शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

मुंबईकरांनो,

मुंबईकरांनो,

त्या मुंबई स्पिरीटचं लोणचं घाला, 'आमच्यासारखी घड्याळाच्या काट्यावरची आयुष्य', 'आम्ही कित्ती गर्दीत राहतो' ही कौतुकाने सांगण्याची गोष्ट आहे हे जितक्या लवकर विसराल तितके चांगले. माणसाला नऊ वाजता बटण दाबून सुरु होणार्‍या, दिवसभर अविश्रांत फिरत राहणार्‍या नि बरोबर सहा वाजता बटण दाबूनच बंद होणार्‍या मशीनची कळा येऊ देऊ नका. दोषांना गुण-विशेषणांच्या मखरात बसवून मेल्या पोपटाचे उत्सव करु नका. तो मेला आहे हे मान्य करा नि इतरांनाही स्पष्टपणे सांगा. सतत पडणार्‍या मुडद्यांकडे पाहून 'शो मस्ट गो ऑन' म्हणण्याची परंपरा होऊ देणार नाही हे स्थानिकापासून सर्वोच्च शासकापर्यंत सर्वांना ठणकावून सांगा. तुमचं ते स्पिरीट ग्लासात ओतून सोड्याबरोबर वर्षानुवर्षे चाखत आलेल्या मुर्दाडांना पार्श्वभागी लत्ताप्रहार करण्याची हिंमत धरा आता.

मुंबई आता माणसांनी ओसंडून वाहते आहे, तिची एकाच वेळी पाच-सहा पिले घातलेल्या नि उकीरड्यावर पुरेसे अन्न न मिळाल्याने स्वतःबरोबरच पिलांनाही अर्धपोटी ठेवणार्‍या आणि अधेमधे माणसांच्या लाथा वा काठीचे प्रहार सोसणार्‍या कुत्रीसारखी अवस्था झाली आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या बसेस, लोकल, मेट्रो, बुलेट ट्रेन, स्वतंत्र देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक इ. उपायांनी त्या कुत्रीच्या सतत वाढणार्‍या पोरवड्याची भूक भागणार नाही, आता नसबंदीखेरीज पर्याय नाही हे शासकांना समजावून, आणि नाही समजले तर चार फटके देऊन मान्य करवून घेण्याची वेळ आली आहे.

जमिनीच्या लहानशा तुकड्यावर अधिक माणसे सामावून घेण्यासाठी स्काय-स्क्रेपर्स बांधून जमिनीचा प्रश्न सुटेल कदाचित, पण एका माणसाच्या अन्नात दोन माणसांची भूक भागवण्याची किंवा लोकलमधील एका सीटवरून चार माणसे प्रवास करण्याची सोय करणे माणसाला अद्याप जमलेले नाही. त्यामुळे बिल्डर्सच्या खाल्ल्या मिठाला जागण्यासाठी भरमसाठ वस्ती वाढवण्याचे प्रोजेक्ट पास करत असताना त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे हळूहळू अशक्यतेच्या पातळीवर जाऊ लागले आहे याचे भान नसणे हे नालायक शासन असल्याचे निदर्शक तर आहेच पण नागरिक मुर्दाड आणि बेजबाबदार असल्याचेही.

सद्यस्थितीत मुंबई देवळे, मशीदी, चर्चेस, पुतळे, स्मारके इ.ची मागणी करत त्यावर शासकीय पैसा वा जमीन वाया घालवू इच्छिणार्‍यांना किंवा कुठल्याशा संस्थेला कुणाचे तरी नाव देण्यासाठी वा कसल्याशा पुस्तकात्/चित्रपटात/नाटकात कुणाची तरी अस्मिता दुखावली म्हणून सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणार्‍यांना उलटे टांगून मिरच्यांनी धुरी देण्याची नि हा सारा पैसा मूलभूत गरजांकडे वळवण्याची सोय नागरिकांनीच शासनाच्या डोक्यावर बसून करून घ्यायला हवी.

ते जमत नसेल तर आजच्या दिवसापुरते आपल्या चेहर्‍यावर पांढरी चादर नाही याचे उत्सव करा नि नवरात्रात दांडिया खेळायला जा. बुडत्या टायटॅनिकवरच्या खुर्च्या ताब्यात घेण्यासाठी काही प्रवासी जसे धडपडले होते तसेच.

#ToHellWithMumbaiSpirit
#LiveLikeHumanNotLikeADog
#KickSomeAssIfNeeded
#ParelStampede