मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ८ : उपसंहार

जंगलवाटांवरचे कवडसे - ७ : लाकूडतोड्याची साक्ष << मागील भाग
---

"या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?" हा तिसर्‍या माणसाने विचारलेला प्रश्न हा चित्रपटाचा गाभा आहे. मुद्दा आहे तो प्रत्येक साक्ष देणार्‍याची विश्वासार्हता निश्चित करण्याचा नि त्या आधारे प्रत्येकाच्या साक्षीतील सत्यांश शोधून त्याच्या आधारे निवाडा करण्याचा. निवाड्यासाठी आधी कळीचे प्रश्न निश्चित करावे लागतील नि साक्षींच्या, अन्वेषणाच्या आधारे त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. ताजोमारूने स्त्रीवर केलेला अत्याचार वादातीत आहे. जंगलात त्यावेळी उपस्थित असलेल्या तीनही व्यक्तींनी त्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्याबाबत कायदेशीरदृष्ट्या ताजोमारू दोषी आहेच. नैतिकदृष्ट्या किती दोषी आहे हे मात्र सापेक्ष आहे. ताजोमारू तसेच सामुराईच्या साक्षीनुसार ती स्त्री ताजोमारूला वश झालेली आहे तर खुद्द स्त्रीने त्याबाबत मौन बाळगले आहे. परंतु कळीचा मुद्दा आहे तो सामुराईच्या मृत्यूचा किंवा हत्येचा. इथे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे ’त्याचा मृत्यू कोणत्या हत्याराने झाला” नि दुसरा प्रश्न ’ते हत्यार चालवून त्याचा बळी घेणारा कोण?’

ThisIsHell
हे जग हा एक नरकच आहे.

पहिलाच प्रश्न आपल्याला लेखमालेच्या पहिल्या भागात उल्लेख केलेल्या अन्वेषण-निकषांपाशी नेतो. कथेतील नि चित्रपटातील न्यायासनासमोर तीन साक्षी झाल्या त्यातील दोघांनी - सामुराई नि त्याची स्त्री- यांनी सामुराईचा मृत्यू खंजिराने झाल्याचा उल्लेख केलेला आहे, तर ताजोमारू त्याची हत्या आपण तलवारीने केल्याचे सांगतो. आता दोन विरुद्ध एक असा निव्वळ बहुमताच्या न्यायाने हत्या खंजिराने झाल्याचा निष्कर्ष काढू शकतो काय? या तीन साक्षींच्या आधारे जरी निर्णय केला तरी तो खंजीर त्या घटनास्थळी कुठेही सापडलेला नाही हे सत्य नाकारता येत नाही. (पोलिस नि लाकूडतोड्याची न्यायासनासमोरची साक्ष याला दुजोरा देते.) शिवाय बहुमताच्या बाजूचे दोघे पती-पत्नी आहेत हे विसरता कामा नये. या नात्यामुळे त्यांच्यात सामायिक असा स्वार्थ असण्याची नि त्याला अनुसरून त्यांनी एक बाजू घेतल्याची शक्यताही ध्यानात घ्यायला हवी. आणखी गोंधळ तेव्हा वाढतो जेव्हा लाकूडतोड्या आपली दुसरी जबानी -राशोमोन द्वारावर देतो- ज्यात तो ताजोमारूने ती हत्या केल्याचा नि तलवारीने केल्याचा उल्लेख करतो. आता हा नवा पुरावा ध्यानात घ्यायचा तर दोन-दोन अशी बरोबरी होऊन गुन्ह्याचे हत्यार नक्की कुठले हा प्रश्न अनिर्णित राहतो.

पण बहुमत हाच अन्वेषणाचा एकमेव निकष नव्हे. एक पर्याय असा असू शकतो की सरळ सामुराईच्या देहावरील जखम पहावी नि ती तलवारीने झाली की खंजिराने याचा तज्ञांच्या सहाय्याने निर्णय घ्यावा. पण इथेही एक मेख आहे. ताजोमारूने सामुराईची हत्या केली असे सांगणार्‍या दोन्ही साक्षी - ताजोमारू आणि लाकूड्तोड्याची दुसरी जबानी - जेव्हा हा हत्येचा प्रसंग आपल्याला दाखवतात तेव्हा - आधीच नोंदवून ठेवल्याप्रमाणे - ताजोमारूने तलवारीने पारंपारिक पद्धतीने भोसकून त्याची हत्या न करता तलवार ’फेकून मारण्याच्या’ पद्धतीने केली आहे. अशा प्रकाराने झालेला जखम नि एखाद्या खंजिरासारख्या हत्याराने झालेली जखम एकाच प्रकारची असण्याचा संभव आहे. तेव्हा हा ही पर्याय निर्णायक ठरला नसल्याची शक्यता - जरी चित्रपटात याचा उल्लेख नसला तरी - आहे.

तिसरा पर्याय राहतो तो साक्ष देणार्‍याची विश्वासार्हता नि घटनेतील त्याचा सहभाग अथवा भूमिका. या निकषानुसार लाकूडतोड्या हा पूर्णपणे त्रयस्थ असल्याने त्याची साक्ष अधिक विश्वासार्ह मानता येईल. त्याचा कोणताही स्वार्थ गुन्ह्याच्या घटनेत गुंतलेला नाही त्यामुळे तो मूळ घटना यथातथ्य सांगत असावा असे गृहित धरले तर ताजोमारूच गुन्हेगार ठरतो नि हत्या तलवारीने झाल्याचाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो नि सारा गुंता सुटतो. पण घटनेचा साक्षीदार असलेली व्यक्ती खरंच त्रयस्थ राहू शकते? की हे ही एक गृहितकच? समजा तसे मानलेच तर मृतात्मे खोटे बोलत नाही हे गृहितक - भिक्षू तर नक्कीच हे गृहित धरणारा आहे - नाकारले जाते. याच्या उलट भिक्षूच्या या गृहितकाधारे निर्णय घेतला तर कोणताही स्वार्थ न गुंतलेला लाकूडतोड्या खोटं का बोलेल याचा उलगडा व्हायला हवा. एवढेच नव्हे तर या दोनही दृष्टिकोनातून पाहताना सामुराई नि त्याची स्त्री यांनी दिलेल्या साक्षींमधील विसंगत तपशील निर्णायकरित्या खोटा ठरवायला हवा, पण तो कसा ठरवणार? थोडक्यात या नव्या माहितीनेही हा सारा गुंता सहजासहजी निस्तरला जात नाहीच.

राशोमोन द्वारावरील तिघांचे बोलणे आता संपले आहे. त्या तिसर्‍या माणसाचे कपडेही वाळलेत. एक एक करून शेकोटीची लाकडे विझवण्यासाठी पावसात फेकू लागतो. भिक्षू आणि लाकूडतोड्या अजूनही दिङ्मूढ अवस्थेत उभे आहेत. त्या माणसाच्या मनात मात्र कोणताही संभ्रम नाही, कारण त्याला काही समजावून घेण्याची इच्छाही नाही.

StealingKimono
अर्भकाला गुंडाळलेला किमोनो हिरावून घेताना तो माणूस.

अचानक दाराच्या वरच्या बाजूने एका अर्भकाचे रडणे ऐकू येते. तिघेही चपापतात. सर्वप्रथम तो माणूस उठतो नि आतल्या बाजूला जातो. काही क्षण जातात. अचानक लाकूडतोड्या नि भिक्षू चमकून एकमेकाकडे पाहतात नि आत धाव घेतात. अपेक्षेप्रमाणे तो माणूस त्या अर्भकाला बाजूला काढून त्याला लपेटणारा किमोनो काढून घेत असतो. लाकूडतोड्या त्या माणसाला दूर ढकलतो नि भिक्षू त्या मुलाला उचलून घेतो.

किमोनो हाताभोवती नीट गुंडाळून तो माणूस लाकूडतोड्याला विचारतो
"यात तुझा काय संबंध?"
"हे भयंकर आहे." लाकूडतोड्या ओरडतो.
"कुणीतरी हा किमोनो नेलाच असता, मी घेतला तर काय बिघडलं?" माणूस प्रतिवाद करतो.
"पण हे पाप आहे." लाकूडतोड्या वाद घालू पाहतो.
"पाप? आणि या पोराच्या आईबापांचे काय? ते पापी नाहीत? स्वतःच्या वासनेसाठी त्यांनी याला जन्म दिला नि उकिरड्यावर असे फेकून दिले. ते पापी आहेत."
"नाही तू चुकीचे बोलतो आहेस. त्या मुलाच्या गळ्यातील ताईत पहा. त्याच्या आईबापांनी जगातीला सार्‍या दुष्टाव्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठीच तो त्याच्या गळ्यात बांधलेला आहे. तो किमोनोदेखील वार्‍यापावसापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून त्याच्याभोवती गुंडाळला होता. आपले मूल असे सोडून देताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार कर जरा."
"इतरांच्या भावनांचा विचार करायला मला वेळ नाही." तो माणूस गुरकावतो.
"तू स्वार्थी आहेस." लाकूडतोड्या चिडून म्हणतो.
"मग त्यात वाईट काय आहे?' माणूस ताडकन उत्तर देतो. "या जगात माणसापेक्षा कुत्र्याचे जिणे अधिक सुसह्य आहे. तुम्ही स्वार्थी नसाल तर तुम्ही जगू शकत नाही."

लाकूडतोड्याचा तर्क आता संपला आहे. क्षुब्ध होऊन तो म्हणतो "या जगात सगळेच स्वार्थी नि अप्रामाणिक आहेत, तो डाकू, ती स्त्री, तो तिचा पती आणि तू सुद्धा" "आणि तू? तुझे काय? तू स्वार्थी नि अप्रामाणिक नाहीस?' तो माणूस उलट प्रश्न करतो. "तू कोर्टाला फसवू शकतोस, मला नाही."

YouAreDishonestToo
आणि तू? तू स्वार्थी नि अप्रामाणिक नाहीस?.

या शाब्दिक वाराने त्याच्याशी झटापट करत किमोनो काढून घेऊ पाहणारा लाकूडतोड्या स्तब्ध होतो. त्याची नजर खाली झुकते. तो दोन पावले मागे सरकतो. आपला वार वर्मी लागला आहे हे माणूस ओळखतो. लाकूडतोड्याजवळ जातो नि विचारतो "मला सांग त्या खंजीराचं तू काय केलंस? तो अतिशय मूल्यवान होता ना, त्यावर मोती जडवलेले होते म्हणे." लाकूडतोड्याच्या तोंडून शब्द फुटत नाही. माणूस पुन्हा पुन्हा त्याच्यावर त्या प्रश्नाचा भडिमार करीत राहतो. अखेर खदाखदा हसत म्हणतो "एक चोर दुसर्‍याला चोर म्हणतो आहे. हे स्वार्थी वागणे झाले, नाही का?" असे म्हणत तो त्याला एक जोरदार थप्पड मारतो नि चालता होतो.

लाकूडतोड्याने सामुराईचा मृत्यू खंजिराने नव्हे तर तलवारीने झाला हे सांगण्याची उबळ दाबली असती तर त्याचे त्या घटनेशी असलेला संबंध उघडकीस आला नसता. पण ही अस्थानी सत्यनिष्ठ वृत्तीच त्याचा घात करते. त्या अर्थी तो लाकूडतोड्या अगदी सामान्य माणूस आहे. सामुराईच्या मृत्यूनंतर तिथे पडलेल्या तलवारी नि खंजीर फुकटात पळवण्याची वृत्ती त्याच्यात आहे तसेच आपल्या योग्य साक्षीने सत्य उघड झाले असते ते आपण टाळले हा अपराधगंडही त्याचा पिच्छा सोडत नाही. ’मला काय त्याचे?’ किंवा ’माझ्या सत्य सांगण्याने तो जिवंत थोडीच होणार आहे?’ असे म्हणण्याइतके निर्ढावलेपण त्याच्यात निर्माण झालेले नाही. लाकूडतोड्याची ही दुसरी साक्ष - जी कोर्टात नव्हे तर राशोमोन गेटवर भिक्षू नि त्या तिसर्‍या माणसासमोर दिली जाते - त्रयस्थाची म्हणून अधिक विश्वासार्ह असे म्हणता येईल का? तर हे गृहितकदेखील चुकीचे असू शकते हे कुरोसावा दाखवून देतो. प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसलेला असा एखादा दुय्यम असा स्वार्थ त्या त्रयस्थाची भूमिका प्रदूषित करू शकतो नि म्हणून साक्षीदाराची विश्वासार्हता हा स्वतंत्रपणे प्रस्थापित करण्याचा मुद्दा आहे अधोरेखित करतो.

IcanAccomodateOneMore
'सहा मुले आहेत मला, आणखी एक जड नाही'

या सार्‍या संवादाला साक्षी असणारा तो भिक्षू हतबुद्ध झाला आहे. इतकावेळ ज्याच्याशी संवाद साधला, ज्याला समानधर्मा समजलो त्याचेही पाय अखेर मातीचेच निघाले हे पाहून तो सुन्न झालाय. बराच वेळ दोघे एकमेकाशी न बोलता स्तब्ध उभे आहेत. पाऊस आता थांबलाय. भिक्षूच्या हातातील ते मूल रडू लागतं. या अशा जगात त्याच्यावर आलेल्या या अनाहुत जबाबदारीचे काय कराचे हे त्याला समजत नाही. एवढ्यात लाकूडतोड्या पुढे होतो नि त्याच्याकडून ते मूल घेऊ पाहतो. इतका वेळ माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे असे निक्षून सांगणार्‍या भिक्षूचा आता माणुसकीवरील विश्वास उडाला असावा. त्याला लाकूडतोड्याचा हेतू लक्षात येत नाही. त्याला वाटते आता जे काही लहानसे धडुते त्या पोराला गुंडाळले आहे ते ही तो हिरावून घेऊ पाहतो आहे. आपल्यावर त्याने दाखवलेल्या अविश्वासाने लाकूडतोड्या विकल होतो. करूण आवाजात तो सांगतो "मला सहा मुले आहेत हो. अजून एक जड नाही मला."

भिक्षूला आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप होतो. लाकूडतोड्याची क्षमा मागून तो ते मूल त्याच्याकडे सुपूर्द करतो आणि म्हणतो "मला वाटतं, आता मी माणसावर श्रद्धा ठेवू शकेन." लाकूडतोड्या ते मूल घेतो, भिक्षूला अभिवादन करतो (इतका वेळ कळवळून रडणारं ते मूल लाकूडतोड्याचा हाती येताच शांत होतं) नि द्वाराच्या पलिकडे निघून जातो. इथे तो माणूस प्रेक्षकांच्या दिशेने अर्थात द्वाराच्या अलिकडच्या बाजूने निघून गेला होता हा एक तपशील जाताजात नोंदवून ठेवायला हवा. दोघे परस्परविरुद्ध दिशेने गेले आहेत हे महत्त्वाचे. कॅमेरा फिरवून आता द्वाराच्या मागच्या बाजूला गेलाय. लाकूडतोड्या पायरी उतरून खाली येतो नि चालू लागतो. आता त्याच्या चेहर्‍यावर समाधान आहे ते हाती काही निर्मळ, अनघड असे काही असल्याचे. ज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आपण ती नक्कीच पार पाडू असा विश्वासही त्याच्या चेहर्‍यावर पसरलेला दिसतो.

TheBeginning

राशोमोनचा मुख्य सूत्र हे की एखाद्या व्यक्तीचा अनुभव हे त्याच्यापुरते सत्य असते, जे अर्थातच त्याच्या जाणीवांच्या मर्यादेनुसार, दृष्टिकोनानुसार वेगवेगळे असू शकते. आता हा अनुभव जेव्हा निवेदनस्वरूपात इतरांसमोर येतो तेव्हा तो यथातथ्य येईलच असेही नाही. कारण इथे अपरिहार्यपणे आत्मसमर्थनाचा, स्वत:ला झुकते माप देण्याचा प्रयत्न होतो. अगदी ज्याचा प्रत्यक्ष स्वार्थ ज्यात गुंतलेला नाही अशा व्यक्तीकडूनही प्रामाणिक सत्यकथन - त्याच्या जाणीवेतले का होईना - होईलच याची खात्री देता येत नाही.

अन्वय नि उहापोह याच्या पलिकडे प्रश्न उरतो तो त्यातून निर्माण झालेल्या भविष्याचा, त्या बालकाच्या भवितव्याचा. मुलाचे रक्षण/पोषण हे एकप्रकारे ढासळत्या नीतीमूल्यांच्या जगात निर्मळतेचे, पूर्वग्रहरहित विचारांचे संगोपन करणे आहे. भविष्याचे संरक्षण करणे आहे. आयुष्यभर कृतिशून्य चांगुलपणा जपत आलेल्या भिक्षूपेक्षा स्खलनशील पण चांगुलपणावरचा, मूल्यांवरचा विश्वास टिकवून धरणार्‍या लाकूडतोड्याच्या हातीच माणसाचे भविष्य सुरक्षित राहू शकते.

