-
माध्यमांतील प्रतिबिंब << मागील भाग
---
सहा-आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ‘पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला.
निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात.
आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत
एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कांगावा करत धुडगूस घालणार्या सेना, ब्रिगेड वा संघटनांचा गल्ली-बोळांत ढेकणांसारखा बुजबुजाट झालेला दिसतो. माध्यमेही त्यांच्या त्या अस्मितेच्या गळूला, त्या नकारात्मतेला मूळ कलाकृतीपेक्षा अधिक वाव देणारी आहेत.
‘हिंद देशके निवासी सभी जन एक है’ वगैरे म्हटले तरी माझे कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझी ओसाडवाडी, माझी भकासगल्ली जग्गात भारी आहे असा बहुतेकांचा समज असतो... आणि ‘आपला तो नाही’ हा गैरसमजही असतो.
लेखाच्या पूर्वार्धाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या प्रतिज्ञेमधील “सारे भारतीय माझे बांधव आहेत.” आणि “माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.” हे भारतीय नागरिक केव्हाच विसरले आहेत. ‘माझ्या धर्माचे, माझ्या जातीचे, माझ्या उपजातीचे, माझ्या गावाचे लोक, माझ्या –धार्मिक वा राजकीय– बुवाचे स्वयंघोषित अनुयायी वा मानसिक गुलाम हेच फक्त माझे भाईबंद आहेत’ अशी नवी प्रार्थना चॅनेल्सवरुन, भाट छपाई माध्यमांतून, व्हॉट्सअॅपवरुन घोकून घेतली जात आहे. भरीला ‘याची कणभरही लाज वाटू देऊ नका’ असे बिनदिक्कतपणे सांगणारे नेते पैशाला पासरी झाले आहेत.
विडंबनकार रामदास फुटाणे यांनी पन्नास वर्षांपूर्वी आसपासची ढासळती राजकीय नि आर्थिक नैतिकता, उग्र होत जाणार्या धार्मिक, जातीय अस्मिता आणि विखंडित होत जाणार्या समाजावर भाष्य करताना या प्रतिज्ञेचे विडंबन केले होते. ते आज अधिकच चपखल बसते आहे.
भारत कधी कधी माझा देश आहे भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा,माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे... माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांताची जुंपणार आहे जुंपल्यांतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील... (अपूर्ण) - रामदास फुटाणे
बांधिलकी ते भक्ती
साधारण दोन-तीन दशकापूर्वीपर्यंत ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द परवलीचा होता. आता त्याची जागा ‘राष्ट्रभक्ती’ या शब्दाने घेतली आहे. दोन्हींत महत्वाचा फरक आहे. पहिल्यामध्ये परस्पर-बांधिलकी आहे, तर दुसर्यामध्ये केवळ समान आदर्शापुढे झुकणारी भक्ती आहे.
त्या भक्ति-विषयाची ठेकेदारी बळकावणारे तिचे पौरोहित्य करून सामान्यांनी तिच्या चरणी अर्पण केलेला मलिदा ओरपत आहेत. आणि जे झुकत नाहीत त्यांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद-छद्म-झुंड आदि सर्व वैध-अवैध मार्गानी ही खुजी मंडळी आपली उंची वाढल्याचा आभास निर्माण करत आहेत.
बांधिलकीची अपेक्षा आता निष्ठेच्या अपेक्षेत रूपांतरित झाली आहे. आणि निष्ठेला, अस्मितेला छेद देण्यासाठी मग जातीय अस्मितेची विषवल्लीही वेगाने वाढू लागली आहे. माणसांना बांधिलकी ऐवजी अस्मिता, द्वेष यांचा आधार घ्यावासा वाटतो आहे. देशाची, देशप्रेमाची उभारणी ही बांधिलकीपेक्षा द्वेषावर अधिक होते आहे. यातील विसंगती समजून घेण्याची बहुतेकांची इच्छा नाही नि कुवतही.
माणसे मानसिकदृष्ट्या एका बाजूने भीती आणि ती दडपण्यासाठी आवंतून आणलेल्या अभिनिवेशी त्वेषाने इतकी भारली आहेत, की सर्वांचे आदर्श हळूहळू रचनात्मक कृती करणार्यांपेक्षा प्रासंगिक शूरवीरांकडे अधिक सरकले आहेत.
आदर्शांचे बाहुबलीकरण
डॉ. आंबेडकरांसारखा चतुरस्र बुद्धिमान माणूस शोषित वर्गाला पुरेसा वाटत नाही. त्यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ या सशक्त दृष्टिकोनापेक्षा प्रासंगिक, कर्मकांडसदृश विद्रोह त्यांना अधिक आकर्षक वाटतो. त्यासाठी इतिहासातून आपले शूरवीर उचलण्याची गरज वाटते.
इतर जातींनीही आप-आपल्या जातीतील संतांचे बोट सोडून इतिहास खंगाळून आप-आपले वीर शोधून काढले आहेत. उदाहरणार्थ, धनगरांच्या कार्यक्रमांतून सर्वकल्याणकारी अहिल्याबाईंची जागा हळूहळू रणझुंजार मल्हाररावांनी घेतली.
फार कशाला, प्राचीन कालापासून स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवणार्या ब्राह्मणांनीही आपल्या संघटनेचा आदर्श म्हणून त्या जातीतील असंख्य बुद्धिमंताऐवजी क्षत्रिय-निर्दालक परशुराम निवडला. त्यामागे प्राचीनतेचा अट्टाहास तर आहेच, त्याचबरोबर याला ब्राह्मण जातीअंतर्गत (‘कोकणस्थ → कोकण → अपरांत → निर्माता → परशुराम’ अशा बादरायण संबंधाने) कोकणस्थांचा वरचष्मा स्थापन करण्याचा मार्ग म्हणूनही पाहता येते. म्हणजे गटातल्या गटातही उपगटांची कुरघोडीही कमी नसते.
माणसे रचनात्मक, निर्मितीक्षम कामांपेक्षा, अस्मितेला, त्यांच्या झेंड्यांना, सतत भावना दुखावण्याला, इतर गटांवर दात धरून राहण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत.
गटनिष्ठेच्या माकडउड्या
कोरोनासारख्या अभूतपूर्व आणिबाणीच्या काळातही कोणतीही नवी माहिती, नवी घटना ही कायम अस्मिता-द्वेषांच्या चष्म्यातून पाहिली जात होती. केंद्राचे काम चांगले, राज्याचे वाईट आणि पुन्हा मनपाचे चांगले असे मला परिचित पुण्यातील एका बाजूच्या गटाचे मत होते. तर उलट बाजूच्या मंडळींच्या दृष्टिने केंद्रातील सरकारचे वाईट, राज्यातले काम चांगले नि मनपाचे पुन्हा वाईट अशी भूमिका होती. आंधळी गट-निष्ठा राखण्यासाठी तर्काच्या अशा माकडउड्या मारल्या जातात.
बरं या विधानांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसतो. आपल्या बाजूच्या विरोधकांवर आग ओकणे, शक्य त्या माध्यमांतून जळजळीत द्वेष पसरवणे, इतकेच ‘माझे देशबांधव’ आता करु लागले आहे. माणसे बुद्धीचा कमीतकमी वापर करुन केवळ अस्मिता-द्वेषांच्या पार्ट्या पाडून खेळ खेळू लागली आहेत. याला व्हॉट्सअॅप वा फेसबुकसारख्या माध्यमांतून निरर्गलपणे होणारा स्वार्थानुकूल अफवांचा संघटित प्रसार भरपूर हातभार लावतो.
धंदेवाईक माध्यमांचे प्रदूषण
समाजकारणाने नि राजकारणाने जसे या विघटनवादाला खतपाणी घातले, तसेच भांडवलशाहीने आणलेल्या धंदेवाईकतेनेही. चॅनेलवर साधकबाधक चर्चा होण्यापेक्षा शाब्दिक लठ्ठालठ्ठी झालेली त्यांच्या मालकांना हवी असते. कारण मग तो व्हिडिओ समाजमाध्यमांतून फिरतो. त्याला त्या चॅनेलच्या वेबसाईटवर वा यू-ट्यूब चॅनेलवर भरपूर हिट्स मिळतात. आणि इंटरनेटच्या जमान्यात हिट्स/क्लिक्स = पैसा हे गणित असल्याने मालक खुश होतात.
साधकबाधक, विषयाला धरुन, उद्बोधक चर्चा झाली तर त्यातून चॅनेल मालकांना पैसा मिळत नाही. म्हणून चर्चेमध्ये अद्वातद्वा बोलणारे, एकमेकांवर हेत्वारोप करणारे वगैरे चर्चक अधिक प्रेमाने बोलावले जातात. ‘आमच्या बाजूच्याने विरोधी बाजूच्या चर्चकाची आरडाओरडा करुन बोलती कशी बंद केली’ म्हणून खुश होत अल्पबुद्धी समाजमाध्यमी तो व्हिडिओ ’व्हायरल’ करतात.
हे पुरेसे नसते म्हणून चर्चेचे पक्षपाती सूत्रसंचालक कोणत्या बाजूला टीआरपी अधिक मिळेल (आणि त्यांचे मालक कुण्या पक्षाकडून अधिक मलिदा मिळेल) याचा अंदाज घेऊन ती बाजू घेऊन लढतात. स्वत:च बोलावून आणलेल्या विरोधी मुद्दे मांडणार्यांचा अपमान करतात, त्यांची मुस्कटदाबी करतात. त्यांना दूषणे देणार्या अन्य सहभागी चर्चकांच्या उद्धटपणाकडे काणाडोळा करुन ती बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरतात.
चर्चांपलिकडे अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमातही गुणवत्ता अथवा सर्जनशीलतेपेक्षाही ‘खपाऊ’ मालालाच प्राधान्य असते. त्यातून माध्यमे लोकानुनयी होतात.
खासगी माध्यमे ‘आम्हाला कुठे यातून पैसा मिळतो? आम्ही हे का करावे? हे आमचे काम नाही, कारण आम्ही व्यावसायिक आहोत, नफा मिळवणे हे आमचे एक आणि एकच साध्य आहे. त्यापलिकडे समाजाचे आम्ही काहीही देणे लागत नाही.’ अशी भूमिका घेऊन उभी असतात.
यातून बहुसंख्येच्या मनोरंजनाच्या संकल्पनेत न बसणारे विषय बाद होऊन जातात. जिथे विज्ञानासारख्या आवश्यक विषयाला कणभर जागा मिळत नाही, तिथे समाजहिताची भूमिका घेऊन केलेल्या प्रबोधनप्रधान कार्यक्रमांची उत्तरक्रिया केव्हाच होऊन गेली आहे.
सर्जनशीलता नि प्रबोधनाचा अस्त
तीन-चार दशकांपूर्वी चॅनेलमाध्यमांचा सुळसुळाट होण्यापूर्वी ‘दूरदर्शन’ हे शासन-संचालित एकमेव चॅनेल कार्यरत होते. त्याची आर्थिक बाजू शासनाने सांभाळलेली असल्याने म्हणा, की ‘मिळू शकणारा शेवटचा पैसाही प्रेक्षकाकडून वसूल केला पाहिजे’ असा बाणा घेऊन जन्मलेली मॅनेजमेंट नावाच्या सर्वविषय-अर्धशिक्षित आणि स्वयंघोषित सर्वज्ञ जमात उदयाला आलेली नसल्याने कार्यक्रमांचे विषय, दिशा आणि मांडणी ही अद्याप सर्जनशील व्यक्तींच्या हाती होती.
