शनिवार, २५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर

कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग <<  मागील भाग

नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली.

पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव्वाशे नौदलातील होते. २५ मार्च रोजी पेंटगॉनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ’रुझवेल्ट’वरील बाधित खलाशांना लवकरच उपचारासाठी आणले जाईल असे जाहीर केले

USSRoosevelt

३० मार्चपर्यंत नौकेवरील बाधितांची संख्या दीडशेहून अधिक झाली. उपचाराचे तर सोडाच, त्यातील एकाचेही विलगीकरणही केले गेलेले नव्हते. आता मात्र नौकेचा कॅप्टन ब्रेट क्रोझर याने धोक्याचा बिगुल वाजवण्याचा निर्णय घेतला. त्याने एक चार पानी इमेल नौदलातील आपल्या वरिष्ठांना पाठवली.

वरिष्ठांनी सर्व खलाशांची चाचणी घेण्याचे आश्वासन त्याला दिले होते. पण क्रोझर म्हणतो, "निव्वळ चाचणी केल्याने विशिष्ट व्यक्तीला लागण झाली आहे की नाही इतकेच समजू शकेल. त्याच्या प्रसाराला आळा घालणे शक्य नाही. त्यासाठी १४ दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणाची आवश्यकता आहे आणि ते साध्य करणे नौकेच्या मर्यादित जागेमध्ये शक्य नाही." अरुंद आणि सामायिक केबिन्स, खाणावळ आणि सुमारे पाच हजार कर्मचारी अशा विषम परिस्थितीत विलगीकरण यशस्वीपणे राबवणे अशक्यच होते.

’शिवाय...’, क्रोझर लिहितो, "सध्या परिस्थिती युद्धजन्य नाही. तसे असते, तर कर्तव्य म्हणून आम्ही सर्वजण लढत राहिलोच असतो. पण सद्यस्थितीत नौका सज्ज ठेवण्यासाठी खलाशांना मृत्यूच्या दारात उभे करण्यात काहीच हशील नाही."

अणुभट्टीसह अनेक शस्त्रे, विमाने आणि यंत्रसामुग्री असलेली नौका एरवी संपूर्णपणे रिकामी करणे शक्य नसते. अत्यावश्यक कामांसाठी काही कर्मचारी त्यावर ठेवावे लागतात. क्रोझर म्हणाला, "असे असले, तरी पाच हजार खलाशांच्या जीवितासाठी हा धोका पत्करायला हवा. नौदलाला अत्याधुनिक यंत्रणांइतकीच त्यांच्या जीविताचीही काळजी आहे, हे त्यांना दाखवून द्यायला हवे."

BretCoetzer

ब्रेटने लिहिलेले हे पत्र दुसर्‍या दिवशी ’सॅनफ्रॅन्सिस्को क्रॉनिकल’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आणि नौदलासह अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ माजली. पण नौदलाचे प्रभारी सचिव थॉमस मॉड्ली यांनी या सार्‍या गोष्टींना फार महत्व देण्याची गरज नसल्याचे भासवले. ’हे खलाशी बाधित असले तरी त्यांची प्रकृती उत्तम आहे, कुणालाही गंभीर त्रास नाही’ असा दावा त्यांनी केला.

ज्या ’गुआम’मध्ये या नौकेवरील खलाशांना उतरवून घेण्याचे आदेश दिले होते, ते जेमतेम दोनशे चौरस मैल क्षेत्रफळाचे अमेरिकन अधिपत्याखालील एक लहानसे बेट आहे. पावणेदोन लाख लोकसंख्येच्या या बेटावर पाच हजार लोक - ते ही संभाव्य बाधित रुग्ण - सामावून घेण्याइतकी सक्षम आरोग्ययंत्रणाच नाही. तेव्हा चाचणी होऊन लागण झाली नसल्याचे सिद्ध झालेल्या खलाशांनाच सामावून घेण्याची, त्यांच्या केवळ विलगीकरणाची सोय करण्याची तयारी तेथील गव्हर्नरने दाखवली.

गुआममधील एका व्यायामशाळेला विलगीकरण कक्ष म्हणून रूपांतरित करुन त्यात दीडशे खलाशांची सोय केली होती. नौकेप्रमाणेच इथेही विलगीकरणाला आवश्यक असणारे किमान अंतर राखणे अशक्य होते. त्यातील अनेक खलाशी लवकरच बाधित म्हणून घोषित झाले. ’उरलेले कर्मचारी ’बाधित होतील का?’ हा प्रश्नच गैरलागू ठरुन ’ते कधी बाधित होतील?’ एवढाच प्रश्नच आता शिल्लक राहिला आहे.

दरम्यान क्रोझरचे पत्र माध्यमांतून प्रसिद्ध झाल्याने धक्का बसलेल्या मॉड्ली यांनी क्रोझरच्या ’सुमार निर्णयक्षमते’ला जबाबदार धरुन त्याला नौकेच्या कमांडर पदावरुन मुक्त केल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी सुमारे पाच ते सहा वेळा ’त्याने ते मुद्दाम लीक केले नसले...’ असे म्हणत असतानाच क्रोझर आणि लीक हे दोन शब्द एकाच वाक्यात पुन्हा पुन्हा उच्चारले. शब्दार्थाने त्याच्यावर संशय नसल्याचे सांगत असताना ध्वन्यर्थाने तोच दोषी असल्याचा खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रयत्न केला.

पुढे नौकेवरील खलाशांशी संवाद साधताना, त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ’क्रोझरने प्रसिद्धी माध्यमांकडे जाणॆ ही मोठी चूक होती.’ म्हणत पुन्हा एकवार त्यानेच ते पत्र माध्यमांकडे लीक केले असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. या भाषणादरम्यान क्रोझरवर दोषारोप करत असताना क्रोझर हा ’भाबडा आणि अतिशय मूर्ख’ असल्याचा आरोप केला. तेथील नाराज खलाशांनी अनेकदा त्यांच्या बोलण्यात अडथळा आणला. ’आमच्या जीविताच्या हितासाठीच क्रोझरने ते केले असल्याचे’ मॉड्ली यांना बजावले.

त्यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप माध्यमांतून पसरली आणि मॉड्ली यांच्या शेरेबाजीवर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली. विशेषत: क्रोझरला उद्देशून त्यांनी वापरलेले ’दगाबाज’ हे विशेषण टीकेचे सर्वाधिक धनी ठरले. कारण नौदलाच्या आणि एकुणच संरक्षण दलांच्या नियमावलीनुसार ’दगाबाजी’ हा कोर्ट मार्शल होण्याइतका गंभीर गुन्हा मानला जातो. त्यातच मॉड्ली यांनी कोणत्याही चौकशीशिवाय एकतर्फी निर्णय घेत क्रोझर यांच्यावर कारवाई केली होती. सेनाधिकार्‍यांत आणि लोकप्रतिनिधींमध्येही या विरोधात प्रचंड नाराजीचे सूर उमटले. अखेर प्रचंड गदारोळानंतर मॉड्ली यांनी क्रोझरकडे दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यापूर्वी नौकेवर झालेला ब्रेटचा निरोपसमारंभ ही चोख आणि रोख जगण्याच्या काळातील अपवादात्मक असा हृद्य प्रसंग होता. आपल्या नौकेला आणि सहकार्‍यांना अखेरचा सॅल्यूट देऊन नौका सोडणार्‍या आपल्या कॅप्टनच्या नावाचा जयघोष करत त्याच्या सहकार्‍यांनी त्याला निरोप दिला. अनेक खलाशांनी याचा व्हिडिओ सोशल माध्यमांतून प्रसिद्ध केला. मायकेल वॉशिंग्टन याने ’एका श्रेष्ठ नि जबाबदार कॅप्टनला असाच निरोप द्यायला हवा.’ म्हणत हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना क्रोझर याला GOAT अर्थात Greatest Of All Times या विशेषणाने गौरवले.

१३ एप्रिलपर्यंत रुझवेल्ट नौकेवरील कर्मचार्‍यांमधील बाधितांची संख्या तब्बल ५८५ इतकी झाली, आणि कोरोनाने नौकेवरचा आपला पहिला बळी घेतला.

अमेरिका ही जगातील सर्वश्रेष्ठ महासत्ता मानली जाते. महासत्तेचे मोजमाप अर्थबळ आणि शस्त्रबळ या एककांत केले जाते. ’सर्वांसाठी आरोग्यसेवा’ या व्याख्येचा भाग नसते. पण सर्व अत्याधुनिक साधने आणि शस्त्रे धारण करणारी, चीनसारख्या बलाढ्य शत्रूच्या मनातही धडकी भरवणारी रुझवेल्ट जेव्हा एका विषाणूसमोर नांगी टाकते, तेव्हा माथेफिरु शस्त्रास्त्रस्पर्धांमध्ये रमलेल्या राष्ट्रप्रमुखांनी महासत्तेच्या आपल्या व्याख्येकडे नव्याने पाहण्याची गरज निर्माण होत असते.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी दिनांक २५ एप्रिल २०२०)

पुढील भाग >> वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस


हे वाचले का?

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे

भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे असे मी म्हणतो. ते तंतोतंत खरे करण्याचा माझ्या देशबांधवांचा प्रयत्न पाहून माझे ऊर भरून येतो.

