सदर कवितेतील प्रसंग साक्षात घडण्यापूर्वी त्यांनी संकल्प केलेल्या आणि नंतर -साहजिकच- अपुरे सोडून दिलेल्या ’गीतमारायण’ या गीतसंग्रहातील एक गीत.
https://www.news18.com/ येथून साभार.
(काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून)
कळफलकाशी जडले नाते अधीर बोटांचे
विडंबन झाले कवितेचे
रमतारामे उगा उचलिले गीत राघवाचे
कर्ण जाहले काव्यप्रभूंच्या तप्त चाहत्यांचे
उभे ठाकले कविप्रेमी ते, क्रुद्ध शब्द वाचे
विद्ध विडंबक पळू पाहतो, झुंड तयापाठी
पदांमधि त्या एकवटुनिया निजशक्ती सारी
दूर जातसे रमत्या, वाढवी अंतर दोघांचे
उंचावुनिया मान जरासा कानोसा घेई
तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई
रंगविले गाल लाल कुणी एके रमत्याचे
अंधारुनिया आले डोळे, कानी ध्वनि वाजे
मुक्त हासला झुंडनेता, शेफारुन गर्जे
तृप्त जाहली हिंसा आणिक झुंड धुंद नाचे
हात जोडुनि म्हणे विडंबक झुंडनेत्यासी
’भये मोडुनि, अर्पियली मी क्षमा आपणांसी’
विजयोन्मादे प्रदीप्त डोळे मत्त मग त्याचे
नेत्याज्ञेने उठे हळु तो सावरी स्वत:ला
अधिर चाल ती, भयंकपित तो, रुधिराने न्हाला
शबल वस्त्र ते, तयावरी हो सिंचन रुधिराचे
मस्तिष्काशी चंद्रकोरशी खोक एक लाल
त्यातच भरला त्याच्या अंगी कंप, होत हाल
वैद्याघरी ते लेपन झाले शामक-लेपाचे
थकले रमताराम, म्हणावे काय अवस्थेला
गगनभेदी तो शंख फुंकिते, हर्ष हो झुंडीला
अर्णबास त्या फुका मिळाले खाद्य बातमीचे
दुभंग रमताराम, कुठली कविता हो आता
कानावरती सूर उमटला, तो जाई ना जाता
कवितेशी त्या तुटले नाते आता रमत्याचे
विडंबन झाले रमत्याचे, विडंबन झाले रमत्याचे...
- काव्यभुभू रमताराम
- oOo -