गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

’आधार’ जीवा...

सर्वप्रथम व्यक्तिस्वातंत्र्याचा यथायोग्य वापर केल्याबद्दल न्या. चंद्रचूड यांचे अभिनंदन. परंतु याचा अर्थ मी त्यांच्याशी सहमत आहे असा मात्र नाही. (हे दोन्ही एकाच वेळी कसे असू शकते हे काहींच्या चटकन ध्यानात येणार नाही. पण पुढे वाचा.)

AadharFraud

धन-विधेयक म्हणून पास करणे आणि टेलिफोन/बँक सक्तीबाबत त्यांच्या मताशी सहमत. पण सरकारी योजनांबाबत नाही.

जर खासगी बँका कर्ज देताना आपली नियमावली तयार करु शकतात तर सरळसरळ सहानुभूती म्हणून, तुमची जबाबदारी स्वीकारुन सवलती देऊ करणारे सरकार आधारची सक्ती का करु शकत नाही? त्या योजनांचा गैरवापर टाळण्यासाठी, सुसूत्रपणे ती राबवण्यासाठी, प्रत्येक लाभधारकाला युनिकली आयडेन्टिफाय करण्यासाठी आधार चा वापर सक्तीचा केला तर काय चूक आहे? बँका साल्या तुमच्याकडून कर्जावर व्याज घेतात नि वर तुमचे ते घर मॉर्गेज करुन घेतात, तुमच्या सिबिल स्कोर पासून तुमच्या उत्पन्नाचे सत्राशे साठ पुरावे मागतात. तुम्ही ते निमूटपणे त्यांना देता. बँकेला सॅलरी स्लिप, आयटीआरची कॉपी, फोन नं., पत्त्याच्या पुरावा... अशा ढीगभर गोष्टी देता, वर व्याजही देता, ईएमआय चुकला तर दंडही.

इथे कुणी उलट दिशेने तुमचा फायदा करुन देत असताना काही नियम व अटी घालून दिल्या तर तुम्हाला व्यक्तिगत हक्काचा भंग वाटतो? इथे सरकार तुम्हाला काही सवलती देऊ करणार तर तिथे तुमच्या मांजरीचा वाघ होतो?

न्या. चंद्रचूड म्हणतात की यूआयडीएआय ने ग्राहकांच्या माहिती संरक्षणाची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. हे अगदीच मान्य. ती त्यांनी घ्यायलाच हवी. पण दुसरा मुद्दा असा की जर त्याचा वापर केवळ सरकारी सवलत योजनांपुरता राहणार असेल तर त्या माहितीला फक्त सरकारलाच अ‍ॅक्सेस असणार आहे. अन्य कुठेही मी आधार नं देत नसल्याने किंवा सक्ती नसल्याने इतर कुणाही खासगी पार्टीला या माहितीला अ‍ॅक्सेस देणे यूआयडीएआयला बंधनकारक नसल्याने ते सरसकट नाकारु शकतात. आता ही सारी माहिती केवळ सरकारपुरती राहते. (हॅकिंगचा मुद्दा वेगळा आहे. ते बँकेचेही होते. म्हणून आपण कागदी लेजरवर पुन्हा कामाला सुरुवात करा म्हणत नाही.) मग आक्षेप कशाचा आहे.

(व्हॉटअबाउटरी सुरु) आज मी जेव्हा एखादा नवीन मोबाईल नं घेतो तेव्हा जो जाहिरातींचा भडिमार होतो त्याचे काय? मी एका बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले की हटकून इतर बँकांचे फोन सुरु होतात, हे कसे? पहिल्या बँकेकडून माझी माहिती 'विकली' गेल्याखेरीज हे शक्य आहे काय? हीच गोष्ट टेलिफोन कंपन्या, ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्स यांचीही आहे. तुमचा मोबाईल नं तुम्ही कोणत्याही एका आस्थापनाकडे दिलात की त्यासारखाच व्यवसाय करणारे अचानक तुमच्याकडे धावू लागतात.(याला अर्थातच तुमचा अँड्रॉईड फोन आणि त्यावरील फुकट अ‍ॅप तसंच गुगलसमोर नागवे होऊन उभे राहण्यास दिलेली कबुली कारणीभूत होते.)

आज मला नको असलेल्या जाहिरातींचा भडिमार थांबवण्याचे कोणातेही साधन माझ्याकडे नाही. दिवसाला न वाचता वीस-पंचवीस मेसेजेस, ईमेल्स डिलीट करत बसणे हे माझ्या वैयक्तिक आयुष्यावर अतिक्रमण आहे असे आम्ही मानत नाही. (डीएनडी ही भंपक सर्विस आहे. न्हाणीला बोळा नि दरवाजा उघडा ही म्हण सार्थ करणारी.) हे सारे खासगी मंडळींचेच प्रताप आहे. त्याबाबत फार काही कलकलाट होत नाही. त्याबाबत काही करावे असा आवाज आम्ही उठवत नाही. पण सरकारने तुम्हालाच सवलती देण्यासाठी माहिती जमवली की 'सिक्युरिटी' म्हणून कलकलाट? तुमच्या माहिती संरक्षणाची कोणती जबाबदारी टेलिकॉम कंपन्या वा बँका घेतात? उलट त्यांच्या फॉर्म्समध्ये त्यांच्या बाजूने इन्डेम्निटी क्लॉज असतात. मग यूआयडीएआय घेत नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे. तुमच्या डोस्क्यावर व्याजाचा बोजा लादणारे ही जबाबदारी घेणार नाहीत, पण सरकारने मात्र तुम्हाला सवलती द्या नि वर ही जबाबदारीही घ्या हा माज कुठला? (व्हॉटअबाउटरी संपली)