चित्रपटाची सुरुवात भिक्षूच्या माणसावर विश्वास ठेवण्याबाबत साशंकता व्यक्त करून होते तर शेवट या सामान्य लाकूडतोड्याने भविष्याबद्दल भिक्षूला आश्वस्त करण्याने होते. जीएंच्या ’माणसे: आरभाट नि चिल्लर’ या पुस्तकाचा शेवट " 'समजत नाही, समजत नाही’ हेच सार्‍या बाबतचे अखेरचे शब्द असतील? ते देखील समजत नाही." या वाक्याने होतो. कुरोसावाचा राशोमोन पाहिल्यावर असेच काहीसे मनात येते. फारसे समजले नाही पण थोडीफार उमज पडली तरी खूप झाले असे म्हणावे लागेल.

उपसंहार:
राशोमोनला परदेशात बरेच नावाजले गेल्यानंतर बर्‍याच काळानंतर तो तेथील दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आला. चित्रपटापूर्वी त्या चित्रपटाच्या निर्मात्या 'डेई' कंपनीच्या अध्यक्षांची एक मुलाखत दाखवण्यात आली. याच माणसाने राशोमोन प्रथम प्रकाशित झाल्यावर त्यावर 'अर्थशून्य' असल्याची कडक टीका केली होती, कंपनीतील ज्या अधिकार्‍यांनी त्या चित्रपटाला मदत केली त्यांची पदावनती केली होती. त्या मुलाखतीत मात्र चित्रपटाच्या यशाचे सारे श्रेय त्याने स्वतःकडे घेतले. चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच कॅमेरा सूर्याकडे रोखण्यात आला याचा प्रौढीने उल्लेख केला. फक्त तो कॅमेरा लावणारा नि त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणारा दिग्दर्शक यांची नावे मात्र सांगण्यास सोयीस्करपणे विसरला.

राशोमोनने जे सांगण्याचा प्रयत्न केला त्या अंशत: सत्याचा पडताळा खुद्द त्याच्या दिग्दर्शकाच्या संदर्भातच सामोरा यावा हे चित्रपटाचे आत्मप्रतारक सामर्थ्य म्हणावे का?

(समाप्त)

१. ही माहिती "गर्द रानात भर दुपारी (ले. विजय पाडळकर)" या पुस्तकातून साभार.


हे वाचले का?

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ७ : लाकूडतोड्याची साक्ष

जंगलवाटांवरचे कवडसे - ६ : सामुराईच्या आत्म्याची साक्ष << मागील भाग
---

न्यायालयातील साक्षींचा तपशील तिसर्‍या माणसाला सांगून संपलेला आहे. राशोमोन द्वारावर लाकूडतोड्या अस्वस्थपणे फेर्‍या घालतो आहे. भिक्षू नि तो माणूस खाली बसून त्याच्याकडे पाहत आहेत. लाकूडतोड्या अस्वस्थपणे द्वाराच्या आतल्या बाजूला चालत जातो, अचानक वळतो नि म्हणतो "हे खोटं आहे. तिथे खंजीर नव्हताच. त्याची हत्या तलवारीने झाली."

TellMeWhatUKnow

तो माणूस तुच्छपणे हसून 'आता हे अपेक्षितच होते' अशा नजरेने भिक्षूकडे पाहतो. लाकूडतोड्या हलके हलके पावले टाकत द्वाराच्या मागच्या बाजूला जातो नि तिथे बैठक मारतो नि मान खाली घालून बसतो. शेकोटीजवळ बसलेला तो माणूस उठतो नि त्याच्या जवळ जातो त्याच्या शेजारी बसतो नि म्हणतो "आता हे सारे मनोरंजक होते आहे. कदाचित तू स्वतः काय घडले ते पाहिले आहेस, हो ना?" लाकूडतोड्या हलकेच मान डोलावतो. "मग तसे तू कोर्टात का सांगितले नाहीस?" तिसरा माणूस विचारतो. "कारण मला यात फार गुंतायचे नव्हते." लाकूडतोड्या ताड्कन उत्तर देतो. "ठीक आहे, पण ते तू इथं तर बोलू शकतोस. चल सांग मला. कदाचित तुझी गोष्ट अधिक मनोरंजक असेल." तो माणूस त्याला म्हणतो.

भिक्षू अधिकच अस्वस्थ होतो. त्याच्या विश्वासालाच तडा जाणारे काहीतरी लाकूडतोड्या बोलणार याचा अंदाज त्याला आलेला आहे. "बस्स. आता याहून अधिक भयानक कथा नकोत." तो विरोध करतो. "पण हे आता रोजचेच आहे." त्या माणसातला संशयात्मा/ निराशावादी पुन्हा बोलतो. "मी तर ऐकले आहे की या द्वारावर राहणारा सैतान देखील माणसातील हे क्रौर्य पाहून इथून निघून गेला आहे." मृतात्म्याची कथा सुरू होण्यापूर्वी पडणार्‍या पावसाने निर्माण झालेल्या एका ओहळाला प्रतिरोध करणारा एक सैतानी चेहरा असलेला दगड आपण पाहिला होता, त्याचे औचित्य इथे समजून येते. भिक्षू हताश होऊन गप्प बसतो.

लाकूडतोड्याची जंगलात पाहिलेला प्रसंग उलगडू लागतो. "त्या झुड्पावर मला ती हॅट मिळाली. मी तिथून पुढे गेलो. सुमार वीस पावलांवर मला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. एका झुडपाआडून मला एका माणसांला बांधून ठेवलेले मला दिसले. जवळच ती स्त्री नि ताजोमारू होते." "म्हणजे तुला मृतदेह दिसला हे तू खोट बोललास तर" माणूस मधेच बोलतो. "मला त्या लफड्यात गुंतायचे नव्हते." लाकूडतोड्या पुन्हा उसळून म्हणतो.

MarryMe

ताजोमारू गुडघ्यावर बसून त्या स्त्रीची विनवणी करताना दिसतो. तो तिची माफी मागत असतो. तो म्हणतो "मला आजवर जे जे अयोग्य असे ते करावेसे वाटले ते मी बिनदिक्कत केले. त्यामुळे माझ्या मनात त्याबद्दल कोणतीही अपराधभावना कधी आली नाही. पण आज वेगळे घडते आहे. मी तुझा भोग घेतला आहे. पण का कुणास ठाऊक मला आज तुझ्याकडून अधिक काही हवेसे वाटते आहे. मी तुझ्याकडे माझी पत्नी होण्याची भीक मागतो आहे." त्याला उत्तर न देता जमिनीवर पडून ती रडतेच आहे.

"खुद्द ताजोमारू तुझ्या हातापाया पडून विनंती करतो आहे. तुझी इच्छा असेल तर मी दरोडे, लुटालूट बंद करेन, डाकू म्हणून जगणे थांबवेन. सुदैवाने मी आजपर्यंत इतके कमावले आहे की तुझे उरलेले आयुष्य सुखात जाईल. आणि माझा पापाचा पैसा तुला नको असेल तर मी कष्ट करेन नि पुन्हा पैसा कमावेन. तू माझ्याबरोबर आलीस तर मी तुझ्यासाठी काहीही करेन." ताजोमारू आपल्याशी लग्न करावे असे पुन्हा पुन्हा विनवित राहतो. ती बधत नाही असे दिसताच अखेर "तू जर माझे ऐकले नाहीस तर तुला ठार मारण्याखेरीज मला गत्यंतर नाही" अशी धमकीही देतो. पण काहीही उत्तर न देता ती मुसमुसत पडून राहते.

अखेर एका निर्धाराने ती उठते नि म्हणते "हे शक्य नाही. एक स्त्री याचा निर्णय करू शकत नाही." सामाजिक संकेतानुसार पुरूषांनीच तिच्याबाबत निर्णय घेतला पाहिजे याची जाणीव तिला आहे. ती उठते, दूरवर जमिनीत रुतलेला खंजीर काढून घेते नि धावत जाऊन आपल्या पतीचा दोर कापून त्याला मोकळे करते. एकप्रकारे तुम्ही दोघांनी मिळून आता याचा निर्णय करावा असे सुचवते. ताजोमारू तिचे हे आव्हान स्वीकारतो नि तलवार उपसतो. पण सामुराई मात्र घाईघाईने हाताने खूण करून ताजोमारूला थांबवतो. "थांब. या 'असल्या' स्त्रीसाठी माझे आयुष्य पणायला लावायची माझी इच्छा नाही."

GoKillUrSelf

त्याला बंधमुक्त करण्यासाठी हाती घेतलेला खंजीर अजूनही हातातच असलेली ती स्त्री अजूनही मुसमुसत असते. आपल्या पतीचे ते शब्द ऐकून ती अचानक स्तब्ध होते. अतिशय तीव्र नजरेने ती त्याच्याकडे पाहते. ताजोमारूदेखील आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहतो.

सामुराई दोन पावले पुढे येतो नि आव्हानात्मक स्वरात तिला म्हणतो "तू दोन पुरुषांशी रत झालेली स्त्री आहेस. आपले आयुष्य संपवून टाकत नाहीस तू?" पुढे ताजोमारूकडे वळून तो म्हणतो "माझे आता या निर्लज्ज वेसवेशी काही देणेघेणे नाही. तू तिला घेऊन जाऊ शकतोस. तिची किंमत आता मला माझ्या घोड्याइतकीही नाही." हे ऐकून ती स्त्री आशेने ताजोमारूकडे वळते, त्याची प्रतिक्रिया अजमावू पाहते. त्याच्या नजरेत तिच्याबद्दल थोडी कणव दिसते.

पण कदाचित सामुराईच्या युक्तिवादाचा परिणाम म्हणा किंवा रतिसुखाचा आवेग ओसरून वास्तवाची जाणीव झाल्याने म्हणा, आता त्यालाही तिच्यामधे रस उरलेला नाही. तो तिथून निघून जाऊ पाहतो.

लाकूडतोड्याच्या नि सामुराईच्या जबानीत बरेचसे साम्य आहे. ताजोमारूने त्या स्त्रीला लग्नाची मागणी घालण्यापर्यंत दोघांचे वर्णन सारखेच आहे. पण तिची त्यावरील प्रतिक्रिया मात्र दोघांनी भिन्न प्रकारे नोंदवली आहे. ताजोमारूने दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावाबाबत तिची प्रतिक्रिया दोघांच्या सांगण्यानुसार वेगळी आहे. सामुराई सांगतो ’ती त्याला म्हणत होती, मला कुठेही घेऊन चल.’ म्हणजेच ती ताजोमारूला पूर्णपणे वश झाली असल्याचा दावा तो करतो आहे. याउलट लाकूडतोड्याच्या जबानीत ती म्हणते की "हे मी कसे ठरवू?". नीतिनियमांनी बद्ध असलेल्या स्त्रीच्या बाबत हा विचार अधिक विश्वासार्ह वाटतो. आधीच्या स्त्रीच्या वाटचालीवरून ती स्वतःला ज्या व्यवस्थेत बसवते आहे त्यात याबाबतचा निर्णय पुरुषानेच घ्यायचा असतो. सबब त्या दोन पुरूषांनी तो निर्णय घ्यायला हवा असे ती सुचवते.

इथे लाकूडतोड्याच्या म्हणण्यानुसार सामुराई लढण्याचे नाकारतो. हे एकप्रकारे स्वतःचे सामुराईपण नाकारणे आहे. जर हे खरे असेल तर सामुराईच्या दृष्टीने हे लांच्छनास्पद आहे नि म्हणूनच तो हे कबूल करू शकत नाही नि त्याच्या साक्षीमधे त्याला स्त्रीवरच दोषारोप करून स्वत:ची पत जपण्याचा प्रयत्न करावा लागतो. इथे सामुराई म्हणतो "मी स्त्री पेक्षा घोड्याला वाचवेन वा त्याच्यावर अधिक विश्वास ठेवेन." इथे पुन्हा एकदा सुरवातीलाच आपण पाहिलेल्या ’बांधून ठेवलेला घोडा नि स्त्री’ चे चित्र डोळ्यासमोर येते. सामुराई लढण्यापासून स्वत:ला वाचवू पाहतो तर तो जिवंत असेपर्यंत ती ताजोमारूची होऊ शकत नाही हा सामाजिक संकेत ती मोडू शकत नाही नि म्हणूनच ताजोमारूच्या प्रस्तावाला ती रुकारही देऊ शकत नाही. त्यातच ’असल्या भेकडाला मी एकतर्फी मारणार नाही’ तसेच नि ’स्वत:च्या पतीला ठार मारावे असे म्हणणारी स्त्री’ आपल्याला नकोच अशी भूमिका आता ताजोमारू घेतो आहे.

थोडक्यात सांगायचे तर ती स्त्री आता दोन्ही पुरूषांकडून धुडकावली गेलेली आहे नि त्यामुळे नीतिनियमांनी करकचून बांधलेल्या समाजात त्या स्त्रीला आता काहीही भवितव्य नाही. सामाजिक नियमांनी मालकी हक्क प्रस्थापित केलेला पती नि बळजोरीने हक्क दाखवणारा ताजोमारू या दोघांनाही त्या स्त्रीबाबत कोणतीही अभिलाषा उरलेली नाही. जिची अब्रू आपण वाचवू शकलो नाही ती आपल्या नामर्दपणाची आठवण करून देणारी ती स्त्री आता पतीला अजिबात आपल्या आसपास नको आहे. याउलट, मुळातच स्वच्छंद आयुष्य जगायची सवय असलेल्या ताजोमारूला संसारसुखाची वाटलेली क्षणिक ओढही आता विरून गेली आहे. त्यामुळे या दोन्ही पुरुषांच्या दृष्टीने आता ही स्त्री म्हणजे एक लोढणे झाले आहे.

निघून जाऊ पाहणार्‍या ताजोमारूला ती स्त्री अडवू पाहते. (इथे कॅमेरा ताजोमारूच्या दोन पायातून त्याच्यासमोर पडलेल्या त्या स्त्रीकडे पाहतो आहे, पार्श्वभूमीवर तो सामुराई.) ताजोमारूनेही तिला धि:कारल्याने उसने बळ आणून सामुराई तिला धमकावू पाहतो. तिच्या रडण्याभेकण्याचा काहीही उपयोग नाही असे सांगतो. पण ताजोमारू त्याला तसे न करण्याबद्दल सांगतो. तो म्हणतो 'स्त्रिया जात्याच दुबळ्या असतात." हे ऐकून ती उसळते.

Challenge

"खरे दुबळे तर तुम्ही आहात." ती आपल्या पतीकडे वळून ती म्हणते. "तू माझा पती आहेस ना, मग तुझ्या पत्नीची अब्रू लुटणार्‍या या नराधमाला तू का ठार मारत नाहीस? त्याला ठार मार नि मग मला सांग माझे आयुष्य संपवून टाकायला. ही खरी मर्दानगी म्हणेन मी." ताजोमारूकडे वळून ती म्हणते "तूही खरा मर्द नाहीसच. तू ताजोमारू आहेस हे ऐकून मी रडायचे थांबले. या दुबळ्या नि दिखाऊ जगण्याचा मला कंटाळा आलेला होता. यातून ताजोमारू मला बाहेर काढेल असं मला वाटलं. त्याने जर मला यातून वाचवलं तर त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं मी स्वत:शीच ठरवलं होतं." असं म्हणून ती त्याच्या तोंडावर थुंकते. थोडी हिस्टेरिक होऊन खदाखदा हसत सुटते. 'पण तू ही माझ्या पतीसारखाच क्षुद्र माणूस आहेस." तिच्या या हल्ल्याने ताजोमारू गांगरलेला. 'लक्षात ठेव. स्त्री त्याच्यावरच प्रेम करते जो तिच्यावर जीव तोडून प्रेम करतो. पुरूषाने आपली स्त्री तलवारीच्या धारेच्या बळावर जिंकून घ्यायला हवी. तुम्ही नेभळट कसले पुरुष,"

तिच्या या निर्भर्त्सनेने ते दोघेही पेटून उठतात नि ’नको असलेल्या स्त्री’ साठी एकमेकांशी लढू लागतात. आता ही जी लढाई होते ती ताजोमारूच्या साक्षीमधील लढाई पेक्षा अगदी वेगळी आहे. इथे दोघांचेही लढणे सफाईदार नाही. एकमेकांवर हल्ला करताना ते अडखळून पडतात, झुडपात अडकतात, समोर न पाहता आंधळेपणाने वार करतात. ताजोमारू सामुराईवर चालून जाताना कापतो आहे, त्याच्या हातातील तलवार थरथरते आहे. सामुराईची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकमेकांसमोर येऊन ते वार करणार इतक्यात ती स्त्री घाबरून किंचाळते, ते ऐकून दोघेही सैरावैरा पळत सुटतात. एकदा ताजोमारू खाली कोसळतो नि त्याची तलवार हातून निसटते नि जमिनीत रुतते. अनेक प्रयत्नांनंतरही त्याला ती हस्तगत करता येत नाही. सामुराईचे वार चुकवत तो त्या ठिकाणाहून दूरही जातो.तरीही सामुराईला या संधीचा फायदा उठवता येत नाही. तो फक्त वेडेवाकडे वार करत राहतो.

