बुधवार, १४ जून, २०२३

जम्पकट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)

अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)<< मागील भाग
---

जगभरातील प्रत्येक माणसांत एक संभ्रमित जनावर दडलेले असते. जनावरांच्या तुलनेत माणसाची ग्रहणशक्ती जितकी वाढली आहे त्या मानाने आकलनशक्ती अजून बरीच मागे आहे. त्यामुळे अनेकदा माणसाला अनेक प्रश्नांना, माहितीला, समस्यांना सामोरे जावे लागते ज्याच्याबाबत काय करायचे हे त्याला/तिला उमगत नाही. समस्या समोर असते पण तिच्या कारणांचे आकलन त्याला/तिला झालेले नसते. अशा वेळी एकतर कुणाला तरी ते झाले आहे आणि त्या समस्यांचे उत्तर त्याच्याकडे आहे असे गृहित धरणे सोयीचे असते.

काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात माणसाच्या जाणिवेला जनावरांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ आयाम मिळू लागले होते. त्या विकसित झालेल्या बुद्धीमुळे भयाचे आकलनही अधिक तीव्र झाले होते. परंतु जाणीव जागी झाली असली तरी मर्यादित बौद्धिक, शारीरिक व तांत्रिक वकुबामुळे अजूनही अनेक प्रकारचे धोके, अनामिक, अनाकलनीय धोक्यांपासून सुटकेची अथवा निराकरणाची पुरेशी माहिती वा साधने उपलब्ध होत नव्हते.

त्यातून अशा संभ्रमित मंडळींनी आकलनाचा मधला टप्पा ओलांडून थेट उपायाचा, निराकरणाचा आयता मार्ग शोधला. वैय्यक्तिक आयुष्यामध्ये ’देवा’ची आणि सत्ताकारणामध्ये ’राजा’ची भूमिका यातून तयार होते. तो सर्वशक्तिमान, ’आपल्या समस्यांचे कसे निवारण करणार, त्यासाठी आवश्यक कौशल्ये त्याच्याकडे आहेत का?’ याचा विचार त्या दोघांना शरण जाणारे करत नसतात. ते त्याचे काम आहे नि त्याने ते करायलाच हवे, तो त्यासाठी सक्षम आहे हे त्यांनी गृहित धरलेले असते. त्याच्या क्षमतेबाबत विचार वा मूल्यमापन करण्याची गरज त्यांना वाटत नसते. श्रद्धेचा उगम हा असा ’या शिरीचे विवंचना-चक्र त्या शिरी’ देण्याच्या असोशीतून झालेला आहे.

पर्यायी सत्तास्थान

टोळीजीवनामध्ये या देवत्वाशी संवादाचे माध्यम म्हणून टोळ्यांमध्ये भगताची नेमणूक झालेली असे. हा एका बाजूने देवांना कौल लावणे, टोळीच्या कार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेणे वगैरे कार्ये करण्याबरोबरच टोळीतील सदस्यांच्या व्याधीं-उपचारांची जबाबदारीही घेत असे. आजच्या भाषेत सांगायचे तर हा मांत्रिक आणि वैद्य यांचे मिश्रण असे. त्यामुळे टोळीप्रमुखापाठोपाठ त्याचे स्वत:चे असे विशेष स्थान असे. त्यामुळे त्यालाही अप्रत्यक्ष सत्तेची जाणीव होत गेली असेल.

माणसाने शेतीचा शोध लावला, ज्यातून त्याच्या मूलभूत गरजा एका ठिकाणी स्थिर राहूनही भागवणे शक्य झाले, टोळीची समाजाकडे वाटचाल सुरु झाली. निसर्गजीवी असण्याकडून नागरजीवी होताना घटलेल्या शारीरिक संघर्षांचे नि प्राकृतिक धोक्यांचे प्रमाण पाहता बाहुबलाचे निर्विवाद श्रेष्ठत्व डळमळू लागले. इथे आपल्या अप्रत्यक्ष सत्तेला प्रत्यक्ष सत्तेमध्ये रूपांतरित करण्याची इच्छा भगताच्या मनात बळावली असावी. अशा वेळी बाहुबलींकडे असणारी राजकीय सत्ता आपल्याकडे कशी खेचून घेता येईल, निदान त्यातील वाटा मिळवता येईल याचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला असेल. मग त्यातून आपल्या हाती असलेल्या एकाधिकारालाच सत्तेचे रूप देण्याची महत्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली असेल.

परंतु हे तितकेसे सोपे नव्हते. भगताला ’स्वबळावर’ बाहुबलाशी थेट संघर्ष शक्य नव्हते. त्याच्याकडे असलेले देवता-संपर्काचे बळही त्याला अशा थेट संघर्षात उपयुक्त ठरणारे नव्हते. कारण तोवर देवता-संकल्पना ही जेमतेम प्रतीक म्हणूनच अस्तित्वात होती. आपल्या कार्यात अडथळा आणू नये म्हणून भगतामार्फत माणसांची टोळी देवाला काही देऊ करत असे नि त्याबदल्यात ते देव आपले कार्य सुकर करतील अशी आशा करत असत.

उलट दिशेने त्या देवतांकडून मानवाशी कोणताही संपर्क (?) केला जात नसे. देवाचा अनुग्रह झाला की कोप झाला याचे मूल्यमापन माणसानेच वास्तवाकडे पाहून करायचे असे. शिवाय देवतांमधील प्रत्येकाचे एक कार्यक्षेत्र निश्चित असे, ते सर्वशक्तिमान, सर्वव्यापी नव्हते. त्यामुळे त्यांच्या मुखी आपले बोल बोलवावे नि त्या आधारे सत्ता मिळवावी हे शक्य होत नव्हते. आणि म्हणून वास्तविक बलाची कमतरता असलेल्या भगतासारख्या सत्ताकांक्षी मंडळींनीही मानवी-देव संकल्पना जन्माला घातली असेल ही एक शक्यता नाकारता येत नाही.

कारण देव मानवी झाले नि त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. आता केवळ विशिष्ट प्राकृतिक घटक वा घटना यांच्यापुरती त्यांची सत्ता नव्हती. एका टोळीवर अधिराज्य गाजवणार्‍या टोळीप्रमुखाप्रमाणेच ते मानवांचे पारलौकिक जगातील नेते होते. ते सर्वसत्ताधारी, सर्वव्यापी बनू लागले नि त्यामुळे विविध टोळींचे, गटांचे - पुढे धर्मांचे - देव परस्परांशी स्पर्धा नि संघर्ष करु लागले हे ओघाने आलेच.