आपल्या सीएम आणि पीएम ने सांगितले की एसी वापरु नका... आता ते ही अंमळ कर्मकांडवालेच, घरच्या पर्सनल एसीला धोका नाही हे सांगितलेच नाही. मग त्यांचे थाळीबंद शागीर्द त्यांची आज्ञा पाळण्यास सरसावले.

मॉल, चित्रपटगृह, मोठी औद्योगिक कार्यालये यांत ’सेंट्रलाईज्ड एअर कंडिशनिंस सिस्टम’ असते, जिथे हवा रि-सर्क्युलेट होते. जिथे एअर-व्हेंट असतात तिथे हवा आत खेचली जाऊन सेंट्रल कूलिंग युनिटकडे नेली जाते. तिथे ती थंड करुन पुन्हा परत सोडली जाते. या प्रक्रियेत कामाच्या ठिकाणी जर कोरोनाचे ड्रॉप्लेट्स असतील,  तर ते हवेबरोबर खेचले जाऊन व्हेंटमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतात. धोका इथे आहे! 

घरच्या - स्प्लिट वा विंडो - एसीमध्ये बाहेरच्या बाजूला जे पॅनेल असते त्यात अतिशय पातळ पत्रे असतात. त्यांचा एकुण सरफेस एरिआ भरपूर पण जाडी नगण्य असल्याने, त्यांच्याभोवती फिरणारा पंखा त्यांना लवकर थंड करतो. आणि हे खोलीतील हवेला थंड करतात.

StupidMen

स्प्लिट एसी असेल तर तो त्याला जोडलेल्या कॉपर ट्यूबचे तपमान कमी करतो, त्यातून आतील कूलन्टचे तपमान कमी होते. ही ट्यूब आतील युनिटपर्यंत गेलेली असते. तिथे एक कार्बन सिलिंडर घरातील हवा त्या ट्यूबभोवती फिरवून पुन्हा खोलीत सोडतो. त्यामुळे त्या हवेचे तपमान कमी होते. या प्रक्रियेत ना आतली हवा बाहेर टाकली जाते ना बाहेरची आत खेचली जाते. त्यामुळे मुळातच आत कोरोना ड्रॉप्लेट्स असतील तरच ते टिकून राहण्याचा प्रश्न येतो. आणि आधीच ते असतील तर मग एसी लावा की न लावा, फरक काय पडतो?

विंडो एसीबाबत परिस्थिती अगदी किंचित अधिक रिस्की म्हणता येईल. कारण तिथे आत हवा फेकणारा पंखा त्या पॅनेल्सच्या तुलनेने जवळ असतो. त्यामुळे बाहेरुन त्या पॅनेलवर ड्रॉप्लिंग पडले तर तो आत खेचण्याची नगण्य- पण शून्य नसलेली शक्यता असते. पण आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हा विषाणू फ्लूच्या इतर विषाणूसारखा हवेत राहात नाही. त्यामुळे अगदी वरच्या मजल्यावरील कोरोनाबाधित माणसाने नेम धरुन तुमच्या एसीवर शिंकले तर मात्र विंडो एसी तुम्हाला धोक्यात टाकू शकतो. पण आता एकुणात ही शक्यता किती उरते याचे गणित करा तुम्हीच.

पण मी सांगतोय तो किस्सा याहून महान आहे. एसी वापरायचा नाही म्हणून आमच्या समोरच्या बिल्डिंगमधील खिडकी-शेजार्‍याने भेंडांचे/वाळ्याचे पडदे असणारा भलामोठा कूलर आणला. मी ताबडतोब समोरूनच त्याला एक दंडवत घातला. अरे मर्दा त्यापेक्षा एसी बरा की रे. तीन बाजूने लावलेल्या त्या भेंडांची शीट्स तर जंतूंसाठी इनक्युबेटर सारखेच काम करतात.

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाच्या साथीच्या वेळेस पाणी बराच काळ साचू देऊ नये म्हणून सांगितले जाते. घरात पाण्याची टाकी, पिंप यांतील पाणी वरचेवर उपसून शेवाळ वा गाळ साचू नये याची खात्री करुन घेण्याचे आवाहन केले जाते. त्याचे कारण म्हणजे साचलेल्या पाण्यात, गाळ-शेवाळात जंतू वेगाने वाढतात.

इथे तर त्याहून अधिक चांगले म्हणजे आर्द्र आणि थंड वातावरण तयार होते. वर भेंडांमध्ये जिवाणू, विषाणूंना दडून राहायला भरपूर सांदीकोपरे तयार असतात. त्यांची स्वच्छता जिकीरीची असते. आख्खे शीट डेटॉल सारख्या डिस-इन्फेक्टंट मध्ये बुडवून काढल्याशिवाय किंवा कडक ऊन्हात बराच काळ वाळवल्याखेरीज ते स्वच्छ होणे अवघड.

थोडक्यात, ’काय सांगितले’ हे ऐकताना ’का सांगितले’ हे ऐकले नाही, समजून घेतले नाही, तर केवळ कर्मकांड तेवढे पाळण्याचे गृहित धरुन, वर त्याला त्याहून घातक पर्याय काढला जातो तो असा.

कर्मकांडप्रधान देश प्रगती करत नाही तो यामुळे. कारणमीमांसा, कार्यकारणभावाची उकल याचं आपल्याला तंतोतंत वावडं आहे. बाबा बोला वैसा करने का, एवढंच आपल्याला कळतं.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

’कोर्ट’ आणि एका ’असंवेदनशील’ प्रेक्षकाच्या नजरेतून चित्रपट

१७ तारखेला (२०१५) 'कोर्ट' रिलीज झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला तेव्हा प्रचंड गर्दीने प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबद्दल अधिकाधिक चर्चा होऊ लागली. लोक उत्सुकतेने तो रिलीज होण्याची वाट पाहू लागले होते. चित्रपट मराठी असल्याने किती काळ टिकेल हे ठाऊक नसल्याने रिलीज झाल्या-झाल्या बघून टाकण्याचे बहुतेकांनी ठरवले होते. चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहून घेतला. वृत्तपत्रांतून आलेल्या समीक्षेतून बहुतेकांनी त्याला उत्तम रेटिंग दिले गेले. पहिल्या एक-दोन शोमधेच असा अनुभव येऊ लागला, की सर्वसामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया निराशेची होती.

स्वयंघोषित चित्रपट रसिक/समीक्षकहा धक्का होता. त्यातून काही जणांनी प्रेक्षक 'असे कसे दगड हो?' अशी प्रतिक्रिया देऊ केली. थोडे सभ्य होते त्यांनी 'काही संवेदनशीलता वगैरे आहे की नाही' असा थोडा सुसंस्कृत सूर लावला. एकामागून एक लेख नि फेसबुक पोस्ट्समधून अशा 'दगड' वा 'असंवेदनशील' प्रेक्षकांवर लेखकुंनी कोरडे ओढायला सुरुवात केली. माझा बुवा, माझा नेता, माझी जीवनपद्धती, माझी आवडनिवड्च काय ती 'बरोबर' नि त्याच्याशी न जुळणारे ते सारे 'चूक', नव्हे त्याज्य अशी भारतीय मानसिकता पुन्हा एकदा दिसून येऊ लागली.

Court

अशा गदारोळात मी ही कोर्ट पाहिला. स्पष्ट सांगायचं, तर सामान्य प्रेक्षकाला तो न आवडणे अगदी साहजिक आहे असेच माझे मत झाले. तसे मी माझ्या एकदोन मित्रांशी बोललोही. पण असा एखादा नवा प्रयोग लोकांना निदान पाहू दे, आताच नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नको असा एकुण सूर दिसला नि तो मला मान्य झाला. परंतु ज्या वेगाने चित्रपट न आवडणार्‍यांबद्दल विविध माध्यमांतून गरळ ओकले जात आहे, ते पाहता मी माझा नियम बदलून यावर बोलावे असे ठरवले आहे. मी स्वतः मराठी चित्रपटाचा प्रवाह भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सशक्त प्रवाह आहे असे मानणारा आहे. (हसू नका! बरं 'बर्‍यापैकी प्रयोगशील प्रवाह' म्हणतो, ठीक आहे?) किंबहुना समीक्षकांचे पूर्वग्रह मराठी चित्रपटाला मारक ठरताहेत असेच माझे मत झाले आहे. एका बाजूने मराठी चित्रपटाची टर उडवणारेही केवळ आता तो पाश्चात्त्य चित्रपटाच्या मापदंडानुसार बनवला गेल्याने त्याचा उदोउदो करत आहेत. दुसरीकडे केवळ सामाजिक हिताचा विषय (?) असल्याने चित्रपट आवडायलाच हवा असा आग्रह असणारे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक आहेत.

खरंतर चित्रपटाची गोष्ट वेगळी नि चित्रपट वेगळा असे अनेक तज्ज्ञ सांगत आले आहेतच. मी तर म्हणतो विषय, कथा, पटकथा नि शेवटी चित्रपट असे चार टप्पे पाहू शकतो.

