शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

जम्प-कट - २ : अन्नं वै प्राणिनां प्राणा

मानवी जीवनप्रवासाचा 'जम्प-कट'<< मागील भाग
---
अन्नं वै प्राणिनां प्राणा । अन्नमोजो बलं सुखम् ।
तस्मात्कारणात्सद्भिरन्नदः प्राणदः स्मृतः ।।"
- (भविष्यपुराण--१६९.३०)

अन्न हेच प्राणिमात्रांचा प्राण आहे. अन्न हे ओज, बल आणि सुखही आहे. यास्तव अन्नदात्यालाच प्राणदाताही म्हटले जाते.

---

या जीवसृष्टीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी त्याच्या आहार आणि संरक्षण या दोन मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी लागते. प्रत्येका प्राण्याच्या आयुष्याच्या मोठा भाग या दोन गरजांनी व्यापलेला असतो. बारकाईने पाहिले तर या दोनही गरजा परस्परांशी निगडितच दिसतात.

जीवो जीवस्य जीवनम्‌

Food-Chain

जीवसृष्टी ही 'जीवो जीवस्य जीवनम्‌’ या तत्त्वाच्या आधारे चालणारी एक प्रकारची बंदिस्त व्यवस्था (closed) किंवा स्वयंपूर्ण (self-sustaining) व्यवस्था आहे. वनस्पतीसृष्टी ही या अन्नसाखळीची सुरुवात मानली, तर त्यांच्यापासून शाकाहारी जीव आपले अन्न मिळवतात. तर मांसाहारी जीव या शाकाहारी जीवांना भक्ष्य बनवतात. क्वचित त्यांचीही शिकार करणारे अन्नसाखळीतील आणखी वरचे जीव असतात. त्यांच्या अंतानंतर त्यांचे देह कीटकांचे भक्ष्य ठरतात. किंवा मातीत अथवा पाण्यात मिसळून वनस्पतींच्या अथवा जलजीवींच्या वाढीस सहाय्यभूत ठरतात.

कोणताही जीव संग्रह(gather), शिकार(hunt) आणि अपहार(steal) या तीन प्रकारांनी आपले अन्न मिळवताना दिसतो. संग्रह म्हणजे निसर्गातून आहारयोग्य (प्रामुख्याने) वनस्पतीजन्य पदार्थ जमा करणे. यात पाने, फुले, फळे हे वृक्षजन्य, तर गवत वा त्यापासून मिळणारी तृणजन्य बीजे, हे शाकाहारी जीवांचे मुख्य अन्न. हे शाकाहारी जीव प्रामुख्याने संग्राहक. त्यांच्या अन्नसंग्रहादरम्यान भक्ष्य-भक्षक संघर्ष क्वचितच होतो. कारण त्यांचे भक्ष्य हे बव्हंशी प्रतिकारक्षम नसते. अगदी मोजक्या वनस्पतींमध्ये गंध वा रसायनजन्य प्रतिरोध व्यवस्था असतात. परंतु त्यातही प्रतिकारापेक्षा संरक्षणाचा, बचावाचाच भाग अधिक असतो.

मांसाहारी प्राणी हे आपले अन्न मुख्यत: शिकारीमार्फत मिळवतात. इथे भक्ष्य-भक्षक थेट संघर्ष असतो. यात दोन समस्या असतात. पहिली म्हणजे भक्ष्य नेहमीच शिकार्‍याच्या तावडीत सापडेल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे भूक लागेल तेव्हा अन्न मिळेलच याची खातरी नसते. दुसरे म्हणजे तसेच भक्ष्याकडेही दात, नखे वगैरे प्रतिकाराची साधने उपलब्ध असतील, तर काही प्रमाणात शारीरिक हानीही सोसावी लागते.

मांसाहारी प्राण्यांत स्वत: शिकार न करता अन्य प्राण्याने केलेली शिकार बळकावणे हाही एक अन्न मिळवण्याचा मार्ग दिसतो. चित्त्यासारखे चापल्य नसलेले सुस्तप्रवृत्ती तरसही त्या चित्त्याने केलेली शिकार आपल्या चार-दोन सोबत्यांच्या मदतीने हिसकावून घेते. कळपाचा पोशिंदा म्हणवणारा सिंहदेखील त्याच्या कळपातील सिंहिणींनी केलेल्या शिकारीवर बळाने अधिकार सांगताना दिसतो. गिधाडांसारखे मृताहारीदेखील एखाद्या वाघिणीने अथवा सिंहिणीने केलेली शिकार संख्याबळ आणि चिकाटीच्या बळावर हिरावून घेतात.

