डे डिलिवरी’ बद्दल पटवू पाहतो आहे. या ताबडतोब डिलिवरीसाठी वीस डॉलर किंमत आहे पण ग्राहकाला अजिबात घाई नाही. सराईत एग्जिक्युटिव त्याला त्याबद्दल १५ डॉलर एग्जिक्युटिव डिस्काउंट देऊ करतो. (यावरून तो सिनियर/मॅनेजर लेवलचा आहे हे लक्षात येते). अखेर ’नेक्स्ट डे डिलिवरी” साठी त्या ग्राहकाला राजी करण्यात तो यशस्वी होतो. त्यांचे संभाषण चालू असतानाच कॅमेरा आजूबाजूला फिरत त्या ऑफिसच्या परिसराचे दर्शन घडवतो. त्यावरून एका उच्चभ्रू अमेरिकन शहरातील पब्लिक मार्केट नावाच्या मोठ्या इंडस्ट्रीयल भागात हे ऑफिस आहे हे लक्षात येते. अखेर कॅमेरा येऊन स्थिरावतो तो त्या एग्जिक्युटिववर, टॉड अँडरसनवर. कॅमेर्‍याकडे पाठमोरा असलेला टॉड फोन खाली ठेवतो नि आपल्या संगणकावर आल्ट+टॅब दाबून अपुरा राहिलेला पेशन्सचा गेम खेळू लागतो. टॉडच्या समोर दोन-तीन क्युबिकलच्या पलिकडे असलेल्या भिंतीवर कंपनीचे नाव दिसते. टॉडच्या क्युबिकलमधे त्याच्या समोरच एक वीकली चार्ट लावलेला आहे, त्याच्या डाव्या बाजूला थोडे मागे एक कमोडिटी लिस्ट आहे. त्याच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला एका जुन्या प्रकारच्या स्कूटरचे मॉडेल ठेवले आहे, काही नोट्स/चिट्ठ्या समोरच्या सॉफ्ट-बोर्डवर चिकटवून ठेवलेल्या दिसतात. टॉडच्या समोर साताठ क्युबिकल्समधे त्याच्याप्रमाणेच कानाला मायक्रोफोनसहित हेडफोन लावलेले आणखी काही एग्जिक्युटिव्स बसलेले आहेत. त्या सर्वांच्या मागे, टॉडच्या बरोबर समोरच्या दिशेला त्या ऑफिसमधे प्रवेश करण्याचा दरवाजा आहे, या दरवाजाच्या बाजूलाच सर्व क्युबिकल्समधून दिसतील अशा ठिकाणी वेगवेगळ्या वेळ दाखवणारी तीन घड्याळे शेजारीशेजारी लावली आहेत. हे दृष्य आहे ’वेस्टर्न नॉवेल्टी’ नावाच्या कंपनीच्या ’ऑर्डर फुलफिलमेंट डिपार्टमेंट’च्या ऑफिसमधले.

