शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

एक दिवस मठाकडे

(काही आठवड्यांपूर्वी आळेकरांचं 'एक दिवस मठाकडे' पाहिलं. तेव्हा असंच काही सुटं सुटं डोक्यात उमटलं ते खरडून ठेवलं. पुन्हा केव्हातरी पक्कं करू म्हणून. पण आता काही दिवसांनी तो अनुभव फिका झाल्यावर हे अवघड झाले. तेव्हा आता तो खरडा तसाच इथे टाकून दिलाय.)
 
जिवाभावाच्या व्यक्तींशी हरवलेला संवाद... आपण त्यांच्या जगण्याचा भाग असतो, ते आपल्या जगण्याचा भाग असतात का?.... निघून गेलेल्या त्या व्यक्तिबाबत उभे ठाकलेले प्रश्न... साधेसोपे, जगण्याच्या तळातले ...जे पुरेशा संवादाने सहज सुटू शकले असते, एकमेकाला अधिक चांगले समजून घेता आले असते... परस्परसंवादातून एकमेकांबद्दल जे सहज समजून घेता आले असते, वाटून घेता आले असते ते सारे हरवून गेल्यावर शोधण्याचा प्रयत्न... मग कोण्या एखाद्या मठात आपल्या या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे गृहित धरून अशा मठाच्या शोधात वणवण...शोधाच्या वाटेवर मार्गदर्शक तर हवाच... पण मग नक्की कुणाला मार्गदर्शक करावे याबाबतही असलेली अनभिज्ञता... केवळ मठाच्या संभाव्य वाटेवर भेटलेला कुणी .... त्यालाच पथप्रदर्शक बनवण्याचा किंवा त्याच्यातच आपला मार्गदर्शक शोधण्याचा केलेला प्रयत्न..

पुढे निघून गेलेल्याने मागे सोडलेले जग... त्याची नव्याने होणारी ओळख... आसपासच्या एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीला रिप्लेस करण्याचा हलकासा प्रयत्न... पुन्हा ते जग तसे उभे राहील का ही उमेद.

हे दोघे  खरंच आले होते की त्या मध्यमवयीन व्यक्तीचा भूतकाळच स्मृतींच्याआधारे त्याच्यासमोर उलगडला होता, त्याचे त्यालाच ठाऊक. पण मग हे सारे त्याच्या स्मृतींचे उलगडणे असेल तर मग त्याचा तो मठाचा शोध नक्की कशाचा शोध आहे?

नव्या माध्यमाचा वापर दाद देण्याजोगा. रंगमंचावर मागे असलेल्या स्क्रीनचा वापर करून त्यावर या जगण्याची पार्श्वभूमी चित्रपटातील गाणी नि चित्रपट-अभिनेत्यांची छायाचित्रे यांचा वापर करून उभी केलेली. आज आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला चित्रपट जणू आपल्या जगण्याचे काल-परिमाणच होऊन बसला आहे.  त्यातून आपण आपले रोल मॉडेल शोधू लागलो आहोत.  परंतु हे असतानादेखील तथाकथित संस्कारांची, पुरुषी अहंकारांची, स्त्रीत्वाच्या न्यूनगंडाची वीण मात्र अजूनही तेवढीच घट्ट आहे. जाती-धर्मभेदाच्या व्यवहारातील भिंतीची कदाचित थोडी पडझड झाली असेल, परंतु मनाच्या तळात त्या अतिशय मजबूत पायावर उभ्या असतात. इतक्या की त्या तरुणाची आजी आपल्याला दिलीपकुमार ऊर्फ युसुफखान आवडतो याचा उच्चारही करू शकत नाही, केवळ मशीदीतली बांग ऐकू आली की जणू आपले गुह्यच उघड होते की काय या भावनेने कावरीबावरी होते. तिचे हे गुह्य या हृदयीचे त्या हृदयी जाणून घेतले ते तिच्या सुनेने, त्या तरुणाच्या आईने. तिलाही त्याचा उच्चार शब्दात करणे शक्य होत नाही. केवळ आपल्या डायरीत त्याचा उल्लेख ती करून ठेवते, जणू हाडामासाच्या व्यक्तींशी हरवलेला संवाद त्या डायरीशी करू पाहते. आजीची ही घुसमट परिवर्तित होते ती तिच्या पतीला आपल्यासारखा केसाचा कोंबडा आहे एवढ्याच कारणासाठी आवडणार्या देव-आनंदबद्दलच्या तीव्र नावडीच्या स्वरूपात.

मागच्या स्क्रीनवर मठाच्या पायर्‍या दिसताहेत, वर कुठेतरी तो मठ असावा...असावा असंच म्हणायला हवं, कारण तो ज्याच्या त्यालाच सापडतो किंवा सापडत देखील नसावा. हे ही ज्याचे त्यालाच ठरवायला हवे.

ओटा.... जगण्यातील स्त्री जोडीदाराला गमावल्यानंतर तिच्यापाठी लपून गेलेल्या जगण्यातील असंख्य छोटी छोटी गोष्टी, ज्यांना आजवर गृहित धरलं होतं. चहाचा कप उचलून बेसिन मधे टाकावा लागतो, बेसिनमधे असलेल्या किटलीतील चहाची पत्ती किटली धुण्याआधी कचरापेटीत... तीही ओल्या कचर्याच्या पेटीत टाकावी लागते... जगण्याची ही व्यवधाने त्या व्यक्तीच्या जाण्याने अचानक दत्त म्हणून समोर उभी ठाकतात. त्या व्यक्तीला गमावण्याने भावनिक बाजूवर होणार्‍या आघाताबरोबरच जगण्याच्या या अतिशय व्यावहारिक बाजूला आलेले स्थित्यंतरही नवे आव्हान उभे करते, त्यासाठी जगण्याचे मार्ग बदलावे लागतात, विचार बदलावे लागतात त्यासाठी कोणत्याही मठात तयार उत्तरे नसतात.

तरुण मुलगी दोन भूमिकात. त्या मध्यमवयीन गृहस्थाशी त्याची पत्नी म्हणून संवाद साधते तर तरुणाशी त्याची प्रेयसी म्हणून. तिला अतिशय थोडीशी वाक्ये आहेत. ती देखील केवळ त्या त्या पुरुषाला आश्वस्त करणारी. एका अर्थी ती एकुणच स्त्रीत्वाचं प्रतीक मानावी लागेल. जवळच्या जिवाभावाच्या व्यक्तीशी संवाद नाही, जे काही थोडे बोलते त्यातही केवळ त्या पुरुषाचीच काळजी, त्याच्याबद्दलची आपुलकी वा त्याबाबतची आपलेपणाची, सुखदु:खाच्या वाटेवरील सोबत ही एवढीच भूमिका समोर येते.