एकुण त्यांची एकाग्रताही फारशी चांगली नाही वा शौर्यही. केवळ आवेगाची, नवशिक्या शिपायांची लढाई ते लढत आहेत. दरम्यान एका वारामुळे सामुराईची तलवारही एका तोडलेल्या झाडाच्या कुजलेल्या बुंध्यात अडकते. तो ती काढण्याचा प्रयत्न करीत असताना इकडे जमिनीत रुतलेली आपली तलवार काढून घेण्यात ताजोमारू यशस्वी होतो नि सामुराईवर हल्ला चढवतो. तलवार गमावलेला ताजोमारू ज्या चापल्याने सामुराईच्या वारांना चुकवत होता ते चापल्य सामुराईकडे नाही. याशिवाय त्वेषाने केलेल्या त्या वारांमुळे तो अधिकच थकलेला आहे. थरथरत्या हाताने तलवार घेऊन त्याच्या दिशेने येणार्‍या ताजोमारूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पळण्याइतके त्राण त्याच्यात नाही. जमिनीवरून खुरडतच तो ताजोमारूपासून दूर सरकू पाहतो. ताजोमारूचेही त्याला भोसकण्याचे धैर्य होत नाही. तो हळूहळू पुढे सरकत सामुराईच्या जवळ जातो पण हल्ला करीत नाही. तो बराच जवळ आल्यावर सामुराई गर्भगळित होतो नि 'नाही, मला मरायचे नाही.' असे ओरडतो. मरणाचे नाव ऐकून ताजोमारूतला डाकू जागा होतो नि आपल्या तलवारीने भोसकून तो सामुराईला ठार करतो.

ही भोसकण्याची क्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. एरवी वक्राकार पात्याच्या तलवारीने वरून खाली अथवा पोटात खुपसून हत्या केली जाते. सरळ पात्याच्या तलवारीने भोसकून वार केला जातो. दोन्ही प्रकारात तलवारीची मूठ वार करणारा हाती ठेवूनच वार करतो नि वार केल्यानंतर तलवार पुन्हा ओढून बाहेर काढली जाते. तिच्यावरील पकड कधीच सोडली जात नाही. इथे ताजोमारू - त्याच्या स्वतःच्या साक्षीत असो, की या शेवटच्या लाकूडतोड्याच्या साक्षीत असो - एखादा सुरा जसा दुरून फेकून मारला जातो तसे एका हाताने पाते नि दुसर्‍या हाताने मूठ धरून एकाच वेळी दोन्ही हातांनी गती देऊन तलवार 'फेकून मारतो' नि सामुराईची हत्या करतो.

इतक्या वेळ त्या दोन पुरूषांच्या द्वंद्वात सूडाचे समाधान पाहणारी ती स्त्री आपल्या पतीचा वध पाहून किंचाळते. ते ऐकून ताजोमारूचा त्वेषही सरतो नि तो भानावर येतो. आपण केलेली हत्या पाहून तो स्वतःच भयचकित होऊन मागे सरतो आणि नि:त्राण होऊन खाली कोसळतो. तो कोसळतो ते थेट त्या स्त्रीच्या पुढ्यात. अचानक त्याला आपल्या विजयाची जाणीव होते. आपले बक्षीस - ती स्त्री - तिच्यावर आता तिचा हक्क प्रस्थापित झालेला असतो. तो तिला हाताला धरून उठवू पाहतो. ती त्याला झिडकारते. थोड्या झटापटीनंतर ती मुख्य रस्त्याच्या दिशेने पळत सुटते. सामुराईची तलवार उचलून ताजोमारू तिचा पाठलाग करू पाहतो, पण अर्ध्या वाटेवर तो कोसळतो. पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतो. पण आता त्याच्या अंगात तिचा पाठलाग करण्याइतके त्राण नाही. थकून तो तिथेच पडून राहतो. काही वेळाने थोडा सावरलेला ताजोमारू उठतो. सामुराईचे धनुष्यबाण, तलवार नि स्वतःची तलवार उचलून लंगडत खुरडत निघून जातो.

ताजोमारू आणि सामुराई यांचा प्रत्यक्ष संघर्ष संपूर्ण घटनाक्रमात दोनदा येतो. स्त्रीवर अत्याचार होण्यापूर्वी त्यांच्यात झालेला पहिला नि अत्याचार-पश्चात झालेले द्वंद्व हा दुसरा. पहिल्याचा तपशील केवळ ताजोमारूने आपल्या साक्षीमधे दिला आहे. सामुराई नि त्या स्त्रीने अधिक तपशील पुरवला नसला तरी हा संघर्ष झाला याबाबत दुमत नाही. परंतु दुसया द्वंद्वाबाबत या तिघांपैकी फक्त ताजोमारू बोलतो आहे. या द्वंद्वातच आपण त्या सामुराईला वीराचे मरण दिल्याचा त्याचा दावा आहे. परंतु इतर दोघे या तपशीलाबाबत ताजोमारूशी आणि परस्परांशीही सहमत नाहीत. स्त्रीच्या मते सामुराईचा मृत्यू हा खून आहे की अपघात हे ठाऊक नसले तरी तो खंजिराच्या वाराने झाला एवढे नक्की. तसेच त्याचा मृत्यू झाला तेव्हा ती त्याच्या जवळच बेशुद्धावस्थेत पडलेली होती. सामुराई मृत्यू खंजिराने झाला या तपशीलाबाबत आपल्या पत्नीशी सहमत आहे. परंतु ती स्त्री तिथे उपस्थित असल्याचे नाकारतो. ती आणि ताजोमारू घटनास्थळापासून निघून गेल्यावरच आपण हाराकिरी केली असे ते सांगतो.

आता नव्यानेच समोर आलेल्या माहितीनुसार ताजोमारूच्या दाव्याला लाकूडतोड्या बळ देतो आहे, सामुराईची हत्या ताजोमारूनेच केली नि तलवारीनेच केली असा दावा लाकूडतोड्याने केला आहे. परंतु तपशीलाबाबत तो ही ताजोमारूशी असहमती दाखवतो. ताजोमारूच्या जबानीत हे सम-समा युद्ध आहे. सारखाच त्वेष, डावपेच करण्याची दोघांची प्रवृत्ती सारे काही तुल्यबल, कोणी डावे नाही की कोणी उजवे नाही. ताजोमारू सामुराईचे कौतुक करताना म्हणतो की 'तो शौर्याने लढला. त्याने माझ्यावर तेवीस (२३) वार केले. यापूर्वी कोणीही वीस(२०) पेक्षा जास्त वार करू शकले नव्हते'. यात एक आत्मप्रौढीचा धागाही मिसळून दिलेला आहे. याउलट लाकूडतोड्याच्या कथनावरून दोघेही पुरूष आपापल्या शौर्याच्या मारत असलेल्या बढाया या फुकाच्याच होत्या असे दिसून येते.

हे द्वंद्व नाईलाजाने लढलेले असल्याने पुरेशा त्वेषाने लढले जात नाही. मारण्यापेक्षा स्वतःला वाचवण्याकडेच दोघांचा कल अधिक दिसतो. शिवाय एकाचवेळी दोघांच्याही हाती शस्त्र आहे असा काळ फार थोडा आहे. थोडक्यात इथे समसमा द्वंद्व नाही, पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकते आहे, आंदोलित होते आहे. त्या द्वंद्वात सामुराई ठार झाल्यानंतर ती स्त्री घटनास्थलापासून पळून जाते. ताजोमारू पूर्ण थकलेला आहे तो तिचा पाठलाग करू शकत नाही. एका कचखाऊ सामुराईशी झालेल्या लढाईनंतर तो इतका थकला आहे. यावरून कदाचित तो स्वत:देखील फारसा लढवय्या वगैरे नसावा असा तर्क करण्यास जागा राहते. किंवा त्याने द्वंद्वापूर्वीच म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या पतीच्या मृत्युंनंतर मी तुझी होईन म्हणणार्‍या - त्याला पाषाणहृदयी वाटणार्‍या - त्या स्त्रीबद्दलचे आकर्षण, अभिलाषा आता ओसरून गेली असावी. कदाचित त्या स्त्रीचा उपभोग घेतल्यानंतर उसळून आलेले तात्कालिक प्रेम नि लग्न करण्याची इच्छाही आता मरून गेली असेल नि मूळचा स्वच्छंद स्वभाव पुन्हा जागा झाला असेल. कारण काहीही असले तर दृष्य परिणाम म्हणजे तो तिला अडवू शकत नाही नि ती सहजपणे त्याच्या हातून निसटून जाते...

... हे सारे नाट्य आपण झुडपाआडून पाहिले असे लाकूडतोड्या सांगतो.

तिसरा माणूस हे सारे ऐकून खदाखदा हसतो. 'ही खरी गोष्ट आहे?" त्याच्या प्रश्नात उपहास डोकावतो आहे. लाकूडतोड्या चिडतो, त्या माणसावर धावून जात तो म्हणतो "मी खोटे बोलत नाही. हे सारे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे." माणूस हसतो "मला पटत नाही." लाकूडतोड्या पुन्हा पुन्हा ठासून सांगतो की हे खरे आहे. सारे असेच घडले होते. माणूस हसतो "माणसे मी आता खोटे बोलतो आहे असे सांगून थोडीच खोटे बोलतात."

"हे सारं भयंकर आहे." इतका वेळ या दोघांचे संभाषण ऐकणारा भिक्षू न राहवून बोलतो "माणसे परस्परांवर विश्वास ठेवित नसतील तर या जगाचा नरक झालेला काय वाईट." तो त्वेषाने म्हणतो. 'अगदी बरोबर. हे जग एक नरकच आहे." तो माणूस म्हणतो. "नाही! माझा माणसावर विश्वास आहे." भिक्षू ठासून म्हणतो. " या जगाचा नरक व्हावा असं मला वाटंत नाही." माणूस खदाखदा हसतो. "तूच विचार कर आता. या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?" "मला ठाऊक नाही." भिक्षूऐवजी लाकूडतोड्याच परस्पर उत्तर देतो. "थोडक्यात काय तर माणसे कशी वागतील हे तुम्ही कधीच समजावून घेऊ शकत नाही." पुन्हा एकवार खदाखदा हसून तो त्याचा अधिक्षेप करतो.

(क्रमश:)

पुढील भाग >> जंगलवाटांवरचे कवडसे - ८ : उपसंहार


हे वाचले का?

जंगलवाटांवरचे कवडसे - ६ : सामुराईच्या आत्म्याची साक्ष

जंगलवाटांवरचे कवडसे - ५ : स्त्रीची साक्ष << मागील भाग
---

CallingTheSpirit
सामुराईच्या आत्म्याला आवाहन केले जात आहे.


WillUMarryMe
माझ्याशी लग्न कर- ताजोमारू स्त्रीला विनवतोय.

सामुराईचा आत्मा सांगू लागतो. "तिच्याशी संग केल्यानंतर तो डाकू तिच्याशी लाडीगोडीने बोलू लागला. तो म्हणत होता की ’जंगलात अशा परपुरुषाबरोबर राहिल्याने तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले असल्याने आता ती पतीबरोबर राहू शकत नाहीच. असे असेल तर तिने तिच्या दुबळ्या पतीला सोडून त्याच्याशीच लग्न का करू नये?’ त्याने तिच्यावर अत्याचार केला तो ही त्याच्या मनात तिच्याबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातूनच. ते दोघेही वृक्षातळी निवांत बसून बोलत होते.

हे ऐकताच माझ्या पत्नीने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. ती जणू कोणत्या धुंदीत असल्यासारखी दिसत होती. ती यापूर्वी एवढी सुंदर कधीच दिसली नव्हती. (थोडक्यात तिने इतक्या स्निग्ध नजरेने, प्रेमाने, आपुलकीने आपल्याकडे कधीच पाहिले नव्हते असे तो सुचवतो आहे.) त्याच्या या प्रश्नावर माझ्या पत्नीचा प्रतिसाद काय होता? या हतबल पतीसमोर ती त्याला म्हणाली 'तू मला कुठेही घेऊन चल.' पण हे एवढे एकच तिचे पाप नव्हते. तसे असते तर आज मी हा असा नरकात खितपत पडलो नसतो."

KillHim

"तिची संमती मिळाल्यावर तो डाकू माझ्याजवळ आला, त्याने माझे धनुष्य, बाण नि माझी तलवार उचलली नि तिचा हात धरून तो लगबगीने तिला चालवू लागला. पण तिने त्याला थांबवले. तिने माझ्याकडे बोट दाखवले नि म्हणाली 'ठार मार त्याला.जोवर तो जिवंत आहे तोवर मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही.' एवढे तिरस्करणीय शब्द कुणी कधी ऐकले असतील? तो डाकू देखील त्या शब्दांनी पांढराफटक पडला. 'त्याला ठार मार, ठार मार त्याला.' ती त्याला पुन्हा पुन्हा म्हणत होती.

तिच्या या बोलण्यावर ताजोमारूने तिरस्काराने तिच्याकडे पाहिले नि एका हिसड्यासरशी तिला माझ्यासमोर आदळली. तिला एका पायाखाली दाबून तिच्याकडे बोट दाखवत त्याने मला प्रश्न केला 'बोल, काय करू हिचं मी. ठार मारू की जिवंत सोडू?' (इथे तो आत्मा - ते माध्यम - खदाखदा हसतो. जणू आपल्या त्या स्त्रीची ती मानखंडना त्याला आपली अप्रत्यक्ष जीत वाटत असते.) त्याच्या त्या औदार्याखातर मी त्याचा गुन्हा माफ करायला तयार होतो. तिच्या शरीरावरील आपला पाय काढून तो माझ्याकडे सरकला नि मला पुन्हा तोच प्रश्न विचारला.

एवढ्यात ती संधी साधून तिने पळ काढला. तो ही तिच्या मागे पाठलागावर गेला. काही वेळाने तो एकटाच परतला. बहुधा ती त्याच्या हातून निसटली असावी. तो सरळ माझ्याकडे आला नि आपल्या तलवारीने माझी दोरी तोडून त्याने मला बंधमुक्त केलं. ’ती तर पळून गेली. आता मला माझ्या भवितव्याची चिंता करायला हवी’ असं म्हणून तो निघून गेला. सारं काही शांत झालं होतं. एवढ्यात कोणाचे तरी रडणे माझ्या कानी पडले."

आता खुद्द सामुराईच हताश होऊन रडताना दिसतो. आपल्यासारख्या सामुराईचा य:कश्चित डाकूने केलेला पाडाव, आपल्या देखत आपल्या पत्नीची लुटली गेलेली अब्रू हे सगळे पुरेसे नाही म्हणून की काय आपली हत्या न करता जिवंत ठेवून अखेर जातानाही उपकार करून आणखी लज्जित करून गेलेला तो डाकू. ही सारी मानखंडना असह्य होऊन तो मुसमुसू लागतो. त्या दु:खावेगाच्या स्थितीतच खांदे पाडून तो चालू लागतो. एवढ्यात जमिनीत रुतलेला तो खंजीर त्याला दिसतो.

Harakiri

इथेही पुन्हा तो खंजीर जमिनीत रुतलेल्या स्थितीत त्याच ठिकाणी दिसतो जिथे ताजोमारूच्या जबानीत प्रत्यक्ष रुतताना दाखवला होता. अशा रितीने त्या खंजिराच्या जमिनीत रुतण्यापर्यंतच्या घटनाक्रमाबाबत तीनही सहभागी व्यक्तींचे एकमत असावे असे गृहित धरण्यास हरकत नसावी. त्याच्या मूल्यमापनाबद्दल त्यांचे मतभेद असू शकतात परंतु घटिताबाबत एकमत आहे एवढे नोंदवून ठेवावे लागते.

तो उपसून तो चालू लागतो. दोन पावले टाकल्यावर क्षणभर थबकतो. काही क्षण त्या खंजिराकडे एकाग्र नजरेने पहात राहतो. अचानक एका निर्धाराने तो खंजीर उंचावतो आणि आपल्या छातीत खुपसून घेतो. "सगळं कसं शांत होतं. अचानक सूर्य मावळला नि सगळीकडे अंधारून आले. सार्‍या आसमंताला ती नीरव शांतता वेढून घेत होती. मी तिथे निष्प्राण होऊन पडून राहिलो." काही वेळानंतर कोणीतरी माझ्याकडे येत असल्याचे मला जाणवले..."

