बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

एफ-१, वन झीरो फाईव: तंबूत शिरू पाहणार्‍या उंटाची गोष्ट

लहानपणी आपण सार्‍यांनीच तंबूत शिरलेल्या उंटाची गोष्ट ऐकली असेल. थोडे डोके तंबूत आणू का, पोटाला थंडी वाजते आहे ते आत घेऊ का, शेपटावर माशा बसून चावताहेत ते आत घेऊ का असे करत हळूहळू पुरा तंबूत शिरलेला नि अखेर मालकालाच हाकलून तंबूच बळकावून बसलेल्या उंटाची गोष्ट! मुळात मालकाने उंट पाळला तो त्याची कामे करण्यासाठी पण अखेर तो मालकाचेच काही हिरावून घेऊ लागला. माणसाच्या जगण्यात असे अनेक अदृष्य उंट त्याच्या हक्काचे बरेच काही बळकावून बसलेले असतात, आधी डोके, मग पोट असे करत संपूर्णपणे तंबूत घुसून तो तंबूच ताब्यात घेतात. यात माणसाने स्वतःच निर्माण केलेल्या व्यवस्था फार मोठा वाटा बळकावताना दिसतात. काहीवेळा हे उंट जन्मतःच आपल्या बोकांडी बसलेले असतात, त्यांच्यापासून सुटका नसते. या उंटांपासून आपले तंबू कसे वाचवायचे असा वरकरणी साधा वाटणारा प्रश्न संदर्भ बदलले की पाहतापाहता अक्राळविक्राळ होऊन बसतो.

आदिम काळापासून माणूस एकटा नाही. त्याची जात कळपाने राहणार्‍या प्राण्याचीच. कळप हा 'साम्यवादी' कधीच नसतो. त्यात अधिकारांची नि कर्तव्यांची उतरंड नेहेमीच अस्तित्वात असते. परंतु आदिमकाळात ही विभागणी कदाचित जबाबदारीचे वाटप या भूमिकेतून असावी आणि ती करण्याची जबाबदारीही कुण्या एका नेत्याची असावी. पण पुढे या रचनेला 'व्यवस्थेचे' रूप येत गेले नि एकाऐवजी अनेक नेते, निश्चित धोरणाधारित व्यवस्था असे काहीसे औपचारिक रूप तिला येत गेले. पण असे घडत असतानाच मुळात माणसाच्या हिताच्या हेतूने केलेली व्यवस्था हे रूप बदलत जाऊन त्या व्यवस्थेने आपलेही हित-अहित निर्माण केले आणि त्यांना आपले घटक असलेल्या माणसाच्या हिताहिताच्या वर नेऊन ठेवले. हा झाला पहिला टप्पा. पुढच्या टप्प्यात तर व्यवस्थेच्या हिताहिताचा विचार करतो असा दावा करत व्यवस्थेच्या ठेकेदारांनी आपलेच हित व्यवस्थेचे हित म्हणून दामटायला सुरुवात केली. माणसाने स्वतःला संस्कृतीच्या आणखी पुढच्या टप्प्यावर आणल्याचा उद्घोष करताना व्यवस्थेचे ठेकेदार नसलेल्यांनीही आपण व्यवस्थेचे हित पहात असल्याची बतावणी करत आपले स्वार्थ साधायला सुरुवात केली. या सार्‍या संक्रमणात मुळात ज्याच्यासाठी हा सारा डोलारा विकसित होत गेला त्या माणसाला मात्र कागदोपत्री स्वातंत्र्याच्या सनदा बहाल  करत त्याच्याभोवती गुलामगिरीचा फास आवळला जाऊ लागला.

एफ-१/१०५ ची कथा अगदी एका घरगुती प्रश्नापाशी सुरु होते नि लहान लहान तपशीलाची, प्रसंगांची जोड देत पाहता पाहता एक मोठा प्रश्न कवेत घेऊन उभी राहते. सागर नि मुमु हे शहरी बहुसांस्कृतिक वातावरणातील जोडपे. सागर मेट्रोसेक्शुअल म्हणतात तसा, स्वयंपाकाची अतिशय आवड असलेला नि घराचे स्वयंपाकघर ताब्यात घेऊन असलेला. मुमु बुद्धिमान, करियर करणारी स्त्री. जोडप्याचे परस्पर प्रेम जसे दिसते तसेच लग्न हा तडजोडीचा भाग असल्याचे भानही. आसपासचा समाज हा कॉस्मोपोलिटन. घरात काम करणार्‍या स्त्रीपासून, रंगकामाला येणार्‍या पेंटरपर्यंत आसपासचे लोक वेगवेगळ्या सामाजिक गटाचे. त्या अर्थी या समाजाचा एक असा चेहरा नाही... पण खरंच...? खरंच या समाजाला एक असा चेहरा नाही/नसतो?