त्या तरुणाच्या तोंडी वारंवार येणारे वाक्य ’काहीतरी करायलाच हवं ना.’ एक प्रकारे पुरेशा संवादाअभावी गमावलेल्या आपल्या माणसाबद्दल कर्तव्यच्युतीचा अपराधगंड त्याला भेडसावतो आहे. आता बैल गेला निदान आपल्या समाधानासाठी का होईना पण एक  खोपा करावा असे काहीसे त्याचे वागणे दिसून येते. कुठल्यातरी त्या मठात आपल्याला आपल्या त्या जिवाभावाच्या माणसाबद्दल आपल्याला जे खरंतर आधीच जाणून घ्यायला हवे होते ते निदान आता जाणून घेता येईल असा एक काल्पनिक देखावा त्याने आपल्यापुरता उभा केला आहे. एकप्रकारे त्यातली विफलता, आत्मवंचना त्याला दिसते आहे नि म्हणूनच तो वारंवार ’काहीतरी तर करायलाच हवं ना.’ असे म्हणत आपल्या त्या निष्फळतेचे भविष्य ललाटी घेऊनच जन्मलेल्या त्या कृतीचे समर्थन करू पाहतो आहे. खरंतर जे करायला हवं - आपल्या प्रेयसीशी संवाद सुरू करायला हवा - जी चूक त्या मध्यमवयीन गृहस्थाची तीच तो पुन्हा करतो आहे.  तो ही मागून येणार्‍या प्रेयसीची वाट न पाहता पुढे निघून जातो आहे. शेवटी तो तरुण मुलगा पुढे निघून गेलेला... मागे राहिलेली ती त्याची प्रेयसी पुन्हा त्याच भागधेयाला सामोरी जाणारी.  जे त्या तरुणाच्या आईच्या, आजीच्या नि त्या मध्यमवयीन गृहस्थाच्या पत्नीच्या कपाळी कोरले होते.

 मध्यमवयीन माणसाचा संवाद. तो... त्याने कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने गमावलेली पत्नी. ते दोघे याच मठाच्या वाटेवर फिरायला येत. तो पुढे नि ती मागे. तिचा एक ठरलेला मोठा दगड. तिथे बसून तिने प्राणायम करायचा. तिला बसलेली पाहून मग याने मागे यायचे. परतीच्या वाटेवर मात्र ती पुढे नि तो मागे. दोन अर्थाने. लौकिक अर्थाने पहायचे तर घराची ओढ स्त्रीला अधिक तेव्हा ती पुरुषापेक्षा अधिक ओढीने, घाईने घराकडे परतणार. संकेतार्थाने पहायचे तर  आपल्या परंपरेत पतीच्या आधी 'जाणे' याला एक प्रकारची प्रतिष्ठा लाभलेली (खरेतर व्यावहारिक, सामाजिक अर्थाने एक प्रकारची अपरिहार्यता प्रतिष्ठेचे रुप घेऊन उभी राहिलेली.)  फिरायला गेल्यावर परतीची वाट असो वा जगण्याचे देणे देऊन परतीची वाट असो, त्या मध्यमवयीन गृहस्थाच्या पत्नीने हे श्रेयस साध्य केलेले.

तरुणाने त्या मध्यमवयीन गृहस्थामधे आपला बाप अथवा पथप्रदर्शक शोधणे नि त्या गृहस्थाने त्याच्यामध्ये आपला मठाकडे जाणारा मुलगा शोधणे हे समर्पक. एक प्रकारे तो गृहस्थ त्या तरुणात आपले तारुण्य पुन्हा एकवार पडताळून पाहू शकतो. त्या तरुणाला केलेले प्रश्न एका अर्थी त्याला स्वतःलाच केलेले आहेत. त्या अर्थी तो मठावर अवलंबून न राहता आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधू लागल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे तो एकच आहे जो कधीही मठात गेलेला नाही वा जाण्याचा मनोदय त्याने कधी केलेला नाही.

त्या गृहस्थाचा दीर्घ असा मोनोलॉग, स्वगत त्याच्या पत्नीनिधनोत्तर आयुष्याचा धांडोळा घेणारे एक प्रकारे त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीतून त्या व्यक्तीच्या आपल्या आयुष्यातील व्यावहारिक, भावनिक स्थानाचे कळून येणारे. हे स्वगत सुरू होण्यापूर्वी तो आपल्या पत्नीरूपातील त्या मुलीशी बोलत असतो. एक वेळ थांबतो नि म्हणतो 'आता माझ्या मोनोलॉगची वेळ झाली.' थोडक्यात आता संवाद संपला नि स्वगताचे दिवस सुरू झाले. नि या स्वगतांच्या दिवसाचा सारा पटच तो आपल्या स्वगतातून प्रेक्षकांसमोर मांडतो.