शनिवार, ८ जून, २०१९

नट, कुसुमाग्रज आणि मुक्ता बर्वे

पाच वर्षांपूर्वी वेचलेला अनुभव...
---

MuktaRecitesPoem

कविवर्य कुसुमाग्रजांची ही कविता आज मुक्ता बर्वेने सादर केली नि अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले, क्षणभर ते सारे प्रेक्षागृह रिकामे झाले नि असं वाटलं की मीच तो, मीच तो नटसम्राट, नट, बोलट किंवा नुसताच साक्षीभावाने वावरणारा नाटकातला एखादा नोकर वगैरे, किंवा मीच तो सूचक नेपथ्यामधला एखादा खांब म्हणून उभा राहिलेला न-नट. नटाच्या अस्तित्वाला नेहेमी शब्दाचीच साक्ष हवी असे थोडेच आहे, अस्तित्व दिसते, ऐकू येते, जाणवते नि संक्रमितही होते. म्हणून तर त्याला नाटक म्हणायचे ना, नास्तित्व अस्तित्वाच्या भासात रूपांतरित व्हावे ते नाटक. पाहता पाहता त्या रोमांचाचे खारे पाणी नजरेला जाणवूही लागले. उण्यापुर्‍या एखाद्या मिनिटाचेच काय ते सादरीकरण असेल, पण तो एखादा मिनिट पुरेपूर जगावा असाच. काही मोजकेच लोक कवितेला जगतात, भोगतात नि बिलगून राहतात असं मला वाटतं त्यात आज मुक्ताचाही समावेश केला मी.

(हे सादरीकरण 'रंग नवा' या मुक्ताचीच निर्मिती असलेल्या कवितेवर आधारित कार्यक्रमाचा भाग. उर्वरित कार्यक्रम 'विस्मरणीय'... हो 'विस्मरणीय' - प्लीज नोट यात 'अ' नाही! - हा एकच शब्द पुरे. प्रतिक्रियेसाठी याहून एकही अधिक शब्द खर्चणे हा अपव्ययच.)
--- 


’नट’
-कुसुमाग्रज

नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणा-या
असंख्य आविर्भावांनी
भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
प्रयाणाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा.
मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,
बिलगून बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतींच्या कोप-यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला,
नाटक संपल्याची खंत-
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करूप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे - माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेउन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशाअंशाने
हजारांच्या जीवनात
- कदाचित स्मरणातही -
वाटला गेलो आहे.
---