पण या तीनही प्रकारात अन्न सेवन करणारा प्राणी आपले अन्न स्वत: अथवा स्वत:च्या गटाच्या साहाय्याने मिळवत असतो. भक्ष्य आणि भक्षक यांचा थेट संबंध येत असतो.

मनुष्यप्राणी

शेतीचा शोध हा माणसाला अन्य प्राण्यांपासून सर्वस्वी वेगळ्या वाटेने घेऊन गेला असला, तरी त्यापूर्वी माणूसही अनेक प्राण्यांपैकी एक होता, आणि वानरकुलातील अन्य प्राण्यांप्रमाणेच मिश्राहारी होता. या कुलातील प्राणी माफक मांसाहार करत असले तरी ज्याला शिकार म्हणावे अशी ठोस कृती ते करत नाहीत. पक्ष्यांची अंडी, छोटे व गतिसुस्त प्राणी वगैरे जीवांचा त्यांच्या आहारात समावेश होतो. याचे कारण शिकारीसाठी लागणारे चापल्य, शारीरबल वा धूर्तपणा वानरकुलात फारसा आढळत नाही.

माणूस हा मुळात दुबळा जीव आहे. त्याला वाघसिंहादि शिकारी प्राण्यांची मजबूत ताकद वा जबडा नाही, चित्त्याप्रमाणे चापल्य नाही, भक्ष्याला फाडून त्याचे मांस खाण्यास आवश्यक असणारे मजबूत सुळे नाहीत. शिकारी पक्ष्यांप्रमाणे भक्ष्यावर घट्ट पकड मिळवता येईल अशा नख्या नाहीत की भक्ष्याचा शरीराचा भेद करुन त्याचे मांस खाण्यास साहाय्यक होईल अशी भेदक चोच नाही. त्यामुळे तो शिकारीपेक्षाही दुय्यम असणारी अपहारपद्धती तो अधिक अवलंबत असावा. पक्ष्यांची अंडी वा पिले, पोळ्यातील मध, उंदरांच्या बिळातील धान्य यांचा अपहार अर्वाचीन जगातील माणूसही करताना दिसतो.

दुसर्‍या प्राण्याने केलेली शिकार परस्पर हिसकावून घेण्याचे हे तंत्र बहुधा त्याने तरस वा गिधाडांसारख्या अपहारप्रवीण जीवांकडे पाहून विकसित केले असावे. अगदी विसाव्या शतकात एड्रियन बोशिअर या भटक्याच्या आफ्रिका सफारीमध्ये त्याने स्वत: हा प्रयोग करुन चित्त्याकडून शिकारीचा एक तुकडा हस्तगत केल्याचे लायल् वॉटसन यांनी त्याच्यावर लिहिलेल्या ’लायटनिंग बर्ड’(२) या पुस्तकात नमूद केले आहे.

मानवी समाजात दुबळी आणि त्या दुर्बलतेने सतत मागे राहावी लागणारी माणसे कुढी होतात, कडवट होतात. अशी माणसे थेट वर्चस्व प्रस्थापित करता न आल्याने, आपले महत्त्व वाढवण्यासाठी कटकारस्थानांचा आधार घेताना दिसतात. त्याचप्रमाणे प्राचीन काळीही दुबळ्या शारीरबलातील कमतरता माणसाने सापळे लावणे, जनावराला फसवून खड्ड्यात पाडून शिकार करणे वगैरे मार्गाने भरून काढली असावी.

वानर ते नर

वानराचा नर होऊ लागल्यावर, म्हणजे माणसाला पुढील दोन पायांचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने करता येऊ लागल्यावर त्याने शिकारीसाठी बाह्य आयुधांचा वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. (मागील लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले ओडिसीमधील दृश्य याच टप्प्यावरचे आहे.) धारदार वा अणकुचीदार दगड, हाडे यांचा हत्यारासारखा वापर करण्याचे तंत्र अवगत झाल्यावर, अन्नासाठी तो शिकारीवर अधिक अवलंबून राहू लागला असेल.