त्याचबरोबर शासकीय मालकी असल्याने शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसारही त्यातून होत असे. प्रबोधन-प्रचार-मनोरंजन अशा तीनही प्रकारांना त्यात समान महत्व होते. पंचवार्षिक योजनेतील धोरणांबद्दल, तिच्या यशाबद्दल प्रचार होत होता, तसेच कुटुंब-नियोजनासंबंधी जनजागृती करण्यासाठी लाल-त्रिकोण, सर्वशिक्षा अभियान यांसारख्या जनहिताच्या योजनांबद्दल करमणुकींच्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच प्रबोधनाचे कार्यही केले जात होते.
याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात त्याचा विध्वंस न करता आपण सारे सहप्रवासी आहोत ही भावना ‘राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेच्या आधारे रुजवण्याचा प्रयत्न केला जात असे.
‘मिले सुर मेरा तुम्हारा’, ‘सौ रागिनियोंसे सजा भारत’ किंवा ‘सारा भारत ये कहे’ सारखी गाणी सादर करण्याची ना शासनाला गरज वाटते ना जनतेला. व्यावसायिकांनी तर ‘यात नफा नाही’ या नावाखाली केव्हाच हात वर केले आहेत. कुणी पदरमोड करुन कुणी केलीच, तरी तरी तिला प्रस्थापित माध्यम मिळत नाही. आणि मिळालीच, तर गणपतीबाप्पासमोरच किंवा कृष्णभक्तीचा आव आणत ‘चिकनी चमेली’ किंवा ‘जलेबी बेबी’बरोबर नाचण्यात धुंद झालेल्या प्रेक्षकांचे त्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही.
यात भर म्हणून अगम्यताप्रेमी, उन्नतनासिका समीक्षक अशा लघुपटांना, गीतांना ‘प्रचारकी’ म्हणून नाके मुरडू लागतात. आणि त्यांच्या पारंब्यांना लटकून कणभर सरस सामाजिक स्थान मिळवून सामान्यांपेक्षा अर्धी पायरी वर राहण्याची धडपड करणारे त्यांचे भाट, त्यांची री ओढत तो समज पसरवण्याचे काम जोमाने करत राहतात.
शत्रूलक्ष्यी विचारांचा उदय
राष्ट्रभक्तीची संकल्पना आणि म्हणून राजकारण, सामाजिक विचार, एवढेच काय कलासमीक्षाही शत्रूलक्ष्यी होत गेली आहे. काय स्वीकारार्ह यापेक्षा काय त्याज्य याची चर्चा अधिक करु लागली आहे. याला अर्थातच अनियंत्रित माध्यमांचा सुळसुळाट हे एक कारण आहे. कोणतीही जबाबदारी न घेता बेफाट विधाने करणे आता सोपे झाले आहे. अशा बेफाट बेमुर्वत विधानांचे पीक प्रचंड वेगाने नि व्याप्तीने वाढते आहे. त्याला आव्हान देऊन त्यातील फोलपणा सिद्ध करताना साधकबाधक विचार करु शकणार्या, तारतम्याला अजूनही तिलांजली न दिलेल्यांची दमछाक होते आहे. यातून काही जण सरळ विचार बंद करुन ‘मुख्य धारेत’ प्रवेश करुन त्या प्रवाहाबरोबर वाहात जाणे पसंत करु लागले आहेत.
एखादा बागुलबुवा तयार करुन त्याच्या विरोधात आपला एक गट तयार करणे याला आता प्राधान्य मिळू लागले आहे. राष्ट्रवादी विचार तर बांधिलकीला संपूर्ण त्यागून केवळ शत्रूलक्ष्यी मांडणी करणार्यांनी अपहृत केलेला आहे. आणि त्यांचे विरोधक ‘त्यांना विरोध की राष्ट्रवाद या संकल्पनेला विरोध’ या संभ्रमात भरकटत चालले आहेत.
अगदी सामाजिक न्यायाचा विचार करणारेही असाच विचार करु लागले आहेत. ‘त्यांच्या’ व्यासपीठावर जायचे नाही हा अलिखित नियम तर झालाच आहे, पण बहुतेक वेळा आपल्याशी एकमत असलेल्या एखाद्याने जरा न पटणारे मत मांडले, की लगेच ‘तो छुपा तिकडचा’ म्हणून त्याला पलीकडे ढकलण्याची त्यांची अहमहमिका एकुण समाजाच्या हिताची तर नाहीच, पण आपलेच वर्तुळ आपल्या सोयीचे लहान करत नेणारी आहे. “पुण्यात शुक्रवार पेठेतील पुरोगामी नारायण पेठेतल्या पुरोगाम्यांच्या वार्याला उभे राहात नाहीत, आणि नव्या पेठेतले पुरोगामी या दोघांना हाताच्या अंतरावर ठेवत असतात” असे मी गंमतीने म्हणत असतो.
जातीय अस्मितांचे प्रवाह
प्रत्येक जाती/ धर्म/ गट/ प्रदेश यांतील एकांगी मतांचे अनेक लोक प्रबळ होऊ लागले आहेत. ते त्या त्या गटाचे नेतृत्व बळकावून बसले आहेत.
यातील ब्राह्मणांच्या मते देशाची दुरवस्था ही ‘आरक्षणवाल्यां’मुळे किंवा आमच्या गुणवत्तेला डावलून पुढे जाणार्या ‘फुकट्यां’मुळे आहे. पोरवडा वाढवून हे लोक बहुमताच्या आधारे आम्हा अल्पसंख्यांकांची मुस्कटदाबी करतात अशी यांची तक्रार असते. ज्या हिंदुत्ववादाच्या आधारे हे आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करू पाहतात त्यात हाच आरोप धर्माधिष्ठित होऊन मुस्लिमांकडे बोट दाखवले जाते. त्यामुळे बहुमताला झुगारुन उभी राहणारी हुकूमशाही यांची लाडकी असते. सत्तर वर्षे लोकशाही रुजलेल्या देशात, हुकूमशाहीच्या अनुभवाअभावी तिचा अर्थ समजण्याइतकी समज त्यांच्याच विकसित झालेली नाही. नव्या व्यवस्थेमध्ये गुणवत्ते(?)नुसार ‘आपले’ राज्य येईल अशी यांना भाबडी आशा असते.
म्हणून महाराष्ट्रात फडणवीस मुखमंत्री होताच मनातल्या मनात ‘आनंद पोटात माझ्या माईना’ गात गात ‘राज्याला प्रथमच णला ण म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला’ असे विधान हे लोक समाजमाध्यमातून फिरवू लागतात. आणि असा तद्दन खोटा दावा करताना, बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान आणि नंतर मुख्यमंत्री, तर सेनेचे मनोहर जोशी हे युतीचे मुख्यमंत्री होते हे सोयीस्कररित्या विसरून जातात. कारण त्यातही खेर काँग्रेसचे नि जोशी सेनेचे; त्या तुलनेत भाजप/संघ अधिक शुद्ध धारेतला ब्राह्मणी असल्याने त्यांच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक अधिक हे ओघाने आले.
उलट दिशेने आंबेडकरी म्हणवणार्यांतील एकांगी मंडळींच्या मत ‘हे सारे ब्राह्मणांचे (पळवाट: ब्राह्मण्यवादाचे) पाप आहे’. एका आंबेडकरी विचारवंताने तिच्या एका लेखाची सुरुवातच मुळी ‘देशात जे जे सगळे वाईट आहे ते ब्राह्मणी व्यवस्थेचे आहे असे मानले जाते’ या विधानाने केलेली माझ्या वाचण्यात आली आणि मी गार पडलो होतो. संगणकावर प्रोग्रामिंग करणार्यांना ‘गार्बेज कलेक्टर’ नावाची संकल्पना माहित असेल. संगणकाच्या स्मरणमंजुषेचा कोणत्याही प्रोग्राम/ प्रणालीला नको असलेला, टाकाऊ भाग हा गार्बेज कलेक्टरमध्ये सामावला जातो. ब्राह्मण्य/ब्राह्मण हे असे गार्बेज कलेक्टर आहेत अशीच तिची व्याख्या दिसली.
थोडक्यात ब्राह्मण्यवाद (स्वगत: ब्राह्मण) हे सार्या पापाचे मूळ आहेत असा यांचा दावा आहे. “पूर्वी अस्पृश्य म्हटले गेलेले पददलित हे नरकाची खाण, मागील जन्मातील अध:पतित” असे म्हणणार्या ब्राह्मणी अतिरेकी दाव्यातील दुराग्रही एकांगीपणाशी मला याचे साधर्म्य दिसते. पण यापैकी कुणालाही सांगायला गेलात तर एकमेकांकडे बोट दाखवून ‘त्यांना आधी सांगा’ म्हणून झटकून टाकले जाईल याची खात्री देता येते.
त्याचप्रमाणे मुस्लिम अतिरेकी व्यक्तींची मानसिकता ‘पूर्वी आम्ही सत्ताधारी जमात होतो. त्यामुळे हिंदू ही गुलाम नि आम्ही सत्ताधारी जमात आहोत. फक्त इस्लामच्या तत्वांचे तंतोतंत पालन केले की आम्ही पुन्हा त्या वैभवशाली भूतकाळात होतो तसे सत्ताधारी होऊ’ अशी आहे. हा समज ‘आम्ही भूतकाळात कधीतरी जगाचे राजे होतो आणि ही साली लोकशाही जाऊन (अन्य जातींपेक्षा आम्ही बुद्धिमान या अहंकारातून) बुद्धिमंतांची म्हणजे आमची हुकूमशाही केव्हा येईल’ याकडे डोळे लावून बसलेल्या ब्राह्मणांच्या समजाइतकाच भाबडा नि हास्यास्पद आहे. हिंदुत्ववाद्यांनी जसा आपला अतिरेकी विचार एकुण हिंदू समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, तसाच मुस्लिमधर्मीय माथेफिरुंनी त्यांच्याही आधी तो सामान्य मुस्लिमांत रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
आर्थिक-राजकीय सत्तेचा प्रवाह
‘एक व्यक्ती एक मत’ तत्वावरील लोकशाही प्रस्थापित झाल्यावर मोजक्या ठिकाणी असलेले ब्राह्मण प्राबल्य वगळता सर्वत्र त्या त्या राज्यातील क्षत्रिय/शेतकरी जमातींनी राजकीय आणि म्हणून आर्थिक (आणि उलटही) वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे पूर्वीच्या ब्राह्मण वा मुस्लिमांप्रमाणेच ‘आता आपण कायमस्वरुपी सत्ताधारी जमात झालो आहोत’ असा समज त्यांच्यातही प्रबळ होऊ लागला.
केशवसुतांच्या ‘आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?’ या कवितेच्या चालीवर “आम्ही कोण म्हणुनि काय पुसता, आम्ही नेते सर्वांचे । देवाने दिधले असे भोगव्य सारे आमुच्याच गोतावळ्या॥” असा या क्षत्रिय म्हणवणार्या जमातींचा समज होऊ लागला होता.
पण ब्रिटिश सत्तेच्या काळात उद्योगधंदे आणि बूर्ज्वा रोजगाराला चालना मिळाली. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यावर सेवाक्षेत्राने मोठी झेप घेतली. त्यातून अर्थकारणातला शेतीचा हिस्सा कमी होत गेला. शिवाय पिढ्यान् पिढ्या त्यांच्या जमिनी विभाजित होत गेल्यामुळेही त्यांच्या आर्थिक आणि पर्यायाने राजकीय सत्तेचा आधार असलेला शेती-व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा होऊ लागला.