विषय संवेदनशील आहे म्हणजे चित्रपट संवेदनशील आहे हे गणित अनाकलनीय आहे. अनेक उत्तम विषयांची चित्रपटातूनच काय, कथांमधून, कादंबरींतून वाट लावलेली आपण पाहिली आहे. तेव्हा केवळ विषयनिवडीवरूनच चित्रपटाला संवेदनशील असल्याचे सर्टिफिकेट देणे बरोबर नाही असे मला वाटते. तेव्हा चित्रपट आवडला नाही म्हणजे तुम्ही असंवेदनशील, दगड, उथळ वगैरे शेरेबाजी करणे हेच मुळी उथळपणाचे लक्षण आहे असे मी मानतो. तिसरा गट आहे तो मुख्यतः बोटचेप्या माणसांचा. चित्रपट न आवडला तर आपल्याला प्रतिगामी, असंवेदनशील, बामणी व्यवस्थेचा समर्थक वगैरे शिव्या खाव्या लागतील या भीतीने आवडल्याचे जाहीर करणारा. अलिकडच्या काही प्रतिक्रिया पाहता ही भीती साधार असल्याचे मला दिसून येते आहे.

या सार्‍या पलिकडे, चित्रपट न आवडणारे किंवा माझ्यासारखे 'ठीक ठाक आहे' असे मत झालेले काही लोक आहेत. माध्यमांतून चित्रपटाचा उदोउदो करण्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही, पण ते करत असताना तो न आवडलेल्यांच्या पेकाटात लाथा घालणे अगोचरपणाचे आहे हे माझे मत. म्हणूनच मी इथे डेविल्स अडवोकेट म्हणून लिहितो आहे. 'कोर्ट'बाबत मी कोणतेही नकारात्मक वा सकारात्मक मत इथे देत नाही याची कृपया नोंद घ्यावी! तेव्हा ज्यांच्यामुळे मी ही नोट लिहायला प्रवृत्त झालो त्या एकांगी प्रवृत्तींनी इथे येऊन माझी सालं काढण्यापूर्वी कणभर विचार करून हे वाचावे ही (फलद्रूप होईल याची शक्यता कमी असूनही) विनंती.

एखादा चित्रपट कुणाला आवडावा वा आवडू नये हे चित्रपटाची नि त्या व्यक्तीची तार जुळण्यावरसुद्धा अवलंबून असते, ते बहुधा वस्तुनिष्ठ निकषांवर ठरतच नाही. तसं असेल, तर मग आपल्या विरुद्ध मत झालेल्याच्या कुवतीवर शेरेबाजी करणे हे कितपत योग्य आहे? 'कोर्ट'बाबत गेले दोन वा तीन दिवस शेरेबाजी चालू आहे नि 'एखाद्या भव्योदात्त(?) चित्रपटाबद्दल क्षुद्र लोक नापसंती व्यक्त करताहेत' असे निवाडे देण्याची अहमहमिका चालू आहे. ती भलतीच एलिटिस्ट वगैरे आहे असे आमचे स्पष्ट मत झाले आहे. एखाद्या प्रेक्षकाला चांगला चित्रपट आवडला नाही असे तुम्हाला दिसले तर त्याचे दुर्दैव म्हणावे नि चूप बसावे, फार जवळचा मित्र असेल, तर आपल्याला त्यात काय चांगले दिसले ते सांगून कदाचित त्याला दिसले नसेल तर दाखवण्याचा, अधोरेखित करण्याचा प्रयत्न करावा हे ही ठीक. पण त्याची कुवतच काढायचे काय कारण? (अर्थात हे राजकारणापासून समाजकारणापर्यंत सार्‍यालाच लागू पडते म्हणा.)

'फँड्री' हा चित्रपट मला अतिशय आवडला होता नि त्यावेळी 'टाईमपास'च्या अपेक्षेने आलेल्या लोकांचा मलाही राग आलेला होता नि तो मी व्यक्तही केला. पण राग आला तो माझ्या चित्रपट पाहण्यात अडथळा निर्माण केला म्हणून! ('कोर्ट' पाहताना ज्यांना असा 'शेजार' भेटला त्यांचा वैताग नि त्रागा न्याय्यच आहे.) एरवी त्यांनी 'फँड्री'मधे 'शोले' पाहण्याचा प्रयत्न केला नि सापडला नाही म्हणून फँड्री फालतू आहे असे जाहीर केले असते तर मी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याच्या कदाचित फंदातही पडलो नसतो. पण म्हणून 'ज्यांना कळत नाही त्यांची मरायला इथे यावेच कशाला.', 'आता कुठे मराठी सिनेमा जरा चांगले काही देतोय तर आले हे पाणी ओतायला' वगैरे 'होलिअर दॅन दाऊ' गमजा कशाला? मला वाटतं ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही, त्यांतही अनेकांना हा विषय नक्कीच भावणारा असणार आहे. किंबहुना न आवडण्याचे एक कारण 'अपेक्षाभंग' हे असणार आहे. चित्रपटाला कथेव्यतिरिक्त अनेक अनुषंगे असतात, त्यातली काही पटतात नि काही पटत नाहीत हे सयुक्तिक आहेच. एकत्रितरित्या 'चांगले' किंवा 'वाईट' या दोनच प्रतिसादात सारे काही आले पाहिजे असे नाही.

तज्ज्ञांनी कितीही कोर्‍या मनाने पहा वगैरे म्हटले, तरी प्रेक्षक काही अपेक्षा घेऊनच चित्रपटगृहात जातो हे उघड आहे. खुद्द ते तज्ज्ञदेखील पूर्वग्रहांशिवाय, गृहित चौकटींशिवाय चित्रपटाकडे बघतात याची खात्री ते स्वतः देऊ शकतील का असा प्रश्नही या निमित्ताने विचारू शकतो. ’बालगंधर्व’ चित्रपटात त्यांच्या काळी अस्तित्वातच नसलेली अमुक प्रकारची साडी चित्रपटात कशी असा आक्षेप घेणारा समीक्षक, ’हायवे’ सारख्या काळाच्या तुकड्यावर चाललेल्या कथानकातील वेळेच्या गणिताची ऐशीतैशी मात्र ’असं फुटकळ मुद्द्यांवर चित्रपटाचे मूल्यमापन करायचे नसते' म्हणून झटकून टाकतो. यात पूर्वग्रह वा हितसंबंधांचे गणित सांभाळण्याची शक्यताच मला अधिक दिसते.

एका जमिनीच्या तुकड्यावर वसलेला, एका भाषेत संवाद करणारा, नि एकच सांस्कृतिक वारसा बर्‍याच अंशी पाळणारा समाज, त्यांना अनुसरुन अपेक्षांचे चित्र घेऊन येतो हे अपरिहार्य आहे. एखादा चित्रपट माझ्या अपेक्षेहून सर्वस्वी वेगळे काही घेऊन येत असेल, तर ते ग्रहण करण्यास आवश्यक मानसिक जडणघडण माझी नसेल, तर एका चित्रपटासाठी ती अचानक उगवून यावी ही अपेक्षा कितपत योग्य आहे? 'कोर्ट'मधील बहुसंख्य पात्रे जसे कोर्टाबाहेर सामान्य चाकोरीबद्ध जीवन जगतात तसेच प्रेक्षकही जगतो ना, तो ही त्याच समाजाचा भाग आहे ना? मग त्याने चित्रपटांकडे दिग्दर्शकाला वा तज्ज्ञांना अपेक्षित दृष्टिकोनातून पाहिले नाही, त्यामुळे त्याला तो आवडला नाही तर त्याला असंवेदनशील, दगड म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे म्हणणार्‍यांची संवेदनशीलता कलेच्या बाहेर, प्रत्यक्ष आयुष्यात कशी उमटते हे ऐकायला मला आवडेल.

आता अपेक्षा म्हटलं तर कोणत्या असा प्रश्न येईलच. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोमोज वा प्रसारणपूर्व जाहिरातींचे तंत्र आपण स्वीकारले हे खरे, पण ते कितपत परिणामकारक होते आहे याचा अभ्यास कधी केला गेला आहे का? मीडिया मॅनेजमेंटचे पुस्तकी शिक्षण घेऊन प्रोमोज बनवणारे चित्रपटाबद्दल दिशाभूल करणारे प्रोमोज बनवत नाहीत ना असा प्रश्न निर्माता/ दिग्दर्शकाला पडत नाही का? (की हे हेतुतः केले जाते?) तो चित्रपटाच्या कथानकाची सुरुवातच, अथवा उपोद्घातच तेवढा समोर ठेवतो. उदा. ’गण्या सरकारी कचेरीत कारकून आहे. एकदा त्याची आयुष्यात एक घटना घडते नि त्याचं आयुष्य बदलून जाते.’ आता ही शिंची घटना कुठली, त्याने बदल होतात ते कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक (अपघात?), रोजगार... नक्की कुठले. या सिनॉप्सिस मधून काय डोंबल समजतं, की ज्यावरुन मला चित्रपटाचा अंदाज बांधून तो पाहावा की नाही हे ठरवता येईल? आणि ते अपेक्षित नसेल तर त्या सिनॉप्सिसचा नक्की उपयोग काय? (आमचे एक -एकाच नाटकाचे - लेखक स्वत:च्याच नाटकाची जाहिरात ’हे नाटक छान आहे’ असे फेसबुकवर करत. असल्या सिनॉप्सिसपेक्षा ते बरे म्हणायचे मग. :) )

'टाईमपास'शी नातं सांगणारा फँड्रीचा प्रोमो पाहून आलेल्यांना त्या प्रोमोतले गाणेच नसलेला आणि पौगंडावस्थेतील प्रेमकथा नसलेला चित्रपट पहावा लागतो, तेव्हा प्रोमो पाहून तशी अपेक्षा ठेवून आलेल्यांची नाराजी न्याय्य नाही का? किंबहुना यामुळे फँड्रीचा अपेक्षित सुरुवातीचे दिवस चित्रपटगृहाबाहेर राहिला का? असाच प्रश्न 'कोर्ट'बद्दल विचारायला हवा.