आता कॅमेरा जागा बदलून टॉडच्या समोरच्या बाजूला जातो. टॉडच्या पाठीमागे एक केबिन दिसते. त्यातून टॉडचा बॉस - डेव - उठतो नि दारातून बाहेर झुकून टॉडला हाक मारतो. टॉडला आत बोलावून तो केबिनचे दार लावून घ्यायला सांगतो. त्याला एक महत्त्वाचा निर्णय टॉडला सांगायचा आहे. ’वुई आर रिस्ट्रक्चरिंग अवर डिपार्ट्मेंट’ तो प्रस्तावना करतो. ’रिस्ट्रक्चर हाऊ?’ या टॉडच्या प्रश्नावर ’ऑफशोअर द होल डिपार्टमेंट’ तो शांतपणे उत्तर देतो. टॉडच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटते. त्याला वाटते त्याचा बॉस त्याची थट्टा करतोय. पण अर्थातच तसे नाही. टॉड चिडतो, तो म्हणतो आपली सर्व प्रॉडक्टस ही १००% या देशाच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहेत, एखाद्या परक्या देशातील एग्जिक्युटिव त्यांचे मार्केटिंग कसे करू शकतील? उदाहरण म्हणून तो डेवच्या टेबलवर असलेल्या - अमेरिकेचा राष्ट्रीय चिन्ह असलेल्या - गरूडाची अमेरिकन ध्वजांकित प्रतिकृती उचलून दाखवतो. ’जमेल त्यांना, त्यासाठीच तर त्यांना ट्रेनिंग द्यायचे आहे, खास करून उच्चारांचे’ डेव सांगतो. आता मात्र हे आउटसोर्सिंग अटळ आहे हे टॉडला समजते. गेली चार साडे-चार वर्षे तो तिथला इन-चार्ज आहे. त्यामुळे तो तेथील सर्वांचा बॉसच नाही तर मेंटॉर सुद्धा आहे. तो विचारतो ’हे मी सर्वांना सांगावे अशी तुमची इच्छा आहे का?’. ’ते काम मी स्वत: करेन’ असे आश्वासन डेव त्याला देतो. अटळ ते समजून थोडा विषण्ण झालेला टॉड केबिनच्या काचेतून बाहेर नजर टाकतो. अचानक मागे वळतो, त्याच्या चेहर्‍यावर काळजी दाटून आली आहे. ’याचा अर्थ मलाही घरी जावे लागणार असा आहे ना?’. डेव नकारार्थी उत्तर देतो. किंचित आश्वस्त झालेला टॉड उसळून विचारतो, ’माझी सारी टीम गेल्यानंतर कंपनीला माझा काय उपयोग? कंपनीला माझीही गरज नाही’. ’बरोबर.’ निराकार चेहर्‍याने खांदे उडवून डेव उत्तर देतो. ’कंपनीला तुझी’ ’इथे’ गरज नाही, पण इंडियामधे आहे...’ टॉड अवाक होतो. ’..तिथे जे पर्यायी ऑफिस सेट-अप केले जात आहे तेथील एग्जिक्युटिवना ट्रेनिंग देण्यासाठी.’ डेव खुलासा करतो. ’पण त्यानंतर...?’ टॉड विचारतो. ’कंपनी वेगाने विस्तारते आहे, तुझ्यासाठी काहीतरी निघेलच... आणि हो... नोकरी तर तू केव्हाही सोडू शकतोस.’ डेव शांतपणे सांगतो. ’पण विचार कर. तू अजून तुझे स्टॉक-ऑप्शन्स वापरलेले नाहीत. नोकरी सोडल्यावर तुझे पेन्शन, मेडिकल बेनेफिटस सुद्धा नसतील. तू ही या बाहेर बसलेल्यांप्रमाणेच - जे पुढच्या वीस मिनिटात बेरोजगार होणार आहेत - घटत चाललेल्या जॉब-मार्केटमधे असशील... नोकरीच्या शोधात.’ अतिशय थंडपणे पुढील विदारक चित्र तो टॉडसमोर उभे करतो. टॉड उसळतो ’मी जाऊन त्या लोकांना ट्रेनिंग देऊ जे माझाच जॉब हिरावून घेतायत? अशक्य!. मला जमणार नाही.’ डेव सांगतो की टॉडच्या पोजिशनचा माणूस तिथे ’हाफ-ए-मिलियन रुपीज’ किंवा अकरा हजार डॉलर वार्षिक पगारावर मिळू शकतो, कंपनी टॉडला त्याच्या आठपट रक्कम मोजत असते. ’इथल्या प्रत्येक माणसासाठी मी तिथे आठजण रिक्रूट करू शकतो’ छ्द्मीपणे हसत डेव सांगतो. या ’पटी’च्या हिशोबाला टॊडला भविष्यात पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार असते.

