सोमवार, २९ मे, २०१७

गीता कपूर, 'हल्लीची पिढी...' वगैरे

आज गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली आहे.

DemonKid

त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळू लागली आहेत. एकतर आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे गाठण्याची आहे. 'अमुक एक असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशीच आहे म्हणून तो असा आहे' किंवा 'तो असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशी आहे' हे अर्थनिर्णयन सर्रास वापरले जाणारे (जात काढून धर्म, शहर/गांव, देश, भाषा, रोजगार-क्षेत्र, एकाच गावातील उपनगरे/वस्ती हे टाकले तरी हे विधान तितकेच खरे ठरते.) त्यातलाच हा एक नमुना. आईबाप नेहेमी बिच्चारे वगैरे असतात, मुलं वैट्टं वैट्टं असतात.

गंमत म्हणजे हे असले लिहिले की 'आईबापांना सांभाळणे ही आपली संस्कृती आहे(१), 'त्यांच्या'(२)सारखे नाही हो आम्ही" च्या बाता मारणारे धावून येतात. यातील बरीचशी मंडळी लग्न होताच 'मग आम्हाला प्रायवसी नको का?' असं म्हणत आईबापांवेगळे राहतात, वास्तवातील वा फेसबुकच्या पारावर नि बारमधे भरपूर टाईमपास करुनही 'आईवडिलांसाठी वेळच मिळत नाही हो' म्हणून फेसबुकवर मातृदिन पितृदिन 'साजरे' करतात. वर केवळ दुसर्‍यावर आगपाखड करत संस्कृतीचे ठेकेदार म्हणून मिरवतात.

अशी फीचर्स करणार्‍या चॅनेल्सना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. की एखाद्या दारुड्या बापाच्या किंवा सोन्याचांदीच्या, साड्यांच्या अतिरेकी आहारी गेलेल्या आत्ममग्न आईच्या, एका जिद्दीने आपल्या पायावर उभे राहिलेल्या मुलीचे/मुलाचे असे फीचर केले होते का हो? नाही म्हणजे जिद्दीने उभे राहिलेल्यांवर फीचर होते, पण त्यात 'बाप दारुच्या व्यसनात बुडालेला असून, निर्व्यसनी राहून स्वकष्टावर यश मिळवलेली/ला' अशी हेडलाईन पाहिली आहे का कधी?

केवळ आपले तथाकथित पौरुष सिद्ध करण्यासाठी पोर जन्माला घालून आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकून न पाहणारे आईबाप - बाप अधिक - माझा आसपास असंख्य दिसतात. त्यांची स्वकष्टाने, चुकतमाकत, धडपडत, पुन्हा उठून उभे राहात बराच पल्ला गाठलेली अनेक मुले माझ्या पाहण्यात आहेत. त्यांच्या यशाच्या संदर्भात 'आईबापांच्या पाठिंब्याशिवाय' हा शब्दप्रयोग आवर्जून वापरतो का हो आपण? मग हे सतत आईबापांना बिच्चारे नि मुलांना विलन बनवणारे भिकार फीचर्स का करतो आपण? किती काळ असल्या पूर्वग्रहांच्या आधारे जगणार आहोत आपण? जात, धर्म, गाव, भाषा यांच्याबाबत होते तसे हे एकांगी विक्टिमायजेशन का बरं?

मुळात पेन्शनर नावाची प्रिव्हिलेज्ड जमात वगळता जगातील प्रत्येकालाच आपल्या कार्यक्षम काळात वृद्धावस्थेसाठी तरतूद करून ठेवायची असते. म्हातारपणी मुले सांभाळतील हे गृहित धरणे म्हणजे मुलांना पोस्ट-डेटेड चेक समजण्यासारखे आहे.

आज गीता कपूर यांच्याबद्दल ही बातमी आहे. काही काळापूर्वी उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या म्हातारपणच्या विपन्नावस्थेबाबत बातमी होती नि त्यांना मदत करावी म्हणून काही कलाकार नि रसिक मंडळी प्रयत्न करत होती. त्यांच्या खाँसाहेबांबद्दलच्या प्रेमाबद्दल किंवा खुद्द खाँसाहेबांच्या सनईवादनातील गुणवत्तेबद्दल शंका नाहीच, पण 'शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कदाचित सर्वाधिक बिदागी घेणारा कलाकार' अशी ख्याती असलेल्या खाँसाहेबांवर ही वेळ आली यात त्यांचा मोठा दोष नव्हे का?' असा प्रश्न अन्य एका दिग्गज कलाकाराने विचारला होता आणि मला तो पूर्ण पटलेला होता.

इतका पैसा मिळवला त्याचे नियोजन नको? (दणादण इन्शुरन्स पॉलिसीज घेणारे नाहीतर प्लॅट घेणारे कदाचित सर्वोत्तम गुंतवणूक करत नसतील, पण ती करावी लागते हे त्यांना उमगलेले असते इतपत श्रेय त्यांना द्यायलाच हवे.) त्या दिग्गज गायकांना 'माजले आहेत', 'एका कलाकाराने दुसर्‍याबद्दल असे बोलावे का?' वगैरे शेरेबाजी झाली पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या फंदात कुणी पडले नाही, आपण कधीच त्या फंदात पडत नाही. सोपा उपाय म्हणून प्रश्न विचारणार्‍यावर शेरेबाजी, त्याची लायकी काढणे, तिसर्‍याच कुणाला मध्ये आणून 'यापेक्षा तर बरे ना' असा फाटा फोडणे आदी मार्गांनी आपण आपल्यापुरता प्रश्न नाहीसा करुन टाकतो.

गीता कपूर यांनी शंभरेक चित्रपटांतून काम केले. भूमिका हीरोईनच्या नसतील. तेव्हा खूप नाही पण एखाद्या मजुरापेक्षा, दुकानात काम करणार्‍या/रीपेक्षा, रस्त्यावर झाडू मारणार्‍या/रीपेक्षा नक्कीच चांगले पैसे मिळवले असतील. मग त्यांनी वृद्धावस्थेसाठी आर्थिक नियोजन केले नव्हते का? (करूनही ते फसणे सहज शक्य आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे.) की मुलाने सगळे पाहावे असा परावलंबी विचार होता? तसे असेल तर 'माझ्या मते' ही चूक मानायला हवी. आपली मिळकत मुलाच्या नावे करून त्याने म्हातारपणची आर्थिक बाजू सांभाळावी ही विचारसरणीच- निदान सुस्थिर आयुष्य जगलेल्यांच्या संदर्भात चूक म्हणायला हवी.

अशा तर्‍हेची फीचर्स पाहिली की माझ्या डोक्यात हटकून विचार येतो तो एखाद्या 'कामातून गेलेल्या' मजुराचा त्याला मी वृद्ध म्हणत नाही. कारण वृद्धावस्थेच्या सरकारी अथवा रूढ कल्पना त्यांच्या संदर्भात लागूच पडत नाहीत असे मला वाटते. त्याला खायला घालणे परवडणार नाही म्हणून मुलगा त्याला अचानक सोडून गेल्यामुळे(३) निराधार अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या मजुरावर कधी चॅनेल्सनी फीचर्स केले आहेत? त्या निमित्ताने (आज कोणता राजकारणी काय बरळला यावरच्या सनसनाटी चर्चा सोडून) सर्वांना निवारा नि अन्न याबाबत काही करता येणे शक्य आहे का याबाबत चर्चा घडवून काही हाती लागते का याचा निदान प्रयत्न केला आहे?

मुळातच समाजाच्या वरच्या, निदान मधल्या प्रवर्गात मोडतात, स्वतःच्या दुरवस्थेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार असतात, त्यांची दु:खे मांडून सहानुभूती नि मदत द्या वगैरे आवाहने करून समाजातल्या या आहे रे वर्गाच्या समस्या सोडवण्यातच हातभार का लावतात?

- oOo -

(१). असे मी मानत नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे माझे मत, एकुणच संस्कृतीच्या नावाखाली होणारे भंपक सरसकटीकरण अथवा एकसाचीकरण धोकादायक असे मी मानतो.

(२). कुण्या 'त्यांची' रेघ लहान केल्याशिवाय आपली रेघ मोठी करताच येत नाही हे दुर्दैव.

(३). वृद्धाश्रमात फक्त श्रीमंतांचे आईबाप असतात, गरीबांचे नाहीत' असा दावा करत गरीब कित्ती गुणी वगैरे दावे करणारे वृद्धाश्रमाच्या अर्थकारणाबाबत पूर्ण अनभिज्ञ असतात इतकेच बोलून थांबतो.

---

संबंधित लेखन: बालक-पालक


हे वाचले का?