HumanSwingsAndSlings

यानंतर मानवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत अभूतपूर्व अशी क्लृप्ती लढवली आणि ती म्हणजे घासून धारदार केलेल्या दगडाला एखाद्या झाडाच्या फांदीला बांधून तो दगड भक्ष्याला फेकून मारणे(१). शिकारीचे हे तंत्र त्याला निसर्गात कुठेही पाहायला मिळालेले नसावे, आजही मिळत नाही. (अपवाद बेडकाने जीभ बाहेर फेकून कीटकाची शिकार करण्याचा.) हे सर्वस्वी मानवी बुद्धीचे अपत्य होते. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे पाण्याला तोंड न लावता पाणी तोंडाला लावणे हे ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे तसेच हेही.

ज्या नर-वानराच्या डोक्यात हे ’दुरून शिकार साधण्याचे तंत्र’ प्रथम उमटले तो तुम्हां आम्हां तथाकथित प्रगत मानवाचा आदिपुरूष म्हटला पाहिजे. कारण यानंतर या शिकार्‍याच्या दृष्टिने शिकार अधिक सुरक्षित झाली आणि विपुल अन्न कमी श्रमांत उपलब्ध होऊ लागले... आणि त्यासोबतच माणसाच्या मनातील अन्न-गरजेपलिकडच्या हिंसेलाही साधन मिळून गेले!

वर म्हटल्याप्रमाणे अन्य शिकारी प्राण्यांच्या तुलनेत माणूस हा तसा दुबळा जीव असल्याने त्याने कळप करून राहणे ओघाने आलेच. पुढे भाल्यांसारखी, बाणांसारखी बाह्य आयुधे विकसित केल्यावर एकट्या-दुकट्याला पाडाव करता येत नाही अशा मोठ्या जनावराची शिकार सामूहिकपणे करण्याचे कसब विकसित केले. हे सामूहिक शिकारीचे तंत्र माणसाने लांडगे, कोळसुंदे यांच्यासारख्या झुंडीने शिकार करणार्‍या प्राण्यांकडून आत्मसात केले असेल. म्हणजे एके काळी केवळ संग्राहक असलेला मनुष्यप्राणी प्रथम शिकारी आणि नंतर मोठा शिकारी म्हणून प्रस्थापित होत गेला. त्याचबरोबर शेतीच्या शोधानंतर त्याची परोपजीवी (gatherer, stealer) प्रवृत्ती लुप्त होऊन तो अन्नाबाबत स्वयंपूर्ण होऊ लागला.

जातिबाह्य सहकार

कॉनरॅड लोरेन्झ नावाच्या एका वर्तनवैज्ञानिकाने (ethologist) ’Man Meets Dog’ नावाच्या पुस्तकात माणूस आणि कुत्रा यांच्या सहजीवनाच्या वाटचालीची एक काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. एका मानवी टोळीने केलेल्या शिकारीच्या उच्छिष्टांवर जगत त्यांच्या मागे मागे फिरणार्‍या कोल्ह्यांच्या टोळीमुळे पुढे चाललेल्या माणसांच्या टोळीचे मागील बाजूच्या संभाव्य धोक्यांपासून होत असे. एखादा शिकारी प्राणी दिसला, की या ’राखणदार’ टोळीमध्ये जो हलकल्लोळ होई, त्यामुळे पुढे असलेली माणसे आधीच सावध होत.

काही कारणाने ही टोळी मागे रेंगाळल्यामुळे हा मागचा 'पहारा’ गायब होतो. मागील धोक्याची जाणीव वाढलेल्या माणसांच्या टोळीचा नायक अखेर आपल्या मांसाच्या साठ्यातील एक तुकडा स्वत:हून कोल्ह्यांसाठी मागे सोडतो, त्यांना आपल्या पाठीमागे येण्यास उद्युक्त करतो. मानवी जीवनाच्या त्या टप्प्यावर, आपल्या शिकारीचा वाटा टोळीबाहेरच्या माणसालाच नव्हे, तर एका जनावराला देण्याचा हा प्रसंग- काल्पनिक म्हटला तरी- अभूतपूर्वच म्हणावा लागेल. यातून मानवाने प्रथमच अन्य प्राण्याकडे सहकारासाठी हात पुढे केला होता.