ही आहे सुरवात ’आउटसोर्सड’ची. माझ्या एका दोस्ताने हा चित्रपट पहाच असा आग्रह धरला तेव्हा मी प्रथम साशंक होतो. या प्रसंगातून तर माझी शंका खरीच ठरेल असे वाटू लागले होते. वाटले होते की हा चित्रपट म्हणजे पाश्चात्त्य माध्यमांनी आउटसोर्सिंग विरोधात चालवलेल्या प्रचाराचा पुढ्चा अंक असेल. पण सुदैवाने तसे घडले नाही. हळूहळू चित्रपट जसजसा उलगडत गेला तशी ही शंका मावळली नि एक नितांतसुंदर चित्रपट पाह्यला मिळाल्याची जाणीव झाली. एका मॉडर्न विषयावरसुद्धा एक संवेदनशील, अप्रचारकी चित्रपट निघू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अर्थात संस्कृती श्रेष्ठत्त्वाच्या गंडाने पछाडलेल्या दोन्ही बाजूंकडील व्यक्तींना हा चित्रपट आवडणार नाहीच. याउलट जे माणसाकडे माणूस म्हणून पाहू शकतात, जगण्याचे एकाहून अधिक मार्ग असतात हे समजून घेतात, प्रत्येकाच्या काही चांगल्या काही वाईट बाजू असतात हे ज्यांना ठाऊक असते अशां सर्वांना आपण स्वीकारलेली जीवनपद्धती ही आपल्यापुरती - कदाचित- उपयुक्त असेल परंतु तीच श्रेष्ठ असे न समजता इतर पर्यायांकडे स्वीकृतीच्या नजरेने पाहता आले नाही तरी आस्थेच्या नजरेने पाहिले तरीही सहजीवन कितीतरी सुसह्य होऊ शकते हे ठसवणारा हा चित्रपट आवडून गेला नाही तरच नवल. अर्थात हा चित्रपट इंग्रजी असला तरी तो टॉडच्या दृष्टिकोनातून पाहिला जात असल्याने फक्त एक बाजूच समोर येते आहे. भारतीय बाजूला झुकते माप देणारा, खरेतर केवळ ती बाजू दाखवणारा चित्रपट असला तरी जसे टॉड आस्थेवाईकपणे भारतीय जीवनपद्धती अनुभवू पाहतो, येथील जगण्याशी जुळवून घेऊ पाहतो तसे भारतीय मन पाश्चात्त्यांच्या बाबतीत करते का असा प्रश्न राहतोच. नुसते मॅक्डोनल्डसमधे बर्गर खाणे, वीकेंडमधे विविध होटेल्समधे ’डिनर’ला जाणे, आई-वडिलांची (सासू-सासर्‍यांची हे लिहितसुद्धा नाही, यावर बहुतेकांची प्रतिक्रिया इंग्रजीत ज्याला ’फ्राउनिंग’ म्हणतात तशी होईल हे ठाउक आहे मला.) जबाबदारी टाळण्यापुरता व्यक्तिवाद जोपासणे (आणि एरवी इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्लज्ज गॊसिप करणे), मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळवणे म्हणजे ’करियर’ करणे अशी अर्धवट नि सोयीची अमेरिकन जीवनपद्धती स्वीकारून एरवी ’आपली संस्कृती श्रेष्ठ’ असा देखावा निर्माण करण्यासाठी त्यातील केवळ कर्मकांडांचे उपचार करणे अशी ’संकरित’ स्वार्थी जीवनपद्धतीच आपण स्वीकारली आहे. जसा एखादाच टॉड जसा एखादाच अमेरिकन असतो तसा एखादाच भारतीय असे करू शकतो. उरलेले क्षुद्र जीव संस्कृती श्रेष्ठत्त्वाच्या शाब्दिक लढाया करीत राहतात.