आधारच्या खासगी क्षेत्रातील सक्तीला माझा ठाम विरोध आहेच. तिथे माझी माहिती अधिकच उघड्यावर येते, कोणताही अधिकार नसलेले चेहरा नसलेले, ज्यांची ऑथोरिटी कुठे रेजिस्टर्डही नाही अशा व्यक्तींच्या हाती ती जाते. आणि कुणा-कुणाकडे जाते यावर माझे नियंत्रण नसते. प्रॅक्टिकली बाजारात नागवे उभे राहावे अशी स्थिती असते. विशेषत: टेलेकॉम कंपन्यांच्या बाबत. तुमच्या डेटामधील त्यांना शक्य ते सारे विकून ते पैसे करत असतात हे उघड गुपित आहे.

सरकार गैरवापर करणार नाही का? नक्की करणार. सत्ताधारी याचा वापर करुन घेणार. पण तुमच्याकडे सवलती न घेण्याचा पर्याय आहेच. आधार कार्ड काढूच नका. मग तुम्ही सरकारपासून सेफ. किमान इतका पर्याय तरी तुमच्याकडे आहेच. (अर्थात या दीडशहाण्या सरकारने सक्ती करुन त्याच वेळी नवी आधार कार्ड काढण्याचे पर्याय बंद करुन जो छळवाद केला तो काही भरून येत नाहीच. आणि ज्यांनी आधीच हे कार्ड काढले आहे त्यांना पर्याय नाही. पण त्यांचेही जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहेच. त्याबद्दल फारसे काही करता येणारच नाही.)

आयटी रिटर्न्ससाठी काढावे लागेल. पण त्या पलीकडे कुठेच तो नंबर देऊ नका. म्हणजे फार तर सरकारला तुमच्या उत्पन्नाचे स्रोत कळतील. ते तसेही पॅन आणि रिटर्न्समधून कळतातच. पण त्याचबरोबर तुमच्या प्रॉपर्टीचे कनेक्शनही सरकारला हवे आहे, जेणेकरुन तुमच्या उत्पन्नाचे विविध स्रोत जुळवून तुमचे वास्तविक उत्पन्न त्यांना समजून घ्यायचे आहे. तो त्यांचा हक्क आहेच की.

आम्हाला सरकारी सवलती तर हव्या पण आधार देणार नाही हा बाणेदारपणा मूर्खपणाचा आहे. मला बँकेचे कर्ज हवे, पण मी माझ्या उत्पन्नाचा दाखला देणार नाही, कुठले घर घेणार ते सांगणार नाही असा बाणेदार पण घरकर्ज घेताना दाखवलात तर बँक कर्ज देईल का? 'माय स्कीम माय रुल्स' असे म्हणण्याचा हक्क सरकारला का नसावा?

-oOo-


हे वाचले का?

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

अशी ही पळवापळवी

‘अशी ही बनवाबनवी’ला तीस वर्षे पुरी झाल्याच्या निमित्ताने थोरले महागुरु नव्या कोर्‍या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. चित्रपटाचे नाव आहे ‘अशी ही पळवापळवी’.

OriginalQuartet

मुख्य भूमिकांत विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि नीतिन संदेसरा यांना कास्ट केले आहे. चित्रपटातील धनंजय माने गावाकडून पुण्याकडे प्रयाण करतात, तर या रिमेकमध्ये इंटरनॅशनल लेवल आणण्याच्या दृष्टीने ते मुंबईहून लंडनला पलायन करतात असा अपग्रेड देण्यात आला आहे. मल्ल्या प्रथम परदेशी पोचल्याने धनंजय मानेंच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे असा त्याचा दावा होता. पण ‘मेहुल आणि नीरव यांचे आल्रेडी नाते असल्याने त्यांना माने बंधूंच्या भूमिकेत कास्ट करणे योग्य ठरेल’ असे थोरल्या महागुरुंनी त्यांच्या गळी उतरवले आहे. त्यामुळे आता मल्ल्या आणि संदेसरा यांना स्त्री-भूमिकांत पहायची पाळी आपल्यावर येते की कहानी में पुन्हा ट्विस्ट येतो हे पाहायचे.