देवता मानवी झाल्यामुळे आता देव-मानव संपर्क स्थापित झाला. दोन माणसे परस्परांशी संवाद साधतात तसेच हे मानवी देव मानवाशी बोलू (?) लागले. परंतु हे देव सर्वसामान्यांशी अर्थातच बोलणार नव्हते. संवादाचे माध्यम म्हणून - आपले ’प्रेषित’ म्हणून - भगताचीच निवड करावी हे ओघाने आलेच. म्हणजे मानवी देवतांची संकल्पना रुजवतानाच या भगतांनी, प्रेषितांनी त्यांच्या खांद्यावर बसून सत्तेच्या रिंगणात प्रवेश केला. त्यामुळे पारलौकिक देवतांच्या माध्यमातून बाहुबलाला, राजकीय सत्तेला पर्यायी अशी सत्ता उदयाला येऊ लागली. ’Give to Caesar what belongs to Caesar, and to God what belongs to God.’ या येशूच्या प्रसिद्ध उक्तीमध्ये अप्रत्यक्षरित्या हेच अधोरेखित केले आहे. पुढे भगताच्या सत्तेला धर्मसंस्थेचे रूप मिळाले आणि धर्मगुरू अथवा राजगुरू म्हणून भगताचे स्थान राजाच्या तोलमोलाचे होऊन बसले.

त्यापूर्वीच्या अग्नि, वायु वगैरे प्राकृतिक देवांमध्ये आपसांत संघर्ष होण्याचे कोणतेही कारण नव्हते, कारण (एकतर ती प्रतीकेच होती आणि-) त्यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती. पण देवता संकल्पनेला मानवी, सर्वव्यापी बनवल्यामुळे देवता-संघर्षांची ठिणगी पडली. पुढे संघटित धर्मांच्या स्वरूपात या देवांच्या फौजा तयार झाल्या, नि केवळ वर्चस्वाच्या लढाया नव्हे तर युद्धेच सुरू झाली-.

भगताने देवत्व संकल्पनेचा सत्तासंपादनाचे हत्यार म्हणून वापर केला तसाच अन्न नि पाण्याचाही वापर माणसाने केला आहे. याबाबत एक उल्लेख (लॉरेन्स ऑफ अरेबिया) या लेखमालेमध्ये आधी आलाच आहे. त्याचप्रमाणे ’बुक ऑफ इलाय’ या चित्रपटातही विध्वंसोत्तर काळामध्ये पाण्याचा स्रोत आणि देवाचा शब्द (बायबल) यांचा वापर करुन सत्ता बळकट करु पाहणारा एक स्थानिक दादा अथवा गुंड पाहायला मिळतो. भांडवलशाही जगामध्ये इथवर न थांबता चलन अथवा पैसा आणि उपभोग्य वस्तूंचा वापर करुनही अप्रत्यक्ष सत्तेची विविध प्रारूपे निर्माण होत गेली आहेत.

धर्मसत्तेचा उदय

माणसामध्ये जनावरांहून अधिक प्रगल्भ जाणीवा, अपेक्षा नि प्रेरणा विकसित झाल्या, तसतसे त्याला कळपातील परस्पर-व्यवहारांना अधिक काटेकोर करण्याची गरज भासू लागली. नर-मादी संबंधांचे रूपांतर एकास-एक जोडप्यामध्ये झाल्याचा उल्लेख या पूर्वी आलाच आहे. पण त्याही पलिकडे जाऊन परस्पर-सहकार्य नि व्यवहार यांचे नियम अधिक नेमके होत गेले. त्यातून आचारी (behavioral) धर्माचा जन्म झाला, आणि कळपाचे रूपांतर समाजात झाले.

देव संकल्पनेपूर्वी केवळ नीतिनियम होते. टोळीतील एखाद्याने ते मोडले तर शारीर दंड किंवा टोळीतून बहिष्कृत करणे हे दोनच पर्याय होते. टोळीचे नीतिनियम पाळण्यास बाध्य करण्यासाठी या दोहोंची भीती हेच एकमेव प्रतिरोधक होते. ही भीती नाहीशी करता आली की नियम झुगारून देणे शक्य होते. आज लोकशाही व्यवस्थेमध्ये निवाडा-व्यवस्थेला व्यवस्थित वळसा घालून जाता येईल इतके सामाजिक, राजकीय , आर्थिक वा बाहुबळ असणारे नीतिनियमांच्या, सामाजिक-वैधानिक कर्तव्यांच्या कशा चिंधड्या उडवतात हे आपण पाहात असतो.

समाज आणि व्यक्ती यांचे हितसंबंध अनेकदा परस्परांना छेदून जात असल्याने व्यक्तींचा कल अनेकदा सामाजिक - आचारी धर्माचे - नीतिनियम डावलून स्वार्थानुरूप वर्तन करण्याकडे होत असतो. याला प्रतिरोध करण्यासाठी काही चतुर नेत्यांनी आचारी धर्माला यथावकाश देव-संकल्पनेसह पारलौकिक संकल्पनांशी जोडून दिले; आणि आचारी धर्माच्या नीतिनियमांना पावित्र्य संकल्पनेचा आवरणात गुंडाळून सादर केले, ज्यातून ते अनुल्लंघनीय असल्याचा धाक अधिक परिणामकारकपणे घालता येऊ लागला.

परंतु पण एकदा हत्यार म्यानातून बाहेर पडले की तेवढेच नियत काम करुन म्यानात परत जाणे अवघड असतेच. मग याच चाणाक्षांनी त्या नीतिनियमांभोवती आचारी धर्माची उभारणी केली. टोळीप्रमुखाला, राजकीय सत्तेला युयुत्सु सहकार्‍यांचा, सैन्याचा आधार असतो. त्याला उत्तर म्हणून धार्मिकांनी पारलौकिकावर आधारित निष्ठेचा, श्रद्धेचा अंगीकार केलेल्या नागरी फौजा निर्माण केल्या. त्यातून राजकीय सत्तेला पर्याय म्हणून धर्मसत्तेचा उदय होत गेला.

टोळीजीवनामध्ये आपली टोळी हेच आपले कुटुंब, सहकारी, समाज, धर्मगट नि समाज होता. त्याच्या बाहेरील प्रत्येक जीव हा एकतर भक्ष्य होता किंवा शत्रू. परंतु निव्वळ शिकारी वा संग्राहक न राहता माणूस कौशल्याधारित उत्पादन करु लागला नि त्यातून उत्पादनांची देवाणघेवाण सुरू झाली. विविध देवता वा आचारी धर्माला अनुसरणारे परस्परांशी व्यवहार करु लागले. यातून वेगवेगळ्या धार्मिक समाजातील व्यक्तींची सरमिसळ होऊ लागली आणि त्यातून विविध समाजव्यवस्थांचे, धर्मगटांचे परस्परांना छेद जाऊ लागले. आता एक-धर्माचारी समाजच एकत्र वस्ती करून राहील असे बंधन राहिले नाही. त्यामुळे धर्मगट आणि समाज या कल्पना वेगळ्या झाल्या.

आता या सरमिसळ समाजासाठी नीतिव्यवस्था आणि व्यवहार-व्यवस्था निर्माण करणे अपरिहार्य ठरले. विविध तत्त्वज्ञानांच्या माध्यमांतून नवे वैयक्तिक आचारधर्म पुढे आले, तर व्यापारादि परस्पर-व्यवहारासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण केल्या गेल्या. तत्त्वज्ञानांचे क्षेत्र बुद्धिमंतांचे, तर सामाजिक व्यवस्थेचे क्षेत्र प्रामुख्याने राजकीय/सामाजिक नेत्यांचे ठरले.

