-
(प्रसिद्ध समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांनी फेसबुकवर << हे भलतंच काय झालंय आपलं? >> असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या अनुषंगाने मांडलेला हा विचार, एकाच वेळी सर्व बाजूंचा मार खाण्याबद्दल ख्याती असणार्या रमतारामांचा.)
...हे आपल्यापुरतं प्रत्येकाने तपासून पहायला हवं.
ज्यांचा “माझ्या गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग समर्थनीय आहे, पण ‘त्यांच्या’ गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग मात्र समर्थनीय नाही ” असे उघड विषमतावादी, वर्चस्ववादी मत आहे, त्यांचा मुद्दा मी सोडून देतो. निदान ते आपल्या एकांगी भूमिकेशी प्रामाणिक तरी आहेत. पण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेचा उद्घोष करतात, आपली न्यायबुद्धी जिवंत असल्याचा किंवा आपण समतोल विचाराचे असल्याचा दावा करतात, त्यांच्यासाठी हा वरचा प्रश्न आहे.
प्रश्न अगदी वाजवी आहे. ‘आपण’ बदललो, आपण वाहवत जाणारे मुद्दे बदलले म्हणूनच संघटन उभे करणार्यांनी ते मुद्दे उचलले. ढेकर येईतो पोट भरलेले शहरातील व्यक्तिवादी, उच्चशिक्षित, उच्चवर्णीयदेखील ज्या प्रकार फुटकळ अस्मितेच्या लढाया हिरिरीने लढवत असतात ते पाहता मुळातच एका समाजगटाला धरून राहणे ही बर्याच प्रमाणात अपरिहार्यता असलेला सर्वसामान्य व्यक्ती याबाबत किती पायर्या खाली उतरली असेल याची कल्पना करता येईल.
दीर्घकालीन विधायक कार्याचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणे, पटवणे फारच अवघड असते. त्यामुळे त्यापेक्षा एका बाजूला कुण्या स्वयंघोषित त्रात्याने ‘याचे परिणाम आता दिसणार नाहीत, दीर्घकालीन उपाय आहे हा.’ ही कोणत्याही कार्यकारणभावाशिवाय मारलेली थाप एकीकडे चालवून घेत असतानाच, ताबडतोब रिजल्ट देणार्या मोडतोडीच्या घटना - एक प्रकारे सूडाच्या - लोकांना अधिक आकर्षक नि ‘एकदाचं काहीतरी केलं ब्वा’ म्हणून समाधान देतात.
आज* पुतळा फोडला, फेकून दिला, म्हणून राग राग करणार्या किती जणांना बाबरी मशीद पाडल्याबद्दल आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या, किंवा ते कृत्य आजही अभिमानाचे वाटते याचा शोध घेतला, तर त्यांचा दांभिकपणा उघड होईल.
https://joshuaingle.com/2020/08/my-group-is-always-right/ येथून साभार. येथील संवादही या लेखनाला पूरक असाच आहे.मला न पटणारी गोष्ट कायदा हातात घेऊन नष्ट करणे (वर्ष-दीड वर्षांपूर्वी हत्या झालेला अख्लाखही आठवायला हरकत नाही.) मलाच बरोबर समजते, ‘इथे न्याय होत नाही म्हणून मी कायदा हातात घेणार’ हे जोवर आपण स्वतःसाठी, स्वतःच्या गटासाठी समर्थनीय मानतो, तेव्हाच ते दुसर्यासाठी, त्याच्या गटासाठी समर्थनीय होऊन जाते. कारण त्याच्या सोयीच्या प्रसंगी ‘इथे न्याय होत नाही म्हणून कायदा हातात घेणे समर्थनीय आहे’ असा त्याचाही दावा असतो. आणि जर कायद्यासमोर, घटनेसमोर सारे समान असतील, तर दोन्ही गटांचे कायदा मोडण्याचे समान समर्थन वा निषेध करावा लागेल. जर एकावेळी समर्थन नि दुसर्यावेळी निषेध अशी भूमिका घेणार असू तर आपण दुटप्पी असतो हे समजून जावे... इतकेच.
अर्थात हे कायद्यासमोर, घटनेसमोर सारे समान मानणार्यांसाठी, काही गटांना आपले हक्क अधिक असायला हवेत असे वाटते त्यांचा मुद्दा सोडून द्या. ते सरळच विषमतावादी म्हणता येतील.
