मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या वाटेने जात एक मानदंड निर्माण करणारे जे चित्रपट आहेत त्यात दोन-तीन दशकांहून अधिक काळ ज्याचा बोलबाला टिकून राहिला असे मोजकेच.
गाव-पाटील आणि त्याने केलेला अन्याय, त्याविरोधात बंड करुन उठलेला कुणी तरुण, या दोन्हीवर लावणी आणि लावणीवालीचा तडका; सोशिक शेतकरी; प्रेमस्वरुप आई; फुलाला फूल धडकून ज्यांच्या प्रेमाचा इजहारे इश्क पडद्यावर होतो असे माफक प्रणयपटू नि त्यांची कथा; हसण्या-हसवण्याच्या वाटेने गल्ला जमा करत गेलेले चित्रपट आणि अर्थातच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या काळातील कथानकांच्या आधारे मांडलेले कथानक... हे मराठी चित्रपटाचे ढोबळ प्रवाह.
राजकारणातल्या डावपेचांचा आणि त्यावर परिणाम घडवणार्या समाजकारणाचा वेध घेणारा एखादा सिंहासन (१९७९), आपल्या एका प्रश्नानेच गावच्या सत्ताधार्याच्या मनात द्वंद्व निर्माण करणारा सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारा सामना (१९७५) आणि एरवी जास्तीतजास्त गाव पातळीवरील म्हणजे नागरी पार्श्वभूमीवरच्या चित्रपटांची वाट सोडून, थेट ठाकर पाड्यावरची गोष्ट साकारणारा जैत रे जैत (१९७७), स्वत:चा शोध घेत स्वतंत्र होऊ पाहणार्या स्त्रीचे आयुष्य चितारणारा उंबरठा (१९८२)... अशा काही मोजक्या चित्रपटांनी धोपटवाट सोडून आडवाटा धुंडाळल्या. प्रेक्षकांना जे हवे ते विकून पैसे कमावण्याच्या एकमेव उद्देशाने चित्रपट निर्माण करणारे त्या काळात कमी होते. विकण्यासाठी चित्रपट बनवण्याऐवजी, लोकमानसात आधीच घर केलेल्या दर्जेदार कलाकृतींवर चित्रपट काढले जात होते. सिंहासन हा अरुण साधूंच्या 'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक' या दोन कादंबर्याच्या आधारे उभा आहे, उंबरठा शांता निसळ यांच्या ’बेघर’ला पडद्यावर आणतो, तर 'जैत रे जैत’ हा गो.नी. दाण्डेकरांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर बेतलेला आहे.
शब्द-चित्राकडून चित्रपटाकडे येताना अनेक बदल करणे आवश्यक असते. कथानकाला दृश्य बाजूला अधिक व्यक्त करण्याच्या दृष्टीने त्यात बदल करावे लागतात. काही वेळा आधीच बांधलेल्या ताजमहालाला आपल्याही चार विटा लावून त्यावर आपल्या नावाची पाटी लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्याहून वाईट म्हणजे अशा प्रसिद्ध लेखन आणि लेखकाच्या कलाकृतीमध्ये आपल्या दृष्टिकोनाची भेसळ करुन आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला जातो. ’कट्यार काळजात घुसली’ या नितांतसुंदर नाटकाचा हिंदुत्ववादी झगझगीत झगा घालून आलेला ढिसाळ नि बटबटीत चित्रपटीय अवतार आपण अलिकडेच पाहिला आहे. सुदैवाने ’जैत रे जैत’ या चित्रपटात तपशीलातले मोजके बदल सोडले, तर मूळ कादंबरीतील कथनप्रवाहाशी तो प्रामाणिक राहतो आहे.
'जैत रे जैत’ नावाजला गेला याची एकाहुन अधिक कारणे आहेत. कलाकृतीच्या बाजूने पाहिले तर ’आख्यान’ हा नाटकाच्या सादरीकरणाचा प्रकार या चित्रपटाने प्रथमच पडद्यावर आणला. एका बंदिस्त रंगमंचावर सादर होणारे आख्यान खुल्या अवकाशात आले. नाग्या आणि चिंधीची गोष्ट दोन सूत्रधार आपल्याला सांगू लागले. हा प्रयोग अभिनव होता. महानोरांनी लिहिलेली गाणी आणि हृदयनाथांचे संगीत यांनी हे आख्यान चांगले तोलून धरले.