अर्वाचीन काळात पुन्हा ही विभागणी धूसर होत एखादा तत्त्वविचार एकाच वेळी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चौकटी देऊ लागला. कम्युनिझमने पारलौकिकाचा आधार सोडून प्रथमच संपूर्णपणे झुगारून सर्वस्वी अधार्मिक, ऐहिक अशी देऊ केलेली समाजव्यवस्था हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात व्यापकदृष्ट्या प्रभावशाली ठरलेला सर्वात अर्वाचीन असा विचार मानला जातो.

खंडणी आणि वायदा

प्राकृतिक देवतांच्या उदयापाशी त्यांना देऊ केलेले देणे हे त्यांच्याशी निगडित धोक्यांपासून संरक्षण व्हावे या दृष्टीने दिलेले असे. हा एक अध्याहृत करार होता. या ’देवाला’ त्याचे देणे मिळाले की त्याने माणसापुढे विघ्न निर्माण करु नये अशी अपेक्षा असे. थोडक्यात हे देव विघ्नकर्ते होते. माणसाला त्रास न देण्याबद्दल त्यांना एक प्रकारे खंडणी दिली जात असे.

पुढे माणूस नागर झाल्यानंतर आणि या देवतांशी निगडित धोक्यांचे स्वरूप नि प्रमाण कमी होत गेल्यावर याचे देणगीमध्ये रूपांतर झाले. यात ना संरक्षणाची अपेक्षा होती ना कुठली देवघेव. हा साधारणपणे खुशीचा मामला होता. भारतीय देवता-संकल्पनांमध्ये देवांना ’नैवेद्य’ दाखवणे हे याचेच स्वरूप आहे. देव मानवी झाले आणि त्यांच्याशी येणार्‍या संबंधांमध्ये मानवी विनिमय-कल्पनेचे प्रतिबिंब उमटले. या तिसर्‍या टप्प्यामध्ये निव्वळ संरक्षणासाठी, 'नको ते घडू नये' यासाठी साकडे घालण्याऐवजी 'हवे ते घडू दे' यासाठी साकडे घालणे सुरु झाले, यातून नवस व्यवस्था नि भारतातील यातुव्यवस्थेचा जन्म झाला.

प्राकृतिक देवांशी होणारा व्यवहार हा बलवंतासमोर दुबळ्याचे झुकणे होते, तर नागर देवाला केलेला नवस हा एक प्रकारे खरेदी-विक्रीचा समान पातळीवरुन केलेला व्यवहार झाला. ’मला परीक्षेत पास कर तुला अभिषेक करेन’; ’पोराचे/पोरीचे लग्न जमू दे, २१ लाडवांचा नैवेद्य देईन’; ’निवडणुकीत यश दे, तुझ्या देवळाचा कळस सोन्याने मढवीन/तुझ्या देवळाचा जीर्णोद्धार करेन’... असे नवस बोलले जात असतात. थोडक्यात ’मला काही दे मग मी तुला काही देईन’ असा हा वायदा असतो. प्राकृतिक देवाला कोंबडं बळी देऊन प्रवासाला निघालेला एखादा प्रवासी, ’तरीही माझी वाट चुकलीच, दे माझे कोंबडे परत.' असे म्हणू शकत नसतो. उलट निवडणूक हरलेला उमेदवार देवळाचा जीर्णोद्धार करत नसतो वा त्याचा कळस सोन्याने मढवत नसतो. प्राकृतिक देवांना एक प्रकारे स्वसंरक्षणार्थ खंडणी दिली जात असे, जे एकतर्फी देणे असे. नवस हा वायद्याचा (credit) आणि देवघेवीचा व्यवहार आहे. हवे ते मिळाले तरच या वायद्याची पूर्ती होत असते.

देवाचे मार्केटिंग

AllGodsForSale
https://lbb.in/ येथून साभार.

भयनिवारणासाठी माणसाने निर्माण केलेले आणि नितिकल्पना रुजवण्यास वापर केलेली देव-संकल्पना आज बरीच पुढे गेली आहे. या दोन मूळ उद्दिष्टांपलिकडेही अनेक उद्दिष्टांची आवरणे त्यावर चढत गेली आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्या संकल्पनेचे बोट धरून वा तिच्या खांद्यावर बसून राजकीय सत्तेला पर्यायी अशी धर्मसत्ता उभी राहिली. पुढे चलनाची संकल्पना स्थिर झाल्यावर अर्थसत्ताही बाळसे धरू लागली.

श्रद्धा ही माणसाची भावनिक गरज आहे. त्यातून उभी राहिलेली देव संकल्पना हे तिचे संकल्पना-स्वरूप. पुढे अनेक धर्मांनी उपासनेच्या सोयीसाठी आपापल्या देवतांना मूर्तरूप दिले. देवतांच्या या मूर्ती अथवा प्रतीके श्रद्धा नसली तरी श्रद्धेची द्वाही फिरवण्यास, तिचे ’क्रेडिट’ मिळवण्यास सोय म्हणूनही उपयुक्त ठरू लागल्या. त्या प्रतीकांभोवती उभारलेली पूजास्थाने ही धंदेवाईक श्रद्धा-विक्रीकेंद्रे असतात. त्यांचा श्रद्धेशी काडीचा संबंध नसतो. नवसाला पावणारा वगैरे जाहिराती हा त्यांच्या मार्केटिंगचा भाग असतो. अनेकदा तर ते पुरेसे नसते म्हणून वर ’नवस फेडला नाही तर...’ची धमकीही अनेकदा जोडलेली असते. म्हणजे काही प्रमाणात खंडणीखोरीही सोबत असते.

रस्त्यावरील उत्सव हे त्यांचे आठवडी बाजारासारखे प्रासंगिक नि व्यापक स्वरूप. बाजारामध्ये अन्नधान्य विकत घेण्यासोबत मनोरंजनासाठी शिट्टी विकत घेता येते, फिरणार्‍या चक्रामध्ये बसता येते, फोटो काढून घेता येतो, 'बुढ्ढी के बाल’ खायला मिळतात. तसेच या उत्सवांमध्ये, देवस्थानांमध्ये देणगी दिलीत तर तुमच्या नावे अभिषेक, आणखी देणगी दिलीत की देणगीदारांच्या यादीत नाव, आणखी दिलीत तर भिंतीवर संगमरवरी दगड, आणखी दिली तर त्यातून बांधलेल्या सुखसुविधांना तुमचे नाव... असे अनेक पर्याय चढत्या भाजणीने उपलब्ध करुन दिलेले असतात. जितुके पैसे तितुकी मोठी श्रद्धा या नव्या बाजारयुगाने अंगीकृत केलेला नवा नीतिनियम ठरला आहे.

Saibaba

म्हणून आता अंगावर एक धडुतं, हाती कटोरा आणि एकवेळच्या भुकेइतकंच अन्न मागून घेणार्‍या साईबाबांचं भल्लमोठं संस्थान असतं. कुठेही - अगदी गल्लीच्या कोपर्‍यावर - असला तरी त्यांचा पुतळा संगमरवरीच असावा लागतो. बाबांना रत्नजडित असा सोन्याचा मुकुट असावा लागतो, भक्तांसाठी पंचतारांकित होटेल्स उभारावी लागतात, मग बाबांच्या चमत्कारांच्या कहाण्या प्रसृत कराव्या लागतात. तुमचा देव अथवा प्रेषित सुज्ञ, शहाणा, वत्सल, जनतेचा कैवारी असून पुरेसा नाही, त्याचे पुरेसे मार्केटिंग करता आले पाहिजे; त्याच्या नावे गर्दी - आणि अर्थातच पैसा - जमवता आला पाहिजे.

