शनिवार, ४ जुलै, २०२०

मी एक मध्यमवर्गीय पुरोगामी(?)

संघ-भाजपने मुस्लिम/काँग्रेसने (सामाजिक/राजकीय) देशाचं/धर्माचं वाटोळं केलं म्हणायचं, ब्राह्मणांनी दलितांच्या आरक्षणाच्या नावे बेंबीच्या देठापासून बोंब मारायची, दलित विचारवंत म्हणवणार्‍यांनी सगळ्या सामाजिक समस्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेमुळे आहेत म्हणायचे, पुस्तकी-फेमिनिस्टांना सगळे काही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाप दिसते, संघाची वाढ हा समाजवाद्यांचा गुन्हा म्हणून कम्युनिस्ट पाच मैलाचा लेख लिहितात... आणि ’स्त्री जात तेवढी निमकहराम’ म्हणणार्‍या 'पुण्यप्रभाव’मधल्या सुदामसारखे यच्चयावत पुरोगामी ’मध्यमवर्ग तेवढा निमकहराम’चा जप करत असतात.

डावी असोत वा उजवी, माणसं शत्रूलक्ष्यी मांडणीच्या मानसिकतेतून बाहेरच यायला तयार नाहीत. मूळ व्याधीचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्याऐवजी हा जो खापरफोडेपणा सर्वव्यापी झाला आहे, तीच आपल्या समाजाच्या प्रगतीमधील प्रचंड मोठी धोंड आहे असे मी मानतो.

SaveTheMiddleClass

पुरोगाम्यांच्या उठसूठ मध्यमवर्गीयांच्या नावे खडे फोडण्याला कंटाळून मी अनेक गटांपासून दूर झालो. बरं शिंचे हे ’मध्यमवर्गीय’ म्हणताना नक्की कुठला गट वा वर्ग हे प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे असते. त्या वर्गाच्या नावे शंख करणार्‍या चार-पाच पुरोगाम्यांना ’मध्यमवर्गीय म्हणजे नक्की कोण रे?’ असा प्रश्न विचारुन जरा खोलात नेण्याचा प्रयत्न केला. बहुतेकांना कुणीतरी ’ते’ लोक इतकेच समजले आहे असे दिसते.

छानपैकी फ्लॅट, गाडी वगैरे बाळगणारे, मुलांना उत्तम विद्यापीठात शिकवणारे मध्यमवर्गीयांच्या नावे शंख करताना पाहून हसायला येते. अरे बाळा, इतरांचे सोड. किमान तू तरी बाहेर पड की यातून. कम्युनिस्टांचे ते डी-क्लास का काय म्हणतात ते होऊन मग बोल. उगा लोहिया वा मार्क्सची जपमाळ ओढून त्यातून बाहेर पडल्याचा आव कशाला? कदाचित सगळ्यांनी एकसमयावच्छेदेकरुन (हा सावरकरांचा, पुरोगाम्यांच्या सैतानाचा लाडका शब्द बरं का... आणि हो ते ही शिंचे मध्यमवर्गीय. :) ) मध्यमवर्गीय होणे ही डी-क्लास होण्याची नवी व्याख्या असावी.

एका डाव्या पत्रकाराने मजेशीर पळवाट काढली. ती म्हणे, ’अरे मध्यमवर्गीय असणे ही मानसिकता आहे. आर्थिक स्थितीचा काही संबंध नाही.’ हे म्हणजे ’तुमची खरी श्रद्धा असेल तर फळ मिळेल, अन्यथा फळ मिळत नाही’ टाईपचे आर्ग्युमेंट झाले. कारण यात तुम्हाला फळ मिळाले नाही की खरी श्रद्धा नाही असे जाहीर करण्याची सोय आहे. (एक आवाज: रमताराम, तुम्ही पाखंडी आहात.) किंवा आधी ब्राह्मणांच्या नावे दोषारोप करुन मुद्दा अंगाशी आल्यावर ’मी ब्राह्मणांबद्दल नव्हे, ब्राह्मण्यवादी मानसिकतेबद्दल बोलत होतो.’ म्हणून शेपूट सोडवण्यासारखे आहे. (एक आवाज: रमताराम मनुवादी आहेत) किंवा ’संघ प्रामाणिकपणे समजावून घेतलात तर तुम्हाला समजेल’ म्हणत, जोवर तुम्ही संघ श्रेष्ठ म्हणत नाही तोवर तुमचे प्रयत्न प्रामाणिक नाहीत असे म्हणण्याची सोय करून ठेवली आहे. (एक आवाज: रमताराम अर्बन नक्षलवादी आहेत.)

विधानातच, व्याख्येतच मेख मारुन कार्यकारणभाव हा वर्तुळाकृती तर्कात बांधून टाकलेला असतो.

