रविवार, १७ जानेवारी, २०२१

चर्चा अजून संपलेली नाही...

चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू.
--------------------

पोस्टः

या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू.
---

प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का?

प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात.

प्रतिसाद ३: आपल्या देशातील घडामोडींबाबत काडीचा अभ्यास नाही आणि चालले अमेरिकेचा अभ्यास करायला.

प्रतिसाद ४. कुठलीही पोस्ट न चुकता मोदींकडे वळवून त्यांच्यावर टीका करायची तुम्हाला सवयच आहे.

प्रतिसाद ५/६/७: (एकाच व्यक्तीने हे तीन प्रतिसाद देऊन त्यात तीन वेगवेगळ्या इमोजी ऊर्फ भावचित्रे  चिकटवली आहेत.  कुठली तो तपशील फारसा महत्त्वाचा नाही.)

प्रतिसाद ८: हे सारं आजच का आठवलं?

प्रतिसाद ९: अमेरिकेला ट्रम्पसारखाच अध्यक्ष मिळायला हवा. तीच त्यांची लायकी आहे.

प्रतिसाद १०: आपल्या कारकीर्दीत त्या ओबामाने २ मिलियन का कितीतरी बॉम्ब टाकले म्हणे, त्याच्या जाण्याची कसली खंत करता.

उपप्रतिसादः २ बिलियन हो. (सोबत लिंक.)

प्रतिसाद ११: ट्रम्पच हवा अमेरिकेला तो पुतीनला बरोबर वठणीवर आणेल. वरवर मैत्री दाखवत असला तरी तो मनातून कट्टर रशिया आणि चीन विरोधी आहे.

उपप्रतिसादः तुमच्या कानात सांगितलं वाटतं येऊन. (भावचित्र)

प्रतिसाद १२: स्वतंत्र विदर्भ ही काळाची गरज आहे.

उपप्रतिसादः खरंतर मा.गो. म्हणाले तशी चार राज्यं करायला हवीत.

प्रतिसाद १३: तिकडे झारखंडमधे खाण खचून कित्येक लोक मेले ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही.

प्रतिसाद १४: बरोबर आहे, तो ओबामा काळा ना; तुम्ही आता खराखोटा डेटा जमवून त्याची कारकीर्द कशी सामान्य होती हे सिद्ध करणार असाल.

प्रतिसाद १५: अमेरिकेचा अध्यक्ष कोण होतो हे महत्त्वाचे नाही, पुढचे दशक भारताचे असेल.

प्रतिसाद १६: ट्रम्प हा नासाने ट्रायल घेण्यासाठी अध्यक्ष बनवलेला रोबो(ट) आहे. एक रोबोदेखील अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो (इतके आमचे प्रशासन काटेकोरपणे बांधले आहे) अशी पैज सीआयएवाल्यांनी पुतीन यांच्याशी लावली होती. त्यानुसारच हे चालू आहे.

उपप्रतिसादः आपल्या देशात प्राचीन काळातच रोबोंचा शोध लागला होता.

उपप्रतिसाद २: आमच्याकडे एक रोबो आधीच पंतप्रधान आहे. खी: खी: खी:

उपप्रतिसाद ३: पप्पू अजून पंतप्रधान झालेला नाही, कधी होणारही नाही. स्वप्न बघू नका. हॅ हॅ हॅ.

प्रतिसाद १७: अमेरिकेची भलामण करताना तिथे अजूनही एखादा (रेड) इंडियन अध्यक्ष झालेला नाही हे विसरू नका.

उपप्रतिसाद : तिथे साधा इंडियनही अध्यक्ष झालेला नाही मि. एनाराय.

उपप्रतिसादः त्याचा इथे काय संबंध?

उपप्रतिसाद २: (भावचित्रे  ).

प्रतिसाद १८: गुड मॉर्निंग सर. (भावचित्रे  )

प्रतिसाद १९: भलत्या ठिकाणी गुड मॉर्निंग करणारा हा येडाय का?

...
---

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

समीक्षक

अमुकचे नवीन विनोदी पुस्तक आले...
तो म्हणाला...
’ह्यॅ: सगळा मध्यमवर्गीय कचरा.
यात सामाजिक खोली नाही.’