मृतात्मा हे सांगू लागताच पाठीमागे बसलेला लाकूडतोड्या अस्वस्थ झालेला दिसतो. इतकावेळ चित्रासारखा शांत बसलेला तो अचानक ताठ बसतो आणि आपले हात अस्वस्थपणे पायावर फिरवू लागतो. "त्या व्यक्तीने माझ्या छातीतून तो खंजीर काढून घेतला." पुढचा तपशील सांगण्याआधीच आत्मा माध्यमाला सोडून जातो. लाकूडतोड्याच्या चेहर्‍यावर सुटकेचे भाव दिसतात. आपल्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या 'तिथे काही शस्त्र होते का?' या प्रश्नावर घाईघाईने 'नाही, मुळीच नाही' असे उत्तर देतो. उत्तर केवळ 'नाही' इथे न थांबता 'मुळीच नाही' असे म्हणत खुंटा हलवून बळकट करण्याचा अनावश्यक प्रयत्न तो करतो याची इथे मुद्दाम आठवण करून देतो. अशीच चलबिचल त्या सामुराईच्या जबानीच्या वेळी तो (त्याचा आत्मा) 'माझ्याकडे कुणीतरी चालत येत असल्याचा भास झाला' असे म्हणतो तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर दिसून येते.

मृतात्म्याची साक्ष त्या स्त्रीप्रमाणेच त्याच्या स्वत:च्या नि त्याच्या स्त्रीशी ताजोमारूने केलेल्या संगाची घटना टाळून थेट त्यानंतरच्या घटना सांगते आहे. ’ते वृक्षातळी निवांत बसून बोलत होते’ तसेच ’ती यापूर्वी एवढी सुंदर कधीच दिसली नव्हती’ या वाक्यातून आपली स्त्री ही ताजोमारूला वश झाल्याचे ठसवतो आहे. थोडक्यात अशा स्त्रीचे संरक्षण करण्यात अपयश आले तर त्याचा दोष एका पतिव्रता स्त्रीचे संरक्षण करण्यात आलेल्या अपयशापेक्षा गुणात्मकदृष्ट्या कमी लांच्छनास्पद आहे अशी पळवाट काढण्याचा त्याचा प्रयत्न असू शकतो. तसेच ताजोमारू आपली हत्या करण्याच्या मन:स्थितीत नसता तिनेच त्याला चिथावले असे सांगून तिच्या चारित्र्याबद्दल तो न्यायासनाचे मत अधिकच कलुषित करण्याचा प्रयत्न करतोय ही देखील या शक्यतेला दुजोरा देणारी गोष्ट म्हणता येईल.

गंमत म्हणजे याचवेळी ताजोमारूचे चित्र मात्र त्याने जरासे धूसर रंगवले आहे नि त्याच्यावर कोणताच दोषारोप केलेला नाही. एकतर त्याला ताजोमारूने कसे बांधून घातले याबाबत त्याने साक्षीमधे काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे त्याचे बंदिवान होणे हे कपटाने झाले की शस्त्रबळात, बाहुबळात कमी पडल्याने याबाबत त्याने मौन पाळले आहे. शिवाय त्याने आपली दोरी सोडून आपल्याला मोकळे केले, ठार केले नाही असे सांगताना ताजोमारूला तो ही खुनाच्या आरोपातून एकप्रकारे मुक्तच करतो आहे. त्याचबरोबर आत्मगौरव धुळीस मिळाल्याने एका सामुराईच्या ब्रीदाला जागून आपण हाराकिरी केल्याचे सांगून - थोडा फार का होईना - स्वत:चा आत्मगौरव राखण्याचा प्रयत्न केला आहे.

स्त्रीला दोष देणे (दुबळेपणा झाकण्यासाठी नि ती त्याच लायकीची होती असे म्हणत आपली जबाबदारी झटकण्यासाठी) तीच ताजोमारूला वश झाल्याचे सांगणे. वर ताजोमारूने तिला झिडकारल्याचे सांगणे. यात एका बाजूने पुरुषाला पुरुष राजी ही वृत्ती दाखवणेही आले. यानंतर आपल्याला कोणीही मारले नाही, आपण हाराकिरी केल्याचे सांगत आपल्या सामुराई वृत्तीला जागल्याचा दावा करतो. या वेळी ताजोमारू त्याला मोकळा करतो तेव्हा कुरोसावाचा कॅमेरा ताजोमारूच्या कंबरेच्या पातळीवरून बसलेल्या सामुराईकडे पाहतो. यात सामुराईचे त्याला स्वत:ला भासणारे खुजेपण अधोरेखित होते. यातून स्वाभिमान जपण्यासाठी केलेले आत्मविसर्जन ओघाने आलेच. अकुतागावाच्या मूळ ’इन द ग्रोव्ह’ चे कथानक - कुरोसावाने काही किरकोळ बदल केलेले - इथे संपते.

अकुतगावाच्या कथेमधे ती स्त्री आपण अर्धवट बेशुद्धीच्या अवस्थेत तो खंजीर आपल्या पतीच्या छातीत खुपसल्याची साक्ष देते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्याची हत्या आपल्याच हातून झाल्याचा कबुलीजबाब देते आहे. कुरोसावाने मात्र हा तपशील संदिग्ध ठेवला आहे. चित्रपटात ती खंजिराचे पाते समोर पतीच्या दिशेने रोखलेल्या स्थितीत आपण भोवळ येऊन पडल्याचे सांगते. ही ’नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका आहे. पडतानाच तो खंजीर त्याच्या छातीत खुपसला गेला की आपण बेशुद्ध असताना अन्य कोणी अथवा स्वत: आपल्या पतीनेच त्या खंजीराच्या सहाय्याने आत्महत्या केली याबाबत ती अनभिज्ञता दर्शवते आहे. थोडक्यात सांगायचे तर अकुतागावाच्या कथेनुसार सामुराईच्या हत्येचे पातक तिघेही आपापल्या शिरावर घेत आहेत पण चित्रपटात मात्र स्त्री पतीहत्येबाबत थोडी संदिग्धता ठेवते आहे.

हा मोठा गंमतीशीर भाग आहे. बहुधा कोणीही व्यक्ती गुन्ह्याचे पातक आपल्या शिरी येऊ नये म्हणून आटापिटा करेल. इथे उलट परिस्थिती दिसते आहे. हत्या तर एकच झाली आहे नि तिघेही आपणच ती केल्याचा दावा करत आहेत. प्रत्यक्षात सामुराईच मृत्यू कसा झाला हे त्या जंगलात त्या क्षणी असलेले हे तिघेच सांगू शकतात, परंतु तिघांचे दावे इतके परस्परविरोधी आहेत की एकाच वेळी ते खरे असणे शक्यच नाही. सामुराई आणि स्त्री ही हत्या खंजिराने झाल्याचे सांगत आहेत (फक्त कोणाच्या वाराने या बाबत त्यांचे मतभेद आहेत) पण घटनास्थळी असा खंजीर कुठेच आढळून येत नाही. सामुराईचे प्रेत सर्वप्रथम पाहणारा लाकूडतोड्याही असा खंजीर तिथे पाहिल्याचे साफ नाकारतो आहे. याउलट ताजोमारू मात्र ही हत्या तलवारीने झाल्याचा नि आपणच ती केल्याचा दावा करतो आहे.

ताजोमारू नि सामुराईने हे पातक शिरावर घेणे आपण समजू शकतो. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून का होईना पण दोघांच्याही दृष्टिने ती आत्मगौरवाची बाब आहे. पण एरवी पूर्णपणे पराधीन नि अबला असणार्‍या त्या स्त्रीने - अप्रत्यक्षपणे का होईना - आपल्या पतीच्याच हत्येचे पातक आपल्या शिरी का घ्यावे हे थोडे अनाकलनीय आहे.

जर खरोखरच तिच्या हातून आपल्या पतीची हत्या झालेली असेल तर कदाचित निश्चित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नि त्यानुसार कृती करण्याची मोकळीक तिच्या आयुष्यात तिला मिळाली नि तिचा तिने पुरेपूर वापर करून घेतला असे म्हणता येईल. आयुष्यभर वागवलेल्या परावलंबित्वापासून दूर होत एक स्वातंत्र्याचा क्षण आपण अनुभवला याचे समाधान कदाचित तिच्या मनात असेल नि त्यामुळेच तिने आपल्या साक्षीत त्या घटनेचा उल्लेख टाळला नसेल (दोषाची तीव्रता कमी करण्यासाठी हे अनवधानाने झाले ही मखलाशीही केली असेल.) पण हे झाले तिने खरोखरच ती हत्या केली असेल तर! जर मुळातच ही हत्या तिने केलेली नसेल तर?

कुरोसावाने तिच्या साक्षीत बदल करून निर्णायकपणे 'माझ्या हातून झाली' हा मूळ कथेतला उल्लेख टाळून 'कदाचित माझ्या हातून झाली' असा तपशीलात केलेला बदल अतिशय समर्पक ठरतो तो या संदर्भात. जर तिच्या हातून सामुराई मेला नसेल नि खरोखरच त्याच्या बेशुद्धीत त्याचा मृत्यू झाला असेल, तर तो मृत्यू ताजोमारूच्या हातून झालेला नाही (कारण तो आधीच निघून गेला हे ती सांगते) हे ती ठसवते आहे. एकतर तिच्या हातून अनवधानाने हा मृत्यू घडला, तिच्या असावध अवस्थेत सामुराईने हाराकिरी केली किंवा तिसर्‍याच कोणी बाजूला पडलेल्या खंजिराने त्याची हत्या केली या तीन शक्यता ती न्यायासनासमोर ठेवते आहे. (हे सांगून झाल्यावर ती सांगते की आपण सावध झालो तेव्हा तो खंजीर माझ्या पतीच्या छातीत खुपसलेला होता. परंतु लाकूडतोड्याला अथवा नंतर पोचलेल्या पोलिसांना तो तिथे सापडत नाही.) ताजोमारूच्या हातून आपल्या पतीची हत्या झाल्याचे वास्तव स्वीकारले तर आपल्या पतीची समाजात होणारी मानखंडना टाळण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

कथा या पलिकडे जात नाही, इथेच थांबते. निवाडा करणे हे कथेचे काम नाहीच, सत्याची सापेक्षता नि व्यक्तिविशेषांची गुंफण हेच त्या कथेचे बलस्थान आहे. पण कथेबाबत हे ठीक आहे. १९५१ पर्यंत कथालेखन अथवा एकुणच साहित्य हा पुरेसा स्थिरस्थावर झालेला वाङ्मयप्रकार होता. त्यामुळे त्याचे वाचकही या अनवट रूपाला सरावले नसले तरी पूर्णत: नाकारण्याची शक्यता कमी होती.

परंतु चित्रपट हे माध्यम तुलनेने नवे होते नि नावीन्याच्या अपेक्षांमधून पूर्णपणे बाहेर आलेले नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांसमोर असे संदिग्ध आणि निरास न झालेले कथानक मांडणे तुलनेने फारच अवघड होते. (आज ज्या स्वरूपात राशोमोन आपल्या समोर आहे त्या स्वरूपात देखील त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करत उभे रहावे लागले आहे. ज्या स्टुडिओचा भाग म्हणून कुरोसावाने हा चित्रपट निर्माण केला त्यांनीही याबाबत फारसे उत्साही धोरण ठेवलेले नव्हते.) त्यामुळे चित्रपटकथेमधे थोडे सुलभीकरण गरजेचे होते, जेणेकरून हे सुटे धागे जोडून चित्रपटाला ’शेवट’ नाही तरी एक निश्चित ’अंत’ अथवा निरास देता यावा. इथे कुरोसावाने ’इन द ग्रोव्ह’ मधे अकुतागावाने शेवटच्या परिच्छेदात सोडून दिलेला एक सुटा धागा अचूक पकडला नि त्याचा सांधा त्या राशोमोन द्वारावरील पात्रांशी जोडून घेतला नि वरवर समांतर अवकाशात वावरणारे हे लोक मुख्य कथावस्तूमधे प्रवेश करतात.

ताजोमारू, सामुराई नि त्याची स्त्री यांच्या साक्षींनंतर असे वाटू शकते की जर हे तिघेच त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नि भागीदार असतील तर मग राशोमोन द्वारावर त्याबाबत चर्चा करणारे ते तिघे या चित्रपटात काय करताहेत. कारण मूळ घटनाक्रमामध्ये त्यांना काही स्थान नाहीच. जर राशोमोन द्वारावरील त्या तिघांचे प्रसंग पूर्णपणे वगळले तरीही ’इन द ग्रोव्ह’ स्वतंत्रपणे उभी राहतेच. मग या तिघांना चित्रपटात उभे करण्याचे प्रयोजन काय? इथे चित्रपटाचा नि वास्तव जीवनाचा सांधा कुठेतरी जोडून घेण्याचा प्रयत्न कुरोसावा करतो आहे.

’राशोमोन’ प्रकाशित झाला १९५१ मध्ये. त्याची निर्मिती त्या आधी काही काळ सुरू झाली असणार. हा सारा काळ जपान युद्धपश्चात होरपळ अनुभवत होता. माणसाच्या इतिहासातील सर्वात भीषण तांडव नि नृशंस नरसंहार जपानने नुकताच अनुभवला होता. त्यातून प्रचंड मनुष्यहाही, वित्तहानी तर झाली होतीच, पण मुख्य पडझड झाली होती ती माणसाच्या मनात खोलवर. जगण्यावरील त्यांचास विश्वास पूर्णपणे कोसळला होता. अनेक वर्षे कष्टाने फुलवत नेलेले जड नि जीवन एक माणूस विमानातून एक बॉम्ब टाकून क्षणार्धात नाहीसे करू शकतो ही जाणीव प्रत्येक जपानी माणसाला मुळापासून हादरवून टाकणारी होती, त्याच्या जगण्याच्या प्रेरणाच हिरावून घेणारी होती.

असे घडू शकत असेल तर काही नवे निर्माण करावेच कशाला असा वैफल्यग्रस्त दृष्टिकोन समाजात मूळ धरू लागला होता. अशा बाह्य संकटांचा परिणाम म्हणून माणूस मानसिकदृष्ट्याही कमकुवत झालेला होता. अशा परिस्थितीत समाजाच्या उत्थानाला प्रेरक असे एकमेव बलस्थान उरले होते ते म्हणजे माणसाचा परस्परविश्वास. अशा सार्या विपदांच्या परिस्थितीत माणसे जेव्हा परस्पर-अविश्वास दाखवतात तेव्हा समाजाच्या हिताची चिंता करणारा नि पुस्तकी गृहितकांना घट्ट चिकटून जगणारा भिक्षूही त्याच्या गृहितकांबाबत शंका घेऊ लागतो.

TrioAtGate

'जगणे हरवले तरी चालेल पण जगण्याची प्रेरणा हरवू नये' हा मुद्दा पकडून कुरोसावाने राशोमोन द्वारावरच्या तिघांना ’इन द ग्रोव्ह’ चे प्रवासी बनवले आहे, साक्षीदार बनवले आहे, नेमकी हीच भूमिका सर्वसामान्य प्रेक्षक अथवा जपानी नागरिकांनी ’राशोमोन’ या चित्रपटाबाबत वठवावी अशी त्याची अपेक्षा आहे. जसे ते तिघे ताजोमारू-सामुराई-स्त्री या त्रिकूटाबाबत घडलेल्या घटनाक्रमाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यातून उमज पडावी अशी अपेक्षा करतात आणि त्यातून आपल्या जगण्यावरील अशा घटनांचा परिणाम तपासून पाहू इच्छितात तसेच सर्वसामान्य प्रेक्षकाने चित्रपटाबाबत करावे अशी त्याची अपेक्षा असावी.

यासाठी जपानी इतिहासात हिरोशिमापूर्व काळातील सर्वात मोठा विपदेचा काळ असलेला बाराव्या शतकाची पार्श्वभूमी त्याने निवडली आहे. गंमत म्हणजे पडद्यावर येणारे पहिले वाक्य सोडले तर या काळाचा काहीही संदर्भ चित्रपटात प्रत्यक्षपणे दिसत नाही. परंतु कुरोसावाला त्याची आवश्यकता वाटत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिरोशिमा-पश्चात ज्या प्रकारचे भवताल त्या प्रेक्षकाच्या वाट्याला आले आहे त्यावरून राशोमोनच्या प्रेक्षक ’दुष्काळ, युद्धे आणि रोगराई यांनी गांजलेली भूमी’ अनुभवू शकतो. अशा तर्‍हेने अप्रत्यक्षपणे आजच्या परिस्थितीचे आरोपण चित्रपटाची पार्श्वभूमी म्हणून झाले की प्रेक्षक आपोआपच चित्रपटाचा भाग बनून जातो आहे.