या दोन टोळ्यांत देवाणघेवाण सुरु होते. शिकारीचा माग काढण्यासाठी केवळ नजरेवर अवलंबून असलेल्या माणसाला कोल्ह्यांच्या तीव्र घ्राणेंद्रियांची साथ मिळाल्यामुळे शिकारींचा माग यशस्वी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढते. शिवाय त्यांच्या भुंकण्यातून, आवाजाच्या त्या कल्लोळातून शिकार होऊ घातलेल्या प्राण्याची गती नि विचारशक्ती कुंठित करण्याचा, त्याला ’स्तंभित’ करण्याचा डाव साधता येतो. बदल्यात कुत्र्याचे रानटी, अनिश्चित आयुष्य संपून त्याला आहाराची शाश्वती आणि मोठ्या शिकारी जनावरांपासून संरक्षण मिळू लागते. नैसर्गिक न्यायापलिकडे जाऊन झालेली ही पहिली आंतर’जातीय’ युती म्हणता येईल. या युतीने इतर प्राणिजगतावर अधिराज्य प्रस्थापित केले.

Sheep is a sheep...

अन्य जातीय प्राण्याला ’माणसाळवण्याचा’ हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळेच माणसाला पुढे पशुपालनाची प्रेरणा मिळाली. त्यातून मग शेळ्या-मेंढ्या, डुकरे, गायी, कोंबड्या यांना आपल्या परिसरातच सांभाळण्यास सुरुवात केली. यातील बहुतेक प्राणी हे दूध, अंडी, शेतीमध्ये खत म्हणून वापरता येणारी विष्ठा यांच्यासह मांसाचा हुकमी स्रोत म्हणून कामी येऊ लागली.

इतकेच नव्हे तर माणसाच्या विकसित मेंदूने मांसासाठी मारलेल्या जनावराच्या आहारयोग नसलेल्या अवयवांचा वापर करण्याचा विचारही सुरू केला. त्यातून हाडे, शिंगे व खुरांपासून आयुधे, कातड्यांपासून शरीर-प्रावरणे तसंच पाणी वा अन्न साठवणुकीची साधने बनवण्यास सुरुवात केली. त्यातूनच ’Sheep is a sheep... but it is also meat and wool.’ यांसारखी म्हण प्रचलित झाली.

शिकार आणि अन्न

या संपूर्ण अन्नसाखळीमध्ये एक सजीव अन्य सजीवाची हत्या करतो ते त्याचे अन्न म्हणूनच. पोट भरलेला शिकारी सहज तावडीत सापडते म्हणून शिकार करीत नाही. एखादा सिंह अथवा वाघ ’चला हा हरणांचा जथा सापडला आहे तर भरपूर शिकार करुन साठवून ठेवू.’ असा विचार करताना दिसत नाही.

त्याने जर बरीच जनावरे मारुन साठा केला, तर जिवंत सुटलेल्या हरणांची संख्या खूप कमी होईल. त्यातून त्यांच्या नव्या पिढीची संख्या रोडावेल. परिणामी हळूहळू सिंहाला शिकारीला उपलब्ध असणारी हरणे कमीकमी होत जातील. भविष्यात या सिंहाला नाही, तरी त्याच्या पुढच्या पिढ्यांना अन्नाचा तुटवडा भासू लागेल. शिवाय एकाच वेळी भरपूर शिकार केली, तरी ते अन्न साठवून ठेवण्याचे तंत्र त्याला माहित नसल्याने त्यातून मिळालेले बहुतेक मांस हे सडून वाया जाईल. किंवा शिळे मांस खाऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.

अर्थात हा सारा विचार, हा सारा तर्क करण्याइतकी सिंहाची बुद्धी परिपक्व आहे की नाही हा मुद्दा आहेच. पण विचाराने नाही तरी कृतीने सिंह गरजेपेक्षा अधिक जमवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही एवढे मात्र नक्की. म्हणून त्याच्याकडून गरजेहून अधिक शिकार होत नाही. म्हणूनच हरणांची वीण वाढू शकते, आणि त्यांच्यावर पोसल्या जाणार्‍या सिंहांचीही.