त्याचवेळी ‘शिक्षण, आरक्षण आणि रोजगार यातून आलेले आर्थिक स्थैर्य वा प्रस्थापित झालेले सामाजिक स्थान यामार्गे तथाकथित खालच्या जमाती आपल्या मांडीला मांडी लावून बसू लागल्या आहेत नि सर्वच क्षेत्रातील आपला वाटा कमी होत चालला आहे’ हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले, तेव्हा विविध राज्यांतून या जमातींनी तो वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून सर्वत्र आर्थिक, राजकीय आरक्षणाची मागणी सुरु झाली आहे. राजस्थानात गुर्जर, पंजाब/हरयानामध्ये जाट आणि महाराष्ट्रामध्ये मराठा या जमातींची आंदोलने यातूनच उभी राहिली आहेत.
आम्ही श्रेष्ठ तुम्ही दुष्ट
विभागणीच्या धर्म वा जात या रेषाही पुरेशा न वाटून गाव/शहर/शिक्षणसंस्था यांच्या आधारेही गट पाडले जातात. कोणत्याही वस्तुनिष्ठ, संख्याशास्त्रीय पुराव्याखेरीज प्रत्येक गटाचे अध्याहृत असे गुण नि अवगुण मानून त्या आधारे शाब्दिक लढाया नि माफक राजकारणही केले जाते. हे सारे गट-धार्जिणे अतिरेकी नेहमीच ‘त्यांना सांगा की’ या हुकमी तर्काचा आधार घेतात.
जोवर समोरच्या गटात अतिरेकी विचाराची वा अन्य-गट-द्वेष्टी एक तरी व्यक्ती दाखवता येते, तोवर तीच त्या गटाची प्रातिनिधिक असल्याची मखलाशी करत ते आपल्या अतिरेकी मानसिकतेचे समर्थन करत राहतात.
हिंदुत्ववाद्यांच्या मते मुस्लिम देशाच्या सर्व सामाजिक समस्यांचे (आणि राजकीय पातळीवर काँग्रेस) मूळ आहे, ब्राह्मणांच्या मते ‘आरक्षण’ आणि ते लाटणारे ‘फुकटे’ हे देशाच्या प्रगतीला खीळ घालणारे, स्वयंघोषित शोषितांचे ठेकेदार म्हणतात, ‘ब्राह्मण्य (मनात: ब्राह्मण) हे सर्व सामाजिक, आर्थिक समस्यांचे गुन्हेगार’...
या सार्या जात/धर्म अस्मितेच्या मंडळींना नाके मुरडणारे नि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारेही यांच्याहून वेगळे नाहीत. अनेक पुरोगामी मंडळी ‘मध्यमवर्ग’ (म्हणजे कोण?) हा सर्व समस्यांचे मूळ मानतो. कुठलाही कार्य-कारणभाव दाखवता येत नसला, तरीही या वर्गाला ओढून आणून त्यावर खापर फोडत बसतात. यात डाव्या म्हणवणार्यांचा समावेश अधिक आहे.
एक देव नि एक सैतान
मूळ मुद्दा असा आहे की प्रत्येक गट आपापले पारलौकिक तसंच भौतिक देवबाप्पा शोधत असतो, आणि सोबतीला त्याच्या भलामणीसाठी सार्या पापांची कचरापेटी म्हणून वापरता येईल असा एक तथाकथित सैतानही शोधून ठेवत असतो. मग त्यांचे सारे विचार ‘चांगले सारे बाप्पाचे, वाईट सारे सैतानाचे’ या सोप्या निवाड्याभोवती फिरत राहतात. त्या संकुचित विचारवर्तुळाच्या बाहेर जाण्याची गरज त्यांना वाटेनाशी होते. त्यांच्या जगण्याला तेवढे पुरेसे असते.
कोणत्याच समाजगटात सर्वच व्यक्ती सर्वस्वी निर्दोष असणे अशक्य आहे हे उघड आहेच. शिवाय मुळात दोष कशाला म्हणावे यातही प्रचंड सापेक्षता असते. ‘आमच्या गटावर अन्याय केला’ हे गृहितकही समोरच्या गट वा व्यक्तिचा दोष म्हणून जाहीर करता येतेच.
थोडक्यात सांगायचे तर परस्परविरोधी अतिरेकी हे ‘एकमेका साह्य करु’ भूमिकेत असतात. त्यांना एकमेकांची मदतच होत असते. महाभारतातही दुर्योधन पांडवांकडे बोट दाखवून शंभर कौरवांची एकता राखू शकला आहे. एरवी नव्व्याण्णव बंधू असता कुरु साम्राज्य अखंड राखणे त्याला अशक्यच होते.
आता राष्ट्रीय एकात्मतेसारख्या व्यापक बांधिलकीऐवजी लहान गट करुन त्या गटापुरती अस्मितेची मोट बांधणे लोक अधिक पसंत करतात, आणि त्या गटाच्या आधारे बार्गेनिंग करुन राजकीय, आर्थिक तसंच सामाजिक सत्तेमधील आपापला चिमुकला वाटा हस्तगत करुन स्वत:ला धन्य समजत असतात.
अस्मितांचे धुमारे आणि वणवे
अस्मिता अर्थात आयडेंटिटी ही एकाच वेळी समावेशक (inclusive) आणि विभाजक(exclusive) हवी असते. त्यातून आपला ‘देवतुल्य’ पक्ष आणि ‘त्यांचा’ राक्षसपक्ष अशी सोपी विभागणी करता येते, ज्यातून कुणाच्या भाळी टिळा लावायचा नि कुणाच्या ‘माथा हाणू काठी’ करायचे हे अनायासे निश्चित होऊन जाते. त्यामुळे राष्ट्रवादातील राष्ट्रीय एकात्मतेची हाक असो वा मार्क्सवाद्यांची जागतिक बंधुभावाची हाक असो, सर्वसामान्यांना ती पुरेशी वाटत नसते.
म्हणून मग कम्युनिस्ट म्हणवणारेही कळीच्या मुद्द्यांवर आपापल्या जातींच्या वळचणीला गेलेले दिसतात. तसंच ‘हिंदू सारा एक’ म्हणणारे सामाजिक-आर्थिक पातळीवर मागे राहिलेल्या वा ठेवलेल्या हिंदूंच्या उत्थानाची जबाबदारी न घेता, “आम्ही अधिक लायक म्हणून आम्ही पुढे गेलो” असा दावा करतात. यासाठी स्पेन्सरच्या ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या एकांगी दाव्याचा आधार घेतात, आणि ज्याचे अखंड कीर्तन ते करत असतात त्या अखंड(!) हिंदू समाजात ‘आपण आणि ते’ अशी निर्लज्ज विभागणी करुन ठेवतात.
स्वातंत्र्याच्या व्याख्येमध्ये जसे ‘कशाचे स्वातंत्र्य’ या बरोबरच ‘कशापासून स्वातंत्र्य’ असे दोन भाग पडतात. त्याच धर्तीवर तसेच अस्मितेच्या, आयडेंटिटीच्या भुकेचे ‘आपण कोण’ आणि ‘आपल्याहून वेगळे कोण’ असे दोन भाग पडतात. आणि जे आपल्याहून वेगळे ते आपल्याहून मुळातच दुय्यम किंवा दुसर्या बाजूने शोषक, किंवा लायकी नसता पुढे गेलेले, असे गृहितक बळावू लागते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेच्या अनुपस्थितीत वेगळेपण हे विभागणीकडे, वैराकडे वाटचाल करू लागते.
देश देव्हार्यात आहे
या सार्या धुमश्चक्रीमध्ये देश हा देव्हार्यात ठेवलेला देव म्हणून शिल्लक राहिला आहे. श्रावणात एखाद्या देवाच्या नावे उपवास धरावा तसे किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या श्राद्धाचे पिंड घातल्यासारखे फेसबुक, व्हॉट्स-अॅप, ट्विटर वगैरे समाजमाध्यमांतून देशभक्तीच्या डरकाळ्यांच्या पिपाण्या वाजवल्या की पुरते. मग देवाला नैवेद्य दाखवून आपापली ताटे वाढायला घ्यावीत, तसे आपण स्वत:च्या स्वार्थी आयुष्यात सहज परतून येतो.
‘तू मोठा देशभक्त की मी’ या अहमहमिकेतून मग राष्ट्रभक्तीचे जास्तीज जास्त मेसेजेस कोण फॉरवर्ड करतो, कोण सर्वात उंच झेंडा उभारतो, कोण जास्तीत जास्त विरोधकांना राष्ट्रद्रोही म्हणून गुण मिळवतो याची स्पर्धा चालू होते. देशाच्या अवनतीचे खापर अन्य धर्म/ जात/ राज्य/ विभाग यावर फोडून काहीही ठोस कृती न करताही आपला गट आणि पर्यायाने आपण अधिक राष्ट्रभक्त ठरतो असे बहुसंख्येला वाटू लागले आहे.
पण देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्या देशातील समाज, माणसे, संस्कृती, भाषा या सार्याचा समुच्चय. जेव्हा त्यातील एखाद्या अनुषंगाचा तुम्ही तिरस्कार करता तेव्हा तुम्ही देशभक्त असूच शकत नाही, भले बारा महिने तुमचा फेसबुक-डीपी तिरंगा दाखवू दे, भले जगातील सर्वात जास्त देशभक्तीपर मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड केलेले असू देत, भले इतर कुणाहीपेक्षा जास्त देशद्रोही तुम्ही शोधून काढलेले असू देत. भले त्याच्यासारखे अनेक जण एकत्र येऊन तशी घोषणा करत असले तरीही ज्याच्या मनात बांधिलकी नव्हे तर द्वेष आहे तो देशभक्त असूच शकत नाही.
या परिस्थितीत बदल कसा होणार हे आज सांगणे फार अवघड आहे. जंगलाला लागलेली आग किती पसरेल, किती जिवांचा बळी घेऊन, किती झाडांची राख करुन शांत होईल हे सांगणे जसे अवघड, तसेच हे ही. मुळात आग लागली आहे हेच आपापल्या गटाच्या वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगी नागरिकांना मान्य नसेल, त्यातही आपलाही वाटा आहे हे समजून घेण्यास सर्व गट आणि गट-बांधिल व्यक्ती तयार नसतील, तर त्या आगीचे निर्दालन करण्याची सुरुवातही होणे अवघड आहे. अशा वेळी तिच्या अंताचे भविष्य वर्तवणे मूर्खपणाचेच ठरेल.
(समाप्त)
- oOo -
पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती      
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (उत्तरार्ध) : सामाजिक संक्रमण
गुरुवार, २६ जानेवारी, २०२३
राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (पूर्वार्ध) : माध्यमांतील प्रतिबिंब
-
---
प्रास्ताविक:
अलीकडील काही वर्षांत राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे शब्द चलनी नाण्यासारखे नि हत्यारासारखेही वापरले जाऊ लागले आहेत. या दोहोंच्या पूर्वसुरी म्हणता येतील अशा राष्ट्रभावना नि राष्ट्रीय एकात्मता या दोन संज्ञा आता बव्हंशी लुप्त झालेल्या आहेत. या बदलाला देशातील सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, तांत्रिक आणि अर्थातच आर्थिक संक्रमणाला जोडून पाहता येते. त्यातून एक संगती हाती लागते. प्रामुख्याने करमणूकप्रधान माध्यमांतून दिसलेली ही संगती आणि त्यांतील आकलन वास्तवाला जोडून पाहण्याचा हा प्रयत्न.