द्वारावर त्याने बसवलेल्या तीन व्यक्ती तीन वेगवेगळे दृष्टिकोन घेऊन जगताहेत. (लेखमालेच्या दुसर्‍या भागात त्यांची ओळख करून देताना त्याबाबत थोडे लिहिले गेले आहेच.) भिक्षू हा तटस्थ, अक्रियाशील निरीक्षक आहे. असे असूनही तो समाजाच्या भले व्हावे अशी मनीषा असलेला आहे. 'माणूस मूलत: चांगलाच असतो निदान पूर्ण अविश्वास दाखवावा इतका वाईट नसतो' असे गृहितक घेऊन जगणारा नि या गृहितकाला छेद देणारे काही सामोरे आले की अस्वस्थ होणारा असा आहे.

लाकूडतोड्या हा भिक्षूची थोडी व्यवहारी आवृत्ती आहे. चांगुलपणावरचा त्याचा विश्वास, त्याबाबतचा आग्रह अजूनही टिकून आहे. परंतु असे असूनही तो पूर्णत: अक्रियाशील नाही. तो जाणीवपूर्वक कृती करतो, पण त्याचबरोबर अपरिहार्यपणे येणार्‍या ’ती कृती योग्य की अयोग्य?’ या विचाराचे दडपण घेऊन जगतो आहे. इतरांचे प्रत्यक्ष नुकसान होत नसेल अथवा पकडले जाणार नसू तर लहान लहान स्वार्थ साधण्यासाठी एखादी एरवी अयोग्य वाटणारी कृतीही तो करतो आहे. पण पुरेसा निर्ढावलेला नसल्याने त्याचा अपराधगंड देखील शिरी वागवतो आहे.

तिसरा माणूस हा पूर्णपणे तुच्छतावादी (हिरोशिमा-पश्चात जपानी माणसाची वाटचाल ज्या दिशेने होऊ शकली असती अथवा ज्याची चिन्हे कदाचित कुरोसावाला दिसू लागली होती). न्याय-अन्याय, पाप-पुण्य या संकल्पनांना त्याने पूर्ण तिलांजली दिलेली आहे. उगवला दिवस भागवण्यासाठी जे शक्य असेल ते करावे अशी त्याची धारणा आहे. जगातील स्वत:सोडून उरलेल्या स्थिरचराशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. अशा तर्‍हेने हे तिघे प्रवृत्तीच्या तीन वेग-वेगळ्या पातळ्यांवर जगत आहेत. अशीच काहीशी ट्रिनिटी ताजोमारू, सामुराई नि ती स्त्री यांच्याबाबत दिसून येते. राशोमोनद्वारावरच्या तिघांना तीन प्रवृत्तींची उदाहरणे म्हणून कुरोसावा उभा करत असेल तर हे तिघे त्यांच्या सामाजिक स्थानाच्या वेग-वेगळ्या पातळीवर उभे असलेले दिसून येतात.

या तिघांच्या माध्यमातून प्रेक्षकाला कुरोसावाने ’इन द ग्रोव्ह’ च्या सामोरे नेऊन ठेवले आहे. परंतु कथेमधे अपरिहार्य नसलेला पण चित्रपटाला आवश्यक असा कथावस्तूमधील समस्येचा निरास कुरोसावा आता सादर करतो आहे. ज्या भूमिकेतून राशोमोन द्वारावरील ती तीन माणसे उभी केली, त्या सद्यपरिस्थितीच्या संदर्भात हा निरास थोडा भाबडा वाटला तरी तो मूळ कथेलाही अगदी चपखल बसतो. 'इन द ग्रोव्ह' मधे सामुराईच्या साक्षीच्या वेळी एका क्षणी लाकूडतोड्या अस्वस्थ झाल्याचा प्रेक्षकांनी पाहिलेले असते. कथा जरी हा उल्लेख सूचक म्हणून सोडून देत असली तरी कुरोसावा तो धागा उचलून चित्रपटाच्या अंताशी जोडून देतो. सर्वच साक्षींवरून आपण आतापर्यंत काढलेले निष्कर्ष हे प्रामुख्याने 'जर-तर'च्या स्वरूपाचे होते, त्यांना निर्णायक दिशा देण्याचे कार्य या शेवटच्या प्रसंगातून साध्य होते.

(क्रमश:)

पुढील भाग >> जंगलवाटांवरचे कवडसे - ७ : लाकूडतोड्याची साक्ष


हे वाचले का?

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ५ : स्त्रीची साक्ष

जंगलवाटांवरचे कवडसे - ४ : ताजोमारूची साक्ष << मागील भाग
---

न्यायासनासमोर पालथी पडून ती स्त्री विलाप करते आहे. स्थान तेच पण पार्श्वभूमीमधे थोडा बदल आहे. पूर्वीच्या तीन साक्षींच्या वेळी मागील साक्षीदारांना पुढच्या साक्षीच्या वेळी पार्श्वभूमीवर बसवले होते. त्यामुळे भिक्षूच्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या नि ताजोमारूच्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या आणि भिक्षू पाठीमागे बसलेले होते. लाकूडतोड्या, भिक्षू आणि शेवट पोलिस हे तिघे तुकड्यातुकड्याने आपापले अनुभव सांगताहेत. लाकूडतोड्याच्या साक्षीने एक हत्या झाली आहे असे कळते, भिक्षूच्या साक्षीने घटनस्थळापाशी त्याने एका स्त्री-पुरुषाला पाहिले होते हे सांगितले जाते तर पोलिसाच्या साक्षीने त्याने एका डाकूला पकडून आणले असून लाकूडतोड्याने ज्या गुन्ह्याची परिणती - ते प्रेत - पाहिले त्या गुन्ह्याचा आरोप त्याने ठेवला आहे. हे तुकडे अथवा खंड जोडून पुरे चित्र उभे राहते आहे, जे पुढल्या तीन साक्षींसाठी पार्श्वभूमी तयार करते.

LadyTestifying1
सामुराईच्या स्त्रीची साक्ष.

स्त्रीच्या साक्षीच्या वेळी मात्र ताजोमारूची साक्ष झालेली असूनही तो मागच्या दोघांच्या ओळीत बसलेला नाही. याचे कदाचित एक कारण म्हणजे तो आरोपी आहे नि ते साक्षीदार. दुसरे एक कारण अधिक संयुक्तिक असावे. किंवा वरचा तर्क पुढे चालवला तर असे म्हणता येईल की ताजोमारूची साक्ष स्त्रीच्या साक्षीला पार्श्वभूमी देत नाही, दोन्ही मिळून एक चित्र पुरे करीत नाही. दोन्ही साक्षी स्वतंत्र असून त्यांचे दावे एकमेकांना छेद देऊन जातात.

आणखीही एक कारण हे असू शकेल की लाकूडतोड्या आणि भिक्षू हे या घटनाक्रमाच्या एकेका तुकडयाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे संपूर्ण घटनाक्रम काय असावा याबाबत एका बाजूने ते अनभिज्ञ आहेत नि - कदाचित म्हणूनच - दुसर्‍या बाजूने तो पुरा समजून घेण्यास उत्सुक आहेत. याउलट ताजोमारू हा संपूर्ण घटनाक्रमात स्वत: सहभागी आहेच. त्यामुळे त्याच्यापुरते सत्य काय ते त्याला ठाऊक आहेच. शिवाय दोनही गुन्हे त्याने अप्रत्यक्षरित्या का होईना कबूल केलेच आहेत. एकप्रकारे आपले भवितव्य काय याची त्याला पुरेशी स्पष्ट अशी जाणीव आहेच. त्यामुळे तो पुढच्या साक्षींबाबत फारसा उत्सुक नसावा नि म्हणूनच त्या साक्षींच्या वेळी उपस्थित राहण्याची तसदी त्याने घेतली नसावी.

स्त्रीच्या साक्षीतील घटनेचा कालखंड तिच्यावरील अत्याचारानंतर सुरू होतो. त्यापूर्वीच्या घटनांबद्दल ती काही बोलत नाही. स्त्रीसुलभ लज्जेमुळे तिला आपल्यावरील अत्याचाराचे वा त्याच्या पार्श्वभूमीचे - ज्यात तिच्या पतीने ताजोमारूसमोर पत्करलेली हार देखील येते - वर्णन करणे शक्य झाले नसावे. "त्याने मला स्वाधीन होण्यास भाग पाडल्यानंतर मोठ्या प्रौढीने सांगितले की तो कुप्रसिद्ध डाकू ताजोमारू आहे. मग तो बंदिवान केलेल्या माझ्या नवर्‍याकडे पाहून खदाखदा हसला. बिचार माझा नवरा, किती भयकंपित झाला असेल ते ऐकून. तो सुटकेसाठी जितका धडपड करी तितका त्याला बांधलेला दोर त्याच्या शरीरात अधिकाच रुतत असे."

इथे ’त्याने मला स्वाधीन होण्यास भाग पाडले’ अशी वाक्यरचना ती करते आहे, ’माझ्यावर अत्याचार केल्यानंतर’ अथवा ’माझा भोग घेतल्यानंतर’ अशी नाही. यात ’भाग पाडण्या’बरोबरच ’स्वाधीन होण्या’चा भागही आहे. (इथे मी इंग्रजी भाषांतरावर अवलंबून आहे. ते जर मूळ संवादांच्या विपरीत अर्थ देत असेल तर हे निरीक्षण चुकीचे ठरेल. इंग्रजी मधे ’'forced to yield' याचा अर्थ 'शरण आणणे' असा होतो.) या अर्थाने ती त्याला शरण गेली त्याने तिचा बळजबरी भोग घेतला नाही, बलात्कार केला नाही असा काढता येऊ शकतो.

इथे त्या स्त्रीने आपल्या पतीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वतःवर झालेल्या अत्याचाराच्या वेदना ताज्या असून देखील ती आपल्या नवर्‍याच्या दु:स्थितीबद्दल शोक व्यक्त करते आहे. एखाद्या पत्नीधर्माबाबत असलेल्या सामाजिक संकेत/रुढी तिच्यामधे किती खोलवर रुजल्या आहेत हे तिच्या विचारातील प्राधान्यक्रमातून दिसून येत आहे. एकप्रकारे आपल्या नवर्‍याशी प्रामाणिक असल्याचा तिचा दावा आहे. हा दावा ती आपल्याला वश झाल्याच्या ताजोमारूच्या दाव्याच्या सर्वस्वी विपरीत आहे. द्वंद्वाबद्दलची तिची पुढची साक्षही ताजोमारूच्या साक्षीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाते. ती सांगते "माझ्या नवर्‍याला ताजोमारूने बंधनमुक्त केले नि आम्हा दोघांकडे पाहून कुत्सित गडगडाटी हास्य करीत तो निघून गेला."

LadyPicksDagger

ताजोमारू निघून गेल्यावर ती स्त्री आपल्या पतीजवळ येते. त्याच्या नजरेत तिला धि:कार दिसतो. "त्याची नजर पाहून मी थिजलेच. त्याच्या नजरेत राग नव्हता, दु:ख नव्हते, होता फक्त तीव्र अव्हेर आणि अस्वीकृती. (अस्वीकृती या अर्थी की आपल्या स्त्रीच्या मानखंडनेबाबत आपली कोणतीही जबाबदारी, कमतरता, दौर्बल्य तो स्वीकारत नाही, उलट हा तिचा दोष असल्याची भावना त्याच्या नजरेतून प्रकटते आहे.) त्या नजरेने मला भाजून काढले. मी पुन्हा पुन्हा त्याला विनंती करत होते की त्याने त्या नजरेने माझ्याकडे पाहू नकोस. एकवेळ तू मला मार अगदी ठार मार, पण अशा नजरेने माझ्याकडे पाहू नको." पण तो बधत नाही. अचानक त्या तिला काहीतरी आठवते. ताजोमारूशी झटापट जिथे संपली तिथे पडलेला तो खंजीर ती उचलून आणते नि आपल्या पतीला देते.

इथे एक महत्त्वाचा तपशील नोंदवून ठेवायला हवा. तो असा की स्त्रीच्या साक्षीमधे ती जेव्हा खंजीर उचलून आणते तेव्हा तो कुरोसावाने जमिनीत रुतलेल्या स्थितीतच दाखवलेला आहे. याचा अर्थ तो खंजीर जमितीत रुतेपर्यंतचा ताजोमारूच्या साक्षीत आलेला आहे तो त्या स्त्रीला मान्य असावा असे गृहित धरण्यास हरकत नाही. कारण ती स्वतंत्रपणे घटनाक्रमाच्या त्याभागाबद्दल काही बोलत नाही. खंजिराबरोबरच मागचा दुवा उचलून पुढे जाते. पण इथपासून तिची साक्ष वेगळ्या दिशेने जाते आहे.

तो खंजीर तिने उलटा हातात पकडलेला आहे. मूठ तिने पतीकडे केली आहे, त्याला तो हाती घेण्यास सुलभ व्हावे अशा तर्‍हेने. त्या खंजिराच्या सहाय्याने त्याने आपल्या हाताने तिला संपवावे अशी विनंती ती करते आहे. पण त्याच्या नजरेत फक्त तुच्छता आहे. आता ती पकड न बदलता तो खंजीर उलटा फिरवते. अचानक तिच्या चेहर्‍यावर आधी न दिसलेला क्रौर्याचा भास होतो. त्याचे पाते आता त्या पतीकडे रोखले आहे. हळूहळू पावले टाकत ती त्याच्या अगदी जवळ येते. त्याच्या नजरेतील तुच्छता अजूनही तशीच आहे. दु:खावेगाने "माझ्याकडे असे पाहून नकोस" असे पुनः पुनः म्हणत ती त्याच्या जवळ येते. खंजीराचे पाते त्याच्याकडे रोखलेल्या स्थितीत असतानाच भोवळ येऊन कोसळते.

Cruelty
स्त्री खंजिराने ताजोमारूवर हल्ला करते आहे.

न्यायालयात हे सांगत असताना तिच्या चेहर्‍यावर विखार दिसू लागतो. एखाद्या संतप्त व्यक्तीने भावना दडपण्यासाठी जोरजोरात श्वास घ्यावा तसा तिचा श्वासोच्छ्वास जलद होऊ लागतो. तिच्या चेहर्‍यावर आधीच्या हीनदीन भावाच्या सर्वस्वी विपरीत असा परिपूर्तीचा भाव दिसतो. हळूहळू भानावर येत ती म्हणते "बहुधा मी त्यानंतर बेशुद्ध झाले. पुन्हा शुद्धीवर आले तेव्हा..." असे म्हणत असताना मूळचा दीनदु:खी भाव पुन्हा तिच्या चेहर्‍यावर दिसू लागतो. ती हंबरडा फोडते आणि दु:खातिशयाने जमिनीवर कोसळते. सावध होताच ती सांगते की शुद्धीवर आल्यावर मी पाहिले तो माझा खंजीर त्याच्या छातीत खुपसलेला होता.'

म्हणजे त्याचा मृत्यू नक्की कसा झाला याबाबत ती निश्चित विधान करीत नाही.खंजिराचे पाते समोर धरून ती त्याच्याकडे येत असतानाच भोवळ येऊन ती कोसळली त्यावेळी तो खंजीर समोरच असलेल्या तिच्या पतीच्या छातीत घुसला असण्याचा संभव आहे तसेच तिने त्याच्या धिक्काराने निर्माण झालेल्या आवेगाच्या भरात त्याची हत्या केली असण्याचाही संभव आहे. तसेच तिच्या बेशुद्धीच्या स्थितीत अन्य कोणी - कदाचित ताजोमारूने - तो उचलून तिच्या पतीची हत्या केली असण्याचीही शक्यता शिल्लक राहते. आणखी एक विश्वासार्ह शक्यता म्हणजे ती बेशुद्ध झालेली असताना जवळ पडलेल्या खंजीराने खुद्द सामुराईनेच आपल्या ब्रीदाला जागून हाराकिरी केलेली असू शकते. त्यानंतर आपण अनेक प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही असे ती सांगते. माझ्यासारख्या गरीब, निराधार स्त्रीने आता काय करावे अशी प्रश्न ती न्यायासनाला विचारते. इथे तिची साक्ष संपते.