अलीकडे 'जेरुसलेम- एका नगरीची कहाणी' या पुस्तकात त्या शहरापासून उगम पावलेल्या एकेका धर्माला/पंथाला उतरती कळा लागली की त्यांचा देव अपरिहार्यपणे चमत्कार कसा 'घडवायचा' याचे रोचक वर्णन वाचण्यात आले.

त्यातच असा उल्लेख आहे की खुद्द येशू ख्रिस्ताच्या समकालीन असे सुमारे दोनशेहून अधिक प्रेषित त्या काळी जेरुसलेममध्ये वावरत होते. त्या प्रत्येकाचे देव होते, त्या देवांनी दिलेले पवित्र नियम वा संदेश होते. पण यांच्यापैकी कुणाचाच पंथ येशूच्या पंथाइतका विस्तारला नाही. त्यांची पंचतारांकित, अफाट श्रीमंत अशी देवस्थाने उभी राहिली नाहीत. याचे कारण येशूप्रमाणे त्यांना कॉन्स्टन्टाइनसारखा सम्राट लाभला नाही, पीटर नि जोसेफसारखे त्याच्या शिकवणुकीला रुजवत जाणारे शिष्य लाभले नाहीत. भारतातही सनातन धर्माच्या जोडीला बौद्ध नि जैन धर्म विस्तारले याचे कारणही विविध राजांनी, सम्राटांनी त्यांची शिकवणूक स्वीकारली हेच होते. कोणत्याही राजसत्तेचा हात शिरी नसलेला धर्म फारसा विस्तारलेला दिसत नाही.

त्राता तेरे कई नाम

बिब्लिकल धर्मांपाठोपाठ भारतातील हिंदू परंपरांनीही समाजाला एकाच धर्मसूत्रात बांधण्याच्या उद्देशाने एकमेव परमेश्वर ही संकल्पना स्वीकारायला सुरुवात केली. अर्वाचीन नागर समाजामध्ये देव-संकल्पना ही बव्हंशी पारलौकिकाशी जोडलेली आहे. अनागर समाजामध्ये मानवी रूपातील देवता अजूनही पुजल्या जात असल्या तरी अवतार कल्पनेची युक्ती वापरून त्यांना अर्वाचीन, अध्याहृत देवांचे अवतार म्हणून सादर केले जाऊ लागले आहे. (आपल्याकडील विठोबा हे याचे सर्वात अर्वाचीन उदाहरण आहे.) यथावकाश त्या देवतेच्या उपासकांमध्ये काल्पनिक देवांची सद्दी वाढत जाते मूळ देवतेचे महत्त्व लयाला जात असते.

पण अतिमानवी देवसंकल्पनेचा आणखी एक परिणाम मानवी मनावर झाला. प्रत्येक क्षेत्रातच त्याने असा एखादा देव, एखादा त्राता शोधण्यास सुरुवात केली. समाजकारण, राजकारण, अर्थकारण या तीनही मूलभूत व्यवस्थांमध्ये माणसाला असा एखादा देव, एखादा प्रेषित हवा असतो. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून त्या त्या क्षेत्रातील आपल्या हिता-हिताची काळजी तो विसरून जाऊ पाहात असतो. आणि अतिमानवी देवांप्रमाणेच हे नेते सर्वगुणसंपन्न असल्याचे दुराग्रहाने प्रतिपादित केले जात असते. त्याच्या विचार-कृती-ज्ञान यांतील वैगुण्य दाखवणार्‍यावर त्याचे स्वयंघोषित अनुयायी हल्ले करुन त्या टीकाकाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतात.

यांत तीन क्षेत्रांप्रमाणेच साहित्य, कला, क्रीडा वगैरे क्षेत्रेही याला अपवाद नाहीत. एखाद्या प्रसिद्ध लेखक वा कलाकाराला नेतृत्व देऊन टोळ्यासदृश कंपू तयार होतात. तिथेही त्या नेत्याच्या लेखन वा कलेचे साधकबाधक विश्लेषण करणार्‍याने एखादे प्रतिकूल मत व्यक्त केले की तो ’विरुद्ध टोळीचा’ ठरवून त्या टोळीतील देवसदृश नेत्याच्या तथाकथित अवगुणांचा खरा खोटा भडिमार करुन त्याला जाब विचारणे सुरू होते. आदिम काळापासून टोळीशिवाय माणूस’ ही संकल्पना माणसाला समजत नाही, तशीच आता नेता नसलेला, स्वयंभू सामान्य माणूस ही संकल्पनाही त्याला समजत नाही. माणसाची ओळख जात, धर्म, विचाराचा झेंडा (विचार असेलच असे नाही) यांतूनच होत असते असा ठाम विश्वास बहुतेकांना असतो. झेंड्याच्या जोडीला हातात धोंडाही असतो जो अन्य टोळीतील माणसांसाठी असतो.

आदिम काळापासून असलेली टोळीयुद्धे अजूनही चालू आहेत. सुरुवातीला ती अन्नावरील अधिकारासाठी होत असत. त्याचे प्रमाण कमी झाल्यावर अमुक देव अथवा नेता श्रेष्ठ की तमुक यावरुन होऊ लागली आहे. हत्यारे बदलली असली तरी द्वेष नि वैर कायम आहे. आणि या सार्‍याला आता अनुयायी-घोषित सर्वगुणसंपन्न देवांचे/नेत्यांचे अधिष्ठान आहे.

देवत्वाची प्रतिरूपे

देवत्वाच्या संकल्पनेचा उदय हा प्राकृतिक धोक्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने झाला हे सुरुवातीलाच नोंदवले आहे. त्यानंतर मनुष्यरूपी देवतांची पिढी जन्माला आली. पण माणसाने आता इथे न थांबता तिचा आणखी विस्तार केला आणि केवळ प्राकृतिक नव्हे तर अनेक जड पदार्थांवर देवत्वाचे - आणि सैतानत्वाचेही - आरोपण करण्यास सुरुवात केली.