प्रोमोमधे असलेला पोवाडा, त्यानंतर कोर्टातला सीन पाहून हा चित्रपट वीरश्रीपूर्ण, संघर्ष चित्रित करणारा असेल अशी अपेक्षा काही प्रेक्षकांची झाली असेल तर ती अस्थानी म्हणता येईल का? त्या ऐवजी एक संथ लयीतला, कोणतीही घटना, कथा नसलेला केवळ स्थिर असा चित्रपट पहायला मिळाल्यावर त्याची निराशा होणे स्वाभाविक नाही का? चित्रपटाच्या प्रोमोमधे एक जोरकस पोवाडा पाहून नारायण कांबळेच्या संघर्षाची गोष्ट असलेला चित्रपट पहायला मिळणार असा समज करून घेऊन बरेचसे प्रेक्षक आले असणार हे उघड आहे. इथे पाहतो तो पहिला पोवाडा वगळता आम्हाला दिसतो तो निव्वळ परिस्थितीशरण असा नारायण कांबळे. त्याचा संघर्ष कुठेच नाही. प्रेक्षकांनी अमुक एक अपेक्षा ठेवून येऊ नये हा माझेही मत आहेच. परंतु तसे असतानाही त्या असतात हे ही खरेच. (कदाचित अति गवगवा झाल्याने माझ्याही अपेक्षा नको इतक्या वाढल्या नि त्या पुर्‍या झाल्या नाहीत असेही असेल.)

बरं तो प्रोमोमधे असलेला पोवाडा देखील चित्रपटात आम्हाला पुरा पाहू दिला नाही. दोन कडव्यांचा पोवाडा कधी ऐकलाय का हो तुम्ही? अगदी भजनातही दोन चार कडवी असतात हो. दुसर्‍या प्रसंगात पोवाडा नि 'वाट बघतोय रिक्शावाला' या दोन सादरीकरणाला प्रेक्षकांचा प्रतिसाद दाखवत असतानाही तो पोवाडा (की गाणेच?) एकाच कडव्यात आटपले आहे. तसे असेल तर पोवाडा हे चित्रपटाचे केवळ निमित्तकारण किंवा बीजकारण असेल तर प्रोमोमधे त्याला एवढे महत्त्व का बरं? किंबहुना या निमित्ताने प्रोमो तयार करणार्‍या पुस्तकी इवेंट मॅनेजर्सना किमान एका फिल्म अप्रिसिएशन कोर्सची सक्ती करावी का असा एक विचार मनाला चाटून गेला. चित्रपटांचा सिनॉप्सिसदेखील असाच चित्रपटाशी अनेकदा केवळ एखाद्या प्रसंगापुरता संबंध राखून असतो असे दिसते. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल चुकीच्या अपेक्षा रुजवल्याबद्दल असे दिशाभूल करणारे प्रोमो किंवा सिनॉप्सिस देणार्‍यांना जबाबदार का धरले जाऊ नये?

मराठी प्रेक्षकाला नुकतेच कुठे मराठी चित्रपटातून तांत्रिक बाजू कुठे कुठे दिसू लागल्या होत्या, समजू लागल्या होत्या. 'कोर्ट'मधे स्थिर राहिलेला नि वट्ट तीन वेळा हललेला कॅमेरा अशा नवसाक्षर प्रेक्षकांना बुचकळ्यात पाडून गेला. आम्हाला सांगण्यात आले की 'अहो तो कॅमेरा तुमच्या आमच्या वृत्तीचे प्रतीक आहे'. तो एकाच दिशेने नि कोणतीही हालचाल प्रतिक्रिया न दाखवता समोर चाललेले पाहतो आहे. आम्ही म्हणालो, 'वा:, हे समजले आम्हाला'. पण मग त्या वकीलीणबाई कोर्टाच्या दारातून बाहेर पडतात, नि बारा तेरा पावले फुटपाथवरून चालत जातात' त्या प्रसंगात स्थिर कॅमेर्‍याचा नियम मोडून त्यांचा पाठ्लाग करण्याजोगे काय महत्त्वाचे होते? याउलट जोरकस असा पोवाडा चालू असताना कॅमेरा ट्रॉलीशूट तर सोडाच झूमही वापरताना दिसत नाही. जर चित्रपटाचे बीजकारण असलेला पोवाडा इतका महत्त्वाचा की थेट तो प्रोमोमधे आला आहे तर त्याच्या सादरीकरणात ठळकपणा का नसावा ? त्याचा 'वेध' कॅमेर्‍याने अधिक कल्पकतेने घ्यावा ही अपेक्षा चूक आहे का. आता सुरु झाला म्हणे तो आता संपलाही असा चटावरचे श्राद्ध घातल्यासारखा का उरकला आहे तो? आता म्हणतील की अहो ते महत्त्वाचे नाहीच, महत्त्वाचे आहे तो त्याने घडवलेला परिणाम. हे ही मान्य. पण तो पोवाडा कथेत नक्की किती महत्त्वाचा याचा गोंधळ यातून निस्तरला जात नाहीच.

बरं तो मख्ख कॅमेरा हे 'नियमानुसार काम' तंत्र आहे हे जर खरे असेल तर त्याचा परिणामही अपेक्षित होतो की नाही हे पहायला नको का? ते तपासताना आपला संभाव्य प्रेक्षक त्याकडे कोणत्या नजरेने पाहू शकेल याचा विचार करावा लागतो हे पटते का? निव्वळ नि-सा-ग-म-ध-नि-सा*' म्हणजे मालकंस होतो का? गाणार्‍याने त्यात गाळलेल्या जागा भरून - इंग्रजीत म्हणतात तसे फ्लेश अँड बोन्स भरुन - त्याला आकार द्यावा लागतो ना? आम्हा मराठी माणसांच्या चित्रपटीय जाणीवा आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार नाहीत, त्या तशा असाव्यात असा आग्रहदेखील आम्ही फेटाळून लावणार आहोत. त्याबद्दल आम्हाला असंवेदनशील वगैरे म्हणणे हे जजमेंटल होणे आहे. संवेदनशीलता हा मानवी गुण आहे, दोन वस्तूंमधले अंतर नव्हे की ते एक आणि एकच एककाच्या सहाय्याने चोख मोजता यावे. स्थिर कॅमेरा हा नियम आहे म्हणून प्रेक्षकाच्या प्रतिक्रियेची पर्वा न करता आम्ही तो तसा वापरणार असू तर प्रेक्षकाची प्रतिक्रिया अनुकूल न येण्याची शक्यता गृहित धरावीच लागते. ती तशी देणारा मूर्ख नसतो, जसे त्या नियमानुसार शूट करणाराही मूर्ख नसतो. दोघांचे प्राधान्य वेगवेगळ्या गोष्टींना असते इतकेच. तेव्हा कुणी कुणाला मठ्ठ वा दगड म्हणण्याची गरज नाही हे ध्यानात घेतले तरी पुरे.

त्यातच चित्रपटाचा संथ वेग हा ही कंटाळवाणा होत जाणारा. मला वाटते ज्यांना हा चित्रपट आवडला नाही त्याचे हे मुख्य कारण आहे. मूळ पटकथेचा विचार करता तो अपरिहार्य परिणाम आहे असे तंत्राचे अभ्यासक सांगतात. ठीक आहे. पण मुद्दा आता असा की मुळात आमचा प्रेक्षक मेलोड्रामाच्या अपेक्षा कमी करून थोड्या सटल्टीज समजून घेऊ पाहतो आहे. अशा वेळी मेलोड्रामाच काय ड्रामाही नसलेला विषय घेऊन उभा असलेला चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गळी उतरवणे अवघड असणार हे दिग्दर्शकाला ठाऊक असायला हवे, नव्हे असणार आहे याची मला खात्री आहे. मग अशा वेळी प्रेक्षकाला चित्रपटाशी गुंतवून घेण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार दिग्दर्शकाने करायला हवा, तो मात्र केलेला आहे असे दिसत नाही.

आपण आपला चित्रपट ज्या बाजारात विक्रीला ठेवत आहोत तिथला ग्राहक समजूनच तो तयार करायला हवा. इंग्लंडच्या ग्राहकांसाठी बनवलेला केक ढेबेवाडी बु. मध्ये विकला गेला नाही तर गळा काढण्यात अर्थ नसतो. बाजार निश्चित करुनच उत्पादन बनवायचे असते. पाश्चात्त्य चित्रपटाचे मापदंड वापरून तंत्राचा हुबेहूब पुस्तकी वापर करून चित्रपट बनवला तर तो पाश्चात्य अभिरुचीला पटेल कदाचित, पण वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या, चित्रपटाबाबत वेगळ्या (तज्ज्ञांनी खालच्या पायरीवर असे समजायला हरकत नाही.) पातळीवर असलेल्या प्रेक्षकांची निराशा होत असेल, तर ते त्यांच्या कमअस्सल अभिरुचीचे प्रतीक आहे असा आरोप करायचे कारण नाही. एक प्रयोग म्हणून पहा हे म्हणणे ठीक आहे, पण आवडूनही घेतलाच पाहिजे अन्यथा चित्रपटाची नावड म्हणजे विषयाची नावड, नि विषयाची नावड म्हणजे तुम्ही असंवेदनशील असल्याचे मान्य करा, असले भलते त्रैराशिक मांडायची काय गरज आहे?

