इतिहासातील व्यक्तिरेखांना खांद्यावर घेऊन ’बाय असोसिएशन’ आपणही ग्रेट आहोत हे मिरवण्याची संधी लोक साधू इच्छितात. ती व्यक्तिरेखा आपल्या जातीची आणि/किंवा धर्माची असेल तर तिच्यावर आपला बाय डिफॉल्ट हक्क आहे आणि अन्य जात/धर्मीयांचा नाही असे बजावून तिच्यावर ’रिजर्वेशन’ टाकता येते. त्यातून सामान्यातल्या सामान्याला असामान्यतेच्या भोवती मिरवता येते. जोवर सामान्य असण्यात काही गैर नाही हे मान्य करत नाही, उगाचच श्रेष्ठत्वाची उसनी झूल मिरवण्याचे विकृत हपापलेपण माणसाच्या मनातून जात नाही तोवर हे असेच चालणार. पार्ट्या पाडून, टोळ्या बनवून खेळायला, खेळवायला, हिणवायला आणि माज करायला माणसाला आवडते.
इतिहास उकरून काढून आपली दुकाने चालवणारे जसे धर्मवेडे आहेत तसे जात-माथेफिरूही भरपूर आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षांत घरबसल्या तथाकथित ’खरा इतिहास’ लिहिणार्यांची आणि इतिहासकार म्हणून व्याख्याने झोडित हिंडणार्यांची एक फौजच तयार झाली आहे. राजकारणात तर इतिहासावरील वाद-विवाद हे अर्थकारणापेक्षा, अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या मूलभूत गरजांपेक्षाही महत्वाचे झाले आहेत.
जसे देव नि धर्म हे श्रद्धेचे, विश्वासाचे, आचरणाचे विषय आहेत पण देवस्थाने मात्र या गोष्टी विकणारी श्रद्धेची दुकाने, मॉल्स आहेत, तसेच इतिहासाचा अभ्यास हा वेगळा मुद्दा आहे आणि त्यावरची अस्मितेची राजकारणे हा वेगळा. पण देवस्थाने ताब्यात घेऊन त्यांचा प्रचंड पैसा लोककल्याणासाठी वापरा म्हटले की साध्यासुध्या श्रद्धाळूंच्याच भावना अधिक दुखावतात, ज्यांच्या आड दुकानदारी करणारे सुखेनैव जगत राहतात. त्याच प्रमाणे इतिहासावर आधारित अस्मितेच्या राजकारणाला विरोध म्हणजे आमच्या ’वैभवशाली इतिहासा’ला डाग लावण्याचा प्रयत्न हा समज सामान्य करून घेत आहेत तोवर इतिहासाची दुकानदारी करणारेही त्यावर आपली पोळी भाजून घेतच राहणार आहेत.
श्रद्धाळूंनी श्रद्धेच्या बाजाराला विरोध केल्याखेरीज, धार्मिकांनी धर्मवेड्यांना विरोध केल्याखेरीज आणि इतिहासप्रेमींनी इतिहासावर आधारित राजकारणाला विरोध केल्याखेरीज हे कमी होणार नाही. पण दुर्दैव असे की एखादा श्रद्धाळू जसा तर्कानुसार योग्य ते सांगणार्या नास्तिकापेक्षा आपल्या धर्माच्या गुंडाला अधिक धार्जिणा होतो, तसाच इतिहासप्रेमीही ’आपल्या जातीला/सोयीचा’ इतिहास सांगण्यावर अधिक मेहेरबान असतो. किंवा असे म्हणून की या दोन छटांमधला फरक त्या त्या व्यक्तींना समजत नसावा. समजुतीपेक्षा, जाणीवेपेक्षा, विचारापेक्षा टोळीची मानसिकता अजूनही बळकट आहे. आपण तांत्रिक प्रगती केली असली तरी मानसिक पातळीवर अजून रानटीच आहोत. संस्कृती नावाचे काही अजून जन्मायचे आहे.
इतिहासातून प्रेरणा वगैरे घेता येते हा भंपकपणा आहे. असं घंटा काही घडत नसतं. नवनवे सार्वजनिक उत्सव निर्माण करून धंदेवाईक ’सामाजिक कार्यकर्ते’ निर्माण करण्यापलीकडे यातून काही साधत नाही.
फारसा प्राचीन इतिहासच नसलेल्या अमेरिकेने जी भौतिक प्रगती अल्पावधीतच साधली तिच्या जवळपासदेखील अन्य देश साधू शकलेले नाहीत हे वास्तव आहे. इतिहासाच्या कर्दमात रुतून गतिरुद्ध होऊन न बसल्यामुळे अमेरिकेन जनतेला- कदाचित अपरिहार्यपणे असेल, भविष्याकडे पाहूनच आपला मार्ग आखावा लागला आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.
'आमची आध्यात्मिक प्रगती पहा' म्हणणारे भोंदू, मूर्ख असतात. आध्यात्मिक प्रगती ही केवळ अध्याहृत बाब आहे. तिचे मोजमाप करता येत नसल्याने दोनशे पट आहे म्हणणाराही बरोबर नि अधोगती झाली म्हणणाराही बरोबरच असतो. आणि तसाही तिचा व्यवहारात शून्य उपयोग असतो.
भूतकाळात आपल्या अस्मितेची, अभिमानाची स्थाने शोधणारे वर्तमानात संपूर्ण नालायक असल्याची अप्रत्यक्ष कबुली देत असतात. निदान तरुण पिढीने- ज्यांच्यासमोर अधिक व्यापक भविष्य शिल्लक आहे, तरी असल्या भंपक इतिहास-अस्मितेच्या नादी न लागता आपले भवितव्य अधिक चांगले असण्यासाठी आज काय करावे लागेल यावर विचार आणि कृती करण्यात अधिक वेळ खर्च करावा. इतिहासातील व्यक्तिरेखांना उचलून उत्सव साजरे करण्यात नि ’त्यांच्या’ (गट कसाही मोजा) व्यक्तिरेखा कशा कमअस्सल आहेत यावर आपली ऊर्जा नि वेळ खर्च करून वर्तमानाची वाट लावण्यापेक्षा भविष्यासाठी तो खर्च करावा.
इथून पुढच्या आपल्या अभ्यासक्रमांतून इतिहास हा विषय बाद करून फक्त भविष्यकालीन उपयुक्ततेचे विषय शिकवावेत यासाठी इतिहास हा विषयच बाद करून टाकावा. माझ्या मते देशाचे काडीचेही नुकसान होणार नाही. उलट काही पुतळे उभे करणे वाचेल की काही हजार कोटींचा चुराडा होणे वाचवता येईल.
पण तरीही तो अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांना येल अथवा ज्ञानेश्वर विद्यापीठात एक अभ्यासक्रम काढून द्यावा. तिथे किती प्रेरणा घ्यायची ती घ्या म्हणावं. फक्त त्याचं अभ्यासक्रमात कोणतंही क्रेडिट देऊ नये. प्रशासकीय अभ्यासक्रमातूनही तो विषय वगळून टाकावा.
एकुणच इतिहास हा प्रकार खरा वा खोटा नसतोच, तो फक्त सोयीचा वा गैरसोयीचा असतो इतके. सोयीचा तो खरा, गैरसोयीचा तो खोटा. एरवी इतिहास हे खरंतर एक आकलन (perception) असते इतकेच. त्यावरुन भांडणारे सार्वजनिक मूर्ख असतात, स्वार्थी असतात, कुणाचा तरी द्वेष करून आपले श्रेष्ठत्व स्वत:च जाहीर करु पाहण्यास हपापलेले असतात इतकेच.
-oOo-