पुढच्या प्रसंगात मुंबई एअरपोर्ट्वर उतरलेला टॉड दिसतो. तिथे अनेक लोक येणार्‍या पाहुण्यांच्या नावाच्या पाट्या घेऊन उभे आहेत. त्या गर्दीतच एक ड्रायवर त्याला नेण्यासाठी गाडी घेऊन आलेला आहे, टॉड त्याच्या अगदी समोर जेमतेम एक फुटावर उभा आहे. आपल्याला नेण्यासाठी कोणी आले आहे का ते तो शोधतोय. कोणीही आलेले दिसत नाही हे पाहून तो ’कॅब’ पकडावी म्हणून तो पुढे जातो आणि इतका वेळ टॉड समोर असल्याने झाकून गेलेली त्या ड्रायवरच्या हातातली पाटी दिसते ’Mr. Toad'. आपली हसून हसून पुरेवाट होते. इकडे टॉड एअरपोर्टमधून बाहेर येतो. पांढरे ड्रेस घातलेले टॅक्सी-चालक त्याला गराडा घालतात नि त्याला कोण नेणार यावर भांडू लागतात. यातच दूरवर एका कूल - कॅब ला टेकून शांतपणे उभा राहिलेला एक ड्रायवर - जो खाकी कपड्यात आहे! - त्याला दिसतो. भांडणार्‍या टॆक्सीवाल्यांमधून कशीबशी सुटका करून घेत टॉड त्याच्याकडॆ धावतो. ’तू मला रेल्वे स्टेशनवर सोडू शकतोस का?’. ड्रायवर होकारार्थी मान हलवतो. तो टॉडची बॅग उचलत असताना टॉड त्या कॅबचे दार उघडून आत शिरू लागतो. इतक्यात तो ड्रायवर ती बॅग उचलून शेजारच्या रिक्षात ठेवतो (आता तो ड्रायवर खाकी ड्रेसमधे का होता हे उलगडते). ते पाहून टॉड धावत जाऊन रिक्षात बसतो नि त्याला रिक्षा नको आहे, गाडी थांबव म्हणून ओरडू लागतो. एवढ्यात भांडणार्‍या टॅक्सी ड्रायवर्सचा गराडा पडतो. आता मात्र ’थांबू नको, गाडी पळव, लवकर पळव’ असे टॉड ओरडू लागतो. अखेर तो सीएसटीवर सुखरूप पोहोचतो. तिथे मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस मधे आपली सीट शोधत असता त्याला एक आगंतुक गाठतो नि त्याच्याशी गप्पा मारू पाहतो. आणखी एका संभाव्य धोक्याची जाणीव होऊन टॉड सावध होतो. तेवढ्यात गाडी सुरू होते, आसपास लोकांची धावती गाडी पकडण्याची कसरत चालू होते. टॊडला याची सवय नसल्याने तो साहजिकच तो भांबावतो. पण तो आगंतुक त्याची बॅग आत फेकतो नि चालती गाडी पकडायला त्याला मदतही करतो. प्लॅटफॉर्मवरून तो टॉडला टा-टा करीत असतानाच गाडी वेगाने दूर जाऊ लागते.

या पहिल्या प्रसंगात पुढीच चित्रपटाचा टोन दिसून येतो. टॉडला ठकवू पाहणारे रिक्षा आणि टॅक्सीवाले जसे भेटतील तसेच या नव्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायला मदत करणारेही भेटणार आहेत याची सूचनाच दिग्दर्शक या प्रसंगातून देऊन ठेवतो. आता घारापुरी स्टेशनमधून बाहेर येणारा टॉड दिसतो. बाहेर येताच त्याला बर्फाचे गोळे विकणारा दिसतो. खूष होऊन तो चक्क शंभर रुपये देऊन तो गोळा खरेदी करतो. गोळा खात असतानाच एक व्यक्ती - मि. पुरोहित नरसिंहा विराजनारायण या भक्कम नावाची - व्यक्ती त्याला विचारते ’आर यू मि. टोड?’ ’मि. टॉड .’ टॉड दुरूस्ती करतो. झालेल्या गोंधळाबद्दल माफी मागून पुरू त्याला घेऊन निघतो. जाताना गोळे विकणारा (सिद्धार्थ जाधव) आपल्या अफाट इंग्रजीत त्याला पुन्हा या असे सांगतो. ही पुन्हा अस्सल भारतीय पद्धत, आवर्जून ’पुन्हा या’ म्हणत निरोप घेण्याची, पण त्यातच ’एका गोळ्याला शंभर रुपये देणारं गिर्‍हाईक’ असल्याने त्याला एक गंमतीशीर असा स्वार्थाचा रंग पण आलेला.

