मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

काजळवाट

( 'आदेउश' - ले. वि. ज. बोरकर, पृ.१३३ - १३८. पोस्टचे शीर्षक माझे.)

बोट बंदरातून बाहेर काढली तरी कार्मोन टेपरिकॉर्डर लावत नसे. सेंट्रल पार्कवरून येणारे संगीताचे स्वर आकाशात भरून राहिलेले असत. आणि त्यांची लय कार्मोनला बिघडवायची नसे. सेंट्रल पार्कमधून येणार्‍या त्या स्वरांनी बोटीतील वातावरण देखील भारलं जाई. बोट मीरामारच्या आसपास येई तेव्हा सेंट्रल पार्कवरून येणारे स्वर अगदी मंदावल्यासारखे होत आणि कार्मोन टेपरिकॉर्डर चालू करी. तो ही अशा खुबीने की सेंट्रल पार्कमधून येणार्‍या संगीताचे स्वर संपले कधी आणि टेपरिकॉर्डवरचे स्वर सुरू झाले कधी हे कोणाच्याच लक्षात येत नसे.

बोटीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या फेरीत केव्हा तरी सूर्य पश्चिम क्षितिजाला टेकू लागे. सारं पणजी शहर तेव्हा पेटून उठल्यासारखं वाटे. पिवळ्या रंगानं प्रदीप्त झाल्यासारखं वाटे.

दिवसाउजेडीच्या या फेर्‍या कितीही मनोहारी असल्या तरी कार्मोनला खरोखर आवडत त्या काळोख पडल्यानंतरच्याच फेर्‍या. सारा अवकाश काळोखानं भरून गेला असताना, बोटीवर मंद दिवे लावून तो काळोख कापत जाण्यात जो उन्माद होता तो अलौकिकच.

आता काळोख साकळू लागला होता. शेवटच्या फेरीनंतर बोट धक्क्याला लागून थोडा वेळ लोटला होता. बोटीतील वास्तव्यात मंत्रमुग्ध झालेले लोक धक्क्यावर उतरले तरी त्यांची पावलं मागंच ओढ घेत होती ते कार्मोननं पाहिलं होतं.

धक्क्यावर जमलेले लोक आता बोटीमध्ये बसू लागले होते. धक्का रिकामा होऊ लागला होता.

-

काळोख साकळू लागला आणि पाण्यानं आपल्याला आपल्यातच अधिक मिटून घेतलं. ते अधिकच आत्मनिमग्न झालं. आता पाणी म्हणजे फक्त एखाद्या काळ्या लालसर अधिकाधिक गडद होणार्‍या पत्र्यासारखं वाटू लागलं. पाण्याला आता स्वतःशिवाय दुसर्‍या कशाचीच जाणीव नव्हती. आकाशातून उडत येणारी भिरी तर त्याच्या मुळी लक्षातही आली नव्हती.

काळोख जेवढा बाहेर साकळत होता त्याहून जास्त तो झाडात साकळत होता. मीरामारकडे जाणार्‍या रस्त्यावर दुतर्फा हारीनं गच्चं झाडं उभी होती. त्यांचे बुंधे आता अधिकच काळे पडले होते, आणि त्याहूनही त्यांची पानं. पानापानांत काळोख आता गच्च होऊ पाहात होता. त्या झाडांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फाकलेल्या पसरट फांद्या, त्यांची पानं आणि त्यांत जमू लागलेला काळोख हे सगळंच आता एक होऊ पाहात होतं.  एकाच काळ्या रंगात बुडू पाहात होतं. हळूहळू पानापासून पान वेगळं दिसेनासं झालं. सारी झाडंच काळोख पोटाशी धरून बसल्यासारखी वाटू लागली. आणखी... आणखी काळोख पोटात रिचवून गूढ होऊ लागली.