लीलाबाई काळभोर यांच्या भूमिकेसाठी प्रेमळ स्वभावाच्या सुषमाताई, तर विश्वास सरपोतदार यांच्या भूमिकेत जेटलीकाका फिट्ट बसतात. उगा कन्ट्रोवर्सी नको म्हणून त्यांच्या पत्नीचे पात्र ड्रॉप करण्यात आले आहे. बळीची भूमिका दस्तुरखुद्द थोरल्या महागुरुंनी करावी की धाकल्या महागुरुंना द्यावी हे अजून ठरलेले नाही. ‘लीलाबाई काळभोर यांचे स्त्री पात्र लाला काळभोर या पुरुष पात्राने रिप्लेस करुन ती भूमिका थोरल्या महागुरुंनी करावी आणि बळीची भूमिका मला द्यावी’ अशी गळ धाकल्या महागुरुंनी घातली आहे. परश्याच्या सासर्‍याच्या भूमिकेत संबित पात्रांचा वशिला फिट्टं बसल्याचे खात्रीलायक रित्या समजते. सतत आग ओकत बोलणे या क्वालिफिकेशनवर रविशंकर प्रसादही शर्यतीत होते; पण ते गरजेपेक्षा अधिक विषयाला धरुन बोलत असल्याने थोरल्या महागुरुंची त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली आणि त्यांचा पत्ता कट झाला.

स्त्री पात्रांच्या बाबत विचार करताना ‘आपापली हिरोईन हीरोने स्वतःच शोधून आणावी नि आपल्याच मानधनातला हिस्सा तिला द्यावा (एवढा पैसा तुमच्या पदरी पडलाय फुकट, त्यातला थोडा खर्च करा की)’ असे थोरल्या महागुरुंनी चारही नायकांना बजावले आहे. आता फक्त पटकथा लिहायची आहे. “ते ही काम मलाच द्या मी त्यात ‘वंदे मातरम्’ पासून ‘मंदिर वहीं बनाएंगे’ पर्यंत आणि ‘कुणीतरी जाणार जाणार गं’ वगैरे सगळी गाणी बसवेन” अशी ऑफर संबित पात्रा यांनी दिली आहे. पण ‘हा चोर चॅनेल-चर्चेप्रमाणे एकटाच सगळे फुटेज खाईल’ हे ठाऊक असल्याने ‘मीच आहे सर्वात मोठा फुटेजकखान’ म्हणवणार्‍या थोरल्या महागुरुंनी त्याला अजून टांगले आहे.

NewCast

‘धनंजय मानेंनी नेलेली केरसुणी विश्वास सरपोतदारांनी परत नेली आहे आणि तिने ते अंगण झाडताहेत. आणि रस्त्याच्या समोरच्या बाजूला भिंतीवर ‘भारत स्वच्छता अभियान' ची जाहिरात आहे नि त्यावर थोरल्या महागुरुंची छबी विराजमान आहे’ अशा सीनने फटमार होणार आहे. ‘हिचकॉक जसा केवळ छबीरुपाने आपल्या चित्रपटात असे तसे थोरले महागुरु या छबीरूपानेच त्यात असावेत’ असा कुत्सित सल्ला आपल्याला काही रोल न मिळाल्याने रुसलेल्या राजनाथसिंहानी दिला. पण ‘गुळाचा गणपती’ हा जसा ‘सबकुछ पुलं’ चित्रपट होता तसा ‘अशी ही पळवापळवी’ सबकुछ मीच असावा असा ध्यास घेतलेल्या थोरल्या महागुरुंनी तो अर्थातच कानाआड केला. फटमार अडवानींच्या हस्ते व्हावे हा पूज्य जेटलीजींचा सल्लाही त्यांनी असाच धुडकावून लावत तो आद्यपूजेचा मान मा. शाजींना द्यावा असे त्यांनी ठरवून टाकले आहे.

परशाचे वगनाट्य गुरु म्हणून ड्रामादेवबाबा चमकून जाणार आहेत. तर डब्बल श्रींना लीला/लाला काळभोर यांचे गुरु (तेच ते परशाला ‘प्रसादाचा आंबा’ देणारे) यांची भूमिका देण्यात येणार आहे. पण हे अजून फिक्स नाही कारण त्या गुरुंच्या भूमिकेवर आपलाच हक्क आहे असे सांगत कुणी एक स्थानिक आंबेवाले गुरुजी नि एक मौलाना हजर झाले आहेत. त्यांचे भांडण मिटेतो त्यांचे शॉट्स घेऊ नयेत असे महागुरुंनी ठरवले आहे.

हा इन्टरनॅशनल सिक्वेल (सर्व हीरो लोक परदेशी जातात याची कृपया नोंद घ्यावी) असल्याने ‘सत्तर रुपये वारले’ ऐवजी ‘सत्तर हजार कोटी रुपये वारले’ असा बदल केला आहे. आणि ते ‘नोटाबंदीमध्ये वारले’ असे धनंजय माने ऊर्फ नीरव मोदी सांगतात असा सीन घेतला आहे. परशा बळीला ‘सारखं सारखं त्याच झाडावर काय?’ ऐवजी ‘सारखं सारखं त्याच देशात काय?’ असं म्हणताना दिसेल.