तमुकची सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली.
तो म्हणाला...
’ह्यॅ: संकुचित परिघात फिरते.
तिला वैश्विक परिमाण नाही.’

ढमुकचा नवा कथासंग्रह आला.
तो म्हणाला...
’ह्यॅ: उगाच आव आणणारे लेखन.
घाटाचा नीट अभ्यास नाही.’

मामलुकचा नवा कवितासंग्रह आला
तो म्हणाला...
’ह्यॅ: पोज घेऊन केलेले लेखन.
त्याला अनुभवसंपृक्ततेची जोड नाही.

चापलूसचा नवा चारोळीसंग्रह आला
तो म्हणाला...
’ह्यॅ: नुसत्या अनुभवाच्या रांगोळ्या.
त्याला वैचारिक बैठक नाही.’

पामुकची नवी कादंबरी आली.
पानेही न फाडता तो म्हणाला...
’ह्यॅ: आपल्याकडे कुणाला जमणार नाही.
कथानक असे खोल उतरले पाहिजे.’


आणि...

बटाट्याच्या चाळीतला म्हाळसाकांत पोंबुर्पेकर
आता ज्येष्ठ समीक्षक होऊन सरकारी
बिगरसरकारी पुरस्कार कमिट्यांतून
पुरस्कारासाठी लेखन निवडू लागला.

-oOo-

ता.क. :
सदर लेखनाची वर्गवारी 'खविटा’ हा रमताराम यांनी जगप्रसिद्ध केलेला लेखनप्रकार* आहे.  चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले, जोगकंस हा जोडराग नसून त्याला स्वतंत्र प्रकृती आहे म्हणत कुमारांनी जसे त्याला कौशी म्हटले तद्वत रमतारामांनी खवट कवितांना खविटा म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली... नासाने देखील त्यांची दखल घेतली आहे. युनेस्को पुढच्या वर्षीपासून जागतिक खविटा-स्पर्धा सुरू करणार आहे.

(*ह्यॅ: याला कविता म्हणता येणार नाही. याला मीटर, सेंटीमीटर काहीच नाही.’ असे प्रसिद्ध समीक्षक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर म्हटल्यामुळे त्यांनी फक्त लेखनप्रकार म्हटले आहे, काव्यप्रकार नव्हे.)

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

... नाना म्हणाले

आमच्यावेळी असं नव्हतं... नाना म्हणाले

नातवाला चौथीत
नव्वद टक्केच मिळाले
’फार लाडावून ठेवलाय
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

नातवाला पाचवीत
अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले
’अभ्यासाच्या अतिरेकात मूल चिणेल
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

शाळेतल्या गॅदरिंगमध्ये
नातीच्या नाचाचा कार्यक्रम झाला
’अभ्यास सोडून नसते धंदे,
आमच्यावेळी असं नव्हतं...' नाना म्हणाले

नातीला चौथीत
स्कॉलरशिप मिळाली.
’पुस्तकी किडे झालेत सगळे,
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

मागच्या वर्षी पाऊस
दोन दिवस उशीरा आला...
’हल्ली सदा दुष्काळच असतो
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

यावर्षी पाऊस
दीड दिवस आधी आला
’सारे ग्लोबल वॉर्मिंगचे पाप
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

एक वर्षी पूर आला,
लोक उध्वस्त झाले
’हल्ली नियोजनच नसते
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

एक वर्षी अवर्षण आले,
लोक घायकुतीला आले
’कृत्रिम पाऊस पाडा की,
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

पीक जळून गेले
शेतकरी उध्वस्त झाला,
’शेतकर्‍याकडे दुर्लक्ष होते आहे
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

पीक महामूर आले, भाव पडले,
सरकारने हमी भाव दिला
’शेतकरी माजलेत साले,
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले

वैतागली पुढची पिढी म्हणाली,
तुम्हीच आता घर चालवा.
’सर्वांच्या हितासाठीच मी,
आमच्यावेळी असंच होतं...’ खुशीत येऊन नाना म्हणाले

... आणि घरात पुन्हा नानांचे राज्य आले!

- रमताराम

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

दोन स्टॅंप

कुरियरच्या जमान्यात
लोक स्टॅंपला विसरलेत म्हणे.