अनेकांशी झालेल्या चर्चेत मी पुन्हा पुन्हा हे स्पष्ट करत आलो आहे की मी चित्रपटाबद्दल बोलतो आहे, विषय वा कथेबद्दल नाही! तरीही 'मला आवडलेल्या चित्रपटाबद्दल कुणी वाईट बोलूच कसं शकतं' या आवेशात त्यांच्या ते लक्षात येतच नाही. पुन्हा पुन्हा मला त्या विषयाबद्दलच तर्क दिले जात आहेत. चित्रपटाची गोष्ट मला आवडली आहे, पटली आहे नि माझ्या विचाराशी सुसंगत आहेच. तसे मी पुन्हा पुन्हा सांगितले आहेच. थोडक्यात सांगायचे तर रागसंगीतात कुण्या वाग्गेयकाराने बांधलेली एखादी बंदिश असते ती अनेकांनी सुरेख गायलेली असल्याने प्रसिद्ध झालेली असते. पण एखादा गायक किंवा पूर्वी ती उत्तम गायलेलाच गायक एखाद्या कार्यक्रमात ती सुमार गातो. तेव्हा त्या कार्यक्रमाला वाईट म्हणणे म्हणजे बंदिशीला नावे ठेवणे नसते एवढी समज आपल्याला असायला हवी. तेव्हा माझे सारे मुद्दे सादरीकरणाबद्दल आहेत, कथा, पटकथा, विषय किंवा आशय याबद्दल नाहीत हे पुन्हा एकदा, पुन्हा पुन्हा एकदा, पुन्हा पुन्हा पुन्हा एकदा ठसवतो आहे.

जाता जाता: 'कोर्ट'ने एक मात्र साध्य केले हे मान्य करावयास प्रत्यवाय नसावा. प्रथम संगीत नाटक, मग शास्त्रीय संगीत, मग ग़ज़ल आणि शेवटी जागतिक सिनेमा हे समाजातील एलिटिस्ट लोकांनी प्रथम आक्रमक विरोध करत, मग नाके मुरडत नि शेवटी अंगीकारत, गौरवत जोपासलेले छंद आहेत. दुसरीकडे यांना नाके मुरडणारे, सामाजिक विषयांबाबत अगदी फॅनटिक असणारे, पण स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे असे लोक आहेत. भिन्न कारणांसाठी हे दोनही गट 'कोर्ट'ची स्तुती करताना आणि तो न आवडणार्‍यांवर शरसंधान करणार्‍यांना लाखोली वाहताना एकाच बाजूला आलेले दिसताहेत. सामाजिक अभिसरणाचे हे अंग 'कोर्ट'ने दाखवले याचे श्रेय मात्र कोर्टला नि:संशय दिले पाहिजे. 😊

- oOo -


हे वाचले का?

अजा पुत्रो बलिं दद्यात्

२०१४ मध्ये अजस्र पुतळे उभारण्याची अहमहमिका चालू झाली. पुढे एकदोन वर्षांनी एका चर्चेदरम्यान एका पुतळ्यावर केलेल्या खर्चात जनहिताची काय काय कामे करता येतील याबाबत विश्लेषण करत असताना एका पुतळासमर्थकाने ’आम्ही हे ही करु नि ते ही करु.’ असा दावा केला होता. पण सरकारी मालकीच्या कंपन्या विकून सरकारला पैसा उभा करावा लागत असताना हे जास्तीचे पैसे आणणार कुठून या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते.

काही महिन्यांपूर्वी एका कॉम्रेडशी झालेल्या चर्चेदरम्यान कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये ’सर्वांना हवे ते करता येईल, हवे ते मिळेल’ या दाव्यावर ’पुरवठा पुरेसा असेल तर हे शक्य आहे. तो अपुरा असला की प्राधान्यक्रम लावून काहींना नाराज करावेच लागेल.’असा आक्षेप नोंदवला होता. त्यावरचे अप्रत्यक्ष उत्तर ’माणसे फार गरजा वाढवून ठेवतात, त्या मर्यादित ठेवल्या की पुरवठा नेहमीच पुरेसा राहील’ असे होते. थोडक्यात पुरवठ्यानुसार गरजाच कमी करुन घेतल्या की पुरवठा पुरेसा होणारच असा उलट उपाय पुढे ठेवला गेला.

याच्या नेमके उलट भांडवलशाहीच्या मॉडेलमध्ये समाजाच्या वरच्या स्तरातील काही जणांनी भरपूर उपभोग घेतला, भरपूर खरेदी करत मागणी वाढवली, की उत्पादनाचा व्हॉल्युम वाढतो आणि त्यातून प्रति-उत्पादनवस्तू खर्च कमी झाल्याने ते उत्पादन खालच्या उत्पन्न गटाला परवडण्याजोग्या किंमतीत उपलब्ध होते. थोडक्यात समाजातील एका हिश्शाने आपल्या गरजा अवाढव्य वाढवल्याचा परिणाम म्हणून इतरांना आपल्या गरजा भागवणे अथवा विस्तारणे शक्य होत जाते. पण याचा परिणाम म्हणून पुन्हा समाजातील एक लहान गट उत्पादनांच्या उपभोगाचा मोठा हिस्सा राखून असतो. त्याचबरोबर, एखाद्या उत्पादनाच्या किंमती कमी होतात तसतसे त्याच्या ग्राहकांबरोबरच ’संभाव्य ग्राहकां’ची संख्याही वाढत असते. उच्च-मध्यमवर्ग जेव्हा सहजपणे आयफोन खरेदी करु लागतो तेव्हा निम्न-मध्यवर्गीयांमध्ये त्या ’गरजे’ची जाणीव तयार होत असते आणि त्यातून असमाधानी वर्गही सातत्याने तयार होतच राहतो.

पण हे सारे आपल्या जाणिवेपासून, प्रत्यक्ष आयुष्यापासून बरेच दूर घडत असते. अर्थकारणाच्या अभ्यासकाशिवाय फारसे कुणाला ते जाणवत नसते की त्यांना त्याची फिकीर करायची गरज नसते. तात्विक मुद्द्यापेक्षा ’रोख रक्कम देऊन आयफोन खरेदी करावा की कर्जाचे हप्ते बांधून घेउन?’ या व्यावहारिक प्रश्नाला माणसे सामोरी जात असतात. त्याचा व्यापक समाजाच्या, अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काय अर्थ होतो, याबाबत ते पूर्णत: उदासीन असतात.

थोडक्यात सामान्य नागरिक असोत, जनकल्याणाचे मॉडेल देऊ करणारे डावे असोत की दाम हाच देव मानणारे असोत, गरज आणि पुरवठा यांच्या व्यस्त प्रमाणाचे गणित करण्याची, त्यांच्या संभाव्य परिणामांचा वेध घेण्याची (त्याचा फायदा उठवण्याचा हेतू वगळता) तसदी त्यांच्यापैकी कुणीही घेत नसते. क्यूबासारखा लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यसेवेचे जाळे उभे करणारा देश हा अपवाद समजायचा.

मर्यादित पुरवठा आणि अधिक ग्राहक अशी स्थिती जेव्हा विशिष्ट वस्तूच्या टंचाईच्या काळात उद्भवते तेव्हा कदाचित याची थोडी जाणीव त्यांना होत असते. पण चाळीस रुपये किलोचा कांदा शंभर रुपये होऊनही ज्यांना तो सहज नाही तरी खरेदी करणे शक्य होते त्यांची जाणीव केवळ तात्कालिक होऊन राहतो. पुरवठ्याचे नियोजन हा प्रश्न किती महत्वाचा आहे याची खरी जाणीव तेव्हाच होते, जेव्हा ती आवश्यक वस्तू वा उत्पादन अस्तित्वाच्या मूलाधाराला स्पर्श करणारी असते.

एक-दोन वर्षांपूर्वी ’द हंड्रेड’ नावाची एक मालिका पाहण्यात आली. माणसाच्या युद्धखोरीमुळे पृथ्वी जीवनानुकूल राहिलेली नाही. एक किमान गरजांच्या उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण असे एक अंतराळयान सुमारे दोन हजार माणसांसह प्रवास करते आहे. पृथ्वी माणसाच्या वस्तीयोग्य होण्यात अजून वर्षभराचा कालावधी आहे. अशा वेळी अचानक अंतराळयानाच्या प्राणवायू उत्पादक यंत्रणेत बिघाड होतो आणि उरलेल्या उत्पादन यंत्रणेच्या आधारे वर्षभर जिवंत राहण्याइतका प्राणवायू निर्माण करणे शक्य नाही असे दिसू लागते. जेमतेम निम्म्या लोकसंख्येलाच उपलब्ध प्राणवायू पुरेल अशी स्थिती असल्याने त्यातील प्रशासनाला निम्मी लोकसंख्या ’कमी करण्याचा’ निर्णय घ्यावा लागतो. त्यापूर्वीही लोकसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी प्रत्येक तरुण जोडप्याला केवळ एक मूल जन्माला घालण्याची परवानगी प्रशासनातर्फे देण्यात आलेली असते. आणि त्याची ’कडक अंमलबजावणी’ करण्यात येत असते.