हा चित्रपट ‘रिलायन्स एन्टरटेनमेंट अँड डिफेन्स प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली फ्लोअरवर जाईल. यात मी ही काम करणार असा घोषा धाकल्या अंबानींनी लावला होता. पण ‘तुम्ही आधी देशाबाहेर तर जा, सिक्वेलमध्ये तुम्हाला घेतो’ असे म्हणून थोरल्या महागुरुंनी त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तात्कालिक तडजोड म्हणून जसे यशवंत सिन्हा नाहीत तरी जयंत सिन्हांना घ्यावे लागते, तसे सौ. धाकल्या अंबानी यांना त्यांच्या चित्रपटीय अनुभवाला प्राधान्य देऊन विश्वास सरपोतदार यांच्या पत्नीचे किंवा परशाच्या कमळीच्या मैत्रिणीचे काम द्यावे असा विचार थोरल्या महागुरुंच्या डोक्यात घोळतो आहे.

बाकी तपशील जसा हाती येईल तसा देण्यात येईल. अधिक माहितीसाठी या जागेवर लक्ष ठेवा.

-oOo-

---
संबंधित लेखन:

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >>
---


हे वाचले का?

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

अफवेच्या प्रसाराची साधने

इंदिराजींच्या काळात पहिली अणुचाचणी झाली त्या दिवशी त्या दिवशी भारत हा इच्छा असेल तेव्हा अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो हा संदेश भारताला बळकट करुन गेला. त्यामुळे इतिहासात तो दिवस कधीच विसरता न येण्याजोगा.

त्याचप्रमाणे आजचा दिवसही कधीच विसरता न येण्याजोगा! जसे अण्वस्त्र हे लष्करीदृष्ट्या अमोघ अस्त्र तसेच 'छद्म' किंवा सोप्या भाषेत अफवा हे सामाजिक/राजकीय दृष्ट्या अमोघ अस्त्र. याची पहिली व्यापक चाचणी आजच्याच दिवशी १९९५ साली झाली. ती कमालीची यशस्वी झाली.

ShivShaktiDazzles

’गणपती दूध पितो आहे.’ अशी भुमका नव्यानेच प्रचलित होऊ लागलेल्या इंटरनेटजन्य माहिती-माध्यमांतून उठली. जो उठतो तो आपल्या घरचा गणपती कसा दूध प्याला याचे रसभरीत वर्णन समाजमाध्यमांवर करु लागला. कुणी फोटो टाकले. नवीनच हाती आलेल्या मोबाईलच्या माध्यमांतून लोक अहमहमिकेने ही अफवा पुढे पसरवू लागले. चॅनेलच्या मंडळींनी आपले बोंडुक घेऊन आमंत्रण दिलेल्या सेलेब्रिटी आणि राजकारणी मंडळींच्या घरी धाव घेतली. तिथून बाप्पांना दूध पाजण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम लाईव्ह सुरू झाला.

या सार्‍या अहमहमिकेमध्ये केवळ केशाकर्षणाने खेचले गेलेल्या आणि मूर्तीला स्पर्श करताच खाली ओघळून तिच्या पायाशी साठलेल्या दुधाच्या थारोळ्याकडे सर्वांनी दुर्लक्षच केले. पण काही सुज्ञांनी केवळ दूधच नव्हे तर पाण्यासह इतरही काही द्रव हाच गुणधर्म दाखवतात हे सप्रमाण सिद्ध केले. इतकेच काय, तर इतर देवांच्या मूर्तीच नव्हे तर माणसांचे पुतळेही ’दूध पितात’ हे सिद्ध केले.

पण बुद्धिहीन झुंडीपुढे सुज्ञांचा आवाज हतबल ठरतो तसेच इथेही झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही 'आमच्या घरचा गणपती दूध प्याला.' म्हणून सांगू लागले. या निमित्ताने राजकारणी, चंदेरी दुनियेतील सेलेब्रिटी, गल्लीबोळातले ’कार्यकर्ते’ यांनी टीव्हीवर चमकून घेतले.

गंमत म्हणजे, 'पटेल आमचेच' म्हणणार्‍यांप्रमाणेच शैव मंडळींनी 'गणपती आमचाच नव्हे का?' अशी बतावणी करत 'शिव-शक्ती डॅझल्स इन इंडिया' अशा हेडलाईन्स छापून मुलाचे थोडे श्रेय वडिलांकडे वळते करण्याचा प्रयत्नही केला.

उपमुख्यमंत्री मा. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे मोजके अपवाद वगळता सारा समाज या चाचणीचा सहज बळी ठरला.

ही चाचणी कमालीची यशस्वी झाली आणि यापूर्वी केवळ सांगोवांगी अफवा पसरवणार्‍या तिच्या कर्त्यांना कमालीचे बळ देऊन गेली. त्या अस्त्राचा वापर करणारे आयटी सेल आज काय काय करामती करतात, त्याचे परिणाम काय काय घडतात हे आपण अलीकडची काही वर्षे पाहातच आलो आहोत.

ही छद्मप्रसाराची चाचणी बुद्धिदात्या गणपतीच्या नावेच व्हावी ही चलाखी अलौकिक आहे, पोखरणच्या विध्वंसक हत्याराच्या निर्मितीलाही 'बुद्ध हसला' चे कवच दिले होते, तसेच* बाबरीच्या विध्वंसाला नेमका ६ डिसेंबर निवडून एका दगडात दोन पक्षी मारण्याइतकेच धूर्तपणाचे.

राजवाडेंनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' यावर बावीस खंड लिहिले आहेत. इथे 'अफवेच्या प्रसाराची साधने' यावर ५६ खंड लिहिले गेले आहेत असे ऐकतो. पण ते खासगी वितरणासाठीच आहेत असे समजते.

-oOo-

* हे 'त्यांना सांगा की' किंवा 'तेव्हा काही नाही बोललात'वाल्यांसाठी.

गणपतींस दूध पिऊ द्या: https://www.loksatta.com/agralekh-news/rumors-on-social-media-1709343/

https://www.jagranjosh.com/general-knowledge/september-21-ganesha-drinking-milk-miracle-1995-science-behind-the-phenomenon-that-shook-the-world-1632131295-1


हे वाचले का?

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हे चित्र... आणि ते चित्र!

आमच्या एका जुन्या मित्राने पुण्याच्या 'महात्मा फुले मंडई'बाबतच्या काही आठवणी तीन-चार दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या. त्यात त्याने 'मंडई विद्यापीठ' असा शब्द वापरला आणि आमच्याही आठवणी जाग्या झाल्या आणि वढाय वढाय असलेल्या मनाने एकावरुन दुसर्‍या अशा उड्या घेत वर्तमानापर्यंत आणून पोचवल्या.

माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले तिला मंडई विद्यापीठ म्हटले जाई. कारण मंडईतील बहुतेक गाळेवाले, मजूर, हळद-कुंकू आदी विकणारे छोटे दुकानदार असे मंडईच्या परिसरातील मंडळींची मुले या शाळेत शिकत. कारण सोपे होते. मंडईपासून चालत वट्ट तीन मिनिटांच्या अंतरावर शाळा. सकाळी पोरगं गाळ्यावर बसलेलं असे. मग बाजार करून बाप साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास परतून गाळा ताब्यात घेई, पोरगं धोकटी उचलून शाळेत.

त्यामुळे शाळेत अठरा पगड जाती पातींची मुले. कांबळेच्या घरी खेकड्याची आमटी असते ही माहिती खासगीत पुरवून खुसू खुसू हसत त्याची थट्टा करणारा कुणी घाटे असला, तरी कांबळे म्हणजे अमुक आणि घाटे म्हणजे तमुक असा जातींचा हिशोब फारसा होत नसे. वर्गातलं सर्वात दुबळं पोर म्हणून माझी जबाबदारी सार्‍या वर्गाने घेतली होती.

पुढे कॉलेज आणि विद्यापीठ या ठिकाणीही मित्रांमध्ये 'सजातीय' फार कमी असावेत. असावेत म्हणतो कारण मला आजही मोजकी आडनावे वगळली तर मला जात ओळखता येत नाही, ओळखण्याची गरज पडली नाही. ते का आवश्यक आहे हे 'जात-वास्तव माहित पाहिजे बाबा' या तर्काआड लपलेले, जातीयवादी असणारे पण वरकरणी पुरोगामित्वाचा आव आणणारे हे मला पटवू पाहतात. मी ते कानावर पडू देत नाही.

एक वर्गमित्र बारामतीचा होता. विद्यापीठातील सवलतीतले जेवणदेखील खरेदी करण्याइतकी त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. कामा-निमित्त अप-डाउन करणार्‍या कुण्या स्नेह्यांतर्फे, बारामती-पुणे एसटी च्या एखाद्या ड्रायवरकरवी त्याचा डबा रोज घरुन येई. एखादे दिवशी आला नाही तर आमचा डबा शेअर करण्याची अथवा कॅन्टिनमध्ये सोबत चलण्याची मागणी तो नाकारे. अगदी क्वचित तो सोबत आलाच तरी त्याचे ते अवघडलेपण मला स्पष्ट दिसून येई.

पुढे तो डी.एड./बी.एड. करुन एका खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागला. अशा शाळेत नोकरी मिळवण्यासाठी काही काळ बिनपगारी काम करावे लागले असणार ही शक्यता आहेच. त्याने ते मला कधीच सांगितले नाही. आई-वडील, धाकटी बहीण यांची जबाबदारी त्याच्या खांद्यावरच होती. बहिणीचे शिक्षण कसेबसे पुरे केले नि तिचे लग्नही लावून दिले. दुर्दैवाने काही वर्षांतच विधवा होऊन दोन मुले पदरात घेऊन ती परत आली. वडिलांच्या निधनानंतर स्वतःची दोन नि बहिणीची दोन मुले, तो स्वतः आणि पत्नी, बहीण आणि आई अशा आठ जणांच्या संसाराचा गाडा तो एका शाळामास्तरच्या पगारावर ओढतो आहे, चारही मुलांना शिकवून मोठे केले आहे.