आणीबाणीच्या, संकटाच्या समयी देव धावून येतो नि त्यांचे निवारण करतो या संकल्पनेचा विस्तार करून माणसाने एखादी वस्तू, एखादे चिन्ह अगदी पराभवाच्या टोकावर असलेले युद्धही जिंकून देऊ शकतो इथवर नेली. मिल्वियन ब्रिज युद्धाच्या वेळी सम्राट कॉन्स्टन्टाइनला झालेला ख्रिस्ताचा- क्रॉसचा - दृष्टांत नि अफजलखानाबरोबरच्या लढाईपूर्वी शिवाजी महाराजांना झालेला भवानी देवीचा दृष्टांत ही अशा कल्पनाविस्ताराची उदाहरणे आहेत. कॉन्स्टन्टाइनने दुसर्‍या दिवशी सैनिकांच्या ढालींवर क्रूसाचे चिन्ह गोंदवून घेतले. शिवाजीराजांनी भवानी मातेच्या झालेल्या दृष्टान्ताची माहिती आपल्या मावळ्यांना सांगितली; जिचे पुढे ’भवानीमाता तलवारीमध्ये शिरली’ या कथानकात रूपांतर झाले. दोन्हींमध्ये जड वस्तूला या ना त्या प्रकारे जड वस्तूला देवत्वाचे बळ असल्याचा समज करुन घेण्यात वा देण्यात आला. दोनही वेळा धैर्य खचलेले सैन्य त्वेषाने लढले आणि समोर दिसत असलेल्या पराभवाला ठेचून त्यांनी विजयश्री खेचून आणली.

या संकल्पनेचे प्रतिबिंब माणसाच्या सांस्कृतिक वारशामध्ये जसे उमटले (उदा. राम-रावण युद्धातील संजीवनी वनस्पती) तसेच पुढे मानवनिर्मित ललित साहित्य वा मनोरंजन माध्यमांतूनही उमटत गेलेले आहे. सांस्कृतिक कथांमधून देव अथवा देवता ’वर’ देऊ करुन एखाद्या व्यक्तीला इतरांपेक्षा काही अधिक देऊ करत, एखादा दिवा घासल्याने प्रगटलेला जिन्न एखाद्या अलादिनला तीन इच्छापूर्तींचे वरदान देई. मग ही कल्पना इतिहासामध्येही घुसली. विविध राजांच्या लहान-सहान विजयांना दिग्विजयाचे रूप देणारे भाट उभे राहिले. आपल्या कल्पनाविस्ताराच्या साहाय्याने त्यांनी राजालाही देवतुल्य करण्याचा चंग बांधला- अर्थात स्वार्थ साधून.

लिखित साहित्यांमधून पीडितांच्या हाकेला धावून जाणारे अलौकिक गुणवत्तेचे हीरो धुमाकूळ घालू लागले. कुठलासा कोळी चावल्याने त्याचे अंगभूत गुणवैशिष्ट्ये मिळालेला स्पायडरमॅन असो, सुपरमॅन असो की त्यांच्या प्रभावळीतील इतर अतिमानवी हीरो चित्रमालिका, पुस्तके, चलच्चित्रे, चित्रपटांतील कथांमधून पीडित व्यक्तींच्या मदतीला धावून जाताना दिसू लागले. अतर्क्य करामती करत अमेरिकेला, पृथ्वीला वगैरे वाचवणारे वीर हॉलिवुडमधील आणि जगभरातील चित्रपटांतून लोकांना आश्वस्त करु लागले. फ्रेंच चित्रमालिका अस्टेरिक्स (मॅजिक पोशन), अमेरिकन चलच्चित्रमालिका पॉपाय (पालक) किंवा आपला देशी बनावटीचा हीरो छोटा भीम हे कुठलासा पदार्थ खाऊन अचाट करामती करताना दिसू लागले.

अमेरिकेतील प्रसिद्ध हॉलिवूडमध्ये DC आणि Marvel या चित्रकथा(Comics ) उत्पादकांनी सुपरहीरोंच्या कहाण्यांच्या विकण्यास सुरुवात करुन त्यांना पुढे चलच्चित्रे (Animation) आणि चित्रपटांच्या दुनियेन नेऊन सोडले. हे इतके प्रसिद्ध झाले आहेत की त्यांच्या चाहत्यांचेही संप्रदाय तयार झाले आहेत. या गटातील नायक-हीरो-चे चाहते त्या गटातील पुस्तके वा चित्रपट यांच्या वाटे जात नाहीत इतकी गटबाजी बोकाळली आहे.

देवत्व संकल्पनेने माणसाला मानसिक बळ दिले, आणि त्याचबरोबर त्याच्या मनातील हिंसक भावनेलाही आधार दिला. धर्म हा आज द्वेषाचाच आधार होऊन राहताना दिसतो आहे तो त्यामुळेच. टोळीजीवनामध्ये मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग असणारी हिंसा शिकारीच्या, प्रतिस्पर्धी टोळीच्या अथवा संभाव्य धोक्याच्या दिशेने रोखलेली असे. हे संघर्ष नागर, सुस्थिर आयुष्यामध्ये बरेचसे अस्तंगत झाल्याने तिची कुचंबणा होऊ लागली. मग देव, धर्म, वंश, देश आदि नव्या विभागणीसह माणसांनी परस्परांशी संघर्ष उभे केले आणि पुढे कॉमिक्सच्या हीरोंपर्यंत ते घेऊन गेले.

- oOo -

    पुढील भाग >> जम्पकट - ७ : एकाधिकार ते विनिमय-व्यवहार


हे वाचले का?

रविवार, ४ जून, २०२३

जम्पकट - ५ : अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)

कुटुंबव्यवस्था आणि वारसा<< मागील भाग
---

मानवाच्या टोळीजीवनाच्या काळात त्याचे आयुष्य भूक, भावना आणि भय या तीनच बाबींभोवती बांधलेले होते. भूक अन्नाने भागवली जात होती. टोळीजीवनामध्ये आपल्या टोळीतील व्यक्तींबाबत बांधिलकी, आपलेपण तर अन्य टोळीतील व्यक्तींबाबत द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व या भावना असत. माणसाची भूक भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नसंपादन, आहारसिद्धता याबाबत लेखमालेच्या मागील भागांमध्ये विवेचन आलेले आहे. त्याचप्रमाणे मानवी समाजव्यवस्था विविध संक्रमणातून जात असतानाची स्थित्यंतरेही नोंदवलेली आहेत. या भागामध्ये मानवी जीवनात असलेले भय आणि त्या अनुषंगाने देव संकल्पनेची उत्पत्ती नि तिचा पुढील प्रवास याबाबत उहापोह केलेला आहे.

भयवाटेने प्रवेश

माणूस जंगलजीवी, टोळीजीवी असताना भय त्याला अनेक वाटांनी भेटीस येत असे.

LionWorshipInEgypt
https://stillunfold.com/ येथून साभार.

शिकारीला जाताना शिकारीकडे लक्ष एकाग्र केले असता सापासारखे एखादे जिवाणू त्याला दंश करुन जात असे अथवा वाघासारखे एखादे शिकारी जनावर त्याच्यावरच हल्ला करत असे. अचानक हल्ला करणारे शिकारी अथवा मांसाहारी हे प्राणी अन्नातले स्पर्धकच होते. शिकारीच्या वाटेवर असताना जोरदार पाऊस, वणवा वा वादळ त्याला अडकवून टाकत असे. रानातून जाताना सर्वत्र एकसारखा पसरलेला हिरवा-पिवळा रंग त्याला चकवा देऊन त्याची वाट चुकत असे. याखेरीज या हल्ल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा अंधार अर्थात रात्र याचीही भीती.