कथानकाच्या बाजूने पाहिले तर नागर पार्श्वभूमी सोडून या चित्रपटाने प्रथमच अनागर जगणे पडद्यावर आणले. जरी कादंबरीतील ठाकरांचे निसर्गजीवी असणे चित्रपटात तितके ठसठशीत उतरले नसले, तरी त्याने त्यांच्या शोषितपणाची गोष्ट न मांडता, त्यांचे नैसर्गिक आयुष्य समोर ठेवले. आणि म्हणून चित्रपट (आणि अर्थातच मूळ कादंबरीही) सामाजिक अंगाने जात नाही. तो नाग्या-चिंधी यांचे आयुष्य आणि नाग्याचा सूड याभोवती फिरतो. या चित्रपटामुळे मराठी चित्रपट प्रवाहाने एक नवे वळण घेतले असा भास झाला, पण पुढे तो भासच होता हे सिद्ध झाले. कारण मराठी चित्रपट पुन्हा नागर जिण्याच्या गोष्टी सांगू लागला. पुढे तर तो केवळ शहरीच नव्हे, तर महानगरी झाला आणि तथाकथित विनोदी चित्रपटांचा रतीब घालू लागला.
चित्रपट कादंबरीवर आधारित असल्याने दोघांची तुलना होणॆ अपरिहार्य आहे. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो समजण्याइतपत वयाचे होण्यास जसा दशकभराचा कालावधी जावा लागला, तसेच कादंबरी वाचण्यास मुहूर्त लागायला जवळजवळ दोन दशके गेली. ती वाचून संपल्यावर एके काळी प्रचंड प्रभावित केलेल्या त्या चित्रपटातले बरेच काही खटकूही लागले. मूळ कादंबरीबाबत ’वेचित चाललो...’ वर स्वतंत्रपणे लिहिले आहेच. त्या तुलनेत आता चित्रपट कसा दिसतो हे पाहतो आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच नाग्या समुद्रातून पोहून बाहेर येताना दिसतो. नंतर एका प्रसंगात त्याचा बा आणि नाग्या समुद्रकिनारी बोलत बसलेले दिसतात. आता ठाकर हे डोंगरवासी, त्यांच्या त्या अधिवासापासून काही मिनिटात किंवा काही तासांत समुद्रावर पोहोचून आंघोळ उरकून परत वस्तीला पोचता येईल इतका समुद्र जवळ असेल? समुद्रकिनारी डोंगररांगा असलेली ठिकाणे जगात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतील. लिंगोबाचा सुळका हा वास्तवातील कर्नाळा किल्ला. नकाशावर नजर टाकली, तर तेथून समुद्र किमान तीस किलोमीटर दूर आहे. तिथे दहा-बारा वर्षांचा नाग्या एका दिवसात जाऊन परत येईल? आणि मुळात डोंगरात पाणी महामूर असताना समुद्रावर का जाईल? पुढे चिंधीला अर्जुना मोळी उचलून देतो, त्या प्रसंगात एका मोठ्या (कदाचित एखाद्या नदीच्या उगमापाशीच्या) ओढ्याचे दर्शन घडते. तो ओढा सोडून नाग्या आंघोळीला समुद्रावर का गेला असेल?‘ हे समुद्राचे खूळ पटकथालेखकाने का घातले असेल?
आणखी एका मुद्द्याबाबत मला तितकी खात्री नाही. पण शंका आहे. नाग्याच्या बापाला भेटलेले ठाकर त्याला ’राम राम’ म्हणून अभिवादन करतात? महादेवाचे आणि वाघदेव, नागदेव वगैरे निसर्गदेवांचे भक्त असलेले, प्रामुख्याने अनागर लोक ’राम राम’ने अभिवादन करतील? वैष्णव पंथाचा वरंवटा वेगाने फिरत जसजसा भारतीयांचे जिणे व्यापू लागला; त्यात जसे धनगर राजा विठोबाचा विष्णू-अवतार झाला, तसेच अभिवादनात 'राम राम’ने जागा पटकावली असेल का?
पुढे एकदा ढोलिया ढोल वाजवता वाजवता नाचतो. ढोलाचे वजन आणि हाताच्या हालचाली यांचा तोल नि संगती (co-ordination) सांभाळत तो नाचू शकेल? शारीरिक हालचालींमुळे ढोलांवरील आघातांची तीव्रतेची लय बिघडणार नाही? एकुणातच नाग्याचे ढोल वाजवणे अत्यंत निष्काळजीपणे चित्रित केलेले दिसते. नाग्याच्या हाताच्या हालचाली इतक्या वरवरच्या आहेत की ढोलाच्या बोलांशी संगती राखणे सोडाच, अनेकदा ते हात ढोलाला टेकतही नाहीत. सत्तरीच्या दशकात चित्रपटाची तांत्रिक बाजू आजच्या तुलनेत खूपच प्राथमिक पातळीवर होती, हे समजण्याजोगे आहे. पण जे माणसाच्या कुवतीचा भाग आहे त्याबाबत दिग्दर्शकाला सूट देता येणे अवघड आहे.