थोडक्यात सांगायचे तर तिच्या साक्षीनंतर एक पतिव्रता पण अभागी स्त्री अशी तिची प्रतिमा कोर्टासमोर निर्माण होते आहे. जिच्यावर एका डाकूने तिच्या पतीसमोरच अत्याचार केला आहे नि तो पतीदेखील त्या अपघाताला तिलाच जबाबदार धरणारा आहे. एका अर्थी तिथली सामाजिक परिस्थिती - ज्यात स्त्री ही जिंकण्या/हिरावण्याची वस्तू आहे एवढेच नव्हे तर परहस्ते विटाळली म्हणून फेकून देण्याचीही आहे - तिच्या दुरवस्थेला जबाबदार आहे असे एकुण ती सुचवते आहे.

तसेच आपल्या पतीच्या मृत्यूबद्दलही तिने निश्चित विधान केलेले नाही. तिच्या नि ताजोमारूच्या साक्षीमधे असलेली आणखी एक महत्वाची विसंगती म्हणजे सामुराईची हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यार. ताजोमारू आपण त्याची हत्या आपल्या तलवारीने केली असे सांगतो तर त्या स्त्रीच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीचा मृत्यू खंजीराच्या वाराने झाला, पण तो कोणी केला याबाबत ती अनभिज्ञता दर्शवते आहे.

आता या दोन मुख्य सहभागी व्यक्तींच्या साक्षी इतक्या विसंगत आहेत नि घटनास्थळी घटना घडत असता- तिसर्‍या खुद्द सामुराईशिवाय- चौथा कोणीही उपस्थित नसल्याने निर्णय मोठा अवघड होऊन बसतो. ताजोमारूचे म्हणणे मान्य करावे नि त्याला दंडित करावे तर त्याच्याच म्हणण्यानुसार त्या स्त्रीने त्याला आपल्या पतीला ठार मारण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे एक प्रकारे तीही त्याच्या त्या गुन्ह्यात सहभागी आहे. पण ती मात्र स्वतःचा सहभाग तर नाकारतेच, पण ताजोमारूच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीचा मृत्यू झाल्याचेही नाकारते. त्यामुळे तिची साक्ष ग्राह्य मानावी तर सामुराईच्या हत्येचा दोष ताजोमारूच्या शिरी येत नाही, त्यामुळे त्याची - निदान त्या गुन्ह्याच्या आरोपातून - निर्दोष मुक्तता करावी लागते. पण मग खून नक्की कसा झाला की त्या सामुराईने आपल्या ब्रीदाला अनुसरून हाराकिरी केली हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

त्या स्त्रीच्या साक्षीचा तपशील भिक्षूने सांगून संपला आहे. दिङ्मूढ होउन तो मान खाली घालून बसला आहे. आता त्या तिसर्‍या माणसाने कुठून तरी एक फळ पैदा केले आहे. इतर दोघांशी वाटून घेण्याची तसदी न घेता तो एकटाच ते खातो आहे. पाऊस अजूनही पडतोच आहे. "माझा तर विश्वासच बसत नाही." तो माणूस म्हणतो. "पण स्त्रिया त्यांच्या अश्रूंचा वापर करून कोणालाही मूर्ख बनवू शकतात, त्यांना स्वत:ला देखील." आणि या मतावर ठाम असल्याने त्या स्त्रीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही असा निर्णय तो देतो.

इथे या संशयात्म्याच्या दृष्टिकोनातून त्या स्त्रीच्या साक्षीकडे पाहिले तर कदाचित एक वेगळे चित्र समोर येऊ शकते. तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर कोर्टात साक्ष देताना सुरवातीलाच पालथे पडून बराच विलाप केलेला आहे. तिच्यावरील अत्याचाराचा नि पतीच्या मृत्यूने तिने स्वत:वरील अत्याचाराचा तपशील आपल्या साक्षीमधे सांगितला नाही याचे कारण जसे स्त्रीसुलभ लज्जा असेल, तसेच- कदाचित - ताजोमारू म्हणतो त्याप्रमाणे ती त्याला वश झालेली आहे नि म्हणून याबाबतचा तपशील टाळते आहे असेही असू शकतो.

स्वत:वरील अत्याचाराऐवजी पतीच्या दुरवस्थेबद्दल सांगताना एकीकडे ती आपण आपल्या दु:खापेक्षा पतीच्या दुरवस्थेमुळे दु:खी झालो हे सांगत आपले पातिव्रत्य न्यायासनासमोर ठसवू पाहते आहे. दुसरीकडे जर समजा ती ताजोमारूला वश झाली होती हे सिद्ध झालेच तर दुसर्‍या बाजूने अशा विकल, दुबळ्या - सामुराई असूनही ज्याला एक अप्रशिक्षित डाकूने देखील सहज बंदिवान केले - पतीकडून आपले संरक्षण होण्याची शक्यता नसल्याने आपण परिस्थितीशरण झाल्यानेच त्या डाकूला वश झाल्याचा दावा करू शकते. थोडक्यात दोनही बाजूंनी आपली बाजू बळकट करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो.

ताजोमारू नि ती स्त्री यांच्या परस्परविसंगत साक्षींमुळे निर्णायक मतासाठी खुद्द सामुराईच्याच आत्म्याशी माध्यमाद्वारे संवाद साधून सत्य काय ते जाणून घ्यावे असा निर्णय घेतला गेला असे भिक्षू त्या माणसाला सांगतो.

CommonMan
चांगुलपणा हे बहुधा गृहितकच असावे.

"नाही, त्याचीही साक्ष खोटी आहे." लाकूडतोड्या उसळून म्हणतो नि शेकोटीपासून उठून तरातरा दूर निघून जातो. "पण मृतात्मे खोटं बोलंत नाहीत. माणसे इतकी पापी असतात असे मला वाटंत नाही." भिक्षू सर्वमान्य गृहितक सांगतो. थोडक्यात सांगायचं तर हाही प्रश्न केवळ विश्वासाचाच राहतो. ’"हुं, तुझ्या भाबडेपणाला साजेसेच आहे हे गृहितक." तो माणूस उडवून लावतो. तो विचारतो "मुळात निव्वळ चांगले असे काही असते का? की चांगुलपणा हे ही एक लादलेले गृहित-सत्य आहे?" गृहितकांच्या आधारे आयुष्य जगणारा भिक्षू या कल्पनेनेच शहारतो. "माणसाला वाईट ते ते विसरायला नि बनवून सांगितलेल्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला आवडते. कारण ते सोयीचे असते." तो माणूस म्हणतो.

(क्रमश:)

पुढील भाग >> जंगलवाटांवरचे कवडसे - ६ : सामुराईच्या आत्म्याची साक्ष


हे वाचले का?

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ४ : ताजोमारूची साक्ष

जंगलवाटांवरचे कवडसे - ३ : कथाप्रवेश << मागील भाग
---

ताजोमारू सांगू लागतो. "ती दिवसांपूर्वीची गोष्ट. रणरणत्या दुपारी एका विशाल वृक्षातळी मी विश्रांती घेत पडलो होतो. समोरून एक पुरूष घोड्यावर बसलेल्या एका स्त्रीला घेऊन येत होता. मला पाहताच तो थांबला. त्याच्या चेहर्‍यावर भय दिसले. नकळत त्याने आपल्या तरवारीला हात घातला. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपी जाण्याच्या प्रयत्नात होतो. ते पाहून तो थोडा आश्वस्त झाला. एक नजर माझ्यावर ठेवून तो पुढे चालू लागला. ते माझ्याजवळून पुढे जात असतानाच ती झुळुक आली. पाने सळसळली नि मला ओलांडून त्या घोड्यावरील स्त्रीला स्पर्श करून पुढे निघून गेली. त्या झुळुकीने त्या स्त्रीचे अवगुंठन दूर झाले नि तिचा चेहरा माझ्या नजरेस पडला.

कदाचित तिचा चेहरा क्षणभरच दिसला म्हणून असेल (थोडक्यात ती खरंतर फारशी सुंदर नसावी किंवा निदान आज ती तशी वाटत नाही हे तो सूचित करतो आहे.) पण मला एखादी देवीच नजरेस पडल्याचा भास झाला. त्याच क्षणी मी ठरवले, हिला हस्तगत करायचेच. भले त्यासाठी तिच्या पुरूषाला ठार मारावे लागले तरी बेहत्तर. अर्थात तसे करावे न लागता ती मिळाली तर त्याहुन उत्तम. मला तिच्या पुरूषाला ठार न मारता तिला आपलेसे करायचे होते. (इथे तो ’मिळवण्याची’ भाषा करतो आहे, भोगण्याची नव्हे. तसेच मला त्याला मारायचे नव्हते असे म्हणत आपण हेतुत: ही हत्या न केल्याचेही ठसवतो आहे.) "पण मी ते यामाशिनाच्या रस्त्यावर करू शकत नव्हतो, त्यासाठी त्यांना जंगलात आडबाजूला नेणे आवश्यक होते. "

ताजोमारू त्यांच्या मागे धावत सुटतो. धापा टाकत त्यांना गाठतो. सामुराई त्याच्याकडे वळतो नि विचारतो "काय हवंय तुला?". ताजोमारू लगेच उत्तर देत नाही. काही क्षण तो सामुराईला न्याहाळत राहतो. कदाचित आपल्या प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत असावा. यावरून वासनेने पीडित असूनदेखील ताजोमारू बेफाम अथवा उतावीळ झालेला नाही, पुरेसा सावध आहे हे दिसून येते. तो घोड्याभोवती एक फेरी मारतो नि तिचा चेहरा पुन्हा दिसतो का याचा अंदाज घेतो. सामुराई पुन्हा एकवार त्याला सामोरा येतो नि पुन्हा तोच प्रश्न विचारतो. दोनही वेळा या प्रश्नाचे उत्तर न देता ताजोमारू अंगावर बसलेला डास एका फटक्यात चिरडून टाकतो. हळूहळू पावले टाकत निघून जात असल्याचा आव आणतो नि अचानक फिरून सामुराईवर खोटा खोटा हल्ला चढवतो. सामुराई पुरेसा सावध आहे याचा त्याला अंदाज येतो. गडगडाटी हसून तो सामुराईला घाबरायचे कारण नाही असे सांगतो. त्याचा विश्वास बसावा म्हणून आपली तलवारदेखील त्याला पहायला देतो.

'जवळच असलेल्या एका प्राचीन आणि पडक्या अवशेषांमधून मला अनेक उत्तमोत्तम तलवारी नि आरसे आपल्याला मिळाले आहेत. मी ते काढून पलिकडे ढोलीत लपवून ठेवले आहेत. तुला हवे असतील तर ते तुला स्वस्तात विकू शकतो' असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवतो. समोरचा सामुराई आहे त्यामुळे शस्त्र हे त्याला अतिप्रिय असते हे जोखून तो त्याला मोहात पाडतो आहे. त्याच्यावर ही मात्रा नाहीच चालली तर आरशांची लालूच त्याने त्या स्त्रीसाठी दाखवली आहे. स्वत:साठी नाही तरी स्त्रीच्या आग्रहाखातर त्या सामुराईला आपण आपल्याबरोबर येण्यास भाग पाडू शकतो असा त्याचा होरा आहे.

बाराव्या शतकात आरशांची उपलब्धता फारशी नसावी. एकेकाळी घरात फोन असणे, टीव्ही असणे हे जसे दुर्मिळ अथवा प्रतिष्ठेचे समजले जात असे तसेच एखाद्या स्त्रीकडे शृंगारासाठी स्वत:चा आरसा असणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असेल कदाचित. त्यामुळे हा दुसरी लालूच त्या स्त्रीसाठी आहे. जेणेकरून सामुराई मोहात पडला नाहीच तर ती स्त्री मोहात पडण्याची शक्यताही तो निर्माण करतो आहे. मुख्य रस्त्यापासून दूर जंगलात त्यांना खेचून नेण्यासाठी त्याने हा दुहेरी डाव टाकलेला आहे.

Lady_n_Horse
ओढ्याकाठी बांधलेला घोडा आणि स्त्री.

एका ओढ्याकाठी आपला घोडा नि स्त्री यांना थांबवून तो सामुराई ताजोमारूबरोबर जातो. त्यावेळी पडद्यावर असलेला लहानसाच पण वाहता ओहळ नि झर्‍याचे पाणी पितानाही बुरख्यातच असणारी स्त्री नि बाजूलाच लगामाने बद्ध असलेला घोडा त्या स्त्रीचे नि घोड्याचे सामाजिक स्थान सूचित करतात. गर्द जंगलात समोरासमोरच्या लढाईत तसेही निरुपयोगी असणारे धनुष्य नि बाण त्या स्त्रीजवळच सोडून सामुराई केवळ तलवार बरोबर घेऊन ताजोमारूबरोबर जातो. ताजोमारू घाईघाईने पुढे चालला आहे. जंगलाची सवय नसलेल्या सामुराईची त्याच्याबरोबरीने चालताना तारांबळ उडते आहे. त्या स्त्रीपासून पुरेसे दूर गेल्यानंतर ताजोमारू क्षणभर थांबतो नि सामुराईला पुढे जाऊ देतो. संधी साधून मागून हल्ला करून तो नि:शस्त्र करतो नि कमरेच्या दोरीने त्याला बांधून घालतो.

धावतच तो त्या स्त्रीकडे परत येतो. आता त्या स्त्रीलाही तो मुख्य रस्त्यापासून आत नेऊ पाहतो आहे. त्यासाठी तिचा नवरा आत अचानक आजारी झाल्याचे तिला सांगतो. हे ऐकून ती व्यथित होते नि धक्क्याने आपले अवगुंठण दूर करते. आता तिचा चेहरा ताजोमारूला पूर्ण दिसतो. आडरानात आपल्या पुरूषावर ओढवलेल्या प्रसंगाने तिचा चेहरा पांढराफटक पडलाय. थिजलेल्या नजरेने ती ताजोमारूकडे पाहते आहे. "तिच्या चेहर्‍यावर एखाद्या लहान मुलाची निरागसता होती. मला त्या पुरूषाचा हेवा वाटला. अचानक मला त्याचा तिरस्कार वाटू लागला.तो किती दुबळा आहे हे मला तिला सांगायचे होते. त्या पाईन वृक्षाखाली मी किती सहजपणे त्याच्यावर मात केली हे मला तिला दाखवावेसे वाटले." ताजोमारू तिला तिच्या नवर्‍याकडे घेऊन जातो. ते वेगाने जात असतानाच तिच्या हातातील तिची हॅट - नि त्याला जोडलेला तो बुरखा - वाटेतील एका झुडपावर अडकून राहतो. (जो पुढे त्या लाकूडतोड्याला सापडल्याचा उल्लेख त्याने त्याच्या साक्षीमधे केलेला आहे.)

TheLadyAttacks
ताजोमारूवर खंजीराने हल्ला करणारी सामुराईची स्त्री.

नवर्‍याची ती केविलवाणी स्थिती पाहून ती संतापाने उसळते. कंबरेला लावलेला खंजीर काढून ताजोमारूवर हल्ला चढवते. अर्थात ताजोमारू-सारख्या निर्ढावलेल्या गुन्हेगारासमोर तिचा पाड लागणारच नसतो. लहान मुलाशी खेळावे तसा तो तिचे वार चुकवत असतो. पण त्याचबरोबर "आपण अशी निर्भय नि शूर स्त्री कधीही पाहिली नव्हती" अशी कबुली देतो. (यात एकप्रकारे अशा स्त्रीलाही मी अंकित केले हा आत्मगौरवाचाही एक धागा गुंतलेला आहे.)

अखेर थोड्या लुटूपुटूच्या प्रतिकारानंतर तो तिला पकडतो नि तिचा भोग घेतो. तो तिला पकडून तिचा भोग घेऊ पहात असतानाच तिच्या हातातील खंजीर हलकेच गळून पडतो नि जमिनीत रुततो. हे खंजीराचे रुतणे एका बाजूने जबरी संभोगाचे/बलात्काराचे निदर्शक आहे.पण ज्याप्रकारे हलके हलके तो खंजीर तिच्या हातून निसटू लागतो ते पाहता प्रतिकार सोडून ती त्याच्या स्वाधीन होते आहे अशीही एक शक्यता दिसून येते.

त्याचबरोबर हा खंजीर गळून पडत असताना ताजोमारूच्या खांद्यावरून मागे तिला पर्णराजीतून डोकावू पाहणारा सूर्य दिसतो. त्याचे चार चुकार कवडसे तिच्या चेहर्‍यावर पडलेले दिसतात. तिचे डोळे हळूहळू मिटत जातात. आता हे डोळ्यावर पडलेल्या कवडशांनी दिपून गेल्याने की प्राप्त परिस्थितीला शरण गेल्याचे निदर्शक आहे हे कुरोसावा प्रेक्षकाला सांगत नाही, तुमचे तुम्ही समजून घ्यायचे असते. ताजोमारू दुसरी शक्यता सत्य म्हणून ठसवू पाहतो. माझ्या शौर्याला अखेर ती शरण आली, माझ्या स्वाधीन झाली असा त्याचा दावा आहे. म्हणूनच आपल्या भोगाचे वर्णन करताना तो तिने एका हाताने आपल्याला कवटाळल्याचा, देहभोगाला एक प्रकारे संमती दिल्याचा उल्लेख करतो.