आणिबाणीच्या प्रसंगी व्यापक सामाजिक हितासाठी माणसाचा जिवंत राहण्याचा मूलभूत वैयक्तिक हक्कही व्यवस्था हिरावून घेऊ शकते. तो त्या व्यक्तीवर अन्याय असला, तरी व्यापक सामाजिक हिताचा निर्णय असतो. तो कितीही कटू असला तर व्यवस्थेच्या संचालकाला तो घ्यावा लागतो, त्याचे पाप शिरी वाहावे लागते. (अनेक हुकूमशहा याच तर्काचा वापर करुन घेतात हा मुद्दा अलाहिदा. त्यासाठी ते नसलेली आणिबाणीची परिस्थिती वा तिचा आभास निर्माण करतात.) केवळ साहित्य वा चित्रपटातच अशी परिस्थिती उद्भवत नाही, वास्तवातही तिचा सामना करावा लागतो असे जर म्हटले तर आज बहुतेकांना ते पटणार नाही. परंतु आपल्या दुर्दैवाने अशी स्थिती उद्भवली आहे आणि गेल्या दोनशे वर्षांत वेगाने प्रगती केलेल्या माणसाच्या आयुष्यातील कदाचित सर्वात दाहक आणिबाणीची वेळ येऊन ठेपली असल्याचे ते निदर्शक आहे.

इटलीमध्ये कोरोनाची लागण नि प्रसार इतक्या वेगाने झाली की रुग्णालयांची रुग्ण सामावून घेण्याची क्षमता, व्हेंटिलेटर्स आणि डॉक्टर्सची संख्या यांच्या कुवतीच्या कैकपट वेगाने रुग्णसंख्या वाढत गेली. अखेर प्रशासनाने रुग्णांपैकी गंभीर रुग्णांना वैयक्तिक विलगीकरणाच्या, अर्थात किमान उपचार आणि नशीबाच्या भरवशावर सोडून, केवळ बरे होण्याची क्षमता अधिक असलेल्या, एरवी धडधाकट असलेल्या रुग्णांना प्राधान्य देण्याचा तोंडी आदेश दिला असे म्हटले जाते. यातून प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींकडे दुर्लक्ष झाल्याने मृत्यू झालेल्यांमध्ये त्यांची संख्या ८०-९०% पर्यंत आहे असा अंदाज आहे. स्वीडनसारख्या अतिशय कमी लोकसंख्येच्या देशांतही अशा व्यापक पसरलेल्या आजाराच्या तुलनेत आरोग्य कर्मचार्‍यांची अपुरी संख्या पाहता, केवळ लागण झालेले नव्हे, तर त्यापुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष आजार झालेल्यांनाच उपचार देण्यात आले. इतरांना सरळ ’स्वत:ची काळजी घेण्यास’ सांगण्यात आले.

या दोन राष्ट्रांपाठोपाठ आता भांडवलशाहीचे प्रतीक असलेल्या अमेरिकेचा नंबर लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. ’सीएनएन’वर १ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या ’Trump's alarming message portends tragic days ahead’ या आर्टिकलमध्ये स्टीफन कॉलिसन यांनी असे म्हटले आहे, "State governors pleaded with the federal government for more ventilators, and doctors prepared to make grim decisions about who will live and die amid a shortage of the machines."

न्यूयॉर्क पोस्ट’च्या २७ तारखेच्या बातमीनुसार न्यूयॉर्क या सर्वाधिक बाधित राज्यात सरासरी दर सतरा मिनिटाला एक मृत्यू नोंदवला जात होता. डेली मेलच्या वृत्तानुसार ३० मार्च या दिवशी सकाळी १०:३० ते दुपारी ४:३० या सहा तासात सरासरी २.९ मिनिटाला एक या वेगाने मृत्यूंची नोंद वाढत होती. या एकाच दिवसांत तिथे १३८ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही सरासरी तासाला साधारण सहा किंवा दहा मिनिटाला एक मृत्यू अशी दिसते आहे. २ एप्रिल रोजी यात जवळजवळ ९ हजार केसेसची भर पडली तर तीनशेहून अधिक मृत्यू नोंदवले गेले. दुसर्‍या दिवशी, म्हणजे ३ एप्रिल रोजी ही संख्या अनुक्रमे ९८०० आणि जवळजवळ चारशे इतकी आहे. थोडक्यात सरासरी नऊ मिनिटाला एका मृत्यूची नोंद होते आहे. सुदैवाने अन्य राज्यांतून परिस्थिती अजून तरी इतकी भीषण नाही. तरीही संपूर्ण अमेरिकेत आजवर साडेसहा हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

DonaldTrump

इतके दिवस लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून कुरकुरत असलेले, आणि शक्य तितक्या लवकर ते रद्द करावे असा तगादा लावणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखणारा सूर लावला आहे. एका अंदाजानुसार पुढील दोन आठवड्यात अमेरिकेतील मृतांची संख्या तब्बल एक ते अडीच लाख इतकी असेल असे सांगितले जात आहे. रुग्णसंख्येचा अंदाज तर कैकपट अधिक आहे. इतक्या रुग्णांना सामावून घेण्याइतपत अमेरिकेची आरोग्यव्यवस्था सक्षम नाही. आणि आहे ती प्रामुख्याने खासगी आहे, जी अर्थातच चोख दाम वसूल करणारी आहे. हा अंदाज आधुनिक माणसाच्या जगण्यातील सर्वात भयानक शक्यतेचे सूतोवाच आहे. मागील आठवड्याच्या शेवटी ट्रम्प यांच्या सल्लागारांनी ही गंभीर परिस्थिती अखेर ट्रम्प यांच्या गळी उतरवली आहे.

एक दोन दिवसांपूर्वी एका अमेरिकास्थित भारतीयाशी बोलणे झाले. लागण झाल्याचे दिसून आल्यास सक्तीचा जो उपचार घ्यावा लागेल त्याचा खर्च दहा हजार ते दीड लाख डॉलर्स इतका आहे. इतका उपचारखर्च सहजपणे पेलण्याची तेथील सामान्यांची ताकद नाही. त्यामुळे सुरुवातीच्या दोन आठवड्यात लक्षणे दिसूनही लोकांनी टेस्ट करुन घेण्याचे टाळले. हा साधा फ्लू असावा, अशी प्रार्थना ते करत राहिले. आता ज्या वेगाने टेस्ट होत आहेत आणि रुग्णांची भर पडत आहे ते पाहता खासगी आरोग्य केंद्रांना नफ्यासाठी नाही, तरी दाराशी येणारी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आपल्या सेवेची किंमत अनेक पट वाढवणे भाग पडणार आहे. यातून ’अजापुत्रो बलिं दद्द्यात’ या अमेरिकेच्या लाडक्या सिद्धांताचे पुन्हा एकवार आचरण करण्यात येणार आहे.

उपचारांच्या खर्चाच्या तरतुदीसाठी गरीबांकडून आपण लुटले जाऊ, या भीतीने सधन अमेरिकन मंडळींनी बंदुका खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत. आपल्याकडे ’कैलास जीवन’ किंवा ’कायम चूर्ण’ हे जसे हर मर्ज की दवा असते तशी अमेरिकेत बंदूक! शाळांतून, मॉल्समधून, विदयापीठांतून, रेल्वे स्थानकांतून माथेफिरु गोळीबारांत ठार झालेल्यांच्या प्रचंड संख्येकडे पाहूनही बंदुकीच्या हक्कासाठी लढणार्‍या, पण आरोग्याच्या मूलभूत हक्काबाबत उदासीन असलेल्या अमेरिकन्सना कोरोनाच्या दणक्याने का होईना शहाणपण येईल का, त्यांच्या प्राधान्यक्रमात बदल होईल का? की ’गरीबांना मरु द्यावे, त्याला आमचा इलाज नाही’ म्हणणारे त्यांचे कट्टर भांडवलशाहीचेच तत्वच पुन्हा अधोरेखित होईल हे मात्र काळच ठरवेल. कोणी जगावे, कोणाला मरु द्यावे या निर्णयासाठी वय हा निकष इटलीमध्ये परिणामकारक ठरला, अमेरिकेत अर्थबळ निर्णायक ठरेल.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशावर असा निर्णय घेण्याची पाळी येऊ नये या दृष्टीने निकराचे प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात आहे. कारण इथे लोकसंख्येच्या तुलनेत तुटपुंजी आरोग्यव्यवस्था तर आहेच. पण या जोडीला प्रचंड लोकसंख्या, विकेंद्रित लोकशाही, सामाजिक आणि आर्थिक दारिद्र्य, उपायांपेक्षा खापर फोडण्यात धन्यता मानणारे राजकीय नेतृत्व आणि जनता, असे अनेक घटक या निर्णयावर परिणाम करणार आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांत वेगाने वाढलेल्या रुग्णसंख्येकडे पाहता भारतही आता कम्युनिटी लेव्हल अर्थात अंतर्गत संसर्गाच्या टप्प्यात पोहोचलेला आहे असे दिसते आहे. एका अंदाजानुसार तब्बल ६०% भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते. एरवी दुर्धर आजार पण उपलब्ध असूनही न परवडणारे उपचार यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागणार्‍या व्यक्तींची उदाहरणे आपल्यासमोर येत नाहीत. जगण्याच्या एकुण धबडग्यात ती एका दुर्लक्षित कोपर्‍यात हरवून जातात. कोरोनामुळे रुग्णसंख्या एकाच वेळी समोर येत असल्याने, आणि बाधितांच्या माहितीचे संकलन केले जात असल्याने, कदाचित आज या रुग्णांच्या दारुण अवस्थेकडे लक्ष वेधले जाईल अशी आशा आहे. या निमित्ताने सक्षम सार्वजनिक आरोग्यव्यवस्था ही कोणत्याही देशाच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्याची बाब असायला हवी याची जाणीव भारतीय आणि अमेरिकन नेतृत्वाला होईल अशी आशा करु या.