माणसाने प्रगत आयुधे, कुत्र्यासारख्या प्राण्यांचे साहाय्य आणि अन्य प्राण्यांच्या तुलनेत विकसित होऊ लागलेली बुद्धी यांच्या एकत्रित वापराने शिकारीचे तंत्र कमालीचे विकसित केले. पुढे शेतीच्या शोधानंतर आणि पशुपालन यशस्वीपणे साध्य केल्यानंतर अन्नासाठी शिकार करण्याची गरज उरली नाही, तरीही अगदी आजच्या काळातही माणूस हौसेखातर शिकारी म्हणून वावरू लागला. आपल्या या हौसेखातर अमेरिकेतील पॅसेंजर पिजन आणि भारतातले चित्ते यांसारख्या प्राण्यांचा निर्वंशही घडवून आणू लागला.

निसर्गजीवी

माणूसही निसर्गजीवी होता, निसर्गाच्या सोबतीने राहात होता, तेव्हा जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तो निसर्गाकडून घेई. तेव्हा जगण्यासाठी आवश्यक गोष्टी निसर्गातून घेताना हा आपला हक्क नाही याचे त्याला भान होते. केवळ जगण्याची गरज म्हणून आपण ते काढून नेतो, हे तो विसरत नसे. म्हणून त्याबद्दल निसर्गाकडे आपली कृतज्ञता रुजू करत असे.

BushmanAplogizesToTheBuck

गॉड्स मस्ट बी क्रेझी’ नावाच्या सुरेख चित्रपटातील बुशमेन आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हरणाची शिकार करतो. ते पडल्यावर प्रथम त्याला स्पर्श करून त्याची माफी मागतो. ’माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी म्हणून मला तुला मारावे लागते आहे. एरवी माझे तुझ्याशी कोणतेही शत्रुत्व नाही.’ असे त्याला सांगतो.

गो. नी. दाण्डेकरांच्या ’जैत रे जैत’मधला ठाकरांचा नाग्या जळणासाठी फांदी तोडण्यासाठी झाडदेवाची अनुमती मागतो, केवळ वाळलेलीच फांदी तोडेन, ओली तोडणार नाही असे वचन देतो. त्या झाडावरच्या पोळ्यातील माश्यांची माफी मागतो. नागदेवाच्या पाया पडतो. वाघदेवाला त्याचे देणे देत जातो.

आफ्रिकेतील जंगलवासींमध्ये प्रत्येक टोळीचे एक आराध्य दैवत असते. हे दैवत निसर्गातील एखादा प्राणी, पक्षी वा सजीव असतो. त्यातून त्या त्या टोळीकडून त्या दैवत प्राण्याची शिकार केली जात नाही, त्याला संरक्षण दिले जाते. यातून अतिरेकी शिकारीतून त्या प्राण्याचा निर्वंश होणे टळते.

माणूस वन्यजीवी होता त्या काळातील निसर्गाशी असलेले नाते त्याला दिसत होते. आपल्या आयुष्याचा तो मूलाधार आहे याची त्याला जाणीव होती. पुढे माणूस नागर झाला, निसर्गापासून दूर सरकला आणि निसर्गाबाबतची त्याची ही कृतज्ञतेची भावना लुप्त होत गेली... इतकी की सूर्य, वरूणादि देवांसह नागदेव, वाघदेव अशा प्राकृतिक देवांची जागा मनुष्यरूपी काल्पनिक देवांनी घेतली

बलवंताची मोठी पोळी

या शिकारीमानवाच्या टोळीमध्ये शिकारीचा मोठा वाटा हा बलवंताला अथवा शिकारी गटाला मिळे. या विभागणीला ’बळी तो कान पिळी’ या उक्तीचा आधार होता. पण तेवढेच नव्हे टोळीतील अन्य जीव यांच्यावर अन्नासाठी अवलंबून असल्याने त्यांनी सुदृढ राहणॆ एकुण टोळीच्या दृष्टिनेही आवश्यक होते.

याचाच अवशेष म्हणजे ’लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ हे पुढे नागरी जीवनातही अवशिष्ट राहिलेले तत्त्व. नागर आयुष्यामध्ये सत्तेचे स्वरूप नि समीकरणे बदलली तरी सत्ताधार्‍याला अधिक मलिदा या नियमासमोर बहुतेक समाजातील माणसे आजही मान तुकवताना दिसतात.