ताजोमारू तिचा प्रतिकार मोडून तिला कवेत घेतो तेव्हाच तो तिरक्या नजरेने तिचा पुरूष हे पाहतो आहे ना याची खात्री करून घेतो. यात स्त्रीसुखाबरोबरच त्या सामुराईच्या - दुसर्‍या पुरुषाच्या - मानखंडनेचे सुखही तो भोगू पाहतो आहे. एक प्रकारे आपले शौर्य, आपली मर्दानगी तो सिद्ध करू पाहतो आहे. हे कोर्टात सांगत असतानाही तो खदाखदा हसत असतो. "अखेर त्याला न मारता मी त्याची स्त्री मिळवली." अशी बढाई तो मारतो. मला अजूनही/तरीही त्याला ठार मारायची इच्छा नव्हती असा दावा तो करतो.

त्या स्त्रीला आपलेसे करण्याचा - भोगण्याचा - हेतू साध्य झाल्यानंतर ताजोमारू त्या दोघांना तिथेच सोडून निघून जाऊ पाहतो. (इथे ताजोमारू किंचित फसलेला आहे. आधी तिला आपलेसे करण्याची इच्छा असल्याचा दावा करणारा तो, तिच्याशी संग करून चालू लागल्याचे सांगतो तेव्हा हे त्याच्या आधीच्या दाव्याला छेद देऊन जाते हे त्याच्या ध्यानात येत नाही. ) ती स्त्री त्याला धावत जाऊन थांबवते. ती म्हणते "आता एकतर तू मेलं पाहिजेस किंवा माझ्या पतीने तरी. माझ्या अब्रूचे धिंडवडे दोन पुरूषांनी पाहिले आहे. हे तर मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तेव्हा तू त्याला ठार मार किंवा तुम्ही दोघांनी द्वंद्व करावे. जो जिवंत राहिल त्याच्याबरोबर मी राहीन."

त्या काळातील सामाजिक नीतीच तिच्या तोंडाने बोलते आहे. स्त्री ही जिंकून घेण्याची, हिरावून घेण्याची वस्तू आहे. लढणार्‍यांनी तिच्या मालकीचा फैसला करावा हाच नियम होता. त्याचीच आठवण ती ताजोमारूला करून देते आहे. ताजोमारू सामुराईला बंदिवासातून मोकळे करतो नि त्याची तलवार त्याला परत देतो. हे सांगताना आपली न्यायबुद्धी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला कपटाने बंदिवान केले असले तरी त्याला असहाय्य स्थितीत मारलेले नाही असा त्याचा दावा आहे.

TheDual
ताजोमारूवर खंजीराने हल्ला करणारी सामुराईची स्त्री.

ताजोमारूच्या साक्षीतून दिसणारे द्वंद्व हे जवळजवळ समसमा स्वरूपाचे आहे. दोघेही समबल आहेत नि सारख्याच त्वेषाने लढताहेत. युरपिय पद्धतीच्या द्वंद्वातून न दिसणारे असे हूल देण्याचे पवित्रेही वापरत आहेत. ताजोमारू हा जंगलचा डाकू असल्याने त्याच्या पवित्र्यांमधे शस्त्राघाताबरोबरच आरडाओरड करून समोरच्याला विचलित करण्याचे, छद्म युद्धाचेही तंत्र वापरले जाते. उलट सामुराई हा प्रशिक्षित नागर योद्धा आहे. तो स्थिर नजरेने नि एकाग्रतेने वार करतो आहे. अखेर एका क्षणी सामुराई जमिनीवर पडतो, त्याची तलवारही बाजूच्या झुडपात अडकल्याने हातातून निसटते. गडगडाटी हसत ताजोमारू आपल्या तलवारीने भोसकून त्याला ठार मारतो. मला त्याला सन्मानाचा मृत्यू द्यायचा होता नि तो मी दिला असे ताजोमारू फुशारकीने न्यायासनासमोर सांगतो. तो सांगतो "त्याने माझ्यावर २३ वार केले. यापूर्वी कोणीही वीसचा आकडा पार करू शकला नव्हता."

'त्या स्त्रीचे पुढे काय झाले?' या न्यायासनाकडून आलेल्या प्रश्नावर "मला ठाऊक नाही. तिच्या पतीला ठार केल्यावर मी वळून पाहिले तेव्हा ती आधीच नाहीशी झालेली होती" असे तो सांगतो.” मी मुख्य रस्त्यावर येऊन तिचा शोध घेतला. पण तिथे फक्त तिचा घोडाच मला दिसला. मी तिच्या आक्रमकतेवर लुब्ध झालो होतो, पण तीही अखेर एक सामान्य स्त्रीच निघाली." त्याची तलवार गावात विकून त्याबदली त्यातून आलेल्या पैशातून आपण आपण दारू खरेदी केल्याची माहिती तो देतो. परंतु ज्या खंजीराच्या सहाय्याने ती लढली तो खंजीर कुठे आहे या प्रश्नावरही तो ते आपल्याला माहित नसल्याचे सांगतो. "त्याच्यावर मोती जडवलेले होते. त्याबाबत मी पार विसरूनच गेलो की. अगदीच मूर्ख आहे मी. तो तिथेच सोडून येण्यात फारच मोठी चूक केली मी." अशी खंतही तो व्यक्त करतो.

या खंजिराचे अस्तित्व नि त्याचे अखेर काय झाले असावे याबाबत एकाहुन अधिक शक्यता असू शकतात. कदाचित असा खंजीर काही नव्हताच नि त्याच्या सहाय्याने त्या स्त्रीने ताजोमारूवर केलेला हल्ला हा पूर्णपणे ताजोमारूचा बनावच असू शकतो. यातून ती स्त्री दुबळी वगैरे नव्हती असे सूचित करून तो तिच्या प्रती असणारी न्यायासनाची सहानुभूती कमी करू शकतो. आता मुळात अस्तित्वातच नसलेला खंजीराचे पुढे काय झाले हे कसे काय सांगता येणार. दुसरी शक्यता ही की तो खंजीर त्या संघर्षात त्या जंगलाच कुठेतरी पडला असावा. तिसरी शक्यता म्हणजे ताजोमारू नि सामुराईचे द्वंद्व चालले असताना जेव्हा ती स्त्री तिथून नाहीशी झाली तेव्हा जाताना तिने आपल्याबरोबर नेला असावा. आणखीही एक चौथी शक्यता चित्रपटातील न्यायासनासमोर नसली तरी कुरोसावाच्या न्यायाधीशांसमोर म्हणजे प्रेक्षकांसमोर येते, पण त्याबद्दल नंतर.

गोषवाराच सांगायचा झाला तर त्याची साक्ष अशी सांगते की ती स्त्री मी माझ्या शौर्याने मिळवली. एवढेच नव्हे तर तिने राजीखुशीने माझ्याशी संग केला आणि तिच्याच आग्रहावरून मी तिच्या पतीला ठार मारले आणि तो प्रतिस्पर्धीही असा शूरवीर असून. गुन्ह्याची कबुली देतानाही अप्रत्यक्षपणे तो आपले शौर्य, आपली मर्दानगी ठसवू पाहतो.

ताजोमारूच्या साक्षीचा तपशील लाकूडतोड्यांने सांगून झाला आहे. तिसरा माणूस म्हणतो "सर्व डाकूंमधे ताजोमारू सर्वात मोठा स्त्रीलंपट म्हणून प्रसिद्ध आहे. घोडाही न घेता पळालेल्या त्या स्त्रीचे जंगलात काय झाले असेल कुणास ठाऊक."

भिक्षू सांगतो, "ती परवा कोर्टात आली होती. पोलिसांनी तिला शोधून काढेपर्यंत ती देवळात लपून बसली होती."

"खोटं आहे सारं. ताजोमारू नि ती स्त्री दोघेही खोटारडे आहेत." लाकूडतोड्या म्हणतो. "माणसेच खोटे बोलतात." तिसरा माणूस हसून म्हणतो. "बहुतेक वेळ आपण स्वत:शी देखील प्रामाणिक नसतो." "शक्य आहे..." भिक्षू म्हणतो "माणसे दुबळी असतात म्हणून ती स्वत:लाही फसवतात." "हुं. झालं यांचं प्रवचन सुरू." तिसरा माणूस वैतागून म्हणतो. . "ते खरं आहे का खोटं याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. फक्त ते मनोरंजक असलं की मला पुरे." (इथे पुन्हा ऑस्कर वाईल्डच्या लॉर्ड हेन्रीची आठवण होते.) भिक्षू सांगतो "तिची साक्ष ताजोमारूच्या साक्षीच्या अगदी विपरीत अशी होती. तो म्हटला त्याप्रमाणे ती आक्रमक वगैरे मुळीच वाटत नव्हती. उलट अगदीच दुबळी, आज्ञाधारक नि दयनीय अशी भासत होती."

आता त्या स्त्रीच्या निवेदनाचा तपशील भिक्षू त्या तिसर्‍या माणसाला सांगू लागतो.

(क्रमश:)

पुढील भाग >> जंगलवाटांवरचे कवडसे - ५ : स्त्रीची साक्ष


हे वाचले का?

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ३ : कथाप्रवेश

जंगलवाटांवरचे कवडसे - २ : दोन कथा, सहा माणसे << मागील भाग
---

"क्योटो: बारावे शतक, दुष्काळ आणि लढाया यांनी उद्ध्वस्त झालेली राजधानी"*

RashomonGate
राशोमोन द्वार

धुवांधार पाऊस कोसळतोय. कधीकाळी भक्कम वाटावेत असे वासे असलेले छप्पर शिरी घेऊन एक वेशीसारखे द्वार उभे आहे. पण ते छप्पर आता विवर्ण झाले आहे. त्यातील छिद्रातून, भगदाडातून तो पाऊस बेलगामपणे आत घुसतो आहे. आजूबाजूला मोडून पडलेले वासे दिसतात नि शबल झालेल्या भिंती. कधीकाळी या वैभवशाली असलेल्या द्वाराला तोलून धरणारे चार-पाच पुरूष उंचीचे नि किमान दोघा-तिघांना मिळूनच कवेत घेता येतील असे भरभक्कम खांबही आता विदीर्ण झाले आहेत. छपराला दाद न देता आत घुसलेल्या पावसाच्या पाण्याने जमिनीवर तळी साचली आहेत. बाजूलाच या द्वाराचा कधीकाळी आधार असलेला एक भक्कम खांब पराभूत होऊन धराशायी झालेला दिसतो. द्वाराच्या डाव्या बाजूला एका वठलेल्या झाडाचे खोड एका बाजूला झुकलेले आहे.

या भग्न द्वाराच्या छपराची एक बाजू हाडा-काडयांचा रुपात कशीबशी तग धरून उभी आहे. तुलनेने बर्‍या स्थितीत असलेल्या दुसर्‍या बाजूला पावसापासून बचाव करण्याच्या हेतूने आश्रयाला आलेले दोन पुरूष विसावले आहेत. लहानशी गोल टोपी घातलेला एकजण थेट जमिनीवर बसला आहे तर दुसरा विरलेला किमोनो परिधान केलेला पुरूष तिथल्या एका बैठकीच्या दगडावर - पहिल्यापासून थोडा उंचावर - विसावला आहे. जवळून पाहता दोघेही कुठेतरी शून्यात पहात कसल्याशा विचारात गढून गेलेले दिसतात. टोपीवाला एक सुस्कारा सोडतो नि म्हणतो ’मला समजत नाही.... मला अजिबातच समजत नाही.’

त्या दोघांपैकी टोपीवाला हा एक लाकूडतोड्या आहे तर दुसरा बौद्ध भिक्षू. ते तिथे बसलेले असतानाच दुरून एक तिसरा माणूस पावसापाण्याने झालेली तळी तुडवत त्या द्वाराकडे येतो. यावेळी पडद्यावरील दृष्य हे त्या धावत जाणार्‍या माणसाच्या पाठीमागून आपण पहात असतो. समोर असलेल्या त्या द्वाराकडे धावत जाणार्‍या त्या माणसाचा पाठलाग करत असताना पार्श्वभूमीवर ते द्वार हळूहळू पुरे दृश्यमान होत जाते. ज्या क्षणी ते पडद्यावर पूर्ण साकार होते त्या क्षणी एक विलक्षण दृश्य दिसते. आपल्या उजव्या बाजूला - ज्या बाजूचे छत विवर्ण झाले आहे - त्या बाजूला आकाशात पांढरे ढग दिसतात. उरलेल्या सार्‍या आकाशात मात्र काळ्याकभिन्न जलदांचे साम्राज्य दिसते आहे. यात काळे ढग पांढर्‍यांवर आक्रमण करताहेत की पांढरे काळ्यांचे साम्राज्य उलथण्याच्या निर्धाराने सामोरे जात आहेत हे सांगणे अवघड होऊन बसते.

Blank_n_White
तिसरा माणूस राशोमोन द्वाराकडे येतो आहे.

तिसरा माणूस द्वाराच्या छताखाली उभे राहून तो आपले ओले कपडे काढून पिळत असतानाच त्या लाकूडतोड्याचे पुन्हा एकवार ’मला काहीच समजत नाही’ हे उद्गार त्याच्या कानी पडतात. त्याचे लक्ष या दोघांकडे जाते. ’मला अजिबातच काही समजत नाही.’ लाकूडतोड्या पुन्हा पुन्हा म्हणत राहतो. तो माणूस लाकूडतोड्याजवळ येतो नि त्याला विचारू लागतो की ’तुला काय समजत नाही?’ ’मी अशी विचित्र गोष्ट कधीही ऐकली नाही’ लाकूडतोड्या सांगतो. भिक्षूही त्याच्या म्हणण्याला दुजोरा देतो. ’काय झाले आहे?’ माणूस भिक्षूला विचारतो. ’एका माणसाचा खून झाला आहे.’ भिक्षू प्रास्ताविक करतो. ’एकाच?’ तो माणूस उद्गारतो. ’त्यात काय मोठंसं, या द्वारावर एका वेळी पाच-सहा तरी बेवारस प्रेते पहायला मिळतात.’ तो तुच्छतेने उद्गारतो. भिक्षू खेदाने होकार देतो. त्याच्याच निवेदनातून तो काळ उलगडू लागतो.

युद्ध, रोगराई, भूकंप, वादळाच्या एकामागून एक आलेल्या अरिष्टांमुळे आधीच उद्ध्वस्त झालेली नगरी नि त्यात दरोडेखोरीचे थैमान त्यामुळे जगण्यावरील विश्वास हरवून बसलेली, कडवट झालेली सामान्य माणसे. भिक्षूही किड्यामुंग्याप्रमाणे, चिलटांप्रमाणे माणसे चिरडली गेल्याचा नि त्याला आपण साक्ष असल्याचा उल्लेख करतो. पण ही जी अविश्वसनीय वाटणारी घटना आहे त्यानंतर आपण माणुसकीवरचा, माणसाच्या अंतरात्म्यावरचा विश्वास गमावल्याचे सांगतो. जे घडले ते आधी उल्लेख केलेल्या अरिष्टांपेक्षाही भयानक होते असा त्याचा दावा आहे. इतक्या सार्‍या विध्वंसक घटनांपेक्षाही या घटनेत विदारक असे काय असावे की त्या तांडवातही न गमावलेला माणुसकीवरचा विश्वास एका व्यक्तीच्या मृत्यूने त्याने गमवावा?

तिसरा माणूस 'पुरे करा तुमचे प्रवचन' म्हणून त्याला डाफरतो, बिनदिक्कतपणे त्या द्वाराच्या दोन फळ्या तोडून घेतो नि शेकोटी पेटवतो. (यातून त्या द्वाराच्या विदीर्ण अवस्थेला नैसर्गिक र्‍हास जसा कारणीभूत आहे तशीच माणसाची करणीदेखील याची अप्रत्यक्ष नोंद केली जाते.) मनावरील ताण असह्य झालेला लाकूडतोड्या त्याच्याकडे धावतो नि त्याला म्हणतो ’कदाचित तू यातून काही अर्थ सांगू शकशील. मला त्या तिघांचे काही समजतच नाही.’ ’खाली नीट बैस नि मला शांतपणे नीट समजावून सांग’ तो माणूस म्हणतो. लाकूडतोड्या त्याच्या शेजारी जमिनीवर बसतो नि सांगू लागतो. ’ती दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मी जंगलात लाकडे आणायला गेलो होतो....’

