बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

अक्कल का कुंऑं

(एक जुनी आठवण: संदीप खरे यांच्या कवितेवरील एका स्तंभाच्या निमित्ताने झालेले कवित्व आणि तर्कांचे फवारे. सत्यघटनेवर आधारित.)


१.

आम्ही: लोकसत्ताने 'सकाळ'च्या मुखभंगाची बातमी उथळपणे पहिल्या पानावर छापली. एरवी याहून कितीतरी महत्त्वाच्या बातम्या पूर्ण जाहिरातीच्या पानाआड लपतात.

ते: 'सकाळ'ची बाजू घेऊ नका.

आम्ही: आं? एकावर टीका करणे म्हणजे थेट दुसर्‍याची बाजू घेणे? अमेरिकेचे का हो तुम्ही?


२. 

बातमी: सकाळ'ने आणि संदीप खरेंनी कोलटकरांच्या पत्नी/प्रकाशकाच्या परवानगीविना त्यांची कविता छापली
ते: संदीप हा दुय्यम कवी आहे/त्याला मी कवी मानतच नाही.

आम्ही: आं? म्हणजे फक्त तो कवी असेल तरच त्याला रसग्रहणाची परवानगी असते, परवानगीविना इतरांची कविता छापता येते काय? नसल्यास मूळ बातमीचा नि या प्रतिसादाचा परस्परसंबंध काय?


३. 

शहाणेंचे वकील : संदीप खरे 'चोर' आहे.

ते: संदीपला आम्ही कवी मानतच नाही.

आम्ही: आं? म्हणजे कवी नसलेले सगळे चोर असतात? आफत आहे. मी ही कवी नाही.


४. 

संदीप खरे: जुने विस्मृतीत जाऊ पाहणारे उत्तम साहित्य पुन्हा नव्या वाचकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न होता.

ते: कसलं काय, फुकटात स्वतःला प्रसिद्धी हवी होती फक्त.

आम्ही: आं? म्हणजे आजवर अनेक समीक्षकांनी रसग्रहणात्मक, समीक्षणात्मक, टीकात्मक लिहिले ते ही फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच? (यात 'ते' स्वतः देखील आले हे विशेष)

ते: पण त्यांचा अधिकार होता म्हटलं.

आम्ही: मग संदीप खरेंचा नाही हे कुणी ठरवलं?

ते: अर्थात आम्हीच.

आम्ही: आं? (हे ठरवण्याचा अधिकार तुमचा 'हे' कुणी ठरवलं हा प्रश्न विचारण्याचं आम्हाला सुचलंच नाही, पहिल्यापासून ढ'च आम्ही. )


५. 

ते: कॉपिराईट कायदा महत्त्वाचा आहे म्हटलं.

आम्ही: अगदी सहमत.

ते: दोन्हीकडून बोलू नका.

आम्ही: आं? आम्ही कधी नाही म्हणालो? 'संदीप खरेंना चोर म्हणू नका', 'त्यांचा हेतू वाईट म्हणू नका', 'त्यांच्या कविता आम्हाला आवडतात' यातले (अर्थात वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून आलेल्यापैकी) नक्की कुठले वाक्य कॉपिराईट कायद्याला आमचा विरोध आहे वा सकाळ, खरे यांची चूक नाही अशा निष्कर्षाप्रत जाते?

ते: आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अक्कल आहे का?

आम्ही: आं? (आवाज बंद)

-oOo-

1 टिप्पणी:

  1. आम्ही असे पहिले आहे कि अनेकजण ब्लॉग सुरु करतात. परंतु नियमित लिहिणे शक्य होत नसल्यामुळे काही कालावधीनंतर ब्लॉग लिहिणे बंद होते. त्यामुळेच आम्ही webster developer ने 'आम्ही साहित्यिक, आम्ही कलावंत' हे वेब पोर्टल सुरु केले आहे आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या या तुम्ही तुमचे अकाउंट ओपन करू शकता, तुमचे विचार मांडू शकता. कविता, राजकीय विचार लिहू शकता. इतकेच नव्हे आर्ट मॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रकाशित पुस्तके, चित्रे व अन्य कलाकृती विकू शकता.

    उत्तर द्याहटवा