काळोख पडू लागला तशी आजूबाजूच्या परिसरातून कावळ्यांची भिरीच्या भिरी आकाशात उडाली होती. जोरजोरानं हवेवर पंख हाणत पणजीच्या दिशेनं झेपावू लागली होती. आकाशातून उडत येणारे हे कावळे विलक्षण कलकलाट करीत आता या झाडांच्या पानांत घुसत होते. त्यांच्या कलकलाटानं सारा आसमंत दणाणू सोडत होते. दाटणार्‍या काळोखाच्या वजनाखाली त्यांच्या चिमुकल्या छात्या दडपल्या जात होत्या. आसमंताच्या या विरूप दर्शनानं त्यांच्या हृदयांचा भीतीनं गोळा होत होता. एक दिवस संपत आलेला होता. या दिवसाच्या अखेरीस कावळ्यांना आपला अंतकाळच समीप दिसत होता. त्यांचा ध्यास एकच होता - तो अंतकाळ यायच्या अगोदर आपण आपल्या जागी सुरक्षित असावं. म्हणूनच आपलं ठराविक झाड, ठराविक फांदी, ठराविक घरटं गाठीपर्यंत त्यांच्या जिवाला थारा नव्हता. पानात शिरलं तरी त्यांचे पंख फडफडतच राहत होते, एकमेकांशी झुंजत होते. त्या झुंजीत प्राणभयानं ते खाली रस्त्यावर शिटंत होते. ते आक्रंदत होते आणि त्यांच्या आक्रंदनानं सारा आसमंत थरारून उठत होता.

आसमंतात दाटू पाहणारा काळोख अधिकच कुंद होत होता.

-

बोट सुरू करण्याच्या नेमक्या वेळेलाच हातात मेंडोलिन, गिटार, व्हायोलिन, क्लारियोनेट, बोंगो अशी वाद्यं घेतलेली चारपाच तरुण पोरं बोटीत शिरली आणि कार्मोननं ओळखलं, आपल्याला आता टेपरिकॉर्डर चालू करावा लागणार नाही.

बोट धक्क्यापासून दूर झाली, थोडी लांब गेली आणि बोटीतला प्रकाश वेगळाच वाटला. एवढा वेळ बोट धक्क्याला लागून होती. बोटीत दिवे होते तसेच धक्क्यवरही दिवे लागलेले होते आणि सर्वांचाच एक मंद फिका प्रकाश पसरलेला होता. बोटीतल्या काय, किंवा बोटीबाहेरच्या काय, कोणत्याही प्रकाशाचं काही विशेष वाटतच नव्हतं. आता बोट नदीच्या पाण्यात खेचली गेली आणि एकदम पाण्यावर सभोवती पसरलेल्या काळोखाचं अस्तित्व जाणवलं.

त्या काळोखानं बोटीला चहूबाजूंनी घेरलं होतं, आणि फूल फुलावं तसा हा बोटीत मध्येच प्रकाश फुलला होता. हा प्रकाश एकदम वेगळा वाटू लागला. सुखद वाटू लागला. हवाहवासा वाटू लागला. प्रकाशाच्या या अस्तित्वामुळं प्रत्येकाला इतर सृष्टीपासून आपण वेगळं असल्याची एक अनोखी जाणीव होऊ लागली.

बोट पणजीच्या किनार्‍यापासून दूर झाली आणि पणजीच्या किनार्‍यावरच दिवे दिसू लागले. दाटणार्‍या काळोखात प्रकाशाचे गोल. पण काळोख अजून पुराअ पडला नव्हता. क्षणाक्षणाला तो अधिकाधिक गडद मात्र होत होता. आणि त्या काळोखात ते दिवे, कोणीतरी गळा घोटल्यामुळे घुसमटावं, तसे घुसमटत असल्यासारखे दिसत होते. बोटीतून पालासीसमोरच्या रस्त्यावरून येणारी-जाणारी माणसंही दिसत होती. रस्त्यावर दिवे सर्वत्र लागले होते खरे, पण तरीही ती माणसं काळोखाच्याच आवरणाखाली असल्यासारखी वाटत होती. त्या दृश्यात एकाच वेळी काहीतरी करुण होतं आणि काही तरी तितकंच रम्य होतं.

धक्क्यापासून बोट अलग झाली तेव्हांपासूनच वाद्यांच्या हलक्या, नाजूक लहरी उठू लागल्या होत्या. वाद्यांच्या स्वरांच्या त्या तरंगांनी बोटीतील वातावरण धुंदकारु लागलं. क्षणन् क्षण तरल, रोमांचित होऊ लागला. क्षण आता क्षणामागून जात असल्यासारखे वाटतच नव्हते. प्रत्येक क्षण तिथेच, त्या स्वरमेळातच जणू अडकून राहत होता. थांबत होता.