---१. अनेकता में एकता
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. १९६२ मध्ये प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम् मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले.
यातील ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या पहिल्या वाक्यामध्येच समतेचे तत्त्व अधोरेखित केले होते. पुढेही ‘विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे’ म्हणताना एकाच परंपरेचे श्रेष्ठत्व लादण्याचा प्रयत्न करणार नाही हे मान्य केले होते. देशाबरोबरच देशबांधवांशी निष्ठा राखण्याचे वचन दिले जात होते. वैय्यक्तिक कल्याण आणि समृद्धी ही देश नि देशबांधवांच्या समृद्धीशी जोडण्यात आली होती. एकुणात भ्रातृभाव, बांधिलकी हा देशबांधवांना जोडणारा धागा असेल असे यातून मान्य करण्यात आले होते. ‘राष्ट्रीय एकात्मता’ ही संज्ञा तेव्हापासून परवलीची होऊन गेली होती. चित्रपटांतून, माहितीपटांतून इतकेच नव्हे तर जाहिरातींमधूनही या राष्ट्रीय एकात्मतेचा धागा ठळक करण्यात येत असे.
चलच्चित्र माध्यमात एकात्मता
तो काळ तसा तंत्रज्ञानाच्या बाल्यावस्थेचा होता. १९५९ मध्ये सुरू झालेले ‘दूरदर्शन’ हे सरकारी मालकीचे एकमेव चॅनेल बातम्या, मनोरंजन, माहिती याबरोबरच संस्काराचे, प्रबोधनाचेही कार्य करत असे. ज्याला बहुसंख्य लोक आजही केवळ मनोरंजनाचे साधन समजतात त्या चलच्चित्रांच्या (Animation) माध्यमाचा वापरही यासाठी करुन घेतला जात होता. दूरदर्शनवर भीमसैन यांनी तयार केलेल्या ‘अनेकता में एकता’ (१९७४) (सुधारित) किंवा ‘एकता का वृक्ष’ (१९७२) यासारखे चलच्चित्र लघुपट राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना सोप्या स्वरूपात रुजवू पाहात होते.
याशिवाय देशोदेशी तयार झालेले अशाच स्वरूपाचे प्रबोधनात्मक चलच्चित्रपटही स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन दाखवले जात. इतालियन-अमेरिकन लेखक नि चित्रकार लिओ लिओनी याच्या कथेवर आधारित स्विम्मी (१९७१) हा एकतेचा संदेश देणारा लघुपट सर्वाधिक गाजला.
एकता का वृक्ष (१९७२) हा आणखी एक चलच्चित्रपट बराच लोकप्रिय झाला होता. या सार्यांमध्ये सामायिक मुद्दा होता तो बांधिलकीचा. विविधतेतून एकता, परस्पर-बांधिलकी हे राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे मूलाधार होते.
अनुबोधपटांची परंपरा
‘फिल्म्स डिविजन इंडिया’ ही संस्था ‘राष्ट्रीय एकात्मता’ या एकाच विषयावर नव्हे तर काही सामाजिक व आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे अनेक चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट तयार करत असे. दूरदर्शनच्या एकाधिकारकाळात ते दूरदर्शनवरुन दाखवले जात. तसंच चित्रपटगृहांमधून चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक-दोन माहितीपट दाखवले जात असत. यात अनुबोधपटांचाही समावेश असे.
यात कुटुंबनियोजनाबाबत प्रबोधन करण्यासाठी शासनाने चालवलेल्या ‘लाल त्रिकोण अभियाना’अंतर्गत ‘अँगल ऑफ द ट्रँगल’, अफवाविरोधी प्रबोधनासाठी ‘गुब्बारा’, दैनंदिन वाहतुकीच्या स्थितीबाबत ‘इंडियन ट्रॅफिक’ , स्वच्छतेचा संदेश देणारा ‘हायजीन: द वे ऑफ लाईफ’, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा ‘मीना’, लाल त्रिकोण अभियानाप्रमाणे ‘हम दो हमारे दो’ संकल्पनेच्या प्रचारासाठी ‘द क्रेडल’, असे विविध अशा अनुबोधपट दूरदर्शनने तयार केले होते.
असे अनुबोधपट आज किती खासगी वाहिन्या तयार करतात, प्रसारित करतात? आपल्यापैकी किती जण असे माहितीपट पाहतात?
पुढे चलच्चित्रांचा हात सोडून प्रबोधन चित्रपटांकडे सरकले आणि मिले सुर मेरा तुम्हारा (१९८८) बजे सरगम हर तरफ से (१९८९) सौ रागिनियोंसे सजा (२०१३) असे अनुबोधपट निर्माण झाले. पण...
आता बांधिलकीचा हात सुटून देवत्वस्वरूप देशाप्रती बांधिलकीच नव्हे, तर समर्पणभाव रुजवणे सुरू झाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेची जागा देशभक्तीने घेतली. आणि त्यातून प्रथम ‘कोण अधिक देशभक्त’ची अहमहमिका सुरू झाली आणि ती ‘कोण अधिक देशद्रोही’ पर्यंत येऊन पोहोचली. लहान मुलांच्या म्हटलेल्या चलच्चित्रांमध्ये असलेला सुज्ञभाव मोठ्यांकडे सूत्रे येताच नाहीसा झाला.
२. सारे भारतीय माझे बांधव आहेत‘अनेकता में एकता’, ‘स्विम्मी’ आणि ‘एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. ‘आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्या सर्वांसाठी तो संदेश होता. ‘मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ एक प्रकारे त्यातून ध्वनित होत होता.
साहित्य-कलांमधील संक्रमण
पण काळ पुढे सरकला, तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढीच्याही स्मरणातून धूसर होऊ लागल्या.
मराठी साहित्यामध्ये खांडेकरी आदर्शवाद मागे सरकू लागला आणि फडकेंच्या गुलाबी कथांची सद्दी सुरू झाली. पुढे रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी पौराणिक/ ऐतिहासिक कथानकावर आधारित कथनात्म साहित्याचा प्रवाह बळकट केला. हिंदी चित्रपट क्षेत्राने सामाजिक विषयांवरील चित्रपटांचे बोट सोडून ‘अँग्री यंग मॅन’भोवती कथानके विणायला सुरुवात केली.
सामाजिक चित्रपटांमध्ये– पारंपरिक संदर्भात का होईना– पण नेमक्या भूमिका असणार्या अभिनेत्रींना आता या अँग्री यंग मॅनची जोडीदार इतकेच स्थान मिळू लागले. पुस्तकांची जागा नियतकालिकांनी घेतली आणि तिथेही हिंदी चित्रपटसृष्टीतील खमंग गॉसिप्स कोणताही विधिनिषेध न बाळगता विकली जाऊ लागली. हळूहळू हे कृतकवीर तरुणाईचे आदर्श होऊ लागले. आता प्रबोधनाचे माध्यमही त्यांना शरण जाणे अपरिहार्य होऊन बसले.
राजकीय संक्रमण
समाजातील मनोरंजनाचे केंद्र दूरदर्शनकडून हिंदी चित्रपटांकडे सरकत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवरही उलथापालथ होत होती. मुस्लिम धर्मियांमधील ‘तोंडी तलाक’ संदर्भातील मैलाचा दगड मानला गेलेल्या प्रसिद्ध ‘शाहबानो खटल्याचा निकाल १९८५ मध्ये आला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा आरोप करत मुस्लिम धर्मियांमधील एका गटाने आंदोलन सुरू केले. त्या दबावासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ साली संसदेत कायदा करुन या निकालास रद्दबातल केले.
या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेसवरचा ‘मुस्लिमधार्जिणेपणाचा’ आरोप अधिक जोरकसपणे करता येऊ लागला. यातून जनमतामध्ये झालेली हानी भरून काढण्यासाठी आजवर धार्मिक, पौराणिक कार्यक्रमांना कटाक्षाने दूर ठेवलेल्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारतावर आधारित मालिका दाखवण्याची सूचना राजीव गांधींनी केली. १९८७ मध्ये रामानंद सागर निर्मित रामायण दूरदर्शनच्या पडद्यावर राज्य करु लागले. या दोन निर्णयांमुळे राजकीय सत्तेला धार्मिक दबावाने झुकवता येऊ शकते हा विश्वास निर्माण झाला. यातून दोन्ही धर्मियांमध्ये कट्टरपंथी मंडळींचा वरचष्मा होऊ लागला आणि आजवर राजकीय भूमीपासून दूर असलेल्या धर्मवेडेपणाने राजकीय जमीन व्यापण्यास सुरुवात केली.
मिले सुर मेरा तुम्हारा
पुन्हा राजीवजींच्याच प्रेरणेने जयदीप समर्थ (प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचे बंधू) यांनी हा प्रस्ताव दूरदर्शनकडे नेला. १९८८ साली ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हा संगीत-पट ‘लोकसेवा संचार परिषद’ या संस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. यात प्रथमच मानवी एकतेचा, बांधिलकीचा गजर मर्यादित करुन केवळ ‘देशबांधवांच्या एकतेचा’ पुकारा करण्यात आला.
या संगीत-पटाची संगीत-कल्पना भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची होती. भारतीय रागसंगीतामध्ये हिंदुस्तानी आणि कर्नाटक असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीं संगीतांच्या रागविस्ताराच्या दृष्टिकोनात फरक असला तरी मूळ राग-कल्पना कर्नाटक संगीतामधूनच आलेली असल्याने काही रागांमध्ये साम्यही दिसते. या दोन्ही प्रवाहांचे प्रातिनिधित्व करणार्या ‘भैरवी’ला मुख्य आधार म्हणून घेत रागसंगीतामधील इतर काही रांगांच्या छटा अधेमध्ये वापरण्यात आल्या.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यात हिंदी, असमी, तमिल, तेलगु, कश्मीरी, पंजाबी, हरयाणवी, सिन्धी, उर्दू, कन्नड़, मलयालम, बंगाली, उडीया, गुजराती, मराठी अशा अनेक भाषांमधली कडवी समाविष्ट करण्यात आली.
प्रत्यक्ष पडद्यावर पं. भीमसेन जोशी आणि विदुषी लता मंगेशकर या दोन ‘भारतरत्नां’सह बालमुरली कृष्ण, कविता कृष्णमूर्ती यांच्यासारखे गायकांसोबतच जावेद अख्तर, नरेन्द्रनाथ चक्रवर्ती, सुनील गंगोपाध्याय यांच्यासारखे कवीही हजेरी लावून गेले.
(तत्कालीन) नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्यासारख्या तारे-तारकांसह हरीष पटेल, वीरेन्द्र सक्सेना यांच्यासारख्या सहकलाकारांचाही समावेश करण्यात आला होता.
नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकामुळे सुवर्णकाळ चालू असलेल्या क्रिकेटसह इतर खेळांतूनही काही खेळाडूंची वर्णी लागली होती. प्रसिद्ध चित्रकार आणि तत्कालिन कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांचाही समावेश करण्यात आला होता.
गूँजे देस राग
पुढच्याच वर्षी (१९८९) मध्ये ‘बजे सरगम हर तरफ से’ हा आणखी एक संगीत-पट निर्माण करण्यात आला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ मध्ये भारताचे भौगोलिक वैविध्याचे दर्शन प्राधान्याने घडवले होते. ‘बजे सरगम’ मध्ये भारतातील विविध संगीत, नृत्य परंपरांचा अंतर्भाव करत सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात आला होता.