कादंबरीमध्ये चिंधी नाग्याला ’बाला’ म्हणजे ’बाळ’ म्हणून संबोधते. कधी ’माजा नाना (न्हाना, लहाना) ढोलिया’ म्हणते. कारण तो वयाने तिच्याहून लहान आहे. चित्रपटातील ठाकराची चिंधी मात्र एकदम नागर भाषा बोलू लागते. ती आता त्याला ’माझ्या राजा’ म्हणते. प्रेक्षकांतील सनातनी मनांना सांभाळण्यासाठी चित्रपटात हे वयाचे गणित बदलून घेतले असावे.
बहुधा याच कारणाने कादंबरीतील ’देवीमाशी’ चित्रपटात ’राणीमाशी’ झाली. हा बदलही संदर्भ सोडतो. कादंबरीमध्ये नाग्याच्या श्रद्धाळू मनाला एकाहुन अधिक ’देवां’कडून दगाफटका झाला आहे. नागदेवाला मान देऊनही त्याच्या प्रजेतील एकाने नाग्याच्या बापाचा बळी घेतला. आणि उंदीर, मोर यांपासून दूर राहूनही गणपती अथवा सरस्वती त्याच्या मदतीला धावली नाही. वाईटवकट वागला नाही. परक्या बाईकडे पाहिले नाही. तरी महादेवाने त्याच्यावर अनुग्रह केलेला नाही. यातून नाग्या अश्रद्ध झाला नसला, तरी त्याने देवांविरोधात बंड केले आहे. तो त्यांना जाब विचारतो आहे. देवीमाशीला तर तो तिच्या घरातून हुसकावून लावण्याचा पणच करुन बसला आहे. सनातनी मनांना हे धक्का देणारे आहे. या कारणाने चित्रपटाने कथानकातील नाग्याच्या सूडावर अधिक लक्ष केंद्रित केले असावे.
कादंबरीतील चिंधी कणखर आहे. ती स्वयंपूर्ण तर आहेच, पण नाग्याचा आधारही आहे. ती कधीच वृत्तीने नरम पडलेली दिसत नाही. नाग्याच्या काहीशा आततायी सूडाच्या कृतीतही ती त्याच्यामागे खंबीर उभी आहे. एकदोनदा नाग्या स्वत:च, ’काय करायचे आता देवीमाशीवर सूड उगवून’ म्हणत सोडून देऊ पाहतो, तेव्हा ती त्याला पुन्हा उद्युक्त करते आहे. आजवर ज्या पोळ्यांना कुणी हात घालण्याची हिंमत केली नाही ते काम आपला ढोलिया नक्की करेल याचा तिला विश्वास आहे. भारतीय साहित्यात जी मोजकीच कणखर नि स्वतंत्र बाण्याची प्रमुख स्त्री-पात्रे रंगवलेली आहेत त्यापैकी चिंधी हे एक महत्वाचे पात्र आहे.
चित्रपटात ती प्रथम नाग्याच्या झोपडीत येते तेव्हा त्याच्या आईशी बोलताना तिच्या डोळ्यात पाणी येते. ती अशी हळवी झालेली पटणारे नाही. कादंबरीमधली चिंधीने पूर्ण विचारपूर्वक नाग्याच्या झोपडीत पाऊल ठेवले आहे. ती दृढनिश्चयी आहे. चित्रपटातील त्या भावुक प्रसंगाने तिचे व्यक्तिमत्व उणावते आहे. पुढे त्यांचा पाट लागल्यावर तो तिला प्रथम लिंगोबाच्या सुळक्याकडे घेऊन जातो, आपला निर्धार सांगतो, तेव्हा ती ’नाग्या मला भ्या वाटतंय’ म्हणते. या दोन प्रसंगांमुळे अन्य प्रसंगांत स्वत:च्या वडिलांना ’माझा जीव हाय त्याच्यावर’ (कादंबरीत ती प्रीत म्हणते.) म्हणून ठणकावते किंवा ’(पैशाला) हात लावू नगंस’ म्हणते, तेव्हा कणखर व्यक्तीपेक्षा स्वार्थी नि उद्धट अधिक भासते.