कधी कामानिमित्ताने तो पुण्यात येतो तेव्हा आवर्जून भेटतो. त्याच्या स्वभावात कोणताही वैताग, तणावाचा लवलेश नसतो. सहज हसतमुख जगणारा माणूस आहे तो. तो स्वतःबद्दल बोलतो, वर्गातील इतर मित्रांची चौकशी करतो, कुणाच्या भेटी वा फोन झाले ते सांगतो आणि माझी चौकशी करतो. माझ्या माफक यशाबद्दलचा त्याच्या डोळ्यात जसा दिसतो, तसा निरभ्र आनंद माझ्या घरच्यांच्या नजरेतही मी कधी पाहिला नाही असे नक्कीच म्हणू शकतो. स्वतःबद्दल सांगताना तो चुकूनही कधी त्याची नि माझी तुलना करत नाही...

... याउलट आयटी इंडस्ट्रीतच झालेला एक 'सजातीय' मित्र आहे. पुढे जरी त्यांचे आर्थिक गणित बिघडले असले तरी पदवीपर्यंतचा काळ मुंबईच्या मध्यवस्तीत दोन प्रशस्त फ्लॅट्स मालकीचे असलेल्या बापाच्या पोटी जन्मलेला. चांगलाच सुखवस्तू. दोन भावांतील हुशार म्हणून आणि लहानपणी आजारी असल्याने अधिकच झुकते माप दिला गेलेला. पुढे लग्नानंतर सासरची बाजू भक्कम, पत्नी हुशार आणि उत्तम कमावती.

WhyNotMe

असे असून सतत आपण कमनशिबी आहोत या रडगाण्यातून बाहेर न येणारा, जिथे आहे तिथे कायमच अस्वस्थ असणारा, शून्य चिकाटी असलेला आणि सतत स्वतःची इतरांशी तुलना करत 'पहा मी कसा मागे राहिलो' म्हणत कण्हत बसणारा. चार वेळा सल्ला विचारायला येणारा, दिलेला सल्ला कधीच न मानणारा. आणि नाकारण्याचे कारण हटकून 'तुझं ठीक आहे...' ,'आता तुझंच बघ...' किंवा ’तुझी गोष्ट वेगळी आहे...’ या वाक्याने करणारा. आपले काय या पेक्षा दुसर्‍याचे काय याची सतत चिंता करणारा इसम.

त्याचे असे असते की तो खूप विचार करतो, किंवा करतो असे त्याला वाटते., मग चार पर्याय घेऊन कसा निवडू विचारायला येतो. आपण त्याला अपेक्षित पर्याय निवडला नाही- अगदी व्यवस्थित कारणमीमांसेसह तो स्वीकारू नये असे सांगितले, तरी त्याच्या तोट्याच्या बाजू पुन्हा पुन्हा सांगणारा किंवा त्याला हव्या त्या पर्यायात याहून अधिक चांगले फायदे कसे आहेत हे सांगत राहणारा... म्हणजे खरे तर त्याने निवडलेल्या पर्यायावर तुमच्याकडून केवळ शिक्कामोर्तब अपेक्षित ठेवणारा. जेणेकरुन पुढे तो निर्णय चुकला असे दिसले तरी त्याच्यासोबत त्याची जबाबदारी तुमच्या पण शिरावर असावी अशी आगाऊ तजवीज करून ठेवणारा.

पुण्याच्या सुखवस्तू वस्तीत हजारेक एक चौरस फुटांचे स्व-मालकीचे घर, उच्चशिक्षित कमावती पत्नी, उच्चशिक्षित सासू-सासर्‍यांचा आणि आई-वडिलांचा भक्कम आधार असून 'माझं काहीच कसं नीट होत नाही' म्हणत सतत या नोकरीतून त्या नोकरीत उड्या मारणारा. आणि नोकरी बदलण्यात इतका उतावीळ की चार नोकर्‍या बदलूनही चार पैसेही आर्थिक वाढ मिळवू न शकणारा.

त्याने आमच्या बारामतीच्या मित्राची भेट घ्यायला हवी. पण असे लोक त्याच्या वर्तुळात कसे असतील, त्याच्या वर्तुळात त्याच्यासारखेच एंजिनियर, उच्चवर्णीय, उच्चभ्रू लोक. त्यांचा उत्कर्ष तो पाहणार नि त्याचा आत्मविश्वास पुन्हा दोरी निसटून विहिरीत पडलेल्या पोहोर्‍यासारखा गडगडत राहणार, हे असंच चालणार. अर्थात आमच्या बारामतीच्या मित्रालाही त्याने 'तुझी गोष्ट वेगळी आहे...' म्हणून काहीतरी ऐकवलं असतं हीच शक्यता अधिक आहे.

या मित्रावरुन आणखी एक चुलत-मित्र आठवला. याच्या संपर्कात जेमतेम एक वर्ष होतो. मी स्वतंत्र राहात होतो तेव्हा आमच्या कॉलनीत राहणारा एक प्राणी आमच्या एका मित्राकडे बुद्धिबळ खेळायला येई. हा हुशार वगैरे अजिबात नव्हता. बुद्धी कमी होती असेही नाही, सर्वसाधारण होती. एक दोन विषयांत गटांगळ्या खाऊन, एक सहामाही जास्ती शिकून ५०-५५% टक्क्याने बी.कॉम. झाला आणि 'नोकरीसाठी फक्त ब्राह्मणांना प्रवेश, कोकणस्थांना प्राधान्य' अशी अलिखित पात्रता असलेल्या बँकेत चिकटला.