आता पुरूच्या गाडीतून टॉडचा प्रवास सुरू होतो. हवापाण्याच्या गप्पा सुरू होतात. मुंबईच्या तुलनेत घारापुरी स्वच्छ आहे असे पुरू सांगतो. त्याचवेळी एका भिंतीवर नैसर्गिक रंगकाम करणारा एक जण टॉड दिसतो. अशा लहानलहान प्रसंगातून, विरोधाभासातून त्याला त्या परिसराची ऒळख होऊ लागते. त्यांच्या संभाषणातूनच टॉड ’एग्जिक्युटिव वाईस प्रेसिडेंट ऒफ मार्केटिंग ऎंड ऒर्डर फुलफिलमेंट’ या पदावर असल्याची माहिती आपल्याला कळते. पुरू प्रभावित होतो, तो म्हणतो ’धिस इज वेरी इम्प्रेसिव’, ’नॉट अ‍ॅज मच अ‍ॅज इट साऊंड्स’ टॉड खुलासा करतो. तो म्हणतो ’All I do is sell kitsch to some rednecks. And now I am going to train some shmucks' . त्याचा सगळा वैताग त्याच्या प्रतिसादातून बाहेर पडतो. पंचाईत अशी होते की त्याचा अर्थ न समजून बिचारा पुरू त्याला kitsch , redneck” आणि ’shmucks’ या शब्दांचा अर्थ विचारतो नि वर ते आपल्या टिपणवहीत टिपून ठेवतो. अर्थात टॉड शेवटच्या शब्दाचा अर्थ त्याला सांगत नाहीच. पुरू हा एक गंमतीशीर माणूस आहे. त्याने ’फ्यूचर कॉल सेंटर मॅनेजर’ असा हुद्दा लावून आपली बिजनेस कार्डस सुद्धा छापून घेतली आहेत. हाच माणूस इथल्या कॉल सेंटरचा इन-चार्ज होणार आहे हे टॉड ला समजते. गोर्‍या साहेबासमोर नम्रता दाखविण्याचा, त्याला खूष करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो आहे. पण तो लाचार नाही. आपल्या हातून काही चूक होऊ नये, हाती आलेली ५ लाख रू. ची नोकरी जाऊ नये या दृष्टीने तो काळजी घेतो आहे इतकेच. बोलता बोलता स्तुती करण्याच्या ओघात तो टॉडला सांगतो की बहुतेक परदेशी प्रवासी बर्फाचा गोळा खाऊन आजारी पडतात. तू खूप स्ट्राँग आहेस. यथावकाश तो बर्फाचा गोळा टॉडला त्याचा प्रताप दाखवतोच.

मुख्य रस्त्यापासून थोडे दूर जाताच गाडी दोन्ही बाजूनी झाडांनी वेढलेल्या रस्त्यावरून धावू लागते. यावेळी सतारीचे बोल ऐकू येऊ लागतात. चित्रपटात अशा समर्पक संगीताचा वापर जागोजाग केलेला आहे. टॉड अमेरिकेत असताना वापरलेले संगीत, तो मुंबईत उतरल्यानंतर रिक्षातून मुंबईच्या रस्त्यावरून जात असताना वापरलेले पंजाबी ढंगाचे उडते संगीत, तर घारापुरीच्या रस्त्यावरून जाताना ऐकू येणारे हे शांत सतारीचे स्वर यातून त्या त्या ठिकाणची जीवनपद्धती सूचित केली जाते.

