-
(मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.)
मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते(१).
अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र तर सोडाच, पारंपरिक काव्यालंकारामध्येही मला ही विषमता चटकन दिसून येते.
आता हेच पाहा ना. साधे उपमांचे क्षेत्र फुले, चंद्र, काटे, आदी केवळ दृश्य पैलूंमध्ये बंदिस्त आहे, याचा आम्हाला नेहमी विषाद वाटत आला आहे. माणसाला पंचेंद्रिये असतात (आणि तरीही १४५ कोटींच्या देशांत लोक सहाव्याच्याच अधिक आहारी गेलेले दिसतात... पण तो मुद्दा अलाहिदा.) रंग, गंध, स्पर्श, चव नि स्वर यापैकी इतर चार इंद्रियानुभव उपमेच्या क्षेत्रात सुखेनैव बागडत असतात. असे असता चवीला अथवा जिंव्हारसज्ञानाला मात्र यातून कायम दूर ठेवले गेले आहे. ‘असे का?’ हे सहज समजण्याजोगे आहे.
हे बघा: तो रंग... तो गंध.. तो स्पर्श... तो स्वर... पण ‘ती’ चव. आता कळले का कारण? नसेल तर आणखी थोडे पुढे जातो.
आता यांचा अनुभव ज्या इंद्रियांकडून घ्यावा लागतो ती इंद्रिये पाहा. तो डोळा/ते डोळे, ते नाक, तो हात, तो कंठ... आणि ‘ती’ जिंव्हा!
नाही कळले? यू ब्लडी एमसीपीग्ज(२), चव नि जिंव्हा दोघीही स्त्रीलिंगी आहेत म्हणून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पुरुषी अहंकाराने लिप्त कवि-मंडळ यांना कटाक्षाने टाळत आले आहे.
आता हेच पाहा ना. आपल्या काल्पनिक प्रियेच्या ओठांनासुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांची उपमा देणारे शायर कुठल्याही नाक्यावरच्या पानाच्या ठेल्यावर, रस्त्यावर पहुडलेल्या प्रत्येक सिगरेटच्या पाकीटामागे एक या दराने सापडतात. पण वास्तवातील प्रियेच्या ओठांना एखाद्या कविने साखरेच्या कणांचे हिमबिंदू पांघरलेल्या सुक्या गुलाबजामची उपमा दिलेली ऐकली आहे कधी? अजिबात नाही!
पण तुम्ही म्हणाल: “पण गुलाबजाम मानवनिर्मित आहे, त्याची उपमा आमच्या स्वर्गीय (म्हणजे कैलासवासी नव्हे, स्वर्गातूनच जणू उतरलेली या अर्थी) प्रेम-विषयाला— (“रमतारामभाऊ, इथे तरी प्राज्ञ मराठी सोडा. ‘प्रेम-विषय’ काय, शाळेत गेल्यासारखे वाटते आहे.”) म्हणजे माशुकाला (उर्दू साली लै चावट, नुसत्या शब्दाने अंगावर मोहोर उमटतो) द्यावी का?”
बरं मग सफरचंद घेऊ. हिमाचलातून येते आणि काश्मीरची गुलाबी आठवण करुन देते. पण नाही. त्याचीही धाव बालकाच्या गालापर्यंतच. पोर मोठी झाली की कविने उपमा भरुन ठेवलेल्या ड्रम वा टाकीतून सफरचंदे हद्दपार.
गालांवरून आठवले, आपण ओठांपासून गालावर घसरलो. पुन्हा ज्ञानेंद्रियांकडे येऊ. खाद्य पदार्थांकडून पेय पदार्थांकडे सरकलो तर स्थिती किंचित सुधारते. आपल्या प्रियेच्या डोळ्यांना ‘नशीली’ म्हणणारा, थोडा धीट प्रियकर हिंदी/ऊर्दूमध्ये सापडेल; पण तो ही अंगचोर; शराब– म्हणजे दारुचा स्पष्ट उल्लेख करण्याची शक्यता खूप कमी आहे. रणांगणाचे तोंड न पाहिलेले कविदेखील प्रियेच्या डोळ्यांवरच्या भुवयांना (की भिवयांना?) धनुष्याची उपमा देतात, पण दिवाळीत ज्यावर ताव मारतात त्या कानवले ऊर्फ करंज्यांची आठवण त्यांना का होत नसावी? चवीलाही गोड असतात ते.
Magicpin appच्या X-भिंतीवरुन साभार.प्रियेच्या नाकाला फार तर पोपटाच्या चोचीची उपमा दिलेली आम्ही वाचली आहे. पण एखाद्या कविने ‘काजूकतलीसारखे शुभ्र नि धारदार’ असे म्हटलेले तुमच्या स्मरणात आहे? किंवा गोलसर, कोबीच्या गड्ड्याच्या आकाराच्या नाकाला, जुन्या कवितेच्या काळात ‘नाकाची गुंजडी’ अशी उपमा आम्ही ऐकली होती. ही गुंजडी काय याची आम्हाला काही कल्पना नाही. बहुधा गुंज या शब्दाचे लडिवाळ रूप असावे. पण त्याऐवजी ‘फणसाच्या गर्यासारखे भक्कम नाक’ अशी उपमा दिली आहे कुणी?