असे असूनही 'राखीव जागांनी ब्राह्मणांचं कसं नुकसान केलं.' हा विषय त्याच्या बोलण्यात हटकून येई. दोन-तीनदा झाल्यावर माझ्या अंगभूत उद्धटपणाने 'नसत्या तरी तू काय मोठे तीर मारले असतेस लेका. बँकेने चिकटवून घेतले नसते, तर नोकरी मिळवायला चार वर्षे वणवण हिंडला असतास.' म्हणून फटकावला. माझा फटका कदाचित अनाठायी वैय्यक्तिक असेल (तरुणपणी तेवढी समज असते कुठे?) पण मुद्दा पुन्हा तोच. लायकीपेक्षा अधिक मिळूनही 'मी किंवा माझी जात कशी वंचित' हे रडगाणं...

ही दोनही उदाहरणे सजातीयांची असली तरी ती त्यांची मक्तेदारी आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. या ना त्या संदर्भात हे playing the victim किंवा जिणे अभावाचे असल्याचे रुदन बहुतेक जातींमध्येच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसून येते. म्हणून तर ’तुम्ही फार सोसलं आहे...’ किंवा ’इतरांसाठी तुम्ही फार करता. पण त्याची कुणाला जाणीव नसते.’ अशा प्रस्तावनेने सुरुवात करुन बहुतेक भंड-भविष्यवेत्ते मनाने अशा कमकुवत मंडळींकडून दक्षिणा उपटण्याची तजवीज करत असतात.

पण परत मागे जाऊन बारामतीच्या मित्रासोबत आणखी एका उदाहरणाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मी प्रथम विद्यापीठात शिकवू लागलो, तेव्हा माझ्या वर्गात राजेश पाटील नावाचा एक विद्यार्थी होता. हुशार तर होताच, पण अत्यंत मितभाषी, आपल्या कोषात असलेला दिसे. अर्थात मी शिक्षक असल्याने, मित्र नसल्याने त्याच्या स्वभावाबाबत ठाम विधान करणार नाही. याचा वेश म्हणजे पांढरा शर्ट नि पांढरी पॅंट. त्याला मी अन्य कुठल्या ड्रेसमध्ये पाहिल्याचे मला तरी आठवत नाही. त्याच्या वर्गातील माझे काही विद्यार्थी बोलके होते. त्यांच्याकडून त्याच्याबद्दल समजत गेले.

आमच्या बारामतीच्या मित्राप्रमाणेच त्याची आर्थिक स्थिती नाजूक. त्यामुळे कपड्यांचे मोजके दोन जोड तो वापरायचा. त्याचे गाव बारामतीइतके जवळ नसल्याने - तो खानदेशचा - नाईलाजाने विद्यापीठाच्या विद्यार्थी-भोजनालयात (refectory) जेवायचा. तिथेच गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची जी सोय होती. ती वापरुन त्यातले खर्चाचे थोडे पैसे कमवायचा. चकाट्या पिटणे, कॅंटिनमध्ये टाईमपास हे आपल्यासाठी नव्हे हे त्याने पक्के ठरवून घेतले होते. अभ्यासाचे वर्ग, भोजनालयातले काम आणि नंतर वसतिगृहावर अभ्यास या पलीकडे त्याने वेळ दवडला नाही.

तो  उत्तम गुणांनी उतीर्ण झाला हे वेगळे सांगायला नकोच. पण त्या पुढे तो भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन जिल्हाधिकारी झाला. त्याचे मोठे नाव झाले. पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने आपल्या अनुभवावर आधारित आत्मचरित्र लिहिले, त्याचे शीर्षक होते ’ताई, मी कलेक्टर व्हयनू’. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या अक्षरश: हजारो प्रती खपल्या आहेत. इतक्या वर्षांनंतरही हे पुस्तक कधीच out of print नसते अशी त्याची ख्याती आहे. (बहुतेक पुस्तकांच्या दुकानात आजही उपलब्ध असेल.)

याच्या उलट एक उदाहरण आठवते. हा आणखी एक पाटीलच, पण ज्याला ओ.बी.सी. म्हणतात त्या प्रवर्गातला. घरात वाडवडिलार्जित अशी भरपूर बागायती शेती होती. त्या काळात डाव्या हाताने गिअर टाकावा लागणारी स्कूटर हे खासगी दुचाकी वाहन प्रामुख्याने वापरले जात असे. बाईक हा प्रकार नुकताच कुठे बाजारात आलेला होता. त्याची किंमत पाहता बहुसंख्येला ते परवडत नसे. अशा काळात या विद्यार्थ्याकडे अद्ययावत बाईक होती. त्याचे कपडेही चांगले branded (हा प्रकारही तेव्हा धनकोंसाठीच असे) असत.

