शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

नरोटीची उपासना

पु.ग.सहस्रबुद्धे यांनी ‘नरोटीची उपासना’(१) हा लेख लिहिला, त्याला आज पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहेत. पन्नास वर्षे झाली त्या वर्षी एका प्रथितयश वृत्तपत्राने तो पुनर्मुद्रित केला होता. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.

हा पु.गं.चा लेख नाही, त्याचा आजच्या काळात वेध घेणारा म्हणून शकू कदाचित. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो (फारसा उपयोग नसतो हे ठाऊक असूनही) ती म्हणजे पु. गं.चा लेख किंवा हा लेख आपल्या परंपरांचे/ प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. इथे अश्रद्धतेचा विचार येणार नाही. (प्रतिवादाच्या सोयीसाठी प्रथम तसा शिक्का मारणे सोपे असते, पण लेखाची व्याप्ती ती नाही.)

---

नरोटी म्हणजे करवंटी, नारळाच्या आतील जीवनदायी पाण्याचे, खोबर्‍याचे रक्षण करणारे भक्कम वेष्टण. श्रद्धा आणि परंपरांच्या भाषेत सांगायचे, तर खोबरं नि पाणी हे मूलतत्त्व नि नरोटी म्हणजे त्याभोवती उभे राहिलेली व्यावहारिक कर्मकांडे वा उपचार. आपल्या लेखात पु.गं.नी त्याचा विचार साररूपाने मांडला आहे तो असा.

कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा, त्याची उन्नती व्हावी, यासाठी त्यातील धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वे मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासने सांगितलेली असतात. त्या नीतिनियम व व्यावहारिक नियमांच्या मागची जी तत्त्वे, त्यांचा जो मूळ हेतू– त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचे पालन करीत असतो तोपर्यंत ती फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणास, रक्षणास, अभ्युदयास त्यांचे साह्य होते.

EmptyCoconutShell

कालांतराने स्वार्थामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, आळसामुळे, श्रद्धाशून्यतेमुळे त्या मूळतत्त्वांचा विसर पडून समाज केवळ त्या जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचे बाह्यरूप तेवढे जाणतो. अंतरीचे तत्त्व, त्याचा आत्मा तो जाणत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतले खोबरे कोणी नेले, ते नासले, तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त नरोटीची उपासना करीत राहतो. पण त्याची श्रद्धा मात्र असते की आपण श्रीफळाचीच उपासना करीत आहोत. समाजाचा अध:पात येथूनच सुरू होतो.

या मूलत्त्वाचे निरूपण त्यांनी काही ऐतिहासिक काही तात्कालिक उदाहरणांच्या आधारे केले होते. आजच्या काळाचा विचार करता परिस्थिती फार बदलली आहे का असा विचार मनात येतो. रोजच्या जगण्यातले तुमचे-माझे काही अनुभव आहेत ज्यावरून असे वाटते की आजही परिस्थिती काही वेगळी नाही. कदाचित उद्याचीही काही वेगळी नसेल.

आज नागपंचमी आहे, नागपूजेचा दिवस. हा सण खरेतर शेतकर्‍यांचा. वावरातील धान्याची नासाडी करणार्‍या उंदरांवर जगणारा नाग हा एक प्रकारे शेतकर्‍याचा उपकारकर्ताच असतो. परंतु हा उपकारकर्ता मवाळ वृत्तीचा नाही. खुद्द तो शेतकरी वा त्याचे कुटुंबिय त्याच्या जगण्याआड आले, तर त्यांनाही डसण्यास कमी करणार नाही. यास्तव, एका बाजूने त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे नि दुसर्‍या बाजूने वावरातले सहजीवन सुखदायी व्हावे म्हणून त्याला अन्न देऊन स्नेह जोडणे असा दुहेरी हेतू यात असावा.

आता मुद्दा असा आहे की मुळात हा वावराशी निगडित सण आहे. मग ज्यांनी जन्मात कधी वावराचे तोंड पाहिले नाही अशा पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील फ्लॅट्-संस्कृतीमधे वाढलेल्या नि कदाचित (त्यातील काही) गांडूळ दिसले तरी चप्पल घेऊन मारायला धावणार्‍या स्त्रिया, नागपंचमीचे व्रत करतात हा विरोधाभास नाही का?