या प्रासंगिक प्राकृतिक अडचणींपलिकडे अतिवृष्टी अथवा अवर्षणासारख्या दीर्घकाळ अन्न-तुटवडा निर्माण करणार्‍या आपत्तींनाही त्याला तोंड द्यावे लागत असे. त्यांवर मात करण्याची साधने त्याच्याकडे नव्हती- आजही नाहीत! त्यांपासून संरक्षण करणे एवढेच त्याच्या हातात होते. त्यादृष्टीने त्याने काही उपाय योजणे सुरू केले असावेत.

पावसांपासून संरक्षण करण्यासा आडोशाचा आधार घेण्यास, पावसाची वा वणव्याची चाहूल घेण्यासाठी घ्राणेंद्रियाचा वापर तसेच अन्य प्राण्यांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यास त्याने सुरुवात केली. त्याच धर्तीवर वाघासारख्या शिकारी वा हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करण्याचे मार्ग त्याने शोधले असतील. त्यासाठी त्यांच्या अधिवासाचा शोध घेणे, त्याच्या हालचालींच्या निरीक्षणाच्या आधारे आपले शिकारक्षेत्र निवडणे आदी ज्ञानेंद्रियांधारित उपाय तो योजू लागला असेल. पण यापलिकडेही अज्ञाताचे भय राहतेच.

लेखमालेच्या पहिल्या भागात माणसांनी कोल्ह्यांच्या टोळीला माणसाळवण्याबाबत कॉनरॅड लोरेन्झने लिहिलेल्या काल्पनिक गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात माणसांची टोळी कोल्ह्यांसाठी आपल्या शिकारीतील काही वाटा मागे सोडत जात असते. त्याच धर्तीवर, ‘पोट भरलेल्या वाघापासून हरणालाही भय नसते’ हे ध्यानात आल्यावर माणसाच्या एखाद्या टोळीनेही त्याच्यासाठी शिकारीचा वाटा ठेवण्यास सुरुवात केली असेल. 

याचा उगम कदाचित दोन स्पर्धक टोळ्यांमध्ये क्वचित होणार्‍या देवघेवीतूनही झाला असेल. त्यातून आपल्या शिकारीमध्ये त्याच्याकडून येणारे विघ्न त्यांना टाळणे शक्य झाले असेल. मग बहुतेक उपद्रवी प्राण्यांनाही त्यांच्या सोयीचे असे देणे दिले जाऊ लागले असेल. पुढे नागर मानवाने या विघ्नकर्त्यांना देवत्व दिल्यानंतर त्यांच्या संदर्भात याला ‘नैवेद्या’चे रूप आले असावे. गो. नी. दाण्डेकरांच्या ‘जैत रे जैत’ मध्ये ठाकर नाग्या आपल्या सोबत्यांसोबत शिकारीला जाताना वाघदेवाला, नागदेवाला निवद देऊनच पुढे जातो असा उल्लेख आहे.

पण या टप्प्यावर हा व्यवहार देवघेवीचा होता. या विघ्नकर्त्यांना आपल्या आयुष्यात अडचणी वा धोके निर्माण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही देऊ करणे हा हेतू होता. यात श्रद्धेचा अंशही नव्हता. देवत्वाची संकल्पना अजून दूर होती. पुढे माणसाची बुद्धी नि जगण्याची व्याप्ती वाढली, त्याच्या आयुष्यातील अडचणींची, धोक्यांची संख्याही वाढली तेव्हा त्याला एखाद्या नियंत्रकाची, देवाची कल्पना करावीशी वाटली.

प्राकृतिक ते मानवी

जगातील बहुतेक संस्कृती-परंपरांमधून देवत्वाची कल्पना उत्क्रांत होत गेलेली दिसते. यात देवांची पहिली पिढी ही प्राकृतिक देवांची असते. आपल्याकडे वैदिक देवांमध्ये अग्नी, सूर्य, वरुण, वायू, उषा, आपस वगैरे देवतांची पहिली पिढी होती. टोळीप्रमुखाप्रमाणे या देवांचा राजा म्हणून इंद्र होता. ग्रीकांमध्येही टायटन्स (Titans) ही ग्रीक देवांची पहिली पिढी. यात Oceanus, Coeus, Crius, Hyperion, Iapetus, Cronus हे सहा देव नि Theia, Rhea, Themis, Mnemosyne, Phoebe, आणि Tethys या सहा देवतांचा समावेश होतो. ही सर्व युरेनस आणि गाया या आद्य माता-पित्याची अपत्ये. युरेनस आकाशाचा देव, तर गाया धरित्रीची देवता. Oceanus हा समुद्राचा देव. तो आणि Tethys यांची अपत्ये ही नद्यांचे देव नि देवता...

एकुणात ग्रीक देवांची ही पिढी म्हणजे प्राकृतिक देवांचे मनुष्यीकरण होण्याचा टप्पा आहे. ऑलिम्पियन म्हणून ओळखली जाणारी ग्रीक देवतांची दुसरी पिढी प्राकृतिक संदर्भ सोडून संपूर्णपणे मानवी झालेली आहे. (अलिकडे बर्‍याच गाजलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेमध्ये बरीच पात्रे वचन देताना, शपथ घेताना ‘बाय द ओल्ड गॉड्स अँड द न्यू’ असा उल्लेख करतात. त्याचा संदर्भ इथे आहे. ) आपल्याकडे पुढच्या पिढीमध्ये विष्णू, ब्रह्मा, शिव, लक्ष्मी वगैरे देवांचा उदय झाला. यथावकाश मागील पिढीतील देवांचे नियतकार्य या नव्या पिढीच्या सुपूर्द केले गेले. हे स्थित्यंतर जंगलजीवी माणूस हळूहळू नागरजीवी अथवा स्थिरजीवी होतानाच झाले असावे.

आफ्रिकेतील जंगलवासींमध्ये आजही प्रत्येक टोळीचे एक आराध्य दैवत असते. हे दैवत निसर्गातील एखादा प्राणी, पक्षी वा सजीव असतो. त्यातून त्या त्या टोळीकडून त्या एका प्राण्याची शिकार केली जात नाही, त्याला संरक्षण दिले जाते. यातून त्या प्राण्याचा निर्वंश होणे टळते. विविध प्राण्यांना, पक्ष्यांना वेगवेगळ्या टोळ्यांकडून संरक्षण मिळाल्याने निसर्गाचा तोल राखला जातो. ही खरी संस्कृती म्हणायची! इथून पुढे मानव-समाजाचा जो ‘विकास’ झाला किंवा जी ‘प्रगती’ झाली त्यातून जे रसायन तयार झाले त्यात हा संस्कृतीचा अंश लयाला गेला.

अनागर ते नागर

जोवर सर्व उत्पादन माणूस केवळ शारीरबळ नि कौशल्याआधारे करत होता, तोवर निसर्गातून तो किती घेईल याला मर्यादा होत्या. हाताने होईल तितकेच काम तो करु शकत होता, आणि त्या कामाला आवश्यक तितकेच निसर्गातून काढून आणत होता. आणि माणूस काढून नेईल त्याहून कैकपट अधिक निसर्ग पुन्हा निर्माण करत होता. स्वयंचलित अथवा वेगवान यांत्रिक उत्पादन सुरू झाल्यावर उत्पादनक्षमता अफाट वाढली, त्याला लागणार्‍या कच्च्या मालाची गरज वाढली आणि त्याच्या पूर्ततेसाठी निसर्गाला ओरबाडण्याचा वेगही वाढला. या अफाट वेगवान आयुष्यात माणसाला निसर्गाची माफी मागून, मागणी करुन सामुग्री जमा करण्याची फुरसद आणि इच्छा दोन्ही उरली नाही. आणि त्या विनाशाच्या वेगाने पुनर्भरण करण्याची शक्तीही निसर्गात नव्हती.