प्रसंग साधा असतो. सागर नि मुमुचे घर रंगवायला काढले आहे. त्यासाठी मूळचा 'नॉर्थ'चा असलेला पेंटर आलेला आहे. सागर घरात नसल्याने मुमुशी त्याचे संभाषण होते. घराला देण्यासाठी सागरने रंग निवडला आहे 'हिरवा'. हे मुमुने सांगताच तो दचकतो आणि घरातील गणपतीच्या तसबिरीकडे पहात शंकित होऊन विचारतो 'क्या आप सचमुच घरमें हरा रंग लगाना चाहती हैं?' बस्स. घटना म्हटली तर एवढीच. पण घटनेपेक्षाही तिच्याकडे पाहण्याचे दृष्टीकोनच तिचे मूल्यमापन आणि परिणती ठरवतात याची सुरेख मांडणी लेखकाने पुढे केलेली आहे.

माणसाच्या जगण्याचे मुख्य आधार त्याची पंचेंद्रिये आणि त्या आधारे उमटणार्‍या रस, रंग नि गंध यांच्या जाणीवा. आहार या मूलभूत गरजेला रस नि चवीची जोड देत कौशल्याच्याच नव्हे तर पाक'कले'च्या टप्प्यापर्यंत पोचलेला माणूस! निसर्गातून दिसणार्‍या रंगांचा आस्वाद घेत असतानाच आपल्या निवासासाठी रंगांच्या निवडीने स्वातंत्र्य मागणारा. या दोन किमान पातळीवरही आपले स्वातंत्र्य आपण गमावतोय का या भीतीने गांजलेला माणूस! पण रंगांच्या निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आणि रंगांना फक्त दृष्टीचा आयाम असतो की आणखी काही गुणावगुणांचा, मूल्यांचा अवमूल्यांचाही? रंग हे निव्वळ रंग न म्हणून राहता त्यांची प्रतीके होऊन जातात तेव्हा मुमु सारख्या अगदी कॉस्मोपॉलिटन वातावरणातील स्त्रीच्याही मनात ती खोल रुजून बसतात. मुमूच्या बाबतीत केवळ पूर्वग्रहाच्या पातळीवर उरलेले हे प्रतीक, सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भात वेगळा 'रंग' घेऊन उभे राहते तेव्हा त्याचा व्यापक व्यवस्थेअंतर्गत एक व्यवस्था म्हणून सागर नि मुमूच्या कुटुंबाला/घरावर त्यातील व्यक्तींवर कसकसा परिणाम होतो याची एक शक्यता मांडून त्या आधारे आशुतोष पोतदार यांनी व्यापक अर्थाकडे अंगुलिनिर्देश करून ठेवला आहे.

पथनाट्याची शैली आज रंगभूमीवर येऊन बस्तान बसवू पाहते आहे. अलिकडेच 'अभिनय कल्याण' च्या 'लेझीम खेळणारी पोरं, 'नाटक कंपनी'च्या 'बिनकामाचे संवाद' मधेही या स्वरूपातील सादरीकरण पहायला मिळाले होते. दिग्दर्शक मोहित टाकळकरांनी एफ १/वन झिरो फाईवला त्याच बाजात सादर केले आहे. पार्श्वभूमीवर प्रसंगाला अनुरूप अशा स्टिल फोटो प्रोजेक्शन'चा अलिकडे बर्‍यापैकी बस्तान बसवलेला पर्याय निवडला आहे. मी पाहिलेला प्रयोग 'सुदर्शन' सारख्या लहान रंगमंचावर असल्याने प्रेक्षक मुख्य रंगमंचाच्या अगदी जवळ असल्याने आणि प्रोजेक्शन पार्श्वभूमीवरचा पूर्ण स्क्रीन व्यापणारे असल्याने ते काहीसे त्रासदायक झाले. मोठ्या रंगमंचावर कदाचित हे अधिक समर्पक ठरावे. अभिनयात आवर्जून उल्लेख करायचा तो मुमू झालेल्या मृण्मयी गोडबोलेचा. प्रसंगांतून येणारे विराम आणि त्यातील काही प्रसंगी अपेक्षित असलेली भावनिक आंदोलने, स्थिर स्थितीत केवळ चेहर्‍यावरील बदलत्या भावांतून दाखवणे दाद घेऊन गेले. बिहारी पेंटरच्या भूमिकेती रामकुमार तांगडेंची भूमिकाही चांगलीच लक्षात रहावी अशी. (यांना यापूर्वी 'शिवाजी अंडरग्राऊंड...' मधे पाहिले होते नि तेव्हाही त्यांचे काम दाद देण्याजोगे असल्याने चांगलेच लक्षात राहिले होते.)

शेवटी जाताजाता नाटकाच्या काहीशा विसंगत वाटणार्‍या नावाबाबत. एफ-१/१०५ हा सागर्/मुमुच्या फ्लॅटचा नंबर असावा असा होरा होता. पण तसा काही उल्लेख ऐकल्याचे आठवत नाही. जरी एफ-१ चा संदर्भ लागला नाही तरी त्यातला १०५ हा 'वयं पञ्चाधिकं शतं' कडे अंगुलिनिर्देश करणारा आहे का असा कुतूहलजनक प्रश्न पडला, कधीतरी लेखकाला विचारेन म्हणतो.

1 टिप्पणी:

  1. थॅंक्स जी. नाटकात फ़्लॅट नंबर आहे याचा उल्लेख आहे. डॉन पेंटर येतो तेंव्हा तो विचारतो हाच का तो फ़्लॅट. पण धन्यवाद या समीक्षेबद्दल.

    उत्तर द्याहटवा