हा पाटीलही बुद्धीने वरच्या दहा टक्क्यांत बसेल इतका हुशार. एम.एसी.साठी त्याने ओ.बी.सीं.साठी राखीव जागेवर प्रवेश घेतला होता. खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला असता, तरी पहिल्या दहा टक्क्यांतच त्याला सहज मिळून गेला असता इतके गुण त्याला मिळाले होते. 'तू तसे का केले नाहीस?’ असा प्रश्न त्याला कुतूहल म्हणून त्याला विचारला असता, ’तुम्ही बामणं आमचं चांगलं बघू शकत नाही. आमच्या राखीव जागांवर तुमचा डोळा असतो...’ वगैरे पाच मिनिटे बरसला होता.

त्याचा भर ओसरल्यावर त्याला विचारलं, ’समजा तू तुझी राखीव जागा सोडून खुल्या जागेवर प्रवेश घेतला असतास तर उलट खुल्या प्रवर्गातील - तुझ्या मते आम्हा बामणांची - जागाच कमी झाली नसती का? शिवाय राखीव जागांमधील एक जागा मोकळी होऊन दुर्दैवाने दोन गुण कमी मिळाल्याने प्रवेश न मिळाल्याने बाहेर राहिलेला, तुझ्याच समाजातील एक विद्यार्थी तिथे आत येऊ शकला नसता का? यात आम्हा बामणांचा फायदा होता की तोटा?’

मला नक्की आठवत नाही, पण ओ.बी.सी. राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्यांना तेव्हा फी माफी नसली तरी भरलेली फी परत मिळत असे. खुल्या जागेवर प्रवेश घेतला असता तर ती त्याला परत मिळाली नसती इतकेच. परंतु एका सहामाहीची फी त्याच्या महिन्याच्या पेट्रोलच्या खर्चाइतकी होती. तेव्हा त्याच्या दृष्टीने ती नगण्यच होती. अशा वेळी आपल्याच गटाच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी ती सोडणे त्याला सहज शक्य होते (प्रशासकीय बाबूगिरीमुळे ती परत मिळवणे हे ही एक दिव्यच असे हा ही एक मुद्दा.) पण त्याची त्याला तयारी नव्हती.

माझा मुद्दा समजल्यावर तो थोडा नरमला. पण तरीही ’मी त्या गटातला असल्याने माझाही हक्क आहेच की. मला फी माफी मिळते तर मी का नाही घ्यायची?’ म्हणत कुरकुरत राहिला. मुद्दा हक्काचा नव्हे तर बांधिलकीचा होता; आपल्याच समाजबांधवाला हातही नव्हे तर केवळ एक बोट धरायला देऊन वर आणण्याचा होता. तो त्याला समजला इतका हुशार नक्कीच होता. पण ते बोटही द्यायची त्याची तयारी नव्हती.

सुखवस्तू बापाच्या पोटी जन्मलेला, सिगरेट आणि दारुवर सहजपणे पैसे खर्च करणारा एखादा दलित वा ओ.बी.सी. मित्र जेव्हा 'तुम्हाला काय जाणवणार आमच्यावरील शतकानुशतकांचा अन्याय...' म्हणतो तेव्हा एकही खिडकी नसलेल्या दहा बाय आठच्या खोलीत पंधराहून अधिक वर्षे काढलेले आमचे पाच जणांचे कुटुंब मला आठवते. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाही ज्याच्याकडे केवळ दोनच पँट्स होत्या, फाटल्या तर त्या रफू करुनच वापराव्या लागत तो माझा भाऊ आठवतो. आणि त्याहीपूर्वी नवी घेणे परवडत नसल्याने ढुंगणावर दोन्हीकडे दोन-दोन बोटे विरलेली चड्डी घालून शाळेत येणारा कुणी ढोरजे मला आठवतो. अकरावीपासून क्लासेसचे नववी-दहावीच्या वर्गांचे पेपर तपासून कमावता झालेलो मी स्वतः आठवतो...

...आणि या सुखवस्तू असूनही बापदाद्यांच्या शोषणाला encash करु पाहणार्‍या आणि आपण तथाकथित उच्चवर्णीय नाही म्हणजेच आपण आपोआपच पुरोगामी, शोषितांचे ठेकेदार वा प्रवक्ते आहोत असे समजू लागलेल्या त्या उद्दामांच्या पेकाटात - शाब्दिक का होईना - सणसणीत लाथ घालतो.

-oOo-

१. राखीव जागांच्या तेव्हाच्या परिस्थितीवर आधारित ही चर्चा नि प्रसंग आहे. पुढे राखीव जागांचे प्रवर्ग झाले. एकदा खुल्या जागेतून शिकलेल्याला पुढील शिक्षणांत वा नोकर्‍यांमध्ये राखीव जागांचा लाभ घेता येणार नाही असा नियम आल्याचे समजले. तेव्हा तसे असते तर खुल्या वर्गातून प्रवेश घेणे त्याला पुढे अडचणीचे ठरू शकले असते हे खरे. हा अजब नियम अजूनही आहे की रद्द झाला माहित नाही.


हे वाचले का?