‘मिले सुर...’ ने भैरवी रागाला आधार-स्वर मानून संगीताची मांडणी केली होती तर ‘बजे सरगम...’ साठी देस रागाची निवड करण्यात आली होती.
‘मिले सुर...’ मध्ये केवळ गायक, गायन आणि अभिनेते यांचाच समावेश होता. ‘बजे सरगम’ने पं. रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, पं. रामनारायण यांच्यासारखे तंतुवाद्यवादक, हरिप्रसाद चौरसियांसारखे बासरीवादक, उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासारखे तबलावादक, अशा वाद्यवादकांचाही समावेश केला होता.
यासोबतच ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी, कथ्थक नर्तकी शोभना नारायण यांच्यासह कथकली, कुचिपुडी, मोहिनिअट्टम्, भरतनाट्यम् आणि मणिपुरी नृत्यांचाही समावेश केला होता.
दुसरे संक्रमण
१९९२ मध्ये बाबरी मशीदीचा विध्वंस झाला, नि त्यापाठोपाठ दंगली उसळल्या. देशात पुन्हा एकवार हिंदू-मुस्लिम द्वेषाचे तांडव सुरू झाले. अशा वेळी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा पुन्हा एकवार बुलंद करण्याची गरज वाटू लागली.
‘सारा भारत ये कहे’(१) हे गीत हे १९९३ मध्ये चित्रित करण्यात आले. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’प्रमाणे यातही त्या काळातील प्रसिद्ध बॉलिवुडी अभिनेत्यांचा समावेश होता. यात आणखी एक महत्वाचा बदल असा होता की आता या बंधुभावाची शिकवण बालपणापासूनच बिंबवायला हवी हे ध्यानात घेऊन हे गीत त्या पिढीलाच उद्देशून लिहिले गेले होते.
राजकीय, धार्मिक, आर्थिक वावटळ
‘सारा भारत ये कहे’ नंतरचा काळ हा भारताचा संक्रमणकाळ ठरला. मनमोहन सिंग प्रथम अर्थमंत्री नि नंतर प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण यांचा बोलबाला सुरू झाला.
हिंदी चित्रपटांनी गुन्हेगारी, बटबटीत शृंगार, चोख मनोरंजन करणारे विनोद आदींची कास धरून ‘अर्थस्य हि पुरुषो दास:’ ही म्हण तंतोतंत अंमलात आणायला सुरुवात केली. खासगी चॅनेल्सच्या वावटळीमध्ये ‘दूरदर्शन’ एका कोपर्यात फेकले गेले. तांत्रिक, आर्थिक प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू झाली. देशाचा आर्थिक विकास ज्याने होतो ते ते सारेच समर्थनीय ठरू लागले. त्यासाठी ज्याचा उपयोग नाही ते सारे निरुपयोगी ठरून बाहेर फेकले गेले.
यादरम्यान रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला आणि सामाजिक समता, सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. मंडल आयोग लागू झाल्यानंतर धार्मिक अस्मितांसोबतच जातीय अस्मिताही धारदार होऊ लागल्या. देशभर मोकाट सुटलेल्या अस्मिता-सांडांच्या धुमाळीमध्ये ‘राष्ट्रीय एकात्मता’ नावाची गाय परागंदा झाली.
भारत अनोखा राग है
त्यानंतर बराच काळ अशा स्वरुपाचे कार्यक्रम नव्याने तयार झालेले दिसत नाहीत. जवळजवळ वीस वर्षांनी प्रसिद्ध गायक पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पुन्हा एकवार या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने ‘भारत को एक सलाम’ शीर्षकाखाली नवा संगीत-पट निर्माण केला. ‘सौ रागिनियों से सजा भारत अनोखा राग है’ या गीताभोवती हा संगीत-पट उभा आहे.
परंतु त्याच्या गीताचे बोल पाहिले तर यात भारतीय भौगोलिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक वैशिष्ट्यांबद्दल काहीच उल्लेख नाही. एखाद्या देवाची स्तुती करणारी आरती असावी असे ते गीत लिहिले आहे.
‘देश हा आपणा सर्वांना जोडणारा समान धागा’ या व्याख्येपासून सुरुवात करुन ‘तुम्हा-आम्हा नागरिकांपासून वेगळा असा काहीतरी एक देश नावाचा देव नि आपण त्याचे भक्त’ इथपर्यंतचा प्रवास इथे पुरा झाला आहे.
हे गीत अनेक गायक-गायिकांनी गायले आहे. यात संगीतमार्तंड पं. जसराज, आपल्याला प्रामुख्याने चित्रपटगीत-गायक म्हणून ठाऊक असलेले कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध गायक पं. येसूदास, शंकर महादेवन यांच्यासह कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, जगजित सिंग आणि अनूप जलोटा यांचा समावेश होता. जावेद अख्तर यांच्यासारखे कवी, शबाना आझमी यांच्यासारख्या अभिनेत्रीही हजेरी लावून गेल्या आहेत.
R.I.P. राष्ट्रीय एकात्मता
‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ म्हणत १९६३ मध्ये सुरू झालेला ‘राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेचा संगीत-प्रवास २०१३ साली ‘भारत अनोखा राग है’पाशी थांबला. एकात्मतेला श्रद्धांजली वाहून देशभक्तीचा गजर सुरू झाला आणि कोण अधिक देशभक्त याची चढाओढ सुरू झाली.
१९९२ मध्ये आलेल्या स्पर्धाव्यवस्थेने देशभक्तीमध्ये स्पर्धा रुजवली. त्या व्यवस्थेत अपरिहार्यपणे गुणवत्तेपेक्षा उपलब्धतेला महत्त्व येऊन, स्वत:च्या गुणवत्तेपेक्षा इतरांमधील तिच्या अभावाची चर्चा होते. तेच देशभक्तीच्या क्षेत्रातही होऊ लागले. ‘सारा भारत ये कहे’ मधील संस्कार आणि आता व्हॉट्स-अॅप सारख्या अनियंत्रित माध्यमांतून होणार प्रचार यातील फरक स्पष्ट दिसू लागला आहे. त्या गीतामध्ये बालकांवर केलेले बांधिलकीचे संस्कार कुठे आणि आज देशभक्तीच्या नावाखाली त्यांच्या मनात रुजवला जात असलेला द्वेष कुठे.
हातात हात घालून चालणारे नागरिक आता हात सोडून शेजार्याच्या पुढे राहण्यासाठी जिवाच्या आकांताने धावू लागले. प्रसंगी दुसर्याची धाव खंडित करण्यासाठी एकमेकाच्या पायात पाय घालून पाडूही लागले. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ पासून ‘आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत’ पर्यंत मजल आपण मारली आहे.
(पूर्वार्ध समाप्त)
पुढील भाग >> सामाजिक संक्रमण
- oOo -
---
टीप:
(१) बर्याच काळाने त्याच्याबद्दल एक रंजक माहिती मला मिळाली. त्यानुसार ‘सारा भारत ये कहे’ (१९९३) हे गीत संजय दत्त अभिनीत ‘खलनायक या शीर्षकाच्या चित्रपटातील आहे. ‘नायक नहीं खलनायक हूँ मैं’ हे त्यातील गाणे आणि एकुणच कथानक गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप झाल्याने तो वादग्रस्त ठरला होता.एकुणच बॉलिवुडी मसालापट परंपरेतील असलेल्या या चित्रपटात हे गाणे अगदीच अस्थानी दिसले असावे. प्रत्यक्षात सिनेमागृहांतून दाखवलेल्या प्रतीमध्ये हे होते की नाही मला ठाऊक नाही. परंतु दूरदर्शनवर मात्र त्याचे प्रसारण अनेकदा पाहण्यात आले.
कदाचित असेही असेल की, मूळ कथेमुळे चित्रपट वादग्रस्त ठरल्यामुळे त्याच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी हे गाणे नंतर समाविष्ट करण्यात आले असावे. तसे असेल, तर देशभक्ती हे आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी हत्यार म्हणून वापरले गेल्याचे हे अर्वाचीन काळातले पहिले ठळक उदाहरण म्हणता येईल. गेल्या आठ-दहा वर्षांत आता देशभक्तीचा गजर हे सर्व समस्यांचा, अडचणींचा निपटारा करून जमावाच्या आधारे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे हुकमी चलनच ठरलेले दिसते.
---
रविवार, १५ जानेवारी, २०२३
मानवी जीवनप्रवासाचा 'जम्प-कट'
-
('मुक्त-संवाद' या मासिकात प्रसिद्ध होत असलेल्या ’जम्प-कट’ या मालिकेतील पहिला भाग)
सदर रेखाचित्र deviantart.com या कला-देवाणघेवाण संस्थळावर Killb94 या सदस्याने रेखाटले आहे.पन्नास वर्षांपूर्वी ‘२००१ अ स्पेस ओडिसी’ म्हणून चित्रपट येऊन गेला. त्यातील सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये मानवी उत्क्रांतीच्या आद्यकाळातील वानरमानव नुकतेच हत्याराप्रमाणे वापरण्यास शिकलेले एक हाड विजयोन्मादाने हवेत उंच भिरकावतो. ते इतके उंच जाते की थेट अंतराळात पोहोचते आणि हळूहळू एका अंतराळयानात परिवर्तित होते. मानवी प्रगतीची झेप दहा सेकंदाहून कमी अवधीत दाखवणारा तो प्रसंग चित्रपट इतिहासात संस्मरणीय मानला जातो.
चित्रपटाच्या परिभाषेमध्ये जम्प-कट याचा अर्थ एकाच प्रसंगामध्ये काळात बदल होऊन, मधला बराच काळ वगळून, कथानक अथवा त्यातील एखादे पात्र काळाच्या बर्याच पुढच्या तुकड्यामध्ये प्रवेश करते. उदा. एखाद्या हिंदी चित्रपटात एक लहान मूल फुटबॉल खेळत असते, त्याने मारलेला फुटबॉल हवेत उंच जातो. तिथून खाली येतो तो थेट तारुण्यातील त्याच मुलाच्या पायाशी. मधला काही वर्षांचा काळ कथानकातून वगळलेला असतो.
‘ओडिसी’ मधील वरील प्रसंगाला चित्रपट इतिहासातील सर्वात दीर्घ जम्प-कट मानले जाते. रोचक बाब ही की क्युब्रिकने ‘ओडिसी’ची सुरुवात सर ऑर्थर सी. क्लार्क यांच्या ‘द सेन्टिनेल’ या एक-पानी कथेपासून केली होती. क्लार्क यांच्या मदतीने त्याने तिचे एका अविस्मरणीय चित्रपटाच्या पटकथेमध्ये रूपांतर केले. एका अर्थी हा ही एक जम्प-कटच म्हणावा लागेल.
हाडाचा साधन म्हणून वापर करण्यापासून सुरू झालेली मानवी प्रगतीची वाट नक्की कुठली यावर मतमतांतरे आहेत. कुणी असं म्हणतं की देव नावाच्या कुण्या हलवायाने झारा घेऊन बुंदी पाडावी तशी माणसे निर्माण करुन पृथ्वीवर वस्तीस सोडून दिली. कुणी मानवाचा प्रवास हा देवत्वाकडून अवनत होत प्राणिमात्रांच्या पातळीकडे (अवक्रांत) होतो आहे असे मानले. तर वैज्ञानिक विचारांच्या, अनुभवसिद्ध ज्ञानाच्या पुरस्कर्त्यांनी प्रत्यक्ष पुरावे, चिकित्सा आणि निष्कर्षाच्या पद्धतीला अनुसरत मानवी उत्क्रांतीला सर्वाधिक संभाव्य (probable) शक्यता मानले आहे. मानवी उत्क्रांतीच्या या वाटेचा कुणी अधिक्षेप करते(१) तर काही विज्ञानवादी म्हणवणारे, पण वैज्ञानिक दृष्टीचा अभाव असणारे तिला तंतोतंत वास्तव मानून चालतात. मी स्वत: या दोनही टोकांच्या मतांशी सहमत नाही.