वाद्यांचे सुरुवातीला हलके वाटणारे स्वर हळू हळू घनदाट बनू लागले. त्या स्वरांच्या आघातानं बोटीतील प्रकाशाचा कणन् कण थरारू लागला. किंबहुना, बोटीतील त्या प्रकाशालाच स्वरांचे कळे फुटत असल्यासारखं वाटू लागलं. आता त्या स्वरांबरोबरच पावलांचे ठेके धरले गेले. थोड्याच वेळात आणखीही ठेके मिसळले जाऊ लागले. आणि मग त्या वाद्यांतून निघणारा स्वरमेळ केवळ त्या चौघा पाच जणांचाच राहिला नाही. तो बोटीतील सर्वांनाच झाला.

बोटीवर वाद्यं अशी झणकारत असताना, त्या वाद्यांच्या लयीशी जुळवून कोणी तरी उंच, कापर्‍या स्वरात गाऊ लागलं.

पेद्रू काजराक ओयता
पेद्रू काजराक ओयता
मारयाच्या काजराक ओयता


त्या गाण्याचे स्वरच असे थरकंपित करणारे होते की काही अघटित घडत असल्याच्या जाणीवेनं सारी बोट तटस्थ झाली. भुंग्यानं भोवती गुणगुणत फिरावं तसे गाण्याचे ते स्वरच प्रत्येकाच्या भोवती आता रुंजी घालू लागले होते.

ही मारिया कोण? ही पेद्रूची प्रेयसी. बालपणापासूनची त्याची मैत्रीण. लग्नाच्या त्यांनी आणाभाका घेतलेल्या. आणि त्याच मारियाचं आता दुसर्‍याशी लग्न होत होतं. सगळा गाव या लग्नाला जाणार. पेद्रूला तरी मागं राहून कसं चालेल.? जनरीत म्हणून पेद्रूलाही लग्नाला गेलंच पाहिजे. आणि तिथे गेल्यावर काय होतं?

पेद्रू मारयाक चोयता
ताच्या मारयाक चोयता


बोटीनं फेरीबोटीचा पट्टा आता ओलांडला होता. मीरामारकडे जाणार्‍या रस्त्यावरचे दिवे आता एका ओळीत ओवलेल्या मण्यांसारखे दिसत होते. पण नवलाची गोष्ट अशी की ते मणी चमकदार असूनही झाकोळून गेल्यासारखे दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडांच्या ऐसपैस विस्ताराची जणू त्यांच्यावर सावली पडली होती आणि त्या सावलीतच ते गुरफटून गेले होते. दिवे लागले तरी त्या रस्त्यावर अजूनही अंधारच असल्यासारखा वाटत होता.

काळोख आता जणू नदीतूनच वर उसळत होता. बोटीला चहूबाजूंनी घेरत होता. आणि या उसळत्या काळोखात बोटीतील प्रकाश तेवढा संथपणे तरंगत होता. गाण्यानं, संगीतानं बेभानपणे निनादत होता.

वधूवेषातील मारियाला पेद्रू पाहतो. जी मारिया या वेषात त्याच्याबरोबर असायला हवी होती तीच मारिया या वेषात दुसर्‍याच कुणाबरोबर  असलेली पाहून पेद्रूच्या काळजाचा ठाव सुटतो. तो वेडापिसा होतो. त्या लग्नघरात राहणं मग त्याला शक्यच होत नाही. तो आपल्या घरी परततो.

पेद्रू घराक येयता
दोळ्यातल्यान् दुखां व्हायता
दोळ्यातल्यान् दुखां व्हायता


मूकपणाने पेद्रू अश्रू ढाळीत राहतो.

हळू हळू नदीचं पात्र रुंद होऊ लागलेलं आहे. आता समोर काळा समुद्र अपरंपार पसरलेला दिसतो. क्षितिज कुठे दिसतच नाही. समुद्र आणि आकाश यांचा आता एकच गडद अवकाश झालेला दिसतो. आकाशात कुठे कुठे चांदण्या दिसतात म्हणून फक्त आकाश वेगळं ओळखता येतं. त्या चांदण्याही आता निस्तेज, फिक्याच दिसतात. आणखी थोडा अवकाश गेला की याच चांदण्या विलक्षण तेजानं चमकू लागतील.

नदीचं समुद्रापासून वेगळं अस्तित्व जिथं नाहीसं होतं तिथं बोट वळली. कार्मोननं बोट वळवली आणि समोर एकदम आग्वादचा किल्ला दिसला. उंचच उंच टेकाडावर हा किल्ला वसलेला होता. एरव्हीदेखील या किल्ल्याच्या पाषाणी भिंती समुद्रावर स्वामित्व गाजवत असल्यासारख्या भासत होत्या. आता काळोखात त्या अधिकच काळ्या दिसत होत्या. त्या भिंती आणि त्याच्या लगतचा परिसर. त्यांच्या हुकमतीखाली पाणी जणू निचेष्ट पडलं होतं.