संपूर्ण कादंबरीत ती फक्त दोनदा, ती ही फक्त नाग्यासमोरच हळवी झाली आहे. प्रथम ती त्याच्या झोपडीत शिरते तेव्हा त्याची आई तिला ’उष्टी नवरी’ म्हणते, आणि नाग्या तिला मूक संमती देतो तेव्हा. इतरांचे वाटेल ते बोल ऐकून घ्यायची तिची तयारी आहे. पण ज्याच्यावर प्रीत केली, त्यानेही तसेच समजावे याने ती दुखावते. दुसर्या वेळीती गर्भार असल्याचे तिला जाणवते तेव्हा ती त्याला सूडापासून परावृत्त करु पाहते त्या प्रसंगी. तिच्या त्या अवस्थेत तिचे ते वागणे अगदीच समजण्याजोगे आहे. तिच्या व्यक्तिमत्वातील तो बदल अपेक्षितच आहे.
चित्रपटात सुभान्या नाग्याच्या आईशी बोलताना तिचा दंड धरुन, स्पर्श करुन बोलतो. चक्क दारू मागतो. हा प्रसंग अनाकलनीय आहे. स्त्री-पुरुषांबाबत ठाकरांच्या चालीरीती अगदी नागर वस्तीतील पांढरपेशांइतक्या अनाठायी कडक नसतील. पण नवरा गमावलेल्या, परक्या स्त्रीला तो स्पर्श करुन बोलेल, आणि वर तिच्याकडून दारू मागेल हे अशक्य कोटीतील वाटते. चित्रपटातच चिंधी जेव्हा नाग्याच्या झोपडीत येते, तेव्हा तिचे बखोट धरून तिला बाहेर काढताना नाग्याची आई ’ही दुसर्याची बाईल, घरात मी ठेवू कशी’ म्हणते. म्हणजे परस्त्रीबाबत एक अंतर राखून राहणे हे त्या समाजातही अपेक्षित आहे. तसे असेल तर सुभान्याचे वर्तन अनाकलनीय तर आहेच, पण त्या प्रसंगाचे कथानकातले औचित्यही समजत नाही.
चरमसीमेच्या अर्थात क्लायमॅक्सच्या प्रसंगातही मोठा घोळ आहे. नाग्या सुळक्यावर जायला निघतो, तेव्हा तो चिंधीला म्हणतो, ’मी वरुन दोर सोडतो. तू खाली घट्ट धरुन ठेव.’ हे त्याचे सांगणे अनाकलनीयच नव्हे, तर धक्कादायक आहे. वर लटकून तो पोळी खाचणार म्हणजे साहजिकच गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने ती खाली पडणार. त्यातून संतापाने पेटलेल्या माश्या बाहेर पडणार. आणि समोर दिसेल त्या जीवावर त्या सूड उगवणार हे काय नाग्याला ठाऊक नाही? अशा स्थितीत तो तिला खाली थांबण्यास कसे सांगू शकेल?
कादंबरीमध्ये हा प्रसंग अधिक तपशीलाने मांडला आहे. पोळ्यांच्या बरोबर डोक्यावरुन खाली उतरणे शक्य नव्हते. कारण त्या ठिकाणी तो बांधण्यास आधार नसतो. मग पुढे काही अंतरावर एका झाडाला बांधून तो खाली सोडला जातो. तो पोळ्यांपासून थोड्या अंतरावर खाली येतो. आता पोळ्यांकडे जाता यावे म्हणून तो तिरपा करुन पोळ्यांजवळून खाली नेणे आवश्यक असते. नि हे काम नाग्या चिंधीला सांगतो. 'खाली दोर बांधून तू दूर जाऊन उभी राहा, कांबळं नीट गुंडाळून घे' असेही बजावतो.
पण प्रत्यक्षात तो पोळी फोडू लागतो तेव्हा दोर हलू लागतो. त्या हलण्याने तो पडेल या भीतीने चिंधी धाव घेते, नि तो घट्ट धरुन ठेवते. त्यामुळेच ती माश्यांच्या हल्ल्याच्या टप्प्यात येते. हे तर्कसंगत आहे. चित्रपटातील प्रसंग अगदीच फसला आहे. सर्वात वाईट म्हणजे शेवटी चिंधी ’नाग्या तू जितलास’ म्हणते. मूळ वाक्य ’तुझी जैत झाली’ असे आहे. आणि कादंबरीचे, आणि म्हणून चित्रपटाचे शीर्षकही ज्यातून येते आहे तो शब्दच बदलला आहे. हा बदलही पटकथालेखकाने का केला देव जाणे.
