गेल्या पासष्ट वर्षात काय झाले हे म्हणणारे आणि गेल्या पिढीच्या
साहित्यात 'ते हे नाही' म्हणणारे नवकवी, साहित्यिक, नवरसिक यांच्या
गुणात्मकदृष्ट्या फारसा फरक नसतो. हे म्हणताना त्या विधानाची पार्श्वभूमी
म्हणून असते त्यांचे अज्ञान, जाणीवेचा अभाव किंवा बेपर्वा, हेतुतः अपलाप
करण्याची स्वार्थी किंवा 'आम्हीच काय ते कर्ते', 'आम्हालाच काय ते सारे
समजते'. 'आम्हीच काय ते दिवे लावू शकतो' ही आढ्यतेखोर वृत्ती. डोळे झाकून
बसल्याने प्रकाश नाहीसा होत नाही पण आपल्यासारख्याच अनेकांना 'डोळे झाकून बसले
की प्रकाश नाहीसा होतो' हे पटवून देण्याचे कौशल्य अंगी असेल तर बहुमताच्या
आधारे 'प्रकाश नाहीसा झाला आहे' हा ठराव मात्र पास करून घेता येतो. यात
अडचण ही की प्रकाशाप्रती असूया म्हणून एकदा हे केले की आपणच त्या धारणेचे
गुलाम होतो नि कायम डोळे बंद करून चाचपडत बसणे नशीबी येते.
---
-: काय कराल :-
मी पत्र लिहून कळवीन तुम्हाला
माझी, सोबत्यांची, या मातीची दुर्दशा
किंवा कविता लिहून
उपमा, रूपक, प्रतिमा, यमक यांनी सुदृढ अशा
- पण तुम्ही स्वतः निरक्षर असल्याचे
प्रमाणपत्र सादर कराल.
मी बोलीन व्यासपीठावरून
एकेक शब्द कडू कारल्यात घोळून
मी गाईन आवेगी गाणी
आवाजात लोकमानसात उसळणारा
तप्त लाव्हा मिसळून
-पण तुम्ही चांदीच्या कानकोर्ण्याने
कानातला मळ काढण्यासाठी वेळ मागाल.
मी उभा राहीन तुमच्यासमोर नागडा
जिवंत दाखल्यासमान
दोन्ही हातांत धरून
रक्ताळलेला वर्तमान
- पण तुम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी
दवाखान्यात भरती व्हाल.
मग मी ओरबाडीन तुमची शुभ्र वस्त्रे
अन् माझ्या नखांनी काढीन तुमच्या
शरीरावर आमच्या यातनांचा नकाशा
- तेव्हा तुम्ही काय कराल?
स्वतःला संवेदनाशून्य घोषित कराल?
सांगा
सांगा
काय कराल?
- नारायण कुळकर्णी कवठेकर (३०.०८.८४)
-: काय कराल :-
मी पत्र लिहून कळवीन तुम्हाला
माझी, सोबत्यांची, या मातीची दुर्दशा
किंवा कविता लिहून
उपमा, रूपक, प्रतिमा, यमक यांनी सुदृढ अशा
- पण तुम्ही स्वतः निरक्षर असल्याचे
प्रमाणपत्र सादर कराल.
मी बोलीन व्यासपीठावरून
एकेक शब्द कडू कारल्यात घोळून
मी गाईन आवेगी गाणी
आवाजात लोकमानसात उसळणारा
तप्त लाव्हा मिसळून
-पण तुम्ही चांदीच्या कानकोर्ण्याने
कानातला मळ काढण्यासाठी वेळ मागाल.
मी उभा राहीन तुमच्यासमोर नागडा
जिवंत दाखल्यासमान
दोन्ही हातांत धरून
रक्ताळलेला वर्तमान
- पण तुम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी
दवाखान्यात भरती व्हाल.
मग मी ओरबाडीन तुमची शुभ्र वस्त्रे
अन् माझ्या नखांनी काढीन तुमच्या
शरीरावर आमच्या यातनांचा नकाशा
- तेव्हा तुम्ही काय कराल?
स्वतःला संवेदनाशून्य घोषित कराल?
सांगा
सांगा
काय कराल?
- नारायण कुळकर्णी कवठेकर (३०.०८.८४)