टॉडचे बुकिंग येथील घारापुरी पॅलेस होटेलमधे झालेले आहे. पण पुरू सांगतो की ती जागा अतिशय एकाकी आहे. त्याऐवजी मी तुम्हाला ’आंटीज गेस्टहाऊस' मधे नेतो. आंटी तुझी तुझ्या आईप्रमाणे काळाजी घेईल. वाद घालू पाहणार्‍या टॉडच्या विरोधाला न जुमानता तो त्याला आंटीज गेस्ट हाऊसला नेतोच. एका लहानशा बंगलीवजा दुमजली घरात हे आंटीचे गेस्ट हाऊस आहे. आंटी ही तिथली सर्वेसर्वा. ही आंटी फर्डे इंडियन-इंग्लिश बोलते. तिच्या ’व्हॉट इज युअर गुड नेम?’ या अतीव ब्रिटीश वळणाच्या ('गुड नेम?’) प्रश्नाने अमेरिकन टॉड बुचकळ्यात पडतो. अखेर पुरू त्याची ऒळख करून देतो. आत जाऊन बसत नाहीत तो आंटी आपल्य देशी पद्धतीने त्याचे आईवडील काय करतात, त्याचे लग्न झाले आहे का, नसल्यास त्याला गर्ल-फ्रेंड आहे का, त्याला पगार किती मिळतो वगैरे प्रश्नांची सरबत्ती करते. व्यक्तिवादी समाजात वावरलेला टॉड चांगलाच बावरून जातो. चाचरत चाचरत तो सांगतो की त्याची एक गर्लफ्रेंड होती परंतु त्यांचा नुकताच ब्रेक-अप झालेला आहे. ’का?’ हा प्रश्न आंटी विचारणार हे ओघाने आलेच. ’शी वाँटेड टू स्टार्ट अ फॅमिली अँड आय वॉज नॉट रेडि फॉर दॅट’ टॉड सांगतो. ’बट व्हाय, यू आर ओल्ड इनफ टू बी ए ग्रँड्फादर.’ हा टिपीकल आंटीचा शेरा! टॉड कसनुसं हसतो. काय करणार बिचारा. पुढे एका प्रसंगात ही आंटी बिचार्‍या एकाकी टॉडला एखाद्या छानशा इंडियन मुलीशी भेटवण्याची ऑफर देते. त्याने नकार देताच तो ’होमो’ आहे का अशी विचारणाही बिनदिक्कत करते तर दुसरीकडे ’अगदी हाडांचा सापळा आहेस. भरपूर खाल्ले पाहिजेस तू.’ असा प्रेमळ दम देऊन भरपूर खायलाही देते. एकदा ही आंटी धोब्याकडून आलेल्या त्याच्या अंडरवेअरला सुद्धा इस्त्री करून ठेवते. आश्चर्यचकित झालेल्या टॉडला विचारते ’तुझी आई इथे असती तर तिने नसती केली का?’ अशी पृच्छा करते. एकुण ही आंटी भलतीच प्रेमळ नि सर्वांची काळजी करणारी आहे, एक प्रेमळ पण मॉडर्न आजीबाई.

तेवढ्यात चहा नि खाणे येते. खाण्यासाठी आणलेले फरसाण डाव्या हाताने खाणार्‍या टॉडला पाहून आंटी आणि पुरू अस्वस्थ होतात. त्यांची नेत्रपल्लवी चाललेली पाहून टॉडला काहीतरी गडबड आहे याची जाणीव होते. अखेर पुरू सांगतो ”डाव्या हाताने खाऊ नको कारण तो हात आम्ही... अशुद्ध .. हो अशुद्ध समजतो’. टॉडपुन्हा बावरलेला. ते पाहून अंकल - आंटीचा नवरा - उठतो आणि डाव्या हाताचा उपयोग सप्रयोग समजावतो. हा अंकल फक्त या एकाच प्रसंगापुरताच हालचाल करतो. एरवी तो दिसतो तो आरामखुर्चीवर बसून आराम करताना किंवा खाताना. एकुण हा अंकल आंटीच्या जिवावर जगतो आहे हे लक्षात येते. भारतीय नवर्‍यांची जगण्याची ही ही एक पद्धत! रोजच्या जगण्यातले हे छोटे छोटे तपशील टॉड हळू हळू आत्मसात करू लागतो. त्याच्या खोली लावलेला कालीचा फोटो असो, की बक्कळ चार चमचे घालून केलेली कॉफी असो, एक एक गोष्ट त्याला इथल्या जगण्याची ओळख करून देऊ लागते. एकदा आंटीच्या बागेत चहा घेत बसलेल्या टॉडला तेथील बोगनवेलीच्या झाडावर दिसतो तो शमेलिऑन, भारतात जवळजवळ सर्वत्र आढळणारा सरडा. आपल्या परिसराशी एकरूप होण्यासाठी रंग बदलणार्‍या या सरड्याबद्दल या नव्या परिसराशी जुळवून घेण्याची वेळ आलेल्या टॉडला विशेष कुतूहल वाटते.