पूर्वी,
प्रेमपत्र असो की वसुलीची नोटीस
स्टॅंप लावायचा की
पोस्टखाते निर्लिप्तपणे
पत्र इच्छितस्थळी पोचवायचे.

म्हणे,
आता दोन नवे स्टॅंप आलेत
यांना पैसेही द्यावे लागत नाहीत
काहीही खपवायचे असले की
या दोनपैकी एक चिकटवा
नि समाज तुम्हाला हवे ते
निमूटपणे शिरोधार्य मानतो

या दोन स्टॅंपची छपाई
थेट केंद्रीय पातळीवर होते
ज्यांना हवे त्यांना ते फुकट
मिळतात, अट एकच...

ते न वापरणार्‍यांना
सतत दूषणे द्यायची

दूषणे देणॆ हे आवडीचे काम
जनता अतिशय आनंदाने करते
स्टॅंप लावलेली
रिकामी पाकीटे नि पॅकेट्स
संपत्ती म्हणून मिरवते

आणि स्टॅंप न लावलेले
कितीही उपयुक्त असले
तरी बाणेदारपणे फेकून देते...
रिकाम्यापोटी

पाठवण्याजोगे काहीच नसलेले लोकही
रिकामी पाकीटे नि बॉक्सेसना
भक्तिभावाने हे स्टॅंप लावून
परिचितांना पाठवत असतात.

त्यांचा रक्तगट म्हणे दुर्मिळ आहे
’अस्मिता’ म्हणतात म्हणे त्याला

आणि ते दोन स्टॅंप्स
’आत्मनिर्भर’ आणि ’राष्ट्रहित’
या नावाने ओळखले जातात.

-oOo-

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

वाचाळ तू मैत्रिणी

काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून काव्यभुभू रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.)

एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली.  एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्‍याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्‍यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला...

---

झाशीवाली नव्हेस कन्या, नव्हेस अंबामाय
उसनवारीची कंठी मिरविसी रुंडमाळ की काय
प्याद्यासी या म्हणेल राज्ञी, बॉलिवुडी का कुणी?
वाचाळ तू मैत्रिणी

बदनामीचे अस्त्र उपसले, मुळी न धरलीस चाड
तुला पाहता लावून घेतो, मम सदनाचे कवाड
नकोच दर्शन अंशमात्रही, मज हे कैदाशिणी
वाचाळ तू मैत्रिणी

कशांस पंगा घेतलास तू, पाय आणि खोलात
उर्मिलेस त्या दूषण देता, कां नच झडले हात?
कित्येकांसी वैर घेतले, ट्विटरावरती, जनीं
वाचाळ तू मैत्रिणी

राणी(!) असुनि झालीस प्यादे, घरटे तुटले आज
पाठीवरचा हात दगा दे, उतरुन गेला माज
समर्थनासी परी धावले, झुंडीच्यासह कुणी
वाचाळ तू मैत्रिणी

तुला पाहता प्रदीप्त होते, मम शब्दांची धार
होईल शोभा पुन्हा म्हणुनि करत नाही मी वार
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा झणी
वाचाळ तू मैत्रिणी

चला राऊता(!), द्या सेनेला(!) एक आपुल्या हाक
नटीसंगती सुसज्ज असतील ट्विटर-ट्रोल हे लाख
तव पोस्टींच्या संगती ठेवा ’सामना’ची(!) पुरवणी
वाचाळ तू मैत्रिणी

मरुस्थलासम तव बुद्धीचे भान होई वैराण
कशास भांडुन तंडुन केले जन हे तू हैराण
ताळतंत्र हे पुरे सोडले, तुवा गतसाजणी
वाचाळ तू मैत्रिणी

भगिनीसह शब्दांनी केले तूच वार अनेक
दुखावले जे तव शब्दांनी, दुरावले जे लोक
कुठल्या वचने तव सुहृदांची करशील समजावणी?
वाचाळ तू मैत्रिणी

जमेल तेथे, जमेल तैसी करु काव्य-पैदास
हाच एकला ध्यास आणखी, हीच एकली आस
शब्दप्रभूचे काव्य विडंबी, कुंपणावरचा मुनी
वाचाळ तू मैत्रिणी

- काव्यभुभू रमताराम

-oOo-