इथेही सत्यान्वेषणाबाबत एका प्रचलित पद्धतीचा आधार लाकूडतोड्या घेऊ पाहतो. सत्य काय ते मला ठाऊक नाही, पण दुसर्‍या कोणाला ते ठाऊक असावे अथवा उमगावे नि त्याने ते आपल्याला उलगडून सांगावे अशी मूलभूत इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली आहे. इथे ज्याच्याकडून ती अपेक्षा आहे त्याचा पूर्वेतिहास अथवा लाकूडतोड्या जे सांगतो त्यातून योग्य अर्थ काढण्याची त्याची गुणवत्ता (इलिजिबिलिटी) दोन्ही याबाबत लाकूडतोड्याला काहीही पूर्वकल्पना नाही. समाजात मान असलेला नि सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शक म्हणून मान्य असलेला भिक्षूही ज्या समस्येपुढे हतबुद्ध झाला आहे त्याबाबत हा सर्वस्वी तुच्छतावादी दिसणारा माणूस काही उलगडून दाखवू शकेल असे लाकूडतोड्याला का वाटावे हे वरकरणी अनाकलनीय वाटेल. परंतु हा मनुष्यस्वभाव आहे. ’दोघांपेक्षा तिसरा शहाणा’ या उक्तीचा परिणाम आहेच शिवाय या निमित्ताने त्याला घटनाक्रमाची पुन्हा उजळणी करता येईल, नि त्या दरम्यान स्वतःकडून दुर्लक्षले गेलेले काही तपशील पुन्हा बारकाईने तपासता येतील हा एक संभाव्य फायदाही त्याच्या मनात असावा.

लाकूडतोड्याच्या कथनाची सुरवात होते ती जंगलात, सूर्यावर कॅमेरा रोखून. पण हा कॅमेरा स्थिर नाही, तो एका निश्चित गतीने पुढे सरकतो आहे. त्यामुळे वृक्षराजीतून त्याला दिसणारा सूर्य लपंडाव खेळताना दिसतो. त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही, अधूमधून नि खंडशः दिसणार्‍या त्याच्या प्रकाशाच्या तुकड्यांवरून त्या विशाल वृक्षांच्या पर्णराजीपलिकडे वर त्याचे स्थान असावे इतके नक्की सांगता येते.

त्यानंतर दिसतो तो एका व्यक्तीचा खांदा नि त्यावरील कुर्‍हाड, जिचे पाते एका चामड्याच्या तुकडयाने अवगुंठित केले आहे. सुरुवातीला दिसणारे सूर्य नि अवगुंठित कुर्‍हाड ही कुरोसावाने पुढील कथेची केलेली नांदीच आहे. खांदा खुद्द निवेदक लाकूडतोड्याचा. जंगलातून चाललेला असता त्याचा दृष्टीस पडते ती एक टोपी, जपानी भद्र समाजातील स्त्रिया उन्हापासून आपले संरक्षण करताना घालतात ती गोल टोपी, त्याला असलेल्या झिरझिरित अवगुंठन. थोडे पुढे गेल्यावर त्याला सापडते सामुराई लढवय्ये वापरतात तशी लहानशी टोपी. मग सापडते ती एक दोरी.

थोडे पुढे गेल्यावर वाटेवर एक चमकदार वस्तू पडलेली त्याला दिसते. त्यावरून परावर्तित झालेल्या कवडशामुळे त्याच डोळे दिपतात. ती वस्तू नक्की आहे तरी काय हे निरखून पहात तो तिच्याकडे जात असताना तो अडखळतो. आपण कशाला अडखळलो हे पाहू जाता त्याला दिसते ते दोन हात समोर करून पडलेले एक प्रेत. घाबरून तो पळ काढतो. त्याची कुर्‍हाड, त्याने उचलून घेतलेली सामुराईची टोपी नि ती दोरी त्या धावपळीत तिथेच पडतात.

लाकूडतोड्याला सापडलेल्या वस्तूंबाबत काही लक्षणीय आहे. तीनही वस्तू एका जागी सापडलेल्या नाहीत. तो घटनाक्रम अंशा-अंशाने प्रकट होत जातो आहे. त्या तीनही वस्तूंची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे आहे हे पुढे स्पष्ट होते. प्रत्येक वस्तू त्या त्या व्यक्तीबद्दल काही सांगून जाते. अवगुंठन हे स्त्रीचे आहे हे तर उघडच आहे पण त्याचबरोबर ती स्त्री प्रतिष्ठित अथवा भद्र समाजातली असावी. दुसरी टोपी एका सामुराईची, त्यामुळे त्याचा मालक एक सामुराई असावा याबाबत शंका घेण्याचे कारणच नाही. तिसरी आहे ती दोरी ही तशी सामान्याचे साधन, ते एखाद्या लाकूडतोड्याचे असू शकते अथवा एखाद्या डाकूचे. थोडक्यात त्या तीन वस्तू तीन तिथे व्यक्तीचे अस्तित्व सूचित करतेच नि त्यांच्या सहभातून घडलेल्या घटनेची परिणती ते प्रेत लाकूडतोड्याला दाखवत असते.

तीन दिवसांनी लाकूडतोड्याला न्यायालयात साक्षीसाठी बोलावणे येते.

लाकूडतोड्या साक्ष देतो आहे. पण इथे पडद्यावर न्यायाधीश नाही. तो सरळ कॅमेर्‍याकडे पहात बोलतो आहे. एकप्रकारे हा प्रेक्षकांशीच संवाद आहे. न्यायाधीशांनी विचारलेले प्रश्न प्रेक्षकांना ऐकू येत नाहीत (जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रेक्षकच ते प्रश्न विचारताहेत), पण साक्ष देणार्‍याला ते ऐकू येतात. साक्ष देणारा वाळूवर बसला आहे. त्याच्या पाठीमागे भिंत आहे नि तिच्यावरून मागचे आकाश दिसते आहे. तो बसलेल्या ठिकाणी अर्ध्या भागात प्रकाश आहे तर उरलेला अर्धा भाग सावलीत आहे. प्रकाश नि सावली दोघांनाही पुरी जमीन व्यापता आलेली नाही. सावलीचे क्षेत्र, मग दिसणारे कडक उन्हाचा पट्टा, त्यानंतर थोड्या अधिक गडद रंगाची भिंत नि पलिकडे काळ्या पांढर्‍या रंगांची घुसळण मिरवणारे आकाश.

WoodcuttersTestimony
लाकूडतोड्या साक्ष देतोय.

त्याला न्यायाधीश विचारतात 'तिथे तू एखादी तलवार पाहिलीस का?' त्यावर तो केवळ ’नाही’ या एका शब्दात उत्तर न देता अतिशय गडबडतो नि घाईघाईने 'नाही, मुळीच नाही' असे ठासून सांगतोय. त्या वाटेवर आपल्याला सापडलेल्या त्या तीन वस्तूंव्यतिरिक्त तो झाडावर एके ठिकाणी एक ताईत लटकलेला दिसल्याचा उल्लेखही करतो. तो ताईतही त्याच्या मालकाला अरिष्टाला दूर ठेवू शकलेलाच नसतो.

पुढची साक्ष त्या भिक्षूची. भिक्षू आता लाकूडतोड्या जिथे बसला होता त्या जागी बसलाय. पण त्याच्या मागे काही अंतरावर तो लाकूडतोड्या बसला आहे. प्रत्यक्षात न्यायालयात एकाची साक्ष पुरी झाल्यावर त्याने पुढील साक्षींसाठी अथवा निकालासाठी उपस्थित असणे अनिवार्य नसते. त्यातून पुढच्या साक्षीदाराच्या पाठीमागे बसण्यापेक्षा समोरच्या बाजूला बसून ती ऐकणे अधिक सयुक्तिक नव्हे काय? पण हे वरकरणी अनाकलनीय वाटणारे दृश्य वाटते तितके आश्चर्यकारक नाही. लाकूडतोड्या नि भिक्षू यांच्या साक्षींनंतर पुढील - पोलीस, ताजोमारू, ती स्त्री आणि माध्यमाच्या सहाय्याने दिली गेलेली सामुराईची साक्ष या - सर्व साक्षी/जबान्यांच्या वेळी हे दोघे साक्ष देणार्‍याच्या पाठीमागे बसलेले दिसतात. जंगलातील ज्या घटनेचा अंशमात्रच जाणत असल्याने संपूर्ण घटनाक्रमाबद्दल उत्सुकता असल्याने ते या सार्‍या साक्षीपुराव्यांचे वेळी उपस्थित राहून जंगलात नक्की काय घडले हे जाणून घेऊ पहात आहेत.

भिक्षू सांगतो मी त्या मृत व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी भेटलो आहे, सुमारे तीन दिवसांपूर्वी, दुपारी. एका घोड्याला हाती धरून चालवत नेणारा पुरुष नि त्यावर आरुढ झालेली एक स्त्री, बुरखा असल्याने तिचा चेहरा दिसला नाही. पुरुषाच्या कमरेला तलवार होती, बगलेत बांधलेले धनुष्य नि पाठीवर बाणांचा भाता. त्याचा असा शेवट होईल याची शंकादेखील मला आली नाही. मानवी जीवन प्रात:कालीन दवबिंदूंइतकेच अल्पायुषी असते हेच खरं. जे घडले त्याबद्दल तो खंत व्यक्त करतो नि मृतासाठी प्रार्थना करतो.

भिक्षूची साक्ष ही घटनाक्रमाच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने बव्हंशी निरुपयोगी अशी आहे. लाकूडतोड्याला सापडलेल्या तीन वस्तूवरून आधीच तर्क केलेले एक स्त्री नि एका सामुराईच्या त्या जंगलातील अस्तित्वाला अनुमोदन देण्यापलिकडे त्यातून काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही. समाजात असलेल्या त्याच्या केवळ साक्षीदाराच्या, सहभागशून्य चांगुलपणाच्या भूमिकेचे सादरीकरण यापलिकडे प्रत्यक्ष खटल्यात त्या साक्षीला फारसे महत्त्व नाही. घटनाक्रमामधे सहभागी असलेल्या पहिल्या दोन व्यक्तींचा कथावस्तूमधे प्रवेश या साक्षीमधून होतो. उरलेल्या तिसर्‍याचा प्रवेश पुढील साक्षीतून.

यानंतर न्यायासनासमोर येतो तो ताजोमारू नावाचा डाकू नि त्याला बंदिवान करणारा, बहुधा पोलिस. प्रथम साक्ष होते ती त्या पोलिसाची. पोलिसाची साक्ष चालू असताना शेजारीच बसलेला, बंदिवान केलेला डाकू आकाशात तिसरीकडेच कुठेतरी नजर लावून बसलेला आहे. समोर जे चालू आहे त्याच्याशी आपला काडीचाही संबंध नाही असा त्याचा आविर्भाव आहे. या दोघांच्या पाठीमागे तो लाकूडतोड्या नि भिक्षू बसलेले दिसतात. पोलिस मात्र न्यायासनासमोर अतिशय नम्र आहे. वारंवार अभिवादन करत तो न्यायासनाला आपण त्या डाकूला बंदिवान कसे केले याचा घटनाक्रम उलगडून सांगतो आहे. दोघांच्या समोर एक तलवार, धनुष्य नि बाणांचा भाता ठेवलेला आहे.

’हा जो मी पकडलेला माणूस आहे तो आहे कुप्रसिद्ध डाकू ताजोमारू.’ अशी प्रस्तावना करून तो घडलेला प्रसंग सांगू लागतो नि तो कुरोसावा प्रेक्षकांसाठी पडद्यावर साकार करू लागतो. तो पोलिस दोन दिवसांपूर्वी कत्सुरा नदीकिनारी फिरायला गेलेला असताना तिथे पोट पकडून तळमळत पडलेला ताजोमारू त्याला दिसतो. त्याला तो उठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ताजोमारू त्याला इतक्या जोराने झिडकारतो की तो तीनताड उडून थेट नदीत जाऊन कोसळतो. ताजोमारूच्या शेजारीच कातड्याचे आवरण लावलेल्या धनुष्याबरोबरच गरुडाचे पंख लावलेले काही बाण विखुरलेले दिसतात. जवळच एक घोडा रेंगाळत असतो. (हे सारे त्या मृत माणसाचे, सामुराईचे होते).

ThePoliceTestifying
पोलिसाची साक्ष (बाजूला बंदिवान केलेला ताजोमारू).

पोलिस आपण ताजोमारूला कसे पकडले हे सांगत असताना ताजोमारू आकाशात उलगडणार्‍या ढगांच्या लडींकडे नजर लावून बसला आहे. पोलिसाच्या जबानीकडे जणू त्याचे लक्ष नाही. पोलिस पुढे सांगतो "ताजोमारूचे दुर्दैव हे की त्या चोरलेल्या घोड्याने त्याला फेकून देऊन एक प्रकारे आपल्या धन्याचा सूड उगवला त्याच्यावर." हे ऐकल्यावर मात्र ताजोमारू खाडकन आपली मान फिरवतो नि खुनशी नजरेने फौजदाराकडे पाहतो. मग वेडगळपणाची झाक असलेले गडगडाटी हास्य करतो. ’मला घोड्याने पाडले? मूर्ख कुठला.’ तो म्हणतो. ’त्यादिवशी...’ असे म्हणत तो आपली साक्ष सुरू करतो.

घटनेत सहभागी नसलेल्या किंवा साक्षीभावानेही उपस्थित नसलेल्या तिघांच्या साक्षी आता पूर्ण झालेल्या आहेत. प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तिघांची ओळख प्रेक्षकांना या साक्षींमधून झालेली आहे. आता प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांच्या - हो तिघांच्या, कारण मृत झालेल्या सामुराईची साक्षही कुरोसावा काढतो आहे - साक्षी आता कुरोसावा आपल्यासमोर मांडतो आहे. ’घोड्याने आपल्याला पाडले’ हे पोलिसाचे म्हणणे खोडून काढत ताजोमारू आपले निवेदन सुरू करतो, जे आपल्यासमोर दृश्यरूपात साकार होऊ लागते.

आकाशात काळेकभिन्न ढग विहरत आहेत. त्यांच्यामधून एखादा चुकार सूर्यकिरणांचा पट्टा निसटून जमिनीकडे झेपावतो आहे. क्षितीज अगदी खाली जेमतेम नजरेस येईल इतक्या उंचीवर दिसते आहे. नि त्यावरून अगदी खेळण्यातला वाटावा इतका इटुकला दिसणारा ताजोमारू आरडाओरड करत दौडत जातो.

TinyTajomaru

"... मी घोड्यावरून दौड करत होतो नि मला तहान लागली होती. ओसाकाजवळ एका झर्‍याचे पाणी मी प्यायलो. कदाचित त्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला एखादा विषारी साप मरुन पडला असावा. ते पाणी प्यायल्यावर थोड्याच वेळात मला पोटात वेदना होऊ लागल्या. नदीकाठी येईतो पोटदुखी असह्य होऊन मी खाली कोसळलो नि जमिनीवर तडफडत पडून राहिलो." तुच्छतेने पोलिसाकडे नजर टाकून तो म्हणतो "आणि हा म्हणतो मला घोड्याने पाडले, हुं. एखादा मूर्खच असा मूर्खपणाचा विचार करू शकतो." इथे आपण केवळ योगायोगाने पोलिसाच्या हाती लागलो, पोलिस किंवा घोडा यांच्यापैकी कोणीही आपल्यावर मात केलेली नाही हा अहंकार त्याने जोपासला आहे.

"आज ना उद्या तुम्ही मला पकडणारच होतात. ठीक आहे. काहीही न लपवता आता मी सांगतो. त्या व्यक्तीला ठार मारणारा हा ताजोमारूच होता." आता तो प्रत्यक्ष घटनेबद्दल सांगू लागतो. "तीन दिवसांपूर्वीची दुपार. मी जंगलात एका झाडाखाली झोपलो होतो. अचानक वार्‍याची एक थंडगार झुळुक आली. पुढे जे काही घडले ते या एका झुळुकीमुळे. ती झुळुक आली नसती तर मी त्याला ठार केले नसते..."

(क्रमश:)

पुढील भाग >> जंगलवाटांवरचे कवडसे - ४ : ताजोमारूची साक्ष

_______________________________________________________
*(क्रायटेरियन कलेक्शनमधे उपलब्ध असलेल्या प्रतीमधे - निदान सबटायटल्समधे - हे दिसले नाही. परंतु राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात जेव्हा आम्हाला हा चित्रपट दाखवला गेला तेव्हा पडद्यावरचे पहिले वाक्य हे होते. याच्याशिवाय राशोमोन द्वाराची भग्नावस्था तसेच कथेचा अविभाज्य भाग असलेल्या तिसर्‍या माणसाचे वर्तन प्रेक्षकाला समजावून घेता येणे अवघड होते.)


हे वाचले का?