उत्क्रांतीच्या तत्त्वामागचा मुख्य तर्क हा रोजच्या जीवनात सहज दिसून येणार्या संक्रमणाचा आहे. माणसाच्या आहारात, विचारात, जीवनशैलीमध्ये एका आयुष्यातच मोठा फरक पडलेला दिसतो. प्राकृतिक, भौगोलिक तसंच तांत्रिक बदलांशी माणसे कशा तर्हेने जुळवून घेत पुढे जातात हा आपल्या अनुभवाचा भाग आहे. त्याच अनुभवाला तर्काच्या साहाय्याने लांबवून उत्क्रांतीची कल्पना मांडता येते.
discovermagazine.com/ येथून साभार.असे असले तरी उत्क्रांती ही अखेर एक प्रक्रिया आहे, काळाच्या एका तुकड्यावर घडलेली घटना नव्हे. त्यामुळे पिढ्यानुपिढ्या काळाच्या प्रत्येक तुकड्यावर तिच्यासंबंधी निरीक्षण करणे आणि नोंदी ठेवत तिला तंतोतंत वास्तव म्हणून सिद्ध करणे हे मानवी कुवतीच्या बाहेरचे आहे. भूतकालात घडलेल्या एखाद्या घटनेचे तिच्यावरील नोंदींच्या आधारे केलेले आपले आकलन वास्तव म्हणणेही धाडसाचे ठरते. तिथे लाखो वर्षे चालू असल्याचा दावा असलेली एखादी प्रक्रिया वास्तव म्हणणे ही फारच मोठी उडी म्हणता येईल.
संख्याशास्त्रीय परिभाषेत ज्याला अनुमान-प्रारूप(२) (prediction model) म्हणतात, तसे काहीसे उत्क्रांती सिद्धांताचे स्वरूप आहे. (खरेतर तितके ठोसही नाही.) भूतकालातून जमा केलेल्या वास्तविक पुराव्यांच्या साहाय्याने प्रथम ते तयार केले जाते. त्याच्या साहाय्याने काढलेल्या अनुमानांना पुढे वास्तविक पुराव्यांचे आधार मिळत गेल्यास ते विश्वासार्ह प्रारूप म्हणून मान्य होत जाते. अनुमान, पुरावा, चिकित्सा, निष्कर्ष या वैज्ञानिक मार्गाने उत्क्रांतीचाही हा दावा बळकटही होत जातो. तिच्या अन्य स्पर्धक पर्यायांचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक ग्रंथांचे प्रामाण्य स्वरूपाचे असल्याने त्यांना वास्तवातील निरीक्षणांचा कोणताही आधार नाही.
माणसाला विविध कालखंडातील मानवाच्या जगण्याच्या पाऊलखुणा सापडलेल्या आहेत, सापडत आहेत. माणूस आपल्या वैज्ञानिक साधनांच्या, प्रक्रियांच्या मदतीने त्या वस्तुमात्रांची कालनिश्चिती करतो. या पद्धतीमध्ये कालनिश्चितीचा बिनचूकपणा किती यावर त्या वस्तुमात्राचा काळ ढोबळमानाने निश्चित होतो. मग या पुराव्यांच्या जंत्रीला तो कालक्रमानुसार मांडून त्यातून एक सुसंगत चित्र सापडते का याची चाचपणी करतो.
सापडलेला सर्वात जुना पुरावा आणि सर्वात अर्वाचीन पुरावा यातून निश्चित झालेल्या कालपटावर ‘तुलनेने’ मोजक्या संख्येने असलेल्या पुराव्यांच्या साहाय्याने या पुर्या कालाचे चित्र रेखाटण्याचे आव्हान वैज्ञानिकांसमोर असते. दोन पाठोपाठच्या पुराव्यांच्या काळातही काही सहस्रकांचे अंतर असू शकते. यातील मधल्या काळात काय घडले असावे, हे केवळ अनुमानितच करता येते. त्या गाळलेल्या जागा तर्काने भरल्या जातात. याशिवाय पुराव्यांमध्येही विश्वासार्ह(३), महत्त्वपूर्ण कोणते याचा निवाडा वैज्ञानिकाला करावा लागत असतो. एकाने अविश्वासार्ह मानून सोडून दिलेला पुरावा दुसर्या वैज्ञानिकाने (कारणमीमांसेसह) विश्वासार्ह मानला, तर दोघांकडे अभ्यासासाठी असलेल्या पुराव्यांची संख्या नि संच वेगवेगळा असू शकतो. यातून दोघांच्या चित्राच्या तपशीलात फरक पडू शकतो.
हे काहीसे लेगो अथवा मेकॅनो या खेळासारखे आहे. तुम्ही वस्तू बनवण्यासाठी कोणते तुकडे निवडता नि कोणते सोडून देता यावर तुम्हाला कोणती वस्तू बनवता येईल ते ठरते. एकाने बस बनवली तर दुसरा कार बनवू शकतो. पण लेगोंचे वास्तव कारही नसते वा बसही. लेगोंच्या तुकड्यांचा तो पुरा संच हाच तुमच्या दृष्टिने वास्तवाच्या सर्वात जवळचा असतो. कार अथवा बस हे तुमच्या आकलनाच्या सोयीखातर, तुमची अभ्यासाची गाडी चालती करण्यासाठी बनवलेली प्रारूपे असतात इतकेच. जास्तीत जास्त लेगोचे तुकडे वापरून केलेली वस्तू ही त्यांच्या समुच्चय असलेल्या अज्ञात वास्तवाच्या अधिक जवळ असू शकते असे म्हणता येईल. पण त्यातही जोडण्याची क्रमवारी आणि ते जोडणार्याची कल्पकता यांचे हीण मिसळलेले असणारच.
पण लेगोचे तुकडे मोजके असतात, मानवी इतिहासाचा पल्ला प्रचंड आहे. त्यामुळे वैज्ञानिकांना अनुमानाच्या अधिकाधिक चांगल्या पद्धतींच्या सतत शोधात राहावे लागते. नवी, अधिक कार्यक्षम पद्धत सापडली, की जुन्या निरीक्षणांच्या आधारे नवे प्रारूप, नवी अनुमाने मांडली जातात. त्यांच्या आधारे भूतकालाचा, त्यातील घटितांचा नि प्रक्रियांचा अधिकाधिक नेमका वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो... माणसाच्या जिज्ञासेचा प्रवास असा अखंड चालू राहातो.
Credit: Lambert/Ullstein Bild/Getty Images.या लेखमालेचा उद्देश उत्क्रांतीचा वेध घेणे, विरोध करणे वा तिचे समर्थन करणे हा नाही. लाखो वर्षे चालू असलेल्या प्रक्रियेचे समर्थन अथवा विरोध करण्यापेक्षा सरळ ‘तेव्हा आणि आता’ अशा काळाच्या दोन तुकड्यांवर अथवा टप्प्यांमध्ये मानवी जीवन जसे दिसते, त्यांची तुलना करुन मधल्या प्रवासाच्या साहाय्याने कुठून कुठे पोहोचलो याचा अदमास घेण्याचा आहे. ‘ओडिसी’बाबतच्या पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे याची मांडणी एखाद्या जम्प-कटसारखी आहे.
उत्क्रांती-समर्थक असोत, अवक्रांतीचे समर्थक असोत की कुण्या देवबाप्पाने बुंदी पाडल्यासारखी अथवा मूर्तिकाराने बनवल्यासारखी माणसे बनवली असे मानणारे; या सार्यांचे एका मुद्द्यावर एकमत होऊ शकते. आणि ते म्हणजे माणूस एकदम नागरजीवी नक्कीच झाला नाही. जंगलजीवी ते स्थिर-जीवन ही वाट त्याला तुडवावीच लागली आहे. आणि ही प्रगतीची वाट ही निरीक्षण, अनुकरण, विश्लेषण, सुधारणा आणि निर्मिती या गुणांच्या साहाय्याने त्याने पार केली आहे.
इतर प्राण्याने केलेली शिकार पळवणे त्याने कदाचित तरसासारख्या प्राण्याकडून उचलले असेल, आरोग्याची समस्या निर्माण झाली की विशिष्ट वनस्पती शोधून ती खावी हे एखाद्या मार्जारकुलातील प्राण्याचे अनुकरण असेल, एखादे सावज शिकारीसाठी सोयीच्या ठिकाणी कसे हाकून न्यावे हे लांडगे, जंगली कुत्रे वा त्यांच्या कुण्या पूर्वजांकडून शिकला असेल. निवारा म्हणून गुहा शोधण्याऐवजी आपली ‘गुहा’ स्वत:च बांधण्याची कल्पना त्याने कदाचित घरटे बांधणार्या पक्ष्यांकडून घेतली असेल. दुसरीकडे डोंगर उतारावरून गडगडत जाणारा धोंडा पाहून चाकाची प्राथमिक कल्पना त्याच्या डोक्यात उमटली असेल. ‘ओडिसी’तील प्रसंगात दाखवल्याप्रमाणे हाडांचा वापर हत्यार म्हणून केल्यानंतर अन्य कोणत्या वस्तूंचे हत्यार अधिक परिणामकारक ठरेल हे त्याने वारंवारतेच्या प्रयोगातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असेल का? हे नि असे प्रश्न विचारुन मानववंशशास्त्रज्ञ त्यांचा वेध घेत राहतात.
याच धर्तीवर अर्वाचीन(modern) मानवाच्या प्रगतीच्या प्रेरणा कोणत्या? त्या प्राचीन मानवाच्या प्रेरणांशी कितपत जुळतात. निरीक्षण, अनुकरण, विश्लेषण, सुधारणा आणि निर्मिती या पलिकडे आणखी कोणती उद्दिष्टे अर्वाचीन मानवी जीवनात प्रेरक ठरत असतात. त्यांची प्राचीन मानवाच्या भावभावना, वृत्ती-प्रवृत्ती, कौशल्ये, दृष्टिकोन आदिंशी कितपत सांगड घालता येते असे प्रश्न विचारून त्यांना ‘हे चित्र आणि ते चित्र’ म्हणून परस्परांसमोर ठेवून तुलना करुन पाहता येईल. तेव्हा ‘माकड ते माणूस’ की ‘थेट माणूस’ हा वादाचा मुद्दा आपण वाद-संवादप्रिय भारतीयांवर सोडून आपण ‘तेव्हा’ नि ‘आता’ अशा निव्वळ निरीक्षणांच्या साहाय्याने काही आकलन होते का ते पाहू.
यातून कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाची अपेक्षा अर्थातच नाही. कोणतीही सैद्धांतिक मांडणी करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे शास्त्रीय वा वैज्ञानिक चौकटीचाही विचार केलेला नाही. निव्वळ जिज्ञासा, त्याला अनुसरून निरीक्षणे आणि माफक विश्लेषण इतकेच करावे असे धोरण राखले आहे. विश्लेषणाचा भाग वगळला तर हे साधारणपणे पत्रकारितमधील रिपोर्ताजच्या व्याप्तीमध्ये बसेल असे वाटते.