१९ मार्चपासून आपल्या आजवर केंद्रीय नेतृत्वाने केलेली वाटचाल पाहता, त्यावर सुचवलेले ’उपाय’ पाहता असे कटू निर्णय घेण्याची वेळ येऊच नये अशी प्रार्थना करणे आणि स्वत:च स्वत:ची चोख काळजी घेणे इतकेच सामान्यांच्या हाती आहे.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: ’द वायर-मराठी’ : https://marathi.thewire.in/america-corona-virus-new-crisis )

संदर्भ:
१. Trump's alarming message portends tragic days ahead: https://edition.cnn.com/2020/03/31/politics/trump-coronavirus/index.html

२. FBI sees spike in gun sale background checks amid coronavirus pandemic: https://edition.cnn.com/2020/04/02/us/fbi-gun-sale-background-checks-coronavirus/index.html

३. Coronavirus killing people in New York City at rate of one every 17 minutes:
https://nypost.com/2020/03/27/another-84-people-killed-by-coronavirus-in-new-york-city/

४. https://www.dailymail.co.uk/news/article-8171033/Corpses-screened-cardboard-three-loaded-truck-90-minutes-Brooklyn.html

५. worldometers.info/coronavirus/country/us/


हे वाचले का?

रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग

नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार << मागील भाग
---

LiWenLiang

मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला.

या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांकडे पाठवला. त्याच्याकरवी तो वुहानमधील वैद्यकीय वर्तुळात फिरला आणि वुहान मध्यवर्ती रुग्णालयातील नेत्रविशारद असलेल्या ’डॉ. ली वेनलियांग’ यांच्यापर्यंत पोचला.

त्यात सार्सचा उल्लेख वाचून त्यांनी त्याकडे बारकाईने लक्ष देण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास त्यांनी आपल्या वैद्यकीय वर्गमित्रांच्या एका चॅट ग्रुपमध्ये ’वुहान सी-फूड मार्केट’मधून सार्सच्या सात जणांना सार्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे लिहिले. सोबत त्या पेशंट्सच्या सीटी-स्कॅन आणि टेस्ट रिपोर्ट्सही पोस्ट केले. तासाभरातच त्यांनी या सर्वाना ’कोरोनाव्हायरस’ गटातील विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु नेमका कोणता विषाणू (नव्यानेच सापडल्याने याला ’novel coronavirus’ असे पुढे म्हटले गेले) हे अद्याप समजलेले नसल्याची माहितीही दिली. त्याचबरोबर आपल्या या चॅटग्रुपमधील सर्वांनी आपली नि आपल्या कुटुंबियांची या विषाणूजन्य आजारापासून काळजी घेण्याचे आवाहनही केले/सुचवले.

चॅटमधील या संवादाच्या आधारे या गटाबाहेरही ही बातमी पसरली. ३ जानेवारीला सायबर सुरक्षा विभागाने याची दखल घेऊन ली यांना ताबडतोब चौकशीसाठी बोलावले. त्यांना चुकीची माहिती पसरवल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात आली आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही अशी लेखी हमी त्यांच्याकडून घेण्यात आली.

त्यासुमारास ली यांच्यासह सुमारे आठ 'अफवाखोरांना' वुहान पोलिसांनी ताकीद दिली होती. ली यांची पोलिसांनी केलेली चौकशी आणि केलेली कारवाई याबद्दल माहिती CCTV या शासनअंकित चॅनेलवरुन साग्रसंगीत दाखवण्यात आली. थोडक्यात चिनी समाजमाध्यमांनी ली यांची गोष्ट उगाळली ती एक ’अफवाखोर’ म्हणून.

४ फेब्रुवारीला चीनमधील सुप्रीम कोर्टाने या आठ जणांनी प्रसिद्ध केलेली माहिती सर्वस्वी चुकीची नसल्याचे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असल्याचे जाहीर केले. कोर्टाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत पोस्टमध्ये असे म्हटले होते की, ’सर्वांनी या ’अफवां’वर विश्वास ठेवून काळजी घ्यायला सुरुवात केली असती, मास्क वापरले असते, जंतुनाशक द्रावणांचा वापर सुरु केला असता आणि प्राणिजन्य खाद्यपदार्थांपासून दूर राहणे पसंत केले असते तर फार बरे झाले असते.’

पुढे ’कायझिन’ या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ली म्हणाले, ’वैद्यकीय अफवा पसरवल्याबद्दल माझ्या रुग्णालयाकडून माझ्यावर कडक कारवाई होईल अशी मला भीती वाटत होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पोस्टने मला दिलासा मिळाला आहे. माझ्या मते एखाद्या व्यवस्थेमध्ये एकाहुन अधिक, पर्यायी मते अस्तित्वात असणॆ हे त्या व्यवस्थेच्या निरोगीपणाचे लक्षण आहे. व्यवस्थेला जनतेने दिलेल्या अधिकाराचा अशा तर्‍हेने पर्यायांचे दमन करण्यासाठी केलेला वापर मला अजिबात मान्य नाही.’

८ जानेवारी रोजी एका मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान ली यांना कोविड-१९ विषाणूची लागण झाली. ली यांनी शस्त्रक्रिया केलेला हा रुग्ण वुहानमधील एका सीफूड घाऊक विक्रेत्याकडे स्टोअरकीपर म्हणून काम करत होतो. त्याच्यामार्फत या विषाणूचा ली यांना मिळाला. एरवी ली यांच्यासारख्या तरुणांमध्ये विषाणूची लक्षणे दिसण्यास सुमारे दोन आठवड्याचा कालावधी लागतो. पण दोनच दिवसांत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. बारा जानेवारी रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

या उपचारांदरम्यान ३१ जानेवारी रोजी त्यांनी आपला पोलिस चौकशीचा अनुभव आणि त्यांच्याकडून लिहून घेतलेल्या हमीपत्राची प्रत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. ही त्यांची पोस्ट प्रचंड प्रमाणात वाचली गेली आणि अनेक इतर माध्यमांतूनही फिरली. अशा तर्‍हेने एखाद्या धोक्याची पूर्वसूचना देणार्‍या वैद्यकीय तज्ज्ञांची मुस्कटदाबी करण्याच्या प्रशासनाच्या अशा प्रयत्नांबद्दल अनेकांनी जाहीर रोष व्यक्त केला.

२३ जानेवारी, म्हणजे ली यांनी धोक्याचा इशारा दिल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी वुहान प्रांतात लॉकडाऊन अर्थात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली. पण तोवर या नव्या कोरोनाव्हायरसने हुबेई प्रांतात पंचवीस जणांचा बळी घेतला होता आणि जवळजवळ आठशे जणांना त्याची बाधा झालेली होती. आज तीस मार्च रोजी जगभरात सुमारे सदतीस हजार लोकांना या विषाणूने आपल्या दाढेखाली चिरडले आहे, अजून सुमारे सात लाख लोक या धोक्याशी दोन हात करत आहेत. ली यांनी दिलेला धोक्याचा इशारा वुहान प्रशासनाने कानाआड केल्याची शिक्षा आज इतके लोक भोगत आहेत, आणखी अनेकांना भोगावी लागणार आहे.

६ फेब्रुवारी रोजी, म्हणजे सुमारे तीन आठवड्यांच्या संघर्षानंतर कोविड-१९ ने घेतलेल्या सहाशेहून अधिक मृतांच्या यादीत त्यांचेही नाव नोंदले गेले.

HomageToLi

ली यांच्या मृत्यूनंतर शासनाने आणि कम्युनिस्ट पार्टीने त्याला दिलेली ताकीद मागे घेऊन त्याच्या कुटुंबियांची माफी मागितली. पण ली यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये बराच रोष आणि संताप उसळला. #wewantfreedomofspeech हा या हॅशटॅगसह अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. तब्बल वीस लाख जणांनी आपले मत व्यक्त केले. हजारो जणांनी स्वतंत्रपणॆ पोस्ट लिहून यावर आपले म्हणणे मांडले... पण पाचच तासांत शासकीय नियामक यंत्रणांनी ते सारे पुसून टाकले!