बराच काळ गारुडी नाग दाराशी घेऊन येत नि या तथाकथित सश्रध्द स्त्रिया त्या नागाची पूजा करून पुण्य कमावत. यात अनेक नाग मृत्युमुखी पडतात हे लक्षात आल्यावर पुण्यातील एका प्राणिमित्र संघटनेने दाराशी आलेल्या नागाची पूजा न करता सर्पोद्यानात जाऊन करा अथवा प्रतिमेची पूजा करा असे सांगताच त्यांच्यावर ‘संस्कृती विरोधक’ असल्याचा शिक्का मारला गेला (आमच्यासारखाच).

एका विद्वान साहित्यिकाने लेख लिहून ‘दाराशी नाग येणे नि तो पहायला मिळणे हा आमच्या मुलांचा सांस्कृतिक हक्क आहे’ असा दावा केला होता. आता नागपूजा हा सांस्कृतिक हक्क हे मान्य, पण त्यापाठोपाठ ‘दाराशी येण्याचा हक्क’ हे त्याचे पिलू कुठून आले? जसे गणोशोत्सवाबरोबर कर्णकटू स्पीकर लावण्याचा हक्क हा देखील संस्कृतीचा भाग होतो तसेच बहुधा.

अशीच गोष्ट निर्माल्याची. आपल्याकडे देवाच्या अंगावरून काढलेले निर्माल्य नदीत सोडण्याचा प्रघात आहे. यामागे अतिशय सुंदर नि संवेदनशील कारण आहे. पण संस्कॄतीच्या नावाखाली त्याचे पालन करणार्‍या किती जणांना ते ठाऊक आहे? विचारा स्वतःला हा प्रश्न.

कारण असे आहे की आपण आपल्या उपासनेसाठी निसर्गातून त्याच्या चैतन्याचा अंश ती फुले काढून आणतो. जे आपले नाही ते आपण निसर्गाकडून घेतो. ते पुन्हा निसर्गालाचा परत करावे हा हेतू असतो. मग नदीतच का, तर वाहते पाणी हा चैतन्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. सुकलेल्या फुलांना - ज्यांचे चैतन्य आपण हिरावून घेतले होते - पुन्हा एकवार चैतन्याच्या सहवासात सोडावे, संकेतार्थाने त्यांचे चैतन्य त्यांना पुन्हा मिळवून द्यावे हा.

आजच्या आपल्या नद्यांची अवस्था काय आहे. पुण्यातील मुठा नदी हे सार्‍या शहराचे मैलापाणी पोटात घेऊन गटार झाले आहे. दोन-तीन धरणांमुळे ‘वाहते पाणी’ हा मुद्दा पूर्णपणे निकाली निघालाय. अशा पाण्यात निर्माल्याचे विसर्जन करणे हे त्याचे अवमूल्यन नाही का? आमच्या मातोश्रींना अनेकदा हा मुद्दा सांगण्यात आला. परंतु तो नाकारून आमच्या माघारी निर्माल्य नदीतच विसर्जन केले जाते. माझी खात्री आहे बहुतेकांकडे हीच स्थिती असणार आहे.

आता याची दुसरी बाजू पाहूया. काही वेळा आपण कर्मकांडात बदल करतो. पण त्यात हेतू मूल्यमापनाचा/ सुधारणेचा असतो की स्वार्थाचा/सोयीचा? श्रावणात एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावण्याची पद्धत आहे. आता बहुतेक नोकरदार स्त्रिया रविवारी बोलावतात, कारण एरवी सुटी नसते.

आता सवाष्ण बोलावण्याचे हेतू काय असतील हे मला माहित नाही. पण माझ्यापुरता एक अर्थ मी लावला आहे तो सांगतो. श्रावण हा महिना असा आहे की हा बहुधा दुष्काळी महिना. मागच्या वर्षीचे धान्य संपत आलेले नि यावर्षीची कापणी व्हायला वेळ असते. अशा वेळी घरची स्त्री अन्नधान्य पुरवून वापरत असते. बहुधा घरच्या धन्याला नि पोरांना अधिक देऊन ती अर्धपोटी राहत असेल. अशा वेळी निदान एक दिवस तिला चांगले जेवण मिळावे हा एक हेतू असावा. बहुधा अशा गरजू स्त्रीला बोलावण्याचा मूळ प्रघात असावा. त्या फळत्या-फुलत्या घरात एक दिवस एक माणूस सहज खपून जाते. त्यामुळे फार काही खर्च वाढत नाही हा ही एक फायदा.

आज काय स्थिती आहे? जिला सवाष्ण म्हणून बोलावण्यात येते ती गरजू असते का? एक धक्कादायक प्रकार– निदान त्यावेळी मला तसा वाटला– पाहण्यात आला.

वारः शनिवार, स्थळः अभिषेक वेज, मेहेंदळे गॅरेज समोर.

आम्ही एका मित्राची वाढदिवसाची पार्टी काढायला गेलो होतो. शेजारी दोन टेबलवर एकुण आठ स्त्रिया बसल्या होत्या. मधे चांदीचे ताम्हण आणि निरांजन. प्रकार काय आहे समजून घेण्यासाठी जरा कान देऊन ऐकले तर धक्काच बसला. ते सवाष्ण भोजन होते. ‘अ’ ने ‘ब’ला, ‘ब’ ने ‘क’ला असे करत ‘ट’ ने ‘अ’ला दिलेले. एकच ताम्हण नि निरांजनात भागते. है का आव्वाज? त्यातच एक बया तिच्या अफाट हिंदीत (हिंदी का कुणास ठाऊक) दुसर्‍या अफाट स्त्रीला म्हणत होती ‘मैं तो उसको (एखाद्या अनुपस्थित महिलेबद्दल असावे) बोली की तुम दोनोही आजाव, मेहुण करके.’ मला फेफरं यायचं बाकी होतं.

दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटायची पद्धत आहे. ‘मोठी असतात नि तजेलदार दिसतात’ म्हणून त्या झाडाच्या सजातीय असलेल्या कांचनवृक्षाची पाने हल्ली सर्रास वाटली जातात. श्रावणात जीवतीच्या पुजेसाठी प्रत्यक्ष लेकुरवाळ्या स्त्रीला न बोलावता तिच्या चित्राची पूजा केली जाते. तीच गोष्ट वटपौर्णिमेची. काही चतुर लोकांनी अशा आळशांच्या सोयीसाठी श्रावण महिन्यातील सार्‍या सणांचे एक पानाचे टेम्प्लेटच तयार केले आहे. ते देव्हार्‍यात चिकटवायचे की झाले काम. अशी अनेक उदाहरणे आहेत.

तात्पर्य. आपल्या सोयीनुसार आवडीनुसार परंपरेत आम्ही बदल करू, त्यासाठी मूळ हेतूला बाधा येते का हे आम्ही पाहणार नाही. अर्थातच हे आम्ही गुपचूप करू, गाजावाजा करणार नाही. आणि आम्ही संस्कृती जाणतो त्यामुळे आम्हाला तो हक्कच आहे. आम्ही मूळ हेतूला हरताळ फासतो आहोत हे सांगणार्‍याला आम्ही संस्कृती विरोधक ठरवू, त्यांचा निषेध करू, त्यांच्या तोंडाला काळे फासू. आम्ही म्हणू ती परंपरा, आम्ही सांगू ती संस्कृती, आमच्या हेतूबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही.

अखेरीस नरोटीला चिकटून राहण्याचा अट्टाहास कुठल्या थराला जातो याचे उदाहरण म्हणून एक श्लोक देतोय.

वरं हि मातृगमनं, वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्या न भोजनम्

परंपरेने घृणास्पद मानली गेलेली सगळी पापे केली तरी चालतील पण एकादशीला भोजन केलेले चालणार नाही. हे लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते हे मला ठाऊक आहे. पण मुळातच ही तुलना इतकी घृणास्पद आहे, की ही जर संस्कृती असेल तर आम्ही सुखे संस्कृती-विरोधक म्हणवून घेऊ. खोबरे सडून गेले, तर उपासनेसाठी नवे श्रीफल आणू– मग ते भले जुने नसेना– पण नरोटीची उपासना कधीही करणार नाही.

- oOo -

(१). हा लेख ‘माझे चिंतन’ या कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.


हे वाचले का?