कार्मोननं बोट संपूर्ण वळवली आणि तिचं तोंड पुन्हा धक्क्याच्या दिशेनं केलं. बोट समुद्राकडे जात असताना अभावितपणे सर्वांच्या नजरा पणजीच्या किनार्‍यावरच खिळलेल्या असत. इथं बोट वळली की आपोआपच त्या डोळ्यांसमोर येई ते आग्वादचा उंच टेकाडावरचा किल्ला आणि वेरेबेतीच्या लांबलचक किनार्‍याचा पट्टा. नेहमी या वेळेला बोटीतील प्रवासी आश्चर्यातिरेकानं, उन्मादानं चित्कारत असत. पणजीकडेच वळलेल्या डोळ्यांचा नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावरचं संपूर्णपणे वेगळं दृश्य पाहताना एकदम स्वतःवरचाच विश्वास उडे. या किनार्‍याकडे, किनार्‍यावरील झाडांकडे, छोट्या छोट्या घरांकडे पाहताना ते मंत्रमुग्ध होत. या दोन किनार्‍यावरील दोन दृश्यांपैकी अधिक विलोभनीय कोणतं याचा ते हिशेब मांडू लागत, पण त्यांना पडलेलं कोडं मात्र कधीच सुटत नसे.

पण आज एकाच्याही तोंडातून कसलाही चित्कार उमटला नाही. एकाएकी कार्मोनच्या लक्षात आलं, बोटीवर केव्हापासून हास्यध्वनी उमटलेच नाहीत. मौजमजाही झालीच नाही. वाद्यांच्या स्वराबरोबरच वाजणारे पावलांचे ठेही केव्हा बंद झाले समजलं नाही. सारी बोट तटस्थ झाली होती. प्रत्येकाची मुद्रा गंभीर झाली होती. प्रत्येकजण केवळ एकट्या पेद्रूशीच तद्रूप झाला होता.

गाता आवाज आता विलक्षण कातर झाला होता. त्याला कमालीची धार चढली होती. तो ऐकणार्‍याचं हृदय कापत थेट आत घुसत होता.

दुखांची मोतीया जातात
मोतयांत मारयाच दिसतां
मोतयांत मारयाच दिसतां
पेद्रू काजराक ओयता...


गाणं संपलं. आपोआपच वाद्य थांबली. कोणाची लवदेखील हलली नाही. जो तो तिथल्या तिथेच खिळून राहिला. पेद्रूच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू... अश्रूंचे मोती... त्या मोत्यांत पुन्हा मारियाच... ज्याला त्याला मारियाच फक्त डोळ्यासमोर दिसत होती.

केव्हातरी बोटीला या सगळ्यातून जाग आली. एकदम पालासीजवळचे दिवे दिसू लागले. दिवे फक्त एका कुशीलाच. बाकी दिसत होता तो समोर आरपार पसरलेला धुवांधार काळोख.

खरं तर धक्का आता अगदी जवळ आला होता. पण एकाएकी ते अंतर फार वाटू लागलं. सारं अस्तित्वच आता जड वाटू लागलं होतं.
-oOo-

'माती आणि आदेउश'
ले. वि. ज. बोरकर
मौज प्रकाशन गृह
(पुस्तकावर प्रकाशनाचे वर्ष लिहिलेले नाही पण किंमत रुपये बावीस पाहता ऐंशीच्या दशकातले असावे.) 

४ टिप्पण्या:

  1. आदेउश म्हणजे काय?

    असो, पण ट्रान्समध्ये गेल्याचा फिल आला. कदाचित हरवल्याचा. नक्की काय हरवलं ? म्हणजे माझं काही हरवलं की मीच हरवलो... गॉड नोज ! पण जे काही आहे ते अतिशय संमोहक आहे. बाजारात उपलब्ध आहे का हे पुस्तक ?

    बाकी धन्स या 'फिल' साठी !

    उत्तर द्याहटवा
  2. आदेउश हा पोर्तुगीज शब्द आहे, फ्रेंच Adieu चा अर्थ आहे तोच' इंग्रजीत गुड बाय.

    उत्तर द्याहटवा