वेगवान आणि यांत्रिक उत्पादकतेने समाजात आणखी एक बदल घडवला तो म्हणजे माणूस नागरी आयुष्याकडे– आणि म्हणून निसर्गापासून दूर सरकला. निसर्गापासून दूर वा त्याचा विध्वंस करुन उत्पादनकेंद्रे, व्यवस्थापनकेंद्रे आदींची उभारणी करून त्याभोवती मानवी समाजाची वस्ती आकाराला येऊ लागली. या नागर, पांढरपेशा आयुष्याची नाळ निसर्गातील फारच थोड्या मनुष्येतर सजीवांशी जोडली गेली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील देव-संकल्पनांचा संदर्भही निसटत गेला आणि देवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले. जगण्याशी त्याची नाळ तुटली आणि स्वर्ग-नरक, मृत्यूपूर्व नि पश्चात जीवन, पूर्वजन्माचे ओझे वगैरे संकल्पनांच्या आधारे त्याचा विस्तार होत गेला.

देव-संकल्पना निसर्गापासून दुरावली नि माणसाच्या मनातील तिचा धाकही नाहीसा झाला. निसर्गातील नागाचा नि वाघाचा, नागदेव नि वाघदेव होऊन त्याची पूजा करणे, त्याला मान देणे, त्याच्या वाटेस जाणे टाळणे हा ‘जगा नि जगू द्या’ दृष्टीकोन मागे पडून वर्चस्ववादी वृत्ती वाढली. नागापासून दूर राहण्यापेक्षा त्याला ठार मारण्याचे उपाय सहजपणे योजले जाऊ लागले. वाघनखे गळ्यात घालून शौर्याचा आव आणला जाऊ लागला. औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यातील उत्पादनांसाठी आवश्यक कच्च्या मालासाठी माणूस निसर्गाची अनिर्बंध लांडगेतोड करु लागला.

निसर्ग-मनुष्य संबंधांसंदर्भात विचार केला तर शहरीकरण ही मानवी संस्कृतीमधील सर्वात मोठी घोडचूक होती. निसर्गाशी नाते पूर्ण तुटून गेल्यावर आपल्या विकासाची किंमत फक्त पैशाने मोजली जात नाही याचे भानही हरवले. या दरम्यान माणसाच्या देवांचेही प्राकृतिक बंध तुटले. सूर्य, वायु, नदी, समुद्र यांचे तसंच नागदेव, वाघदेव, यांचे देवत्व लयाला जाऊन सोनेरी मुकुटापासून रेशमी धोतरापर्यंत पेहरावाचे आणि पीळदार संगमरवरी शरीराचे मानवी देव जन्माला आले.

Khandav-van%20Sanhaar.jpg
खांडववन: नागर देव-मानव युतीने प्राकृतिक आयुष्याचा केलेला विध्वंस.

माणसाप्रमाणे हे मनुष्यरूपी देवही निसर्गाचे शत्रू होते. वने जाळून वस्ती करणार्‍या माणसाने तेच गुण देवांनाही बहाल करुन आपल्या कृतीचे समर्थन करण्याची सोय करुन ठेवली. अर्वाचीन काळात आता ती ही आवश्यकता उरलेली नाही. ‘विकास’ नावाच्या अरुपाचा देव सारा विध्वंस आवश्यक मानत पुढे जातो आहे. माणसाच्या नीतिसंस्कारांना दिलेला आधार म्हणून देवता-संकल्पना आता निरुपयोगी ठरते आहे. जंगलवस्तीमधून गावात नि गावांतून नगरात पोहोचलेली ती संकल्पना आता देव्हार्‍यात बंदिस्त झाली आहे. तिला कर्मकांडरूपी भरजरी वस्त्र देऊ केले की त्याबदल्यात तिने माणसाच्या आयुष्यातीले नीतिनियमांच्या विरल्या वस्त्राकडे दुर्लक्ष करावे असे माणसाने तिला बजावून ठेवले आहे.


बळकट केलेला खुंटा

मनुष्यप्राण्याने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी देव ही आदर्श, नियंत्रक आणि कृपाळू संकल्पना निर्माण करून त्याचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करायला सुरुवात केली. हे अस्तित्व केवळ मानण्यावरच अवलंबून असल्याने स्वयंसिद्ध होते. पण मनुष्यप्राण्याचा माणूस होऊ लागला, त्याचे विचार-इंद्रिय विकसित होऊ लागले तसतसे श्रेष्ठत्व हे पुराव्याने, तर्काने सिद्ध करावे लागेल याची त्याला जाणीव झाली. माणसांच्या कुठल्याही टोळीला अन्नासाठी, पाणवठ्यावरील नियंत्रणासाठी अन्य स्पर्धक टोळ्यांशी संघर्ष करावा लागत असे. अन्य प्राण्यांचाही जगण्यासाठी इतर प्राण्यांशी संघर्ष होतच असे. अशा संघर्षरत आयुष्य असण्याच्या काळात श्रेष्ठत्वाची व्याख्या ही सापेक्ष असावी हे ओघाने आलेच.

JesusAndSatan

आपली रेघ मोठी करायची असेल तर शेजारची खोडून लहान करायला हवी, आणि शेजारी अशी रेघ नसेलच तर आपणच एक छोटी रेघ शेजारी ओढून आपली रेघ मोठी असल्याचा भास निर्माण करावा’ हे माणसाला संस्कृतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत झालेलं ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही एखादी व्यक्ती ‘कुणाला तरी हरवून जिंकली’ आहे असं म्हटलं की जमावाच्या तिच्याबाबतचा आदर चटकन वाढतो आणि त्याचे म्हणणे जमाव आस्थेवाईकपणे ऐकतो. आता हे जिंकणे युद्धभूमीवरचे रक्तरंजित युद्ध असो किंवा बौद्धिक वितण्डाच्या स्वरूपातील. 

त्याचबरोबर आजही एखाद्याच्या अवगुणाबद्दल बोललात तर त्याच्या बाजूचे लोक हटकून त्याच्याहून अधिक अवगुणी व्यक्तीला चर्चेत आणून त्याच्या निरपेक्ष मोठेपणाऐवजी, सापेक्ष मोठेपणा तुमच्या गळी उतरवू पाहतो. माणसाने देवांच्या बाबतीतही हीच युक्ती वापरण्यास सुरुवात केली. आपल्या देवाच्या मोठ्या-शेजारी छोटी रेघ ओढून त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली.