पिले म्हणजे मुले ही सर्वस्वी परावलंबी आणि भविष्यातील अन्न मिळवणार्‍या शिकारी टोळीचे संभाव्य सदस्य या न्यायाने पुढचा वाटा मुलांचा असे. आणि अन्नसेवनाच्या हक्काच्या शेवटच्या पायरीवर स्त्रिया उभ्या असाव्यात- आजही आहेत! शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला असे मानले जाते. त्यामागे अन्नाबाबत स्वावलंबी होण्याची प्रेरणा असावी.

भक्ष्य ते आहार

माणूस हा टोळीजीवी, वन्यजीवी असताना अन्नसेवन हे अर्थातच कच्च्या स्वरूपात होत असे. भाजणे, शिजवणे, दोन भिन्न पदार्थ एकत्र करून खाणे या स्वरूपाची अन्नप्रक्रिया अद्याप बरीच दूर होती. अन्न भाजून खाणे अथवा शिजवून खाणे या दोन मूलभूत अन्नप्रक्रिया.

यापैकी अन्न भाजून खाणे ही पहिली प्रक्रिया असावी. जंगलात लागलेल्या वणव्याने होरपळून हाती पडलेली शिकार अन्न म्हणून खाताना ते अधिक चविष्ट लागते हा शोध अनायासे लागलेला म्हणावा लागेल. परंतु अन्न शिजवणे, म्हणजे पाण्याच्या साहाय्याने वाफवणे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या कुठेही पाहायला सापडणे शक्य नव्हते. पाणी तोंडाकडे आणणे, शस्त्र फेकून शिकार करणे याप्रमाणेच हा शोध सर्वस्वी मानवी बुद्धिचेच फलितच आहे.

माणूस वन्यजीवी, भटके जीवन स्थिरजीवी झाला त्यानंतर, शेतीच्या शोधानंतरच हा शोध माणसाला लागला असावा. कारण या प्रक्रियेमध्ये (पाणी तोंडाकडे आणण्यासाठीही) पाणी साठवू शकणार्‍या पात्राची आवश्यकता असते. अशी पात्रे तयार करण्याचे कौशल्य माणसाने आत्मसात केल्यानंतरच हे शक्य झाले असेल.

उदरभरण नोहे...

निसर्गात शाकाहारी असोत वा मांसाहारी असोत, रुचिचे वैविध्य प्राण्यांच्या हाती नसते. उपलब्ध असेल त्या अन्नातून, मिळू शकेल ते निवडावे लागते. परंतु शेती आणि पशुपालन यांच्यामुळे माणसाला हवे तेव्हा हवे ते अन्न उपलब्ध होऊ लागले. शिकारीमधील परावलंबित्व संपुष्टात आले. अन्न-संग्रहण आणि शिकार यांत गुंतवलेली त्याची ऊर्जा मोकळी झाली.

भक्ष्य भाजणे आणि शिजवणे या दोन मूलभूत अन्नप्रक्रियांच्या साहाय्याने माणूस अन्नसेवनाबाबत निर्णायकरित्या अन्य प्राणिसृष्टीपासून वेगळा झाला. अन्न हे केवळ उदरभरणाचे साधन न समजता, वाचलेली ऊर्जा नि उसंत वापरून त्याने त्याने एक वा अधिक अन्न-घटकांच्या संमीलनाने नैसर्गिक अन्नघटकांपासून आपल्या सोयीचे नि हव्या त्या चवीचे अन्न तयार करण्यास त्याने सुरूवात केली.

...जाहले यज्ञकर्म

BohraCommunityKitchen

सुमारे वर्ष-दीड वर्षांपूर्वी दाऊदी बोहरा समाजाच्या कम्युनिटी किचनबाबत एक बातमी वाचण्यात आली होती. आपल्या समाजाच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किमान एकवेळचे सकस अन्न पोटभर मिळावे यासाठी हे किचन काम करते. या किचनच्या सचिव हजिफा जवादवाला यांच्या दाव्यानुसार या किचनचा एक उद्देश म्हणजे समाजाच्या स्त्रियांना घरातील किचनच्या जबाबदारीतून स्वतंत्र करून स्वत:चे असे करिअर घडवता यावे.