अशा व्यापक साथीच्या शक्यतेबद्दल सावध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अई फेन यांनाही शासकीय आरोग्य यंत्रणेतील त्यांच्या वरिष्ठांकडून ताकीद मिळाल्याचा आरोप त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला. ही मुलाखत चीनच्या समाजमाध्यमांतून अनेक नागरिकांनी पोस्ट करावी आणि शासकीय नियंत्रकांनी ती उडवून टाकावी असा उंदरा-मांजराचा खेळ बरेच दिवस चालू राहिला. शासकीय यंत्रणांच्या संगणकीय नजरेस ती पडू नये म्हणून स्पेलिंग चुकवणे, पोस्ट ऐवजी तिचा फोटो चिकटवणॆ, जुन्या तारायंत्राच्या मोर्स कोडचा वापर करणे, प्रचलित आधुनिक लिपीऐवजी जुन्या लिपीचा वापर करणे, रोमन लिपीमधून लिहिणे अशा अनेक क्लृप्त्या लढवत सोशल माध्यमांतून या मुलाखतीचा दस्त ऐवज समाजमाध्यमांतून हजारो लोकांपर्यंत पोचवण्यात आला. समाजमाध्यमे सत्ताधार्‍यांची प्रॉपगंडा पसरवण्याची माध्यमे होऊ शकतात तशीच ती दडपशाहीविरोधातील हत्यारेही होऊ शकतात हे जागरुक चिनी नागरिकांनी दाखवून दिले... पण लगेचच ली यांच्या नावाने पारंपरिक चहा हा कोरोनाचा यशस्वी मुकाबला करु शकतो ही अफवाही याच माध्यमांतून वेगाने पसरवली गेली.

ली यांच्या मृत्यूनंतर ते काम करत असलेल्या वुहान मध्यवर्ती रुग्णालयासमोर ’I blew a whistle for Wuhan tonight' म्हणत वुहानमधील अनेक नागरिक एकत्र आले. सर्वांनी आपल्या घरातील दिवे पाच मिनिटे बंद ठेवून नंतर सामूहिक शिटीवादनानेच या व्हिसलब्लोअरला आपली श्रद्धांजली अर्पण केली.

-oOo-

ता.क.
चीनच्या ’सुप्रीम कोर्टाने जरी ’अफवेवर विश्वास ठेवायला हवा होता’ असे म्हटले असले तरी तो अफवा हा शब्द अवतरणचिन्हांत आहे. याचा अर्थ ’अफवा म्हटला गेलेला’ असा घ्यायला हवा. दुसरे असे की खुद्द ली हे स्वत: व्यवसायाने डॉक्टर होते. त्याविषयांतले तज्ज्ञ होते. तेव्हा कुणीही पाठवलेल्या माहितीवर विश्वास ठेवायला हवा असे समर्थन याच्या आधारे करता येऊ नये म्हणून हा खुलासा.

---

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी, दिनांक ५ एप्रिल २०२०)

    पुढील भाग >> ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर


हे वाचले का?

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’

‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे.

पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर अशा विषाणूच्या प्रसाराचा अभ्यास करताना अनेकविध घटकांमुळे कार्यकारणभाव, निष्कर्ष यात अनेक अडचणी येतात. लोकसंख्येच्या विस्तारामुळे प्रत्येक व्यक्तीबाबत निरीक्षणे नोंदवत जाणे जिकीरीचे होते. याशिवाय अभ्यासक्षेत्र जरी आखून घेतले तरी त्या सीमेबाहेरील अनेक घटकांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम अनुभव आणि निरीक्षणांवर पडत असतात. अशावेळी मर्यादित क्षेत्रफळ, मर्यादित लोकसंख्या आणि बाह्य घटकांशी सहज तोडता येणारा संपर्क यामुळे या क्रूझवरील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास अधिक नेमकेपणे करणे शक्य झाले. यातून या विषाणूच्या प्रसाराचा वेग, त्याला अनुकूल घटक, त्याची मारकक्षमता यांचा वेध घेणे शक्य झाले. याच्या आधारे भविष्यातील प्रसाराचा अंदाज घेणे शक्य झाले.

PrincessDiamond

हजारेक कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू घेऊन ही क्रूझ प्रवास करत होती. १ फेब्रुवारी रोजी या क्रूझवरील एक उतारु हाँगकाँग येथे उतरला. त्याला कोविद-१९ ची लागण झाल्याचे दिसून आल्यावर क्रूझला ताबडतोब संदेश पाठवून सावध करण्यात आले. ३ फेब्रुवारीला जपानमधील बंदरात ती पोचताच तिला ’क्वारंटाईन’ घोषित करून त्यातील व्यक्तींची तपासणी सुरू केली असतात तब्बल ७०० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याक्षणी चीनपाठोपाठ सर्वाधिक लागण झालेली ती जागा होती. अन्य देशांतून आता कुठे या विषाणूच्या प्रसाराची सुरूवात होत होती. प्रिन्सेसच्या बाबतीत हे उघडकीस आल्यानंतर समुद्रात प्रवास करत असलेल्या अन्य क्रूझनाही संदेश देण्यात आले. पुढे सुमारे २५ क्रूझवर कोविड-१९ पोचला असल्याचे दिसून आले. या क्रूझमधून विविध बंदरांवर पोचलेल्या उतारुंनी तो आपल्यासोबत त्या त्या देशात नेला.

जपानी वैद्यकीय अधिकार्‍यांनी या क्रूझवरील उतारूंची कसून तपासणी केली. यात आधीच लागण झालेले ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली. काहींची एकाहून अधिक वेळा तपासणी करण्यात आली. संख्याशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर संपूर्ण लोकसंख्येची अशी तपासणी करण्याची, त्यांच्यावर निरीक्षणे नोंदवण्याची दुर्मिळ संधी या वैद्यकीय अभ्यासकांना मिळाली. यात त्या रुग्णांची केस-हिस्टरी, जीवनपद्धती वगैरे अधिकचे संभाव्य परिणामकारक घटकही नोंदवून ठेवता आले. यातून अभ्यासाची दिशा अधिकाधिक काटेकोर करणे शक्य झाले.

या अभ्यासाआधारे ’युरोसव्हिलन्स’ने तयार केलेल्या रिपोर्टनुसार लागण झालेल्यांपैकी तब्बल १८% लोकांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे आढळून आली नव्हती. म्हणजे हे लोक जर एखाद्या देशात राहात असते, तर ते इतर लोकांत मिसळून त्यांना संसर्ग देणारे वाहक म्हणून काम करणारे ठरले असते. इतकेच नव्हे तर या क्रूझवर मुख्यत: सुटीचा आनंद लुटायला आलेले ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्यामध्ये अशी लक्षणे दिसून येण्याची शक्यता अधिक होती. याचा अर्थ सर्वसामान्य समाजात, जिथे मध्यमवयीन, तरुण आणि मुले यांचे प्रमाण क्रूझहून अधिक असते, तिथे अशा वाहकांचे प्रमाण कितीतरी अधिक असणार याचा अंदाज अभ्यासकांना आला. यामुळे धोक्याचा इशारा देऊन सामाजिक विलगीकरण अपरिहार्य करण्यात आले. ५ फेब्रुवारीपासून सर्व उतारुंना दोन आठवड्यांसाठी आपापल्या केबिनमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली. एरवी रोज सरासरी सात माणसांच्या संपर्कात येणारी व्यक्ती आता सरासरी एकाहून कमी व्यक्तीला भेटत असल्याने संसर्गाची शक्यता बरीच कमी झाली.

याच निरीक्षणांच्या आधारे पुढे केलेल्या अभ्यासातून या विषाणूबाधित लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे ३.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. चीनमध्ये प्रत्यक्षात हा दर १.१% इतका नोंदवला गेला आहे. अंदाजाहून कमी दिसण्याची एकाहून अधिक कारणे असावीत. पहिले म्हणजे चीनसारख्या एकाधिकारशाही असलेल्या देशात कटू निर्णय घेणे आणि अंमलात आणणे तुलनेने सोपे असते. दुसरे चीनचा इतिहास पाहता हा मृत्युदर बराच अधिक असण्याची शक्यता आहे, परंतु अधिकृत पातळीवर तो कमी सांगितला गेला असेल. तिसरे म्हणजे प्रिन्सेसच्या उतारुंच्या तपासणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे रुग्णांचे आणि विलगीकरणाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे केले गेले असू शकेल.

पण यात एक मेख आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये तपासलेल्या रुग्णसंख्येच्या आधारे हे गुणोत्तर जाहीर केले आहे. यात तपासणी न होताच मृत्यू पावलेल्यांची संख्या जमेस धरलेली नाही. शिवाय प्रत्यक्षात लागण झालेले, पण तपासणी न झालेले आणि अजूनही वाहक असणार्‍यांच्या संख्येचा यात अंतर्भाव नाही. त्यामुळे त्या आधारे आजच्या मृत्यूंचे गुणोत्तर आणखी कमी दिसणार असले तरी भविष्यात या वाहकांमुळे हा विषाणू आपले हातपाय पुन्हा पसरु शकणार आहे.

जी गोष्ट चीनच्या आकडेवारीबाबत तीच प्रिन्सेसवरील अभ्यासांतून काढलेल्या निष्कर्षांबाबत. संख्याशास्त्रीय अभ्यास तुम्हाला निरीक्षणांतून निष्कर्ष काढण्यास मदत करतात. ते कितपत उपयुक्त असतील त्याचा अंदाजही देतात. त्यापुढे माणसाचे काम सुरू होते. तुम्ही आम्ही ते किती सुज्ञपणे आणि किती कार्यक्षमपणे हाताळतो त्यावर पुढचे यशापयश अवलंबून असते.

(स्मृती मल्लपती यांच्या ’नेचर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ’What the cruise-ship outbreaks reveal about COVID-19′ या लेखाच्या आधारे.)

-oOo-


हे वाचले का?