पण हा जरा धोक्याचा मुद्दा आहे. हा शत्रू वास्तवातील असेल तर यात त्याचाकडून काही वेळा आपल्या देवालाही पराभवाला सामोरे जावे लागण्याची जाण्याची शक्यता असते. यावर शब्दपंडितांनी एक सुरक्षित उपाय शोधून काढला. त्यांनी या देवांचे, त्याच्या प्रेषितांचे काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याच्यावर आपल्या प्रेषिताने, नेत्याने, देवाने, धर्मासारख्या व्यवस्थेने विजय मिळाल्याच्या कपोलकल्पित कथा प्रसृत करायला सुरुवात केली. अशा विजयकथांतून आपल्या देवाची, नेत्याची, धर्माची ‘विश्वासार्हता’ वाढते आणि जमाव त्याच्या शब्दाला प्रमाण मानून चालण्याची शक्यता कित्येक पट वाढते.

जगात सर्वाधिक प्रसार झालेल्या बिब्लिकल धर्मात सैतान, इब्लिस वगैरे असतात, बौद्ध धर्मात बुद्धाला तत्त्वच्युत करू पाहणारा ‘मार’ असतो, बोधिसत्त्वाचे सत्त्व हरण करू पाहणारा देवदत्त असतो. हिंदू धर्मात असा ‘एकास एक’ सामना नसला– याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मच अनेकेश्वरवादी आहे – तरी ऋषीमुनींचा तपोभंग करणार्‍या मायाविनी अप्सरा असतात, यज्ञसंस्कृतीच्या उपासकांचे यज्ञ उद्ध्वस्त करणारे असुर असतात, क्वचित माणसामध्ये कुणी ‘कली’ शिरतो नि तो असुरवृत्तीने वागू लागतो. थोडक्यात श्रेष्ठत्वाचा मापदंडच मुळी ‘शेजारच्या लहान रेघेहून मोठा’ असा असतो. जगातील बहुतेक सर्व धर्मांमधे देवाच्या जोडीला असा एक अँटि-गॉड असतो. त्याचा रोल, त्याची भूमिका ही या शेजारील छोट्या रेघेसारखी असते.

ही आदिम जाणीव माणूस आजही पुढे घेऊन जातो आहे. राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठेही शेजारी लहान रेघ ओढल्याखेरीज आपली रेघ मोठी सिद्धच करता येत नाही इतकी श्रेष्ठत्वाची व्याख्या खुजी झाली आहे. इतिहास वा साहित्यही याला अपवाद नाही.

अतिमानवी (superhuman) देवत्व

TheAlchymist

प्रथमपासूनच अन्नाची (वा पुढे आर्थिक ) असुरक्षितता, अनारोग्य नि त्यातून येणारी वेदना आणि अखेर मृत्यू या तीन गोष्टींचे भय माणसाच्या मनाला कायम व्यापून राहिलेले असते. त्यामुळे या तीन भयांचे परिमार्जन करण्याच्या दृष्टीने त्याचा आटापिटा चालू असतो. प्राचीन काळापासून सर्वच समाजातील किमयागार(alchemist) शिशापासून किंवा अन्य सहज उपलब्ध असलेल्या धातूपासून सोने, पॅनासिया(Panacea) म्हणजे ‘हर मर्ज की दवा’ आणि मुख्य म्हणजे चिरंजीवित्व देणारे द्रव्य (elixir of immortality) तयार करण्याच्या प्रयत्नात होते. धन, आरोग्य आणि मृत्यु-मुक्ती हे तीन हेतू यामागे होते.

पण केवळ मृत्यूपासून मुक्ती पुरेशी नव्हती. कारण जगण्याच्या धबडग्यामध्ये तो अनेक धोक्यांना, लहान लहान समस्यांना सामोरे जात होता. त्यातून त्याच्या शरीराची झीज होत होती. अनारोग्याची अनेक कारणे आसपास होती. अनारोग्याने भरलेले शरीर आणि चिरंजीवित्व यांचा संयोग मृत्यूहून वेदनादायी असेल हे त्यांनी जाणले असेल. त्यामुळे चिरंजीवित्वासोबतच आरोग्याचा विचारही ते करत होते. काहींना चिरंजीवित्वाचा सुदृढ नि निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य हा व्यावहारिक अर्थच अभिप्रेत होता.

पण अमरत्व देणारे द्रव्य विकसित करण्यासाठी आधी ‘असे द्रव्य अस्तित्वात आहे का?’, ‘असू शकेल का?’ ‘निर्माण करता येईल का?’ ‘अमरत्व साध्य करणे शक्य आहे का?’ या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळण्याची गरज होती. तरच पुढच्या धडपडींमागे पुरेसे मानसिक नि आर्थिक बळ उभे करणे शक्य होते. यासाठी आधी कुठेतरी असे अमरत्व अस्तित्वात आहे अशी मानवाने कल्पना सुरू केली. कल्पनाविस्ताराची मोठी कुवत असलेल्या माणसांनी मग पुराणकथांना जन्म दिला.

वास्तव आयुष्यात दिसणारे आकाशातील सूर्य, तेथूनच पडणारा पाऊस, तो घेऊन येणारे पाणी हे जसे चिरंजीव आहेत तसेच दोन हात, दोन पाय नि डोके असणारे मानवसदृश जीव कुठेतरी आहेत, नि ते चिरंजीव आहेत ही कल्पना देवांना नि पारलौकिकाला जन्म देऊन गेली. यामुळे चिरंजीवित्वाला कल्पित का होईना आधार मिळाला नि त्याचा पाठपुरावा सुकर झाला.

सुरुवातीच्या काळात प्राकृतिक घटकांना, काही महानायकांना (उदा. राम, कृष्ण, अनेक ग्रीक देवता) दिले गेलेले देवत्व मागे पडून अध्याहृत, कल्पनानिर्मित देवांनी त्यांची जागा घेतल्यावर त्यांच्या गुणांमध्येही बदल होत गेले. त्यांच्यातला मानवी अंश अस्तंगत होऊन ते अधिकाधिक पारलौकिकाकडे ढकलले गेले. ही देव-संकल्पना प्राकृतिक देवता वा त्यांच्या पुढच्या पिढीच्या देव-संकल्पनेहून वेगळी होती. आता अतिमानवी देवतांची सद्दी सुरू झाली होती. यातूनच पुढे सर्वशक्तिमान, सर्वकल्याणकारी अशा एका परमेश्वराची संकल्पना बिब्लिकल धर्मांतून उदयाला आली.

आता आधीच्या पिढीतले मानवी देव-देवता या नव्या सर्वव्यापी परमेश्वराचे अवतार अथवा अंशरूप अस्तित्व म्हणून मानल्या जाऊ लागल्या. त्यांच्यामध्ये असणार्‍या मानवी गुणांचा हळू हळू लोप होत गेला आणि तेही सर्वगुणसंपन्न असल्याचे ठसवले जाऊ लागले. इंद्रादी देवांची सद्दी हळूहळू संपत आल्यानंतर पुढे आलेल्या शिव, विष्णू वगैरे वैदिकोत्तर देवांच्या पुढच्या पिढीतील आपले देव सर्वस्वी दुर्गुणविरहित असल्याचा दुराग्रह आपण धरू लागलो आहोत.

(पूर्वार्ध समाप्त)

- oOo -

    पुढील भाग >> > जम्पकट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)


हे वाचले का?