अन्न हे पूर्णब्रह्म म्हणत असतानाच दुसरीकडे ’घरच्या अन्नाची चव बाजारच्या अन्नाला नाही.’ अशी मखलाशी करत उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या घरातील स्त्रियांनाही कायम किचन-करियरमध्ये गुंतवून ठेवण्याचा धूर्तपणा पुरूषप्रधान समाजातून आजही पक्के मूळ धरून आहे. अशावेळी आज महानगरी जीवनात जागोजागी उभी राहिलेली व्यावसायिक ’पोळीभाजी विक्री केंद्रे’ स्त्रीला खरोखरच मोठा आधार देताना दिसतात.

अन्न ही क्रयवस्तू

पण या सामाजिक हिताच्या हेतूने उभ्या केलेल्या किचनसारखा अपवाद वगळला तरी अन्नसेवन हे घरापासून बाजारात आले ते फार प्राचीन काळी. शेतीच्या शोधानंतर माणसाने ’अतिरिक्त उत्पादन आणि त्याची विक्री’च्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि व्यापार संकल्पनेने मूळ धरले. हे व्यापारी व्यावसायिक हेतूने देशांतर्गत नि देशाबाहेरही प्रवास करत असत. परमुलखात अशा व्यक्तींच्या अन्नाची सोय करणार्‍या खानावळी धर्मशाळांसारख्या व्यवस्थेचे उपांग म्हणून प्रथम सुरू झाल्या.

भांडवलशाहीच्या उदयानंतर त्यांचे रोख पैसा घेऊन चोख अन्न देणार्‍या होटेल्स आणि रेस्तरांमध्ये रूपांतर झाले. इथे अन्नदाता आणि अन्नसेवक यांच्यामध्ये चोख रोखीच्या व्यवहार होत असतो. मुख्य म्हणजे या दोहोंचाही त्या अन्नाचे मूल घटक देऊ करणार्‍या निसर्गाशी संपर्क तुटून गेलेला होता. नागरी, महानगरी जीवनात तर तो पुरा पुसून गेलेला दिसतो.

नियमित रोजगारावर घरापासून जाणार्‍या परंतु घरच्या अन्नाची सोय वेळेत होत नसल्याने, आणि बाहेरचे अन्न परवडत नसल्याने पेचात सापडलेल्या चाकरमान्यांसाठी मुंबईसारख्या महानगरामध्ये डबेवाल्यांची एक चोख यंत्रणाच काम करत असते. हे काम व्यावसायिक असूनही एकप्रकारे सामाजिक सेवेचेच म्हणावे लागेल. या घरपोहोच- अथवा ऑफिसपोहोच- अन्नाची संकल्पना भांडवलशाही व्यवस्थेमध्ये व्यावसायिकही झाली. झोमॅटो, स्विग्गी यांसारख्या सेवादात्यांमार्फत हव्या त्या होटेल, रेस्तरांमधले अन्न मागवणार्‍याकडे मागेल तेथे पोहोचवले जाते.

नातं(?) निसर्गाशी

आता ही व्यवस्था अंगवळणी पडू लागल्यावर ते अन्न सेवन करणार्‍या व्यक्तींचे अन्नाच्या मूलभूत घटकांशी असलेले नातेही धूसर होत चालले आहे. आपण जो पदार्थ खातो आहोत त्यात निसर्गदत्त अशा कोणकोणत्या धान्यांचा, मसाल्यांचा समावेश केला आहे, याचा या ग्राहकाला गंधही नसतो. पदार्थाची चव रुचते आहे तोवर त्यांतील घटक नि त्यांची कृती (रेसिपी) जाणून घेण्यात ग्राहकाला काडीचाही रस नसतो.