गेस्ट हाउसच्या दारातून आत येताना डाव्या बाजूला कुंपणाची दगडी भिंत आहे. ही बरीच उंच आहे. पलिकडे काय आहे ते या बाजूने दिसू शकत नाही. परंतु बरेचदा गेस्ट हाउस मधे शिल्लक राहिलेले अन्न एका ट्रे मधे भरून त्या भिंतीवर ठेवले जाते. पलिकडून ते काढून घेऊन ट्रे पुन्हा त्या भिंतीवर ठेवण्यात येते. पलिकडील जगाचा नि त्या गेस्ट हाउसचा - त्यातील गेस्टस चा - एवढाच संबंध. पुढे आंटीने दिलेले भरपूर खाणे न संपवता आल्याने अनेकदा टॉडही आपले अन्न पलिकडच्या जगासाठी त्या भिंतीपलिकडच्या जगासाठी ट्रे मधे घालून भिंतीवर ठेवू लागतो. गोर्‍या माणसाला खाता येणार नाही इतके मिळावे तर भिंतीपलिकडच्या जगाचे निव्वळ उरलेल्या अन्नातही भागावे असा एक अर्थ यातून दिसू शकतो. अखेर कुतूहल अनावर होऊन तो त्या भिंतीवर चढून पलिकडे डोकावतो. त्याला दिसतो एक धोबीघाट, एका विहिरीभोवती वसलेला. आजूबाजूला असलेल्या जुनाट कळकट चाळवजा इमारतींच्या गॅलर्‍यांमधे लोंबकळणारे कपडे, नि धोबीघाटावर नित्य कलकलाट करीत धुणे धुणारे धोबी. त्यातला एक - कदाचित त्यांचा नेता वा सुपरवायजर - पिवळा टी शर्ट घातलेला धोब्याचे लक्ष भिंतीवरून डोकावणार्‍या टॉडकडे जाते. अन्न शेअर करणारे दोघे एकमेकांना प्रथमच भेटतात, ते ही भिंतीच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या जगात राहूनच. यथावकाश त्या भिंतीचे बंधनही दूर होते, तो भाग पुढे येईलच.

पहिल्या दिवशी सकाळी ऑफिसकडे जाताना पुरू टॉडकडून त्याला पाच लाख पगार दिला जाणार असल्याची खात्री करून घेतो, नि स्वत:वरच खूष होतो. त्यातच तो सांगतो की या नोकरीमुळेच त्याला भाग्यश्री सहस्रबुद्धे नावाच्या त्याच्या जुन्या मैत्रिणीशी लग्न करता येईल. चांगली नोकरी नसल्याने इतके दिवस रखडलेले हे लग्न आता सुरळितपणे पार पडणार असल्याने स्वारी खुषीत आहे. त्या भरातच ती ऐश्वर्या राय पेक्षाही सुंदर असल्याचा दावा तो करतो नि आपण गालातल्या गालात हसतो.

