सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

देवस्थान

DoorLookedTemple
एका प्रसिद्ध देवस्थानाने श्रद्धाळूंची स्पर्धा घेतली.
त्यात एकच प्रश्न होता, 
’देवस्थानातील देवाचे दर्शन कसे घेतले 
की अधिक पुण्य लाभते?’

एक म्हणाला, 
’मनोभावे हात जोडून घरुन केलेला नमस्कारही 
देवाला पोचतो.’; देवस्थानच्या ’कार्यकर्त्यांनी’ 
त्याला घरीच गाठला, यथास्थित पूजा करून 
इस्पितळात पोचवला.

दुसरा म्हणाला 
’घरच्या प्रतिरूप मूर्तीचे दर्शन घेतले तरी 
देवस्थानात जाऊन दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.’
देवस्थानने स्वामित्वहक्क कायद्याखाली त्याच्या
देव्हार्‍यातील मूर्ती जप्त करून नेली. 

तिसरा म्हणाला,
’रस्त्यावरुन गाडीवरुन जाताजाता एका हाताने
केलेला नमस्कारही पुरेसे पुण्य देऊ शकतो.’
देवस्थानने दारासमोर भिंत बांधून बाहेरुन
फुकट दर्शन घेणार्‍यांचा बंदोबस्त केला.

चवथा म्हणाला,
’आत पाऊल न टाकता दारात उभे राहून घातलेले
गार्‍हाणेही आतला देव सहज ऐकू शकतो.’
देवस्थानने गाभार्‍यासमोर असलेले दार चिणून
उजव्या बाजूने प्रवेश देणे सुरू केले.

पाचवा म्हणाला,
’देवस्थानात दर आठवड्याला षोडशोपचारे पूजा
केल्यानेच त्यातील देवाचा खरा अनुग्रह होतो.
देवस्थानने त्याला आठ पूजांच्या देणगीमध्ये
दहा पूजांचे पॅकेज देऊ केले.

सहावा म्हणाला,
’देवाच्या नावे दरमहा देवस्थानला देणगी 
दिल्यानेच देव अधिक प्रसन्न होतो.’
देवस्थानने भिंतीवरील देणगीदारांच्या यादीत
त्याचे नाव जाड टाईपात रंगवले.

सातवा म्हणाला,
’देवस्थानला सर्वस्व दान करून देवासमोर
नतमस्तक झाल्यानेच माणूस पुण्यवान होतो.’
देवस्थानने त्याच्या नावे काळ्या पाषाणाची
एक पायरी देवाच्या पायाशी बसवली.

आठवा म्हणाला,
’देवस्थानाला भरपूर देणग्या मिळवून देत
संपूर्ण कळस सोन्याने मढवला की देव
प्रसन्न होतो नि मरणोत्तर स्वर्गलाभ होतो.’
देवस्थानने त्याला ताबडतोब संचालकांमध्ये
सामावून करून घेतला.

नववा म्हणाला,
’श्रीमंतांच्या उत्पन्नाच्या सहा टक्के
देवस्थान कर सरकारने घ्यावा.’
त्याच्या निवडणूक खर्चाचा भार 
देवस्थान समितीने उचलला.

दहावा म्हणाला...
... 
तो काय म्हणाला, 
त्याला देव प्रसन्न झाला का,
ठाऊक नाही;
...
पण सध्या सारे संचालक मंडळ
त्याच्या दाराशी हात जोडून उभे असते.

- oOo -

कवितेसोबत जोडलेले छायाचित्र https://www.123rf.com/photo_27699327_locked-temple-door.html येथून साभार.


हे वाचले का?

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

कुंपण

TheFence
आम्हा दोघांच्या घरांमध्ये 
एक प्राचीन कुंपण ;
कधी घातले, कुणी घातले
आणि मुख्य म्हणजे का घातले...
ठाऊक नाही !
पण त्याचे घर तिकडचे
आणि माझे इकडचे,
इतके मात्र पक्के ठाऊक.

त्याला त्याचे आवार सुंदर हवे,
आणि मला माझे.
कुंपणाच्या माझ्या बाजूने
एक एक काटा उपसून
त्याच्या आवारात भिरकावला,
आणि फक्त फुले शिल्लक ठेवली.
त्यानेही तिकडच्या बाजूने 
नेमके तसेच केले असावे. 

आता माझ्या आवारात 
विविधरंगी फुलांचा सडा !
कुंपणावरुन डोकावून पाहिले
तर मी फेकलेले काटे
तो कुरवाळतो आहे.

त्याने माझ्या हातातील 
फुलांकडे पाहिले,
आणि हसून म्हटले,
’वेड्या, फुले सोडून काटे
का कुरवाळतो आहेस.’

आता आम्ही दोघेही दिङ्मूढ.
ऐतिहासिक कुंपण कुरवाळताना
हे काट्या-फुलांचे गणित
दोन्ही आवारात कसे चुकते आहे ?


- oOo -

हे वाचले का?

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

फूटपट्टी

DonkeyWithARuler
https://www.wonkeedonkeetools.co.uk/ येथून साभार.
कुणी म्हणतं,
’हे जग माझ्या हिरव्या फूटपट्टीने मोजले तर,
हवे त्याहून अधिक लांबीचे आहे, 
सबब ते पापी आहे.’ 

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या भगव्या फूटपट्टीने मोजले तर.
हवे त्याहून कमी लांबीचे आहे, 
सबब ते पापी आहे.’ 

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या लाल फूटपट्टीने मोजले तर,
हवे त्याहून जास्त रुंदीचे आहे, 
रुंद पंजाच्या माणसांना धार्जिणे आहे.’

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या निळ्या फूटपट्टीने मोजले तर, 
हवे त्याहून कमी रुंदीचे आहे, 
सामान्यांची मुस्कटदाबी करणारे आहे.



कुणी म्हणालं, ’
फूटपट्टी मला सोयीची मोजमापे देत नाही. 
सबब ती बदलली पाहिजे.’ 

कुणी म्हणालं,
’मोजणी केल्याने डावं-उजवं करण्यास प्रोत्साहन मिळते.
सबब फूटपट्टी शोषकांची हस्तक आहे.’

कुणी म्हणालं,
’लाकडीऐवजी प्लास्टिकची फूटपट्टी वापरुन 
मोजल्याने माझी उंची कमी मोजली गेली.’

कुणी म्हणालं, 
’बुटक्या लोकांनी तयार केलेली फूटपट्टी,
आम्ही उंच लोकांनी का वापरावी?’

कुणी म्हणालं, 
’फूटपट्टीची लांबी एक फूटच असली पाहिजे,
हा आमच्या विरोधकांचा कावा आहे.’ 

कुणी म्हणालं,
’तिच्यावरील मिलिमीटरच्या खुणा हा तिने
मेट्रिक व्यवस्थेशी केलेल्या व्यभिचाराचा पुरावा आहे.’ 

...

फूटपट्टीला कान नसतात ; तरी ती ऐकत असते,
सार्‍यांना समजावून सांगू पाहते. पण...
तोंडच नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सहन करीत निमूटपणे मोजणी करत राहते.

- oOo -

हे वाचले का?