पुलंनी एके ठिकाणी असे गंमतीने म्हटले होते की, ’कापूस हा गादीतच तयार होऊन वाढत जातो नि अखेरीस बाहेर पडतो’ असा आम्हा मुंबईकरांचा समज असतो.’ त्याच धर्तीवर सांगायचे तर काही वर्षांतच ’मॅक्डोनल्ड्स’वाल्यांकडे बर्गरचे झाड असते किंवा ’पिझ्झा-हट’वाल्यांच्या ग्रीनहाऊसमध्ये पिझ्झाची शेती केली जाते असा समज विद्यार्थ्यांमध्ये रुजू लागला तर फार आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. पण यातही झाड वा शेती याबाबत त्यांना माहिती असेल हे गृहित धरले आहे. आज ’तुमच्याकडे दूध कुठले असते?’ या प्रश्नाला ’गाईचे’ अथवा ’म्हशीचे’ ऐवजी ’चितळेंचे’ किंवा ’अमूलचे’ असे उत्तर मिळण्याची शक्यता कैकपट अधिक आहे. तसेच तयार अन्नाच्या बाबतही होऊ शकते.

भक्षकाचा ग्राहक झाल्यानंतर त्याच्या भक्ष्याशी, निसर्गाशीच नव्हे तर नैसर्गिक घटकांशी येणारा संबंध विरत चालला आहे. प्रगतीच्या महामार्गावर सुसाट वेगाने धावणार्‍यांना अन्नासाठी लागणारे घटक आणणे, त्यांपासून विविध पदार्थ बनवणे नि चाखणे, त्यातील आनंद घेणे या सार्‍या प्रक्रियेतील वेळ नि ऊर्जा वाया घालवली जाते आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे.

अन्न हे पूर्णब्रह्म?

DeliTakeoutFood

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांत घरी अन्न न शिजवता एखाद्या डेली (deli अथवा delicatessen) मधून तयार आणण्यास अनेक चाकरमानी प्राधान्य देऊ लागले आहेत. पुठ्ठ्याच्या डब्यांमधून येणारे हे अन्न त्यातच सुरी-काटा (फोर्क) बुडवून खायचे नि तो डबा, सुरी काटा थेट कचर्‍यात फेकून द्यायचे असा प्रघात रूढ होतो आहे. यातून अन्न रांधण्यास लागणारा कच्चा माल विकत आणणे, त्याच्या वापराचे नियोजन टळते आणि किचन नावाची संकल्पना मोडीत निघते आहे. प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात कदाचित अंतराळवीरांप्रमाणे माणूस केवळ चौरस आहार देणार्‍या, शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करणार्‍या गोळ्याच पाण्याबरोबर गिळून कामाला लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पण दुसरीकडे अन्न हे केवळ पोटात ढकलण्याचे भक्ष्य नसून ते रस, रंग, गंध यांसहित पंचेंद्रियांशी तादात्म्य पावणारे असायला हवे हा भारतीय बाणा व्यावसायिक पातळीवर आणणार्‍या ’मास्टरशेफ’सारख्या कार्यक्रमांची, फूडी चॅनेल्सची माध्यमांतून चलती आहे. गरज आणि चैन या दोनही गोष्ट माणसाच्या आयुष्यात कायम हातात हात घालून चालताना दिसतात. उदरभरण म्हणून सुरू झालेली अन्नसेवनाची वाटचालही त्याला अपवाद ठरलेली नाही.

- oOo -

(१) बायबलमधील ज्यूंचा राजा डेव्हिड आणि गॉलायथ यांची कथा इथे आठवते. धिप्पाड अजिंक्य फिलिस्तिनी योद्धा गॉलायथला डेव्हिड हा अगदी कोवळा तरूण गोफणीतून दगड फेकण्याचे कौशल्य वापरून वर्मी घाव घालून ठार मारतो आणि ज्यूंच्या सुवर्णकाळाचा आरंभ होतो.

(२) निरंजन घाटे यांनी या पुस्तकाचा ’निसर्गपुत्र’ नावाने मराठी अनुवाद केला आहे.
---

    पुढील भाग >> टोळी ते समाज आणि माणूस


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. खूपच छान लिहिले आहे. धन्यवाद. जॅरेड डायमंड यांच्या Guns, Germs, and Steel या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे, त्यातही या विषयी विस्ताराने लिहिले आहे,त्याची आठवण झाली.

    उत्तर द्याहटवा
  2. दुसरा भागही उत्तम झाला आहे. अनेक चमकदार तुकडे सापडले ज्यांचा अधिक विस्तार शक्य आहे. पुढचे भाग पूर्ण करा. तुम्हाला खूप वेळ आहे, पण आम्ही मर्त्य आहोत. - विशाल

    उत्तर द्याहटवा