हे पुरेसे नव्हते म्हणून की काय, याच क्षणी संपलेल्या कादंबरीला ताणून आणखी एक प्रसंग चित्रपटात घातला आहे. खालून येणारा ढोलाचा आवाज ऐकून माश्यांनी डसलेल्या अवस्थेत चिंधीला सोडून ढोलाकडे धाव घेतो. तो फक्त ढोलिया आहे आणि तो फक्त त्याच्या ढोलाचाच आहे, इतर कुणाचाच नाही असे पटकथालेखकाला ठसवायचे असावे. बरं इथेही थांबले असते, तरी मुद्दा पुरा झाला असता. पण नाही.
पुढे गेलेल्या अर्जुनाला चिंधीचे कलेवर दिसते. आता तो पुन्हा नाग्याला बोलावून आणतो. नाग्या फक्त एक नजर टाकतो, ढोल पाठीवर टाकतो नि निघून जातो. थोडक्यात ’चिंधी वारली’ हे प्रेक्षकांना सांगण्यापुरता हा पुढचा तुकडा जोडला आहे. कादंबरीत जिथे ’तुझी जैत झाली’ असे चिंधी सांगते, तिथेच गोनीदांनी नाग्या-चिंधीची गोष्ट संपवली आहे. कारण ती नाग्याच्या पुण्यवंत होण्याच्या असोशीची, त्यातून जन्मलेल्या श्रद्धेची, मग विपरीत अनुभवाधारे ती गमावल्याची, सूडभावनेच्या उगमाची आणि अखेरीस त्याच्या परिपूर्तीची(?) आहे. त्यामुळे तिथेच ती गोष्ट खर्या अर्थी संपली आहे. चित्रपटातील पुढचा प्रसंग ’न्हाई म्हजी पर नक्की कशाप्पाई घातला हा?’ असा प्रश्न मनात उमटवून जातो.
एकुणात प्रथमदर्शनी अतिशय प्रभावित करुन गेलेला चित्रपट पुन:प्रत्ययाचा आनंद काही देऊ शकला नाही. You can never go home again या उक्तीचा प्रत्यय तो चित्रपट पुन्हा पाहताना येत गेला. असे असले तरी पहिल्या अनुभवाने दिलेला आनंद काही खोटा नसतो. आता आम्हाला फार अक्कल आली आहे, हे जगाला सांगण्याच्या नादात त्याचा अधिक्षेप करायचा नसतो. त्याचे देणे त्याने आधीच दिलेले असते, त्याबद्दल कृतज्ञ राहायचे असते.
- oOo -
जाताजाता:
चित्रपटातील एका पात्राचे नाव समजले नाही म्हणून ते शोधत होतो. गुगलबाप्पाने मराठी विकीवर नेऊन पोचवले... अत्यंत भयाण माहिती समोर आली! जेमतेम एका परिच्छेदात असंख्य चुका आहेत. सर्वात अधिक खटकलेले म्हणजे ’शेवटी नाग्या राणी माशीला मारण्यात यशस्वी होतो’ हे ठोकून दिले आहे. मुळात चिंधी म्हणते ’उडून गेली’, मेली नव्हे ! दुसरे, नि महत्वाचे म्हणजे खरेच तिने तशी पाहिली, की नाग्याला सूडपूर्तीचे समाधान द्यावे, जेणेकरुन तो जगण्याकडे परतून येईल म्हणून तिने तसे (खोटे) सांगितले, याचा उलगडा चित्रपटात होत नाही. त्यामुळे त्याबाबत असे निश्चित विधान करताच येणार नाही. कादंबरीत तर ’आधीच योजून ठेवलेले खोटे बोलली’ असे गोनीदा निसंदिग्धपणे म्हणतात.
काडीमोडासाठी चिंधी नवर्याला ’नुकसानभरपाई’ देते म्हणे. विकीवर माहिती भरणार्यांना हुंड्याच्या नेमके उलट असलेली ब्राईडप्राईस म्हणजे वधूशुल्क ही पद्धत माहित नसावी. तिच्या नवर्याने पंचवीस रुपये तिच्या बापाला देऊन तिच्याशी लग्न केले होते. लग्न मोडायचे तर तो पैसा त्याला परत देणे भाग असते. यात नुकसानभरपाईचा मुद्दाच नाही. शिवाय या पानावर नाग्या आणि चिंधीचा पाट लागल्याचा उल्लेख नाही. जणू विवाहबाह्य संबंधातून ती गर्भार राहते असा आभास त्यातून होतो आहे.
भारतीय- त्यातही मराठी- विकीपीडिया हा अज्ञानी, हौशी, रिकामटेकड्या तसंच धूर्त लोकांनी (आपल्या सोयीची माहिती पेरण्यासाठी) चालवलेला सर्वस्वी अविश्वासार्ह माहितीकोष आहे असे मी म्हणतो त्याला पुष्टी देणारे हे भक्कम उदाहरण आहे.