गाडी ऑफिसपाशी पोचते. ’हे आपले ऑफिस’ पुरू सांगतो. टॉड इकडेतिकडे पाहतो. एका एकमजली अर्धवट बांधलेल्या बांधकामाखेरीज तिथे काहीच नाही. ऑफिसला बाहेरून रंग दिलेला नाही. दुसर्‍या मजल्यावरचे पिलर्स पुरे झालेत पण स्लॅबचा नि भिंतींचा पत्ता नाही. बांधकामाच्या ठिकाणी वापरला जाणारी शिडी (जिला ते लोक ’घोडा’ म्हणतात) तशीच तिथे उभी. वरच्या चार पिलर्सला जोडणारे चार बांबू नि त्यावर प्लास्टिकचे निळे कापड टाकलेले. त्याच्या जवळच लावलेला एकुलता एक ए. सी. खालच्या मजल्याला खिडक्या नाहीतच आणि आत जाण्यासाठी पार्टिशनचे वाटावे असे एक दार नि त्यावर ’Fulfilment' असे कंपनीचे नाव असलेला एक फ्लेक्स टांगलेला. ’इथे हवी तशी जागाच उपलब्ध नव्हती, म्हणून आम्हाला स्वत:च हे बांधकाम करावे लागले’ पुरू स्पष्टीकरण देतो. परंतु आत प्रवेश करताच टॉडला दिसते एक सुसज्ज ऑफिस. अजून एखाद दुसरी चुकार वायर लोंबते आहे हे खरे पण एकुण ऑफिस उत्तम बनवलेले. दहा ते पंधरा सर्विस एग्जिक्युटीव ना बसण्यासाठी क्युबिकल्स नि त्या सर्वांवर एकाच वेळी नजर ठेवता येईल अशी एक सुपरवायजर्स केबिन, मॅनेजर पुरू नि व्हीपी असलेल्या टॉड यांच्यासाठी. टॉड प्रथमच समाधानी दिसतो. थोडे पुढे येताच त्याला दिसते मागचे दार नि त्यातून डोकावणारी एक गाय. ती जिथे उभी असते त्या व्हरांड्यातही साधी टेबल्स टाकलेली नि प्रत्येक टेबलवर दोन दोन एग्जिक्युटिव्ज ना बसायची सोय केलेली. हे सारे पाहत असतानाच सकाळचा बर्फाचा गोळा आपली करामत दाखवू लागतो. न राहवून तो गेस्ट हाऊसला परतण्याचा निर्णय घेतो.

अवघडलेला टॉड घाईघाईने गेस्ट हाउस कडे परतत असताना वाटेत एक पोरगं उगाच भुकेला आहे एक रुपया द्या म्हणून त्याच्या मागे लागते. पोटावर हात धरून चाललेला टॉड ’नो नो, नॊट अ गुड टाईम(!)’ म्हणून टाळू पाहतो. पण ते पोरगं त्याचा पिच्छा सोडत नाही. अखेर त्याला पैसे देण्यासाठी पोटावरून हात काढताच ते पोरगं त्याचा कमरेला लावलेला मोबाईलच पळवून नेतं. (पण ते पोरगं चोर नसतंच, फिरंग्याची गंमत करावी एवढाच त्याचा उद्देश असतो. काही काळाने ते तो फोन परत आणून देतं. पुढेही टॉडची नि त्याची ही गंमत चालू राहते.) हातघाईच्या स्थितीत असलेला टॉड धावतच आपल्या खोलीत शिरतो. पण हाय रे दैवा. त्याच्या टॉयलेट मधील टॉयलेट बोल त्याच्या देखतच एक गवंडी बाहेर आणताना दिसतो. दुसरा गवंडी सांगतो ’नीचे नीचे... डाउनस्टेर्श.. बाथरूम.. नो प्रॉब्लेम’. बिचारा धावतच जिना उतरतो नि खालच्या मजल्यावरील टॉयलेटमधे घुसतो. घाईघाईने पँटचा पट्टा काढत असताना एकीकडे नजरेनेच तो टॉयलेट पेपर वगैरे शोधत असतो. पण त्याला ते सापडत नाही. एवढ्यात त्याचे खाली लक्ष जाते. तिथे कमोड ऐवजी इंडीयन पद्धतीचा टॉयलेट दिसतो. हतबुद्ध झालेल्या टॉडच्या चेहर्‍यावर हळूहळू काही समजल्याचे भाव दिसतात. सावकाशपणे तो आपला डावा हात वर आणतो नि त्याकडे पाहतो नि एक सुस्कारा सोडतो.या ’अशुद्ध डाव्या हाता’च्या प्रसंगाप्रमाणे इतरही अलिकडचे पलिकड्चे काही प्रसंग असे छानपैकी जुळवून घेतलेले दिसतात. पुढेही अनेक वेळा पूर्वार्धातील अनेक प्रसंगांची सावली उत्तरार्धातील प्रसंगांवर पडलेली दिसते. त्यामुळे कथानकाला एक प्रकारचा बांधीवपणा आलेला आहे. कोणताही प्रसंग उपरा वाटत नाही, त्याचा कुठे ना कुठे सांधा जोडून घेतलेला दिसून येतो.

(क्रमशः)