ज्या देशात बहुसंख्येचे मूलभूत प्रश्न अजून गंभीर आहेत, तिथे अस्मितेच्या प्रश्नावर माणसे दिवसचे दिवस वाया घालवतात, सत्ताधारी नि विरोधक मूलभूत प्रश्नांपेक्षा याबद्दल अधिक आरोप-प्रत्यारोपात रमतात. आज निवडणुकीची चाहूल लागताच वेगवेगळे पक्ष प्रश्न घेऊन आंदोलन करण्याऐवजी ‘होम मिनिस्टर’, अनेक बक्षीसे जिंकायची संधी देणारी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या नावाखाली करमणुकीचे कार्यक्रम, ज्येष्ठांना देवदर्शनाची सहल असे कार्यक्रम आयोजित करतात.
आश्वासनांमधे स्थानिक पातळीवर फ्री वाय-फाय तर राष्ट्राच्या पातळीवर बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी वगैरे चमकदार वाटणारी पण थोडे खोलात गेले तरी सर्वस्वी निरुपयोगी आहेत हे अर्धशिक्षितालाही सहज समजू शकेल अशा पातळीवरची आश्वासने दिली जातात.
त्याचे कारण आपल्या नेत्यांनी आपल्याला अगदी योग्य जोखले आहे. नेते अध:पतित नाहीत, आपण अध:पतित आहोत, थिल्लर पातळीवरचे जिणे जगतो आहोत. आपण घसरलो आहोत म्हणून नेते घसरले आहेत. पण राजकारणात सत्ताधार्यांसह विरोधकांना, समाजकारणात दलितांपासून ब्राह्मणांना, या गावापासून त्या गावापर्यंत सार्यांना दोषाचे धनी ‘ते’ आहेत अशी बोटे मोडून मोकळे व्हायची इतकी सवय झाली आहे, की समस्या समोर आली की उपायांऐवजी कोणाकडे बोट दाखवता येईल याचा विचार आधी होतो आहे. ही आपला देश ‘महान’ होण्याची चाहूल आहेच... फक्त महानतेची व्याख्या थोडी बदलून घ्यायला हवी आहे.
- oOo -
* संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला.
---
(ते तत्त्वज्ञान घाला खड्ड्यात, अमुक बाबतीत तुमचे मत काय ते सांगा हो ... हा याकूबच्या फाशीच्या वेळेसह वेळोवेळी विचारला गेलेला प्रश्न. त्या प्रश्नातच वेगवेगळ्या वेळी, वेगळ्या गटांच्या वा व्यक्तींच्या संदर्भात परस्परविरोधी सोयीच्या भूमिका घेण्याची प्रवृत्ती स्पष्ट दिसून येते हे सांगणे न लगे. त्यांच्यासाठी हा ताजा कलम.)
माझ्या दृष्टीने पुतळे, स्मारके ही अस्मितेच्या दृष्टीने वा विद्रोहाच्या दृष्टीने सारखीच कुचकामी आहेत. कोण्या श्रेष्ठीचा पुतळा उभारल्याने माणसे त्याच्यापासून काही डोंबलाची प्रेरणा वगैरे घेत नसतात. त्याच्या भोवती दृश्य/अदृश्य देऊळ तेवढे उभारले जाते आणि त्याच्या भोवती उत्सवांचे कर्मकांड आणि त्याच्या जिवावर फुकाची गुरगुर करणार्या कार्यकर्ते ‘म्हणवणार्यांचे’ कोंडाळे तेवढे उभे राहाते.
तसंच एखादा पुतळा नष्ट केल्याने तो ज्या व्यक्तिचा आहे तिचे महत्त्व नष्ट होते, असेही मला वाटत नाही. ही सारी फुटकळ प्रतीकांची लढाई माझ्या दृष्टीने वांझ आहे, प्रसिद्धीलोलुपांची आहे. आणि याबाबतीत मी या समाजातील प्रातिनिधिक व्यक्ती अजिबातच नाही याची मला चांगलीच जाणीव आहे.
---
संबंधित लेखन: नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे
‘वेचित चाललो...’ वर :   
पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती      
बुधवार, ४ जानेवारी, २०१७
आपण निषेध विशिष्ट घटनेचा करतो की प्रवृत्तीचा...?
हे वाचले का?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)