प्रियेच्या कुरळ्या केसांचा उल्लेख न चुकता ‘कुंतल’ असा करणार्या काव्यकर्तनकारागीरांनी ‘एखाद्या मद्यप्याला सोबत करणार्या चकलीसारखे माझे सोबती– तुझे कुंतल’ असे म्हटले आहे कधी? किंवा नितंबांपर्यंत झुळझुळणार्या (अर्थात कल्पनेमध्ये) तिच्या केशसांभाराला ‘अंधारातील सुतरफेणी’ची उपमा दिली आहे कुणी?
कितीही उदाहरणे दिली तरी कमीच आहेत. काव्यकळपातील उपमा-क्षेत्रात असलेला हा भेदभाव नाहीसा व्हावा, यासाठी आम्ही विद्रोह पुकारत आहोत. इथून पुढे आम्ही कविता लिहू तेव्हा चव, जिंव्हा– आणि म्हणून खाद्य पदार्थ, यांना यथोचित सन्मान देण्याचे वचन देत आहोत. या वचनपूर्तीच्या वाटेवरील हा पहिला काव्य-मोतीचूर. (झेंडूच्या फुलांची वा एकुणच पुष्पगुच्छाची उपमा नाकारुन आम्ही बेसन-कळ्यांना सांधणार्या लाडवाची उपमा दिली आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत.)
---
काव्य-मोतीचूर
१. तळून ताटात ठेवलेल्या मैद्याच्या गोळ्यासारखा मी तुझ्या ओठांत उकळत असलेल्या साखरपाकात बुडण्यास अधीर झालेला दोघे मिळून गुलाबजामसारखे अद्वितीय व्हावे म्हणून २. लाडवांसाठी खरपूस भाजलेल्या रव्यासारखा जगण्याच्या तापलेल्या तव्यावरुन तुझ्यापर्यंत पोहोचलो मी पण तू? पाणी कमी पडलेल्या पाकासारखी एका य:कश्चित वेलचीसाठी रुसून बसलेली ३. बटाट्याला पोटात घेऊन, अंगभर बेसनाचा पदर लेवुन, काहिलीवरच्या तप्त कढईतही बेभान उडी घेतलेली— तुझ्यासाठी; बेसनाचा तो पदर दूर करुन, मला कधी कवळशील(३) अशी पर्युत्सुक मी; आणि... शेजारच्या हिरव्या मिरचीचा तोरा, नि लालभडक चटणीचा बडेजाव, यांच्याकडे अतीव प्रेमाने पाहात माझ्या आर्जवांना दूर सारणारा तू ४. दुरूनच जिचा गंध यावा, नि जिच्या लालभडक दर्शनाने आत्मा अधीर व्हावा, असा मिसळीचा कट तू आणि... बटाट्यांपासून पोह्यांपर्यंत, मटकीपासून वाटाण्यापर्यंत; सार्यांमध्ये संघर्ष, तुझ्या सहवासासाठी! यांच्या निवाड्याची वाट पाहात दिङ्मूढ बसलेला शालीन फरसाण मी आपल्या परिणय-प्रसंगी, यज्ञकुंडात आहुतीसाठी सज्ज समिधेसारखा निर्लेपपणे पहुडलेला कांदा... आणि... खाली ढणढणत पेटलेला गावगन्ना अस्मितेचा(४) जाळ... ५. तुझ्या आगमनाच्या प्रतीक्षेत दह्यासारखा टांगून घेतलेला मी आता चक्क्यासारखा फुलून आलो आहे तुझा गोडवा नजरेस पडताच रोमांचाचे केशर मिसळून श्रीखंडासारखा पक्व होऊन होईन
- oOo -
टीपा:
(१). अशाच एका किंकर्तव्यमूढ स्थितीमध्ये स्फुरलेली ‘खिन्न देखणा चेहरा माझा, हुश्श: मुखातुन निसटे’ ही माझी ओरिजिनल ओळ ग्रेसने ‘खिन्न देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातुन वाजे’ अशी बदलून घेतली नि गूढतेचा त्याचा लाडका पॉईंट सर केला. थकलेला, श्रमलेला, कंटाळलेला जीव हुश्श: करेल; बिगुल कुठून आणेल? काहीही लिहायचं उगाच. पण ते जाऊ दे. आपल्या माणसाला फुल फॉन्ट-साईझमध्ये दोष द्यायचा नसतो. [↑]
(२). MCP = Male Chauvinist Pig— पुरुषी अहंकाराने लिप्त व्यक्ती. [↑]
(३). येथील श्लेष ध्यानात घ्या. [↑]
(४). वास्तविक मिसळ हा पावभाजीप्रमाणेच पोटभरु पदार्थ, पण त्याचीही अस्मिता निर्माण करणारे किमान तीन गावचे लोक आहेत. एकुणात भारतीयांना अस्मिता फार प्रिय असते. भविष्यात आप-आपल्या अंडरवेअरच्या रंगांचाही झेंडा करुन त्यावर अस्मिता-युद्धे होतील याची खात्री आहे. सर्जकता नि रचनात्मक विचार याचा संपूर्ण अभाव असलेल्या समाजात अशा थिल्लर अस्मितेचे उद्भव व्हावेत हे अगदीच सयुक्तिक आहे.[↑]
---
संबंधित लेखन: चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, ११ जून, २०२५
काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता
संबंधित लेखन
कविता
भाष्य
मनोरंजन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा