कविकुलगुरु कालिदास हा भरतखंडातील कविश्रेष्ठांचाही मेरुमणि. त्याच्या मेघदूताने देशकालाच्या, भाषेच्या सीमा ओलांडून अनेकांना भुरळ घातली, आकर्षित केले. अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने एकेक दृष्टीकोन घेऊन त्यातील सौंदर्य, त्यातील छंदशास्त्र, त्यातील भूगोल उलगडण्याच्या यथामती प्रयत्न केला, काही कविंनी आपल्यापुरते आपले 'मेघदूत' लिहून काव्यक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेत गदिमांनी या विरहाला चिरविरहाच्या पातळीवर नेऊन एक अजोड कविता लिहिली.
अनेकांनी त्याचे आपापल्या भाषांतून कुठे स्वैर, कुठे समश्लोकी अनुवाद करून त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करून पाहिला तर काहींनी याही पुढे जाऊन या सार्या अनुवादांच्या तौलनिक अभ्यासातून कुणाला किती कालिदास सापडतो याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचे तर भारतीय साहित्याला पडलेले कालिदास हे चिरवांच्छित स्वप्न बनून राहिले आहे.
नव्या जमान्यात कलाकारातला माणूस शोधण्याच्या काळात कालिदास हा वैयक्तिक आयुष्यात व्यक्ति म्हणून कसा होता, आसपासच्या लोकांना कसा दिसत असे हे तपासणेही अभ्यासाचे एक अंग समजले जाणे ओघाने आलेच. समीक्षकांनी आपल्या कोरड्या मापदंडांच्या आधारे हा कालिदास उभा केला असेलच. पण ललित साहित्याच्या क्षेत्रातही असे प्रयत्न झाले आहेत. कालिदासाच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे मोहन राकेश यांचे 'आषाढ का एक दिन' हा भारतीय नाट्यक्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जातो.
तसं पाहिलं तर या नाटकात ऐतिहासिक सत्य किती नि नाट्यनिर्मितीसाठी घेतलेले स्वातंत्र्य किती हे मला ठाऊक नाही, नाटकाचा आस्वाद घेऊ पाहणार्याला त्याची आवश्यकताही नसावी. मेघदूत या काव्यातून दिसणारा प्रेमिकांचा विरह हा कदाचित कालिदासाच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग असावा असे गृहित धरून मोहनबाबूंनी मल्लिका नावाची त्याची सखी, प्रणयिनी निर्माण केली, त्या दोघांचा सवंगडी, मित्र असलेला नि त्या दोघांना नजरेसमोर नकोसा झालेला असा विलोम निर्माण केला आणि त्या तिघांच्या भोवती कालिदासाच्या आयुष्याची मांडणी केली.
या तीन अंकी नाटकात प्रत्येक अंक हा ढोबळ मानाने कालिदासाच्या आयुष्यातील एकेका टप्प्याचे अवलोकन करतो. पहिल्या अंकात कालिदास, मल्लिका नि विलोम यांच्या गावातील आयुष्याचा. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व नि परस्पर नात्यांची ओळख करून देणारा. या अंकाच्या शेवटीच कालिदासाच्या आयुष्यात एक निर्णायक वळण येते नि पुढच्या अंकातील त्याच्या आयुष्याची पायाभरणी करून जाते.
दुसर्या अंकात कालिदास हा प्रथम उज्जैनचा राजकवी, मग राजकन्या प्रियंगुमंजरीशी विवाह करून गुप्त कुळाचा जावई नि अखेर - कदाचित त्याचेच बक्षीस म्हणून - 'मातृगुप्त' हे नाव धारण करून काश्मीराधिपती म्हणून तिथे राज्य करू लागतो. परंतु या अंकात कालिदास कुठेच येत नाही, त्याच्या आयुष्यातील या घटना अन्य पात्रांच्या तोंडूनच मल्लिकेला समजत जातात.
त्याच्या विविध काव्यांच्या प्रती देखील तिला उज्जैनहून येणार्या व्यापार्यांकडून मागवून घ्याव्या लागतात. कालिदास पुढे कितीही स्वत:चे समर्थन करू पाहत असला तरी त्याने उज्जैनला आल्यापासून रचलेल्या एकाही काव्याची प्रत स्वत: मल्लिकेसाठी धाडलेली नाही.
तिसर्या अंकात आपल्या राजकीय आयुष्यात पराभूत झालेला कालिदास परतून आपल्या प्रतिभेचा मूलस्रोत असलेल्या आपल्या गावी येतो, मल्लिकेकडे येतो. हे सारे प्रामुख्याने मल्लिकेचे आयुष्य मांडते. त्या अर्थाने हे नाटक हा मेघदूताचा अँटिथिसिस म्हणावा लागेल. मेघदूताच्या माध्यमातून जर कालिदासाने आपल्या प्रियेविना कंठाव्या लागणार्या आयुष्याची कर्मकहाणी आपल्या प्रियेसाठी लिहिली असेल, तर त्याने एकाकी सोडलेल्या त्याच्या प्रियेची कैफियत कुणी मांडावी? ती तर कायमच मूकपणे त्याला साथ देण्यास कटिबद्ध असते, अंबिकेच्या - आपल्या आईच्या - वात्सल्ययुक्त संतापालाही भीक न घालता. हे नाटक त्या मल्लिकेची जीवनकहाणी मांडून एक वर्तुळ पुरे करते. तीन अंकाच्या प्रवासात हळूहळू ढासळत जाणारे तिचे घर हे जणू तिच्या हरत चाललेल्या आयुष्याचेच प्रतीक बनून राहते.
अतुल पेठेंनी उभा केलेला असल्याने कालच्या प्रयोगाकडून खूपच अपेक्षा होत्या. कदाचित आधीच उंचावलेल्या अपेक्षा बहुधा निराशा पदरी आणतात तसेच काहीसे घडले. लेखाच्या मर्यादेत किती विस्ताराने मांडता येईल ठाऊक नाही, पण दोन तीन ढोबळ गोष्टी नोंदवून ठेवतो.
कालिदासाचा मागे राहिलेला भाग म्हणून उभा असलेला विलोम कायिक नि वाचिक अभिनयात संपूर्ण छाप पाडून गेला. ज्याने केवळ पार्श्वभूमी, परिप्रेक्ष्य प्रदान करावे ते पात्रच नाटकाच्या सादरीकरणाचा गाभा बनून राहिल्यासारखे भासले. मेघदूतातला मेघ ही जशी कालिदासाची अजरामर निर्मिती आहे तसेच हा विलोम मोहनबाबूंची ही कल्पक निर्मिती आहे.
हा विलोम म्हणजे कालिदासाचा मागे राहिलेला भाग आहे. एके ठिकाणी तो स्वत:च म्हणतो की ’कालिदास म्हणजे यशस्वी विलोम, आणि विलोम म्हणजे अयशस्वी कालिदास’. हा एकाच वेळी कालिदासाचा प्रतिस्पर्धी आहे आणि मित्रही. असे असूनही त्याच्या खलनायकी वृत्ती नाही. असलीच तर एक आपलेपणा असलेल्या टीकाकाराची.
बालपणीचे सवंगडी असलेले हे दोघे, एक पुढे गेला तर ऊर्जा, कुवत कमी पडल्याने तो मागे राहिला. अशा मागे राहिलेल्यांच्या मनात त्याबाबत विषाद उरतोच, विलोमच्या मनातही तो आहे. पण त्याचबरोबर कालिदासाला नेमके ओळखणारा तोच आहे. वेळोवेळी नेमके प्रश्न विचारून तो कालिदासाला अडचणीत टाकतो. असे असूनही त्याच्या मनात कालिदासाबाबत तिरस्कार नाही, राग नाही. आहे ती केवळ त्याच्याबद्दलची असूया. तीही कालिदासाच्या कवि म्हणून मिळालेल्या यशामुळे अधिक, मल्लिकेच्या मनातील त्याला हवा असलेला कोपरा कालिदासाने आधीच पटकावल्याने आलेल्या निराशेतून अधिक, की अलौकिक काव्यांचा निर्माता म्हणून कालिदासाच्या पायी चालत आलेल्या राजैश्वर्यामुळे अधिक हे सांगता येणे अवघड आहे.
परंतु या तीनहीपेक्षा मोठे शल्य आहे ते मित्र खूप उंचीवर पोहोचल्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही,त्यातून आपला जिवाभावाचा सखा आपण गमावला याचे. त्यामुळेच त्याच्या स्वरात उपहास आहे, कालिदासाच्या वर्तणुकीतील बेजबाबदार आत्ममग्न वृत्तीला थेट उघडे पाडण्याची आस आहे, त्याच्या आत्मकेंद्रित वृत्तीची चीड आहे, पण तिरस्कार नाही, कुटीलपणा नाही.
कालिदास उज्जैनला जाणार तो 'मल्लिकेशी विवाह करून का?' हा रोखठोक प्रश्न विचारण्यामागचे हेतू हे आहेत. कारण खरंच तसं झालं तर मल्लिकेला आपलीशी करण्याचा त्याची स्वतःची इच्छा धुळीला मिळणार असते. कदाचित मल्लिकेच्या कालिदासाशी असलेल्या नात्यावर समाजमान्यतेची मोहोर उमटावी असा सद्हेतूही असावा. फक्त तो तसा शब्दातून व्यक्त होत नाही. उलट एखाद्याला टोचून उद्युक्त करावे तसा उपहासातून होतो.
कारण कदाचित मनाच्या तळाशी तो कितीही सत्शील नि कालिदास, मल्लिका यांचा हितैषी असला तरी खेळगडी असलेल्या त्या तिघांत तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचताना तो परका झाला; आधी कालिदासाने त्याला तसा मानला नि मल्लिकेलाही तसे मानण्यास भाग पाडले या विषादाचा तवंग त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या पृष्ठभागी तरंगतो आहे. मनाच्या तळातून येणारी त्याची सद्भावना या तवंगाचे अस्तर घेऊनच बाहेर येत आहे नि त्याच्या हेतूपेक्षा वृत्तीच्या मलीनतेचा दोषच तेवढा पदरी येतो आहे.
अखेर कालिदासाला समाजमान्य स्वरूपात न गवसलेली मल्लिका तो मिळवतो नि आपल्यापुरता कालिदासावरचा एक छोटासा - कदाचित बिनमहत्त्वाचा हे त्यालाही ठाऊक आहे असा -विजय तो मिळवतो. पण तरीही त्याबाबत कालिदासाला हिणवण्याइतक्या क्षुद्र पातळीवर तो उतरत नाही. उलट परतून आलेला कालिदास नि मल्लिका यांना एकांतात बोलण्याची संधी देऊन कालिदासाला आणखीनच उपकृत करून ठेवतो. (कदाचित हा ही आणखी एक छोटा विजय मिळवण्याचा प्रयत्न असू शकेल. कालिदासाने मल्लिकेच्या संदर्भात विलोमच्या उपस्थितीबाबत नेहमीच नाराजी व्यक्त केलेली आहे नि मल्लिकेलाही तेच मत स्वीकारायला भागही पाडले आहे. तेव्हा त्या तुलनेत मल्लिकेबरोबर एकांतात राहण्यास कालिदासाला अनुमती देऊन विलोमने त्यावर कडी करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो.)
कालच्या प्रयोगातला विलोम या सार्या वैशिष्ट्यांसह उभा राहिलेला दिसला. उपहासाला कुत्सितपणाच्या नि कडवटपणाला तिरस्काराच्या पातळीवर उतरू न देता विलोम उभा करणे ही तो साकार करणार्या ओम भुतकरच्या अभिनयगुणांना दाद द्यायलाच हवी.
तिसर्या अंकात गावाकडे, मल्लिकेकडे परतून आलेल्या कालिदासाचे दीर्घ भाषण, मोनोलॉग अपेक्षित उंची गाठण्यास अपयशी ठरले असे वाटले. हे उरी फुटून निघालेल्या, सर्वस्व हरलेल्या संवेदनशील, कवि मनाच्या व्यक्तीचे आक्रंदन न भासता निव्वळ एक अकॅडेमिक डिस्कोर्स वाटला. भावनेचा पूर्ण अभाव असलेला. कालिदासाचे काम करणार्या आलोक राजवाडेला कदाचित त्यातील नेमके मर्म सापडले नसावे. या दीर्घ मोनोलोग मधे अनेक छोटे छोटे चढ-उतार आहेत. एखादा कसलेला अभिनेता त्याचे सोने करील. फार कशाला विलोम’चे काम करणारा ओम भुतकर जसे त्या व्यक्तिमत्त्वाचे छोटे छोटे कंगोरे व्यवस्थित दाखवून जातो, त्या मानाने हा कालिदास अगदीच एकसुरी.
कालिदासाच्या या दीर्घ भाषणाला अनेक पैलू आहेत. आपल्याकडून घडलेल्या अनेक चुकांची तो कबुली देतो आहे. काश्मीराधिपती झाल्यावर, कालिदासाचा 'मातृगुप्त' झाल्यावरही एकदा तो आपल्या गावी आला होता, पण तेव्हा त्याने मल्लिकेची भेट घेणे टाळले होते. त्यामागे आपला दुबळेपणा कसा होता हे सांगून तो तिला मोठेपणा देऊ पाहतो नि बदल्यात प्रामाणिकपणाचे श्रेय घेऊ पाहतो. अंबिकेने आपल्या स्वार्थी, आत्मकेंद्रित नि आसक्त वृत्तीबाबत केलेले मूल्यमापन किती योग्य होते हे काळाच्या ओघात आपल्याला दिसून आले, हे देखील तो सांगतो, आणि याच वेळी मुळात अंबिकेपेक्षाही ज्याने हे अधिक नेमकेपणे ओळखले होते त्या विलोमचा उल्लेख चलाखीने टाळतो.
अंबिकेलाच नव्हे तर आपल्या स्वत:लाही जी भीती वाटत होती त्या आपल्या सुखलोलुपतेला लाखोली वाहताना, त्या परिस्थितीत आपली कशी घुसमट होत होती हे मल्लिकेला पटवून देताना जर विक्रमादित्य महाराजांच्या मृत्यूनंतर गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले नसते, केवळ गुप्त कुळाचा जावई या एकाच गुणावर (आणि कदाचित कवी असल्याने, राजकारणात रस नसल्याने डोईजड होण्याची भीती बाळगण्याचे कारण नसण्याने) काश्मीराधिपती झालेल्या मातृगुप्ताला आपल्या राज्यात बंडाळीचा सामना करावा लागला नसता. आणि अंगभूत नेतृत्वाचा अभाव असल्याने परागंदा व्हावे लागले नसते, 'तर' ही उपरती त्याला झाली असती का, तो असा परतून आला असता का हा प्रश्न अनुत्तरितच ठेवतो. मल्लिकाही सुज्ञपणे हा प्रश्न त्याला विचारत नाहीच, तो फक्त तुम्हा आम्हा प्रेक्षकांच्या मनातच उमटतो.
एकाच वेळी आपल्या मागच्या आयुष्याचे सिंहावलोकन, मूल्यमापन करताना, आपल्या हातून घडलेल्या चुका, प्रमाद यांचा धांडोळा घेताना, त्यांची कबुली देताना, ते जुने जग त्याला पुन्हा मूळ स्थितीत हवे आहे हे अप्रत्यक्षपणे तो सूचित करतो आहे.
आपल्या सार्या यशाचे श्रेय इथल्या भूमीला, आपल्या प्रेरणेला - मल्लिकेला - देताना मनात कुठेतरी ती प्रेरणा पुन्हा गवसावी हा सुप्त हेतू आहे. म्हणूनच तर तो काश्मीरमधून परागंदा होऊन आपल्या मूळ भूमीत परतला आहे, तो त्या आपल्या प्रतिभेच्या त्या मूलस्रोताच्या शोधात. त्याने स्वतःच मल्लिकेकडे कबुली दिली आहे की तिथे असताना जे काही त्याने निर्मिले त्यांचे भांडवल त्याने इथूनच नेले होते, तिथले असे काहीच नवे त्याला गवसले नव्हते.
तेव्हा कविकुलगुरु म्हणून आदरणीय असलेला कालिदास आपल्या त्या काव्य-प्रतिभेच्या, त्या मूळ भूमीतून नेलेले सारे संचित वापरून संपल्यावर, त्या आधारे मिळालेले सुखवस्तू, कीर्तिसंपन्न आयुष्य गमावल्यावर पुन्हा नवे संचित मिळवण्याच्या हेतूनेच तो परतून आला आहे. हे सारे प्रामाणिक भासणारे कथन त्या स्वार्थी हेतूने कायम वेटाळून राहिलेले आहे.
पण पूर्वीच्या ज्या निर्भर आयुष्यात तो परतून येऊ पाहतोय तिथे स्थान मिळावे इतका तो निर्भर राहिला आहे का, याची खुद्द त्याच्याच मनात शंका आहे (तुम्हा आम्हा सामान्यांच्या मनात तर ती ही नसते.) शिवाय जिथे तो परतून येऊ पाहतोय ते तेच आहे का जे तो मागे सोडून गेला होता? इथे सर्वशक्तिमान काळाने त्याचे ते जगही पुरे बदलून टाकल्याची प्रचीती त्याला येते आहे. इंग्रजीतील You can't go home again या उक्तीची पुरेपूर जाणीव त्याला तिथे होते आहे. काळाचे चक्र आपण कितीही प्रयत्न केला तरी मागे फिरवता येत नाही ही विदारक जाणीच घेऊनच त्याला आता पुढचा प्रवास करावा लागणार आहे हे ही त्याला उमजले आहे.
हे सारे गुंतागुंतीचे, एकाच वेळी सत्यकथन करणारे, थोडे प्रामाणिक, थोडे अप्रामाणिक, स्वार्थलोलुप तरीही गमावल्या संचिताच्या वेदनेचे क्रंदन असलेले व्यामिश्र स्वरूपाचे भाषण हा नाटकाचा परमोत्कर्षबिंदू. कालिदासाच्या आयुष्यातील दोनही प्रवाह इथे अधेमधे दृश्यमान व्हायला हवेत. जिला आपण सखी मानले पण सहचरी मानले नाही, भावनेच्या हिंदोळ्यावरील नात्याला स्त्री-पुरूषाच्या, नर-मादीच्या नात्याच्या पातळीवर येऊ दिले नाही हा दावा करताना, मल्लिकेला ते पटवून देताना अंबिकेचा, आर्य मातुलांचा रोष नि विलोमच्या टीकेला तो सामोरा गेला, तो अखेरच्या क्षणी मल्लिकेला सवत्स स्थितीत पाहून तिथून निघून जातो, निव्वळ माणसाच्या पातळीवर उरतो. त्याचे हे दुभंग, दुटप्पी व्यक्तिमत्त्व या दीर्घ भाषणातून उलगडून यायला हवे. कालच्या सादरीकरणात हे सारेच केवळ शब्दातून समजून घ्यावे लागले असे खेदाने म्हणावे लागते.
एक सहज जाताजाता नोंदवून ठेवण्याजोगी बाब म्हणजे पहिल्या अंकात मल्लिका, तर तिसर्या अंकात आर्य मातुल नि खुद्द कालिदास हे मुसळधार पावसात भिजून आलेले आहेत. परंतु इतक्या मुसळधार पावसात भिजून आल्यानंतरही हे लोक एकदोनदा कपडे झटकण्यापलिकडे त्याचा परिणाम कुठेच दाखवत नाहीत. याउलट विलोम बोलता बोलता चिखल झटकतो, उत्तरीय पिळून काढतो, ते काढून दोन्ही हातात धरून झटकतो विविध हालचालीतून भिजलेपणाचे नि त्या निमित्ताने पावसाचे अस्तित्व दर्शवतो.
हे खास करून उल्लेखनीय ही आवश्यकही. आवश्यक यासाठी की पेठेंनी प्रयोग उभा करताना जड वस्तूंच्या अस्तित्वाला संपूर्ण फाटा दिलेला आहे. अंबिका धान्य कांडत असलेले उखळ, तिच्या हातीचे मुसळ, ज्या चुलीवर मल्लिकेसाठी दूध गरम करून ठेवले ती चूल, मल्लिका पुढे राजवधू प्रियंगुमंजरीला द्रोणातून पाणी देते तो पानांचा द्रोण हे सारे केवळ मुद्राभिनयातून उभे करणे अपेक्षित आहे नि बरेचसे साधलेही आहे.
परंतु पावसाचे अस्तित्व- विलोम वगळता - कुणीही जाणिवेच्या पातळीवर दाखवून देत नाही. 'आषाढातील एक दिवस' हे शीर्षक देऊन मोहन राकेश यांनी त्या पावसाचे कहाणीतील अतूट स्थान आधीच अधोरेखित करून ठेवले असताना हे अधिकच खटकणारे. याशिवाय संस्कृत कविकुलगुरु कालिदासाच्या तोंडून अधूनमधून येणारे न्हवतं, म्हाईती या वळणाचे उच्चार खटकले. अर्थातच ही नाटककाराची समस्या नव्हे, तर अभिनेत्याचा, दिग्दर्शकाचा गाफीलपणा म्हणावा लागेल.
एकुणात सांगायचे तर हा आषाढातील एक दिवस नेटकेपणे उभा केला खरा, आम्हाला भावला मात्र नाही.
- oOo -