उजवे राष्ट्रवादी विचारवंत पु.ग. सहस्रबुद्धे (विचारवंतात उजवे किंवा उजव्यांमध्ये विचारवंत असूच शकत नाहीत असे समज असणारे सो-कॉल्ड डावे त्यांना तसे मानणार नाहीत हा मुद्दा अलाहिदा) यांच्या 'नरोटीची उपासना’ या लेखाची मला राहून राहून आठवण होते. चितोड स्वतंत्र होईतो गवतावर झोपू ही प्रतिज्ञा सुखासीन आयुष्यात गादीखाली गवताच्या चार काड्या ठेवून सिद्ध होते असे मानणार्‍या चितोड राजघराण्यातील मुघल मांडलिकांचे उदाहरण त्यांनी दिले होते. तसेच हे मध्यमवर्गीय पुरोगामी. लेखनात, तोंडाने मध्यमवर्गीय ताडन केले की यांचे डावेपण सिद्ध होते.

प्रत्येक विचाराचा, धर्माचा एक देव नि एक सैतान असतो. तसे मार्क्स वा लोहियांच्या जोडीला मध्यमवर्ग नावाचा सैतान ठेवून दिला की उरला वेळ छान उबदार मध्यवर्गीय आयुष्य जगायला मोकळे, असे असावे बहुधा. अमेरिकेत राहून वर्षाला एक सत्यनारायण घातला की ’आपल्या मुळांना विसरले नाहीत हं’चे सर्टिफिकेट पदरात पाडून घेणार्‍यांसारखे, वर्षातून एकदा मध्यमवर्गीयांवर आगपाखड करणारा लेख वा व्याख्यान झोडले की उरलेले मध्यमवर्गीय आयुष्य सुखाने व्यतीत करता येते. वर पुन्हा धार्मिकांच्या ’खरा धार्मिक सत्प्रवृत्त असतो. तो अमुक सत्प्रवृत्त नाही म्हणाजे तो खरा धार्मिक नाही.’ या तत्वाचा व्यत्यास म्हणजे, ’मी मनाने मध्यमवर्गीय नाही. आर्थिक स्थितीचा वृत्तीशी काही संबंध नाही.’ हा उफराटा तर्क द्यायला तयार.

आता मी ’मध्यमवर्गीय... फख्र है’ नावाचे नाटकच लिहिणार आहे, मध्यवर्गीय समाज हा एकुणात व्यवस्थेचा कणा असतो हे सिद्ध करणारे. मध्यमवर्गीयांच्या नावे खापर फोडणारे ’अ‍ॅण्टी-मध्यमवर्गीय-वर्ग-द्रोही’ असतात, छान मध्यमवर्गीय आयुष्य जगतात. जगोत बापडे. हे हायक्लासही होऊ नयेत वा डी-क्लास.

विचाराने मी पुरोगामी आहे असा माझा समज आहे. पण धर्म, राष्ट्र, शिवछत्रपती, आंबेडकर, मार्क्सापर्यंत सर्वांचे जे ठेकेदार असतात, जे तुम्ही ’खरे इकडचे की छुपे तिकडचे’ याचा निवाडा - फुल टाईम - करत असतात. या सर्वगटीय ठेकेदारांचे ’आम्ही छुपे तिकडचे आहोत’ यावर एकमत आहे, असे आम्हाला सगळीकडच्या आतल्या गोटातून समजले आहे. तेव्हा आता आम्ही आपले ज्ञानोबावादी, ’जो जे वांच्छिल तो ते लाहो’ म्हणणारे. ’फक्त मलाच लाहो, त्याला न लाहो’ म्हणण्यासारखा क्षुद्रपणा दाखवला नाहीत तरी पुरे, एवढी माफक अपेक्षा ठेवणारे. :)

-oOo-


संबंधित लेखन

४ टिप्पण्या:

  1. चौफेर मारा...
    आणि हो हे मूळ न विसरणं डोक्याला ताप ए...
    शत्रूलक्ष्यी मांडणीची मानसिकता हे म्हणजे फारच नेमकं!

    उत्तर द्याहटवा
  2. शत्रूलक्षी मांडणी न करणारा भारतात एकच माणूस होता. मोहन करमचंद गांधी.असं मला वाटतं. तू शत्रूलक्षी मांडणी न करणे म्हणजे काय आणि पर्यायी मांडणी यावर सविस्तर लिहावे ही विनंती...

    उत्तर द्याहटवा
  3. होय सध्या त्याच्याच विचारात आहे. पण सतत स्वत:च चॅलेंज करत राहिल्याने एक कॉंक्रीट काही केव्हा हाती लागेल सांगता येत नाही. सध्या तरी तुकडे तुकडेच हाती आहेत.

    उत्तर द्याहटवा