अन्न, संरक्षण आणि मैथुन या प्राणिजगतातील मूलभूत गरजा मानल्या आहेत. जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला जिवंत राहण्यास अन्न लागते, प्यायला पाणी लागते या दोन गोष्टींच्या आधारे त्याचे पोषण होते. प्रत्येक प्राण्याचे अन्न आणि ते मिळवण्याच्या पद्धती भिन्न असतात. जंगलवासी अथवा आदिम मानवाचे अन्न कुठले होते, ते मिळवण्याच्या पद्धती कोणत्या होत्या, त्यांचा शोध त्याला कसा लागला असावा असे प्रश्न विचारता येतील.
मनुष्य सोडून जगातील यच्चयावत प्राणिमात्र पाण्याला तोंड लावून पितात, मानव हा एकच प्राणी पाण्याला तोंडाकडे घेऊन येतो. ही कृती प्रथम त्याने कोणत्या प्रेरणेने अथवा विचाराने केली असेल? शिकारीला आवश्यक असणारे मजबूत सुळे, जबडा, धावण्याचा वेग, धारदार नखे असे कोणतेही नैसर्गिक अवयव नसतानाही त्याला शिकारीची प्रेरणा कशी मिळाली असेल? त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य त्याने कसे अंगीकृत केले असेल? टोळी ते समाज हा स्थित्यंतराची प्रेरणा काय असावी?
मानवी जगण्याला पुरी वेटाळून राहिलेली ‘देव’ नावाची संकल्पना त्याला कशी स्फुरली असेल? त्यामागच्या प्रेरणा आणि तिच्या भूमिका कोणत्या? साहित्यिकांच्या लाडक्या हिंसा नि लैंगिकता या आदिम प्रेरणांपलिकडे(४) आणखी कोणत्या प्रेरणा होत्या ज्यांच्या साहाय्याने मानवाने आपली प्रगतीची वाट वेगाने पादाक्रांत केली? त्यातील कोणत्या प्रेरणांचे अवशेष वा रूपे आजच्या मानवात नि समाजात आजूनही आढळून येतात?
हे नि असे प्रश्न, त्या मागची जिज्ञासा आणि त्यातून माणसाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या सदरात केला जाणार आहे. या प्रवासादरम्यान माणसाने काय कमावले नि काय गमावले, त्या आदिम काळातील मानवाच्या वृत्ती-प्रवृत्तीच्या पाऊलखुणा आजच्या माणसांत दिसतात का? जनावरांहून असामान्य अशी बुद्धी लाभलेल्या माणसाने बौद्धिक प्रगती तर केलीच, पण ती करत असताना त्याचे आहार, वर्तन, समाज, संघर्ष, अधिवास, साधने कशी बदलली आहेत, त्यात आदिम काळातील माणूस आजही डोकावतो का? या प्रश्नांचा वेध घेणारे हे सदर, मानवी संस्कृतीच्या उगमाचा धाग एक जम्प-कट घेऊन थेट वर्तमानाशी जोडून पाहणारे.
- oOo -
(१) ‘उत्क्रांती ही वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे’ असे प्रतिपादन करणार्या एका पुस्तकाला नुकताच राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले(!) यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
(२) उदाहरणार्थ: पावसाचे अथवा एकुणच तपमानाचे वा बर्फवृष्टीच्या शक्यतांचे अनुमान करण्यासाठी वापरली जाणारी मॉडेल्स अथवा प्रारूपे.
(३) ‘पिल्टडाऊन मॅन’ या नावाने ओळखल्या गेलेल्या तथाकथित आदिमानवाची कवटी वास्तवात एका अर्वाचीन मानवाची आणि एका ओरांग उटानची कवटी यांच्या मिश्रणातून बनवण्यात आली होती. उत्क्रांतीवादाच्या समर्थकांना अडकवण्यासाठी लावलेला हा एक प्रकारचा सापळा होता असे मानले जाते.
(४) साहित्यिक भाषेच्या प्रेमात पडलेले याऐवजी चुकीने ‘पुनरुत्पादनाची किंवा आपल्यासारखा जीव निर्माण करण्याची प्रेरणा’ अशी वाक्यरचना करतात. परंतु मनुष्य सोडल्यास बहुतेक प्राण्यांना देहभोगातून अपत्य-जन्म होतो याची जाणीव असण्याइतपत प्रगल्भ बुद्धिमत्ता नसते. त्याची प्रेरणा देहभोगाचीच असते.
---पुढील भाग >> अन्नं वै प्राणिनां प्राणा
रविवार, ८ जानेवारी, २०२३
भावनांचा प्रवाहो चालला
-
२०११ सालच्या एप्रिल महिन्यांतील घटना. मी तेव्हा हिंजवडीमधील एका कंपनीसोबत काम करत होतो. आमचा एक परदेशी अन्नदाता (client( आला होता. जेवणासाठी त्याला घेऊन आम्ही त्याच परिसरातील एका होटेलकडे चाललो होतो. एका वळणावर ‘मी-अण्णा’ असे लिहिलेल्या गांधी-टोप्या घातलेला आयटी-कामगारांचा एक मोर्चा आम्हाला आडवा गेला. लोकपाल या नव्या व्यवस्थेच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा होता. शाळेच्या भाषेत सांगायचे तर ‘मधल्या सुटी’मध्ये काढलेला.
https://news.biharprabha.com/ येथून साभार.मुळात त्या मागणीच्या परिणामकारकतेबाबत मी फारसा आशावादी नव्हतो. त्यात ही मंडळी जे कर्मकांड करत आहेत ते पाहून मला हसू आले. आमचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) सोबत होता. मी हसलेला पाहून त्याने उत्सुकतेने चौकशी केली. माझे विश्लेषण मी त्याला सविस्तर सांगितले. त्यावर तो वैतागून म्हणाला, ‘पण कुणीतरी काहीतरी करतं आहे. काहीतरी होतंय ना. काहीच न करण्यापेक्षा ते बरे ना.’ हे ऐकून मला आणखी हसू आले.
मुळात ‘काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेले चांगले’ हा घातक पायंडा आहे. (‘काहीतरीच करण्यापेक्षा काहीच न केलेले अधिक चांगले.’ हे यावर माझे उत्तर असते.) ईजिप्तमधील क्रांतीमधून मुस्लिम ब्रदरहुडचे सनातनी सरकार स्थापन झाले. अफगाणिस्तानातील रशियन वर्चस्व उलथून लावण्याचा आटापिटा करताना अमेरिकेने त्या देशाची आणि स्वत:चीही प्रचंड हानी करून घेतली आणि अखेर मुस्लिम सनातनी मंडळींच्या हातात तो देश सोपवून चालते झाले.
झालेला प्रत्येक बदल हा योग्य दिशेनेच होईल अशी भाबडी आशा करणे मूर्खपणाचे असते. अण्णा आंदोलनाला पाठिंबा देणारी, पण भाजप-समर्थक नसलेली मंडळी या मुद्द्याशी सहमत व्हायला हरकत नसावी(१). बदलासाठी जे हत्यार आपण स्वीकारतो त्याची परिणामकारकता, संभाव्य परिणाम, संभाव्य दुष्परिणाम (collateral effect/damages) यांचा विचार न करता मारलेली उडी उपकारक न ठरता बाधक ठरण्याचीही शक्यता असते. शिवाय यातून विद्रोहाची कर्मकांडे निर्माण होतात किंवा त्या आयटीवाल्यांसारखे आंदोलन केल्याचे स्टॅंप जमा करून फेसबुक अथवा इन्स्टाग्रामसारख्या आपल्या व्हर्चुअल चिकटवहीत चिकटवले जातात.
अशा कृतींतून जनजागृती होते हा एक दावा केला जातो. ते मला मान्य असले, त्याचे महत्त्व मी अमान्य करत नसलो, तरी त्याची परिणामकारकता मर्यादितच असते असे माझे प्रामाणिक मत आहे. हे आंदोलन, मोर्चा वा निषेधाची कृती कुठे, कोण नि कशी करते यावर ते अवलंबून असते. शाळेतील मुलांनी फक्त सव्वीस जानेवारी वा पंधरा ऑगस्टला तिरंग्याचा एक लहानसा स्टीकर शर्टवर लावला म्हणून देशातील देशभक्तीचा स्तर उंचावत नसतो. त्यासाठी ती कृती संभाव्य परिणामांशी सांगड घातलेली हवी.
जगाच्या पाठीवर कोणत्याही देशांत अभावाचे, दारिद्र्याचे जिणे जगणार्यांची बहुसंख्या असते हे निर्विवाद सत्य आहे. याला धर्माधिष्ठित, संसदीय वा लोकशाही, राजेशाही, एकाधिकारशाही, हुकूमशाही यापैकी कोणत्याही प्रकारची व्यवस्था अपवाद नाही! तेव्हा अण्णा आंदोलन असो, ईजिप्तमधील ‘स्प्रिंग रेव्होल्युशन‘ असो, ट्युनिशियातील ‘जस्मिन क्रांती’ असो की अगदी अलिकडे इराणमध्ये मोरल पोलिसींग आणि हिजाबविरोधात स्त्रियांनी केलेला उठाव असो, त्यात या दडपलेल्या बहुसंख्येला बदलाची आशा दिसत असते. गमावण्यासारखे काहीच नसलेल्यांनी ‘काहीतरी बदलले की काहीतरी सुधारेल’ हा आशावाद जोपासणे अगदीच समजण्याजोगे आहे.
परंतु सुशिक्षितांमध्ये, बुद्धिजीवींमध्ये असलेला हा स्वप्नाळूपणा किंवा बदलत्या वार्यांबरोबर आपले शीड जुळवून घेण्याचा असलेला प्रकार माझ्या मते एकतर भाबडा, किंवा स्वार्थी, धूर्त असाच असतो. बदलानंतरच्या संभाव्य व्यवस्थेबाबत जे व्यवस्थित माहिती करून घेतात, त्यातून आजचे काय जाईल नि नवे काय येईल याची व्यवस्थित मीमांसा करतात, त्याचा ताळेबंद मांडून हा बदल सकारात्मक दिशेने आहे हे सिद्ध करु शकतात (नुसता दावा वा आशावाद नव्हे!) त्यांचा अर्थातच अपवाद करतो आहे. पण असे लोक समाजात अगदी मोजकेच असतात. बाकीचे केवळ वार्याबरोबर पाठ फिरवणारेच असतात.
माझ्यातला मध्यममार्गी माणूस नेहमीच सावध असतो. एका टोकाचे विचार नाकारताना दुसर्या टोकाच्या विचाराची रुजवणूक होत नाही ना याची खातरजमा होत नाही तोवर मी होऊ घातलेला बदल किंवा समोर आलेला पर्याय सकारात्मक आहे हे मानायला तयार नाही.
सुरुवातीला अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा उल्लेख केला होता. त्या काळात अनेक सुशिक्षित, बुद्धिजीवी मंडळींना नवी पहाट दिसू लागली होती. ‘एक नवा अन-अधिकारी (non-executive) आल्याने नक्की काय नि कसे बदलेल?’ याबाबत मी विचारणा करत असताना यातील बहुतेक मंडळी त्याबाबत अनभिज्ञ आहेत असे दिसत होते. पण त्यावेळी निर्माण झालेल्या त्या मंतरलेल्या (की कुणी मंत्रवलेल्या) वातावरणात सारे मंत्रमुग्ध झाले होते.
देश स्वतंत्र झाल्यापासून ‘काँग्रेस म्हणजे दुर्गुणाचे पुतळे असलेल्यांचा पक्ष’ असा समज जोपासून अँटि-काँग्रेसिझमचा पाया घातलेल्यांचा वारसा चालवणारे जे आहेत तेच अण्णा आंदोलनात अग्रेसर होते. हे आंदोलन केवळ लोकपाल आणण्यासाठी आहे असे समजण्याइतके ते भाबडे नक्कीच नव्हते. निदान त्यातील काही जणांना या आंदोलनाची १९७५-७६ मधील जेपींच्या नवनिर्माण आंदोलनाची सांगड बसते हे नक्कीच उमगले असणार. याचा सुप्त हेतू काँग्रेसचे सत्ताकारणातले स्थान दुबळे करण्याचा, शक्य तर तिला सत्तेतून पायउतार करण्याचा होता हे बरेचसे स्पष्ट होते. पण तिची जागा कोण घेणार याचे उत्तर यांतील बहुतेकांकडे नव्हते. ‘आधी जुनी इमारत तर पडू द्या, पर्याय आपोआप उभा राहील’ अशा भगवान-भरोसे मानसिकतेचे हे लोक होते.
यातील काही मंडळी अजूनही तिसरी आघाडी नावाच्या पर्यायाचे स्वप्न पाहात असतात. विविध राज्यांतून निम्म्याहून अधिक आमदार लीलया फोडून विरोधी सरकार पाडण्याची ताकद राखून असलेल्या भाजपसमोर क्राउड-फंडिंग केल्यासारखे यांचे चार, त्यांचे पाच खासदार एकत्र करुन बांधलेली मोट टिकाव धरेल असा भाबडा आशावाद यांच्याकडे अजून शिल्लक आहे.
जेपींच्या आंदोलनानंतर काँग्रेस पराभूत झाली. काँग्रेसला पर्याय म्हणून उभे राहता यावे इतके बळ आंदोलनात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांपैकी कुणालाच मिळाले नव्हते. त्यातून परस्परविरोधी विचारांची एक खिचडी अँटि-काँग्रेसिझमचा दुबळा धागा घेऊन उभी केली गेली. यथावकाश त्यातील अंतर्विरोधांनी ती धराशायी झाली नि काँग्रेस पुन्हा सत्तेमध्ये परतली.
https://www.deccanchronicle.com/ येथून साभार.परंतु नव-गांधी म्हणून प्रसिद्धी केली गेलेल्या अण्णांच्या आंदोलनात उतरलेल्या काहींकडे मात्र काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यावर तिची जागा कोण घेणार याचे निश्चित उत्तर होते! त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला.
पुढील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सफाया होऊन मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाला आणि धर्माधिष्ठित राजकारण करणार्या भाजपचा डंका वाजू लागला.
आता नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्याआधीच जुनी इमारत पाडल्याचे परिणाम काय होतात हे समजलेले, अण्णा आंदोलनात अग्रेसर असणारे अनेक जण भ्रमनिरास होऊन पुन्हा आपल्या जगात परतून गेले. हा भ्रमनिरास दुर्दैवाने त्यांच्या पाचवीला पुजलेला दिसतो. याचे कारण हे ठोस पर्यायांपेक्षा तात्कालिक उठाव अथवा आशावादाच्या हिंदोळ्यावर झुलण्यात आनंद मानताना दिसतात.
https://www.news18.com/ येथून साभार.बुडत्याला काडीचा आधार या भूमिकेतून हे अनेकदा अतिशय दुबळ्या प्रवाहांवर स्वार होऊ पाहतात. अण्णा आंदोलनाच्या ‘मंतरलेल्या दिवसांत’ वाहवत गेलेले हे लोक पुढे मग चार घोषणा देऊन प्रकाशझोतात आलेल्या कुण्या कन्हैय्याकुमारमध्ये नवा त्राता शोधू लागतात. (गंमत म्हणजे तोंडाने हे व्यक्तिकेंद्रित मांडणीचा विरोध करत असतात.) किंवा ‘ईव्हीएम इज इव्हिल’ या कुणीतरी सोडलेल्या पुडीने गुंग होऊन ‘पुन्हा एकदा मतपत्रिका आणा की सगळं ठीक होईल.’ अशा भ्रमात ‘ईव्हीएम हटाव’चा नारा देतात.
ईव्हीएम ही भाजपची काहीतरी जादू आहे नि ते हटवले की मोदी हरतील हे तर्कापुरते खरे मानले, तरी त्यातून मोदी-भाजप सरकार पायउतार होईल... पण त्यांची जागा कोण घेईल? पुन्हा काँग्रेस? मग २०११ पासून ‘काँग्रेस-भाजप एकाच माळेचे मणी आहेत’ किंवा ‘काँग्रेस म्हणजे मूर्तिमंत भ्रष्टाचार’ म्हणत काँग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्याचा जो आटापिटा केला त्याचे फलित काय? बरं या दोघांनाही बाजूला सारून सत्ता मिळवेल असा राष्ट्रव्यापी, कल्याणकारी पर्याय उभा राहणे सोडा, त्या दृष्टीने प्रयत्नही गेल्या आठ-नऊ वर्षांत यांनी केलेले दिसत नाहीत, त्याचे काय?
फार कशाला नवरात्रीमध्ये नऊ दिवसांच्या नऊ रंगांच्या साड्या नेसून महिला फोटो टाकतात, तसे पांढरे कपडे घालून फोटो टाकल्याने निषेध व्यक्त होतो असा यांचा समज असतो. गंमत म्हणजे हीच मंडळी मोदींनी आदेश दिलेल्या थाळ्या-टाळ्यांच्या कार्यक्रमाची टर उडवत असतात.
विरोध अथवा विद्रोह हाच रचनात्मक कार्यक्रम आहे असा त्यांचा गैरसमज असतो. कदाचित रचनात्मक पर्याय देण्यासाठी लागणारा अभ्यास व चिकाटी त्यांच्याकडे नसते. त्यामुळे जुनी इमारत पाडल्याचे श्रेय त्यांना पुरेसे वाटत असते. तिची जागा घेतलेल्या नव्या इमारतीतली न्यूनेही त्यांना दिसू लागतात नि तीही पाडली पाहिजे असे प्रतिपादन करणे सुरू होते. परंतु या सार्या खटाटोपात आपल्याला हवी तशी भक्कम, आवश्यक त्या सोयींनी युक्त, बहुतेकांच्या खिशाला परवडेल अशी घरकुले देणारी इमारत कशी नि कुणी बांधावी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र हे कधीच करताना दिसत नाहीत.
या सार्या मंडळींपेक्षा बरीच मोठी संख्या आहे ती मोदींच्या समर्थकांची. ‘मोदीजी ने किया है तो कुछ तो सोचा होगा ।’ म्हणत त्यांनी आपल्या जगण्याचे सर्व हक्क मोदींच्या स्वाधीन केले आहेत. ते म्हणतील ती पूर्व दिशा असे यांनी मनोमन मान्य केले आहे. धोरणे वा कृती तर सोडाच त्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या अश्लाघ्य विधानांची – कदाचित स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धिलाही न पटणारी – समर्थने ते प्रसवत नि पसरवत असतात. कारण एकच, ‘आता एक त्राता आला आहे नि तो करेल ते सगळे बरोबरच असणार आहे.’ या अविवेकी, प्रवाहपतित भूमिकेचे ते बळी ठरले आहेत.
https://www.jagran.com/ येथून साभार.मोदी-विरोधकांपैकी जे अण्णा आंदोलनाचे समर्थन करण्यापासून सुरुवात करुन ईव्हीएम हटाव, कन्हैयाकुमार वगैरे काड्या पकडून बुडण्यापासून वाचण्याची आशा करत आले आहेत, त्यातील अनेक जण आज राहुल गांधीच्या ‘भारत-जोडो यात्रे’ने प्रभावित होऊन त्यांच्यामध्ये नवा त्राता शोधू लागले आहेत. थोडक्यात पुन्हा एकदा एका नव्या प्रवाहात उडी घालत आहेत.
या भारत-जोडो यात्रेने सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर कोणता नि कसा बदल घडेल, त्यातून राजकीय परिवर्तनाची शक्यता किती? पूर्वी काँग्रेस हा भाजपपेक्षा वेगळा नाही हे आपले असलेले मत आपण आता बदलले का? आठ-नऊ वर्षांत तिसरा पर्याय उभा करून न शकल्याची ही कबुली म्हणायची का? अण्णा आंदोलनाच्या वेळी पर्यायी राजकीय चित्राबाबत जे प्रश्न होते, सत्ताधारी बदलूनही आज तेच समोर आहेत. अशा यात्रेने, राहुल गांधींचे नेतृत्व इतके उंची गाठेल का, की ज्यातून मोदी-भाजपला गांधी-काँग्रेस हा पर्याय म्हणून पुन्हा उभारी धरेल?
या प्रश्नांची उत्तरे सोडा, याला सामोरे जाण्याची तरी या प्रवाहपतितांची तयारी आहे का? की सतत नवनव्या काड्या पकडून ‘हां आता आपण बुडण्यापासून वाचू.’ असा भाबडा – त्याची वारंवारता लक्षात घेता मूर्खपणाचा म्हटले तरी वावगे ठरणार नाही – आशावाद घेऊन हे जगत राहणार आहेत?
माणसांना विचारांपेक्षा भावनांच्या प्रवाहात तरंगत जगायला अधिक आवडते. कुणी एक त्राता आला आहे, काहीतरी घडते आहे म्हणजे आता चांगलेच काहीतरी होईल या स्वप्नांवर स्वार होऊन उडत उडत जायला त्यांचे प्राधान्य आहे. विवेक-विचार-विश्लेषणाची आठवण कुणी करून देऊ लागला की, ‘तुमच्यासारख्या काहीच न करणार्यांनी आम्हाला, आमच्या नेत्याला शिकवू नये.’ असे फटकारण्याची त्यांची सोपी पद्धत असते. हे वाजवी उत्तर आहे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते.
विवेक-विचार-विश्लेषणातून सद्यस्थितीचा आलेख मांडणे, त्यातील न्यूनांची कारणमीमांसा, त्यावर ठोस उपाय, त्यातून कृतींचा वा व्यवस्थेचा भविष्यकालीन आराखडा मांडणे म्हणजे ‘काहीच न करणे’ असा यांचा समज दिसतो. कृतीला अवास्तव महत्व देत असताना तिच्या मागे भानावर असलेला विचार हवा हे डाव्या-उजव्या-मधल्या म्हणवणार्या सार्यांनाच ठाऊक नाही; असले तरी त्या मार्गाने जाण्याइतकी चिकाटी त्यांच्यात नाही. वेगवेगळ्या भावनिक प्रवाहांचे प्रवासी होऊन राहणे त्यांना अधिक आरामाचे वाटत असावे.
- oOo -
(१) याउलट मोदी-भाजपने अण्णा आंदोलनासोबत नि त्याच्या पश्चात घडामोडी नि व्यवस्था यांचा एक ठोस आराखडाच तयार केला होता. रोहित चोप्रा यांनी ’व्हर्चुअल हिंदू राष्ट्र’ या पुस्तकात या हिंदू प्रोजेक्टचा सविस्तर आढावा घेतला आहे.
---
संबंधित लेखन:
जस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे... >>
सत्तेचे भोई >>
एका किंग-स्लेअरची गोष्ट (एक राजकीय रूपककथा) >>
‘काँग्रेस-भाजप एकाच माळेचे मणी’ पार्टी >>
---